आनंदी आनंद गडे.. (कथा)

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
30 Aug 2009 - 1:01 am

( बरीच पूर्वी लिहिलेली आणि मोबाईल एसएमएस फार जास्त वापरात आलेले नव्हते, त्या काळातली गोष्ट... पाच पत्रांची... बरेच योगायोग वगैरे गृहित धरावे लागतील , पण वाचा)

**********

मनीष
दिनांक १२ नोव्हेंबर २०००

ती.सौ. आईस,
सा.नमस्कार.

पत्र लिहायचा इतका कंटाळा येत असूनही तुला शब्द दिलाय म्हणून लिहितोय. (खरंतर तुझी धमकीच याला कारण, की तू पत्र लिहिलं नहीस तर आम्ही पण लिहिणार नाही). आता एवढे फोन आहेत ना, तरी?)

दिल्लीला येऊन आज तीन महिने सात दिवस झाले आहेत. घरी यायला फ़क्त २१ दिवस उरले आहेत. (कोण कोण ते म्हणतंय तिकडे की होमसिक झालाय, होमसिक झालाय .. अजिबात नाही.) .. सारखी आठवण येते घरची आणि कॅलेंडर आणि तुमची पत्रं ,फोटो पाहण्यात भरपूर वेळ जातो, ;) बाकी काही नाही... होमसिक वगैरे तर मी अजिबातच नाही...

सध्या पहाडगंजमध्ये राहतो. जागा फ़ारशी देखणी नाही. ( खरंतर एरिआही फ़ारसा बरा नाही, बकाल आहे पण चालवून घ्यायला पाहिजे) .. पुढल्या महिन्यात मी आणि कंपनीतला अजून एक मित्र (प्रसन्नजीत) मिळून बरी जागा मिळवणार आहोत. जेवण व्यवस्थित चालू आहे. काल तिकडून आणलेली तुपाची मोठी बरणी संपली. (सुरुवातीला नाही नाही म्हणत मी चांगलं तूप हाणलं एकूण)... मी उंच आहे हा भ्रम इकडे आल्यावर संपुष्टात आला. मी कंपनीतला सर्वांत बुटका इन्जिनियर आहे.

दिल्ली भारी आहे पण पुण्याची फ़ार आठवण येते. विशेषत: नाटकं पर्वती आणि मित्रमंडळी. (प्रसन्नजीतसुद्धा कोलकात्याच्या आठवणीत असेच उसासे टाकत बसलेला अस्तो.).. आणि यावेळी तर दिवाळी इथंच काढावी लागली. बाहेर अनेक वर्षं राहिलो पण दिवाळी नेहमी घरीच व्हायची. इतक्या दूरच्या ठिकाणी घरच्यांविना दिवाळी काढायची पहिलीच वेळ... (गेल्या वर्षीची संजीव अभ्यंकराची दिवाळी पहाट मैफ़ल अजून आठवतेय. मग काकांनी घरी म्हटलेली मदनमोहनची गाणी.. आणि रात्री फ़क्त शोभेचे फटाके.. दिवाळी म्हणजे एकदम बेष्ट सण आहे. असो..)

इकडे महाराष्ट्र मंडळाच्या मीटिंगला गेलो होतो एकदा. बाबांची लांबची ओळख निघाली. बाबा नागपूरला होते तेव्हाची. आडनाव आठवत नाही, चिमणे की असंच काहीतरी होतं. तिकडे अनेक हुशार आणि ( अर्थात थोडे चक्रम) लोक भेटले. त्याबद्दल आल्यावरच डीटेलमध्ये सांगेन.एकूण मजा आली. तुझे चायनीज कूकिंग क्लास जोरात सुरू आहेत असे ऐकले. ( गेलो तेव्हा नुकतेच सुरू झाले होते ना..).. आसपासच्या अनेक आयाबहिणी आपापल्या नवर्‍यांना आणि पोराबाळांना चॉपस्युई, मान्चॉव वगैरे खायला घालून तृप्त करणार तर... आणि बॉन्सॉयचे प्रयोग यशस्वी होताहेत का? आणि मानसीला सांग की पुरुषोत्तम स्पर्धा संपून आता दोन महिने उलटून गेले. आता अभ्यास केला तरी चालेल. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखिकेचं बक्षीस किती काळ पुरणार? (ती मान्य करत नाही पण गेल्या वर्षी मीच सांगितलेली थीम तिनं डेव्हलप केली की नाही हे परत विचार तिला.) बाबांनी जिम सोडून घरीच योगा सुरू केलंय असं ऐकलं फोनवर.. मात्र जपून चालूद्यात म्हणावं, अतिउत्साह वाईट...

