समर्पण

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
21 Jul 2009 - 9:15 pm

समर्पणाची आस उराशी, आतुर सरिता आली धावत
ऐकशील का कधी सागरा अंतरिचा हा नाद अनाहत?

लाटांचे हे तांडव आवर, या बेभान मनाला सावर
व्यापुन राही कणाकणाला, तुझ्या भेटिची ओढ अनावर

पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन
उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन

कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल
स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल

एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर
सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Jul 2009 - 9:22 pm | प्राजु

पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन
उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन

एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर
सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

या कडव्यांचं कौतुक करायला शब्द नाहीयेत.
नदीचे असे मनोगत.. अफाट!! :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठमोळा's picture

26 Jul 2009 - 7:44 pm | मराठमोळा

या कडव्यांचं कौतुक करायला शब्द नाहीयेत.
नदीचे असे मनोगत.. अफाट!!

+१ सहमत आहे. अप्रतिम काव्य..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

बेसनलाडू's picture

22 Jul 2009 - 9:11 am | बेसनलाडू

नदीच्या नादासारखी, प्रवाहासारखी लयबद्ध, प्रवाही कविता खूप आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

22 Jul 2009 - 9:25 am | ऋषिकेश

वा वा वा!!
काय बोलू.. वाहून गेलो कवितेत इतकंच म्हणेन.. मस्त.. भावनांनी सजलेली लयबद्ध रचना

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विसोबा खेचर's picture

22 Jul 2009 - 9:26 am | विसोबा खेचर

सुरेख...!

(फ्यॅन) तात्या.

पाषाणभेद's picture

22 Jul 2009 - 9:41 am | पाषाणभेद

"कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल
स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल"

वरील ओळी तर छानच.

मला आपल्या बर्‍याच कवितांचा अर्थ हा बीं. च्या सारख्या जाणवणार्‍या दुसर्‍या अर्थाच्या (द्वैत -अद्वैत) वाटतात.

असली कवीता करतांना कवीच्या मनात काय असते यावर कवयत्रीने जास्त भाष्य करावे ही अपेक्षा.

मी जर शालेय मराठी पाठ्यपुस्तक तयार करणार्‍या कमिटीत असतो तर आपल्या सगळ्या कविता त्यात समाविष्ठ केल्या असत्या.

झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

क्रान्ति's picture

22 Jul 2009 - 8:06 pm | क्रान्ति

बाबतीत तर आपल्या जाणवणार्‍या दुसर्‍या अर्थाच्या (द्वैत -अद्वैत) या विचाराशी मी १००% सहमत आहे. प्राजु म्हणते त्याप्रमाणे हे नदीचे मनोगत तर आहेच, तो रूढार्थ झाला. पण नदीचे रूपक घेऊन आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास हा कवितेचा गूढार्थ आहे.
आयुष्य नदीसारखं उगमापासून वेगवेगळ्या चढउतारांतून जात असताना एक वेळ अशी येते, की नको हे सारं, आता विश्रांती हवी असे विचार मनात येतात. पण ते वैतागाचे किंवा उद्वेगाचे नसतात. अशाच काहीशा विचारातून ही नदी उगम पावली.
[अवांतरः- मी खूप काहीतरी जडजंबाल तत्वज्ञान लिहिलं वाटतं! ]:?

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

सुबक ठेंगणी's picture

22 Jul 2009 - 4:01 pm | सुबक ठेंगणी

इतकी सुंदर ओघवती झालिये कविता!
शेवटच्या ओळीतला अंतर आणि निरंतर ह्या शब्दाचा प्रयोग खूप आवडला.
निरंतर= स्वतःचं वेगळं मन नसलेली असा अर्थ घेतला तर समर्पणाची भावना अगदी अधोरेखित होऊन मस्त परिणाम साधतोय!

घाटावरचे भट's picture

22 Jul 2009 - 4:37 pm | घाटावरचे भट

खूपच छान.

दत्ता काळे's picture

22 Jul 2009 - 6:15 pm | दत्ता काळे

कधि बांधांच्या चाको-यातुन

- हे फार आवडलं

शाल्मली's picture

22 Jul 2009 - 6:39 pm | शाल्मली

एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर
सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

खूपच छान!

--शाल्मली.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2009 - 8:40 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम सुं द र अ प्र ती म !!

कसे काय सुचते ग तुला हे असले सगळे ??

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य