मराठी मागे का पडत चालली?
त्याला जबाबदार कोण किंवा कारणे काय असावीत?
एका दिवसात काही भाषा पसरत नाही, प्रचलीत होत नाही. सामान्यांची बोली वेगळी असते आणि नाटक, साहित्याची भाषा जड आणि प्रासादिक, किंवा क्लिष्टही असते. प्रचलीत भाषेतून व्यवहार होतात, भाषेच्या व्याकरणाची मोडतोडही होते तरीही तीच बोलली जाते.
मराठीला मागे सारून मुंबईत हिंदीच पुढे गेली. व्यवहारात आणि कागदोपत्रांत, परिवहनात.
१. चाळीस पन्नास वर्षे मागे जाऊ. मराठी शाळा खूप होत्या. त्यातूनच विज्ञान गणित शिकलेले काही विद्यार्थी पुढे नावारूपासही आले. शाळेतून कॉलेजच्या इंग्रजी माध्यमात गेल्यावर खूप जणांना जड जाऊ लागले. साधे संभाषण नाही तर अभ्यासही कठीणच. श्रीमंत मुलांनी 'क्लासेस' मध्ये जाऊन अभ्यास भरून काढला. पण त्याच वेळी इंग्रजी शाळांतून आलेली सामान्य मुलेही चमकू लागली कारण संभाषण ही अडचण मुळीच येत नव्हती. मराठी शाळेप्रमाणेच गुजराती शाळांतील मुलेही असतं. पण त्यांचा सर्व भार फक्त थोडेफार कॉलेज करणे आणि 'धंध्याला' लागणे असे. शिक्षणाधारित नोकऱ्या पकडणे हा नसे. मराठी मुलांना आणि पालकांना हे चांगलेच जाणवू लागले. पुढे स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा नडू लागल्या. त्यांत इंग्रजी संभाषण, संवाद, गट चर्चा अवघड जात. पालकांचा कल इंग्रजी शाळेत मुलांना पाठवणे हा वाढला. तिकडे मराठी गौण दुय्यम भाषा झाली. मग काही मराठी शाळांनी तर ' सेमी इंग्लिश' सुरू केले. मराठी शाळांचे प्रवेश कमी होत जात शेवटी बंद पडल्या. तर मराठीची ही मागे पडण्याची सुरुवात. इकडे समाजातील मान्यवर, राजकारणी यांनी लक्ष दिले नाही. मराठी शाळांसाठी एक विशेष इंग्रजी अभ्यासक्रम सुरू केला असता तर मराठी शाळाही टिकल्या असत्या, मराठी टिकली असती, काळानुरूप इंग्रजीचीही हेळसांड झाली नसती.
२. मुंबई कशी झाली वाढली हेसुद्धा पाहाणे गरजेचे आहे. मुंबई हे मुख्य बेट धरून सात बेटे ही इंग्रजांना पोर्तुगीजांकडून मिळाली त्याचं पोर्तुगीज नाव त्यांनी Bom bay ठेवलं होतं म्हणजे good harbour. चांगले बंदर. मूळ रहिवासी कोळी आणि सीकेपी सावकार. त्या सात बेटांचा विकास करून जोडून एक मोठं मुंबई बेट इंग्रजांनी बनवून बंदरातून व्यापार सुरू केल्यावर इकडे प्रथम पारशी, बोहरी, गुजराती, राजस्थानी( मारवाडी म्हणत) आले आणि व्यापारात घुसले. अगोदरचा व्यापार अफूचा ( बिहार, बंगाल, मध्यप्रदेशात पिकलेली अफू चीनला पाठवणे), कापसाचा ( इंग्लंडला पाठवणे )होता. तिकडून कापड येत असे. मग इकडेच कापड गिरण्या सुरू करायची कल्पना निघाली. स्वदेशी मिल पहिली. मग पंचवीस वर्षांत पन्नासएक गिरण्या सुरू झाल्या. मालक पारशी किंवा गुजराती. कामगार आणि बाबू कोकणातले आले. तर यावेळी मराठी माणूस मुंबईत आला. त्यांच्या राहण्यासाठी गिरगाव ते दादर भागांत मिल मालकांनी मोठ्या इमारती ( चाळी) बांधून दिल्या. नोकऱ्या वाढल्या तशी वस्ती वाढली. सर्व राज्यांतून हुन्नरी लोक मुंबईत आले. गुजराती, कच्छी छोटे मोठे दुकानदार कापड आणि वाणी सामानाची दुकाने उघडून बसले. मुंबई ठाणे परिसरात स्टील, केमिकल, औषधे यांचे कारखाने उभे राहिल्यावर विविध स्तरातील कर्मचारी वर्ग विविध राज्यांतून मुंबईत आला. त्यांची भाषा मराठी नव्हती. इमारती उभारणारे सिंधी पंजाबी राजस्थानी ' बिल्डर' आले. पण बांधकाम मजूर आंध्र, राजस्थान आणि बिहारचे आले. मुंबईतील रेल्वे, वीज आणि पाणी व्यवस्थेमुळे आणि पोटाचा व्यवसाय मिळण्याच्या खात्रीने वस्ती अफाट वाढत विरार, कल्याण व्यापून टाकले. एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के मराठी माणूस राहिला. मुंबईत जन्म झालेले कित्येक लोक मराठीचा 'म' न बोलताही चाळीस वर्षे राहात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे व्यवहार सुरळीत चालत आहेत.
