अमेरिकेतील राज्यपध्दती

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
11 May 2009 - 1:47 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

लवकरच भारतात १५ व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल आणि नवे सरकार कोणाचे हे ठरेल.मतमोजणीला पाच दिवस राहिले आहेत आणि आपल्यापैकी सगळ्यांनाच भारतातील राजकिय व्यवस्था कशी असते याविषयी माहिती आहेच.या लेखातून अमेरिकेतील राजकिय व्यवस्था कशी आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न राहिल.खरे म्हणजे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी हा लेख लिहिणे अधिक योग्य ठरले असते पण त्यावेळी मी परीक्षांमध्ये बुडून गेलो होतो आणि हा लेख लिहायला तेव्हा अजिबात वेळ नव्हता.भारतात मतमोजणी सुरू होत आहे तोपर्यंत अमेरिकेतील राज्यव्यवस्थेची माहिती करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे.

भारत आणि इंग्लंड प्रमाणे अमेरिकेतही संसदेची दोन सभागृहे असतात.अमेरिकन संसदेला ’काँग्रेस’ म्हणतात आणि काँग्रेसची दोन सभागृहे आहेत-- हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हज (कनिष्ठ सभागृह) आणि सीनेट (वरीष्ठ सभागृह). पण भारतीय-ब्रिटिश आणि अमेरिकन पध्दतीत एक महत्वाचा फरक आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये संसदेच्या कनिष्ठ सभागृहास (लोकसभा आणि हाऊस ऑफ कॉमन्स) अधिक अधिकार आहेत.तर अमेरिकेत वरीष्ठ सीनेटला अधिक अधिकार आहेत.

हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हज चे एकूण ४३५ सदस्य तर सीनेटचे १०० सदस्य असतात.हाऊसमध्ये राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक राज्याचे खासदार असतात.उदाहरणार्थ कॅलिफोर्निया या अमेरिकेतील सगळ्यात जास्त लोकसंख्येच्या राज्याच्या हाऊसमध्ये ५३ तर फोरिडामध्ये २५ तर मोन्टानामध्ये अवघी एक जागा हाऊसमध्ये आहे.सीनेटमध्ये प्रत्येक राज्याच्या दोन जागा असतात.म्हणजे राज्याची लोकसंख्या कितीही असली तरी सीनेटमध्ये दोनच जागा असतात. कॅलिफोर्नियाचे आणि मोन्टानाचे प्रतिनिधित्व सीनेटमध्ये करणारे दोनच सीनेटर्स असतात.

हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हज चा कार्यकाल अत्यंत कमी म्हणजे दोन वर्षे असतो.त्यातही खरी पावणेदोनच वर्षे हाऊसला खर्‍या अर्थाने मिळतात. याचे कारण हाऊसच्या निवडणुका दर सम वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या मंगळवारी होतात.ही तारीख ठरलेली आहे.त्यात कधीही बदल होत नाही.आणि निवडून आलेल्या हाऊसचा कार्यकाल निवडणुका झाल्यानंतरच्या वर्षीच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो.म्हणजेच नोव्हेंबर २००८ मध्ये निवडून आलेल्या हाऊसचा कार्यकाल जानेवारी २००९ मध्ये सुरू झाला.आणि परत नोव्हेंबर २०१० मध्ये निवडणुका होतील.म्हणजे खर्‍या अर्थाने हाऊसला २० महिन्यांचाच कालावधी हक्काने मिळतो.हाऊसच्या सदस्यांची निवड लोकांकडून भारतातल्या पध्दतीप्रमाणेच होते. मात्र भारतात आणि इंग्लंडमध्ये पंतप्रधानाला वेळेपूर्वी लोकसभा/हाऊस ऑफ कॉमन्स बरखास्त करून निवडणुका घ्यायचा अधिकार आहे तसा अधिकार अमेरिकेत अध्यक्षांना नाही.निवडणुका ठरलेल्या मंगळवारीच होतात त्यात कोणताही बदल होत नाही.

सीनेटच्या प्रत्येक सभासदाचा कार्यकाल ६ वर्षे असतो.सीनेटचे एक तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष सीनेटचे पदसिध्द अध्यक्ष असतात.या अर्थी सीनेट आणि भारतातील राज्यसभा यात साम्य आहे.पण भारतातील राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात.पण अमेरिकेत सीनेटर्ससुध्दा लोकांकडून निवडले जातात.त्यामुळे हाऊसच्या सदस्यांप्रमाणेच सीनेटर्सही स्वत:ला लोकांचे प्रतिनिधी म्हणवू शकतात.

राज्याचे दोन सीनेटर एकाच वेळी पूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करतात.म्हणजे एक सीनेटर राज्याच्या अर्ध्या भागातून निवडून येतो आणि दुसरा उरलेल्या अर्ध्या भागातून निवडून येतो असे होत नाही.राज्याचे दोन्ही सीनेटर एकाच वेळी निवृत्त होत नाहीत.दर दोन वर्षांनी हाऊसच्या निवडणुकीबरोबरच निवृत्त होत असलेल्या सीनेटर्सच्या जागा भरायलाही निवडणुका होतात.

कोणत्याही कायद्याला काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाची मान्यता लागते.कायदा पास करायची पध्दत अमेरिकेत भारतातल्यापेक्षा थोडी वेगळी आहे.भारतात बहुतांश कायद्यांची विधेयके सरकार संसदेत आणते.खासदारही स्वतंत्रपणे विधेयके आणू शकतात पण पक्षीय राजकारणामुळे स्वतंत्र विधेयके मंजूर व्हायचे प्रमाण कमी असते.तेव्हा अमेरिकेत विधेयके हाऊस किंवा सीनेटचे एक किंवा अनेक सदस्य मांडतात.त्यावर सभागृहात चर्चा होते,गरज पडल्यास समित्यांकडे ते विधेयक पाठवले जाते.इतर सदस्य त्यांच्या सुधारणा सुचवतात.त्या सुधारणा मंजूर करायचा किंवा फेटाळायचा अधिकार अर्थातच सभागृहाचा असतो.विधेयक मंजूर झाल्यावर ते दुसर्‍या सभागृहाकडे पाठवले जाते.त्या सभागृहातही हीच प्रक्रिया परत पार पाडली जाते. जर हाऊस आणि सीनेटने मंजूर केलेल्या विधेयकाच्या मसुद्यात फरक असेल तर सीनेट आणि हाऊसच्या ’कॉन्फरन्स कमिटी’ मध्ये त्यावर चर्चा होऊन एकाच मसुद्याला मंजुरी द्यावी लागते आणि हा मसुदा परत दोन्ही सभागृहांकडून मंजूर करून घ्यावा लागतो.सामान्यत: कायद्याची विधेयके कोणत्याही सभागृहात मांडली जाऊ शकतात.पण अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे महसूलाशी संबंधित विधेयके (नवे कर लावणे वगैरे) प्रथम हाऊसमध्येच मांडावी लागतात.

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक अध्यक्षांच्या सहीसाठी पाठवले जाते.अध्यक्ष ते विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर करू शकतात किंवा आपल्या सुधारणांसह काँग्रेसकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात किंवा फेटाळून लावू शकतात. संसदेने पास केलेले विधेयक फेटाळून लावायच्या अध्यक्षांच्या अधिकाराला ’व्हेटो’ म्हणतात.भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकावर सही करायला राष्ट्रपतींपुढे कोणतीही कालमर्यादा नाही.पण अमेरिकेत दहा दिवसांत अशा विधेयकावर अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही तर ते विधेयक आपोआप कायद्यात रुपांतरीत होते.मात्र या दहा दिवसांच्या नियमाला एक अपवाद आहे.त्या दहा दिवसात जर संसदेचे अधिवेशन संपले तर मात्र विधेयकाचे रुपांतर कायद्यात होत नाही.त्या परिस्थितीत ते विधेयक lapse होते.अनेकदा महत्वाची विधेयके संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटी मंजूर केली जातात कारण त्यापूर्वी त्यावर चर्चा चालू असते.अशा परिस्थितीत अध्यक्ष त्यांना नको असलेल्या विधेयकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतात.त्यांनी ते फेटाळून लावले नाही तरी दहा दिवसांच्या आत संसदेचे अधिवेशन संपल्यामुळे ते विधेयक आपोआप lapse होते.यास अध्यक्षांचा ’पॉकेट व्हेटो’ म्हणतात. अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज बुश वरीष्ठ यांनी पॉकेट व्हेटोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता.

