मिपा संपादकीय - समाजाची प्रातिनिधिक प्रतिमा - बहुजनांची की अभिजनांची?

संपादक's picture
संपादक in विशेष
5 Jan 2009 - 12:59 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...

समाजाची प्रातिनिधिक प्रतिमा - बहुजनांची की अभिजनांची?

शितावरून भाताची परीक्षा, असे म्हटले जाते. ते स्वयंपाकघरात लागू होते तसेच बाहेर समाजातही लागू होते का?

मराठी माणसाची, भारतातील अन्य भाषी समाजात जी एक प्रतिमा बनलेली / बनवली गेलेली आहे, ती समस्त मराठी भाषिकांची प्रातिनिधिक म्हणता येते का? अन्य भाषी समाजांच्या प्रतिमांबाबत काय होते आहे?

हे आणि असे अनेक प्रश्न गेला कित्येक काळ माझ्या मनात घर करून आहेत. आज ह्या संपादकीयाच्या निमित्ताने त्यास मोकळी वाट करून देण्याचा मानस आहे.

समाजातील ज्या घटकांचा, अन्य समाजातील कोणत्या घटकांशी संबंध येतो, त्यावर ही प्रतिमा-उभारणी अवलंबून असते. मनोरंजन आणि माहितीची प्रसारमाध्यमे जी प्रतिमा उभी करतात, ती उर्वरीत देशात मुकाट्याने स्वीकारली जाते. ह्या प्रसारमाध्यमांनी मराठी माणसाची चितारलेली प्रतिमा आहे ती - भांडकुदळ आणि अल्पसंतुष्ट नोकरपेशी माणसाची. काय ही प्रतिमा संपूर्ण मराठी माणसाची प्रातिनिधिक मानता येईल?

तामिळ आणि बंगाली भाषिकांचे उदाहरण घेऊन बघू.

तामिळींची प्रतिमा - हुषार, अभ्यासू, कपाळावर उभे वा आडवे गंध लावणारा धार्मिक, शुद्ध शाकाहारी नोकरपेशी. तर बंगाळ्यांची प्रतिमा आहे ती, रसिक, कवि हृदयाच्या आणि हळव्या मनाच्या माणसाची.

तुम्ही जर तामिळनाडूत फिरलात, झक्कास चेट्टीनाड मटण ओरपलंत, तेथे चालण्यार्‍या अनेक चिट-फंडाच्या सुरस कथा ऐकल्यात, तर ही त्यांची प्रतिमा किती तकलादू आहे, हे समजून येते.

तीच गोष्ट बंगाल्यांची. अशिक्षित, अल्पशिक्षित बंगाल्यांशी - जे बहुसंख्येने आहेत -, बोलले की त्यांच्या, ह्या माध्यमांनी चितारलेल्या प्रतिमेला उभे-आडवे छेद जातात!

थोडक्यात, तामिळी काय किंवा बंगाली काय, त्यांच्याविषयीच्या प्रतिमा ह्या त्यांतील बहुजन समाजापेक्षा, अभिजन समाजाचेच प्रतिनिधित्व करतात, असे दिसून येईल.

पण हे मराठींबाबत होत नाही. मराठींची प्रतिमा ही, अभिजन समाजापेक्षा, बहुजन समाजाचेच प्रतिनिधित्व करते.

हा फरक का? आणि हे योग्य की अयोग्य?

फरक आहे तो मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि तिच्या आर्थिक व्यवहारात मराठी माणसाच्या असलेल्या नगण्य सहभागामुळे. वर सांगितल्याप्रमाणे, मनोरंजन आणि माहितीची प्रसारमाध्यमे ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांचा ज्या मराठी लोकांशी संबंध येतो, तशीच प्रतिमा ते उभी करतात.

द्रवीड चळवळीमुळे तामिळनाडूतून हाकलले-हुसकले गेलेले अय्यर-अय्यंगार ५०च्या दशकात तामिळनाडू बाहेर पसरले. साहजिकच हे उच्चवर्गीय तामिळी हीच संपूर्ण तामिळी भाषकांची प्रतिमा बनली.

इंग्रंजांमुळे इंग्रजीशी प्रथम संबंध आलेल्या बंगालमधिल भद्र लोकांबद्दलही असेच झाले. भद्र लोकांची प्रतिमा हीच बंगाल्यांची प्रतिमा झाली.

आता एखाद्या समाजाची प्रतिमा ही त्यांतील अभिजनांचे प्रतिनिधित्व करणारी असावी की बहुजनांचे?

एक अभिजन म्हणून, सुरुवातीला आपल्या ह्या प्रतिमेबद्दल वाईट जरूर वाटते पण अंतीमतः आपण बहुजनांचाच एक भाग आहोत, हे वास्तव स्वीकरणेच योग्य, असे वाटते.

पाहुणा संपादक : सुनील.

