॥ श्रीगणेश स्तवन ॥
जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु.॥
तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे
मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे
सुमुख तुझे स्मरता अवघे खल, पापविचार, दशा हरती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥१॥
मुनिजनपूजित वेदपुरस्कृत लौकिक सर्व दिशांत वसे
चरण शुभंकर पंकज कोमल लीन जिथे मम शीश असे
गजवदना तव आशिष मंगल दुःखनिवारण ते करती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥२॥
भवभयहारक दुष्टनिवारक अंकुशधारक रुद्रसुता
शुभगुणकानन तू करुणाघन तूच महोदर विश्वपिता
कलियुग हे घनघोर धरेवर घे अवतार गुणाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥३॥
स्वरसुमने नित अर्पियली तुज नादप्रतिष्ठित छंदपती
अवतरती स्तवनात निरागस भक्तिसुधारसयुक्त श्रुती
निसदिन जे भजती प्रथमेश्वर, ते भवसागर हा तरती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥४॥
वृत्त - हंसगती
गीत : दीपाली ठाकूर
संगीत : श्रद्धा प्रभु
संयोजन : संदीप फाटक
स्वर : प्रज्ञा गावंड, निलेश नाईक, केतकी सावंत, नितीन सावंत, सोहम फाटक आणि श्रद्धा प्रभु
तबला : रुपक वझे
सितार : मंदार नामजोशी
संवादिनी : शिवहरी रानडे
बासरी : राजेश रूमाओ
प्रोग्रामिंग : मयूर पाटील आणि चिराग ढोके
रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग : सोहम फाटक - सृजन विरार स्टुडिओ.
छायाचित्रण : आदित्य चौधरी
व्हिडिओ एडिटिंग : श्रद्धा प्रभु आणि सोहम फाटक
चित्रीकरण स्थळ : श्री गणेश मंदिर - पुरापाडा - विरार (प.) आणि लेले बंधू यांचे श्रीगणेश दर्शन कला केंद्र - आगाशी.
प्रतिक्रिया
7 Sep 2024 - 9:53 am | कर्नलतपस्वी
गणपती बाप्पा मोरया.
7 Sep 2024 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गणेश स्तवन सुंदर झालंय गीत आणि साज संगीत मजा आगया.
वृत्तात लिहिण्याचं कायम कौतुक आहे. पुलेशु.
मिपास १८ व्या वर्धापनदिनाच्या खुप शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
7 Sep 2024 - 10:22 am | अमरेंद्र बाहुबली
छान
7 Sep 2024 - 11:14 am | ज्ञानोबाचे पैजार
गणपती बाप्पा मोरया
पैजारबुवा,
7 Sep 2024 - 11:27 am | टर्मीनेटर
मस्त! व्हिडिओही छान आहे 👍
7 Sep 2024 - 2:51 pm | बिपीन सुरेश सांगळे
वावा !
सुरुवात गणेश स्तवनाने .
जबरदस्त !
दीपालीजी ,
खूप अभिनंदन ! खूप मस्त . आणि खूप शुभेच्छा !
7 Sep 2024 - 5:27 pm | Bhakti
सुंदर!
7 Sep 2024 - 7:34 pm | प्रचेतस
अतीव सुंदर.
श्री गणेश लेखमालेची उत्तम सुरुवात.
9 Sep 2024 - 4:59 am | राघव
अप्रतीम! खूप आवडले.
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! :-)
19 Sep 2024 - 9:15 pm | चौथा कोनाडा
व्वा ... सुंदर झालंय गणेश स्तवनगीत !
व्हिडिओही एक नंबर !
दीपाली जी , आपले हार्दिक अभिनंदन .... आणि खूप शुभेच्छा !