३. एकजूट करा, आपली अस्मिता टिकवा, मिळून मिसळून राहा एवढेच सांगतो.
प्रतिक्रिया
6 Jul 2025 - 1:39 pm | कर्नलतपस्वी
इतर प्रांतात मातृभाषे बरोबर हिन्दी शिकवतात. जसे राजस्थान मधे राजस्थानी,पंजाब पंजाबी, हिमाचल डोग्री. हिन्दीभाषीक प्रदेशात सुद्धा स्थानिक मातृभाषा वेगळी जसे उत्तर प्रदेश मधे अवधी,बुंदेली,ब्रज गढवाली,कुमाऊनी,गोरखाली इत्यादी. तीथे कधीच असा वाद ऐकायला मिळाला नाही. मग मराठीतच का?याची काही कारणे सांगता येतील काय?
6 Jul 2025 - 2:29 pm | कंजूस
त्या राज्यांची हिंदी उदरनिर्वाहाची भाषा आहे.
6 Jul 2025 - 3:40 pm | माहितगार
* त्रिभाषासूत्र, दुटप्पी हिंदी राज्ये?
* हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे
6 Jul 2025 - 4:27 pm | तुर्रमखान
भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना
कोणतीही भाषा टिकवण्यासाठी आणि तिला समृद्ध करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची नितांत आवश्यकता असते. या केवळ मराठीसाठीच नव्हे, तर भारतातील इतर प्रादेशिक भाषांसाठीही कमी-जास्त प्रमाणात लागू पडतात.
१. अधिकृत शब्दकोश आणि नवीन शब्दांची निर्मिती
आपल्या भाषेत सातत्याने नवनवीन शब्दांची निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी, एक अधिकृत आणि प्रमाणित शब्दकोश असणे अनिवार्य आहे, जिथे प्रत्येक नवीन शब्दाला मान्यता दिली जाईल. यामुळे भाषेला एक अधिकृत संदर्भ मिळेल आणि शब्दांचा वापर अधिक सुसंगत होईल. प्रत्येक संकल्पनेसाठी आपल्या भाषेत एक मान्यताप्राप्त पर्यायी शब्द असावा.
२. मातृभाषेतून सक्तीचे शिक्षण
सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जिथे किमान ९०% विद्यार्थी शिक्षण घेतील. या शाळांमध्ये मातृभाषेतून सक्तीचे शिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण त्यांच्या स्वतःच्या भाषेत मिळते, ज्यामुळे त्यांची आकलनशक्ती वाढते आणि भाषेची पकड मजबूत होते.
३. उच्च शिक्षणात मातृभाषेचा वापर
वरील उपाययोजना अंमलात आणल्यास भाषेचे केवळ अस्तित्वच टिकणार नाही, तर तिचा विकासही होईल. नवीन शब्दांची निर्मिती होईल आणि विद्यार्थी मातृभाषेतून उच्च शिक्षण घेण्यास सक्षम होतील.