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

5 Jan 2009 - 1:40 am | लिखाळ

चांगला लेख.
प्रतिमा नक्की कुणाच्या मनात तयार होत असते ते सुद्धा पाहायला पाहिजे. पण आपण म्हणता तसे या प्रतिमा सार्वत्रिक आहेत असे समजू.
बंगाल्यांबद्दल माझी प्रतिमा भलतीच वेगळी आहे.
>अंतीमतः आपण बहुजनांचाच एक भाग आहोत, हे वास्तव स्वीकरणेच योग्य, असे वाटते.<
हे योग्यच आहे. (मी स्वतःला अभिजन समजत नाही.)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

पांथस्थ's picture

5 Jan 2009 - 1:44 am | पांथस्थ

ज्या पध्दतीची मांडणी आहे त्यावरुन वाटते लेखाचा विस्तार वाढवला असता तर बर्‍याच मु्द्दयांविषयी - संयमित, तार्कीक आणि परिपुर्ण असा - उहापोह करता आला असता

पण जेवढे आहे ते छानच आहे.

- (मराठि माणसाच्या प्रतिमेचा आणि प्रतिभेचा अभिमान बाळगणारा) पांथस्थ

माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

सुनील यांचा चर्चाविषय चांगला आहे.

पण त्यांच्याकडून थोडा अधिक ऊहापोह आवडला असता.

प्राजु's picture

5 Jan 2009 - 1:48 am | प्राजु

पण लेखाची लांबी खूपच कमी वाटली.
मराठी माणसाची प्रतिमा... हा विषय खरंतर किचकट आहे.
याला काही अंशी, इतिहास, बर्‍याच प्रमाणात आपले राज्यकर्ते आणि काही प्रमाणात मराठी मुलुखात येऊन स्थायिक झालेले अमराठी हेही जबाबदार आहेत.
लेख अजूनही विस्तारीत करता आला असता.
बंगाली लोकांबद्दलची प्रतिमा, तामिळ लोकांबद्दलची प्रतिमा .. ही माझ्यासाठी काही वेगळीच आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
पण आपला लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रियाली's picture

5 Jan 2009 - 2:56 am | प्रियाली

मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर स्थायिक न व्हावे लागणे, रोजगाराची उपलब्धता स्वतःच्या प्रदेशात असणे आणि याच बरोबर मराठी माणसाची अल्पसंतुष्ट (चांगल्या शब्दांत समाधानी) वृत्ती, आपण बरे आपले काम (घर, पोरे) बरे ही अलिप्त वृत्तीही जबाबदार असावी.

त्यातून लोकांनी मराठी अभिजनांची ठळक प्रतिमा निर्माण केलेली आहे. कोणताही ६०-७० च्या दशकातला चित्रपट घ्यावा. नायक-नायिका यांची शर्मा, वर्मा, दास, गुप्ता, खन्ना, कपूर यांच्याशिवाय आडनावे आढळत नाहीत परंतु बाई या शब्दाचा अर्थ मात्र कामवाली (आणि तीही मराठी) असा नक्की आढळतो. रामूचाचा हा घरचा नोकर काकांसारखा असतो पण बाई मात्र झाडू-पोता मारणारी. आता कोणी म्हणेल, चित्रपट मुंबईत घडत असेल तर कामवाली मराठीच असणार. हे सत्य असले तरी नायक, नायिका, त्यांचे मित्रमंडळ, शेजारी-पाजारी, पोलीस इन्स्पेक्टर, खलनायक हे सहसा मराठी नसतात. (अपवादः ऋषीकेश मुखर्जींचे काही चित्रपट , दिवारमधला प्रमुख खलनायक सामंत [ज्याला चित्रपटातच अधूनमधून सावंत म्हटलं जातं] असे काही मोजके. गेल्या दशकात बर्‍यापैकी मराठी भाषक पात्रे चित्रपटात निर्माण झाली असे वाटते.)

बहुजनांची प्रतिमा तयार करणे सहसा सोपे असते. ते काम त्या समाजातील,सांप्रदायातील, गटातील किंवा इतर समाजातील,सांप्रदायातील, गटातील मंडळी करू शकतात परंतु अभिजनांची प्रतिमा ही त्या समाजाला स्वतःलाच निर्माण करावी लागते. अगदी, मधुर भांडारकरच्या कॉर्पोरेटमध्येही दोन बिझनेस टायकून्स अमराठी असतात, त्यांचे टॉप एक्झेक्युटिव्ज अमराठी असतात पण एका ट्रेनीचे मध्यम वर्गीय फाईवस्टार हॉटेलला घाबरणारे आई-बाप मराठी असतात.

