अतिरेक्यांचे निर्मूलन यावरील समारोपीय लेख.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
6 Dec 2008 - 12:49 pm
गाभा: 

एखाद्या विस्तीर्ण अशा भूभागावर असंख्य लोक अनेक शतकापासून राहत असावेत. अनेक संकटांना एकत्र सामोरे जात असावेत, अनेक प्रथा-परंपरा समान असाव्यात. सांस्कृतीक इतिहास हा समान धागा असावा पण दुर्दैवाने काळाच्या ओघात एक विभाजन व्हावे. एकाच रात्रीत यातील लोकांची भूभागाच्या आधारे विभागणी व्हावी हे कदाचित तर्कसंगत असू शकेल. पण या विभाजनानंतर मात्र हे लोकांनी परस्परांना वैरी समजावेत आणि त्यांच्या निर्मूलनाचा एक कलमी प्रयत्न करावा अशी घटना काल्पनिक नसून वस्तुस्थिती आहे. प्रसंगी तृण खाऊ पण दुसर्‍या देशाचा नाश करू अशा प्रति़ज्ञा कराव्यात. या वस्तुस्थितीच्या दोन्ही देशाचे नाव आहेत भारत आणि पाकिस्तान.

२० व्या शतकाने अनेक शोध लावले अनेक नव्या कल्पनांना जन्म दिला. सर्व जगाचे एका प्रकारचे मापदंड आणि जीवन प्रणाली होऊ लागले पण या शतकाने सर्वात भयंकर अशा शोधाला जन्म दिला आणि तो म्हणजे राष्ट्राच्या सीमा. अनेक साम्राज्ये आली आणि गेली, पण या राजवटीत सामान्य माणसे, श्रमण,फकीर, संन्यासी, व्यापारी आणि कलावंत यांचे चलनवलन अबाधित पणे चालू होते. एक दिवस आला आणि देशाचे जाती, धर्मावरून विभाजन झाले आणि कायमस्वरुपी एकच सांस्कृतिक परंपरा निर्मितीला आळा बसला, इतके असते तर क्षम्य राहिले असते. आता एकत्र असणे, बंधुभाव असणे या ऐवजी लोकामध्ये द्वेश आणि दुर्भावनेने निष्पापांची हिंसा करावी असे गालबोट १००० वर्षाच्या काळखंडाला लागले. १०/१२ जण येतात, अत्याधुनिक शस्त्र सामग्री आणतात आणि शेजारी राष्ट्राच्या लोकांची अमानुषपणे हत्या करतात. केवढे हे क्रौर्य? अर्थातच या क्रौयाचा अंत दुप्पट अशा क्रौर्याने, बळाने होईल का? होईलही कदाचित. जगाचे अंतरंग बदलले आहे, अनेक पैलूंनी जगाचे राजकारण ग्रस्त झाले आहे. अनेक संस्कृती नष्ट झाल्या तसे आजची संस्कृती अशा मूठभर वेड्या माणसाच्या आतताईपणामुळे नष्ट होईल का या काळजीने केलेला हा लेखप्रपंच.

१९४७ ला या खंडप्राय देशाचे विभाजन झाले. त्यातल्या भारत नावाच्या देशाने शांततेची कास धरली. धर्माचे नावाने होणारे विभाजन अमान्य केले. धर्म, वंश, जात, वर्ण आणि भाषा अशा निकषाचे आणि असमानतेचे जे काही अस्तित्व होते ते मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले. देश मोठा, सा़क्षरता कमी. परंतू पण प्रत्य़क्ष हिमालयाला खुजेपण वाटावे असे नेते, कार्यकर्ये असल्यामूळे सगळ्याच ठिकाणी यशाची चाहुल दिसू लागली. लोकांना आनंद वाटू लागला. वि़ज्ञान, तंत्रज्ञान, भाषा इत्यादींच्या प्रगतीने देश जगाच्या प्रगतिशील देशामध्ये जाऊन बसू लागला. कदाचित लवकरच महासत्ता होईल अशी भाकिते होऊ लागली.

दुसऱ्या पाकिस्तान या देशाने मात्र विपरीत मार्ग स्वीकारला, कोणा बलाढ्य देशाचे हित करण्यासाठी आपण त्याचे पाद्ये व्हावे असा हट्ट निर्माण झाला. इकडून तिकडून शस्त्र साह्य घ्यावे आणि हल्ला करावा, पण ज्या देशाचे ईश्वरच हालाहाल पचवणारे आहेत त्याला अशा हल्ल्याने काय फरक पडणार? या प्रक्रियेत धर्माच्या नावाने वेगळे झालेले पाकिस्तान मात्र दोन भागात विभाजित झाले.

असो. सरळच्या युद्धाने लाभाऐवजी नामुष्कीच पदरी पडू लागली, मग माणसकीला परागंदा झालेल्या या देशाने मात्र अतिशय कुटील डाव खेळला. मूठभर माणसे जमा करावी, त्यांना काही आमिषे दाखवावी, नाहक अशा हिंदू-मुस्लिमाचा वैराचा बागलबुवा दाखवावा, थोडेफार सैन्य प्रशिक्षण द्यावे आणि भारत देशावर नियोजित हल्ले करण्याचे पाठवावे. त्यांच्या दुर्देवाने, अशा प्रयत्नाने हिंदू-मुस्लिम दंगे व्हावे,यादवी व्हावी अशी नतद्रष्ट ईच्छा मात्र फलद्रुप होईना. जनक्षोभ क्षमेना, युद्ध हवे, युद्ध हवे असा आक्रोश सुरु झाला. राजकारणी लोकांना फक्त कसेही करून राज्य हवे, प्रशासनाला सबबी हव्यात, या सर्वात आपल्या १००० वर्षाच्या समृद्ध अशा परंपरेचा बळी जातो का म्हणून केलेला हा लेख प्रपंच.

शेवटी या हल्ल्याचे स्वरूप आणि त्याला संभाव्य येऊ शकणारी शक्यता पाहून आमच्या मनातील १००० वर्षाच्या पुण्यश्लोक पूर्वजांच्या माणसाचे स्मरण झाले. त्यांचा प्रयोग आणि निष्कर्ष होते, प्रेम, अहिंसा आणि माणुसकी. त्यायोगे कोणतेही लक्ष्य असाध्य नाही. कोणतेही वैर दिर्घगामी नाही.

यासाठी काही विचार आणि योजना या विस्तृतपणे अगोदरच मांडण्यात आले आहेच. ( भाग ३).