सीनेट या सभागृहाच्या सदस्यांकडे हाऊसच्या सदस्यांपेक्षा जास्त कार्यकाल तर असतोच पण त्यांच्याकडे नसलेले काही विशेष अधिकारही असतात.अध्यक्षांनी नेमलेल्या कोणत्याही व्यक्तीची नेमणूक सीनेटकडून मंजूर करून घ्यावी लागते.म्हणजे अध्यक्ष ओबामांनी परराष्ट्रमंत्री म्हणून हिलरी क्लिंटन यांना नेमले.ती नेमणूक सीनेटकडून मंजूर करून घ्यावी लागते.अशा वेळी सीनेटची संबंधित समिती (या उदाहरणात सीनेटची परराष्ट्रसंबंध समिती) संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारून ज्या खात्यामध्ये त्या व्यक्तीची नेमणूक केली जात आहे त्या खात्याविषयी त्या व्यक्तीस आवश्यक ज्ञान आहे की नाही हे बघते.उत्तरे समाधानकारक वाटल्यास समिती सीनेटकडे अध्यक्षांनी केलेल्या नेमणूकीला मंजूरी द्यावी अशी शिफारस करते आणि नंतर ती एक औपचारिकता असते.

सीनेटच्या सदस्यांना असलेला दुसरा विशेष अधिकार म्हणजे अध्यक्षांनी परराष्ट्राबरोबर (एका किंवा अनेक) केलेल्या कोणत्याही कराराला मान्यता देणे! सीनेटने एखादा करार फेटाळला तर अमेरिकेला त्या कराराची अंमलबजावणी करता येत नाही.अध्यक्ष बुश यांनी भारताबरोबर केलेला अणुकरार सीनेटकडून मंजूर करून घ्यावा लागला.१९१९ मध्ये अमेरिकन सीनेटने अध्यक्ष वुड्रो विल्सन यांचा अमेरिकेने राष्ट्रसंघात (लीग ऑफ नेशन्स) सामील व्हायचा प्रस्ताव फेटाळला त्यामुळे अमेरिका राष्ट्रसंघात सामील होऊ शकली नाही.तसेच १९९९ मध्ये बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना सीनेटने असाच CTBT करार फेटाळून लावला होता.

अनेकदा सीनेटमध्ये ज्या पक्षाचे बहुमत असेल त्याच पक्षाचा अध्यक्ष असतो असे नाही.१९८२ ते १९९४ या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात डेमॉक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व होते तर अध्यक्षपदी १९९२ पर्यंत रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज बुश वरीष्ठ हे रिपब्लिकन होते.तसेच १९९४ ते २००० या काळात बिल क्लिंटन हे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष होते तर दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व होते.तरीही अध्यक्षांना मुद्दामून त्रास देण्याच्या उद्देशाने सीनेटने त्यांच्या नियुक्त्या रखडवल्या किंवा अध्यक्षांनी परराष्ट्रांशी केलेले सगळे करार फेटाळले असे प्रकार काही अपवाद वगळता झाले नाहीत.

अध्यक्षांवर महाभियोग मंजूर करून त्यांना पदावरून दूर करता येते.महाभियोगाच्या खटल्यात अमेरिकेचे सरन्यायाधीश preside करतात.अध्यक्ष (किंवा संबंधित मंत्री/अधिकारी) यावर रितसर आरोप ठेवले जातात आणि सीनेटमध्ये त्यांच्या प्रतिनिधीला या आरोपांना उत्तर देण्याची संधी दिली जाते.त्यानंतर सीनेटने दोन-तृतीयांश बहुमताने महाभियोग मंजूर केला तरच तो हाऊसपुढे जातो.हाऊसने मतदान करून दोन-तृतीयांश बहुमताने महाभियोग मंजूर केला तर अध्यक्ष किंवा संबंधित अधिकारी पदावरून दूर होतो.म्हणजे सीनेटने महाभियोगाचे आरोप मंजूर केले नाहीत तर हाऊसला त्याबाबतीत काही करता येत नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष किंवा मंत्री हे संसदेचे सदस्य नसतात.कोणी सदस्य असेल तर त्याला अध्यक्ष/मंत्री होण्यापूर्वी राजीनामा द्यावा लागतो.अध्यक्षपदी निवडून आल्यावर बराक ओबामांनी इलिनॉय राज्याच्या सीनेटरपदाचा राजीनामा दिला.भारतात याच्या अगदी उलट परिस्थिती आहे.भारतात मंत्रीमंडळ सामुहिक पध्दतीने लोकसभेला जबाबदार असते तर अमेरिकेत मंत्रीमंडळ अध्यक्षांना जबाबदार असते.हे अमेरिकन पध्दतीत हे काही फरक आहेत.

अध्यक्षपदाची निवडणूक हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे.दर लीप वर्षात हाऊसच्या निवडणुकीबरोबरच अध्यक्षपदाच्या निवडणुका होतात.लोक आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारालाच मते देतात पण अध्यक्षांची निवड ’इलेक्टोरल कॉलेज’ चे सदस्य करतात.इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण ५३९ सदस्य असतात. यामागचे गणित म्हणजे हाऊसचे ४३५ सदस्य अधिक सीनेटचे १०० सदस्य अधिक डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियाचे ४ या आकड्याइतके असे ५३९ सदस्य असतात. मात्र हे सदस्य आणि अमेरिकन संसदेचे सदस्य वेगळे असतात.या सदस्यांचे अध्यक्षांची निवड करणे हे एकमेव औपचारिक काम असते.प्रत्येक राज्यातील हाऊस आणि सीनेटच्या सदस्यांच्या बेरजेइतकी सदस्यसंख्या प्रत्येक राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांची असते.म्हणजे कॅलिफोर्नियातून हाऊसमध्ये ५३ तर सीनेटमध्ये २ सदस्य निवडले जातात.तेव्हा इलेक्टोरल कॉलेजमध्ये कॅलिफोर्नियाचे ५५ सदस्य असतात.अशाच पध्दतीने विविध राज्यांचे सदस्य इलेक्टोरल कॉलेजमध्ये असतात.अमेरिकेतल्या विविध राज्यांमधील इलेक्टोरल कॉलेजमधील सदस्यांची संख्या खालील नकाशात दिली आहे. (हया नकाशाचा दुवा दिल्याबद्दल मिपाकर सहज यांना धन्यवाद.

इलेक्टोरल कॉलेज

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला एखाद्या राज्यातून (समजा कॅलिफोर्निया) सर्वाधिक मते मिळाली तर त्या राज्यातील इलेक्टोरल कॉलेजमधील सगळी मते त्या उमेदवाराला मिळतात.म्हणजे २००८ च्या निवडणुकीत बराक ओबामांना कॅलिफोर्नियात जॉन मॅककेन पेक्षा एक मत जरी जास्त मिळाले असते तरी राज्यातील इलेक्टोरल कॉलेजमधील सगळी (५५) मते ओबामांच्या पारड्यात गेली असती.माझी माहिती बरोबर असेल तर केवळ नेब्रास्का राज्यात उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात इलेक्टोरल कॉलेजमध्ये मते मिळतात.पण इतर सगळ्या राज्यांमध्ये एकतर सगळी मते नाहीतर काहीच नाही अशी परिस्थिती असते.तसेच या इलेक्टोरल कॉलेजमधील सदस्यांची नेमणूक ओबामा/मॅककेन कसे करतात याविषयी मला काही माहिती नाही.