व्यापक दृष्टिकोन
हे केवळ मराठीपुरते मर्यादित नाही, तर भारतातील जवळजवळ सर्वच प्रादेशिक भाषांसाठी हे सत्य आहे. अनेकदा हिंदी भाषिक राज्यांतून होणारे स्थलांतर हे देखील प्रादेशिक भाषांवरील दबावाचे एक कारण असू शकते. युरोपप्रमाणे, जर भाषावार प्रांतरचना अधिक काटेकोरपणे झाली असती, तर मराठी, कन्नड, किंवा तमिळ भाषा कदाचित फ्रेंच आणि जर्मन भाषांच्या पंक्तीत जाऊन बसल्या असत्या. अर्थात, हे केवळ भाषिक चर्चेच्या अनुषंगाने आहे. मोठ्या देशाची सॉफ्ट पॉवर, तसेच 'फक्त मराठीच का, कोकणी किंवा वर्हाडी का नको?' आणि हे कुठे थांबवायचे, असे अनेक प्रश्न यासोबत येतातच.
6 Jul 2025 - 9:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मराठी मागे पडली आहे असे वाटत नाही. मुंबई-परिसराच्या समस्या ह्या त्या परिसराच्या- आर्थिक आहेत. गेल्या ६०-७० वर्षात मराठी माणसाला(मुंबई परिसरातील) एक प्रकारचा हा भाषिक न्युनगंड आहे. आपल्या समस्यांना ईतर भाषिक जबाब्दार आहेत असा त्याचा गैरसमज आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम राजकीय पक्षांनी, विशेष करून शिवसेनेने केले.
इंग्रजी आपण सर्व भारतियांनी अंगावर ओढवली आणि ती बोकांडी बसली. तिचे आकर्षण आणि तिचे फायदे ह्यामुळे भारतिय प्रेमात पडले आणि मग साहजिकच भारतिय भाषा जशा वाढायला हव्या होत्या तशा वाढल्या नाहीत.
6 Jul 2025 - 10:30 pm | कंजूस
वस्तुस्थिती आहे.
>>एक प्रकारचा हा भाषिक न्युनगंड आहे. आपल्या समस्यांना ईतर भाषिक जबाब्दार आहेत असा त्याचा गैरसमज आहे. >>मुंबईत रेल्वे, बसमध्ये प्रवास करतानाही समजेल दहापैकी आठ अमराठी आहेत. पण त्यांना घालवणार कसे?
8 Jul 2025 - 7:50 am | युयुत्सु
त्याला जबाबदार कोण किंवा कारणे काय असावीत?
मराठी मागे पडली आहे का?
माझे मत- हो मराठी मागे पडली आहे. याचे अनेक पातळ्यावर उत्तर शोधता येते. माझ्याकडे १९०५ च्या सुमारास प्रसिद्ध झालेला जाड-जूड द्विखंडात्मक सरस्वती-कोश हा मराठीचा शब्दकोष आहे. आज या कोशात समाविष्ट केलेले २०% शब्द पण वापरात नसतील. म्हणजे आज जर मराठी भाषेचा शब्दसंग्रह (लेक्सिकॉन) तयार करायचा झाला तर तो आकाराने सरस्वती-कोशाच्या २०% पण नसेल. फक्त क्रियापद मराठी म्हणून आज बोलल्या जाणार्या भाषेला मराठी म्हणणे मला तरी पटत नाही.
याची कारणे काय?
जैविक पातळीवर याचे योग्य उत्तर मिळते - मेंदूच्या भाषिक विकासाला मर्यादा आहेत. माझ्या लहानपणी वृत्तपत्रीय भाषा 'आदर्श' आणि शुद्ध मानली जायची. आज तो मान वृत्तपत्रांनी गमावला आहे.
7 Jul 2025 - 12:08 am | शशिकांत ओक
मित्रांनो
आपल्याला ३ भाषा समजतात बोलायला लिहायला येतात ही आपली भाषिक श्रीमंती आहे. तमिळांना प्रांताबाहेर तोंड उघडता येत नाही. बंगाली लोकांना नीट हिंदीत बोलता येत नाही. मराठी माणसांना परदेशात इंग्रजी येते म्हणून उच्च शिक्षण व नोकरी मिळते. चिन्यांना, युरोपियनांना आधी इंग्रजी शिकायला लागते. कॅनडात पंजाब्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ड्रायव्हरची कामे मिळतात.
