केरळ कन्याकुमारी लेखमाला : दिवस सहावा - कन्याकुमारी, वट्टकुट्टई किल्ला व सुचिंद्रम मंदिर

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
25 Aug 2024 - 4:15 pm

या आधीचे भाग

1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

3)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा

4)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस तीसरा

5)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस चौथा

6)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पाचवा

     आम्ही जेथे उतरलो ते हॉटेल ‘जास’ अतिशय मध्यवर्ती व छान होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप ऐसपैस होती. इथली रूम सर्विसही उत्तम होती. आमच्या रूम्स या तिसऱ्या मजल्यावर होत्या. तथापि हॉटेलमध्ये लिफ्ट होती त्यामुळे सामान वरती उचलणे व खाली आणणे सोपे गेले. अर्थात सामान उचलायला त्यांच्या हॉटेलमधला स्टाफ तत्परतेने आला. आम्हाला त्यांना रिक्वेस्ट देखील करावी लागली नाही. बोट जेट्टी पासून हे हॉटेल चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.

      सकाळी उठून आम्ही तेथीलच जवळ असलेल्या प्रसिद्ध मारुती रेस्टॉरंट मध्ये मेदू वडा, इडली, पुरी भाजी इ. नाष्टा केला.

फोटो

हॉटेल लहान आहे पण पदार्थ चविष्ट होते.

      आम्ही विवेकानंद स्मारक साठी जेट्टी पॉईंटला उभे राहिलो. खूप सारी गर्दी होती. तथापि रांग पुढे पुढे सरकत होती. साधारणतः पंधरा-वीस मिनिटात आम्हाला तिकीट मिळाले. तिकीट दर अत्यंत कमी आहे. साधारण 70 रुपये. हेच जर एक्सप्रेस टिकीट काढायचे ठरवले तर आताशी नक्की आठवत नाही पण काही तीनशे रुपयांच्या आसपास दर आहे.
      आम्ही नावेत चढलो आणि मोक्याच्या जागा पकडल्या. साधारण दहा ते पंधरा मिनिटात विवेकानंद स्मारकापाशी आलो. तथापि या प्रवासात समुद्राचे जे दर्शन होते ते अत्यंत प्रेक्षणीय आहे.
फोटो

फोटो

कारण येथील समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या रंगाच्या छटा उठून दिसतात. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे तीनही कन्याकुमारी येथे एकत्र येतात आणि या पाण्याचा रंग काही ठिकाणी हिरवा, काही ठिकाणी निळा, असा दिसतो. पण पाणी अत्यंत देखणे आहे.

फोटो

समुद्र नितळ आहे. हा समुद्र पाहणे हाच एक घेण्यासारखा अनुभव आहे!! मला जे काही म्हणायचे आहे ते कदाचित मी शब्दात मांडू शकणार नाही. परंतु हे दृश्य असे होते की तो समुद्र केवळ पहात राहण्यासाठी अर्धा दिवस किंवा पूर्ण अख्खा दिवस मी काढू शकले असते, इतका तो मला आवडला होता.

