जय रायरेश्वर

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
27 Apr 2024 - 7:35 am

जय रायरेश्वर
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते.
सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ?
आज राजे आणि त्यांचे सहकारी किल्ल्यावर चालले होते, ते रायरेश्वराच्या देवळात शपथ घ्यायला. साधीसुधी शपथ नाही, तर स्वराज्य स्थापनेची ! तो दिवस होता - २७ एप्रिल १६४५.
राजांनी देवळात प्रवेश केला आणि त्यांच्या सवंगड्यांनीही. राजांनी पिंडीला नमस्कार केला आणि गर्जना केली - हर हर महादेव ! त्यांना तानाजी , येसाजी आणि बाकीच्यांनाही साथ दिली.
त्या सगळ्यांनी शपथ घेतली. हिंदवी स्वराज्य स्थापनेची !
ते सगळे मंदिराबाहेर आले. उन्हाळा सुरु झाला असला तरी गडावर हवा छान होती. राजांनी आसपासच्या परिसरावर नजर टाकली. वरून खाली दिसणारी घरं, शेतं, वस्त्या . कुठे वर जाणार निळसर धूर. त्यांना वाटलं - हा परिसर आपला. ही माती आपली. पण दुर्दैवाने ती परकीयांच्या ताब्यात आहे; पण यापुढे मी असं होऊ देणार नाही.
त्यांचे सहकारी राजांच्या चेहऱ्याकडे पहात होते आणि एकदम राजांचा चेहरा चिंताक्रांत झाला. काय असावी राजांची चिंता ?...
XXXXX
त्यावेळी दुसऱ्या बाजूने राणोजी येत होता. तो राजांच्याच वयाचा होता. जेमतेम सोळा वर्षांचा. त्याच गडावर राहणारा एक साधा मुलगा. पण धाडसी. अंगावर मळकट फाटके कपडे. पण तरतरीत.
अतिशय अवखळ पोरगा. धाडसी.त्याच्या धाडसाच्याही गंमतीच असायच्या.
थोडे दिवस आधीची गोष्ट.
रायरेश्वर पठाराच्या एका बाजूला एक उत्तुंग कडा होता. झाडाझुडपांत लपलेला. एका बाजूला. तिकडे कोणी जायचं नाही. पण राणोजीचा बा मात्र त्याला घेऊन जायचा. त्या कड्याच्या टोकावर एक भैरोबाचं देऊळ होतं. त्याच्या पूजेसाठी. अगदी रोज.
देऊळ सहज दिसणारं नव्हतं. देऊळ कसलं ? एक गुहाच होती ती. त्या कड्यावरून थोडं खाली उतरलं की ती होती. तो भैरोबा बसला होता त्या गुहेत. बहुतेक त्याला वाटत असावं- खरे भक्त असतील तर या अडचणीच्या जागीही ते येतीलच. माझ्या दर्शनासाठी.
एके दिवशी त्याचा बा त्याला म्हणाला,' राणोजी या गुहेच्या खाली आणखी एक गुहा आहे देवाची. '
'म्हणजे आणखी एक गुहा आणि आणखी एक देव आहे?' त्याने विचारलं.
' खाली देवाची आणखी एक गुहा आहे. हे मला माहिती आहे. पण खाली जायचं नाही. नाहीतर देव कोपतो.'
त्याने बाला विचारलं.' तू गेला आहेस कधी खाली ?'
' नाही !'
मग त्याने धाडसी मनाने विचारलं .' मी खाली जाऊन बघू ?'
बा म्हणाला .' नाही म्हणलं ना एकदा. गप बस. '
बाचं ऐकणं भाग होतं. तो काटक होता अन तेवढाच कडक !
भैरोबाला जाणं थोडंच अवघड होतं. पण त्याच्या खाली जाणं मात्र अतीच बिकट होतं. अगदी सरळ कडा. ताशीव. जरा हात निसटला तरी खाली खोल दरीतच. थेट कपाळमोक्ष ! त्यामुळे खाली त्या गुहेत जायचं नाही, असं होतं का ? हे फक्त त्याच्या बाला माहिती . आणि ही गुहेची गोष्ट बाला त्याच्या बाने सांगितलेली होती.
एकदा राणोजीच्या धाडसी स्वभावाने उचल खाल्ली आणि तो देवळाकडे गेला. एकटाच.
तो आधी भैरोबाला गेला.भैरोबा म्हणजे शंकराचं उग्र रूप. त्या जुन्या काळ्या पाषाण मूर्तीला शेंदूर थापलेला होता. पण कमी झालेला. तो देवाच्या पाया पडला. त्याचे आशीर्वाद घेऊन तो खालच्या गुहेत उतरू लागला.
सोपं काम नव्हतंच ते. एकदा तो घसरला; पण एका झाडाला धरून तो थांबला. ते झाड मिळालं नसतं तर तो थेट दरीतच गेला असता.