7 Jul 2025 - 2:16 pm | माहितगार
एक समतोल दृष्टीकोण: भारतातील भाषा वाद: हिंदी विरुद्ध बिगर-हिंदी - डॉ. विकास दिव्यकीर्ती युट्यूब पॉडकास्ट दुवा
7 Jul 2025 - 3:10 pm | विवेकपटाईत
जी भाषा रोजगार देते लोक ती भाषा शिकतात. जोपर्यंत मराठीत उच्च शिक्षण तिला जात नाही महाराष्ट्रातील मराठी मुले ही मराठी शिकणार नाही. देशातील इतर लोकांची संवाद साधायला हिंदी शिकावी लागते. आपल्या देशातील प्रशासन व्यवस्था अजूनही ब्रिटिश सिस्टमची गुलाम आहे. आज ही अंग्रेजी सोडून मराठी हिंदी बंगाली कोणताही भाषेत उच्च शिक्षण नाही. मराठीत उच्च शिक्षण दिले जाईल तर महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी शिकतील.
बाकी आज जो विवाद आहे तो उर्दूला दुसरी भाषा करण्यासाठी आहे मराठी प्रेमासाठी नाही. हिंदी जर शाळेत शिकविली जाणार नाही तर उर्दूला दुसरी भाषा करणे सहज शक्य आहे.
7 Jul 2025 - 3:57 pm | अभ्या..
हा भंकस आयडी आहे. काहीही ठोकायचे हेच काम आहे.
किमान चार ठिकाणी हाच उल्लेख आहे.
काय पुरावा आहे ह्याचा? कोण करणार आहे हे? कधी ठरले? कुणी ठरवेले? काही लिंक वगैरे असली तर द्या. पार्कमदे टहलताना ऐकला असले सांगू नका.
.
हे फक्त भाषिक मुद्दा धार्मिक तेढ वाढवायचा आहे इतकेच.
आणि तसे पाहता उर्दू ही भारताचीच हिंदीसारखीच राजभाषा आहे, तिचा जन्मही भारतातलाच आहे मग प्रॉब्लेम काय आहे?
7 Jul 2025 - 3:50 pm | अभ्या..
प्रश्न किति भाषा हा नाहीचे. कधीपासून हे महत्त्वाचे आहे. आणि एखादी भाषा तीच का ह्याचेही संयुक्तिक कारण दिले तर महत्त्वाचे आहे.
.
मी स्वतः महाराष्ट्रातल्या बहुभाषी सीमाभागात्ल्या गावात राहिलो आहे. आईची भाषा म्हणजे मातृभाषा असे असेल तर माझी कन्नड आहे मातृभाषा पण माझी आई स्वतः इंग्रजीमाध्यामात शिकली. अगदी मिशनरी शाळात. कारण आजोबा रेल्वेत. पण ती स्वतः मराठी शाळेत शिक्षिका होती. आम्हाला मराठीच शाळेत शिकवले. हिंदी पाचवीपासून विषय होता. संस्कृत आठवीपासून. आता त्याचा सुभास्षितांचा आणि रुपांचा व्यवहारात किंवा व्यवसायात काडीइतकाही उपयोग झाला नाही हि गोष्ट अलहिदा. पण सोलापुरात कन्नड तेलुगु चालते. चालते म्हणजे कामापुरते समजते बहुसंख्यांना. आता त्या भाषा कशा असतात सोलापुरात तर कन्नड शाळा आहेत, तेलुगु पण आहेत ठराविक समाज त्या भाषा वापरतात. म्हणजे लिंगायत कन्नड, पद्मशाली तेलुगु. पण त्या सर्वाना मराठी येतेच. हेल थोड वेगवेगळा असतो पण त्यावरुन कुणी काही अडू देत नाही. सोलापुरात अगदी पक्का आंध्रनिवासी किंवा कन्नडिग आला तर त्याचे अडत नाही कारण मराठी भाषिकांना ती भाषा थोडीफार समजते पण गावात रोज व्यवहारात तिन्ही भाषा समोरचा माणूस बघून वापरल्या जातात. त्यात कुणी अस्मिता, संस्कार, धर्म आणत नाही. अगदी एखादा पक्का कानडी जरी आला दुकानात आणि अस्सल कन्नड ओढू लागला तरी मराठी दुकानदार जवळपासच्या एका कानड्याला सांगेल " नोडरी आपा, येन अर्थ वागुतिल्ला. स्वल्प नोड' मग त्या कानड्याला काय पाहिजे ते मिळते बरोबर पण धंदा थांबत नाही. तसेच तेलुगु चे पण. आणि हे सगळे विजापूर वेशीत बेगम पेटेत गेले की दखनी किंदी पण जोरात हाणतात. " क्या करतंय क्या की" स्टाइलचे.
