तृष्णा भयकथा - भाग २

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
2 Aug 2022 - 6:57 am

आधीचा भाग: http://misalpav.com/node/50502

संदिप चित्रा चे घर ज्या भागांत होते त्याला जॅकसन कॉलोनी म्हणायचे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तलावाच्या बाजूला राहण्यासाठी बांधलेली हि घरे. प्रशस्त रुंद रस्ते,  त्याला भले मोठे  फुटपाथ, त्याच्या दोन्ही बाजूनं झाडे. जॅक्सन कॉलोनी मध्ये कदाचित २५-३० घरे असतील. फारतर दुमजली. कॉलोनी रोड संपतो तिथून कंपनी कॉलोनी सुरु होत असे, ३-४ ते ७ माजली पर्यंत बिल्डींग्स. इथे बहुतेक खाण कंपनीचे अधिकारी, सरकारी नोकर इत्यादी लोक राहत. पहिली बिल्डिंग होती साईकृपा अपार्टमेंट्स, ४ मजली बिल्डिंग कधी काळी हिचा रंग पिवळा असावा पण आता तो उडून करडा झाला होता. त्याच्या खाली एक फार्मसी, एक HDFC बँक चे ATM आणि बाजूला मफतलाल व्हेज रेस्टोरंट. संदीप आणि चित्र इथूनच जेवण आणायचे त्यामुळे गल्ल्यावर बसणारे मफतलाल आणि संदीप ह्यांची चांगलीच ओळख होती. खरे तर मफतलाल च्या गेल्यावर बसतो म्हणून त्याला मफतलाल म्हणायचे पण प्रत्यक्ष्यांत त्याचे नाव बशीर खान होते. मफतलाल रेस्टोरंट त्याच्या वडिलांनी कुणा मफतलाल कडून घेतले होते हे सुद्धा संदीप ला त्याच्याकडून कळले होते.

नोकरी गेल्यापासून संदीपला सोमवार आणि रविवार ह्यांत फरक रहिला नव्हता.  त्यामुळे तो वेळी अवेळी ह्या बाजूने यायचा. कंपनी कॉलनी मधून पुढे गेल्यावर बऱ्याच बिल्डींग्सलागायच्या, कस्तुरबा हॉस्पिटल, डॉक्टर रानडे चौक आणि त्याच्याही पुढे गेल्यावर रस्ता दुभंगत असे. डाव्या बाजूने रस्ता एका टेकडीवर जात असे ज्याला जुने शहर लोक म्हणत. रस्ता जुना असल्याने अशीर होता आणि वळणांचा होता. तिथे म्हणे जुनी ब्रिटिश कालीन घरे इत्यादी होती. उजव्या बाजूंचा रस्ता खाणीच्या दिशेने जायचा. इथून गरीब लोकांची, कामगारांची वस्ती सुरु व्हायची. एक मोठा पेट्रोल पम्प, रिक्षा स्टॅन्ड, असंख्य मेकॅनिक आणि पंक्चर वाले इत्यादी त्या भागांत होते. ह्याभागांतून मुख्य रस्ता थेट खाणीकडे जायचा पण, त्याच्या आधी म्युनिसिपाल्टी चौकातून एक फाटा थेट हायवे कडे जायचा तर दुसरा फाटा थेट जाऊन जॅक्सन कॉलोनीच्या दुसऱ्या बाजूला. आणि ह्याच रस्त्याच्या दुतर्फ़ा खाणीच्या कंपनीनीची दिवाणी कामे करणारी ऑफिसे होती. हा रस्ता जॅक्सन कॉलोनीला जिथे मिळतो तिथेच स्मशान होते.

संदीपने शहर पालथे घालून पहिले नव्हते. धुळीचा त्याला तिटकारा होता. सरोवर सोडल्यास तसे पाहण्यासारखे काही नव्हतेच. जुने शहर त्याला पाहावेसे वाटत होते पण चित्राला त्यांत रस नसल्याने त्याला तिथे जाण्याचा योग्य आला नव्हता. त्यामुळे शहराची माहिती त्याला बहुतांशी रात्री डिनर साठी बाहेर जाताना किंवा सरोवराच्या भोवताली जो पार्क आहे तिथे फिरताना झाली होती. संदीप ला इतरांशी बोलताना सुद्धा थोडी भीती वाटायची कारण लपविण्यासारखे रहस्य त्यांच्याकडे होते.

