पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
3 Sep 2018 - 7:05 pm

६: कांडा गावाहून परत

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक

१ डिसेंबर २०१७ ची पहाट. कांडा गावामध्ये लग्नाचं वातावरण आहे. रात्री उशीरापर्यंत नाच- गाणं सुरू होतं. पहाटे सगळे निघण्याच्या तयारीत आहेत. इथून वरातीची मंडळी जातील. पहाटे उजाडण्याच्या आधी अंधारात गावाचं आणखी वेगळं रूप दिसलं. चहा- नाश्ता घेऊन निघालो. आता परत कालचाच ट्रेक उलट्या दिशेने करायचा आहे. छोटासाच ट्रेक. पण एक- दोन ठिकाणी घसरण्याची शक्यता. काल येताना मुलीला बायकोने आणलं होतं. बराच वेळ तीही पायी चालली होती आणि नंतर कडेवर. ट्रेक तर मी आरामात करेन, पण अशा वाटेवर मुलीला कडेवर नेण्याचं साहस माझ्यात नाही! तिला इथल्याच एक ताई कडेवर नेतील असं ठरलं. मी थोडं सामान घेतलं. सकाळी दव जास्त असल्यामुळे घसरण्याची अजून जास्त शक्यता आहे. सोबत सगळेच लोक आहेत. एका जागी मंदीरात दर्शन घेऊन बाकीचे सगळे येतील. इथे कोणतंच वाहन येऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच पायी चालावं लागतं. जर सामान आणायचं असेल तर त्यासाठी घोडा असतो.

चालताना माझ्यासोबत छोटा भाचाही आहे. तो सद्गडला राहणारा असल्यामुळे चढाची त्याला सवय आहे. हळु हळु जात राहिलो. काल दुपारचं दृश्य वेगळं व आज सकाळची मजा वेगळी आहे! पर्वतात अजूनही झाडं मोठ्या संख्येने आहेत. सगळ्या पहाडी भागांचं हे मोठं वैभव आहे. भारतात जे वन क्षेत्र आहे, त्यामध्ये खूप मोठा वाटा पहाडी राज्यांचा आहे. उत्तराखण्डमध्ये जागोजागी ही गोष्ट जाणवत राहते. हे बघत बघतच वर चढत गेलो. रस्त्यापर्यंत पोहचण्याच्या थोडं आधी सोबत घेतलेल्या सामानामुळे थकायला झालं. भाच्यालाही त्रास झाला तेव्हा किंचित थांबून निघालो. लवकरच रस्त्यापर्यंत पोहचलो.


आता इथे काही अंतर पायी पायी चालेन. येण्याच्या आधी माझा विचार सायकल चालवायचा होता. सायकल मिळाली नाही. पण ती कसर आता रमणीय नजा-यांच्या ह्या रस्त्यावर पायी फिरून भरून काढेन. एकदम शांत पण अतिशय सुंदर रस्ता! अगदी आतल्या गावांना जोडत असल्यामुळे वाहतुक फारच कमी. इथून पुढे बुंगाछीनापर्यंत जीप चालतात. अगदी पावलोपावली न राहवून फोटो घेत जातोय, असे नजारे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पर्वतीय रौद्र सौंदर्याचे वेगवेगळे भाग दिसत आहेत! पायी पायी चालणंही इतकं रोमँटीक असू शकतं! एका जागी एक सायकलवालाही दिसला. कोणी वन कर्मचारी असावा व तो हातात सायकल घेऊन पायी पायी येत आहे. अशा चढाच्या रस्त्यांवर साध्या सायकलीचा एकच वापर- फक्त उतरताना जाण्यासाठी किंवा सामान असेल तर चढावावर लादून आणण्यासाठी.


अदूचे गाल अजूनही लाल झाले नाहीत!