पण हे सर्व चालताना कुठे अ तिक्रमण होतेय असे वाटले नाही. पण एक महत्त्वाचे. मराठी हि सगळेजण शाळेत शिकलेलेच असतात. बाकी इतर भाषा लोक व्य्वहारात शिकतात. शाळेत नाही. कन्नड किंवा तेलुगु शाळात दुसरी भाषा मराठी असतेच शिवाय रोज मराठी वातावरणात ति मुले मराठी बोलतातच.
बर मराठी किंवा हिंदी घेतली तरी त्याचे कित्येक डायलेक्ट आम्हाला पहायला मिळतात. जोडीला काही जातीजमाती त्यांची बोलीभाषा वापरतात आपाप्सात बोलायला. बंजारा आहे, लोदी समाजाची आहे, सावजी समाजाची आहे, राजपूत समाजाची आहे, बेडर, वडर, पारधी ह्याच्या भाषा आहेत, तुळू आहे, रायलसीमा भागातली आहे, सर्वांना मराठी येत असतेच पण त्यांच्या भाषा पण त्यांच्याशी संबध असणारे लोक त्यांची भाषा समजतात.
ह्या सर्वाचा अर्थ तुमच्या गावाची एक कोणती तरी एकच भाषा पाहिजे किंवा महाराष्ट्रातले गाव आहे तर मराठीच सक्तीची आहे असा बिल्कुल वाटला नाही. गरज असेल तर कशीही भाषा शिकली जाते. आता तर कित्येक तंत्रज्ञानाची साधने उपकरणे जोडीला असतात. पण कुणी मी हिच भाषा बोलणार आणि माझ्याशी त्याच भाषेत बोला असा असेल तर अवघड आहे.
राहता रहिला हिंदीचा विषय तर पूर्वापार चालत आलेले हे मल्टीलँग्वल वातावरण बदलले कधी तर विनानुदानित इंजिनिअरिंग कॉलेजे जशी आली तशी परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली. इंजिनिअरिंग कॉलेजात हिंदी ही वापराची भाषा झाली. अगदीच अस्खलित इंग्रजी जमत नसली तरी इंग्लिश मिष्रित हिंदी हा फॅशन ट्रेन्ड झाला. ते लोण हळूहळू इतर कॉलेजात पसरले. आधी हिंदी चित्रपट टीव्हिमुळे समजायचे सर्वांना पण वापर नसायचा. तो वापर ही सुरु झाला. आधि साताठ भाषा येणारे फिरते व्यापारी जाऊन त्यांची जागा फक्त इंग्रजी आणि हिंदी येणार्या मार्केटिंग वाल्यांनी घेतली. त्यांच्या हिंदी रेटण्याला हिंदीत बोलणे हाच एक पर्याय शिल्लक ठेवला गेला. कारण इंग्रजीची भीती. मग तसेच हिंदी सगळीकडे पसरत गेले. चूक मारवाडी गुजराती दुकानदारांची नसते. खरे पाहता पक्क्या व्यापारी जाती त्या. आपण हिंदी बोलतो त्यांच्याशी. मग त्यांना तेच सोयीचे वाटते. त्यांचीही मातृभाषा हिंदी नसतेच. ते आपापसात राजस्थानी किंवा गुजरातीत बोलतात. त्या दोन्ही भाषा मराठीला जवळ आहेत हिंदीइतक्याच. पण आपण हिंदीला बसवून ठेवतो डोक्यावर. उडपी हाटेलात जाऊन हिंदी हाणणार. तूळू लोकांना मराठी चांगली समजते हिंदीपेक्षा. पण मराठी लोकांना हिंदी येतेच हा जो समज आहे हिंदीभाषिकांचा तो काढला की बर्याच गोष्टी सोप्या होतील.
मग शाळेत कोणत्या वयात किती भाषा शिकवायच्या ते बालमानसशास्त्र जाणणारे ठरवतील. कशा आणि कुठे शिकायच्या ते सरकार ठरवेल. त्यातून आपल्याला काय शिकायचे ते आपल्यालाच ठरवायला पाहिजे.
.
आमचे लेकरु निदान सहा तरी भाषा शिकणार हे मात्र नक्की.
7 Jul 2025 - 6:12 pm | कंजूस
सहमत अभ्या..
वाद घालणारे लोक मुंबईबाहेर हिंडले तर कळणार ना काय चालले आहे.
