सरगम - एक आठवण

अरिंजय's picture
अरिंजय in जनातलं, मनातलं
17 Jun 2023 - 1:55 pm

"सरगम"

अनेक दिवसांनंतर, जवळपास चार महिन्यांनंतर अप्पाच्या हॉटेल वर चहा प्यायला गेलो होतो. तिथे कायम हळू आवाजात गाणी चालू असतात‌. अप्पासोबत गप्पा मारत चहा पित असताना अचानक "सरगम" चित्रपटातलं "कोयल बोली ..." चालू झालं. सरगम - ८० च्या काळात अफ्फाट गाजलेला चित्रपट आणि अफाटच्या अफाट गाजलेली गाणी. अन् उगाचंच त्या काळात आम्ही बघितलेल्या सरगमची आठवण झाली.

लातूरात सरगम लागला होता तो सिंध टॉकीज ला (शिंद टाकी - आता इतिहासजमा झाली). सिंध टॉकीज, त्या काळातल्या इतर चित्रपटगृहासारखीच साधी. तीन वर्ग असायचे - उंचावर बाल्कनी, खाली फर्स्ट क्लास आणि एकदम पडद्यासमोर सेकंड क्लास. बाल्कनी मधे जरा बऱ्या पत्र्याच्या खुर्च्या, फस्क्लास मधे कमी दर्जाच्या पत्र्याच्याच खुर्च्या आणि सेकंड क्लासमध्ये बाकडे. महिलांसाठी बाल्कनीच्या वर वेगळी बसायची सोय लेडीज कम्पार्टमेंट. तिथेही बाकडेच. तिकीटही जास्त नसायचं, दोन रूपये की अडीच रूपये बाल्कनी. मला नक्की आठवत नाही.

तर, या सिंध टॉकीज मधे बरेच चांगले चांगले चित्रपट बघितले. बदाबदा रडवणारे दोस्ती, शामची आई, देशभक्तीचा धबधबा क्रांती, राम बलराम, दी बर्निंग ट्रेन, अमिताभचा पुकार. मी तर चक्क एकदा शोले बघितला आहे.

असो, आपण "सरगम" कडे येऊ. प्रचंड धक्काबुक्की, रेटारेटी करत तिकीट काढायचं आणि तसंच रेटारेटी करत थेटरात शिरायचं, कारण जागा पकडावी लागायची. सीट क्रमांकाची पद्धत तिथे नव्हती. अर्थात त्यावेळी आम्ही लहान असल्याने सोबतच्या मोठ्यांनी हे काम केलेलं. प्रचंड कलकलाट, जागांवरून भांडणं, आरडाओरडा वगैरे सिनेमा चालू झाल्यावरही चालूच असायचं. सर्वात वाईट हाल लेडीज कम्पार्टमेंटचे. बाकड्यावर रेटारेटी करून बसलेल्या बायका, त्यावरून तारस्वरात भांडणं, गुदमरलेल्या लेकरांनी पसरलेलं भोकाड. हे सिनेमा संपून गेला तरी चालूच असायचं. आणि त्या लेडीज कम्पार्टमेंट जवळ ज्यांना जागा मिळायची त्यांना मुकाट्याने सहन करावं लागायचं. या सगळ्यांकडे स्थितप्रज्ञपणे दुर्लक्ष करून एकाग्र चित्ताने सिनेमा बघायचा.

खरी मजा यायची जेंव्हा गाणी सुरू व्हायची. या सिनेमातल्या गाण्यांनी लोकांना एवढं वेड लावलं होतं की, लोकं गाणी सुरू झाल्यावर चक्क पैसे फेकायचे. तेंव्हा चलनात असलेले आणि किंमत असलेले पाच पैसे, दहा पैसे वगैरे. टाळ्या शिट्या जोरात असायच्या. तिकडे खाली वेगळाच गोंधळ. वरून फेकलेले पैसे फर्स्ट क्लास च्या समोरच्या रांगा आणि सेकंड क्लास मधे पडायचे. तिथल्या पब्लिक मधे ते गोळा करायची धडपड. किमान तिकिटाचे तरी पैसे निघावे यासाठी खटाटोप.

