१.पावसाळ्याचे दिवस आहेत....आपण मुसळधार पावसातुन भिजत भिजत नुकतेच घरी आणि त्यातही माहेरी...पोचलो आहोत...आता २ दिवस माहेरी आराम म्हणून आपण जाम म्हणजे जाम खुष आहोत ...कॄपया लग्न झालेल्या पुरुषांनी दातओठ खाउ नयेत :-) बायकोला कधीकधी माहेरी जाउ द्यावे (ह.ध्या.)...आज शुक्रवार आहे ...म्हणजे आता २ दिवस मज्जा :-) ..आपण घरात येतो..मस्त फ्रेश होउन कपडे बदलतो....आणि आई भूक असं ओरडत स्वयंपाकघरात घुसतो....आणि गरम गरम...वाफाळत्या..खमंग थालिपीटाची डिश हातात येते :-)...
२.मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहेत...आपण पहाटे पहाटे ( प्रत्येकाने स्वतःला झेपत असलेली वेळ वाचावी ..)मस्त फिरुन वगैरे आलेलो आहोत (कधी नव्हे ते ...)घरी पोचताच आपल्या लाडक्या "आई" (म्हणजे सासुबाई...सुज्ञांना कळलेच असेल म्हणा..) आपल्यासमोर गरम गरम..खुसखुशीत थालिपीट घेउन येतात...आहाहा..
३.उन्हाळ्याचे दिवस आहेत...आमरस-पुरी वरपुन ४-५ तास झालेले आहेत्..मस्त झोप झालेली आहे....५ वाजता जाग येते आणि आता काहितरी खमंग ,चमचमीत ,तिखटं खायची इच्छा होते....मग आपण मस्तपैकी थालिपीट बनवायला घेतो.. (आई झाली,सासुबाई झाल्या ..आता कोणाला आणायचं इथे, असा विचार करताना..आज्जी डोळ्यांपुढे आली...पण मग मिपा करांना वाटेल कि हि स्मिता स्वतः काही करते कि नाही..म्हणुन या स्टोरीत मीच घुसले )..त्या खमंग वासाने मन भरुन येते ( आणि थोड्यावेळाने पोटही..)
तर मंडळी ...सांगायचा मुद्दा हा..कि कुठल्याही ॠतुत फिट होणारं हे थालिपीट...
साहित्यः
२ वाटी ज्वारीचे पीठ
२ चमचे कणिक
२ चमचे डाळीचे पीठ
१/२ वाटी रवा
थालिपीटाची भाजाणी असेल तर अजुनच उत्तम.....
३-४ हिरवी मिर्ची + ७-८ पाकळ्या लसुण याचे वाटणं
चवीनुसार तिखट,मीठ
हळद,ओवा,हिंग..
आणि सगळ्यात महत्वाचे...भरपुर भाज्या..
२ कांदे बारीक चिरुन,
१ वाटी मेथी बारीक चिरुन,
१ गाजर खिसुन,
थोडा खिसलेला कोबी,
मुळ्याची कोवळी पाने चिरुन,
कोथिंबीर,
थोडक्यात काय तर शक्य होइल तेवढा पालापाचोळा....:-)...अगदीच शेपु ,कारलं वगैरे नको बरका...असो..
आता कॄती: अगदीच शिंपल आहे हो....वरील सगळेच्या सगळे पदार्थ एकत्र करायचे...पाण्याचा वापर करुन ( किवा शिळी आमटी /वांग्याची भाजी अश्या गोष्टी पण खपुन जातात्.. नव्हे..मस्तच लागतात...)थालिपिटाचा गोळा भिजवायचा...
आणि तव्यावर भरपुर तेल सोडुन खरपुस भजुन घ्यायचं...
आणि मग्.....लोणी,दही,लोणचं,चटणी,सॉस,तुप....जे आवडेल त्यासोबत खायला सुरुवात करावी :-)
हा घ्या फोटो....
प्रतिक्रिया
18 Dec 2008 - 5:08 pm | सुनील
पाकृ छान. फोटो चालला असता.
अवांतर -
कृपया शीर्षकात पौष्टिकसुधा... ऐवजी पौष्टिकसुद्धा... असा बदल करावा.