फोटो
समुद्रातून दिसणारे स्मारक

फोटो

      विवेकानंद स्मारकाच्या इथे गेल्यानंतर त्यांनी तेथे ऑफिसमध्ये आम्हाला सगळ्यांना बसवले आणि विवेकानंदांचे जीवन चरित्र आम्हाला सांगितले. त्याचबरोबर कन्याकुमारी या स्थानाचे महात्म्य सांगितले. फार पूर्वीच्या काळामध्ये तिथे देवी कन्याकुमारी राहत होती. जी माता पार्वतीचा अवतार होती. तिथे बाणासुर नावाचा दैत्य फार माजला होता. त्याला असे वरदान होते की केवळ कुमारी स्त्रीच्या हातूनच त्याचा वध होईल. इकडे देवी कन्याकुमारीने मात्र तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याशी विवाह करण्यासाठी त्याला कन्याकुमारी येथे येण्यासाठी सांगितले. ठरल्याप्रमाणे हिमालयातून भगवान शंकर माता कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी निघाले. येथे देव लोकात मात्र चिंता होऊ लागली की जर भगवान शंकर आणि माता कन्याकुमारीचा विवाह झाला तर काय होईल? कारण माता कन्याकुमारीच्या हातूनच बाणासुराचा वध होणार होता. त्यामुळे हा विवाह रोखण्यासाठी नारद मुनींना पाठवण्यात आले. नारद मुनींना भगवान शंकराला सांगितले की देवींनी विवाहाचा वर मागितला आणि तुम्ही निघालात? हा तर तुमच्या भोळेपणाचा हा फायदा घेण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही तिला असे सांगा की सूर्यास्तापर्यंत कन्याकुमारीला पोचलो तरच हे लग्न होईल अन्यथा नाही. इकडे भगवान शंकर साधारण काही किलोमीटर अलीकडे आले तेव्हा सूर्यास्त झाला आणि भगवान शंकरांना असे वाटले की आता सूर्यास्त झाला त्यामुळे तिथेच राहिले आणि त्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. कालांतराने देवी कन्याकुमारीने बाणासुराचा वध केला. अशी ही काहीशी कथा आहे.
ज्यावेळी विवेकानंद यांना ज्ञान प्राप्ती करायची होती त्यावेळी त्यांनी असा विचार केला की, हिमालयातला योग्यांचा योगी असलेला शंकर जर या स्थानामध्ये आला असेल, तर भारताच्या सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या ठिकाणी मी आलो तर मला ज्ञानप्राप्ती निश्चितच होईल. म्हणून ते येथे आले व या खडकावरती त्यांनी समाधी लावली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर ते पुढील शिकागो मध्ये गेले आणि त्यांनी प्रवचन दिले हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे.

      त्यानंतर आम्ही माता पार्वतीचे पदचिन्ह असलेल्या दगडाचे तिथे मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. मंदिराचे बाहेरून घेतलेले काही फोटो
फोटो

फोटो

तिथे फोटो काढण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांचे पुतळा असलेले जे मुख्य स्मारक आहे तिथे दर्शन घेतले. आत मध्ये ध्यानमंडप आहे तिथे तुम्ही ध्यान देखील करू शकता. इथे देखील आत मध्ये फोटो काढण्यास परवानगी नाही त्यामुळे बाहेरूनच फोटो काढलेले आहेत

फोटो

फोटो

आम्ही सर्वांनी ध्यानाचा अनुभव घेतला.

फोटो

     तिथे दुरूनच थिरुवल्लूवर नावाचे तमिळ कवी आहेत, त्यांचे मोठे दगडी मूर्ती असलेले स्मारक दिसते.

फोटो

फोटो

सध्या त्याचे बांधकाम चालू आहे. पुतळा जरी उभा असला तरी बाजूचे बांधकाम अजून तयार झाले नाही. त्यामुळे सध्या स्थितीत ते लांबूनच पहावे लागते . काही वर्षानंतर बोटीने तेथेही जाता येईल. आम्ही या सर्व ठिकाणी बरीच फोटोग्राफी केली.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

     या स्मारकावरून समुद्राचे अप्रतिम दर्शन होते.
आम्ही येथे खूप फोटोग्राफी करून परत आलो त्यावेळी साधारण साडेबारा वाजले होते.

      मग तेथीलच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. माझी पारंपारीक थाळी, मुलाचा चॉकलेट शेक, पनीर व मलाबार पराठा व पनीर चिल्ली असे फ्युजन जेवण झाले.

फोटो

      आता आम्हाला येथून जवळच असलेल्या वट्टकुट्टई या 18 व्या शतकात त्रावणकोरच्या राजाने टेहळणी करता बांधलेल्या किल्ल्याला भेट द्यायचे होते.

फोटो

फोटो

जर तुम्ही कन्याकुमारीला जाणार असाल तर या किल्ल्याला जरूर भेट द्या. हा किल्ला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडा असतो. गाडीने जायला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. येथून समोर समुद्र 180° दिसतो.

फोटो

फोटो

पूर्वीच्या काळी येथून टेहळणी करणे सोपे होते म्हणून हा किल्ला त्यांनी बांधला आहे.
फोटो

फोटो

नंतर डचांनी येथे वसाहत स्थापन केली तेव्हा हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली आला व त्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. आतमधे सुंदर हिरवळ आहे.

फोटो

फोटो

फोटो

किल्ल्याच्या बुरुजाला आणि कमानी वरती दगडामध्ये जो चौकोन दिसत आहे ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहे.