तेव्हा इलेक्टोरल कॉलेजच्या ५३९ पैकी २७० सदस्य ज्याच्या बाजूचे असतात तो अध्यक्ष होतो.डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात हे इलेक्टोरल कॉलेजचे सभासद संसदेच्या इमारतीत (कॅपिटॉल) जमतात आणि आपल्या उमेदवाराला मते देतात.ही केवळ औपचारिकता असते आणि कोणा उमेदवाराला इलेक्टोरल कॉलेजमध्ये किती मते हा निकाल नोव्हेंबरमध्येच लागलेला असतो.नोव्हेंबरमधल्या निवडणुकीत काही का होईना नंतर इलेक्टोरल कॉलेजच्या सभासदांना चारा पैसे आणि वळवा आपल्या बाजूने आणि लोकांनी मते दिली नसली तरी इलेक्टोरल कॉलेजच्या सभासदांच्या जोरावर अध्यक्षपदी निवडून या असे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही.

त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांचा कार्यकाल २० जानेवारीला वॉशिंग्टन डी.सी वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरू होतो.यावेळी शपथ घ्यायला ओबामांना ४-५ मिनिटांचा उशीर झाला तरी त्यांचा कार्यकाल राज्यघटनेप्रमाणे १२ वाजताच सुरू झाला.अध्यक्षांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ देतात.या शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे असतो.

"I, (Name of the person) do solemnly swear that I will faithfully execute the office of President of United States and will to the best of my abilities preserve,protect and defend the constitution of United States. So help me God". यातील शेवटचे So help me God हे चार शब्द पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथ घेतल्यानंतर अनवधनाने उच्चारले आणि त्यानंतर ते शब्द शपथेचाच भाग करण्यात आले.

इलेक्टोरल कॉलेज पध्दतीत काही दोष आहेतच.या पध्दतीमुळे काही वेळा एखाद्या उमेदवाराला नोव्हेंबरमधील निवडणुकीत जास्त मते मिळाली तरी इलेक्टोरल कॉलेजमध्ये मते कमी मिळून त्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो.असा प्रकार २००० साली अल गोर आणि १८८८ साली ग्रोव्हर क्लिव्हलॅंड यांच्याबरोबर झाला.अर्थात संसदिय पध्दतीतही असे दोष आहेतच.१९९१ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ३१% मते मिळाली आणि पक्षाचे सरकार आले.पण १९९३ साली पक्षाला ३४% मते मिळाली तरी विरोधी पक्षात बसावे लागले आणि त्याच वेळी २७% मते मिळवणारी समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष युती इतर पक्षांच्या पाठिंब्याने सत्तेत आली.तसेच २००८ मध्ये कर्नाटकात भाजपला काँग्रेसपेक्षा थोडी मते कमी मिळूनही राज्यात सरकार भाजपचे आले.

काही कारणाने अध्यक्षांनी राजीनामा दिला तर त्या जागी उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून उरलेला काळ काम बघतात.१९७२ साली अध्यक्षपदी रिचर्ड निक्सन आणि उपाध्यक्षपदी स्पीरो टी. ऍगन्यू निवडून आले.१९७३ साली काही कारणाने उपाध्यक्ष ऍगन्यूंनी राजीनामा दिला.त्या वेळी उपाध्यक्षपदाची परत निवडणुक झाली नाही तर अध्यक्ष निक्सन यांनी उपाध्यक्षपदी जेराल्ड फोर्ड यांची नेमणूक केली.ती नेमणूक सीनेटकडून मंजूर करून घ्यावी लागली.नंतर १९७४ मध्ये वॉटरगेट प्रकरणी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनाही राजीनामा द्यावा लागला तेव्हा परत निवडणुक न होता अध्यक्षपदी जेराल्ड फोर्ड आले.त्यांनी नंतर उपाध्यक्ष म्हणून नेल्सन रॉकफेलर यांची नेमणूक केली आणि ती सीनेटकडून मंजूर करून घ्यावी लागली.पुढे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुका १९७६ मध्ये झाल्या. तेव्हा १९७४ ते २० जानेवारी १९७७ या काळात अमेरिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून न दिलेले अधिकारी होते.

अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर बराक ओबामा आणि परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाल्यावर हिलरी क्लिंटन यांनी सीनेटच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यानंतरही त्यांच्या जागी परत निवडणूक न होता संबंधित राज्यांचे (अनुक्रमे इलिनॉय आणि न्यू यॉर्क) गव्हर्नर त्या जागी सीनेट सदस्यांची नियुक्ती करतात.ही नियुक्ती कशी करतात आणि ती कोणाकडून मंजूर करून घ्यावी लागते का याविषयी मला माहिती नाही.इलिनॉयचे गव्हर्नर ब्लॅगोजेविक यांनी ओबामांची रिकामी झालेली सीनेटमधील जागा भरण्यासाठी लाच स्वीकारली म्हणून त्यांची रवानगी गव्हर्नरच्या कार्यालयातून एकदम तुरूंगात झाली.

अमेरिकच्या अध्यक्षांचा कार्यकाल जास्तीत जास्त १० वर्षे असतो.पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी चार वर्षाच्या दोन कालावधींनंतर अध्यक्षपदाची निवडणुक परत लढवली नाही.तेव्हा अध्यक्षाने दोन कार्यकाल झाल्यानंतर निवडणुक लढवू नये अशी प्रथा पडली.पण तसा नियम नव्हता.१९३२ आणि १९३६ ची निवडणुक जिंकल्यावर फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांनी १९४० आणि १९४४ ची निवडणुक तिसर्‍या आणि चौथ्या कार्यकाळासाठी लढवली आणि जिंकली सुध्दा.पुढे १९४५ मध्ये रूझवेल्ट यांचे निधन झाल्यावर हॅरी ट्रुमन अध्यक्ष झाले.त्यांनी राज्यघटनेत २२ वी दुरूस्ती करून अध्यक्षांचा कार्यकाल १० वर्षांपर्यंत मर्यादित केली.याचा अर्थ दोन पूर्ण कार्यकाल आणि तिसर्‍या कार्यकालातील दोन वर्षे पूर्ण करून राजीनामा असा होत नाही. दोन कार्यकाल पूर्ण झाले तर अध्यक्ष तिसर्‍या कार्यकालासाठी निवडणुक लढवू शकत नाही आणि practically अध्यक्षांचा कार्यकाल दोन कार्यकाल किंवा ८ वर्षे होतो. नोव्हेंबर १९६३ मध्ये जॉन केनेडींची हत्या झाल्यावर लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाले.तेच १९६४ मध्ये निवडून आले.१९६८ च्या निवडणुकीपर्यंत त्यांनी ५ वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला होता.ते १९६८ मध्ये परत निवडून आले असते तरी तो कार्यकाल पूर्ण करून ते ९ वर्षे अध्यक्षपदावर राहू शकले असते आणि ते २२ व्या घटनादुरूस्तीप्रमाणे वैध ठरले असते.पण व्हिएटनाम युध्दामुळे जनतेत असलेली नाराजी लक्षात घेऊन लिंडन जॉन्सन यांनी निवडणुक लढवली नाही.

असो.अमेरिकेतील राज्यपध्दतीची तोंडओळख करून घ्यायला एवढी माहिती पुरेशी आहे असे वाटते.त्यातही इतर अनेक बारकावे आहेत-- उदाहरणार्थ राज्यघटनेतील दुरूस्त्या, Law of succession वगैरे.त्याविषयी परत कधीतरी.

संदर्भ:

World Constitutions या पुस्तकातील अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेबद्दलचे प्रकरण. पुस्तक वाचून ७-८ वर्षे झाली आहेत तेव्हा त्याचा लेखक नक्की कोण हे लक्षात नाही.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

प्रतिक्रिया

नंदन's picture

11 May 2009 - 2:53 pm | नंदन

अमेरिकन राज्यपद्धतीची सोप्या भाषेत तोंडओळख करून देणारा हा लेख आवडला. एक बारीकशी सुधारणा म्हणजे, नेब्रास्काप्रमाणेच मेन या राज्याचेही अध्यक्षीय निवडणुकीत मतविभाजन होऊ शकते. नेब्रास्कातही ही पद्धत १९९६ पासून सुरू झाली. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच असे मतविभाजन झाले. नेब्रास्का हे राज्य जरी रिपब्लिकन पक्षाकडे गेले असले तरी दुसर्‍या काँग्रेशनल डिस्ट्रिक्टमध्ये मिळालेल्या मताधिक्यामुळे ओबामाला एक इलेक्टोरल मत मिळाले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

11 May 2009 - 5:01 pm | विकास

लेख नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि चांगला आहे. काही निरीक्षणे/माहित असलेल्या गोष्टी:

हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हला "अमेरिकन काँग्रेस" असे म्हणतात अथवा नुसते "हाऊस" असे पण म्हणतात.