आज थोडा जास्तच सकाळी संदीप बाहेर पडला. चित्राला अजून झोपायचे होते पण त्याला मेदुवडा खाण्याची इच्छा होती त्यामुळे त्याने गाडी बाहेर काढली. हवेंत एक गारवा पसरला होता आणि नगरपालिकेची गाडी काहीवेळापूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पाणी घालून गेली होती त्यामुळे पावूस पडल्याप्रमाणे मातीचा सुगंध हवेंत दरवळत होता. इंग्रजी भाषेंत ह्या सुगंधाला पेट्रिकोर असे नाव आहे असे चित्राने त्याला एकदा सांगितले होते. रस्त्यावर वर्दळ कमीच होती. संदीप ने गाडी वेगाने पुढे घेतली, जॅक्सन कॉलोनी सोडून तो साईकृपा च्या जवळ पोचलाच होता कि एक दळभद्री कुत्रे अचानक पुढे आले. त्याला वाचविण्यासाठी संदीपने गाडी उजवीला वळवली आणि त्याचा गाडीचा ताबा गेला. एक दोन सेकण्ड गाडी भरकटली असेल आणि त्यांत त्याची गाडी एका दुचाकीला आपटली. एक युवती कदाचित फार्मसी तुन काही घेऊन भर पडली असावी. गाडीचा वेग कमी असल्याने जास्त काही झाले नाही पण दुचाकी रस्त्यावर आडवी पडली. संदीप ने घाबरून गाडीतून बाहेर पाऊल टाकले. मफतलाल ने गल्ल्यावरून संदीप ला पहिले आणि तो सुद्धा पळत आला.

"I am सो सॉरी" त्याने त्या पडलेल्या युवतीला हात देऊन उठवले. "तुमची तशी चूक नाही, तो कुत्रा मध्ये आला तो पहिला मी" तिने उठत कपडे झटकत म्हटले. तिची दुचाकी जाड असल्याने तिला उचलणे शक्य नव्हते पण माफतलाल आणि काही बघ्यांनी ती उचलली. तिची पुढचा दिवा फुटला होता आणि व्हील थोडे डॅमेज झाले होते.

"तुम्ही काही काळजी करू नका मी तुमची दुचाकी पूर्णपणे रिपेर करून देईन. अगदी पूर्वी सारखी. प्लिज." ती मुलगी थोडी घाबरलेली होती. बघ्यांची गर्दी वाढत होती तशी ती आणखीन अवघडत होती.

"मॅडम, तुम्ही आधी आमच्या हॉटेल मध्ये येऊन बसा. संदीप सरांना मी चांगला ओळखतो. ते चांगले सज्जन आहेत. तुमची बाईक इथेच सोडून जा मी लल्लन ला पाठवून रिपेर शॉप मध्ये पाठवतो. " मफतलाल ने हस्तक्षेप करत सांगितले. संदीप ने सुद्धा गाडी बाजूला घेतली आणि बघ्यांची गर्दी पांगली.

ती युवती खूपच अस्वस्थ वाटत होती. तिला कदाचित रडायला येत असावे. संदीपला तर अतिशय गिल्टी वाटत होते. ती साधारण २५-२६ वर्षांची असावी. चांगल्या घरातील आणि सुशिक्षित वाटत होती. सावळा रंग आणि त्यावर पांढरा स्ट्राइप्स चा शर्ट आणि जीन्स म्हणजे ती कदाचित आपल्या कामाच्या ठिकाणी जात असावी.

"तुम्हाला कुठे जायचे होते ? मी तुम्हाला सोडतो ना आणि संध्याकाळ पर्यंत आपली स्कुटर ठीक झाली मी पाठवून देतो तुमच्या कामाच्या ठिकाणी. तुम्ही काहीही काळजी करू नका. " संदीपने तिला माफतलालच्या बाहेर लल्लन ने आणलेली खुर्ची ऑफर करत सांगितले. लल्लन ने एक पाण्याची बाटली सुद्धा दोघांना आणून दिली ती तिने घटाघटा प्यायली.