मी कर्नाटकात गोकर्ण, उडुपी इकडे मराठीतच बोललो. त्यांना समजते आपली मराठी. शिवाय तिकडे किनारपट्टीला राहणाऱ्यांना कन्नडापेक्षा मराठी जवळची वाटते. कारवार गोकर्ण भागात कारवारी भाषा आहे. उडुपी, मंगळुरूकडे तुळू भाषा आहे. तुळू लिपी नाही म्हणून तिला मान्यता नव्हती. परंतू तिकडच्या देवळांतल्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी तुळू लिपी जतन केली आहे ती दिली. आता त्यांनी सरकारकडे अर्ज केला आहे. मी कन्नड आणि तुळू शिकत आहे. प्रवासात फायदा होतो.
लहान मुलांवर एवढे भाषांचे ओझे कशाला असे काहींना वाटते परंतू त्यांना भाषा लवकर येतात. आता प्रश्न राहिला की हिंदीच कशाला? मग तुम्हीच सुचवा कोणती शिकायची आहे? तेलगू/तमिळ/कन्नड/गुजराती/ बंगाली?
7 Jul 2025 - 6:57 pm | अभ्या..
लहान मुलांना लवकर भाषा येतात ह्याचा अर्थ इतकाच आहे की लहान मुले कोरी हार्ड डिस्क घेऊन आलेली असतात. मिळेल ते ज्ञान्प्राप्तीची आस असते ती. मिळालेले ज्ञान वापरायची / काय होते ते बघायची उत्सुकता असते. भाषा कोणत्याही वयात शिकता येते पण तितकी गरज असणे आणि पूर्वग्रह नसणे हे खूप महत्त्वाचे आहे. अगदी अॅकेडेमिक्स नेच भाषा शिकणे आणि व्यवहारात भाषा षिकणे ह्यात फरक आहे. संस्कृत आम्ही शिकलो पण येते का बोलता? तर नाही. का? तर उत्तर आहे वापरात नाही म्हणून. मुले शिकतात भाषा का तर त्यांच्या कानावर ते पडते सतत म्हणून. त्याचा संपर्क माध्यम म्हणून उपयोग होतो हे कळते म्ह्ण्णून. ह्याचा अर्थ असा नाही की लहान मुलांची कोरी हार्ड आहे तर भरा पटापटा. कल हा पण महत्त्वाचा आहे. एक छोटेसे उदाहरण आहे घरातच. माझ्या मेव्हणीच्या ४ वर्षाच्या बोलण्यात समस्या होत्या थोड्या. स्पीच थेरपिस्ट वगैरे झाले पण शेवटी एक विचारणा झाली तज्ञाकडून की घरात कोणती दुसरी भाषा वापरता का बोलायला. उत्तर आले "हो". माझ्या सासरच्या समाजाची भाषा आहे ती. ती घरातच आणी मर्यादित नातेवाईकात ऐकली जाते. बाहेर कुठे नाही तर त्या छोटीचे त्या भाषेचे कन्फ्युजन व्हायचे. हे ऐकल्यावर तज्ञाने सल्ला दिला घरात मराठीच बोला जे समाजात चालते, तिच्या कानावर पडते. भले शाळा इंग्रजी असेल पण संपर्क आणि तोही दैनंदिन उपयोगी पडणारा असेल तर ती भाषा मूल शिकेल. अन्यथा घोकंपट्टी नुसती. बॉलिवूड आणि टीव्ही पाहून आपण शिकलेली हिंदी हि सुध्दा संपर्कपुरती आहे. वाटल्यास हिंदी साहित्ये किंवा कविता वाचून पाहा. कित्येक शब्द कळतही नाहीत आपल्याला तेंव्हा आपल्याला चांगली हिंदी येते हाही समज अर्धवटच आहे.
तेंव्हा लहान मुलांना शिकवायचा विचार करता भाषा हेच एक संपर्क माध्यम नसावे ह्या मताचा मी आहे. चित्रकला आहे, संगीत आहे, अभिनय आहे, अगदी हातवार्यांची पण भाषा असते, स्पर्षाची भाषा असते. त्यापैकी काही कल पाहून द्याव्यात. सुरुवातीला एक संपर्क भाषा म्हणून राज्यभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषा असावी. पण भाषेचे फारसे दडपण असूच नये मुलांवर ह्या मताचा मी आहे. मुलांमध्ये कल तयार करण्याची व्यवस्था असू नये, कल ओळ्खण्याची आणि त्याला वाव देण्याचे व्यवस्था असावी. मग भले त्या मुलाने शाळेतल्या २ भाषा सोडून इतर काही शिकल्या, त्या वापरल्या, त्याचा व्यासंग केला तर कीतीहि भाषा ह्याचे लिमिट नाहीचे. त्या मार्काची बंधने घालू नका फक्त. स्कोरिंग आले की गंतव्य स्कोरिंग च राहते. ते झाले की उपयोजन संपते.