काँग्रेसमन आणि सिनेटरच्या निवडणूकांमधे त्या त्या मतदार संघात पक्षिय निवडणूका होतात.त्यांना प्रायमरीज म्हणतात त्यात पक्षाचे सदस्य तसेच काही ठिकाणि स्वतंत्र मतदार हे भाग घेऊ शकतात. नंतर होणारी निवडणूक ही शेवटी दोन प्रमुख पक्षातच होते. जर कोणी स्वतंत्र/अपक्ष अथवा नविन पक्ष काढून निवडणूका लढवू इच्छित असेल तर त्याला खूप सह्या घ्याव्या लागतात.

अमेरिकन लोकशाही ही "अध्यक्षिय" आहे म्हणजे धंद्यातील "सीइओ" सारखी आहे. त्यामुळे त्यांना असलेले अधिकार हे प्रचंड असतात. वर क्लिंटननी लिहील्या प्रमाणे जर अध्यक्ष काही कारणाने नसला (केनडी मृत्यू तर निक्सन महाभियोगावर निकाल लागण्याआधीच राजीनामा) तर उपाध्यक्ष होतो. जर उपाध्यक्ष पण नसला तर अमेरिकन काँग्रेस (हाऊस)चा सभापती अध्यक्ष होऊ शकतो. म्हणून "थर्ड इन लाईन" असलेले सभापतीचे पद हे अतिशय महत्वाचे धरले जाते. त्याच्या खालोखाल पन सर्व क्रमांक लागलेत म्हणजे - सभापती होऊ शकला नाही तर डिफेन्स सेक्रेटरी, मग सेक्रेटरी ऑफ स्टेट्स मग ऍटर्नी जर्नल वगैरे (शेवटचे दोन-तीन क्रमांक आठवणीतून).

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे: निवडणूका ह्या नोवेंबरच्या पहील्या मंगळवारी त्या त्या कारणासाठी. म्हणजे हाउसच्या आणि १/३ सिनेटच्या प्रत्येक सम वर्षी तर राष्ट्राध्यक्षांच्या दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहील्या मंगळवारी. तेच अगदी नगरपालीकेच्या महापौरांपर्यंत! (काही अगदी कमी अपवाद असतीलही..)

रिकाम्या झालेल्या सिनेट काँग्रेसच्या जागी विविध पद्धतीने नेमणूक होते अथवा काही ठिकाणी पोटनिवडणूक पण होते.

अध्य़क्ष हा केवळ दोनदाच निवडून येऊ शकतो. (आठ वर्षे)

बाकी एक महत्वाची गोष्टः (माझ्या दृष्टीने)

बर्‍याचदा अमेरिकन लोकशाही पद्धत ही आपल्याला आकर्षक वाटते (अमेरिकत काही जणांना संसदईय लोकशाही आकर्षक वाटतेच!) . माझ्या मते यातील कुठलीच एक बरोबर अथवा चूक नाही. मात्र काही अंशी अध्यक्षीय पद्धत ही सत्ता जास्त केंद्रीत करते असे वाटते म्हणून ती आपल्याकडे येण्यासाठी अजून आपण परीपक्व नाही असेच वाटते.

शिवाय लोकशाही कशीही असोत शेवटी त्यातील "नेता" कोण यावर देशाचे भवितव्य ठरते. रुझवेल्ट असला तर मंदीतून संधी शोधून राष्ट्र जागतीक महासत्ता पण बनू शकते आणि बूश असला तर हातात आलेले वैभव आणि ऐश्वर्यदायी राष्ट्रपण मंदीत जाऊन महासत्तेपेक्षा दोनशे राष्ट्रातील एक राष्ट्र होऊ शकते. असे होण्याचे कारण अर्थातच असा नेता एकापेक्षा जास्तवेळेस निवडून देणारा लोकशाहीतील "राजा" - मतदार. आणि लोकशाहीतही शेवटी या अर्थाने देशाच्या आणि नागरीकांच्या भविष्यासाठी हाच "राजा कालस्य कारणम" ठरतो.

श्रावण मोडक's picture

11 May 2009 - 5:06 pm | श्रावण मोडक

जर अध्यक्ष काही कारणाने नसला (केनडी मृत्यू तर निक्सन महाभियोगावर निकाल लागण्याआधीच राजीनामा) तर उपाध्यक्ष होतो. जर उपाध्यक्ष पण नसला तर अमेरिकन काँग्रेस (हाऊस)चा सभापती अध्यक्ष होऊ शकतो. म्हणून "थर्ड इन लाईन" असलेले सभापतीचे पद हे अतिशय महत्वाचे धरले जाते. त्याच्या खालोखाल पन सर्व क्रमांक लागलेत म्हणजे - सभापती होऊ शकला नाही तर डिफेन्स सेक्रेटरी, मग सेक्रेटरी ऑफ स्टेट्स मग ऍटर्नी जर्नल वगैरे (शेवटचे दोन-तीन क्रमांक आठवणीतून).
'द मॅन'ची आठवण झाली ('द मॅन'च ना? कृष्णवर्णीय अध्यक्ष?)

सुनील's picture

11 May 2009 - 8:11 pm | सुनील

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.

भारत, युके आणि अमेरिका यांच्यातील राज्यपद्धतीचा विचार करता खालील गोष्टी लक्षात येतात.

भारत आणि युके (इंग्लंड हा युकेचा एक भाग आहे) यांच्यात सर्वोच्च सत्तेची दोन स्थाने आहेत - राष्ट्रप्रमुख (हेड ऑफ द स्टेट) आणि सरकार प्रमुख (हेड ऑफ द गर्वंमेन्ट). याउलट अमेरिकेत ही दोन्ही स्थाने एकाच व्यक्तीच्या हातात असतात. म्हणूनच अमेरिकेचा अध्यक्ष हा जगातील सर्वात जास्त अधिकार असलेली व्यक्ती मानली जाते.

त्यातही, युकेमध्ये राष्ट्रप्रमुख हे पद वंशपरंपरागत पद्ध्तीने येते आणि त्याला विशेष असे कोणतेही अधिकार नसतात. भारतात ह्या पदासाठीही निवडणूक होते (अप्रत्यक्ष).

ज्या देशात राष्ट्रप्रमुख हा लोकांनी निवडून दिलेला असतो (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) त्या देशाला "रिपब्लिक" असे म्हणायचा प्रघात आहे. म्हणूनच भारताचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ इंडिया असे आहे. त्या अर्थाने युके हा देश "रिपब्लिक" नाही.

क्लिंटन यांच्याकडून असेच विविध विषयावरील माहितीपूर्ण लेख यावेत ही अपेक्षा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धनंजय's picture

12 May 2009 - 3:51 am | धनंजय

संयुक्त राज्ये (यू.एस.)चा राष्ट्राध्यक्ष हा सरकारप्रमुख आणि राष्ट्रप्रमुख दोन्ही आहे - सहमत. शिवाय पुष्कळ अधिकार धारण करणारा आहे - सहमत.

परंतु यू.एस.च्या राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे तीन वेगवेगळी समसमान दर्जाची सत्तास्थाने असतात. पैकी कुठलीही दोन सत्तास्थाने तिसर्‍या सत्तास्थानाला शह देऊ शकतात.

१. राष्ट्राध्यक्ष, २. विधिमंडळ (दोन सदनांची "काँग्रेस), ३. सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनेक वेगवेगळ्या अध्यक्षांनी नेमलेले असतात. म्हणून हे न्यायालय कधीकधी विधिमंडळाच्या आणि अध्यक्षांच्या विरोधात जाते.
विधिमंडळ हे कित्येकदा अध्यक्षाच्या पक्षाचे नसते, तेसुद्धा अध्यक्षांच्या विरुद्ध जाण्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात.

