पावनखिंड - सहलीसाठी उत्तम ठिकाण

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in भटकंती
30 Nov 2021 - 11:15 pm

मागील आठवड्यात ३ दिवस पावनखिंडीत जाउन आलो. मस्त ट्रिप झाली. पावनखिंड आणि परिसर तर सुंदर आहेच. शिवाय ३-५ दिवसांच्या सहलीसाठी एकदम झक्कास जागा आहे. पावन खिंड (किंवा घोडखिंड) कोल्हापूरनजीक अंबाघाटात आहे. पुण्याहुन कराड - मलकापूर मार्गे अंदाजे चार - साडे चार तास लागतात. पावनखिंडीत २ दिवस मस्त मजा करता येते. एक दिवस पन्हाळ्याला जाउन येता येइल. पन्हाळगड तिथून एक सव्वा तासाच्या अंतरावर आहे. मार्लेश्वर देखील एका तासाच्या अंतरावर आहे. शिवाय गणपतीपुळे / रत्नागिरी दोन - अडीच तासात पोचता येते. विशाळगड देखील तासाभराच्या अंतरावर आहे (थोडे कमीच). पण तिथे काही फार पाहण्यासारखे नाही. पन्हाळ्याला गेल्यास गडाबरोबरच तबक उद्यानातही जाता येइल. बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी एक फोटो पोईंट देखील होइल. एका दिवसासाठी चांगली सहल आहे पावनखिंडीपासून.

पावनखिंडीत राहण्यासाठी बर्‍याच जागा आहेत. मागच्या वेळेस (त्याला एक दशक ओलांडुन गेले) आम्ही हॉर्नबिल रिसोर्ट ला राहिलो होतो. चांगले होते. यावेळेस पावनखिंड रिसॉर्टला राहिलो होतो. मला वाटते या परिसरातले सर्वात जुने हॉटेल हेच असावे. इतरही काही ठिकाणे आहेत पण बाकीची महाग आहात. पावनखिंड रिसोर्ट देखील सोयी सुविधांच्या मानाने महागच वाटते.

पावनखिंड रिसोर्ट म्हणजे पुण्याबाहेरच पुणे. ठिकठिकाणी पाट्या. अगदी खोलीत देखील ३-४ पाट्ञा होत्या. रिसोर्टचे संकेतस्थळ म्हणजे तर ठशठशीत पुणेरी बाणा. (https://pawankhind.in/). म्हणजे सूचना देण्याची देखील एक फार स्पष्ट पद्धत आहे. वेबसाईट वाचल्यावर लक्षात येइलच. वानगीदाखल बोलायचे झाल्यास काही प्रश्न असल्यास मालकांनी वेबसाइटवर त्यांच्या नंबर दिला आहे. पण अगदी लगेच सांगितले आहे की फोन दिला आहे म्हणून लगेच उचलून फोन करु नका. संकेतस्थळावर सगळी माहिती आहे. (आणि आम्हाला फुकट त्रास देउ नका हे आपल्याला लिहिलेले नसतानाही वाचता येते).

आणखी एक पुणेरी बाणा म्हणजे उगाच एका कुटुंबासाठी म्हणून खोल्या मिळणार नाहित. तुम्ही वट्ट पैसे मोजायला तयार असाल पण किमान २ कुटुंबे असल्याशिवाय आम्ही खोल्या देणार नाही. बर तुम्ही २ जोडपी आहात म्हणून तुम्हाला खोल्या मिळतील असेही नाही. किमान ६ लोक असल्याशिवाय आम्ही खोल्या देणार नाही. शिवाय समजा तुम्ही ३ जोडपी आहात म्हणजे तुम्हाला ३ वेगवेगळ्या खोल्या मिळतील असे नाही. तुम्हाला पुरतील अश्या खोल्या मिळतील. प्रत्येक कुटुंबाला वेगळी खोली वगैरे लाड नाहित. याउप्पर तुम्हाला यायचेच असेल तर पैसे भरा आणि या.