वरील उदाहरणे फक्त चित्रपट या एकाच प्रसिद्धी माध्यमातील आहेत. ज्या प्रमाणे पंजाबी म्हणजे दिलदार, आनंदी, श्रीमंत. बंगाली म्हणजे रसिक, कलाप्रेमी. दाक्षिणात्य म्हणजे हुशार, धार्मिक, आपल्या लोकांना सांभाळून घेणारे आहे तशी मराठी माणसाची प्रतिमा दुर्दैवाने हलकी कामे करणारे, अल्पसंतुष्ट, मध्यमवर्गीय किंवा भ्रष्ट नेते आणि गुंड अशीच निर्माण केली जाते. (भिकू म्हात्रे, रघुनाथ शिवलकर इ.) जशी पात्रे निर्माण होतात तशी त्यांची अभिव्यक्ती. भिकू म्हात्रे रात्री पु.ल. किंवा जी.ए. वाचतो हे कदापि दाखवले जाणे शक्य नाही. हळवा बंगाली मात्र रविंद्रनाथ ठाकूरांवरच जगत असतो आणि दणकट-दिलदार पंजाबी घरी आलेल्या पाहुण्याला पतियाळा ग्लासातून लस्सी पाजत असतो.

आता सहसा प्रसिद्धी माध्यमांशी संबंध नसलेल्या आमच्या लहान गावात मराठी माणसांची प्रतिमा बघा -

खालील किस्सा एका गुजराथी आणि एका दाक्षिणात्याकडून ऐकावा लागला आहे.

ते: "असे कसे तुमचे मराठी लोक? इतर सर्व भाषकांनी नवरात्रीच्या नऊ दिवशी एक एक रात्र वाटून मंदिरात फुकट जेवण ठेवले, कार्यक्रम केले. मराठी लोकांची (मंडळाची) पाळी आली तेव्हा कोणी आलेच नाही. दोन कुटुंबे होती, तीही आरती नंतर निघून गेली."

माझे उत्तरः "च्यामारी! विक-डेजना घर-दार, पोरं सोडून रात्रीबेरात्री देवळात काय करतात ही माणसं?"

पण प्रातिनिधिक प्रतिमा: मराठी लोकांनी देवळासाठी काही केलं नाही. ऐपत नाही की इच्छा नाही ते कळत नाही. मात्र आम्ही बघा! आम्ही गरबा केला. मिठाई वाटली. पूजा केल्या, जेवणं घातली, कार्यक्रम आयोजित केले वगैरे वगैरे.

(आता अशा प्रतिमा निर्माण व्हायला व्यक्तिशः माझी काहीही हरकत नाही. उगीच धार्मिक वगैरे प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आपलं घर बरं ही प्रतिमा मला आवडेल. इतर भाषकांना त्याचा त्रास होऊ नये अशी आशा आहे.)

माझं मत याबाबतीत असं आहे की, अशा प्रतिमांचा मला फायदा किंवा नुकसान झालेले नाही. फारतर कधीतरी कोणीतरी खवचटपणा करायला या प्रतिमांचा उपयोग करते असा अनुभव आहे. जसे,"क्या तुम मराठी लोग, तुमको खाने-पिने, पैसा खर्च करने का तरिकाही नहीं आता|" असे उद्गार ऐकले आहेत त्यावरताण खवचटपणा मला करता येतो. "क्यों किसी मराठीसे शादी करनी है क्या? नही करनी तो तुम्हारा क्या जाता है| हम लोगोंको जैसा जिना है वैसे जियेंगे|"

एकलव्य's picture

5 Jan 2009 - 5:27 am | एकलव्य

प्रतिमा असणे, घडणे आणि घडविणे हा मोठा गुंतागुंतीचा विषय आहे. चर्चिल यांचे There is no such thing as public opinion. There is only published opinion. हे वाक्य काही अर्थाने येथेही लागू पडते.

असो! लेखाचा विषय आवडला.... आणि लांबीबद्दल म्हणाल तर माझ्यासाठी आजतरी एकदम परफेक्ट!!

- एकलव्य

सहज's picture

5 Jan 2009 - 7:19 am | सहज

विषय इंटरेस्टींग आहे. ह्या धाग्यात मुळ लेखाबरोबर प्रतिसाद वाचण्यात देखील उत्सुकता आहे.

गंमत आहे खरी. एखादा परप्रांतीय, त्यातुन जो थोडाफार शिकला आहे त्याला मराठी माणूस ही प्रतिमा वर लेखात उल्लेख केल्याप्रमाणे वाटली तरी "महाराष्ट्र" म्हणाल्यावर एक स्थैर्य, संधी, प्रगत, पुरोगामी, शांतताप्रिय, स्थलांतरास योग्य असे राज्यच डोळ्यासमोर येत असावे असे वाटते. :-)

बाकी स्टिरीओटाइपचा शिकार कोण नाही? सर्व देशात, समाजात हे कमी जास्त असणारच. बहुदा हे एक मानवी स्वभाववैशिष्ट्य म्हणले पाहीजे.