या सगळ्यावर कळस चढायचा जेंव्हा "डफलीवाले" गाणं सुरू व्हायचं. सुरुवातीच्या संथ बासरी नंतर एकदा का थेटरात लतादीदींचा "डफलीवाऽऽऽलेऽऽ ......" असा आवाज घुमला की पब्लिक च्या अंगात अक्षरशः भूत शिरायचं. असेल नसेल तितका जोर लावून लोकं पैसे फेकायचे. खास या गाण्यासाठी चाराणे (२५ पैसे) आठाणे (५० पैसे. त्याकाळातले ५० पैसे हे आजच्या १०रु. च्या बरोबरीचे) उधळायचे. प्रोजेक्टर रूम मधून येणाऱ्या प्रकाशझोतात ही सगळी नाणी हवेत उडताना दिसायची. अन् खाली गोळा करणाऱ्यांचा गोंधळ सुरू व्हायचा. टाळ्या शिट्टयांना तर ऊत आलेला असायचा. लगेच पुढे "... डफली बजाऽऽऽ ... " ला ढिडिंग टिडिंग डिंग ढिडिंग टिडिंग डिंग डफली सुरू व्हायची अन् उत्साही पब्लिक शिटा सोडून मोकळ्या जागेत येऊन जमतील तसे अंगविक्षेप करत नाचायला चालू करायची. काही अतिउत्साही तर बाल्कनीच्या कठड्यावर चढून चिरकत नाचायची. "मैं नाचूँ, तू नचाऽऽ आऽऽऽ आऽऽऽ ...." नंतर आणि पुढे जेंव्हा जेंव्हा गाण्यात डंगडंगडंगडंग डफली वाजायची तेंव्हा हे नाचे लकालका लकालका हलायचे. गाण्याचं दुसरं कडवं रफी साहेबांच्या आवाज सुरू व्हायचं आणि नर्तक मंडळी स्वतः डफली वाजवल्या ची ॲक्शन करत ऋषी कपूर च्या स्टाईलमधे नाचायची.

अशा सगळ्या गोंधळात सिनेमा एकदाचा संपायचा. क्लायमॅक्स ला मात्र गोंधळ घालणारी जनता चिडीचूप असायची. मला अंधूकसा आठवतो. हिरो आणि आणखी एका नटाला उंच टेकडीवर मंदिरात खांबांना बांधलेलं असतं. प्रकरण अजून गंभीर करायला त्यांची तोंडं पण बांधलेली असतात. आणि टेकडीच्या खाली पोलीसांसकट इतर पब्लिक त्यांच्या नावाने बोंबलत हुडकत फिरत असते. आता त्यांना उत्तर कसं द्यायचं? योगायोगाने, बरोबर या दोघांना बांधलेल्या खांबांच्या मधे एक घंटा लोंबकळत असते. इथे भोलेनाथ चमत्कार दाखवतात आणि काहीतरी होऊन (मला आठवत नाही) ती घंटा जोरजोरात हेलकावे खायला सुरू करते. आणि हिरोला मेन्टॉस खाल्ल्यागत लगेच आयडिया सुचते. ती घंटा त्याच्याकडे आली की तो जोरात मुंडकं हलवून कपाळ त्यावर आपटून ती पलीकडे टोलवतो. दुसरा कलाकार पण तशीच कपाळ मारून हिरोकडे टोलवतो. अशाप्रकारे कपाळाने घंटा टोलवायचा बॅडमिंटन खेळ चालू होतो आणि ती घंटा जोरजोरात टणांग टणांग आवाज करते. तो आवाज ऐकून पब्लिक मंदिरात येऊन या दोघांना सोडवते. इकडे हे सगळे पोहोचेपर्यंत दोघांचेही कपाळ फुटून चक्कर येऊन पडायच्या बेतात असतात. वगैरे वगैरे. दोघे सुटले की प्रेक्षक पण एकदाचे रिलॅक्स व्हायचे.

तोपर्यंत इकडे थेटरातल्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू व्हायची. The End ची पाटी यायच्या आधीच दरवाजे उघडून खरखर पडदे सरकावून ठेवायचे. लख्खकन् उजेड मधे यायचा आणि पडद्यावरचं काहीच दिसेनासं व्हायचं. प्रेक्षकांची पण घशातून चित्र विचित्र आवाज काढत, ओरडत बाहेर पडायची घाई सुरू व्हायची. जसं रेटारेटी करत मधे घुसायचं, तसंच रेटारेटी करत बाहेर मोकळ्या हवेत यायचं की हुश्श. बाहेर येताना बाल्कनी, फर्स्ट क्लास मधली पब्लिक, "मी धा धा पैशे हिबाळलो", "मी चाराणे हिबाळलो" अशी चर्चा असायची आणि सेकंड क्लास मधली पब्लिक चिल्लर मोजत बाहेर यायची.