मागच्या ५० वर्षातील द्वेशभावना कमी व्हावी, गांधींनी सांगितल्या प्रमाणे एक राष्ट्र नाही तरी, चला आदर्श शेजारी तर होऊ या विचाराने प्रेरित होऊन भारत-पाक शांतता मंच अशा संघटनेचे ७/८ वर्षापुर्वी निर्मिती झाली होती. त्याच्या एका बैठकीला सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. या मंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे अध्य़क्ष आपले माजी नौदल प्रमुख श्री रामदास हे होते. एका राष्ट्राच्या नौदल प्रमुखाने विरुद्ध देशामध्ये, त्याच्या नागरिकामध्ये शांतता, बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न करावा याचे मला कौतुकच वाटते. या संमेलनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारत -पाक मधील हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि मुलांचा संघ आहे. त्या दोन्ही देशाच्या संघाचे अध्य़क्ष स्थान मात्र एकाच व्यक्तीकडे होते, त्या म्हणजे सर्वोदयी कार्यकर्त्या कै. निर्मलाताई देशपांडे. सैन्य शक्तिचा आणि विघायक शक्ती चा एकमताचा संगम अनोखा होता.

श्री रामदास यांनी सांगितलेला प्रसंग, निवृत्ती नंतर त्यांनी भारत-पाक मैत्री या कार्याला वाहून घेतले होते. अशा एका प्रसंगी ते पाक सैन्यप्रमुख मुशर्रफ यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेले होते. मुशर्रफ यांनी त्यांना लष्करी सलाम केला. सैन्यातल्या प्रथेप्रमाणे शत्रू सैन्याच्या वरिष्ठ नेत्याला युद्ध नसताना भेटले तरीही त्यांना आपल्या वरिष्ठाप्रमाणेच मान द्यावा लागतो. शांततेच्या प्रयत्नात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.

रामदास सारख्या पूर्ण आयुष्य सैन्यदलात काढलेल्या व्यक्तिला सुद्धा मैत्री आणि शांततेचे मोल समजते. शेवटी युद्धाचा बळी सैनिक आणि त्यांचे नातेवाईकच असतात ना?

१९०४ मध्ये लाहोरमध्ये एका हिंदूमहाविद्यालयाचे संमेलन होते. त्या संमेलनासाठी त्यांनी एका २६ वर्षाच्या कवीला भाषणासाठी बोलावले होते. त्या कवीने मी भाषण देणार नाही पण एक काव्य ऐकवेल असे सांगितले. त्या प्रसंगी त्याने एक काव्य, ज्याला आपण 'तराना-ए-हिंद' नावाने ओळखतो. ते सादर केले. ते काव्य म्हणजे 'सारे जहॊंसे अच्छा, हिंदोस्तां हमारा'. हे काव्य अल्पावधीतच पूर्ण भारताच्या कानोकोपरी पोहोचले. त्या काव्याने त्याकाळच्या सर्वच तरुणांना एक विजयगीत दिले, भारताच्या १००० वर्षाचा इतिहास ५/६ कडव्यात रचला गेला. आसेतुहिंद तरुणांना आपले काव्य मिळाले, परकीयाविरुद्ध एक अमोघ शस्त्र मिळाले. या काव्यनिर्मात्याचे नाव होते, अल्लामा महंमद इक्बाल.

पाकिस्तानाची निर्मितीचे श्रेय या प्रतिभावंत कवीला देण्यात येते. पाकिस्तानच्या कल्पनेला धैर्य आणि नैतिकता या कवीमुळे आली असे आजही मानण्यात येते. आजही या कवीचा जन्मदिवस पाकिस्तानामध्ये राष्टीय सुट्टीच्या साहाय्याने मानण्यात येतो.

आश्चर्य म्हणजे यांचे आजोबा हे हिंदू होते. रामसरण सप्रू. हे अफगाण राजाच्या दरबारात एक विद्वान म्हणून प्रसिद्ध होते.

पाकिस्तानांचे दुसरे निर्माते म्हणजे कायदे आझम जीना. जीना यांचे जिव्हाळ्याचे सर्व मित्र हिंदूच होते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्याला राष्ट्रगीतही जीना यांच्या विनंतीनुसार एका हिंदूनेच बनविले होते.

जीना साहेबही २/३ पिढीपूर्वीचे हिंदूच होते. पाकिस्तानाची निर्मिती बाबर किंवा औरंगजेब यांच्या वंशजांनी न करता नवनिर्मित मुस्लिमांनी करावी हा खराखुरा दैवदुर्विस समजावा की नियतीची थट्टा? आपण हिंदू खरेच का कोठे कमी पडलो?

आज एखादे राष्ट्र नष्ट करणे तसे एखाद्या अण्वस्त्रधारी राष्ट्राला फारच सोपे झाले आहे. पाकिस्तान म्हटले तर समस्या आहे आणि म्हटले तर आवाहन आहे. १००० वर्षापासुन एकत्र राहत असणार्‍यांना मात्र हे आव्हानच आहे, आपल्या सहिष्णुतेला, सामंजस्याला आणि मुख्य म्हणजे हजारो वर्ष उन्नत असलेल्या संस्कृतीला.

आज जसे पाकिस्तानी अतिरेकी कोठेही येण्याचा धोका आहे, अमर्याद नाशाची शस्त्रे त्यांच्याकडे असतीलही. पण आपल्याकडे कधीही पराभूत न झालेले आणि होणारे असे एक शस्त्र आहे आणि ते म्हणजे प्रेम, करुणा आणि याचाच परिपाक असलेली मानवतावादी असलेली दृष्टी. आपल्यालाही आपल्यासारखीच भावना असलेल्या पाकिस्तानी नागरिकापर्यंत जाता आले पाहिजे, सेतू बांधता आला पाहिजे, शांतता आणि सद्भावनांचे महत्त्व पटविता आले पाहिजे. केवळ शब्दाच्या बुडबुड्याने काहीही साध्य होणार नाही हे नक्कीच.

पाकिस्तानच्या नागरिकांनाही आपल्याबद्दल प्रेमच वाटते. नेहरुंच्या मृत्युनंतर पाकिस्तानमध्ये उत्स्फुर्त हरताळ पाळण्यात आला. वसंत उत्सव मोठ्या आनंदाने पाकिस्तानमध्ये साजरा होतो. प्रेमचंद आणि उर्दु भारतीय लेखकाचे आजही बरेच चाहते आहेत.

जशी जशी आपली सद्भावना आणि शांततेचे मित्र दोन्ही देशात वाढत जातील तसे तसे अतिरेक्यांचे बल कमी कमी होत जाईल हे नक्की. शेवटी अतिरेकी अथवा शांततेचे सैनिक एका विचारसरणीतूनच निर्माण होतात. आपल्याला त्या विचारसरणी पर्यंत पोहोचता आले पाहिजे. मार्ग अवघड असला तरी खात्रीचा आहे, आज नाही तर उद्या आपण यशस्वी होऊच, एस्सो धम्मो सनंतनो, एस्सो मग्गो विशुद्धीयो ( हा धर्म सनातन आहे आणि हा मार्गही शुद्ध आहे).

आजच्या या लेखाचा आणि लेखमालेचा समारोप मी ' तराणा-ए-हिंद' नेच करेल,

सारे जहॊं से अच्छा, हिंदोस्तां हमारा, हम बुलबुल है इसकी यह गुलिस्ता हमारा,

गुरबत मै हो अगर हम, रहता है दिल वतन मै, समझो हमे वही ही दिल है हमारा,

मजहब नही सिखाता आपसमै बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा.