गैरसमज होतोय!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Dec 2008 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्मिताताई, थालीपीठापेक्षा जास्त खमंग वर्णन!
18 Dec 2008 - 6:40 pm | छोटा डॉन
मस्त आहे वर्णन आणि पाककॄती ...
आता पांथस्ताच्या याच्याच "सुधा"रीत फोटोसगटाच्या आवॄत्तीची वाट पाहतो आहे ... ;)
येऊ द्यात अजुन ...
------
छोटा डॉन
19 Dec 2008 - 8:04 am | नंदन
सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Dec 2008 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तव्यावर आधीच दोन पोळ्या भाजल्या होत्या म्हणून थालीपीठ असं थापलं



आणि तव्यावर टाकलं, भरपूर साजूक तूप सोडलं,
आणि मग हापसलं!
(मला "दही खाऊ नको", असं सांगण्यात आलं आहे, आणि लोण्यापेक्षा तूपाचीच चव आवडते म्हणून तेवढं मात्र थालीपीठावरच ओतलं!)
19 Dec 2008 - 12:26 pm | स्मिता श्रीपाद
अरे वा.....अदिती..तुप सोडलेल्या थालिपीटाचा वास आला मला :-)
मस्त फोटु :-)
बाकी गॄहपाठ करण्यात १ला नंबर म्हणुनच तुझा नाव अदिती(आ"धि"ती) आहे वाटतं :-)
18 Dec 2008 - 5:25 pm | विसोबा खेचर
वा! थालिपीठाची पाकृ लै भारी..! :)
अजूनही येऊ द्यात प्लीज अश्याच लै लै भारी पाकृ..
फोटू का नाही दिलात?
म्होरल्या वेळेपासून जमल्यास फोटूही दिल्यास बरे होईल..
आणि हो, ही पौष्टिक सुधा कोण? :)
आपला,
पौष्टिक तात्या! :)
18 Dec 2008 - 5:42 pm | स्मिता श्रीपाद
पौष्टिक "सुधा"रणा केली आहे :-)
त्याचं काय हाय तात्या... हितं म्हिपा वर आमी जरा नवे हाय ना....
काय ते तोडकंमोडकं लिव्हलंय ते गॉड माणून घेणे...
नेश्ट टाईंमाला अजुन "सुधा"रणा करुच.. :-)
आपली,
("सुधा"रणाप्रिय)स्मिता श्रीपाद
बाकी..फोटु उद्या नक्की देइन...
18 Dec 2008 - 6:09 pm | विसोबा खेचर
नेश्ट टाईंमाला अजुन "सुधा"रणा करुच..
हरकत नाही. नेक्स्टाईमला वाटल्यास केशर घातलेल्या 'सुधा'रसाची पाकृ फोटूसहीत दिलीत तरी चालेल.. :)
त्याचं काय हाय तात्या... हितं म्हिपा वर आमी जरा नवे हाय ना....
काय ते तोडकंमोडकं लिव्हलंय ते गॉड माणून घेणे...
चलता है! बाय द वे, मिपावर शुद्धलेखनाचे आणि परमाण भाषेचे कुठलेही नियम नसल्याने इथे मोडकंतोडकं असं काही नसतं! :)
आपला,
(आजही आईच्या हातच्या सुधारस-पोळीच्या घासाचा प्रेमी) तात्या.
18 Dec 2008 - 10:01 pm | रेवती
काय ष्टोरी लिवलीये.
आत्ता ती आई व त्या आई दोघीही लांब (म्हणूनच त्या सुखी) असल्याने आमाला कोण करून वाढणार?
जाऊ दे मीच करते आता.
रेवती
18 Dec 2008 - 10:39 pm | लवंगी
आईची आठवण काढत काढत मीच करते. आपली पोर "वा वा.. छान बेत आई" म्हणत जेवली की भरून पावल..
19 Dec 2008 - 8:01 am | शितल
स्मिताताई,
थालीपिठाची पाककृती मस्तच.
थालीपिठ आणि भाकरी कधीही दुसर्याच्या हातचीच छान लागते,(गरम गरम खाऊ शकतो ना आपण म्हणुन बाकी कारण नाही.)