कालांतराने मात्र सिंध टॉकीजचा दर्जा घसरत गेला. काळानुसार न बदलल्यामुळे वगैरे असेल, प्रेक्षकांनी सिंध कडे पाठ फिरवली. दर्जा इतका घसरला की, तिथे फक्त आंबटशौकीन लोकांसाठीचेच चित्रपट लागायचे. असं म्हणतात की तिथे चित्रपट मधेच थांबवून निळ्या चित्रफिती दाखवायचे. टॉकीज भोवती वेश्या देखील घुटमळायच्या. याच सिंध टॉकीजच्या आवारात प्रसिद्ध कृष्णा बेकरी होती. बेकरीतून काही आणताना उगाच इकडे तिकडे बघावं लागायचं. चुकून जरी कोणी पाहिलं तर लगेच "अय हऽऽय, सिंधला जाऊन आला बघ" म्हणून टर उडवायचे. कालाय तस्मै नमः.

तळटीप - सरगम बघितला तेंव्हा मी जेमतेम ८/९ वर्षांचा असेन. त्यामुळे सिनेमा तसा कळलाही नाही अन् लक्षातही नाही. परंतु तो माहोल लक्षात राहीला. त्या एका गाण्यामुळे सगळं आठवलं.

चित्रपट

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jun 2023 - 2:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त आठवणी!!
ही सगळी गाणी त्यावेळी रेडिओवर चालु असायची. त्यामुळे चित्रपट नाही तरी गाणी ओळखीची असायची.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2023 - 2:39 pm | चौथा कोनाडा

मस्त झकास गोल्डन आठवण ! भारी एक नंबर लिहिलंय +१ !
अ ति शय सुंदर गाणी आहेत सरगमची ! किशोर धुमाकूळ घालत असताना मो. रफींची ती सुरेल गाणी रसिकांना खुपच भुरळ घालून गेली !

या सगळ्यावर कळस चढायचा जेंव्हा "डफलीवाले" गाणं सुरू व्हायचं. सुरुवातीच्या संथ बासरी नंतर एकदा का थेटरात लतादीदींचा "डफलीवाऽऽऽलेऽऽ ......" असा आवाज घुमला की पब्लिक च्या अंगात अक्षरशः भूत शिरायचं. असेल नसेल तितका जोर लावून लोकं पैसे फेकायचे. खास या गाण्यासाठी चाराणे (२५ पैसे) आठाणे (५० पैसे. त्याकाळातले ५० पैसे हे आजच्या १०रु. च्या बरोबरीचे) उधळायचे. प्रोजेक्टर रूम मधून येणाऱ्या प्रकाशझोतात ही सगळी नाणी हवेत उडताना दिसायची. अन् खाली गोळा करणाऱ्यांचा गोंधळ सुरू व्हायचा. टाळ्या शिट्टयांना तर ऊत आलेला असायचा. लगेच पुढे "... डफली बजाऽऽऽ ... " ला ढिडिंग टिडिंग डिंग ढिडिंग टिडिंग डिंग डफली सुरू व्हायची अन् उत्साही पब्लिक शिटा सोडून मोकळ्या जागेत येऊन जमतील तसे अंगविक्षेप करत नाचायला चालू करायची. काही अतिउत्साही तर बाल्कनीच्या कठड्यावर चढून चिरकत नाचायची. "मैं नाचूँ, तू नचाऽऽ आऽऽऽ आऽऽऽ ...." नंतर आणि पुढे जेंव्हा जेंव्हा गाण्यात डंगडंगडंगडंग डफली वाजायची तेंव्हा हे नाचे लकालका लकालका हलायचे. गाण्याचं दुसरं कडवं रफी साहेबांच्या आवाज सुरू व्हायचं आणि नर्तक मंडळी स्वतः डफली वाजवल्या ची ॲक्शन करत ऋषी कपूर च्या स्टाईलमधे नाचायची.

झकास .. लै भारी वर्णन ! सगळं चित्र डोळ्यापुढं उभं राहिलं !

माझ्या गावची, अकबर टॉकिजची आठवण झाली.
असाच धुमाकूळ चालायचा ! काय सुंदर दिवस होते ... बालपण समृद्ध केलं अशा सुंदर कलाकृतींनी !

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

प्रशांत's picture

17 Jun 2023 - 3:41 pm | प्रशांत

लै भारी वर्णन केलंय
सगळं चित्र डोळ्यापुढं उभं राहिलं
असेच लिहत रहा

सिरुसेरि's picture

17 Jun 2023 - 6:50 pm | सिरुसेरि

छान वर्णन . सरगम रिलिज झाल्यावर बारामती येथील दुर्गा टॉकिजला बघितला होता . शेवटच्या क्लायमॅक्सच्या प्रसंगात एका उंच टेकडीवरील पुरातन मंदीरात रिषी कपुर आणी असरानी यांना खलनायक शक्ती कपुर याने दोन समोरासमोरील खांबांना बांधलेले असते . योगायोगाने, बरोबर या दोघांना बांधलेल्या खांबांच्या मधे एक घंटा लोंबकळत असते. इथे भोलेनाथ चमत्कार दाखवतात आणि एक नागोबा कुठूनतरी येउन त्या घंटेला लटकतात , त्यामुळे ती घंटा जोरजोरात हेलकावे खायला सुरू करते.