पुण्याहून आठपर्यंत निघाल्यास भैरवनाथची मिसळ किंवा श्रीराम चा वडापाव / कटवडा किंवा विरंगुळाचे थालिपीठ खाउन पावनखिंड रिसोर्ट वर पोचेपर्यंत साडेबारा होतील. पोचल्या पोचल्या वेलकम ड्रींक म्हणून वारणाची लस्सी मिळते . त्यानंतर रुम मध्ये स्थिरस्थावर होइस्तोवर जेवणाची वेळ होतेच. खोल्या बेसिक आहेत असे म्हणले तर ती पण अतिशयोक्ती असेल. ३/४/६ खाटा, २ आडवे मेज, एक आरसा, २ साइड टेबल्स आणि कपडे वाळवण्यासाठी एक रॅक इतकेच आहे खोलीत. टीव्ही नाही आणी लावण्याचा विचारही नाही (हे संकेतस्थळावरच दिले आहे). एसी नाही. पंखा आहे. हिवाळ्याच्या दिवसात तो देखील लागायचा नाही इतपत गारवा असतो. उन्हाळ्यात मात्र बर्‍यापैकी गरम होत असावी. घाटमाथा आहे. खोलीमध्ये साधे कपडे आणि बॅगा ठेवण्यासाठी कपाटही नाही (एक छोटी तिजोरी मात्र आहे). ट्युब नाही. छोट्ञा एलईडी बल्बसचे बनलेले लाइट आहेत मात्र ते एकाच बटणावर चालू बंद होतात. ते मंद किंवा प्रखर होण्यासाठी रेग्युलेटर आहे मात्र आमच्या खोल्यांमध्ये ते बिघडले होते. बाथरुम स्वच्छ / अस्वछतेच्या उंबरठ्यावर होते. कमोड अजुन स्वच्छ असणे गरजेचे होते. मेंटेनन्स चा अभावच आहे. स्विमिंग पूल आहे पण तिथे पालापाचोळा पडलेला होता. बाकी परिसर फार सुरेख आहे पण वारंवार साफसफाई करणे गरजेचे आहे. शिवाय परिसर देखील अजुन नेटका ठेवायला हवा. या झाल्या नकारात्मक गोप्ष्टी.

आता चांगल्या गोष्टींकडे वळूयात. जेवण फार सुरेख असते. नेहमीचे पनीर बटर मसाला आणि चिकन चिल्ली असले प्रकार नाहित. दोन्ही दिवस वेगवेगळे स्थानिक पदार्थ चाखता आले. अस्सल मराठमोळी पालेभाजी, वरण्याची उसळ, झुणका, कुर्मा, बीटाचे कळण असे वेगवेगळे पदार्थ होते. प्रत्येक जेव्णात एक गोड पदार्थ होताच. दूध/ तूप / लोण्याचा सढळ वापर होता. प्रत्येक जेवणात ताक होते आणि ते फार सुरेख होते. भाताशेजारी तूपाचे भांडे हातचे न राखता ठेवले होते. हवे तेवढे घ्या. प्रत्येक जेवणात आणि न्याहारीला पांढरे लोणी अगदी वाडगे भरभरुन होते. पराठ्याबरोबर तर प्रत्येक टेबलावर लोण्याचे वेगळे वाडगे देत होते. जेवणाची चव सुरेख होती. प्रत्येक जेवणात भजी किंवा तत्सम पदार्थ होता. कोल्हापुरी खर्डा / लसणीचा ठेचा देखील अप्रतिम होताच. दिवसातल्या एका जेवणात मांसाहार असतो. दोन्हीवेळेस हवा असल्यास वेगळे सांगावे लागते. त्याचा दरही वेगळा आहे. एक दिवस जेव्हा पावनखिंडीत घेउन जातात तेव्हा बार्बेक्यु असतो. दुपारपेक्षा रात्री रिसॉर्ट वर बार्बेक्यु चांगला लागेल पण हे देखील चांगले होते. २ / ३ दा चहा / कॉफी आणि बिस्कीट आणि नाष्ट्यामध्ये १-२ पदार्थ आणि चहा कॉफी अशी एकुणात खाण्यापिण्याची चंगळ आहे.