रामदास's picture

5 Jan 2009 - 7:51 am | रामदास

आवडला.विस्ताराने लिहीला असता तर बरे झाले असते. अर्थात विस्ताराचे काम बाकी मिपाकर करतीलच.

लेख आणि विषय आवडला. वर एकलव्याने म्हणल्याप्रमाणे लांबी एका अर्थी परफेक्ट वाटली पण कुठेतरी लेख म्हणून त्रोटक वाटला. अधिक विचार वाचायला आवडले असते.

मराठी माणूस एकंदरीत (सरासरी) "शो ऑफ" कमी करतो ही वस्तुस्थिती आहे. वर अनेक कारणे आणि उहापोह झाला आहे ज्या संदर्भात मला सहमत आहे असेच म्हणावे लागेल. मात्र समाज म्हणून आपली प्रतिमा बदलावी लागेल असे वाटते. समाज मुद्दामूम म्हणत आहे कारण त्यात माझ्या लेखी "प्रातिनिधीक आणि बहुजन" असे दोन्ही एकत्रीत येतात. आपले प्रातिनिधीक हे बहुजनांपेक्षा वेगळे नसतात हि वस्तुस्थिती आहे. म्हणजे विविध क्षेत्रातील प्रातिनिधीक बघा: स्वातंत्र्यापुर्वीचे आणि नंतरचे पुढारी (अगदी टिळक आगरकरांपासून ते यशवंतराव, एस एम जोशी, ना.ग. गोरे, मृणाल गोरे, पवार, ठाकर्‍यांपर्यंत..), स्मीता पाटील,लता-आशा, पु. ल., गदीमा., (ज्ञानपिठ विजेते) खांडेकर, कुसुमाग्रज, करंदीकर, तसेच वाडेकर-गावस्कर-तेंडूलकर, दया पवार, आमचा बाप अन आम्ही लिहीणारे नरेंद्र जाधव इत्यादी इत्यादी.. यांना कधी जर माहीत प्रतिमेने माहीत नसलेल्या व्यक्तीने बाजारात भाजी घेताना किंवा ८:५२ची लोकल पकडताना पाहीले, तर ते त्या तमाम माणसात वेगळे वाटणार नाहीत इतके ते साधे आहेत. अगदी माधुरी दिक्षितची प्रतिमा वेगळी धरली तरी तिने मध्यमवर्गीय मराठमोळेपण तसेच ठेवले असे अनेकदा वाटते...

शेवटी या प्रतिमा कोण तयार करते? - प्रसिद्धी माध्यमे आहेतच पण तथाकथीत विचारवंत... म्हणजे असे की मराठी माणसाची निगेटीव्ह प्रतिमा तयार करण्यात कधी कधी अ-मराठी (विशेष करून बंगाली) इतिहास संशोधकांचा पण हात आहे असे म्हणता येईल का? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

बर्‍याचदा परप्रांतात/परदेशात जेंव्हा आपण मराठी/भारतीय म्हणून पाहीले जातो तेंव्हा आपले वागणे हेच जणू काही मराठी माणसाचे/भारतीयाचे वागणे आहे असे (त्या त्या संस्कृतीशी) अनोळखी असलेल्या व्यक्तीस वाटून त्यातून "वन पॉईंट एक्स्ट्रापोलेशन" होऊ शकते - जे कधी कधी चांगले असू शकते तर कधी कधी वाईट...

देवळात अथवा इतरत्र स्थानीक भारतीयांच्या कामात मराठी मंडळाने मदत करावी असे मला वाटते. कारण भारताबाहेर जेंव्हा आपण रहातो तेंव्हा आपण एकत्र असावे असे वाटते. अर्थात ते दोन हाताने टाळी वाजत असेल तर... म्हणजे असे की ९९ साली बॉस्टन भागातील लक्ष्मीच्या देवळात गणेशोत्सवासाठी मराठी माणसांनीपण मदत करावी अशी इच्छा असल्याचे समजले. ते देऊळ हे बर्‍यापैकी दाक्षिणात्य प्रभावाखाली असल्याने, मराठी माणूस (आणि इतर अ-दाक्षिणात्य) अपवादाने त्यात स्वतःला सामावून घेयचा. अर्थात देवळात दर्शनाला वर्षाकाठी त्याच जायचा (कारण जवळच त्यावेळचे एकमेव उडीपी भवन होते ;) ). पण त्याला कारण जसे दाक्षिणात्यांनी त्यांच्याच "स्टाईल्स" ठेवल्या आणि त्यांना तसेच ठेवायचे होते, हे होते तसेच मराठी माणसाला देवळात तितकासा इंटरेस्ट नाही हे देखील आहे... असो. तर तेंव्हा मी मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस गणेशचतुर्थीस मराठी माणसांना विनंती केली आणि संपूर्ण जेवण हे मराठी समाजाने केले. "गणपती बाप्पा मोरया" वगैरे ऐकायला आले. "सुखकर्ता, दु:खहर्ता" म्हणायला लागल्यावर तमाम दाक्षिणात्य भाविक चमकले वगैरे वगैरे.. मात्र नंतर परत कधी बोलावणे आले नाही.... आता गंमत अशी झाली आहे की त्याहूनही मोठे स्वामीनारायण मंदीर दुसर्‍या भागात बांधले गेले आहे. तिथे सर्व देवांचे छान मोठे देऊळ पण केले आहे आणि कुणालाही वेलकमींग आहे. आता परत मध्यंतरी लक्ष्मीच्या देवळात गेलो तर तेथे गणपतीच्या देवळाबाहेर "सुखकर्ता दु:खहर्ता" ही आरती मोठ्या वॉलपेपरवर छापून चिकटवलेली, तर लक्ष्मीच्या देवळाबाहेर "ओम जय लक्ष्मी माता" ही हिंदी आरती!