"मॅडम, घाबरू नका संदीप सर खूप चांगले आहेत, इथे जॅक्सन कॉलोनीतआपल्या मिसेस सह हल्लीच राहायला आले आहेत. तुम्ही त्यांच्या सोबत जा, ते तुम्हाला सुरक्षित सोडतील. आता इथे रिक्षा मिळणे मुश्किल आहे. " मफतलाल ने समजुतीच्या सुरांत सांगितले.

"पण तुम्हाला कुठे जायचे नाही का ?" तिने प्रतिप्रश्न केला.

"तुम्ही काळजी करू नका. मी इथे फक्त मेदुवडा पार्सल घ्यायला आलो होतो. मला अजिबात घाई नाही. मफतलाल, दोन प्लेट मेदुवडा रेडी ठेवा मी ह्यांना पोचवून येतो. या तुम्ही" त्याने अतिशय अदबीने त्या युवतीला गाडीजवळ बोलावले. दार उघडून आंत बसवले.

संदीपने गाडी सुरु केली आणि में रोड वर घेतली. "कुठे सोडू तुम्हाला ?" त्याने विचारले.

"जुन्या शहरांत. तिथे पहिलाच कॅफे जो आहे मेघदूत तो माझा आहे. मी गेल्याशिवाय तो उघडला जायचा नाही" तिने सांगितले.

"अरे वा, तुम्ही म्हणजे बिसिनेस वूमन आहात ? छान. आता तुमच्या मूळे मला सुद्धा पहिल्यांदाच जुन्या शहरांत जायला मिळेल." संदीपने गाडी चालवत म्हटले. तिचा मंद परफ्युम त्याच्या नाकांत जात होता.

"तुम्ही अजून जुने शहर पहिले नाही ? किती काळ काळ झाला तुम्हाला इथे येऊन ? " तिने विचारले.

"३ महिने सुद्धा नाही झाले. सध्या मी कामापासून ब्रेक घेतला आहे. चित्रा आणि मी इथे रिलॅक्स करत आहोत. वर्षभर राहू आणि पुढे मग बघू. कसलीही घाई नाही म्हणून अजून शहरांत सुद्धा जास्त फिरलो नाही. आणि खरे म्हणजे हि धूळ मला अजिबात पसंद नाही" गाडी आता ओल्ड सिटी रॉड च्या जवळ येत होती.

"तुम्हाला आवडेल. तुम्ही मोठ्या शहरांतून इथे आला आहात तर तुम्हाला हा भाग नक्कीच आवडेल. अनेक पर्यटक मुद्दाम ब्रिटिश कालीन वस्तू पाहण्यासाठी येतात. जुना भाग असला तरी अतिशय lively आहे." तिने सांगितले.

"तुम्ही ह्या शहरांत कॅफे का बरे सुरु केला ? तुम्ही इकडच्याच का ? इफ यू डोन्ट माईन्ड मी अस्किंग" त्याने विचारले.

"हो. लहान असताना माझे वडील मला इथे घेऊन आले. ते इथे चीफ इन्स्ट्रुमेंट अभियंता होते. एका औद्योगिक दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आणि आईची जबाबदारी माझ्यावर आली. सुदैवाने आम्हाला विमाचे पैसे मिळाले आणि मेघदूत कॅफे विकायला होता तो मी घेतला." तिने सांगितले.

"I am so sorry to hear that. पण तुम्ही कुटुंबाची जबाबदारी घेता हे स्तुत्य आहे. आम्ही इथे आलो पण आमच्या ओळखी अश्या झाल्या नाहीत. तुम्ही एक दिवस आईला घेऊन आमच्या घरी या. चित्राला सुद्धा तुम्हाला भेटायला खूप चांगले वाटेल" संदीप ने तिला आमंत्रण दिले. खरे तर आपण विवाहित आहोत हे तिला दाखवून तो तिला कम्फरटेबल करायचा प्रयत्न करत होता.

तिने उत्तर नाही दिले.