आता महत्त्वाचं. तू गेल्या पत्रात समजावलेलं सगळं पटलंय मला. आता फ़ारसा चक्रमपणा न करता मी सगळ्यांचं ऐकेन. पण आल्यावर लगेच कुठेही मुलगी पहायच्या कार्यक्रमाला मी येणार नाही हे नक्की. मला ते एकदम चक्रम वाटतं. सून शोधायच्या बाबतीत तुझा ऍन्टेना कायम ऑन असतो. उगाच आधीच मनात काहीही ठरवून ठेवू नकोस. मग ऐकत नाही म्हणतेस...

Please give me some more time...

ती. बाबांना सा.न. आणि चि.मानसीला अनेक आशीर्वाद.

तुझा,
मनीष.

**********

सौ. देशपांडे
दिनांक २९ नोव्हेंबर २०००

चि. नेहास,
अ. आशीर्वाद.

हे पत्र तुला मुद्दामच कॉलेजच्या पत्त्यावर लिहिते आहे... तू आता सुट्टीत चायनीज शिकायला येत होतीस तेव्हाच तुझी चौकशी करायचं ठरवलं होतं... तुझ्या मामांकडून सगळी माहिती मिळवली. पण तू अचानकच परत गेलीस, मला वाटलं राहणार आहेस. असो.. तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे.... (अर्थात तुझ्या मामांकडे प्राथमिक चौकशी केली आहे मी... आणि थोडक्यात सांगायचं तर मनीषसाठी तू सून म्हणून मला पसंत आहेस ).. मानसीनं दाखवलेला मनीषच्या फोटोंचा आल्बम सगळा तू पाहिला आहेसच....

आता असं कॉलेजवर काय पत्र पाठवायचं, असं तुला वाटेल...पण घरी उगाच पत्र पाठवायच्या ऐवजी थेट तुलाच विचारलेलं आणि तुझ्याशी बोललेलं बरं, असं मला वाटतं... तुझं उत्तर काहीही असलं तरी तुला पत्र मिळालं की प्लीज , मागे दिलेल्या फोन नंबरवरती दुपारी दोन ते तीन या वेळात फोन कर....

वाट पाहत आहे.

सौ.देशपांडे

**********

नेहा

Dear Manish,

I hope you receive this e mail in time... मी तुझ्या घरी जाऊन आले. ठरवून नव्हते गेले. मी तर मामा मामींकडे सुट्टीला गेले होते आठवडाभर... मामी म्हटली , जा चायनीज पदार्थ शिकायला.. मीही म्हटलं हा बराय टाईमपास. Can you imagine काय झालंय ते? तुझ्या आईनं मला डायरेक्ट पसंतच करून टाकलंय. :) आता त्यांना काय माहित की आपण तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतो ते? मी तुझ्या आईशी फोनवर बोलले... (तुझ्या चक्रमपणाला घरात चांगलं टरकून आहेत... "मी ते मुली पहायला जाणार नाही" असलं तू निक्षून सांगितलंयस म्हणे. म्हणून तुझी आई म्हणत होती की तू आल्यावर ती आपली भेट घडवून आणेल. ... :) आणि तुला न सांगता... चुकून भेट घडवून आणणार आहे ती आपली... मी सगळ्याला हो हो म्हणत गेले... (पण खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. माझी आई पत्रिका बघते, म्हणजे तिला त्यातलं चांगलं कळतं. तुझी आणि माझी पत्रिका फ़ारशी जुळत नाही असं मी दुसरीकडून कन्फ़र्म केलंय. तुझ्या आईबाबांना मी हे सांगू शकत नाही... आता तुझी खरी जन्मपत्रिका तुझे आई-वडील आमच्याकडे पाठवणार ... मग ती आई जुळवून पाहणार आणि पुढे आपली पुष्कळ एनर्जी त्यांच्याशी भांडण्यात खर्च होणार.... यापेक्षा काही वेगळा मार्ग काढता येतो का बघ...

(फक्त मनीषची आणि माझी भेट होईपर्यंत तुम्ही पुढे माझ्या घरी कळवू नका असं सांगून मी त्यांना थोपवलंय.).. बाकी तू बघ.

तुझी,
नेहा.

**********

श्री. देशपांडे
दिनांक ४ डिसेंबर २०००

श्री.अशोक महाजन यांना,

आपली ज्येष्ठ कन्या चि.नेहा हिचे स्थळ समजले. आपले फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे ही पत्रिका, मुलाची माहिती आणि फोटो पाठवून देत आहोत. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.

धन्यवाद.
श्री.अनिरुद्ध देशपांडे

**********

अशोक महाजन
दिनांक १५ डिसेंबर २०००.