इंग्लंडमध्ये जेम्स राजाच्या काळात राजा आणि संसद तुल्यबल होते, पण त्यानंतर हळूहळू राजमुकुट फक्त शोभेकरिताच राहिला आहे. राजाने (अथवा राणीने) पंतप्रधानाचे म्हणणे मानणे बंधनकारक आहे. इतकेच काय, राणीचे वार्षिक भाषण हे पंतप्रधान लिहून देतो, आणि राणी फक्त वाचते - त्यात काहीएक बदल करायचा अधिकार राणीला नाही. पंतप्रधानाला संसद निवडून देते आणि तो संसदेचाच भाग असतो. अशा प्रकारे राजावर बंधन असल्यामुळे वेगवेगळी अधिकारस्थाने नाहीत. ब्रिटनचे सर्वोच्च न्यायालय म्हणजे त्यांची उमरावसभा होय. येथेसुद्धा जन्मतः उमराव आता बसू शकत नाहीत. राजा आणि जन्मजात उमरावांना जायबंद केले आहे, हे लोकशाहीच्या दृष्टीने उत्तम आहे, तरी "एकमेकांना शह देणारी, लोकप्रिय हुकुमशाही थोपवणारी बलस्थाने" गेलीत हे एका दृष्टीने वाईट झाले.

भारतात राष्ट्रपतींची स्थिती अशीच जायबंदी आहे. राष्ट्रपतींना पंतप्रधानांचे मत स्वीकारणे अपरिहार्य आहे, अशी घटनादुरुस्ती भारतात झालेली आहे. अजून भारतात सर्वोच्च न्यायालय वेगळे बलस्थान आहे, पण न्यायालयाच्या मर्यादा कुठल्या, संसदेच्या मर्यादा कुठल्या, याबाबत थोडी अंदाधुंद आहे.

तस्मात् - यू.एस. एक श्रीमंत आणि शस्त्रास्त्रयुक्त राज्य आहे, म्हणून तिथला राष्ट्राध्यक्ष बलाढ्य आहे. घटनेकडे, आणि प्रचलित इतिहासाकडे बघतासुद्धा त्यांच्या देशातल्या देशात त्याचे हात, सैलसर का होईना, बांधलेले आहेत.

(इराक युद्धाच्या वेळेला, आणि बुश-चेनी काळात विधिमंडळाचे अधिकार राष्ट्राध्यक्षांनी घेतले, आणि विधिमंडळाने तो लाचारपणे देऊ केले. हे असेच जर चालू राहील, तर काही काळाने यू.एस. मध्ये खरोखरच राष्ट्राध्यक्षांचा एकाधिकार येऊ शकेल.)

नितिन थत्ते's picture

12 May 2009 - 3:13 pm | नितिन थत्ते

पण न्यायालयाच्या मर्यादा कुठल्या, संसदेच्या मर्यादा कुठल्या, याबाबत थोडी अंदाधुंद आहे

ही अंदाधुंद मीडियाने मुद्दाम निर्माण केली आहे व त्याचा न्यायालये फायदा उठवत आहेत. (मनातून लोकशाही न मानणारे) मध्यमवर्गीय त्यांना उत्तेजन देत आहेत.

भारतीय घटनेनुसार कायद्याचा अर्थ लावणे आणि संसदेने मंजूर केलेले कायदे घटनेच्या चौकटीत आहेत की नाहीत (घटनेच्या मूळ ढाच्याला आणि तरतुदींना धक्का तर लावत नाहीत ना? आणि योग्य ती प्रक्रिया पाळली गेली आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार न्यायालयाला आहे.

एखादा कायदा असावा का नाही हे ठरवण्याचा कोणताही अधिकार न्यायालयाला नाही. उदा. मुलाचे लग्नाचे वय २१ ऐवजी २० असावे असा कायदा संसदेने संमत केला तर जोवर तो घटनाविरोधी नाही आणि योग्य प्रक्रियेने मंजूर झाला असेल तर न्यायालयाला ते वय २१ असावे की २२ हे ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही. याचे कारण संसद हीच खरे जनतेचे प्रतिनिधित्व करते- म्हणून संसदेचे मत म्हणजेच जनतेचे मत असे मानता येते. न्यायालय हे जनतेचे प्रतिनिधी नसते. (दुसर्‍या शब्दात सांगायचे तर जनता ही सर्वोच्च आहे आणि जनतेने संसदेला कायदे करण्याचे काम सोपवले आहे ते योग्य प्रकारे-घटनेला धरून- होत आहे की नाही हे तपासण्याचे काम न्यायालय करू शकते). न्यायालय कुठलाही कायदा बनवू शकत नाही आणि रद्द करू शकत नाही.
उदा: भटक्या कुत्र्यांना मारावे की नाही हे ठरवण्याचा अधिकार खरे तर न्यायालयाला नाही पण गेली कित्येक वर्षे न्यायालय आडमुठी भूमिका घेऊन बसले आहे.
दुर्दैवाने जेव्हा मंत्री वगैरे जेव्हा न्यायालयाला काही समज देऊ इच्छितात तेव्हा सुशिक्षित जनता न्यायालयांची बाजू घेते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अभिज्ञ's picture

12 May 2009 - 3:35 pm | अभिज्ञ

दुर्दैवाने जेव्हा मंत्री वगैरे जेव्हा न्यायालयाला काही समज देऊ इच्छितात तेव्हा सुशिक्षित जनता न्यायालयांची बाजू घेते.

ह्या सारखे हास्यास्पद विधान दुसरे कुठले नसावे.सुशिक्षित जनतेकडे सदसदविवेकबुध्दी नसते काय?

न्यायालयांना विशेषतः भारतातील, एखाद्या निर्णयात कुठलाच राजकीय फायदा नसतो.
परंतु सरकार वा संसद हे राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कायदे करु शकते.
उदा. शहाबानो प्रकरण.

ह्यावर आपले काय मत आहे?

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

धनंजय's picture

13 May 2009 - 2:43 am | धनंजय

भारतातील न्यायालय हे बर्‍यापैकी स्वतंत्र आहे, हे प्रथमच वाक्य लक्षात असू दे.
येथे २ मुद्दे आहेत.
मुद्दा १: भारतातील न्यायालय पूर्णपणे स्वतंत्र नाही.
इंदिरा गांधी यांची १९७५ मधली निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरवली. त्यानंतर लोकसभेत निवडणूक-कायदा तडकाफडकी बदलून इंदिरा गांधी सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्या. (भूतकाळातील व्यवहाराबद्दल न्याय साधारणपणे बदलता येत नाही - विशेषतः कोर्टात गुन्हा शाबित झाल्यावर...) सर्वोच्च न्यायालयाने याचिकेचा निकाल इंदिरा गांधींच्या बाजूने दिला.

पुढे १९७५-१९७७ काळात सर्वोच्च न्यायालयाने ४ विरुद्ध १ निर्णय दिला की सरकारने आणीबाणीत कोणाला कैद केले, तर त्याला न्यायालयाकडे जाता येत नाही. या ठिकाणी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांचे मुकाट ऐकून घेतले. जिथे पंतप्रधानांच्याच विरुद्ध जायची वेळ आली आहे, तिथे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला धाकदपटशाने घाबरावता येते, स्वातंत्र्य दाखवले जात नाही, असा थोडासा इतिहास आहे.

पुनश्च, आजूबाजूच्या देशांच्या न्यायालयांपेक्षा भारताचे सर्वोच्च न्यायालय बरेच स्वतंत्र आहे.

मुद्दा २: विधिमंडळ, शासन, न्यायालय यांची अधिकारक्षेत्रे वेगळी
विधिमंडळ (=संसद) कायदे बनवते, शासन (=पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ) अंमलबजावणी करते आणि न्यायालय कायद्यांची सुसंगती (एकमेकांशी आणि घटनेशी) लावते.
कायदे राजकीय कारणांसाठी (म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी) बनवले जातात, हीच लोकशाही नव्हे काय? लोकांना कायदे पटले नाहीत तर लोक नवे सरकार आणते आणि सरकार ते लोकेच्छाविरुद्ध कायदे बदलू शकते, असे लोकशाहीचे तत्त्व आहे असे मला वाटते. बनवलेल्या कायद्यांचा आणि निवडणुकीचा काय संबंध असावा असे अभिज्ञ यांना वाटते?

समजा न्यायालय कायदे बनवू लागले. (जसे की भारतात न्यायालय पुष्कळदा करते.) न्यायालयाने "राजकीय-नसल्यामुळे" लोकेच्छाविरुद्ध कायदा केला, तर तो पलटवण्यासाठी लोकशाही मार्ग काय आहे?