ओल्ड सिटी रोड वर संदीपने गाडी घेतली. रास्ता जुना होता आणि उशीर होता. बाजूच्या टेकडीवर नागमोडी वळणे घेत जात होता. डाव्या बाजूला दरी होती, शेवटी एक मोठे वळण घेताच त्याच्या पुढे जुने शहर आले. संदीपने ते पाहून आ वासला. अतिशय मोठ्या चढावर दुतर्फा अगदी व्हिक्टोरियन स्टाईल्स ची लाकडी आणि जुन्या प्रकारच्या इमारती टुमदार पाने उभ्या होत्या. सागवान, शिसंम सारख्या उच्च दरवाजाचे लाकूड विपुल प्रमाणात वापरले गेले होते. मधला रस्ता अरुण असला तरी पराकोटीचा स्वच्छ होता. एखादी दुसरी गाडीच पार्क केली होती. पहिलीच इमारत होती त्याच्या काचेच्या दारावर मेघदूत लिहिले होते. एखाद्या स्कॉटिश शहरांतील पब असावा असा फील होता.

"हे आहे जुने शहर ? बापरे. सुंदर आहे. इथे आम्ही यायला पाहिजे होतो. " त्याने बाजूच्या पार्किंग स्पॉट मध्ये गाडी पार्क केली. ती उतरली. संदीप सुद्धा उतरला.

त्याने आजूबाजूला वळून पहिले. रस्त्याच्या दोन्ही बाजूना दुकाने होती. पण त्या सर्वांचा जो फील होता तो खरोखर रिट्रो होता. म्हणजे जुनाट वाटत नसला तरी जुना होता. पथदिपक जुन्या प्रकारचे होते. दुखनाच्या बाहेर झगमगाट नव्हता, फ्लेक्स बॅनर्स नव्हते, ATM नव्हती, फोन्स च्या जाहिराती नव्हत्या. मेघदूत च्या पुढील दुकान एक भोजनालय होते, त्याच्या पुढे लॉंड्री, पुस्तकांचे दुकान, वाईनशॉप, आणि रस्त्याच्या टोकाला एक मोठी बिल्डिंग होती ती होती कुरियर सर्व्हिस. त्याच्याही पुढे एक दगडी मार्गदर्शक होता आणि त्यावर फक्त रिसॉर्ट अशी मोठी अक्षरे होती.

त्या युवतीने एव्हाना जाऊन कॅफे उघडला सुद्धा होता. संदीप चकित होऊन सर्व काही बघत असताना तिने हाक मारली आणि तो भानावर आला. "संदीप .. आत या ना" . संदीप पायऱ्या चालून आंत गेला. आतील वातावरण अत्यंत कोझी होते. कॉफीचा सुगंध हवेंत होता. कोफी बनविण्याची जी विचित्र यंत्रे असतात ती सगळी होती.

"मी तुमच्या साठी एखादी कोफी करू ? मफतलाल च्या मेदुवड्यापेक्षा माझी कोफी तुम्हाला जास्त आठवणीत राहील. " तिने म्हटले. आधी थोडी अवघडलेली, घाबरलेली ती युवती आपल्या स्वतःच्या कॅफे मध्ये मात्र अगदी सम्राज्ञी प्रमाणे आत्मविश्वासू वाटत होती. तिने काळ्या रंगाचा ऍप्रन घेतला होता आणि ती एखाद्या फुलपाखराप्रमाणे ती त्या काऊंटर च्या मागे विचरण करत होती. तिचा तो सडपातळ बांधा, सावळा रंग आणि मागे बांधलेले केस सर्व काही त्या काऊंटर ची शोभा वाढवीत होती. संदीप ला काही तिचे आकर्षण निर्माण झाले होते असे नाही, फक्त पुरुषसुलभ स्वभावाने तो तिला न्याहाळत होता. त्यांत चुकीचे काहीच नाही असे त्याने आपल्या मनाला सांगितले.

"खरे म्हणजे मला कॉफी म्हटले कि गोंधळायला होते. काय ते अजब प्रकार. एस्प्रेसो, फ्रॅपेचिनो काय आणखीन काय. मी तर साधा आलं घालून चहा पिणारा माणूस. त्यामुळे तुम्ही जी कोफी बनवून द्याल ती तुमच्या भरवशयवर मी पीन." त्याने म्हटले.

"अरे मग चहा पाहिजे ना ? आम्ही अगदी मस्त फक्कड देशी चहा बनवतो आलं आणि ओंवा घालून. तुम्ही पहाच पिऊन." असे म्हणून एखाद्या फुलपाखरने सूर्यफुलावरून कमलदलावर जावे त्याच सुलभतेने ती दुसऱ्या मशीनवर गेली. काही क्षणातच तिने त्याच्या पुढे चहाचा कप ठेवला. अजून दुकानात ग्राहक आले नसल्याने तिने सुद्धा एक कप आपल्यासाठी बनवला होता.

