व्यासपर्व (ऐसी अक्षरे मेळवीन-७)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
19 Dec 2022 - 4:40 pm

व्यासपर्व –लेखिका दुर्गा भागवत

A
काही पुस्तकं मनमुराद अनुभवण्यासाठी मनाचं क्षितीज विस्तारलेलं पाहिजे. व्यासपर्व मनाचं कवाड विस्तारल्यावर हातात पडलं. धर्मग्रंथाला कलाकृती म्हणून अनुभवताना वीण घट्ट झालीये.

मराठी साहित्यातील व्रतस्थ दुर्गा भागवत यांनी केवळ ११० पानांमध्ये महाभारताचे व्यासांच्या मांडणीनुसार केलेले विश्लेषण शब्द सौंदर्याने सुशोभित आहे.

महाभारत-गीता ही ज्ञान, कर्म, भक्ती यांची वात तेजोमय करतात. तेही जगासाठी, केवळ भारतापुरते नाही. अशा ग्रंथाचा रचिता व्यास ह्यांनी प्रत्येक पात्राच्या ठायी जे भाव, रंग, रस यांची मांडणी गुंफली, त्याने एक महान पर्व घडले –व्यासपर्व !

त्याबाबतच प्रस्तावनेतच दुर्गाबाई लिहितात

“व्यासाच्या धर्मावगुंठीत कलेचा विशेष हाच, की ती लेण्यातील शिल्पाप्रमाणे ज्याला बघण्याची इच्छा असेल, तसे त्याला अनुकूल असे आंतरिक विश्व प्रेक्षकांत, वाचकांत वा श्रोत्यांत खुले करते.”
व्यासाला जे भौतिक आविष्कारापलीकडील चिन्मय शक्तीशी निगडीत जे सत्य सांगायचे आहे, यासाठीच युद्धाची घटना अनुकूल कथावस्तू आहे.

अनेक पात्रांपैकी दहा प्रमुख पात्रांच्या नीती, मूल्ये, महत्वकांक्षा यांचा कलावेगासाठी नाट्यबंध कसा साकारला याबाबतचे एक एक लेख वाचतांना दुर्गाबाई यांचे विचार, आकलन क्षमता अचंबित करतेच आणि व्यासपर्व हे ६० वर्षांपूर्वी लिहिले याचा अभिमान वाटतो.

१.पूर्णपुरूष
कृष्ण पूर्णपुरूष संबोधून त्याच्या व्यक्तीमत्वाचा स्वप्नवत आढावा घेतला आहे. विश्वव्यापक रूप जे बालपणीच्या लीला, सवंगड्यांबरोबरीच्या क्रीडा, यौवनातील राधेसोबतचे निळे-सावळे हळुवार प्रेम, कलासक्त व्यक्तीमत्व ते गीतेतील गंभीरता दाखविली आहे.

२.मोहरीतील ठिणगी
द्रोणाचे विद्यादानाचे कसब जे एकलव्य, कर्ण यांना देण्यास नाकारले त्या नकारात्मकाचे रंग द्रोणाच्या महत्त्वाकांक्षा अरूप सीमांनी अजूनच गडद वाटते. मुलाच्या यशासाठी आटापिटा करणारा, परंतु कौरवांकडून लढताना स्वामिप्रिय प्रतिमा दिसताना पांडवांसाठी अन्यायकारक राहते. मोहरी या अर्थाने की द्रोणाचे जग विशाल आतून मोहरी इतके हलके व लहान आहे, त्यात कितीही प्राण ओता, ते क्वचितच एखाद्या महाभागाच्या स्पर्शाने परत विशाल व्हायचे.

३.कोंडलेले क्षितीज
अश्वत्थामा अंतर्मुर्ख पण विश्वाचे सत्य त्याला जाणता आले नाही. आपल्या सृष्टीचे क्षितीज स्वत:मध्ये कोंडून शापित अमरत्व घेऊन फिरणारा अभागी.

४.व्यक्तीरेखा हरवलेला माणूस
व्यासाने विरूप केलेला खलनायक खुबीने ढासळलेल्या व्यक्तिमत्वाचा विदाम्बानातच दाखवला आहे. त्याच्या बुद्धीची चिकित्सा करताना व्यासाने ‘मूर्ख, वेडा‘ अशा शब्दांत वारंवार केली आहे. सुक्ष्म बुद्धीचा अभाव त्यात होता. योद्धा, युद्धाचा प्रणेता दुर्योधन, एक खलनायक जो महाभारतात खलत्व नायक होता.

५.एकाकी
हे विशेषण कोणासाठी हे ओळखणे कठीण नाही. कर्ण! कर्णावर आधारित साहित्य वाचल्यामुळे तो पराक्रमी, दानशूर, मैत्रीत प्रामाणिक, काहीसा अभागी हे माहीतच होते. पण त्याचे मन पदोपदी अवहेलनेमुळे जळत होते. त्या ज्वालेनेच कौरवांकडून युद्धात तो उतरल्यामुळे न्यायाचे पारडे त्यांच्याकडूनही झुकते, तेजाने भरते, पांडवांचे संस्कार उठून दिसतात या आश्वासकतेनेच. कारण हे पात्र रंगविले आहे. जीवनात औदार्याचा दागिना शेवटपर्यंत ज्याने मिरवला, तो जो कोणाचाच नाही एकाकी सुळक्यासारखा उंच गेला.