प्रिय मित्र अन्या,

तुझा ऑफ़िसचा फोन लागत नाही रे नीट. लागला तर तू बाहेर असतोस. म्हणून चक्क ऑफ़िसवर पत्र लिहितोय. साखरपुडा झकास पार पडला. ठरल्याप्रमाणे सगळं नीट झालं...

"पत्रिका जुळली का?" असं नेहा बर्‍याच वेळा विचारत राहिली. आता या सार्‍यामागं तूच पडद्यामागचा कलाकार आहेस हे सार्‍यांना कशाला कळायला हवंय? बाकी तू ठरवल्याप्रमाणेच गोष्टी घडत गेल्या.

पण हिच्या वहिनीला सांगून आमच्या पोरीला तुझ्याकडं चायनीजच्या क्लासला पाठवायची अक्कल माझी बरंका. सहा-सात वर्षांनी भेटलो असू परवा. मुलाच्या बापाची ऍक्टिंग बरी करत होतास. एक दोन वेळा मीच सावरून घेतलं ... आता जुनी दोस्ती नात्यात बदलणार, जरा वेगळं वाटतंय... but that should not change our friendship, नाही का?

काय साली गंमत आहे ना? पोरांना वाटतंय, कोणाच्या बापाला न कळू देता आपण लव्ह मॅरेज करतोय.त्यांना आनंद. आमच्या हिला पत्रिका अगदी व्यवस्थित जुळली म्हणून आनंद. सौ.देशपांड्यांना आपण स्वत: मुलगी पसंत केल्याचा आनंद. आणि सगळ्यांना आनंद म्हणून आपल्या दोघांना अत्यानंद. आता हा अत्यानंद दिल्या वचनाला जागून तू एक झकास पार्टी देऊन साजरा करणार असशील तर मला परमानंद होईल हे ध्यानात असूदे. ;)

तुझा मित्र ,
अशोक महाजन.

कथा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Aug 2009 - 2:03 am | मदनबाण

मस्त कथा... :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

विंजिनेर's picture

30 Aug 2009 - 7:22 am | विंजिनेर

छोटीशी पण छान कथा.. तुटकपणा घालवण्यासाठी, जरा अजून २-४ पत्रे चालली असती.

जाता जाता: फारा वर्षांपूर्वी, ग्रंथाली प्रकाशनाचे असेच एक पुस्तक वाचले होते. त्यात ३ (की ४?) मित्रांची कथा होती. एक डॉक्टर, एक इंजिनयर आणि एक समाजसेवक. त्यांची गोष्ट अशीच एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून उलगडत जाते. कुणाला आठवतेय का ते पुस्तक?

यशोधरा's picture

30 Aug 2009 - 8:38 am | यशोधरा

छान आहे गोष्ट.

संजय अभ्यंकर's picture

30 Aug 2009 - 8:48 am | संजय अभ्यंकर

भारी कथा!
कशा काय आयडीया सुचतात हो तुम्हाला?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दशानन's picture

30 Aug 2009 - 10:16 am | दशानन

=))

हा हा हा !

लै भारी !

मज्जा आली वाचताना !

स्वाती दिनेश's picture

30 Aug 2009 - 11:01 am | स्वाती दिनेश

पत्रातून उलगडत गेलेली गोष्ट छान आहे,
स्वाती

अवलिया's picture

30 Aug 2009 - 11:08 am | अवलिया

मस्त... मजा आली !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दिपाली पाटिल's picture

30 Aug 2009 - 11:18 am | दिपाली पाटिल

मजा आली पत्रं वाचुन...वेगळ्याप्रकारे लिहीलेली कथा आवडली.

दिपाली :)

पाषाणभेद's picture

30 Aug 2009 - 11:54 am | पाषाणभेद

कहानी मे ट्विस्ट!
मस्त कथा आहे.

रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2009 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पत्रापत्री आवडली.
पत्राच्या शेवटी ता.क. दिसले नाही.

-दिलीप बिरुटे

[अभिनेत्यांना शिक्षण,वाचन,लेखन आणि अभिनय कंपलसरी केला पाहिजे- प्रा.डॉ.]

श्रावण मोडक's picture

30 Aug 2009 - 12:40 pm | श्रावण मोडक

'चोरांवर मोर' कथा. भारी. पार्टीत संवाद कसा झाला असेल?

सुबक ठेंगणी's picture

30 Aug 2009 - 1:09 pm | सुबक ठेंगणी

प्रत्यक्ष संवादापेक्षा पत्रांची आयडिया छान.

मन's picture

30 Aug 2009 - 3:08 pm | मन

मस्त कथा.
आणि लेखनाचा हा नवा "फॉर्म्याट" पण सहि!
मस्तच लिहिलत मास्तर.