पण तो पोरगा एवढ्याने घाबरणारा नव्हता. पुन्हा सावरून तो उतरू लागला. परत एकदा तो घसरला. त्यात वरून घरंगळत आलेला एक दगड त्याच्या हातावरच बसला. तो कळवळला. रक्ताचे ओघळ हातावर येऊ लागले. त्याचा तो हात निसटला. तसा तो काटक होता. एका वेलीला एका हाताने धरून तो टिकला होता. तरी तो घाबरला नाही. पण त्याला बाच्या आठवणीने मात्र भीती वाटली. बाला कळलं असतं तर त्याने लई हाणलं असतं.

त्याने दुसऱ्या हाताने आधार घेतला. थोडा दम खाल्ला आणि समोर पाहिलं. समोर झुडपांच्या गर्दीमध्ये अंधार होता आणि आश्चर्य- तीच तर गुहा होती ! ती दुसरी.

तो आत गेला. मिट्ट काळोख. खाली खडबडीत दगड. एक कोंदट, दमट वास तिथे भरून राहिलेला होता. अतिशय शांतता. क्षणभर तर त्याला भीतीच वाटली. आधी त्याला अंधारामुळे काही दिसत नव्हतं. पण जरा वेळाने त्याला दिसू लागलं. इकडे तिकडे पहाता त्याला आत काहीच दिसलं नाही. तिथे कुठल्याही देवाची मूर्ती तर नव्हती. आणि - एका कोपऱ्यात ? …
त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
आत देव नव्हता मग काय होतं ? …
ही भानगड बाला तरी माहिती होती की नाही ? भैरोबालाच ठाऊक.

-X-X-X

असा तो राणोजी. तो चालत येत होता रायरेश्वराच्या देवळाकडे. आणि त्याला राजे दिसले. तो पटकन एका झाडामागे लपला आणि लपून पाहू लागला.

तो राजांना आणि मावळ्यांना पहिल्यांदाच पाहत होता.सगळे धट्टेकट्टे. पिळदार बाहूंचे. कमरेला तलवारी आणि पाठीला ढाली. त्याला लक्षात आलं की हे लढवय्ये आहेत म्हणून . जरी ते आपल्याच वयाचे असले तरी. आणि त्यातली एक व्यक्ती तर खासच वाटत होती . मस्तकी जिरेटोप आणि अंगात मोतिया रंगाचा अंगरखा घातलेली. करारी नजरेची. रुबाबदार !

तानाजी त्या रुबाबदार माणसाला म्हणाला,’ राजे ,बोला.तुमच्या मनात कसली चिंता आहे ते ?’

त्यावर राजे म्हणाले ,' तानाजी , स्वराज्यासाठी शस्त्रं पाहिजेत आणि घोडेसुद्धा. यासाठी धनाची आवश्यकता आहे आणि ते काही मावळातल्या धोधो पावसासारखं आकाशातून बरसत नाही !'

यावर सारेच गप्प झाले.

तेवढ्यात तानाजीची नजर झाडामागे लपलेल्या राणोजीकडे गेली. त्याने झटक्यात तलवार उपसली व तो त्याच्या दिशेने गेला.

'बोल कोणेस तू ? आमच्यावर पाळत ठेवतोस काय?' तानाजी गरजला .