"खूप छान आहे आपला कॅफे. आणि इथे वर दुसरा मजला सुद्धा आहे ? " त्याने जिन्याकडे पाहत म्हटले.

"हो ना. ह्या भागांत आपल्यासारखी रिलॅक्स करणारी अनेक मंडळी येतात, लेखक वगैरे. मग इथून चहा कोफी घेत ती वर जाऊन बसतात. आणि तिसरा मजला सुद्धा आहे तिथे आम्ही कधी कधी भाड्याने रूम देतो. मेघदूत हे खूप जुने आस्थापन आहे. हे नाव संस्कृत प्रेमी ब्रिटिश अधिकाऱ्याने ह्याला दिले होते आणि तुम्ही जिथे राहता ती जॅक्सन कॉलनी ज्यांनी डिसाईन केली होती ते जॅक्सन सुद्धा येथे टाईमपास करायला यायचे." तिने आपली सडपातळ आणि लांब तर्जनी भिंतीकडे दाखवली. तिथे काही जुने फोटो होते.

त्या वास्तूत संदीपला भारावल्या सारखे झाले होते. चहाची जादू होती कि तिच्या साठीची पण त्याच्या मनावरील ताण गायब झाला होता. इतक्यांत कॅफेत ग्राहक आला.

"खरेच सुंदर आहे. आणि मी नक्की इथे वारंवार येणार आहे. तुम्हाला तसदी नको. मी इथून काढता पाय घेतो. मफतलाल चे मेदुवडे हाय चहापुढे खरोखर फिके वाटणार आहेत आता" असे म्हणून त्याने तिचा विडा घेतला.

संदीप बाहेर आला आणि गाडीत बसण्याच्या आधी एक फेरफटका मारू म्हणून त्याने त्या रिसॉर्ट च्या बोर्ड च्या दिशेने म्हणजे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पावले वळवली. तरुण, वयस्क मंडळी होती. काही लोक दुकानात जात होते तर काही येत होते. त्या परिसराला खरोखरच एक lively vibe होती ती क्वचितच एखाद्या भारतीय शहरांत दिसून येते. ब्रॅंडन सिम्स्ट्रेस च्या बाहेर मात्र एक माणूस जमिनीवर बसला होता. संदीप जवळ येतंच तो मोठ्याने खदाखदा हसला. चेहेऱ्यावरून वेडा भिकारी वाटत होता. "मिळाला का तुला ?" त्याने विचारले. त्याच्या त्या निरर्थक आणि असंबद्ध बडबडीकडे लक्ष न देता संदीप ने रास्ता क्रॉस केला. आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने तो पुन्हा मेघदूत च्या दिशेने जाऊ लागला. दुरून एक व्यक्ती आपल्या गाडीच्या जवळ आहे असे त्याला दिसले. गाडीतून कुणी काही चोरत तर नसेल ना ? म्हणून तो थोडा घाबरला आणि वेगाने गाडीच्या दिशेने पळाला.

आणि जी व्यक्ती त्याच्या गाडीच्या बाजूला होती ती व्यक्ती त्याला कदाचित फारतर ३ सेकंड दिसली असेल. त्यानंतर काही मुलांचा एक घोळका त्या बाजूने गेला आणि ती व्यक्ती जणू काही त्या घोळक्यांत विरघळून गेली. पण त्या ३ सेकंदात संदीपला कदाचित हृदयविकाराचा थोडा झटका आला असेल. कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ज्या मृतदेहाचे केस त्याने कापले होते तोच होता. तोच राकट धुळीने माखलेला निर्जीव चेहरा. तेच धुळीने माखलेले केस. तोच होता तो.

संदीप चे हात पाय थरथर कापत होते. घामाने त्याचे सर्वांग भिजले होते. तो गाडीजवळ आला तेंव्हा तिथे आस पास कुणीच नव्हते. गाडींत तो बसणार तेंव्हा दुरून काचेच्या खिडकीतून ती मघाची युवती त्याला बाय करत होती पण तो इतका दचकला होता कि तिला आपण प्रत्युत्तर नाही दिले हे सुद्धा त्याच्या लक्षांत नाही आले.