शेवटी जाता जाता एक गंमतशीर अनुभवः अमेरिकेत विद्यार्थीदशेत म्हणून आल्यावर, आजूबाजूस सर्व गुजराथीच होते (रुममेट्ससहीत). त्यांतील काही असेच गप्पा मारताना मला म्हणाले, "तुम्ही मराठी माणसे कसे एकमेकांना धरून असता आणि एकमेकांना मदत करतात", मी एकदम अवाक होऊन (आणि माझी थट्टातर होत नाही ना ह्याची खात्री करून) विचारले कुठे? (वास्तवीक मला कधीपासून म्हणायचे होते): तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बडोद्यातील मराठी समाज असा एकमेकांना खूप धरून आहे आणि मदत करतो वगैरे. पुढे ते असे म्हणाले, "नाहीतर आम्ही गुजराथी... एकमेकांत नुसते भांडत बसतो!"

आजानुकर्ण's picture

5 Jan 2009 - 8:50 am | आजानुकर्ण

विकासरावांशी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहे.

मात्र :)

पण त्याला कारण जसे दाक्षिणात्यांनी त्यांच्याच "स्टाईल्स" ठेवल्या आणि त्यांना तसेच ठेवायचे होते, हे होते तसेच मराठी माणसाला देवळात तितकासा इंटरेस्ट नाही हे देखील आहे...

यात काहीही वावगे वाटत नाही. दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय पूजापद्धती वेगवेगळ्या आहेत. जर मंदिरासाठी प्रामुख्याने दाक्षिणात्यांनी पुढाकार घेतला असेल तर पूजापद्धती त्यांच्याप्रमाणे असाव्यात हा त्यांचा आग्रह योग्य आहे. अन्यथा पूजेचे समाधान लाभणार नाही (किंवा देव कोपेल वगैरे)

मराठी माणसाला देवळात तितकासा इंटरेस्ट नाही हे न पटण्यासारखे आहे. इतर कोणत्याही समाजाइतकाच मराठी माणूस देवभोळा आहे.

तर तेंव्हा मी मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस गणेशचतुर्थीस मराठी माणसांना विनंती केली आणि संपूर्ण जेवण हे मराठी समाजाने केले. "गणपती बाप्पा मोरया" वगैरे ऐकायला आले. "सुखकर्ता, दु:खहर्ता" म्हणायला लागल्यावर तमाम दाक्षिणात्य भाविक चमकले वगैरे वगैरे.

कदाचित सुखकर्ता दुःखहर्ता नंतर पुण्यात गणपतीसमोर डॅन्स होतो तसा मराठी बांधव चालू करतील की काय अशी त्यांना भीती वाटली असावी. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