युनान ओ मिस्त्र ओ रोम, सब मिट गये जहॊ से, अब तक है बाकी, नाम ओ निशान हमारा,

कुछ बात है की हस्ती, मिटती नही हमारी, सदियो से रहा है दुष्मन, दौर ए जमाना हमारा,

जय हिंद.

टिपा : १ ) या लेखमालेतील १ लेख अतिरेकी कसे बनतात? दुसरा लेख गांधीविचाराने कसा याचा मुकाबला करता येईल आणि तिसरा लेख छोट्या प्रमाणात आपणला काय करता येईल. आजचा लेख वैर कसे अनावश्यक आहे आणि प्रेमाने परत आपण मनाने एक येऊ शकतो का यावर आहे.
२) भारताने स्वातंत्र्यचळवळीत बरेच काही कमावले असले तरी बराच मोठा भूभाग गमावलेला आहे.
३) दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे, भारताची शांततेचा प्रयोग इतरांनाही पथदर्शी ठरु शकतो.
४) शेवटी पटले ते तुमचे आणि अग्राह्य आहे ते माझे.

प्रतिक्रिया

ब्रिटिश's picture

6 Dec 2008 - 1:05 pm | ब्रिटिश

धन्यवाद
(समारोपाबद्दल)

झाडावरुन पिकुन पडलेला

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

टारझन's picture

6 Dec 2008 - 1:03 pm | टारझन

समारोप केल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे, तसेच समारोपाबद्दल आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

- टारझन

स्वप्निल..'s picture

6 Dec 2008 - 2:06 pm | स्वप्निल..

:)

यशोधरा's picture

6 Dec 2008 - 1:12 pm | यशोधरा

>>पण या विभाजनानंतर मात्र हे लोकांनी परस्परांना वैरी समजावेत आणि त्यांच्या निर्मूलनाचा एक कलमी प्रयत्न करावा अशी घटना काल्पनिक नसून वस्तुस्थिती आहे. प्रसंगी तृण खाऊ पण दुसर्‍या देशाचा नाश करू अशा प्रति़ज्ञा कराव्यात.

कृपया भारत आणि पाकिस्तानला एकाच तागड्यात तोलू नये. माझ्या मते भारताने स्वतः होऊन पाकिस्तानची कुरापत कधीच काढलेली नाही आणि पाकिस्तानने सतत कुरापती काढणे थांबवलेले नाही! सद्भावना आणि शांती यांचे महत्व आहेच, पण याचा अर्थ कोणीही यावे आणि टपली मारुन जावे आणि आपण भारतीयांनी ते सहन करावे असा होत नाही.

भारताने पाकिस्तानची खोडी काढलेली नाही. माझ्या मनात आपलेला अभिप्रेत असलेला अर्थच आहे. पाकिस्तानच्या नेत्यांनी विभाजन झाल्यावर आपल्या राष्ट्राची मांडणी त्यांना हवी आहे अशी केली असती तर?

भारताचे याबाबतीतले धोरण स्पष्ट होते. भारताने ६० वर्षातील अनेक क्षेत्रात प्रगती / विकास केला. यात निर्वासितांचा प्रश्न सोडवला हे सर्वात महत्त्वाचे यश आहे असे मी मानतो. त्याबाबतीत पाकिस्तान कोठे आहे?

असे आणि इतके असले तरी भारताने / आपल्यासारख्या नागरिकांनी शांतता मोहिम राबवावी, पुढाकार घ्यावा असेच मला वाटत राहील.

यशोधरा's picture

6 Dec 2008 - 1:44 pm | यशोधरा

>>असे आणि इतके असले तरी भारताने / आपल्यासारख्या नागरिकांनी शांतता मोहिम राबवावी, पुढाकार घ्यावा असेच मला वाटत राहील.

यावर काय बोलणार? शांतता मोहीमा राबवायला आणि पुढाकार घ्यायला भारतात माणसे शिल्लक असोत म्हणजे झाले!!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2008 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

"समारोप" हे शब्द वाचले आणी मला गलबलुन आले ! कसे आणी किति आभार मानावेत कळत नाहियेत मला. अगणीत वार धन्यवाद ! तुम्हाला धन्यवाद देउन आज मी स्वतः धन्य झालो.
आपलाच
धन्यवादी
दुरात्मा आंधी
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अनिल हटेला's picture

6 Dec 2008 - 1:45 pm | अनिल हटेला

समारोप वाचुन अतिशय आनंद झाला........................
त्याबद्दल तुम्हाला(आणी आम्हालाही) धन्यवाद ....

(दुखी आत्मा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

कलंत्री's picture

6 Dec 2008 - 1:56 pm | कलंत्री

श्री हटेला, राजकूमार, टारझन आणि ब्रिटीश,

मला ही हुश्श असे वाटत आहे. तुमच्या शुभेच्छाचा स्विकार करीत आहे.

बराच पिडला मी तुम्हाला... असो. शेवट गोड तर सर्वच गोड.

जमला तर कधी लेख वाचा आपल्या बाबतीत आणि आपल्या देशाच्या बाबतीत अभिमानच वाढेल.

( हेकट ) द्वारकानाथ.

ट हे प्रत्यय असे आहे की ते गुणांना जोडले की त्याने निचतम अशी पातळी दाखवली जाते. जसे बावळा ( बावळट), हलका ( हलकट), नेभळा ( नेभळट) इत्यादी इत्यादी. यात एखादे विशेषण आपणही जोडु शकता.

अवलिया's picture

6 Dec 2008 - 1:58 pm | अवलिया

कलंत्री साहेब,

तुमचे लेख आणि विचार खुपच चांगले होते. फक्त तुम्ही चुकीची वेळ निवडलीत.उपासाचे महत्व माणुस भुकेने कावला असतांना विषद करणे चुकीचे असते. असो.

परत सहा महिन्यांनी हीच लेखमाला टाका. कदाचित चित्र वेगळे दिसेल.

शुभेच्छा

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

7 Dec 2008 - 8:27 am | विनायक प्रभू


असेच म्हणतो +

JAGOMOHANPYARE's picture

6 Dec 2008 - 2:18 pm | JAGOMOHANPYARE

हे राम !

चावा ( चावट) , खरं का ( खरकट) ...

हे राम ! ( हा दुसरा हे राम बहुधा पाणिनीने म्हटला असावा !)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2008 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

>>जमला तर कधी लेख वाचा आपल्या बाबतीत आणि आपल्या देशाच्या बाबतीत अभिमानच वाढेल.
== अभिमान वाढेल म्हणजे नक्की काय होइल ?? हा लेख वाचुन अभिमान नाहि वाढला तर आपण हा लेख मागे घेणार काय ?
ह.घ्या. ;)

आपलाच
टारग(ट)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

कलंत्री's picture

6 Dec 2008 - 2:35 pm | कलंत्री

शेवटी श्रोता /वाचक हे जास्त महत्त्वाचे असतात. भारताबद्दल किंवा आपल्या परंपराबद्दल अभिमान वाटला नाही तर हा समारोपाचा लेख विनाअट उडवुन लावावा अशी माझी विनंती आहे.