आपल्याला भास तर नाही झाला ना ? कारण मनातील सुप्त भीती कधी कधी अश्या स्वरूपांत प्रकट होत असते असे त्याने वाचले होते. त्या व्यक्तीचा तो राकट चेहेरा, ते गलिच्छ कपडे सर्व त्याच्या मनाचा खेळ होता.

आजच्या दिवसात काय घडले ते मुद्दाम चित्राला सांगून तिला विनाकारण त्रास द्यायचा नाही असे संदीप ने ठरवले. ती नागमोडी वळणे घेत त्याची गाडी पुन्हा जॅक्सन कॉलोनीच्या दिशेने जाऊ लागली.

क्रमशः
 

कथा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

2 Aug 2022 - 9:35 am | विजुभाऊ

वा! मस्त लिहीताय.
कीप गोइंग.....

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2022 - 12:09 pm | कर्नलतपस्वी

छान वातावरण निर्मिती,नविन व्यक्तिरेखेचा प्रवेश,ओळख आगदी चपखल.
लेखन आवडले.
पुभाप्र

सौंदाळा's picture

2 Aug 2022 - 12:56 pm | सौंदाळा

तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ज्या मृतदेहाचे केस त्याने कापले होते तोच होता

शेवटी जोरदार धक्का बसला.
पुभाप्र

बापरे. अनपेक्षित धक्का.

मृतदेहाच्या डोईचे केस कापले, आमच्या डोईचे केस उभे र्हायले.

पुभाप्र.

विजुभाऊ's picture

2 Aug 2022 - 1:28 pm | विजुभाऊ

माझ्या बाबतीत हे घडले नाही गवि.

अहो रूटीनमधे तो केस कापलेला मुडदा माणूस अचानक दिसल्याने दुसरे काय होणार? सलग हॉरर न उभे करता किंचित गूढ, किंचित रोमांटिक आणि अशी मधे थोडी ढील देत अचानक खेच देण्याचे टेक्निक उत्तम वाटले.

गाव, त्यातील आस्थापने, सोयीसुविधा या अगदी जगावेगळ्या न ठेवल्याने ही भीती अधिक अंगावर येते.

रानावनात, पावसाळी रात्री दूर कोठेतरी निर्जन वाड्यात घडणारी भयानक गोष्ट तितकीशी दचकवत नाही कारण ती जागा आपल्या वस्तीपासून, घरापासून, शहरापासून दूर दूर असते.

मला हा कथेचा प्लस पॉइंट वाटला.

गवि's picture

2 Aug 2022 - 1:42 pm | गवि

ओह नो विजुभौ

तौबा तौबा. गलती झाली. आत्ता कळले. :=)) :=))

माफी असावी __/\__

श्वेता२४'s picture

2 Aug 2022 - 5:55 pm | श्वेता२४

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

कथा आवडली. गवीनीं माडलेले सगळे प्लस पॅाइंट पटले. धक्का तंत्र मस्त ….पु भा प्र.

सुखी's picture

3 Aug 2022 - 3:22 pm | सुखी

पूभाप्र..
थोडे शब्द खटकले जसे "म्हणून त्याने तिचा विडा घेतला. ", पण कथेच्या मांडणीपुढे हे दुर्लक्षित करता येईल...

Nitin Palkar's picture

3 Aug 2022 - 7:21 pm | Nitin Palkar

हा भाग सुद्धा सुंदर. उत्कंठा वाढत चाललीय

सुचिता१'s picture

6 Aug 2022 - 2:13 pm | सुचिता१

काय अप्रतिम कथा लिहिली आहे आता एक मनापासून विनंती की पटपट पुढील भाग टाका.

नीळा's picture

8 Aug 2022 - 8:47 am | नीळा

छान
जोर का झटका धीरेसे लगा!

फक्त तो रस्ता जूना असल्याने अशीर का ऊशीर का होता तेवढ कळल नाही

साहना's picture

10 Aug 2022 - 1:08 pm | साहना

अशीर = > अरुंद

चित्रगुप्त's picture

20 Dec 2022 - 12:30 am | चित्रगुप्त

आत्ताच भा.दु.वा. छान.