फुंदके.... (खांदेशी भाषेत भेंडके) आणि मानमोडे

योगिता_ताई's picture
योगिता_ताई in पाककृती
26 Feb 2009 - 10:10 am

फुंदके....

साहित्य:
१. तुरीची डाळ ३ वाटी
२. हरभरा डाळ अर्धी वाटी
३. एक चमचा हळद
४. लाल तिखट चवीनुसार
५. एक चमचा धणे पावडर
६. लसूण- आलं पेस्ट दोन चमचे
७. उभे चिरलेला कांदे २
८. चवीपुरते मीठ

कृती :
तुर व हरभरा डाळ घेऊन ती 4-5 तास भिजत ठेवा. नंतर डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाका. हे कोरडेच मिश्रण मिक्सर मधुन रवाळ वाटून घ्या. जास्त पेस्ट बनऊ नका.
मिश्रणात एक चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, दोन चमचे लसूण- आलं पेस्ट, चवीपुरते मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित कालवून घ्यावे.
मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे. पातेल्यावर स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावुन ठेवावी. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करुन चाळणीत झाकुन वाफवण्यास ठेवावे. १० ते १२ मिनीटे चांगली वाफ येवू द्यावी. झाकण काढुन वाफलेले गोळे काढुन ठेवावेत.

मानमोडे

साहित्य:
१. कणीक २ वाटी
२. चिरलेला गुळ अर्धी वाटी
३. चवीपुरते मीठ
४. चिमुटभर सोडा

कृती:
चिरलेला गुळ, मीठ, सोडा गरम पाण्यात टाकून व्यवस्थित कालवून घ्यावे. त्यामधे कणीक टाकुन घट्ट गोळा मळुन घ्यावा. कणकेचे छोटे (पुरीएवढे) गोळे करुन पुरीसारखे जाडसर लाटावे व एका बाजुने तेल लावुन त्याची घडी करावी. तयार पुरीच्या घड्या चाळणीत झाकुन वाफवण्यास ठेवावे. १० ते १२ मिनीटे चांगली वाफ येवू द्यावी. झाकण काढुन वाफलेल्या पुर्‍या काढुन ठेवाव्यात.

वाढण्याची पद्धत:
ताटात फुंदके घेवुन चुरुन तेल टाकावे आणि मानमोड्या सोबत वाढावे. सोबत गरम गरम ताकाची किंवा आमसुलाची कढी... यापुढे विचार तुमचाच "वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे...."

प्रतिक्रिया

सहज's picture

26 Feb 2009 - 10:15 am | सहज

पाकृ छान आहे हो पण तेवढं फोटुच जमवा की. :-)

अवांतर - हे फुंदके व मानमोडे नाव कुठून पडले ह्या छान पदार्थांना? :-)

योगिता_ताई's picture

26 Feb 2009 - 10:23 am | योगिता_ताई

मलासुध्धा माहिति नाही नावाबद्दल...
आम्ही असेच म्हणतो...

समिधा's picture

26 Feb 2009 - 10:27 am | समिधा

छान आहे पण खरच फोटो द्या. त्या शिवाय कसे दिसतात कळणार नाही

चित्रा's picture

26 Feb 2009 - 6:38 pm | चित्रा

असेच म्हणते. हे वरण/चपाती (प्रोटीन/कार्बोहायड्रेटस) एकत्र खाण्याची संधी देत असेल असे वाटते आहे. नवीन पदार्थ कळले, धन्यवाद.

योगिता_ताई's picture

26 Feb 2009 - 10:43 am | योगिता_ताई

पुन्हा केल्यावर फोटो नक्की टाकेल..

चकली's picture

27 Feb 2009 - 10:25 pm | चकली

वेगळ्या आहेत रेसिपी. नक्की करून बघेन. मानमोडे नाव आवडले!
चकली
http://chakali.blogspot.com

मानमोडेला कानोले अस देखिल म्हनतात, पण त्यात गुळ टाकत नाहि.त्या वाफवलेल्या पोळ्या असतात्, चविला फारच छान असतात.फुन्द्केला पण आमच्या खान्देशात फुनके अस अहिराणी बोलीभाषेत म्हणतात.

विसोबा खेचर's picture

6 Apr 2009 - 11:03 am | विसोबा खेचर

आम्ही बिगरफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही, धन्यवाद..

तात्या.