फोटो

फोटो

फोटो

आणि किल्ल्यावरून दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतिम आहे. एका बाजूला समुद्र तर एका बाजूला तटबंदी वरून अशा प्रकारे डोंगरांचे दर्शन होते

फोटो

येथे आम्ही जवळपास तासभर थांबलो होतो.एक छान अनुभव घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      आता आम्हाला जवळच असलेले सुचिंद्रम मंदिर येथे जायचे होते. वट्टकुट्टई किल्ल्यापासून साधारण अर्धा तासात आम्ही देवळाजवळ पोहोचलो. वाटेत निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. खूप नारळाची झाडे, त्याच्यामध्ये डोंगर आणि आकाश यांचे सुंदर दृश्य दिसत होते.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

      मंदिरापाशी आम्ही साधारण साडेतीन वाजता पोहोचलो. त्यामुळे अर्धा तास आम्हाला वाट पाहायला लागली. (या स्थळांबद्दल मला माहित नव्हते .परंतु कंजूस जी यांनी मला सुचिंद्रम मंदिर तसेच पद्मनाभपुरम पॅलेस या स्थळांबद्दल माहिती दिली. त्यामुळे ही दोन्हीही स्थळे मी माझ्या सहल नियोजनात समाविष्ट केली. ही दोन्ही स्थळे आपण कन्याकुमारीच्या आजूबाजूला असेल तर अजिबात चुकवू नये अशीच आहेत.) हे मंदिर दुपारी बारा वाजता बंद होऊन चार वाजता उघडते हे ध्यानात घेऊन नियोजन करावे. प्रवेशदाराच्या कमानीवर असेलेली ब्रम्हा, विष्णू व महेशाची प्रतिमा

फोटो

फोटो

फोटो

आत मध्ये अनेक निरनिराळी मंदिरे आहेत. नेमके काय बघायचे आणि कुठे पहायचे तेच काही कळेना. आम्ही एका पुजाऱ्याला विचारले तेव्हा त्याने मोडक्या तोडक्यात हिंदी मध्ये हे एक पुजारी तुम्हाला शंभर रुपये दिल्यानंतर सर्व मंदिर फिरवून आणतील असे सांगीतले आणि त्या गुरुजींना विचारले त्यावर त्यांनी येथील एका दुसऱ्या गुरुजींना जोडून दिले. हे गुरुजी अतिशय उत्साही होते. त्यांनी आम्हाला सर्व मंदिराची माहिती सांगायला सुरुवात केली. हे मंदिर मूळतः नवव्या शतकामध्ये चोळराजांनी बांधले आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या राजवटींनी त्याचे पुनरुज्जीवन केले. मंदिरात मुख्यतः देवता ही त्रिमूर्तीची आहे. म्हणजेच ब्रम्हा, विष्णू व महेश या तिघांचे हे स्थान आहे. या मंदिरामध्ये हनुमानाचा सर्वात मोठा उभा पुतळा आहे असे म्हणतात. तेथे दत्तात्रेयांचे मंदिर होते . उत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या देवी देवतांमध्ये काही फरक आहे असे वाटले. अनेक असे देव त्यानी सांगितले जे मी कधी ऐकले नव्हते. उदाहरणार्थ गणपतीची अशी मूर्ती त्यांनी मला दाखवली ज्यामध्ये अर्धे शरीर गणपतीचे व अर्धे शरीर स्त्रीचे होते याला ते विघ्नेश्वरी असे म्हणतात. मंदिराच्या आत मध्ये असलेले स्तंभामधून संगीत निर्माण होते . गुरुजींनी तसे आम्हाला वाजवून दाखवले. तिथे फोटो काढण्यास परवानगी नव्हती. तरीही त्यांच्या परवानगीने आम्ही काही ठिकाणी फोटो काढले.
      अहिल्येला फसवल्यामुळे इंद्राला जो शाप मिळाला त्यातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी याच ठिकाणी त्याला दर्शन देऊन शुद्ध केले म्हणूनही शुची इंद्र (इंद्राची शुद्धी)म्हणून असे नाव पडले. या मोठ्या स्तंभ मंडपा मध्ये पूर्वी जेवणावळी बसत असत असे गुरुजींनी आम्हाला सांगितले. तसेच खांबांच्या खाली ज्या मूर्तींचे हात आहेत, त्या हातांमध्ये तेल घालून वात लावून प्रकाशयोजना केली जात असे.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

मंदिरामध्ये ठिकठिकाणी ‘ येळू ‘ या आठ प्राण्यांचे अवयव असलेल्या काल्पनिक प्राण्याची मूर्ती जागोजागी दिसते.