आपण अशी एखादी समिती नेमा आणि त्या समितीला हा निर्णय घेण्याचा आधिकार द्या. कृपया निर्णय कळवावा.

माझे याबाबतीत पूर्ण सहकार्य असेल.

सस्नेह,

द्वारकानाथ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Dec 2008 - 2:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'दुरितांचे तिमिर जाओ'च्या चालीवर शेवटी 'अतिरेक्यांचे निर्मूलन'च्या ऐवजी 'अतिरेकाचे निर्मूलन' वाचायला मिळालं असतं तर जास्त आवडलं असतं.

स्थानिक पाठींब्याच्या जोरावरच दहशतवादी थैमान मांडतात असं भारत आणि इतरही देशांत (रशिया, इंडोनेशिया, युके इ.) असं दिसतं. सगळी लेखमाला, त्यावरचे प्रतिसाद वाचल्यावर असं वाटतंय की पाकिस्तान सोडा पण आपल्याच सर्व देशबांधवांना आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेऊ शकलो तरीही बर्‍याच अंशी काम होईल असं वाटतं. आणि त्यासाठी गोळीबारापेक्षा हा गांधीवाद (किंवा कलंत्रीवाद) जास्त उपयुक्त ठरेल.

विसोबा खेचर's picture

6 Dec 2008 - 5:23 pm | विसोबा खेचर

या समारोपाच्या लेखाबद्दल काही मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. आता यावर धन्याशेठ कुठला नवीन धागा सुरू करतो ते बघायचं! ;)

असो,

कलंत्रीसाहेब, मिपावर एक लेखमाला पूर्ण केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.. असाच लोभ ठेवा...

(विचार जुळत नसले तरीही आपला स्नेही) तात्या.

झाले ते बरे झाले. लेखनाबद्दल धन्यवाद. गांधीवादाच्या अतिरेकी मार्‍यापासुन बचाव झाल्याचा आनंद काही औरच असतो.
वेताळ

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

विकास's picture

7 Dec 2008 - 8:39 am | विकास

सर्व प्रथम हा लेख, या लेखमालेतील इतर लेखांपेक्षा वेगळा वाटला. पहीला लेख अतिरेक्यांच्या ऐवजी भाजपावरच जास्त वाटला... (तसा वेग़ळा लेख - भाजपाचा म्हणून असता तर मी देखील त्यांत टिका करायला सहभागी झालो असतो...), दुसर्‍यात गांधीवादाचा अतिरेक वाटला तर तिसर्‍यात प्रामाणिक इच्छा दिसली. तरी त्यामुळे अतिरेक्यांचे निर्मुलन होईल असे वाटत नाही. ते होण्यासाठी समाजकारण आणि राजकारण यांच्यात फारकत ठेवावी लागेल आणि अर्थकारण हे समाजातील सर्व स्तरावर पोचावे लागेल असे मला वाटते. असो.

श्री रामदास यांनी सांगितलेला प्रसंग, निवृत्ती नंतर त्यांनी भारत-पाक मैत्री या कार्याला वाहून घेतले होते. अशा एका प्रसंगी ते पाक सैन्यप्रमुख मुशर्रफ यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेले होते. मुशर्रफ यांनी त्यांना लष्करी सलाम केला. सैन्यातल्या प्रथेप्रमाणे शत्रू सैन्याच्या वरिष्ठ नेत्याला युद्ध नसताना भेटले तरीही त्यांना आपल्या वरिष्ठाप्रमाणेच मान द्यावा लागतो. शांततेच्या प्रयत्नात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.

रामदासांचा हा किस्सा एकाच बाजूने वाचताना असे वाटू शकते की, कस्सा माझा मुशार्रफ गुणी आहे आणि मैत्रीपूर्ण वागतो, वगैरे वगैरे...पण हेच रामदास आणि त्यांच्याशी मला संवाद साधता येत नसल्याने आत्ताच्या घडीला आपण सांगू शकाल का की, 'याच मुशार्रफने जेंव्हा तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी हे पाकभेटीला गेले होते तेंव्हा लष्करी अधिकारी म्हणून हजर राहून जी मानवंदना देयची होती ती का देण्याचे का नाकारले?'

याच मुशार्रफने जेंव्हा कार्गिलचे आक्रमण आखले, आपल्या सैनिकांना (स्वतः नाही तरी स्वतःच्या हाताखालील सैन्याकडून) आंतर्राष्ट्रीय युद्धाचे जे काही मानवी हक्क आणि युद्धबंद्यांसंदर्भात निती नियम होते ते दूर लोटून हाल हाल करून मारले त्याचे कौतूक आपलाच एक वरीष्ठ अधिकारी करतो? याच मुशार्रफच्या काळात पाकीस्तान हे जागतीक दहशतवादी केंद्र झाले आहे. त्यासाठी त्याने काही केले नाही. उलटे त्याकडे दुर्लक्ष केले. ही वस्तुस्थिती आहे. अशा माणसाशी मैत्री करून काय मिळण्याची अपेक्षा आहे? फारतर पाठ अजून रक्तबंबाळ होईल...

मला मैत्री आणि शांतता मान्य आहे. पण मग मला सांगा आज किती गांधीवादी हा प्रयत्न स्वत:च्या देशबांधवांसाठी करतात? मैत्रीचे हात पुढे करताना ज्या दोन गोष्टींची नितांत आवशक्यता आहे त्या म्हणजे आपण किमान समान पातळीवर असणे आणि दुसरे म्हणजे ज्याच्याकडे मैत्रीचा हात करत आहोत त्याने आपल्याबद्दल द्वेष न करणे. आजतरी हे दिसत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे.

जीना साहेबही २/३ पिढीपूर्वीचे हिंदूच होते. पाकिस्तानाची निर्मिती बाबर किंवा औरंगजेब यांच्या वंशजांनी न करता नवनिर्मित मुस्लिमांनी करावी हा खराखुरा दैवदुर्विस समजावा की नियतीची थट्टा? आपण हिंदू खरेच का कोठे कमी पडलो?

जीनांनी "हिंदू, आणि जहालमतवादी" लोकमान्य टिळकांची वकीली देखील केली होती. पत्नी पारशी होती आणि स्वतः कधीच कर्मठ पद्धतीने अथवा कुठल्याच अर्थाने इस्लाम पाळत नसत. तेच बर्‍याच जणांबद्दल सांगता येईल. असे ऐकले आहे की फारूक अब्दूल्ला पहील्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर वैष्णवी देवीस गेला होता. तेथील पुजार्‍याने विचारल्यावर वंशावळ दाखवली. पाकीस्तानची निर्मिती होण्यास आपला हिंदू धर्म आड आला की राजनिपुणता कमी पडली का दोन्ही हा एक वेगळ्या चर्चेचाअ मुद्दा आहे. केवळ हिंदू म्हणून असे झाले असे मला वाटत नाही...