आता शहा बानो प्रकरण -
त्याचा इथे उल्लेख नेमका कसा येतो ते मला ठाऊक नाही. न्यायालयाने अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार निकाल दिला, संसदेने निवडणुकीच्या दृष्टीने विचार करून कायदा केला आणि शासनाने कायद्याची अंमलबजावणी केली. यात तीन्ही विभागांनी अपेक्षित कार्य केले.

मला या विचारात काहीतरी समजत नाही. राजकीय/निवडणूक हेतू समोर न ठेवून लोकशाहीत कायदे कसे बनवावे. समजा एखाद्या लोकोत्तर विचारवंताला माहीत असेल की अमुकतमुक धोरण देशासाठी श्रेयस्कर आहे, पण हल्ली लोकांना ते आवडत नाही. लोकशाहीत तो नवा विचार लोकांना पटवल्याशिवाय, निवडणुकीच्या अग्निपरीक्षेत उतरल्याशिवाय, कायदा होऊ शकत नाही.

वर ठळक ठशात उद्धृत मुद्द्याबद्दल (दुर्दैवाने ... सुशिक्षित जनता ... ... सदसदविवेकबुध्दी नसते काय?) हा उपप्रतिसाद नाही. तो संवाद खराटा यांच्याशी चालवावा.

विकास's picture

13 May 2009 - 3:07 am | विकास

आता शहा बानो प्रकरण -
त्याचा इथे उल्लेख नेमका कसा येतो ते मला ठाऊक नाही. न्यायालयाने अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार निकाल दिला, संसदेने निवडणुकीच्या दृष्टीने विचार करून कायदा केला आणि शासनाने कायद्याची अंमलबजावणी केली. यात तीन्ही विभागांनी अपेक्षित कार्य केले.

शहाबानोस जेंव्हा सुप्रिम कोर्टाने पोटगी देण्याची आज्ञा केली, तेंव्हा मुस्लीम समाजातील किमान काही भागातून आमच्या धर्मात ढवळाढवळ होत आहे असा आवाज झाला. राजीव गांधींकडे तेंव्हा संसदेत तीन चथुर्थांश जागा होत्या. त्याचा उपयोग करून त्यांनी नुसता कायदाच नाही तर घटनादुरूस्तीच केली. निवडणूकांच्या मतांकडे पाहून एखाद्या समाजासाठी वेगळा कायदा करणे आणि तो करता यावा म्हणून मूलभूत घटनेतच दुरुस्ती करणे हे लोकशाहीच्या तीन पैकी कुठल्याच स्तंभाकडून "अपेक्षित कार्य" कसे काय ते समजले नाही.

राजकारण म्हणून कायदे करताना पण मुलभूत कायदा हा सर्वांसाठी समान असावा, सर्वांना समान हक्क असावे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी, कायदा सुरक्षा व्यवस्थेने कार्य करावे आणि ते त्यांचे अपेक्षित कार्य आहे असे वाटत नाही का?

प्रतिसाद वाचण्यापूर्वी माझ्या वैयक्तिक मताचे स्पष्टीकरण वाचावे :
१. शहाबानोला पुरेशी पोटगी मिळावी असा कायदा केला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. असे माझे सामाजिक मतही आहे.
२. हे करण्यासाठी भारताची विधिमंडळ-शासन-न्यायालय पद्धत मूलभूत बदलू नये असेही माझे मत आहे. (आणि विधिमंडळाने निवडणुकीच्या मार्फत लोकांचे ऐकत काम करावे, हे आलेच.)
३. जे कायदे आता चुकीचे आहेत असे मला वाटते, ते बदलण्यासाठी मला दोन मार्ग सध्या आहेत :
३अ. कायदा घटनाविरोधी असेल तर न्यायालयाकडून तो रद्द करणे
३आ. (हा मार्ग सर्वात श्रेष्ठ आणि लोकशाहीचा राजमार्ग) खूप लोकांचे मन वळवून निवडणुकीच्या मार्फत विधिमंडळावर बदल करून मला योग्य वाटतो तसा कायदा बनवणे.
- - -

राजकारण म्हणून कायदे, समान कायदे, अपेक्षित कार्य वगैरे

यात काही तत्त्वे घटनेने बंधनकारक केलेली आहेत, तर काही मार्गदर्शक ठेवलेली आहेत.

सर्वांसाठी समान कायदा हा कायद्यातला अत्यंत गहन आणि गुंतागुंतीचा विचार आहे.

पैकी सोपा मुद्दा म्हणजे समान नागरी कायदा. हे घटनेचे मार्गदर्शक तत्त्व आहे. या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल नेमका काय विचार करायचा हे मला माहीत नाही. (१. पुरुष-स्त्रियांना समान उपजीविका, २. समान न्यायव्यवस्थेत सर्वांना नि:शुल्य वकिली सहाय्य, ३. सर्वांना शिक्षण, रुग्णसेवा, वृद्धापकाळसाठी सहाय्य, ४ पंचायती राज्य स्थापना, ... क्ष. समान नागरी कायदा, क्ष+१. सक्तीचे मोफत बालशिक्षण...)
ही मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक नाहीत असे घटनेनेच सांगितले आहेत.

आता मूलभूत कायदा समान असावा, हे खरे. पण "नागरी कायदा" हा घटनेने "ऑप्शन"ला टाकल्यामुळे "मूलभूत कायदे" हे वेगळे. मूलभूत हक्कांची यादी घटनेने दिलीच आहे, आणि ती "ऑप्शनल" नाही. मूलभूत कायदे समान असले पाहिजेत ते घटना म्हणते ते ह्या यादीतले.

ही यादी बदलली जाऊ शकते, पण त्यासाठी निवडलेल्या लोकप्रतिनिधींचे राजकारण, आणि त्यातून घटनादुरुस्ती हे पर्याय आहेत. वर राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती करवली, हा उल्लेख आलेला आहेच. लोकांच्या प्रतिनिधींना घटनादुरुस्ती करता यावी याकरिता घटनेने काही मार्ग दिलेले आहेत, ते जाणूनबुजून.

कायदा सुरक्षा व्यवस्थेने कार्य करावे आणि ते त्यांचे अपेक्षित कार्य आहे असे वाटत नाही का?

या वाक्याचा संदर्भ कळला नाही. कायदा आणि सुरक्षा व्यवस्थित असली तर चांगले धोरण आहे, हे मला वाटते (हे प्रश्नाचे उत्तर आहे काय? की वेगळ्याच प्रश्नाचे उत्तर आहे? तसे असल्यास प्रश्न वेगळ्या तर्‍हेने विचारावा.)

शहाबानो खटल्याचा कायदा आणि सुरक्षा व्यवस्थित असण्याशी (वरील वाक्यात "नसण्याशी") संदर्भ कळला नाही. विधिमंडळ-शासन-न्यायालय सर्वांनी घटनानियुक्त कार्य व्यवस्थितच केले.

- - -

सुरुवातीचे स्पष्टीकरण अशासाठी : "भारताची राज्यव्यवस्था तशी ठीकठाक आहे" असे जे मी म्हणतो त्याचा चुकीचा अर्थ कोणी लावू नये. पुन्हा : शहाबानोला अधिक पोटगी मिळावी असा कायदा लोकशिक्षणाने व्हावाच, असे माझे मत आहे.

माझ्या असलेल्या घटनाविषयक मतांचा अनर्थ करून नसलेल्या पोटगीविषयक मतांचा आरोप माझ्यावर कोणी केला नाही, म्हणजे मिळवली ;-)

नितिन थत्ते's picture

13 May 2009 - 9:26 am | नितिन थत्ते

++१
नेहमी प्रमाणे धनंजय यांनी नेमकेपणे मुद्द्यांचे विवेचन केले आहे.