फोटो

फोटो

इथे जवळपास दोन-अडीच तास आम्ही होतो. त्या गुरुजींनी आम्हाला एवढी माहिती सांगितली, आपला वेळ आम्हाला दिला, त्यामुळे आम्ही ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त दक्षिणा स्वतःहूनच त्यांना दिली . बाहेर पुष्करणी होती. अत्यंत सुंदर दिसत होती .

फोटो

फोटो

तथापि आता अंधार पडत आलेला होता त्यामुळे आम्हाला निघणे भाग होते.
इथून आम्हाला कन्याकुमारीच्या जवळच असलेल्या वॅक्स म्युझियम आणि थ्रीडी आर्ट गॅलरी ला भेट द्यायची होती.

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

फोटो

याठिकाणी देखील बच्चे कंपनी वगैरे सोबत असतील तर आणि अतिरिक्त वेळ असेल तर जायला काही हरकत नाही.

      जवळपास तास दीड तास घालवल्यानंतर आम्ही साधारण आठ वाजता कन्याकुमारी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो. त्यावेळी मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. आम्ही पंधरा मिनिटात थेट देवीच्या समोर जाऊन उभे राहिलो . मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. मी आजवर जेवढ्या देवींचे दर्शन घेतले आहे त्यामध्ये कन्याकुमारी देवीचे दर्शन हे अत्यंत मनोहरी होते. देवीकडे कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. देवीची मूर्ती कमालीची देखणी आहे. इतका सुंदर मुखवटा आजतागायत कोणत्याही देवीचा पाहिला नाही. आपण निव्वळ निःशब्द होतो. उजळलेल्या दिव्यांच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये देवीच्या नाकात हिऱ्यांची लखलखत असलेली नथ आणि तिचा अत्यंत देखणा असा मुखवटा, त्यावरती फुलांची केलेली कलाकुसर आणि दिव्यांची आरास , इतकी कमालीची सुंदर दिसत होती की काय वर्णन करू!!!! कमीत कमी पाच ते सात मिनिटे निवांत आम्हाला देवीचे दर्शन घेता आले. भविष्यात कधीतरी मी नक्की देवीला परत भेटायला जाणार आहे हे ठरवूनच तिथून बाहेर पडले.

इथून जवळच मत्स्यालय आहे तिथेही आम्ही थोडा वेळ घालवला. येथील काही फोटो-

फोटो

फोटो

फोटो

      आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा तिथे खूप सारी दुकाने होती. कपड्यांची, इलेक्ट्रिक वस्तूंची, शोभेच्या वस्तूंची तसेच अनेक प्रकारची दुकाने तिथे होती.. चौकशी केली असता आम्हाला लक्षात आले की या वस्तू अत्यंत स्वस्त दरात मिळत आहेत. त्यामुळे आम्ही साड्यांच्या दुकानात शिरलो आणि केरळी साड्या ज्या केरळमध्ये आम्हाला दोन अडीच हजाराच्या आत मिळत नव्हत्या, त्या केवळ 700 रुपयात मिळाल्या . अशा आम्ही सात आठ साड्या घेतल्या. मिस्टरांनी पेन ड्राईव्ह, सेल्फी स्टिक, इअर काॅड इ. वस्तूंची खरेदी केली.

      आता साडेआठ वाजून गेले होते. आम्ही तिथूनच जवळ असलेल्या फूड कोर्ट वरती गेलो . खूप दिवसापासून दक्षिणात्य भोजनावरती ताव मारला होता. त्यामुळे आता काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होती. तेथे पावभाजी आणि फालुदा असे वेगळे जेवण मागवले.

फोटो

तेथे आजूबाजूला रस्त्यावरचे विक्रेते बरेच होते . उद्या आम्ही येथे शिंपल्यांच्या वस्तू घ्यायला यायचे असे ठरवले. उद्या सकाळी येथून आम्ही निघणार होतो. कन्याकुमारीच्या स्थलादर्शनासाठी मी दोन दिवस ठेवले हा माझ्या सहलीच्या नियोजनातील अत्यंत योग्य निर्णय होता. खरंतर अजून एक दिवस देखील ठेवला असता तरी चालले असते. जेणेकरून सकाळी सूर्योदय, संध्याकाळचा सूर्यास्त व समुद्र एन्जॉय करणे झाले असते. पण असो . आजचा दिवस खूपच एन्जॉय केला . आता उर्वरित पद्मनाभपुरम पॅलेस, अझिमला शिवा टेम्पल व त्रिवेंद्रम येथील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर यांचे वर्णन पुढील शेवटच्या भागामध्ये……..