आज एखादे राष्ट्र नष्ट करणे तसे एखाद्या अण्वस्त्रधारी राष्ट्राला फारच सोपे झाले आहे.
तसे असते तर आज अमेरीका इतके वर्ष इराक-अफगाणिस्तान मधे तडमडत बसली नसती किंवा या आधीपण व्हिएटनाममधे मार खाल्ला नसता.

१९०४ मध्ये लाहोरमध्ये एका हिंदूमहाविद्यालयाचे संमेलन होते. त्या संमेलनासाठी त्यांनी एका २६ वर्षाच्या कवीला भाषणासाठी बोलावले होते. त्या कवीने मी भाषण देणार नाही पण एक काव्य ऐकवेल असे सांगितले. त्या प्रसंगी त्याने एक काव्य, ज्याला आपण 'तराना-ए-हिंद' नावाने ओळखतो. ते सादर केले. ते काव्य म्हणजे 'सारे जहॊंसे अच्छा, हिंदोस्तां हमारा'.

१९०४-०५ च्या दरम्यान "तराना-ए-हिंद" आणि "मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा" असे प्रेरणादायी लिहीणार्‍या इक्बालनेच १९१० ला काय लिहीले ते माहीत असेलच. आणि गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे, परस्परविरोधी विचाराच्त नंतरचे विचार हे ग्राह्य धरावे लागतात आणि तीच वस्तुस्थिती देखील आहे): तराना-ए-मिली मधे इक्बाल म्हणतातः
चिनो अरब हमारा, हिंदोस्ता हमारा
मुस्लीमहै हम, वतन है सारा जहाँ हमारा

मला असले वास्तवीक लिहायला आवडत नाही आणि इतिहासात उगाच जायला आवडत नाही. पण जेंव्हा वस्तुस्थिती म्हणून उगाच काहीतरी उदात्तीकरण केले जाते तेंव्हा नाण्याच्या दुसर्‍या बाजू दाखवून हे खरे म्हणजे कसे खोटे नाणे आहे हे दाखवणे भाग पडते...

धम्मकलाडू's picture

8 Jan 2009 - 1:58 am | धम्मकलाडू

मला वास्तविक असे लिहायला आवडता नाही पण तुमचा हा ६०८ शब्दांचा प्रतिसाद (थँक्यू वर्ड काउंट प्लस). पूर्ण वाचू शकलो नाही. बहुधा एक चूक झाली आहे.

तराना-ए-मिली मधे इक्बाल म्हणतातः
चिनो अरब हमारा, हिंदोस्ता हमारा
मुस्लीम है हम, वतन है सारा जहाँ हमारा

तराना-ए-मिली म्हणजे मिली चित्रपटातले गाणे का? मैंने कहां फूलों से हंसो तो वो खिलखिलाके हंस दिये.... ते तराना-ए-मिल्ली हवे असे वाटते. चूक भूल देणे घेणे.असो. बराच शहाणपणा पाजळू शकलो असतो. ही चर्चा, हा लेख इकबालबाबत नाही म्हणून इथेच थांबतो.
(शब्दकृपण) धम्मकलाडू

'फिर सुबह होगी'मध्येसाहिर लुधियानवी म्हणतात
चीनो अरब हमारा

विकास's picture

8 Jan 2009 - 2:47 am | विकास

>>>ते तराना-ए-मिल्ली हवे असे वाटते.

बरोबर आहे ते "मिल्ली" असे हवे. धन्यवाद

>>>मला वास्तविक असे लिहायला आवडता नाही....

आपल्याला "...असे लिहायला आवडता नाही" असे म्हणायचे आहे का "...असे लिहायला आवडत नाही?" असे म्हणायचे आहे? मी काही शहाणपणा पाजळू शकत नाही तेंव्हा कदाचीत "आवडता नाही" असेच म्हणायचे असेल. तरी देखील चूक भूल देणे घेणे...असो. :-)

>>>'फिर सुबह होगी'मध्येसाहिर लुधियानवी म्हणतात...

लुधियानवी म्हणजे तेच का हो ज्यांचे खरे नाव अब्दूल हायी (Abdul Hayee) असे होते आणि जे फाळणीनंतर पाकीस्तानात स्थायीक झाले होते? पण त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीबद्दल त्यांना १९४९ साली पाकीस्तान सरकारने अटक केली आणि ते नंतर लाहोर मधून पळून दिल्लीत आले आणि नंतर, "मुंबई मला बोलावते आहे", असे म्हणत मुंबईत स्थायीक झाले ते? अहो त्यांना जर, "रेहनो को घर नही है, सारा जहाँ हमारा" असे सुचले असेल तर त्यात नवल ते काय?

बाकी ६०८ शब्द मोजून दाखवण्याचा शहाणपणा पाजळणे हे त्यातील विचार वाचून समजून त्यावर बाजूने अथवा विरुद्ध तितकेच वैचारीक लिहीण्यापेक्षा जास्त सोपे आहे.

असो.

धम्मकलाडू's picture

8 Jan 2009 - 3:50 am | धम्मकलाडू

बरोबर आहे ते "मिल्ली" असे हवे. धन्यवाद

मी सांगण्याआधी तुम्हाला मिल्ली माहीत होते तर....हाहाहाहा.... मला वाटलं मला एकट्यालाच सगळ कळतं... सगळंच माहीत असतं...आणि मी कधी चुकत नाही..

लुधियानवी म्हणजे तेच का हो ज्यांचे खरे नाव अब्दूल हायी (Abdul Hayee) असे होते आणि जे फाळणीनंतर पाकीस्तानात स्थायीक झाले होते? पण त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीबद्दल त्यांना १९४९ साली पाकीस्तान सरकारने अटक केली आणि ते नंतर लाहोर मधून पळून दिल्लीत आले आणि

तुम्ही ग्रेटच. तुम्हाला सोडल्यास या माहितीजालावर विकिपंडित आणि गूगलज्ञानीच आहेत... साहिर लुधियानवी मुसलमान होता तर. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

नंतर, "मुंबई मला बोलावते आहे", असे म्हणत मुंबईत स्थायीक झाले ते? अहो त्यांना जर, "रेहनो को घर नही है, सारा जहाँ हमारा" असे सुचले असेल तर त्यात नवल ते काय?

तुमचा तोल सुटला आणि तुम्ही बरळता आहात असे कसे म्हणू? साहिर लुधियानवीची कविता इकबालच्या तराना-ए-मिल्लीची पॅरडी आहे हे तर सगळ्यांना माहीत आहेच....