आपलाच,
मनोबा

दत्ता काळे's picture

30 Aug 2009 - 3:54 pm | दत्ता काळे

पोरांना वाटतंय, कोणाच्या बापाला न कळू देता आपण लव्ह मॅरेज करतोय.त्यांना आनंद. आमच्या हिला पत्रिका अगदी व्यवस्थित जुळली म्हणून आनंद. सौ.देशपांड्यांना आपण स्वत: मुलगी पसंत केल्याचा आनंद. आणि सगळ्यांना आनंद म्हणून आपल्या दोघांना अत्यानंद.

हा ! हा ! हा !

अभिज्ञ's picture

31 Aug 2009 - 10:25 am | अभिज्ञ

जबरी.

मास्तर हा प्लॉट लै भारी.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

घाटावरचे भट's picture

31 Aug 2009 - 10:53 am | घाटावरचे भट

अशाच थीमवर गरवारे कॉलेजचं फिरोदिया करंडकाचं नाटक होतं. साल २००५ बहुधा. गरवारेला करंडक होता. नाटकाचं नाव आठवत नाही. बाकी कथा उत्तमच.

झकासराव's picture

31 Aug 2009 - 11:28 am | झकासराव

:))
मजा आली. बाप खरच बाप होते.

प्रमोद देव's picture

31 Aug 2009 - 11:33 am | प्रमोद देव

आवडलं! :)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

कपिल काळे's picture

31 Aug 2009 - 11:39 am | कपिल काळे

मस्त !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2009 - 6:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झक्कास मास्तर ...

एक कुशंका: इ.स. २००० मधे इमोटीकॉन्स एवढे बोकाळले होते का की दोन मित्र पत्रांमधे डोळा मारतील? ;-)

अदिती

प्रभो's picture

31 Aug 2009 - 7:13 pm | प्रभो

मस्त लिहिलय हो.....आवडली बुआ आपल्याला पत्रापत्री..

ऋषिकेश's picture

31 Aug 2009 - 7:38 pm | ऋषिकेश

वा वा वा,.. कथेची चतुर मांडणी
आणि चोरावर मोर.. त्यावर चोर त्यावर मोर.. अशी दहिहंडी ;) मस्त जमलीए

कथा आणि वापरलेला फॉर्मॅट खूप आवडला.. अजून येऊ दे!

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ३७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "गोलमाल है भाई सब गोलमाल है!...."

छोटा डॉन's picture

8 Sep 2009 - 12:53 pm | छोटा डॉन

बर्‍याच उशीराने वाचली.

कथा आणि सादरीकरणाचा फॉर्मॅट आवडला, बर्‍यापैकी जवळची वाटली कथा, पत्र्-पत्रोत्तरे ह्यामुळे मज्जा आली ...
वर भटोबा म्हणातात तसे ह्यावर बेतलेले एक नाटक २००५ साल्ली नक्की पाहण्यात आले होते, पुरुषोत्तम की फिरोदिया ते नक्की आठवत नाही.

उत्तम, असेच अजुन येऊद्यात.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

धनंजय's picture

8 Sep 2009 - 7:32 pm | धनंजय

मस्तच जमली आहे.

(पूर्वी "एपिस्टोलरी स्टाईल" म्हणून पत्रापत्रांत बसवलेल्या पूर्ण कादंबर्‍या लिहिण्याची पद्धत होती म्हणे!)

भडकमकर मास्तर's picture

9 Sep 2009 - 11:36 pm | भडकमकर मास्तर

वाचून प्रतिसाद दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांना धन्यवाद...
..
२००५ च्या फिरोदियात / पुरुषोत्तममध्ये अशी कथा / एकांकिका झाली हे वाचून आनंद वाटला...
( मी ही कथा २००२ मध्ये लिहिली होती... एकांकिका करायचे मात्र राहून गेले.).

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अमित खोजे's picture

25 Feb 2014 - 2:29 am | अमित खोजे

सुंदर कथा. छानच होता प्लॉट

इनिगोय's picture

26 Feb 2014 - 10:52 am | इनिगोय

खोजकार्य के लिये धन्यवाद :-)

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 3:47 am | स्पंदना

सुरेख कथा आहे.
मजा आली.

बॅटमॅन's picture

25 Feb 2014 - 1:18 pm | बॅटमॅन

जबरी कथा =))

"आखिर बाप बाप होता है और बेटा बेटा होता है" या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण आली.

माधुरी विनायक's picture

25 Feb 2014 - 2:54 pm | माधुरी विनायक

कथा आवडली. साधारण अशाच प्रकारचं एक पुस्तक ( कादंबरी) काही वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्याची आठवण झाली. मात्र त्यात पत्राऐवजी दूरध्वनीवरचं संभाषण होतं. संपूर्ण कादंबरी केवळ दूरध्वनीवरचे संवाद... नाव - साक्षीदार, लेखन - निलिमा आळतेकर...