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

26 Aug 2024 - 8:18 am | श्वेता२४

कृपया हा आणि माझे आधीचे भटकंती मधील धागे मीपा कलादालनात दिसत आहे. ते 'भटकंती' या सदरामध्ये हलवावेत.

सौंदाळा's picture

26 Aug 2024 - 11:33 am | सौंदाळा

मस्तच.
फोटो, वर्णन, खादाडी, वेळापत्रक, अंतर सर्व गोष्टी ओघवत्या भाषेत लिहिल्या आहेत. ईकडे जाण्यासाठी हे प्रवासवर्णन खूपच उपयुक्त ठरेल.
पुभाप्र.

श्वेता२४'s picture

26 Aug 2024 - 1:22 pm | श्वेता२४

प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद...

सुधीर कांदळकर's picture

26 Aug 2024 - 11:34 am | सुधीर कांदळकर

स्वातंत्र्यानंतर कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील समुद्रातल्या एका खडकावर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारले. तमिळ सर्वसामान्य जनतेला स्वामीजींबद्दल काहीच ठाऊक नव्हते. तेव्हा संपर्कसाधने तुरळक होती. ज्या काही बातम्या मिळत त्या वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी ऊर्फ रेडिओतून. तरीही बव्हंशी निरक्षर समाजाला स्वामीजींबद्दल काही ठाऊक असणे कठीणच. त्यात भाषेचा अडसर. सर्वसामान्य तमिळ जनतेच्या दृष्टीने कोणातरी सामान्य व्यक्तीचे स्मारक त्यांच्या माथी मारल्याची भावना त्यांच्यात दाटली. तमिळ संस्कृतीतले सर्वश्रेष्ठ नाव आहे तिरुवेल्लुवर. यांच्या नावाचा संवत्सर पण तिथे चालते. हे स्मारक मी जाने. २०११ मध्ये पाहिले तेव्हांचे संवत्सर होते २०४६. म्हणजे तिरुवेल्लुवर यांचे जन्मवर्ष येते सुमारे इ.स.पू. ३५ या वर्षी. तिरुवेल्लुवर हे तमिळ महाकवी, संत, मुत्सद्दी, राजनीतीज्ञ, महापंडित, विद्वान तत्त्ववेत्ते वगैरे होते. म्हणजे जे स्थान उत्तर भारतात चाणक्याचे तेच किंबहुना त्याहून सरस असे तमिळ जनतेसाठी होते. त्यांच्या नावाचा संवत्सर आहे यावरूनच तमिळ संस्कृतीतले त्यांचे स्थान ध्यानांत येते. मग तमिळ अस्मिता जागृत झाली. आणि त्यातून विवेकानंद स्मारकाशेजारीच तिरुवेल्लुवर स्मारक उभे राहिले. या स्मारकाच्या निमित्तानेच मी त्यांची माहिती समजून घेतली. त्यामुळे स्मारकाचा हुतू सिद्धीस गेला असे नक्कीच म्हणता येईल.

परंतु विविध संस्कृतींच्या विविध अस्मिता असतात आणि अस्मितांमधून विविध पूर्वग्रह झालेले असू शकतात. त्यामुळे आर्य, बौद्ध, ख्रिस्ती, अशा विविध संस्कृतीतील विद्वानांची मते वेगवेगळी असूं शकतात.

हे स्मारक पूर्ण झालेले आहे आणि खूपच प्रचंड असून देखणे आहे. मी २०१२ साली संपूर्ण पाहिलेले आहे. आता डागडुजीसाठी बंद असावे. ही दोन स्मारके समुद्रात आहेत तर महात्मा गांधी स्मारक मुख्य भूमीवर आहे. विवेकानंदांना न मानणारी जनता महात्मा गांधींना मात्र मानते हे पाहून गंमत वाटली. आपल्या लेखाच्या निमित्ताने माझ्या दक्षिण भारत दौर्‍यांच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

30 Aug 2024 - 11:42 am | टर्मीनेटर

विवेकानंदांना न मानणारी जनता महात्मा गांधींना मात्र मानते हे पाहून गंमत वाटली.

साक्षर असणे आणि सुशिक्षित असणे ह्यात काय फरक असतो ते अशा गोष्टींमधुन प्रकर्षाने जाणवते 😀

श्वेता२४'s picture

26 Aug 2024 - 1:24 pm | श्वेता२४

तिरुवेल्लुवर यांच्या बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत. विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...