एकदा लोकशाही मानल्यावर लोकांच्या इच्छेप्रमाणे कायदे हे उघडच आहे. आणि धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे जर एखादा कायदा योग्य नाही असे वाटत असेल तर तो बदलण्यासाठी लोकमत तयार करणे निवडणुकीच्या मार्गाने नवे सरकार आणणे आणि मग कायदे बदलणे हाच मार्ग लोकशाहीत असायला हवा.
१.येथे एक मुद्दा असाही की कोणीतरी एक थोर/ज्ञानी माणूस आहे आणि तो सांगेल तसे कायदे वरील मार्गाने न जाता अस्तित्वात येणे म्हणजेच हुकूमशाही.
२. राजकारणी लोकांविषयी एक नकारात्मक दृष्टीकोन सुशिक्षित मध्यमवर्गात दिसतो. संसद हे त्या राजकारणी लोकांचे कार्यक्षेत्र. त्यामुळे न्यायालये जेव्हा संसदेच्या अधिकारावर अतिक्रमण करतात तेव्हा त्यांना मनातून एक सुप्त आनंद होतो. न्यायालये राजकारण्यांना 'वठणीवर' आणताहेत असे वाटून न्यायालयांची बाजू घेतले जाते. परंतु राजकारण्यांना वठणीवर आणण्याचा खरा अधिकार आपल्यालाच आहे हेच मुळी ते विसरून जातात.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मन१'s picture

21 Jul 2012 - 5:04 pm | मन१

लेख छानच.
शंका:-
ज्या देशात राष्ट्रप्रमुख हा लोकांनी निवडून दिलेला असतो (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) त्या देशाला "रिपब्लिक" असे म्हणायचा प्रघात आहे. म्हणूनच भारताचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ इंडिया असे आहे. त्या अर्थाने युके हा देश "रिपब्लिक" नाही.
सध्या आपला शेजारी कम्युनिस्ट चीन ह्याचे अधिकृत नाव People's Republic Of China(PRC) असे आहे म्हणे.
हे कसे काय?

सध्या आपला शेजारी कम्युनिस्ट चीन ह्याचे अधिकृत नाव People's Republic Of China(PRC) असे आहे म्हणे.
हे कसे काय?

त्या देशाने आपले नाव काहीही ठेवले तरी राज्यशास्त्राच्या परिभाषेत त्या देशाला "रिपब्लिक" म्हणता येणार नाही. आणि देश स्वतःला काहीही म्हणवून घेतात. उदाहरणार्थ पूर्वी अस्तित्वात असलेल्या कम्युनिस्ट पूर्व जर्मनीचे अधिकृत नाव "जर्मन डेमॉक्रॅटिक रिपब्लिक" होते आणि सध्याही अस्तित्वात असलेल्या उत्तर कोरियाचे अधिकृत नाव "डेमॉक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया" असे आहे. त्यामुळे ते देश डेमॉक्रॅटिक नक्कीच बनत नाहीत. तसेच काहीसे.

मिहिर's picture

11 May 2009 - 10:47 pm | मिहिर

माहितीपूर्ण लेख. आवडला.

सागर's picture

11 May 2009 - 11:42 pm | सागर

क्लिंटनसाहेब,
सुंदर लेख आहे नेहमीप्रमाणेच.

अमेरिकन लोकशाहीत निवडणुक प्रक्रीया कशी चालते हे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही उलगडून सांगितले आहेत.
ज्यांना काहीच माहीती नाही वा जुजबी माहिती आहे त्यांच्यासाठी हा मेवाच आहे.

एक कायदा मला खूप आवडला:
अमेरिकेत दहा दिवसांत अशा विधेयकावर अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही तर ते विधेयक आपोआप कायद्यात रुपांतरीत होते

आपल्या देशात तर काही फाईली स्वातंत्र्यापासून पडून असल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. स्वातंत्र्यापासूनच्या फाईली जाऊ देत.
पण आपल्याकडे सरकार बदलले की आधीच्या फाईलींना केराची टोपली दाखवली जाते. मग त्या योजना चांगल्या असोत वा नसोत...

हा कायदा तरी आपल्या संविधानात असायला हवा म्हणजे सगळे खादाडखाऊ राजकारण्यांना झक मारत कामं करावी लागतील...

(उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा ) सागर

बेसनलाडू's picture

12 May 2009 - 4:25 am | बेसनलाडू

(माहितगार)बेसनलाडू

क्लिंटन's picture

12 May 2009 - 1:04 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

नंदन, मेन राज्यातही मिळालेल्या मतांच्या प्रमाणात इलेक्टोरल कॉलेजच्या सभासदांची विभागणी होते हे मला माहित नव्हते.माहितीबद्दल धन्यवाद. बाकी अमेरिकेत असे अनेक नियम राज्यपातळीवर किंवा त्यापेक्षाही खाली जिल्हापातळीवर (काऊंटी) असतात.उदाहरणार्थ निवडणुकीत मतपत्रिका असाव्यात की इलेक्ट्रॉनिक मशिन, मतपत्रिकांची रचना कशी असावी यासारखे निर्णय काऊंटी पातळीवर घेतले जातात.

विकास यांच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष सामान्यत: आठ वर्षे त्या पदावर राहू शकतात आणि जास्तीत जास्त दोनदा अध्यक्षपदी निवडून येऊ शकतात.पण वर लिंडन जॉन्सन यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते की अध्यक्ष १० वर्षे पदावर राहू शकतात.मात्र असे काही अपवादात्मक परिस्थितीतच होऊ शकते.म्हणजे केनेडींची हत्या झाल्यावर जॉन्सन अध्यक्ष झाले आणि ते नोव्हेंबर १९६३ चा शेवट ते २० जानेवारी १९६५ पर्यंत त्या पदावर होते.म्हणजे ते नवा कार्यकाल सुरू करण्यापूर्वी १४ महिन्यांपर्यंत अध्यक्ष होते.त्यानंतर त्यांना पुढील दोन निवडणुकीत यश मिळाले असते तर ते एकूण ९ वर्षे आणि २ महिने अध्यक्ष राहू शकले असते.आणि २२ व्या घटनादुरूस्तीनुसार वैध ठरले असते.या घटनादुरूस्तीची भाषा किचकट आहे पण त्यावरून अध्यक्षांचा कार्यकाल जास्तीतजास्त १० वर्षे असू शकतो हे स्पष्ट होते.केनेडींची हत्या २ वर्षे पूर्ण करायच्या आधी झाली असती (२० जानेवारी १९६३ पूर्वी) तर जॉन्सनना २ वर्षाहून जास्त कार्यकाल मिळाला असता.त्यानंतर १९६४ ची निवडणुकीनंतरची त्यांचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत (२० जानेवारी १९६९) त्यांची ६+ वर्षे पूर्ण झाली असती.अशा परिस्थितीत ते १९६८ ची निवडणूक लढवायला पात्र राहिले नसते.

अध्यक्षांबाबतचा दुसरा एक मुद्दा म्हणजे आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर अध्यक्ष सर्वोच्चपद (अध्यक्ष) सोडून इतर कोणतेही पद भूषवू शकतात.म्हणजे भविष्यकाळात अगदी मंत्री व्हायला त्यांना आडकाठी नाही. उपाध्यक्ष व्ह्यायला परवानगी असेल असे वाटत नाही.कारण अध्यक्षांचे निधन/राजीनामा या परिस्थितीत उपाध्यक्ष अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतात.तेव्हा आधीच ८ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीस भविष्यकाळात उपाध्यक्ष व्हायला परवानगी असेल असे वाटत नाही.याविषयी नक्की खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाही.भारतात माजी पंतप्रधान लोकसभेची निवडणुक लढवून परत संसदीय राजकारणात प्रवेश करू शकतात नव्हे अनेकदा तसेच करतात.पण अमेरिकेत सामान्यपणे माजी अध्यक्ष सीनेटच्या निवडणुकीला उभे आहेत असे चित्र सामान्यत: दिसत नाही.अर्थात तसा नियम नाही पण तसे करायची पध्दतही अमेरिकेत नाही.तसेच पूर्वी अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीस त्या पदापेक्षा कमी अधिकार असलेल्या पदावर इतर कोणाखाली काम करणे प्रशस्त वाटत नसावे म्हणून अध्यक्ष पदावरून दूर झाल्यानंतर सक्रीय राजकारणातून निवृत्त होतात.