बक रहा हूँ जुनूँ में क्या-क्या कुछ
कुछ न समझे खुदा करे कोई

(ग़ालिबानी) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुक्तसुनीत's picture

8 Jan 2009 - 3:51 am | मुक्तसुनीत

लिहिण्याच्या तपशीलातल्या चुका सगळ्यांच्याच होतात - जे फालतू चुका काढून दाखवतात त्यांच्याही. तुम्ही हे सप्रमाण दाखवून दिल्यानंतरही त्याच लोकांनी इतरांच्या ज्ञानाबद्दल उपरोधाने बोलावे म्हणजे ... असो :-)
इतरेजनांची संभावना "विकिपंडित आणि गूगलज्ञानीच "म्हणून करताना , हेच दाखवून दिले जाते की "अरेरे , गूगल आणि विकी यांनी ज्ञानाची कवाडे उघडून दिल्याने कुणाचीच मक्तेदारी ज्ञानावर राहिलेली नाही ! काय जमाना आलाय पहा ! आजकाल कुणालाही कसलीही माहिती मिळते ! :-( "

कुणाच्या लेखात किती शब्द आहेत किंवा कोण किती अज्ञानी आहे हे दाखवायच्या ऐवजी एखाद्या मुद्द्याच्या बाजूने किंवा विरुद्ध सांगण्यासारखे काही आहे का हे लोकांनी तपासून पहायला हवे. नाहीतर आजतागायत अशी कुठलीच निशाणी दिसत नाही.

- गूगल आणि विकीचा अनंत आभारी असा एक अज्ञानी माणूस.

लिहिण्याच्या तपशीलातल्या चुका सगळ्यांच्याच होतात - जे फालतू चुका काढून दाखवतात त्यांच्याही. तुम्ही हे सप्रमाण दाखवून दिल्यानंतरही त्याच लोकांनी इतरांच्या ज्ञानाबद्दल उपरोधाने बोलावे म्हणजे ... असो

आम्ही तेवढ्या तपशिलातल्या चुका (३ चे ३० लाख) करतो. इतरांचे असे नसते. आपला तो बाब्या...

इतरेजनांची संभावना "विकिपंडित आणि गूगलज्ञानीच "म्हणून करताना , हेच दाखवून दिले जाते की "अरेरे , गूगल आणि विकी यांनी ज्ञानाची कवाडे उघडून दिल्याने कुणाचीच मक्तेदारी ज्ञानावर राहिलेली नाही ! काय जमाना आलाय पहा !

ज्ञानाची नाही. माहितीची कवाडे म्हणा.

आजकाल कुणालाही कसलीही माहिती मिळते ! "

आजकाल विकरून आणि गुगलून माहिती सहज मिळते, हे खरे. पण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही ज्ञान टिचकीसरशी मिळत नाही.

बाकी तुमचे चालू ठेवा.

(माहितीपूर्ण 'ढ') धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विकास's picture

8 Jan 2009 - 4:49 am | विकास

आम्ही तेवढ्या तपशिलातल्या चुका (३ चे ३० लाख) करतो. इतरांचे असे नसते....

कधी तरी तीन च्या ऐवजी तीस म्हणले, त्यातील चूक दाखवून दिल्याबरोबर, ती जाहीर मान्य करून मूळ लेखात तो बदल पण केला. उत्तर न देता अथवा "पडलो तरी नाक वर" म्हणत गप्प राहीलो नाही. तरी देखील तेच तेच परत काढून आपण दाखवणार असाल तर आपले वैचारीक कुंपण समजते आणि त्याहून अधिक धाव का घेता येत नाही ते देखील समजते.

आजकाल विकरून आणि गुगलून माहिती सहज मिळते, हे खरे.

त्याचा अभ्यासू माणसे चांगल्या गोष्टींसाठी वापर करतात. अर्थात आपल्याला ते माहीत आहेच. :-) हे आपल्या अभ्यासू लेख आणि प्रतिसादांवरून लक्षात येतेच...

बाकी स्वतःतला "ढ" पणा जरी कुणाला ओळखता आला तरी ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील पहीली पायरी पार पडली असे म्हणायला हरकत नाही... असेच पुढे जात रहा ही शुभेच्छा!

धम्मकलाडू's picture

8 Jan 2009 - 11:56 am | धम्मकलाडू

कधी तरी तीन च्या ऐवजी तीस म्हणले, त्यातील चूक दाखवून दिल्याबरोबर, ती जाहीर मान्य करून मूळ लेखात तो बदल पण केला.

स्पष्टीकरण कुणी मागितले होते ३ चे ३० बाबत.....खिख्खिखिख्खिखिख्खि.

उत्तर न देता अथवा "पडलो तरी नाक वर" म्हणत गप्प राहीलो नाही. तरी देखील तेच तेच परत काढून आपण दाखवणार असाल तर आपले वैचारीक कुंपण समजते आणि त्याहून अधिक धाव का घेता येत नाही ते देखील समजते.

हाहाहाहाहा. पुन्हा प्रयत्न करा.

त्याचा अभ्यासू माणसे चांगल्या गोष्टींसाठी वापर करतात. अर्थात आपल्याला ते माहीत आहेच. हे आपल्या अभ्यासू लेख आणि प्रतिसादांवरून लक्षात येतेच...

हाहाहा. आमचे काम धम्मकलाडू देणे. तुमचे प्रयत्न मात्र चालू ठेवा हं.

(निर्विकार) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विकास's picture

8 Jan 2009 - 5:58 pm | विकास

हाहाहा. आमचे काम धम्मकलाडू देणे. तुमचे प्रयत्न मात्र चालू ठेवा हं. (निर्विकार) धम्मकलाडू

म्हणूनच तर म्हणले की, "मूळ लेखातील चर्चेतील सुसंबंद्ध प्रतिसादाला संबंधीत उत्तर देण्याऐवजी काहीतरी उठसूठ अवांतर लिहायचे आणि तसेच जिकडे तिकडे जाऊन नको ती बक बक करणे हे "गालिबानी" पेक्षा "तालीबानी" म्हणून जास्त शोभेल..."

असो. आता आपण स्वतःला निर्विकार म्हणले आहेच त्यातून येथे चर्चा करण्यापेक्षा काहीतरी बरळत बसण्याच्या शहाणपणा पाजळण्याची आपली मर्यादेबद्दल खात्री झाली. तेंव्हा तुम्ही वाटेल ते चष्मे घाला आणि त्यातून जे काही दिसत राहील ते पाहून बरळत रहा.

बाकी परत मूळ चर्चेसंदर्भातः

अतिरेक्यांच्या निर्मुलनासाठी एका गांधीवाद्याच्या गांधीवादाला असलेल्या समर्थनार्थ चर्चेत वैचारीक समर्थक अथवा विरोधी लिहून त्या चर्चेत सहभाग घेण्याऐवजी व्यक्तिगत आकस काढत लिहून दाखवणे हे या चर्चेला लागलेले गालबोटच आहे म्हणा. आणि ते गालबोट गांधीवादाच्या विरोधकांनी लावले नसून त्या विरोधकांना, वैयक्तिक विरोध करत हिंडणार्‍याकडून लागले आहे. (वैचारीक नाहीच, कारण "धम्मकलाडू देणे हे काम समजणार्‍यांना" कसला गांधीवाद अथवा कुठलेही तत्व पेलणार म्हणा...) अर्थात हा दोष गांधीवादाचा नाही पण जसे कधी कधी गांधीजींचे विचार योग्य ठरू शकतात तसेच कधी कधी आमच्या तुकोबाचे "तुका म्हणे ऐशा नरा..." हे विचार पण गरजेचे आहेत हे खर्‍या गांधीवाद्यांना समजले तर भूतलावरील आणि जालावरील अतिरेकी आणि गावगुंड वृत्ती तडीपार करता येईल असे वाटते.