फोटो आणि वर्णनातून माहिती कळेल आणि अधिकाधिक लोक केरळला स्वतः जातील.

प्रवासी कंपन्यांपेक्षा अधिक गोष्टी पाहिल्या आहेत.
१) तिरुवल्लूवर हा तिकडचा संतकवी. एक लाखापेक्षा अधिक श्लोक लिहिले आहेत. त्यांच्या नावाचा जिल्हा उत्तर तमिळनाडूत आहे.
२) २०१०- १२ साली बोटीचे तिकीट वीस रुपये होतं. त्यात तीन बोटी क्रमाने कन्याकुमारी जेटी ते विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूवर स्मारक अशा फिरत. तिन्ही प्रवासाचे धरून वीस रुपये. सुट्ट्या नसल्या तर एक तासात जमतं.
३)सुचिंद्रमचं वैशिष्ट्य म्हणजे फारिनरनांही आत प्रवेश आहे. आतमध्ये सारेगम वाजणारे दगडी खांब आहेत ते भाविक वाजवू शकतात. नाही जमल्यास सेवेकरी येऊन वाजवून दाखवतात. ( पद्मनाभस्वामी मंदिरात असे पाचशे खांब आहेत पण ते बंदिस्त करून टाकले आहेत).
४) नागरकोईल हे शहर त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी रस्त्यावरच आहे. नागरकोईल म्हणजे नागाचे मंदिर. ते बाजारातच आहे. तेसुद्धा पाहिले. फारसे टूरिस्ट ठिकाण नसल्याने इथले वडे इडली स्वस्त आणि चविष्ट आहेत. टपरीवर केळीच्या पानावर देतात. खाऊन झाले की आपणच आपले पान गुंडाळून डब्यात टाकायचे आणि तिथे वर्तमानपत्राचे कागद ठेवलेले असतात त्याने हात पुसायचे. साधी सोपी पद्धत.

श्वेता२४'s picture

27 Aug 2024 - 10:09 am | श्वेता२४

नागरकोईल मधील नागाच्या मंदिराबद्दल माहित नव्हतं. विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सुचिंद्रमचं वैशिष्ट्य म्हणजे फारिनरनांही आत प्रवेश आहे.
मनात द्वाड प्रश्न आला ,
- हा फॉरिनर जर खरंच धर्माने हिंदू असला तर? फॉरिनर गोराच असे नाही , श्रीलंकन सिंहली पण असू शकतो कि
- किंवा समजा पूर्वेकडील राज्यातील नेपाळी / चिनी सारखे दिसणारे भारतीय हिंदू कोणि असेल तर त्याला कसे अडवणार?

असो
एकूण निरीक्षण असे कि
- काही ( सगळ्या नसावे) हिंदू मंदिरात अहिंदूंना प्रवेश नाकारतात
- मशिदीत मुस्लिम नसल्यानं प्रवेश मिळतो पण काही ठिकाणी असे बघितले कि मशिदीत काही ठरविक भागातच मिळतो
- चर्च मध्ये असे कुठले बंधन दिसले नाही ( चर्च वाले आपल्या धर्माचे मार्केटिंग व्हावे म्हणून अशी बंधने ठेवत नसावीत !)
- बाली तील हिंदू मंदिरात जाताना सर्वांना कमीत कमी एक लुंगी सारखे वस्त्र नेसावे लागते नुसतंय बर्मुडा मध्ये किंवा अगदी पूर्ण धोतर प्यंट असली तरी चालत नाही ( अजसे तिरुपती ला पण कपड्यांचे काहीतरी बंधन असते तसेच काहीसे )

कर्नलतपस्वी's picture

26 Aug 2024 - 5:13 pm | कर्नलतपस्वी

आम्हींपण याच मार्गाने गेलो होतो. कन्याकुमारी तीन दिवस राहीलो होतो. समुद्रकिनाऱ्यावरील तामीळ नाडू सरकारचे गेस्ट रूम साठ रूपये दर दिवसाचे भाडे.

वट्टकोट्टाई किल्ला अप्रतिम.