आपला
(देवभक्त) आजानुकर्ण

मैत्र's picture

5 Jan 2009 - 12:10 pm | मैत्र

आजानुकर्ण यांच्या मताशी मी सहमत आहे.
एक असाच अनुभव म्हणजे लंडनमधली देवळे. इस्ट हॅम या तमीळ बहुसंख्य असलेल्या भागात तसंच एक देऊळ होतं पण त्यांच्या पद्धतीने रचना व पूजा इत्यादि होत्या. देऊळ अतिशय स्वच्छ, नीटनेटकं होतं. तमीळ असून तोडकं मोडकं हिंदी नाहीतर इंग्रजी मध्ये संभाषण होतं. स्वामी नारायण मंदिराबद्दल काय बोलावं! विलक्षण सुंदर, स्वच्छ. आणि अतिशय प्रेमळ गुजराथी आग्रह!!
लंडनच्या महाराष्ट्र मंडळात गणपतीच्या दहा दिवसात दर्शनाला जाण्यासाठी दिलेल्या क्रमांकांवर दिवसातल्या ठराविक दोन तासात संपर्क करून दिलेल्या वेळेनुसार जायचं असतं ! गर्दी होते आणि प्रवेश मिळत नाही!! लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला ७५ वर्षे आत्ताच झाली. एकंदरीत अनास्था या इतर भाषिकांबरोबर तुलना केल्यास फार जाणवते. तिथे कोणी तुम्हाला तुमची भाषा कोणती विचारत नाही. आम्ही राहत असलेल्या छोट्याशा गावात नवरात्रिला गुजराथी लोक आवर्जून बोलवायचे. नवीन गाव - रस्ते माहीत नाहीत, कार नाही तर घरी घ्यायला सोडायला यायचे. तिथे बाजूला न बसवता सर्व पूजा आणि कार्यक्रमात सामील करून घ्यायचे.
फार प्रकर्षाने फरक वाटतो. मराठी ग्रुप असा असणं आधी अवघड आणि असल्यास असं वागणं तर खुपच दुर्मिळ आहे.
गुजराथी, तमीळ आणि पंजाबी यांचं एकमेकांना धरून राहणं बघण्यासारखं आहे.
दिवाळीच्या दिवशी किंवा शनिवारी मीटिंग्जना वेंब्ले पार्क भागात आणि स्वामी नारायण मंदिरात त्यांनी एकी आणि संस्कृती कशी जपली आहे ते पाहून मराठी वागण्याचा विचार मनात येतो. आपल्याला सदाशिव पेठी असण्याचाच अभिमान फक्त.
http://www.mmlondon.co.uk/ आणि http://www.mandir.org/ फरक स्पष्ट आहे.

चांगल्या मुद्द्याबद्दल सुनील यांना धन्यवाद पण विषय अजून मांडायला हवा होता.

आजानुकर्ण's picture

5 Jan 2009 - 8:52 am | आजानुकर्ण

मराठी माणसाची माध्यमांतील प्रतिमा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन विकास प्रकाश जोशी या विद्यार्थ्याने (किंचित आग्रही भाषेत) लिहिलेला हा http://ibnlive.in.com/cfs/blog/52676/2071 लेखही वाचनीय आहे.

सुनीलरावांचा लेख आवडला.

आपला
(दुवादाता) आजानुकर्ण

ऋषिकेश's picture

5 Jan 2009 - 10:43 am | ऋषिकेश

अग्रलेखाचा विषय भयंकर आवडला.. हा विषय (साचेबद्ध) "अग्रलेख" ह्या संकल्पनेपुढे त्रोटक वाटतो तरी वाचकांच्या मनातील प्रश्नाला/भावनेला पुढे आणण्याचे काम चोख बजावतो त्यामुळे हा "क्रिस्प" अग्रलेख आवडला :)

हा विषय माझ्यामनात अनेकदा डोकावतो...

आताच कुर्गच्या ८ दिवसांच्या ट्रेकला गेलो होतो. राष्ट्रीय ट्रेक असल्याने तिथे भारतातील विविध प्रांतातील लोक एकत्र होते. किंबहूना मला असे ट्रेक आवड्याचे एक कारण दरवेळी अश्या ट्रेकनंतर कमी होणारा साचेबद्धपणा हे आहे. ते असो. तर ह्या ट्रेकला एक पुण्याचा काहिश्या जेष्ठ (साधारण पन्नाशीच्या) असा १० जणांचा ग्रुप होता. परंतू ते सबंध ट्रेकमधे कोणाशीही ३ वाक्यांच्यावर बोलले नसतील.. मात्र एकमेकांत भन्नाट टाईमपास चाललेला होता.
सुरवातीच्या एकदोन दिवसांत नवखेपणामुळे असेल म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं.. मात्र त्यांचे हे "रिझर्व्ह्ड/नवखं?/कुचकं?" वागणं शेवटपर्यंत टिकून होतं... शेवटी उगाच "ही मराठी माणसं इतक्या लांब येऊनहि इतरांशी मिक्स होत नाहित तर पर्वतीवरच का ट्रेक करत नाहित " वगैरे टोमणे ऐकायला मिळाले. ज्याला आम्हि योग्य प्रत्युत्तर दिलं हे सोडून द्या पण एक प्रतिमा उगाच तयार झाली..

याच ट्रेकमधे एक गुजराती गृहस्थ होते त्यांची तर मस्त थियरी होती.. ती आठवली म्हणून देतोयः
कोणताहि (इथे मराठी) माणूस एकटा असताना वेगळा असतो तेव्हा तो फक्त तो असतो.. जेव्हा अनेक व्यक्तींचा समुह बनतो तेव्हा त्यांचा मसावि काढला जातो व तो माणूस त्या मसाविला चिकटलेले गुणधर्म वापरायला लागतो.. जसे चार जण जमले व त्यांचा मसावि "मराठी" निघाला की तो माणूस मराठी होतो व मराठी माणसासारखा वागु लागतो .. मात्र जेव्हा चार भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील लोक जमतात तेव्हा तो "भारतीय" होतो व भारतीया सारखे वागु लागतो.. तेव्हा तो ती व्यक्ती नसतो तर समुह असतो

या अग्रलेखाने बरेच विचार चाळवले आहेत.. बरेचरे स्वैर आहेत.. सुचतील तसे देत जातोच :)

-(वैचारीक)ऋषिकेश

विनायक प्रभू's picture

5 Jan 2009 - 10:54 am | विनायक प्रभू

लेख आवडला.