विकास's picture

8 Jan 2009 - 4:40 am | विकास

असला बाष्कळ प्रतिसाद काय सांगतो तर विषयाला धरून लिहायला वैचारीक मुद्दे नाहीत. तरी देखील स्वतःचे नाव सार्थक करायला जायचे आणि चापटपोळी मिळाली तरी पडलो तरी नाक वर दाखवायचे.

मी सांगण्याआधी तुम्हाला मिल्ली माहीत होते तर....हाहाहाहा.... मला वाटलं मला एकट्यालाच सगळ कळतं... सगळंच माहीत असतं...आणि मी कधी चुकत नाही..

अहो तुम्हाला नाही का माहीत, "लिहायला आवडता नाही" ह्यातील "आवडता" हो योग्य शब्दप्रयोग होत नाही ते. चालयचेच... असो.

तुम्ही ग्रेटच. तुम्हाला सोडल्यास या माहितीजालावर विकिपंडित आणि गूगलज्ञानीच आहेत...

आम्ही ग्रेट नाही तर प्रतिसाद देण्याआधी घरचा अभ्यास देतो. आणि हो मी कधी म्हणले की मी पंडीत आहे का ज्ञानी आहे ते? काय गरीबाची चेष्टा करता राव...

साहिर लुधियानवी मुसलमान होता तर.
तुम्हि फारच धर्माच्या चष्म्यातून बघता राव! (कदाचीत इतरही चष्मे वापरत असाल पण ते नंतर कधीतरी) म्हणजे असे की मी साहीर लुधियानवीचा पुर्वेतिहास दिला. त्यातून त्याला हे गाणे कसे सुचले असेल ते समजते. एखादा म्हणाला असता की, "अच्छा, अच्छा ते कम्युनिस्ट आहेत तर," अथवा "ते पाकीस्तानातून कम्युनिस्ट म्हणून राहता न आल्याने भारतात आले तर". पण आपले उलटेच लगेच धर्म बघायचा आणि नुसते मुसलमान ठरवायचे... अहो तुम्हाला माहीत नाही का की कम्युनिस्ट व्यक्ती धर्म मानत नाहीत आणि धर्माला अफुची गोळी समजतात ते? अस दिसतयं की एखाद्याला त्याच्या व्यक्तीगत धर्माच्या नजरेतून पहाण्याची सवय पण अफूच्या सवयी सारखी आहे. असो.

तुमचा तोल सुटला आणि तुम्ही बरळता आहात असे कसे म्हणू?

आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? तोल सुटलेलाच नाही तर तुम्ही तरी कशाला असे बरळाल ? आता म्हणायचेच म्हणून जंग जंग पछाडून मला मी बरळतो असे म्हणायचे असेल, तर मुद्राराक्षसाच्या चुका, शब्द किती आहेत वगैरे जे झेपेल ते करा.

साहिर लुधियानवीची कविता इकबालच्या तराना-ए-मिल्लीची पॅरडी आहे हे तर सगळ्यांना माहीत आहेच....

अरे वा! मला वाटले फक्त तुम्हाला आणि मलाच माहीत आहे असे... मी कुठे म्हणले की ती पॅरडी नाही म्हणून? पण अशी दु:खी पॅरडी करण्याची प्रतिभा असायला काय कारण असू शकते इतकेच काय ते माझे म्हणणे होते आणि आहे. आता ते तुम्हाला पटत नसेल तर तो तुमचा प्रश्न झाला.

बाकी मूळ लेखातील चर्चेतील सुसंबंद्ध प्रतिसादाला संबंधीत उत्तर देण्याऐवजी काहीतरी उठसूठ अवांतर लिहायचे आणि तसेच जिकडे तिकडे जाऊन नको ती बक बक करणे हे "गालिबानी" पेक्षा "तालीबानी" म्हणून जास्त शोभेल...

आजानुकर्ण's picture

8 Jan 2009 - 5:09 am | आजानुकर्ण

लुधियानवी म्हणजे तेच का हो ज्यांचे खरे नाव अब्दूल हायी (Abdul Hayee) असे होते आणि जे फाळणीनंतर पाकीस्तानात स्थायीक झाले होते?

यात मला काही चुकीचे वाटत नाही. विकासरावांनाही यात काही चुकीचे वाटले आहे असे वाटत नाही. किंबहुना लालकृष्ण अडवाणी कुटुंबियही फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले होते. त्यावेळी झालेली लोकसंख्येची अदलाबदल तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने पाहणे आवश्यक आहे.

आपला
(मुहाजिर) आजानुकर्ण

विकास's picture

8 Jan 2009 - 6:28 am | विकास

यात मला काही चुकीचे वाटत नाही. विकासरावांनाही यात काही चुकीचे वाटले आहे असे वाटत नाही.

धन्यवाद...

किंबहुना लालकृष्ण अडवाणी कुटुंबियही फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले होते. त्यावेळी झालेली लोकसंख्येची अदलाबदल तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने पाहणे आवश्यक आहे.

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या कुटूंबिय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला कराची सोडून मुंबईत आले. लुधियानवींनी पाकीस्तान हा स्वातंत्र्योत्तर आपला देश समजला (त्यात मला काही गैर वाटत नाही. त्यावेळेस ती प्रत्येकाची आवड-निवड होती). मात्र जेंव्हा त्यांचे कम्युनिस्ट विचार हे पाकीस्तान सरकारला मानवले नाहीत तेंव्हा ते १९४९ साली भारतात आले.

झुमाक्ष's picture

8 Jan 2009 - 7:38 pm | झुमाक्ष (not verified)

लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या कुटूंबिय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला कराची सोडून मुंबईत आले.

लालकृष्ण अडवानींवर (स्वातंत्र्योत्तर काळात) मोहम्मद अली जीनांच्या खुनाचा कट केल्याचा (कदाचित खोटा) आरोप कराचीच्या पोलीसठाण्यात अजूनही आहे, असे वाचले होते. तपशील गुगलून काढला पाहिजे.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

कलंत्री's picture

8 Jan 2009 - 7:46 pm | कलंत्री

मुशर्रफ आणि मनमोहनसिंग हे त्या राष्ट्राचे प्रमूख म्हणून भेटले असता, मनमोहनसिंगाचा जन्म पाकिस्तानातील तर मुशर्रफांचा जन्म भारतातील.

उद्या लालकृष्ण अडवाणी जर पंतप्रधान झाले तर त्यांचाही जन्म पाकिस्तानातील....

विनायक प्रभू's picture

8 Jan 2009 - 7:50 pm | विनायक प्रभू

दाई कुठल्या धर्माच्या?
टार-या तु फार लवकर निश्वास सोडलास रे?