पुढे जवळजवळ चार किलोमीटर चाललो. पहाड़ी रस्त्यावर फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. हा रस्ता कांडासारख्या इतरही अनेक गावांना जोडतो. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी वर डोंगरात जाणा-या पायवाटा आहेत. तिथले लोकही अधून मधून दिसत आहेत. अतिशय मस्त रस्ता व पदयात्रा झाली! सोबतचे लोक मागून जीपने येतील व मला रस्त्यावरून उचलतील. मी मुख्य रस्त्याला पोहचलो तेव्हा लगेचच जीप आली. इथून आता लोहाघाटपर्यंत जीपने प्रवास होईल. दुपारी लोहाघाटमध्ये लग्न समारंभ आहे. मी पहाड़ी लग्न असं पहिल्यांदाच बघेन. एक लग्न बघितलं होतं पण ते दिल्लीत झालं होतं. बूंगाछीनावरून सामान परत घेतलं व जीपने पुढे निघालो. पहाड़ात सगळे एकमेकांना ओळखतात, त्यामुळे एक प्रकारचं सोशल इंटीग्रेशन अजूनही दिसतं. सर्व समाज एका गावासारखा एकमेकांशी जोडलेला आहे.

काण्डा गावातून मुख्य रस्त्यापर्यंत सुमारे ६ किमी पायी फिरलो


क्रमश:

पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाटचा प्रवास

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रतिक्रिया

मार्गी जी फारच सुंदर. मला खरा इंटरेस्ट तुमची सोयरीक इतक्या दूर कशी झाली? लग्न कसे जमले व लग्नातील प्रसंग.तुम्हाला जावई म्हणून सहज स्वीकारलं गेलं का? तिकडील चालीरीती या सर्वावर आपण लिहावं ही अपेक्षा.

मार्गी's picture

5 Sep 2018 - 9:20 am | मार्गी

धन्यवाद!:) :) ही सोयरीक होण्यामागेही हिमालयच आहे! आशा माझ्या कॉलेजात होती! सुरुवातीला दोन्हीकडून विरोध होता; पण हळु हळु मावळला. ती उत्तराखंडची असली तरी महाराष्ट्रातच जन्मलेली व वाढलेली आहे. त्यामुळे तितका मोठा फरक असा नव्हता. :)

धन्यवाद, सासुरवाडीच्या चालीरीतींवर लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लेखमाला. तुमची वर्णनाची पद्धत आणि सुयोग्य फोटो यामुळे, तुमच्याबरोबर धापा टाकत चालतो आहे, असेच वाटत राहते. :)

दुर्गविहारी's picture

7 Sep 2018 - 1:17 pm | दुर्गविहारी

एरवी लोक सासुरवाडीला जायला टाळाटाळ करतात, तुम्ही उत्साहाने जात असणार. मस्तच लिहीताय. तुमची कथा "टु स्टेट" आहे तर. पु.भा.प्र.

सिरुसेरि's picture

7 Sep 2018 - 4:04 pm | सिरुसेरि

सुरेख फोटो आणी वर्णन .

हा भागही आवडला. फोटो सुंदर आलेत. आपण आवड म्हणून ट्रेकिंग करतो, पण तिथे तर त्याशिवाय पर्यायच नाही!

मार्गी's picture

10 Sep 2018 - 3:26 pm | मार्गी

सर्वांना पुनश्च धन्यवाद!

@ राम राम जी, चालीरितींबद्दल सांगायचं तर त्या संमिश्र आहेत. घरातली भाषाही शुद्ध कुमाऊनी नाही तर हिंदी- मराठी मिश्रित कुमाऊनी आहे, महाराष्ट्रात राहिल्यामुळे. आणि पिथौरागढ़ भाग म्हणाल तर अजून ब-याच अंधश्रद्धा आहेत; बाकी मागासलेपण आहे; पण नैसर्गिक श्रीमंतीही आहे. लोक फार साधे आहेत. आणि त्या अर्थाने मला चाली- रितींमधलं फार कळतही नाही. सो. :)