प्रदीप's picture

5 Jan 2009 - 2:03 pm | प्रदीप

प्रतिमा करण्यावरून अथवा जी काही केली गेली आहे, ती जपण्यावरून माझे स्वतःचे निरीक्षण येथे नोंदवतो.

मी गेली अनेक वर्षे जालावरील, भारतीय चित्रपट संगीतांशी संबंधित असलेल्या ग्रूप्समध्ये वावरत आहे. मला हे ठळकपणे जाणवले की बंगाली आपला बाब्या/ बाबी कितीही सुमार असले तरी त्याला/तिला खूपच जपतात. उदा. शान हा अत्यंत सुमार गायक आहे, (डोळे मिटून ऐकावे, सहज जाणवेल). पण त्याच्या गायनाबद्दल कुण्याही बंगाल्याने कधीही काहीही किंचीतही तक्रार केली असल्याचे माझ्या वाचनात नाही, मग हेमंत'दा', किशोर'दा', मन्ना'दा' असे अनेक 'दा' अथवा गीता दत्त, ज्युतिका रे ह्या सगळ्यांची तर बातच सोडा. म्हणजे त्या व्यक्तिंच्या गुणांच्या बाबतीत त्यांची अस्मिता का कोण ती साहजिकच आड येते, हेच लोक आमच्या लता, आशा, रफी वगैरेंच्या चुका काढण्यास तत्पर. पण त्यांना का दोष द्या, आमच्या लता, आशा ह्यांच्या असलेल्या/ नसलेल्या चुका दाखवावयास आमचेच अनेक मराठी वीर पुढे असतात. ह्यातील काहींना मग मी खाजगी पत्रांद्वारे हे दर्शवून दिले. काहींना हे पटले , काहींना नाही.

असेच एक उदाहरण एका अलिकडेच लिहू लागलेल्या मर्‍हाठी चित्रपट विषयक तज्ञ्याचे. ह्या गृहस्थांनी लोकसत्तेच्या पुरवणी अंकात पानभर लेख मुघल- ए- आझमवर लिहीला. त्यात त्याच्या यशात निर्माता दिग्दर्शक, संवाद लेखक व दिलीपकुमार ह्यांचे कसे हात होते ह्याबद्दल त्यांनी खूपच विस्ताराने व अधिकारवाणीने लिहीले. 'मग मी दिलीपसाहेबांना विचारले...' असली सगळी वाक्ये टाकत. पण त्यात एक अनुल्लेख मला पार खटकला. त्यांना मी तसे ई- मेल ने विचारले. त्यात मी त्यांना लिहीले "ह्या प्रदीर्घ लेखात ह्या चित्रपटाच्या अपार यशात ज्या व्यक्तिंचा हातभार लागला आहे, त्यांचे उल्लेख करतांना लताबाईंचे नाव अजिबात घेतलेले नाहीत. लताबाई- आपल्या लताबाई!! का, इथे खास मर्‍हाठी बाणा आड आला?' अर्थातच अनेक मोठ्या व्यक्तिंबरोबर सहजतेने घसट करणारे ते ज्येष्ठ वगैरे लेखक माझ्या ह्या निषेधाची कसली दाद घेतायत?

तेव्हा आपणच सार्वजनिक स्थानी आपल्याच मानाचे स्थान असलेल्या व्यक्तिंना खाली खेचण्यात मग्न असू, आणी इतरेजन त्यांच्या त्यांच्या अगदी सुमार- टुकार जनांना पुढे ढकलण्यात मग्न असतील, तर आपली कसली प्रतिमा, अन कसले काय!

अमोल केळकर's picture

5 Jan 2009 - 5:58 pm | अमोल केळकर

नेहमी सारखे अभ्यासपुर्ण संपादकीय.
बंगाली आणी तामिळांची दिलेली उदाहरणे आवडली. मला वाटते यात गुजराथी देखील अधिक प्रमाणात येतात ( ज्यांची मुंबईत लोकसंख्या लक्षणीय आहे ).
इथे दिलेल्या सर्व प्रतिक्रिया ही अभ्यासपुर्ण
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2009 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषय आवडला !

चेतन's picture

5 Jan 2009 - 7:04 pm | चेतन

लेख चांगला आहे. पण अग्रलेख म्हणण्यास फार त्रोटक आहे.

