थाई फ्राईड राईस

स्वाती२'s picture
स्वाती२ in पाककृती
21 Oct 2009 - 10:39 pm

नेहमीच्या चायनिज फ्राईड राईस पेक्षा आमच्या घरी थाई फ्राईड राईस जास्त आवडतो. करायला सोपा आणि झणझणीत.

साहित्य
१ १/२ कप तांदुळ (थाई मिळाला तर उत्तम नसेल तर आपला नेहमीचा कोलम पण बासमती नको. )
२ टे. स्पून तेल+ १ टे. स्पून तेल
१ कांदा, चिरून
१ लाल ढब्बू मिरची चिरून (हिरवी चालेल)
२ बोनलेस स्कीनलेस चिकन ब्रेस्ट बारीक तुकडे करून
२-३ लसुण पाकळ्यांची पेस्ट ( मी नुसत्या बारीक चिरून घेते)
१ टे. स्पून रेड थाई करी पेस्ट(mae ploy ब्रँड छान आहे), झणझणीत हवे असेल तर जास्त वापरा.
करी पेस्ट घरी करणार असल्यास http://www.misalpav.com/node/9844
१/२ टी स्पून हळद
२ टे. स्पून फिश सॉस
२ अंडी फेटून
मीठ आणि मिरेपूड चवीप्रमाणे
बेसीलची पाने, बारीक चिरून (नसली तरी चालेल)

कृती

फ्राईड राईस साठी आवश्यक म्हणजे गार झालेला मोकळा भात. तेव्हा तांदूळ धुवून त्याचा मोकळा भात करून घ्यावा आणि ताटात गार होण्यासाठी पसरून ठेवावा.(मी शक्यतो सकाळी भात करुन संध्याकाळी वापरते म्हणजे भात परफेक्ट मोकळा झाला नाही तरी चालतो)

वॉक किवा मोठी कढई गॅसवर तापत ठेवावी. चांगली तापली की त्यात २ टे. स्पून तेल घालावे. जरा कढईत तेल पसरवून घ्यावे. कांदा आणि ढब्बू मिरचीचे तुकडे टाकून १-२ मिनिटे परतावे. चिकनचे तुकडे, लसूण, करी पेस्ट, हळद घालून २-३ मिनिटे परतावे. आचमध्यम करून गार झालेला भात, फिश सॉस घालावा आणि भात गरम होईपर्यंत परतावे, चवी प्रमाणे मीठ आणि मीरेपूड घालावी. भातामधे मधोमध खड्डा करून १ टे. स्पून तेल घालावे. गरम झाले की त्यात फेटलेली अंडी घालून १-२ मिनिटे शिजवावी. लगेच भातात मिसळून घेऊन भात २-३ मिनिटे परतावा. असल्यास वरुन बेसिलची पाने घालावीत.

बोनलेस चिकन ऐवजी कोलंबी घालू्नही हा भात करता येतो. या भातात ब्रोकोली, बेबी कॉर्न, अ‍ॅस्परॅगस पण छान लागते.

प्रतिक्रिया

शेखर's picture

21 Oct 2009 - 10:47 pm | शेखर

ह्याच आठवड्यात खाल्ला... त्यामुळे चित्र व पाकृ बघुन जास्त त्रास झाला नाही.

शेखर..

प्रभो's picture

21 Oct 2009 - 10:53 pm | प्रभो

जबहरा.....माझ्या आवडत्या डिश पैकी एक....मस्तच

--प्रभो

विंजिनेर's picture

22 Oct 2009 - 5:45 am | विंजिनेर

थाई करी पेस्ट

ह्याची एखादी घरगुती पाकृ आहे का?

स्वाती२'s picture

22 Oct 2009 - 6:06 am | स्वाती२

माझ्याकडे आहे. उद्या टाकेन पाकृ.

सुबक ठेंगणी's picture

22 Oct 2009 - 7:53 am | सुबक ठेंगणी

थायलंडमधे खाल्लेली थाई करी एवढी आवडली नव्हती. पण तीच थाई करी जपानमधे खाल्ली तेव्हा आवडली. आता इथे बघते थाई करी पेस्ट मिळते का ते आणि नक्की करून पहाते थाई फोभा. थाई करी पेस्टची रेश्पे मिळाली तर उत्तमच!
फिश सॉसही मी कधी वापरून पाहिलेला नाही आणि मिळतो की नाही हेही माहित नाही. पण जर नाहीच मिळाला तर फिश स्टॉकमधे भात शिजवला तरी चालू शकेल का?

स्वाती२'s picture

22 Oct 2009 - 5:22 pm | स्वाती२

फिश सॉस (nam plaa)जपान मधे मिळू शकेल. salty चव असते. clear, थोडं brownish liquid असतं. anchovies पासून बनवलेलं असतं. फिश स्टॉक ती टिपिकल चव नाही देणार.
थाई करी पेस्टची पाकृ टाकलेय.

गणपा's picture

22 Oct 2009 - 12:57 pm | गणपा

मस्त गं स्वातीबेन.
फिश सॉस मिळतो ईथे. थाई करी पेस्टचा शोध घ्यावा लागेल.
(झंझणीत थाईफुडचा चाहता) गणपा