कन्याकुमारी ची मुर्ती खरोखर अप्रतिम आहे.
बार बार देखो वाली भटकंती आहे.
सर्व फोटो काढून पुन्हा बघीतले

श्वेता२४'s picture

27 Aug 2024 - 10:34 am | श्वेता२४

कन्याकुमारी तीन दिवस राहीलो होतो.
अगदी योग्य केलेत . कन्याकुमारी हे कमीत कमी दोन रात्री व इतिहासाची व आपल्या संस्कृतीला समजून घेण्याची आवड असेल तर तीन रात्रीचे ठिकाण आहे . खरंतर मला गर्दीची ठिकाणे आवडत नाहीत . कन्याकुमारी येथे बऱ्यापैकी गर्दी असते . गल्लीबोळ अरुंद व गर्दीने गजबजलेले आहेत . तरीही या शहरात मला एक प्रकारचा जिवंतपणा जाणवला. का कुणास ठाऊक मला कन्याकुमारी प्रचंड आवडले . तीन दिवसाचा स्थलदर्शन कार्यक्रम पुढील प्रमाणे असायला हवे असे मला वाटते-
दिवस पहिला - स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल (3-4 तास) व जेवणानंतर वॅक्स म्युझियम थ्रीडी आर्ट गॅलरी एक्वेरियम (2-3 तास),
दिवस दुसरा - सकाळी सूर्योदय पाहणे , विवेकानंद केंद्र येथील रामायण गॅलरी व भारत मंदिर हे म्युझियम पाहणे( येथे रामायणाबद्दल अतिशय विस्तृत माहिती मिळते. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील अनेक थोर विभूतींचे कार्य याबद्दल माहिती आहे . कमीत कमी चार ते पाच तास सोबत ठेवून जावे. तसेच इतिहासाचे आवड असणाऱ्यांना येथे जावेसे वाटेल. आम्हाला याबद्दल खूप आवड असली तरीही मुलाचा विचार करून व हाती असलेल्या केवळ दोन दिवसांचा विचार करून आम्ही तो कार्यक्रम रद्द केला. भविष्यात जेव्हा कन्याकुमारीला जाणार आहे तेव्हा केवळ एक दिवस याच साठी ठेवणार आहे.) जेवणानंतर वट्टकुट्टई किल्ला व तेथून पुढे सुचिंद्रम मंदिर पाहणे.
दिवस तिसरा- त्रिवेणी संगम , भगवती अमन मंदिर, स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारून खरेदी करणे, संध्याकाळी सूर्यास्त पाहणे.
अशा पद्धतीने कन्याकुमारी येथे तीन दिवसांची आरामदायी कार्यक्रम पत्रिका होऊ शकते. ज्यांना ऐतिहासिक गोष्टींमध्ये रस नाही त्यांनी विवेकानंद केंद्राचा कार्यक्रम ,तसेच ज्यांना शॉपिंग मध्ये रस नाही त्यांनी खरेदीसाठी अर्धा दिवस ठेवण्याची गरज नाही . मग कन्याकुमारी येथे संपूर्ण दोन दिवस स्थलदर्शनासाठी ठेवले तर पुरेसे होतात.

विवेकानंद स्मारकात गवाक्षांची नक्षी चैत्यकमानींची आहे हे आवडले. वट्टकुट्टई किल्ला, त्यातले डेरेदार झाड आणि मंदिराचे मूर्तीकामाने सजलेले गोपुर एकदम सुरेख. लेखन आणि छायाचित्रे आवडली.

श्वेता२४'s picture

27 Aug 2024 - 10:36 am | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

28 Aug 2024 - 5:53 am | कर्नलतपस्वी

हल्ली इथे सुद्धा भरपूर गर्दी मिळेल.

कन्याकुमारी नागरकोईल जाताना एक मायलादी गाव आडबाजूला आहे. हे शिल्पकारांचे गाव. पिढ्यानपिढ्या शिल्पकला हाच उद्योग. शुचिंद्रम मंदिर यांच्याच पुर्वजानी बांधले असे मार्गदर्शकने सांगीतल .

कर्नलतपस्वी's picture

28 Aug 2024 - 6:06 am | कर्नलतपस्वी

Male and female rocks

Before the rocks are chiselled into idols, prayers are offered. There is no temple in TN and Kerala which does not have atheist one sculpture from this village.

https://www.onmanorama.com/travel/outside-kerala/2018/07/04/myladi-tamil...

वट्टकोट्टाई मधले ते एकटे झाड आता बरेच मोठे झालेले दिसतेय. माझ्याकडेही त्याचा फोटो आहे.