रामदास's picture

7 Dec 2008 - 9:19 am | रामदास

वैचारीक लेख समजण्याची कुवत मर्यादीत असल्यामुळे आपले लेख समजले नाहीत.हिंसेचा परतावा हिंसेनी होत नाही असा काहीसा विचार मांडला आहे असे वाटले आहे.फक्त काही व्यावहारीक अडचणी आहेत.

गांधींचे विचार आणि त्याचे आचरण भारतातच जनसामान्यांना समजले नाहीत .पुरोगामी विकसनशील देश असूनही.सरहद्दीपलीकडे तर अजून मध्ययुगीन (साधारण १५०-२०० वर्षं मागे) सरकार आणि प्रजा आहे.त्यामुळे घटकाभर गांधीवाद हा वाद न धरता गांधी तत्वज्ञान आहे असं समजलं तरी हे विचार सरहद्दीपलीकडे पोचेस्तो चारएकशे वर्षं जातील.तोपर्यंत आपले सार्वभौमत्व टिकून राहील का.?

आतंकवाद सुरक्षेची समस्या आहे.त्यामुळे आतंकवादाचा निपटारा लष्करी कामाचा भाग आहे.इथे तुमच्यामाझ्या सारख्या सिव्हीलीयनचे आणि त्यांच्या थेरीचं काय काम आहे?

आतंकवाद मनात निर्माण होउ नये यासाठी आपण पाकीस्तानासाठी काही करण्याची काय आवश्यकता आहे.त्यांना शांतीवादाची गरज असेल तर त्यांनी पुढाकार घ्यायला हवा असं तुम्हाला वाटत नाही का ?
सहीष्णू निधर्मी राष्ट्र अशी छवी कायम ठेवण्यासाठी आपणंच पुढाकार घेणं म्हणजे बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना असं दिसेल.काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणे हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा मेन अजेंडा आहे अशा परीस्थीतीत शस्त्राघाता शस्त्रच उत्तर भुई न देउ एक तसूभर ह्यापेक्षा काही वेगळे धोरण फायद्याचे होईल का ?
यापरीस आपला वेळ आणि पैसा आपण आपल्या जनतेच्या कामात वापरावा .जर आपण गांधीचे तत्वज्ञान व्यवहारात वापरत असाल तर चला ग्रामोद्धारापासून सुरुवात करू या .

आतंकवादाचा महत्वाचा उद्देश हिंसा नसून हिंसेतून अराजकता निर्माण करणे हा असतो. आपल्या लोकांवरचा,आपल्या देशावरचा , आपल्या सुरक्षाव्यवस्थेवरचा विश्वास उडवावा अशी रचना असते.अशा वेळी आपल्यासारख्या प्रज्ञावंतांनी आपल्या लोकांना मानसीक आधार बनावे आणि सिमाबद्ध राष्ट्रवादाचा पुरस्कार करावा असे मला वाटते. गांधीय तत्वज्ञानाचा पुरस्कार युद्धसदृश वातावरणात करणे सॅडीस्टीक वाटते.हा शब्द वापरणे नकोसे वाटते पण पर्यायी शब्द माझ्याकडे नाही.

बंदूक आणि गांधी दोन्ही शस्त्रे आहेत. शंभर बंदूकवाले विरुद्ध एक गांधीवादी हा प्रकार फार कठीण होता .पण तरीसुद्धा तुमचा तोल गेला नाही याबद्दल अभिनंदन.
सविस्तर नक्की लिहीन पण अजूनही युद्धकालीन दिवसात गांधी ये बात हजम नही होती.
चर्चेनिमीत्ताने आपल्याबद्दलचा आदर वाढला आणि भितीपण वाढली.
धन्यवाद.

२६/११ पासून ते ०७/१२ पर्यंत आपल्या देशाने / नागरिकांनी अतिरेक्यांच्या समस्येसाठी नेमके काय केले आहे हा प्रश्न मला सतावत आहे. एक संभाव्य महासत्ता म्हणून आपल्याला काहीतरी निश्चय / निर्णय घ्यायलाच हवा. मग तो युद्धाचा असो अथवा शांततेच्या मार्गाचा असो.

मध्ये लोकमत मध्ये काही लेख वाचले आणि त्यांनी सर्वसाधारण पाकिस्तानी नागरिकांचे / पत्रकारांचे मनोगत व्यक्त केले होते. ( अतिरेकी व्यक्ती / संस्थाबद्दल निषेधाचा सूर होता.)

आपण विचार करण्यातच बराच वेळ घालवतो असे वाटते.

अशी घटना परदेशात झाली असती तर एव्हाना यावर एखादे सर्वमुद्यांचा स्पर्श करणारे पुस्तक प्रसिद्ध झाले असते. भारतात अशी निष्क्रियता का बरे येत असावी?

लिखाळ's picture

7 Jan 2009 - 9:42 pm | लिखाळ

आपण विचार करण्यातच बराच वेळ घालवतो असे वाटते.
अशी घटना परदेशात झाली असती तर एव्हाना यावर एखादे सर्वमुद्यांचा स्पर्श करणारे पुस्तक प्रसिद्ध झाले असते. भारतात अशी निष्क्रियता का बरे येत असावी?

परदेशात म्हणजे कुठे हा प्रश्न न विचारता, परदेशात काहीही होवो असे म्हणतो.

पण अशी घटना झाल्यावर सर्वसामान्य भारतीय म्हणून यावरचे पुस्तक बाजारात आले की नाही याची मला उत्सुकता नसून अतिरेक्यांचे, त्यांना पाठींबा देणार्‍यांचे सरकारने काय केले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
आपण विचार करण्यात फारच वेळ घालवतो हे खरेच आहे.

-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

कंलत्री साहेब आपण इतक्यातच हताश होउन युध्दाबाबत वा शांतते बाबत निर्णय घ्या असे म्हणत आहात. काही पटत नाही बॉ. खासकरुन तूमच्या व माझ्या झालेल्या चर्चेतुन.

निर्णय घेणे प्रक्रिय ही, " त्या दहशतवादी देशाशी आपण सिमावाद करु नये", हे लिहीन्या इतके सोपे नाही असे वाटते.

मला एक प्रश्न आहे.
नागरिक अतिरेक्यांच्या समस्येसाठी नेमके काय करु शकतात? की जेने करुन हे थांबेल.

(आता थोडे तुमच्या मतातुन - हे नागरिक म्हणजे तुम्हाला भारतात राहनारे पण मनानी धर्मांध पाकिस्थानी असनारे(च) नागरिक म्हणायचे असेल तर बाकी नागरीक पक्षी तुमच्या मताने धर्मांध हिंदु त्यांचा बाबतीत नक्कीच काहीतरी करु शकतील) पण हा विचार सोडता मला सामान्य नागरिक ह्यात काही करुन दहशतवाद थांबवतील असे काही वाटत नाही. ह्यासाठी ९८ टक्के काम देशाच्या सरकारलाच करावे लागते. (त्यात एखादा धर्म दुखावला गेला तरी).