प्रेक्षक ( विशेष करुन मुले ) जीव मुठीत धरुन हा सिन बघत असत . शेवटी सर्व काही आलबेल झाल्यावर प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडत असे .

अक्षरमित्र's picture

17 Jun 2023 - 8:25 pm | अक्षरमित्र

मी साधारण चौथीत असतानाची गोष्ट. त्यावेळी माझ्या वर्गातल्या माधुरी ने शाळेच्या स्नेहसंमेलनात ह्या गाण्यावर नाच केला होता. माझे नृत्याचे ज्ञान अगाध असल्यामुळे आणि मी दिसायला ऋषी कपूर पेक्षा शक्ती कपूर जास्त असल्यामुळे डफलीवाला व्हायचा मोका साधता आला नाही.
तिचा तो मेकअप आणि नाच बघून मी आयुष्यात पहिल्यांदाच प्रेमात पडलो होतो. आता हिच्याशीच लग्न करायचे असे (मनातल्या मनातच) ठरवूनच टाकले. मात्र एक दोन इयत्ता पुढे गेल्यावर तिने मला एकदा सांगीतले की तिने काल डुकराचे मटण खाले आणि ते खुप चविष्ट होते. मी शाकाहारी असल्यामुळे आणी समजा लग्न झाले तर चुंबन न घेता संसार करणे शक्य आहे का हे न कळाल्यामुळे तिच्याशी लग्न करायचा बेत (मनातल्या मनातच) रद्द करुन टाकला. :)

मस्तच!त्याकाळची गाणी म्हणजे कोयल असलीच पाहिजे ;)
रचक्याने "कोयलसी तेरी बोली"माधुरी-अनिल कपूरचं गाणं फार आवडायचे.

लैच भारी लिहिलंय, पिंपरीमधील थिएटर्सच्या पण अशा बऱ्याच आठवणी आहेत, मूड झाल्यास लिहिनही असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

19 Jun 2023 - 10:44 am | कर्नलतपस्वी

काय ते प्रेक्षक आणी काय ती शिणेमा घरे....

आमचं खेडेगावच. एकच टाकीज. गणमान्य व्यक्तींसाठी खुर्च्या तर बाकीच्यांसाठी भारतीय बैठक. आपापली पथारी आणा मस्तपैकी झोपून बघा किवा बघत झोपा.

निळू फुले,ललिता पवार वगैरे आले की आया बायांच्या चित्र विचित्र काॅमेन्ट आणी कडकडाट बोटे मोडण्याचा आवाज यायचा.

जय संतोषी मा तर एक वर्ष चालला होता. बैलगाड्या भरभरून लोकं आसपासच्या खेडेगावातून यायचे.

तुषार काळभोर's picture

19 Jun 2023 - 10:28 pm | तुषार काळभोर

आमचं हडपसरचं वैभव. अगदीं ऐंशीच्या दशकात सुध्दा मध्यमवर्गीय कुटुंबे गर्दी करायची. आईवडिलांना चित्रपट पहायची प्रचंड हौस आणि आवड. वर्षाला ८-१० पिक्चर बघत असतील ते ८०-९० च्या दशकात.
वैभव सोडलं तर पुढील जवळचे पर्याय क्यांपातलं व्हिक्टरी अन पुढं अपोलो. डफलीवाले हे गाणं माझं लई आवडीचं होतं असं घरातले म्हणतात. माझी पहिली आठवण हमाल दे धमाल पिच्चरची. शेजारपाजारच्या बायका मिळून हम आपके है कौन आणि दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे बघायला गेल्या होत्या. नवीनच केबल आल्याने झी टॉप टेन मध्ये दीदी तेरा देवर दिवाना बरेच आठवडे एक नंबर होतं, ते बघून बघून पिक्चर कसा असेल याची सर्वांना उत्सुकता लागली होती.

तिथं पाहिलेला शेवटचा पिच्चर रंग दे बसंती. एकूणच एकेरी पडद्यावरील शेवटचे चित्रपट ओम शांती ओम आणि नो स्मोकिंग.

या लेखामुळे सहज आठवलं म्हणुन -- https://misalpav.com/node/36213
https://misalpav.com/node/36903