:)
19 Dec 2008 - 8:28 am | प्राजु
त्यामुळे आपण दिलेली पाककृतीही तितकीच खुसखुशीत असणार यात शंकाच नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Dec 2008 - 10:52 am | ज्योति
पा कृ फारच छान आणि पौष्टीक पण आहे.
उपवास भाजणीची रेसिपी प्रमाणासहित मिलाल्यास आभारी आहोत.
19 Dec 2008 - 11:04 am | स्मिता श्रीपाद
आज सकाळपासुन फोटो चढवण्याची धडपड करत होते..पण कसचं काय ...हाती यश येइना...
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? ची पण मदत घेतली पण ...
आणि अखेर्..(हताश कि काय ते होउन..),
तात्या ना फोटो चढवण्याबाबत व्यं. नि. पाठवला..आणि काय चमत्कार देवा.... फोटो चढवण्यात यश आले :-)
तात्या महाराजांचा विजय असो :-)
आपली,
(तात्या भक्त)स्मिता
टिपः बाकीच्या मिपा भक्तांनी..थालिपीटाच्या प्रसादाचा (फोटुरुपी) लाभ घ्यावा .:-)
19 Dec 2008 - 11:15 am | विसोबा खेचर
तात्या ना फोटो चढवण्याबाबत व्यं. नि. पाठवला..आणि काय चमत्कार देवा.... फोटो चढवण्यात यश आले
अहो पण आपला निरोप वाचून मी येथे फोटू चढवायला गेलो तर कुणा भल्या संपादकाने येथे तो आधीच चढवला होता! :)
सबब, हे श्रेय माझे नाही. सोन्या-चांदीची कुर्हाड माझी नाही. माझी लाकडी कुर्हाड..!
आपला,
(प्रामाणिक) तात्या.
तात्या महाराजांचा विजय असो
आपली,
(तात्या भक्त)स्मिता
हां हे ठीक आहे! :)
तात्या.
19 Dec 2008 - 11:25 am | स्मिता श्रीपाद
अहो तात्या...मीच ती फोटु चढवणारी ... :-)
तुम्हाला व्य. नि. करुन मग म्हटलं परत एकदा प्रयत्न करावा..तर या वेळेस साधलं की...
हे म्हणजे.. देवाला नवस बोलायच्या अधिच फळ .... :-)
19 Dec 2008 - 12:00 pm | वृषाली
पाकृ छान . वर्णंनही फार सुंदर.
या कृतीत थोडासा दुधी किसुन टाकला तर थाली पीठ अजुन मऊ आणि पौष्टिक होईल.
If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
19 Dec 2008 - 12:19 pm | धमाल मुलगा
च्यायला, थालिपीठ म्हणजे आपला जीव की प्राण...
भरपूर तूप लावलेली दोन थालिपीठं सायीच्या दह्याच्या वाटीसोबत कोणी देणार असेल तर हा मोबदला मी कोणाच्या खुनासाठी सुपारी म्हणुन घ्यायलासुध्दा तयार आहे :)
पण...थालिपीठात भाज्या?? हे नविनच आहे बॉ आपल्याला...
हां, मी पालेभाज्या खात नाही म्हणुन माझी आई आणि आता तिच्या सुचवणीनुसार बायको मधूनधून पालक परोठे केलेत असं सांगून कुठलीही पालेभाजी माझ्या पोटात ढकलतात ते ठाऊक आहे.. पण थालिपीठात भाज्या?? :?
एक डाव प्रयत्न करायला काही हरकत नाही बॉ!
धन्यवाद हो ह्या थालिपीठासाठी :)
>>कॄपया लग्न झालेल्या पुरुषांनी दातओठ खाउ नयेत Smile बायकोला कधीकधी माहेरी जाउ द्यावे
=)) त्याचीच तर आम्ही लोक वाट बघत असतो ;) बायको माहेरी गेली की टोळभैरव (हा बायकोचा शब्द, आमचा शब्दः जिवलग मित्र) जमवून रात्र रात्र गप्पांचे फड रंगवण्याची, पत्ते खेळायची अमुल्य संधी मिळते ना :)
बाकी तात्या, सुधारसाची काय आठवण करुन दिलीत हो....च्यायला, आज रात्रीच्या जेवणाला सुधारसच करुन घेतो :)