श्वेता२४'s picture

28 Aug 2024 - 7:43 am | श्वेता२४

याबद्दल काही माहिती नव्हती. रोचक माहिती दिलीत. हो. तुम्ही गेला त्यावेळी किल्ल्यातील ते झाड अगदी लहान असेल नाही? आता छान मोठे डेरेदार झाले आहे आणि तसेच त्याच्या फांद्या पसरट व उंचीला कमी असल्यामुळे माझा मुलगा तर कित्येक वेळ त्या झाडाच्या वरतीच खेळत राहिला.

टर्मीनेटर's picture

30 Aug 2024 - 11:37 am | टर्मीनेटर

हा भागही आवडला! किल्ला आणि सुचिंद्रम मंदिर मस्त आहेत, हे दोन्ही आधी पाहिले नसल्याने जास्ती आवडले. वॅक्स म्युझीयम मधले पुतळे मात्र अगदिच सुमार दर्जाचे वाटले.
मत्सालयाच्या फोटोंमध्ये तिसऱ्या फोटोतला फ्लॉवर हॉर्न मासा पाहुन थोडा भाउक झालो.तिनेक वर्षांपुर्वी घराचे रंगकाम सुरु असताना पेंटरने फिश टँक तात्पुरती हलवताना एअर पंपचे सकाळी बंद केलेले बटण पुन्हा सुरु न केल्याने मी चार-सव्वा चार वर्षे दिड इंचापासुन जवळजवळ नऊ इंच लांब आणि असेच 'हेड' येइपर्यंत वाढवलेला ह्या जातीचा माझा मासा दिवसभर पुरेसा ऑक्सीजन न मिळाल्याने तडफडुन मेला होता. तेव्हापासुन कितीही आवड असली तरी मासे पाळणे बंद केले आहे!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

श्वेता२४'s picture

30 Aug 2024 - 2:56 pm | श्वेता२४

धन्यवाद टर्मिनेटरजी

किल्लेदार's picture

31 Aug 2024 - 10:40 pm | किल्लेदार

हा किल्ला बघता आला नव्हता पण साधारण अशाच बांधणीचा आणखी एक किल्ला उत्तर केरळमध्ये आहे. फोर्ट बेकल.

झकासराव's picture

2 Sep 2024 - 12:07 pm | झकासराव

सुंदर फोटो , वर्णन आणि माहितीपूर्ण लेखमाला

श्वेता२४'s picture

2 Sep 2024 - 3:21 pm | श्वेता२४

@किल्लेदार, हो. बेकल किल्यावरुन दिसणारे दृश्यही नयनरम्य आहे. माझ्या बकेटलिस्टमध्ये आहे.
@झकासराव, प्रतिसादासाठी धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

3 Sep 2024 - 12:44 pm | कर्नलतपस्वी

gg

श्वेता२४'s picture

3 Sep 2024 - 8:51 pm | श्वेता२४

तेव्हाही हे झाड चांगलेच घेर असलेले होते. छान फोटो....

समर्पक's picture

4 Sep 2024 - 11:02 pm | समर्पक

५० शक्तिपीठांमधील सुचिन्द्रम हेही एक. वर पुष्करिणीचा जो फोटो आहे, त्याच्याच पलिकडे हे नारायणीचे मन्दिर आहे.

Narayani

Narayani

श्वेता२४'s picture

5 Sep 2024 - 11:09 am | श्वेता२४

हे पाहायचं राहून गेलं की हो. याची माहिती वाचली होती. पण मंदीरातील वेगवेगळ्या देवतांचे दर्शन घेण्याच्या नादात डोक्यातून गेलं हे. योग नसतो तो असा. भविष्यात कधीतरी कन्याकुमारीला परत जाणार मी. तेव्हा ईथे दर्शन घेणार नक्की. बरं झालं लक्षात आणून दिलं.

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2024 - 1:01 pm | चौथा कोनाडा

व्वा सुंदरच !
वर्णन आणि प्रचि पाहून डोळे तृप्त जाहले !

अनेक तपशिल दिल्याबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद !
ते खुपच उपयोगी आहेत !

श्वेता२४'s picture

6 Sep 2024 - 3:10 pm | श्वेता२४

प्रतिसादासाठी धन्यवाद

गोरगावलेकर's picture

12 Sep 2024 - 1:54 pm | गोरगावलेकर

वट्टकुट्टई किल्ला आवडला . माझा बघायचा राहिला आहे