' नाही नाही...' राणोजी घाबरला.

' मग लपलास कशासाठी ? नाव काय तुझं? '

'मी राणोजी . गडावरच राहतो.'

‘ अस्सं ? मुजरा कर राजांना . हे शिवाजीराजे आहेत. '

राणोजीला मुजरा कसा करायचा ते माहिती नव्हतं . त्याने कसातरी नमस्कार केला.

राजांना हसू आलं . ते म्हणाले , ' अरे ताना , पोरगा आहे. जाऊ दे त्याला .'

असं जाऊ द्यायचं ? तानाजीला वाटलं . शेवटी तानाजीच तो . त्याने तिरक्या नजरेने राणोजीकडे पाहिलं.

त्यावर राजांनी पुन्हा त्याच्याकडे हसून पाहिलं. त्यावर राणोजीला हायसं वाटलं. तो धीर करून म्हणाला,' एक सांगू ? पण माझ्या बाला सांगायचं नाही !'
'ठीक आहे . बाला नाही तर मग आयेला सांगतो.' तानाजी मिश्कीलपणे म्हणाला .

राजे हसले, 'नाही सांगत बरं. बोल.'

' तुमचं बोलणं मी ऐकलं. तुम्हाला पैका पाहिजे ना ? मी देतो. '

सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले - काय खुळंय हे ! अशा अर्थाने.

' मी देतो ? अन तू कोण रे नवकोट नारायण ? ' पुन्हा तानाजी म्हणाला.
तसे सारे हसले . पण राजांच्या लक्षात त्याचा भाबडेपणा आला .
ते म्हणाले , ' ताना , अरे बोलू दे त्याला . '
त्यावर राणोजीने एक नजर तानाजीकडे टाकली . त्याचा अंदाज घ्यायला . मग राजांचा चेहरा पाहून तो बोलू लागला.

राणोजीने त्याची गंमत सांगितली आणि सगळ्यांचे डोळे विस्फारले .

भैरोबाच्या त्या गुहेत एक घडा होता . सुवर्णमुद्रांनी भरलेला . तो तिथे कोणी ठेवला होता ? कधी ठेवला होता ? ते एक भैरोबालाच ठाऊक ! आणि त्या सुवर्णमुद्रा कुठल्या काळातल्या होत्या ? ते सांगणं त्या क्षणाला अवघड होतं.

राणोजी पुढे म्हणाला ,' पण तिथे गेलं की देवाचा कोप होतो . '
क्षणात राजे म्हणाले , ' चांगल्या कामासाठी देव काही कोपत नाही .'
तो परत म्हणाला , ' पण तिथे जाणं खूप अवघड आहे ! '
राजे फक्त हसले . त्याला मावळ्यांची ताकद माहिती नाही, अशासाठी ते हसणं होतं.
चारजण खाली उतरले. पटापट ! आणि राणोजीही. त्यांचा उत्साह पाहून त्यालाही ऊर्जा आली होती. त्याने गुहा दाखवली आणि तो घडाही.
तानाजीने डोक्याचं मुंडासं सोडलं . तो घडा त्याने बांधून पाठीवर घेतला आणि निघाला की गडी !
ते वर आले. त्यांनी ती पिवळीधमक धनाची रास राजांसमोर ओतली. राजे अतिशय आनंदले. हा तर शुभशकुन होता , स्वराज्यासाठी !
ही भैरोबाची कृपा होती की राणोजीची ?
राजांनी तर राणोजीला मिठीच मारली. तो बिचारा बावरला .
मग राजे म्हणाले आणि त्यांच्या मागे सगळेच - जय रायरेश्वर !
-------------------------------------------------------------------------------------------------------------
काल्पनिक कथा
कॉपीराईट - बिपीन सांगळे

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बिपीन सुरेश सांगळे's picture

28 Apr 2024 - 8:09 am | बिपीन सुरेश सांगळे

वाचकांचे खूप आभार .
ही बालकथा - मोठा वयोगट काल २७ तारखेला पोस्ट केली .
कारण शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथही २७ एप्रिलला घेतली .
जय शिवराय !