8 Jul 2025 - 1:03 am | कंजूस
मग सरळ सरळ त्रीभाषा सूत्रीलाच आव्हान द्यावे कोर्टात. दोन भाषेंचीच मागणी करा. कोर्टात वादविवाद करा आणि तिसरी भाषा रद्द करायला लावा. यासाठी दक्षिणेतील राज्येही सहमत होतील. त्यांच्या राज्याची भाषा आणि इंग्रजी . फक्त महाराष्ट्रातच हिंदी हवे की नको हा विषयच बाद होईल. अर्धी लोकसंख्या नाही म्हणेल तर कोर्ट काय करेल? सगळे अहवाल ठेवा बाजूला. राजकारणच बंद होईल. कोर्ट वेगळे आणि विधान सभागृह वेगळे. तुम्हीच सभेमध्ये केलेले कायदे नियम पाळले जातात का तपासणे आणि आलेल्या अर्जांचा विचार करून निर्णय देणे एवढेच कोर्टाचे काम असते. शिवाय तुम्हीच( महाराष्ट्र सरकारने,मविआ सरकारने ) पूर्वी एक समिती नेमून( माशेलकर समिती ) भाषा शिकण्याचा अहवाल मागवला होता आणि तो स्विकारला होता. पण एक वर्षानंतर कोणत्याही निर्णयाचा पुनर्विचार करून रद्द करता येतोच. पण यासाठी धाडस हवे, लढा देण्याची तयारी हवी.धमक हवी. नेतृत्व हवे.
8 Jul 2025 - 1:19 am | अभ्या..
मी कशाला आव्हाने देत बसू?
आमची झाली नैया पार आता.
जर्मनी मध्ये पण इंग्रजीचा महिमा कळायलाय जर्मनाना. थोडं थोड बोलतात.
तोपर्यंत मी शिकेन जर्मन.
लेकराला तर फुकटात होईल शिक्षण.
जेव्हा कंटाळा येईल तेव्हा पुन्हा येऊ की मराठी बोलायला पुण्यात.
तोपर्यंत कोण किती लढते मराठी साठी ते पाहू.
.
इथे लढायला मात्र आहे बरका संपादक राहू देतील तोपर्यंत.
8 Jul 2025 - 8:40 am | कंजूस
तुम्ही म्हणजे राज्य सरकारे हो.
दक्षिणेतील चार राज्यांना हिंदी नको आहे.दोन भाषा पुरे आहेत. महाराष्ट्रातही हेच करा.
8 Jul 2025 - 1:07 am | कंजूस
प्रत्येक राज्याची राज्यभाषा शिकण्याची सक्ती आहे ती ठेवा.
मंत्र्यांना ज्या कोणत्या दुसऱ्या भाषेत भाषणे ठोकायची आहेत ती ठोकू द्या. दुभाषा ठेवा. काम सोपे आणि प्रश्नच मिटतील.
8 Jul 2025 - 1:20 am | रीडर
अत्यंत योग्य मुद्दे मांडले आहेत
राज्यातील प्राथमिक शिक्षणातील सगळे प्रश्न जणू संपले आहेत आणि पहिलीच्या लहान मुलांवर तिसरी सक्तीची भाषा लादणे इतकं एकच कार्य राहिलं असल्यासारखा उतावळेपणा कशासाठी चाललाय...
मुलं मागे पडू नयेत असं वाटतंय तर आधी आहेत ते विषय शिकवायला शिक्षकांची सोय करा म्हणावं.. ते विषय शिकवा म्हणावं ऑनलाईन का काय शिक्षक नसेल तर...
अभिजात भाषेचा दर्जा याचसाठी दिला होतं वाटतं.. घ्या तो दर्जा आणि बसा जुनं साहित्य कवटाळून... व्यवहारात मात्र मराठी भाषेचं महत्त्व systematically कमी करत राहून, तिला अडगळीत टाका...
उर्दू दुसरी राजभाषा करणार अशा वावड्या आणि अफवा तर धन्यच