मुद्दे चांगले वाटले.

प्रसारमाध्यमांनी मराठी माणसाची चितारलेली प्रतिमा आहे ती - भांडकुदळ आणि अल्पसंतुष्ट नोकरपेशी माणसाची.
थोड्याफार प्रमाणात हे खरं आहेही

काय ही प्रतिमा संपूर्ण मराठी माणसाची प्रातिनिधिक मानता येईल?
ढोबळ मनाने राशी भविष्याप्रमाणे मानायचे झाल्यास होय.

अपवाद आहेत पण कमी

अल्पसंतुष्ट चेतन
अवांतरः ठेविले अनंते तैसेची रहावे (अशिच् आपली वृत्ति आहे का?)

नंदन's picture

6 Jan 2009 - 8:17 am | नंदन

वेगळ्या विषयावरचा हा अग्रलेख आवडला. मागे नवलकरांच्या पत्रकार कन्येने यावर एक विस्तृत लेख लिहिला होता, त्याची आठवण झाली. बाकी, अशा गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हेही ज्याचे त्याने ठरवायला हवे. पूर्वग्रह बदलणे अशक्यप्राय असल्याने त्याला द्यायचेच झाले तर कृतीतून उत्तर दिलेले योग्य.

भाषक पातळीबरोबरच हे पूर्वग्रह म्हणा किंवा पिजनहोलिंग म्हणा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसते. याची चुणूक हवी असेल तर गूगलमध्ये शोध घेताना ऑटो-कंप्लीटचा पर्याय निवडा, आणि मुख्य शोधपृष्ठावर व्हाय डू इंडियन्स/फ्रेंच/अमेरिकन्स/जॅपनीज काय हवे ते टंका. गूगल जे पर्याय सुचवते, ते लोकप्रिय शोधांवर आधारित. ते वाचले तर आपण सगळेच कसे इतरांविषयीच्या हजारो गैरसमजुतींचे, दोन पाय फुटलेले होल्डॉल आहोत हे ध्यानी येईल :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

जृंभणश्वान's picture

7 Jan 2009 - 2:11 am | जृंभणश्वान

गूगलने सुचवलेले पर्याय वाचून अवाक झालो !

दत्ता काळे's picture

6 Jan 2009 - 5:42 pm | दत्ता काळे

लेखाचा अजून विस्तार करता आला असता.
मराठी माणसाची प्रतिमा पर्यटक म्हणून चांगली आहे असे मला वाटते आणि तश्याप्रकारची मते अमराठी लोकांकडूनसुध्दा कळाली आहेत. मी डलहौसीला गेलो असताना, मला तिथला एक हॉटेलवाला सांगत होता कि, इथे येणार्या लोकांमध्ये बहुदा गुजराथी, बंगाली आणि मराठी लोकांची संख्या जास्त असते. हेच मत मला हिमाचल प्रदेशच्या काही भागातही सांगितलं गेलं. सांगणार्यांच्या मते इतर मंडळी उदा. दाक्षिण भारतीय, राजस्थानी ( मारवाडी ), पंजाबी, उ.भारतीय हे फक्त तिर्थक्षेत्राच्याच ठिकाणी पर्यटन करतात.

चित्रा's picture

6 Jan 2009 - 7:07 pm | चित्रा

अग्रलेखाचा विषय वेगळा वाटला. अधिक प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते.

मुक्तसुनीत's picture

6 Jan 2009 - 7:31 pm | मुक्तसुनीत

कुठल्याही गोष्टीबद्दल जेव्हा ठराविक साचे (स्टिरिओटाइप्स) बनतात तेव्हा त्यामागे काही ऐतिहासिक सत्य , परंपरा या गोष्टी असतात, पण त्यांचा भाग अगदी नाममात्र असा असतो. न बदलणारे स्टीरिओटाइप्स घडण्यामागे "सतत बदलत असणार्‍या वास्तवाबद्दल बांधून ठेवलेली झापडे" हेदेखील प्रमुख कारण असते.

हा न्याय मराठी माणसाच्या प्रतिमेबद्दलही लागू होईल असे मला वाटते. मराठी माणसाच्या धंद्यात नसण्याबद्दलच्या , "रिस्क" न घेण्याबद्दलच्या , एकूण भारतीय व्यवस्थेमधल्या दुय्यम स्थानाबद्दलच्या ज्या मिथ्यकथा प्रसृत केल्या जातात त्याला खरा छेद दिला जाऊ शकतो याबद्दलच्या डेटाची (विदा) रीतसर छाननी करून. अर्थात, असा विदा बहुदा सहजासहजी मिळणारा नसावा.

राहता राहिली गोष्ट हिंदी सिनेमाबद्दल. त्याच्यातून प्रसृत केल्या जाणार्‍या गोष्टींना कितपत सत्य मानायचे ?