६.परीकथेतून वास्तवाकडे
आपले जीवनही सुरुवातीच्या अननुभवी काळात परीकथेच्या नजरेतून पाहिले, जगले जाते. एखादी घटना वास्तवाकडे आणण्यासाठी पुरेशी ठरते. त्या वास्तवाचा भार आनंदात रूपांतरित करण्यासाठी एकात्मता प्राप्त व्हावी लागते.
या शीर्षकात दुय्यम नायक भीम जो अर्जुनाचा टेकू आहे विचारात घेतला आहे. भीम परीकथेप्रमाणे नाहीच. वास्तवाकडे जाणारी जागृतीही तो धारण करत नाही. खादाडपणा, बलदंडपणा यात विनोदाची निर्मिती व्यासाने भीमाच्या रूपाने केली पण एक स्त्रीप्रती आदरभाव जपणारा वीर दाखवत परत पांडवाकडून न्यायाचे पारडे जड केले.

७.मुक्त पथिक
युधिष्ठर सौम्यभाषी, प्रौढ, लवचिक स्वभावामुळेच अखंड तोच गूढ सत्याकडे चालत राहिला आहे, असाच दिसला. आणि हाच एकटा पथिक शांतमयदृष्टी शेवटी एकटाच धर्मामध्ये कारुण्य पाहत मुक्त झाला.

८.अश्रू हरवल्यावर
पितामह भीष्म जे वचनबद्ध राहिले. कायम जबाबदारीचा भार ज्यांवर असतो. त्यांचे अश्रू हरवून जातात. तरीही महाभारतात एक प्रेमळ, वृद्ध व्यक्ती, पितामह एक ममत्व भरून देते. आधी वडिलांसाठी, भावांसाठी , त्याच्या पुढच्या पिढीसाठी विविध भूमिका अनुशासनपर्व व्यासाने भीष्म रूपाने दाखविले आहे.

९.माणसांत विरलेला माणूस
महाभारतात अनेक पात्रांशी ज्याने हितचिंतक रूपाने संबंध जोडले असा विदुर! मुत्सदी, युधिष्ठरसम परंतु जन्मभेदाने ज्याने आपली पायरी एक पाऊल खालीच ठेवली ?

१०.कामिनी
महाभारतातले सर्वात आवडते पात्र –द्रोपदी! अग्नीज्वाळेतून जिचा जन्म झाला, अखेरपर्यंत अनेक ज्वाळांत धगधगत राहिली. तरीही या ज्वालेने कोणाला भस्मसात केले नाही. ती पवित्र अग्नी होती. ती रूपवान होती तरीही गर्विष्ठ नव्हती, पाचही पतींमध्ये प्रेम जिने सम वाटले अशी एकमेव पात्र. ती राणी होती तरीही वनवासात तिचे स्वयंपाकाचे कसब सांसारिकपणाचे स्त्रीची ओढ दाखवते. भरसभेत जिचा अपमान झाला तेव्हा ज्येष्ठांना वाघिणीप्रमाणे जाब विचारणारी. तीन वर असतांना पहिल्यांदा पतींची दास्यमुक्ती मागणारी अनोखी. कृष्णासारखा सखा जिने आयुष्यभर निकोप मैत्रीने जपला. तिच्याविषयी वाचताना अंगावर काटाच येतो.
व्यासपर्व महाभारतातील पात्रांची मनपटलावर चिकित्सक उजळणी आहे.
महाभारत कलाकृतीची महानता अजून ठसवते.

-भक्ती

मुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Dec 2022 - 6:04 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.
महाभारतात शेवटपर्यंत नीतिमान राहिलेली व्यक्ती एकच, ती म्हणजे विदुर. भीष्म नीतिमान खराच पण तोही अर्थस्य पुरुषो दास: म्हणत गप्प झालाच.

Bhakti's picture

20 Dec 2022 - 11:45 am | Bhakti

खरंय.

कर्नलतपस्वी's picture

20 Dec 2022 - 9:15 am | कर्नलतपस्वी

पुस्तक ओळख छान..धन्तुयवाद तुमच्या लेखामुळे अणखीन एका पुस्तकाची आठवण आली. त्यावेळेस, १९६७ साली खुप चर्चेत होते.लहानपणी वाचले होते पण जास्त समजले नाही. आता पुन्हा वाचणार आहे.

दुर्गा भागवत यांच्याच समकालीन इरावती कर्वे यांचे युगांन्त हे पुस्तक सुद्धा महाभारतातील पात्रांवर व घटनांवर वेगळ्याच प्रकारे प्रकाश टाकते. याचा हिन्दी संस्करण सुद्धा वाचनात आले होते.

दुर्गा भागवतांचे पुस्तक पि डी एफ मधे असल्यास लिंक शोधावी लागेल. नाहीतर पुस्तकाच्या बघावे लागेल.

युगांन्त गूगलवर आहे.

१९६७ पासून आतापर्यंत चर्चेत!
अजूनही दुर्गाबाई भुरळ घालतात,प्रचंड अभ्यासू लेखिका _/\_

प्रचेतस's picture

20 Dec 2022 - 6:12 pm | प्रचेतस

आणि कुरुंदकरांचे व्यासाचे शिल्प.

अच्छा!कधी मिळालं तर वाचेन.

कर्नलतपस्वी's picture

20 Dec 2022 - 9:16 am | कर्नलतपस्वी

खुप चुका आहेत समजून घेणे.

प्रत्येक पात्रांविषयी वाचताना बी आर चोप्रा यांची महभारत मालिका त्यातले पात्र डोळ्यासमोर उभे होते होते :)
एक ओडिओ -व्हिडीओ रिव्ह्यू
https://youtu.be/-lp-hGvIxT8
खुप सर्दी झालीये सांभाळून घ्या .

कुमार१'s picture

5 Feb 2023 - 8:26 am | कुमार१

सुरेख लिहिलंय.

Bhakti's picture

5 Feb 2023 - 7:58 pm | Bhakti

_/\_