अनेकदा अध्यक्षपदाची निवडणुक हरलेल्या व्यक्तीस पक्षाचे परत तिकिट मिळत नाही किंवा ते तिकिट मागायला जात नाहीत.अर्थात याला काही अपवाद आहेतच. १९५२ आणि १९५६ मध्ये रिपब्लिकन आयसेनहॉवर यांच्याविरूध्द डेमॉक्रॅटिक पक्षाचे एकच उमेदवार अडलाई स्टिव्हनसन पराभूत झाले.१९५३ ते १९६१ या काळात उपाध्यक्ष असलेले रिचर्ड निक्सन १९६० च्या निवडणुकीत जॉन केनेडी यांच्याकडून पराभूत झाले.पण १९६८ आणि १९७२ च्या निवडणुकीत ते अध्यक्षपदी निवडून आले.पूर्वी १८८४ मध्ये ग्रोव्हर क्लीव्हलॅंड निवडून आले, १८८८ मध्ये ते पराभूत झाले आणि १८९२ मध्ये ते परत निवडून आले.अमेरिकेच्या इतिहासात दोन कार्यकालांमध्ये ४ वर्षाचा खंड असलेले ग्रोव्हर क्लीव्हलॅंड हे अजूनपर्यंतचे एकमेव अध्यक्ष आहेत.

बाकी संसदिय लोकशाही चांगली की अध्यक्षीय पध्दती चांगली या मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा जी पध्दती आहे ती योग्य पध्दतीने राबविण्यावर लक्ष केंद्रित करणे हितावह ठरेल. विकास यांनी ’Law of succession' हा राहिलेला मुद्दा मांडला याबद्दल धन्यवाद.

बाकी अमेरिकन पध्दतीत देशाचे आणि सरकारचे प्रमुख एकच असतात हा सुनील यांचा मुद्दा बरोबरच आहे.बाकी धनंजय यांनी म्हटले आहे "सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनेक वेगवेगळ्या अध्यक्षांनी नेमलेले असतात. म्हणून हे न्यायालय कधीकधी विधिमंडळाच्या आणि अध्यक्षांच्या विरोधात जाते". आता अमेरिकेसंदर्भात हा मुद्दा कसा लागू होतो याचे एक उदाहरण देतो. २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत बराच घोळ झाला.अध्यक्ष बुश की गोर हे सुमारे दीड महिन्यानंतर स्पष्ट झाले.या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्वाची होती.बिल क्लिंटन अध्यक्ष असताना १९९४-२००० या काळात सीनेटमध्ये विरोधी रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व होते.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर रिकाम्या झालेल्या जागी आपल्या मर्जीतले न्यायाधीश नेमणे क्लिंटन यांना शक्य झाले नाही.कारण त्या न्यायाधीशांना रिपब्लिकन बहुमतात असलेल्या सीनेटची मंजुरी मिळणे शक्य नव्हते.न्यायाधीशांची नियुक्ती करायची आणि सीनेटने ती नाकारायची हा प्रकार प्रशस्त दिसला नसता म्हणून अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आधीच दोन्ही बाजूंना मान्य होतील असे न्यायाधीश नेमले.त्याच न्यायाधीशांनी पुढे २००० च्या अध्यक्षीय निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली.समजा आधीच बिल क्लिंटन यांना आपल्या मर्जीतले न्यायाधीश नेमता आले असते तर २००० च्या अध्यक्षीय निवडणुकीत फ्लोरिडात झालेले गैरप्रकार (कृष्णवर्णीय मतदारांची नावे मतदार याद्यांमधून मुद्दामून गायब करणे वगैरे) प्रकाशात येऊन कदाचित अल गोर अध्यक्ष झाले असते.अमेरिका आपल्याला वाटते तितकी ’स्वच्छ’ नाही यास्वरूपाचा लेख गोविंद तळवलकरांनी (बहुदा महाराष्ट्र टाईम्सच्या) २००१ च्या दिवाळी अंकात लिहिला होता त्यात याचा उल्लेख होता असे वाचल्याचे आठवते.अधिक संदर्भ मिळाल्यास देईनच.

(अवांतर: १९९३-२००१ या काळात डेमॉक्रॅटिक पक्ष सत्तेत होता.नंतरच्या काळात उपाध्यक्ष झालेले डिक चेनी १९९३-२००१ या काळात हॅली बर्ट्न या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर (बहुदा सीईओ) होते. नंतरच्या काळात एनरॉन आणि वल्ड कॉम सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गैरव्यवहार उघडकीस आले.समजा असेच गैरव्यवहार हॅली बर्टन मध्ये १९९३-२००१ दरम्यान झाले असतील तर त्याची चौकशी डिक चेनी उपाध्यक्ष असताना पूर्णपणे नि:पक्षपातीपणे होईल का असा प्रश्नही तळवलकरांनी याच लेखात मांडला होता.)

बाकी मिहिर,सागर,बेसनलाडू,कर्क,मोडकसाहेब यांच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.या लेखातून मला माहित असलेल्या महत्वाच्या गोष्टी लेख विनाकारण लांबलचक न करता द्यायचा प्रयत्न मी केला.इतरही अनेक गोष्टींचा यात समावेश करता येईल (उदाहरणार्थ संसदेचे अधिवेशन कधी होते,घटनादुरूस्ती कशी करतात वगैरे वगैरे). तरीही मला माहित असलेल्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश यात केलाच आहे. विकास,धनंजय यांच्या प्रतिसादांमधून त्यात मोलाची भर पडली आहे.अर्थात या विषयावर पी.एच.डी चा प्रबंधही अपूर्णच असेल आणि प्रत्येक गोष्ट अधिक चांगल्या पध्दतीने मांडता येऊ शकते किंवा अधिक गोष्टींचा समावेश जरूर करता येऊ शकतो.तेव्हा आपणही या लेखात राहिलेल्या गोष्टी प्रतिसादांच्या स्वरूपात मांडाव्या ही विनंती.हा लेख अपूर्ण वाटत असेल तर मिपाकरांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत असा अर्थ मी घेत आहे आणि त्याबद्दल धन्यवाद.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

चन्द्रशेखर गोखले's picture

13 May 2009 - 7:11 am | चन्द्रशेखर गोखले

लेख आणि या लेखावरील चर्चा सुद्धा .एकंदरीत मिपा दर्जेदार तर आहेच आधिकाधिक दर्जेदार होत चालले आहे !!

रमताराम's picture

9 Oct 2012 - 12:12 pm | रमताराम

या लेखावरील बहुसंख्य प्रतिसाद मला 'विषय' वगळला तर कोरे दिसताहेत. अशीच समस्या आणखी बर्‍याच धाग्यांबाबत आहे.

हंस's picture

9 Oct 2012 - 1:07 pm | हंस

रराकाकांना अनुमोदन, मला वाटले हा प्रॉब्लेम फक्त मला एकट्यालाच येत आहे.

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Oct 2012 - 10:32 pm | पुण्याचे वटवाघूळ

+१

अमेरिकेत लवकरच होत असलेल्या निवडणुकांच्या पार्स्व्हभूमीवर या लेखातील प्रतिसादही नीट वाचता आले तर बरे होईल. प्रतिसादांमध्येही बरीच उपयोगी माहिती आहे.

अर्धवटराव's picture

19 Oct 2012 - 10:43 pm | अर्धवटराव

चंद्रकांत गोखल्यांचा "वाचनीय" असं शिर्षक असलेला २००९ सालचा प्रतिसाद "नवीन" म्हणुन टॅग झालेला दिसतोय...

अर्धवटराव

क्लिंटन's picture

22 Oct 2012 - 1:07 pm | क्लिंटन

लेखात लिहिले आहे की निवडणुका सम वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी होतात आणि त्यात कोणताही बदल होत नाही. अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे निवडणुका सम वर्षातील नोव्हेंबर महिन्यात "Tuesday following first Monday" होतात. म्हणजेच जर एखाद्या वर्षी पहिला मंगळवार १ नोव्हेंबरला आला तर मतदान १ नोव्हेंबरला न होता ८ नोव्हेंबरला होईल.

माझ्या अमेरिकेतील एका परिचिताने ई-मेल करून मला हे सांगितले.ते मिपाचे सभासद नाहीत त्यामुळे त्यांचे नाव इथे जाहिर न करता या सुधारणेबद्दल त्यांना धन्यवाद देत आहे.