रिसॉर्टचा परिसर सुंदर आहे. देखभालीची गरज आहे. पण तरीही चांगले आहे. प्रत्येक खोलीला व्हरांडा आहे शिवाय दर ३-४ खोल्यांमागे ऐसपैस सिट आउट आहे जिथे छोटासा झोपाळा देखील आहे. पत्ते / कॅरम / टेबल टेनिस / बॅडमिंटन / सापशिडी इत्यादीची सोय आहे. पोहण्याचा तलाव आहे पण त्यात पालापाचोळा होता शिवाय आजूबाजूला जळवा होत्या. कराओकेची सोय आहे. मोठ्या ग्रुपला एकत्र बसण्यासाठी बर्‍याच जागा आहेत. एकुणात मोठ्या ग्रुपसाठी भन्नाट जागा आहे.

Resort Premises

Resort Premises 2

कर्माचारी वर्ग अतिशय नम्र आणि तत्पर आहे. अगदी रात्री अकराला देखील गादी, बेडशीट काचकूच न करता लगेच बदलून दिले. मागितलेल्या गोष्टी तत्परतेने मिळत होत्या. पावनखिंडीची खासियत म्हणजे ओपन जीप सफारी. जीप / टेम्पो / ट्रॅक्स वगैरेच्या वरच्या बाजूला कॅनोपी टाकुन बसण्याची सोय केली जाते आणि त्यातुन जंगल सफारी आणि पावनखिंडीत नेले जाते. न चुकवण्यासारखी गोष्ट. पावनखिंडीत घेउन जाणारे चालक गाइडचे सुद्धा काम करतात शिवाय आग्रह करकरुन आणि धीर देउन, मदत करुन सगळ्यांना खिंडीत उतरवतात.

Vehicles

रिसोर्ट मध्ये एक छोटीशी लायब्ररी आहे. ज्यात बरीच उत्तमोत्तम पुस्तके आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात पुस्तके वाचणे म्हणजे सुख असावे (मी वाचली नाहित. इतर गोष्टींमध्ये वेळ नाही मिळाला). शिवाय एक छोटेसे कन्विनियन्स स्टोअर आहे. दाडीचे सामान. कंगवा, ब्रश, पेस्ट, शॉर्टस, पावडर इत्यादी सामान मिळुन जाते. एकुणात बारीकसारीक गोष्टींचा विचार केलेला आहे.

REsort Utilities

एकुणात खानपान, परिसर, कर्मचारी वर्ग, एकुण अनुभव इत्यादींसाठी पैकीच्या पैकी मार्क्स पण स्वच्छता, देखभाल यात मात्र सुधारणेची गरज. या सगळ्यासाठी (खाण्यापिण्यासकट) प्रत्येक खोलीमागे (४ व्यक्ती) प्रत्येक रात्रीसाठी आम्ही ९००० रुपये मोजले. जे की खोल्यांमधल्या सोयी सुविधा बघता नक्कीच जास्त आहेत. शिवाय जीप सफारीचे १८०० वेगळे. तरी एकुणात आलेल्या अनुभवाचा विचार करता मी इतरांना हे रिसॉर्ट नक्की सुचवेन.

आता तिथे काय करता येते / येइल याबद्दल थोडेसे. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी जेवण झाल्यावर चहा वगैरे घेउन आम्ही साधारण साडेचारच्या सुमारास ओपन जीप मधून जवळच्या मनोळी धरणावर गेलो. तिथे स्वखर्चाने नौकाविहार करता येइल. धरणाचे पाणी उथळ असल्याने तसे सेफ आहे. पाण्यात उतरता येते. नंतर आमचे चालक कम गाईड आम्हाला धरणाशेजारुन एका छोट्या जंगल वॉक वर घेउन गेले. मजा आली.

Manoli 1

Manoli 2

Manoli View

Manoli Jungle Walk

Manoli Jungle Walk 2

Manoli Dam

दुसर्‍या दिवशी सकाळी न्याहारीनंतर परत ओपन जीप मधुन सफारी असते. रस्त्यात कोकण दर्शन पोइंट करत पावनखिंडीत घेउन जातात. पावनखिंडीकडे जाणारा रस्ता निसर्गरम्य आहे आणि रस्त्यात विस्तृत जलाशय नजरेस पडतील.

Enroute Pawankhind

पावनखिंडीत जाण्यासाठी आधी २१५ पायर्‍या उतराव्या लागतात आणी मग शिडीवरुन अंदाजे ५० -६० फूट खाली खिंडीत उतरावे लागते. प्रथमदर्शनी पाहता ट्रेकिंगची सवय नसलेल्यांना ही शिडी अवघड वाटु शकते पण तितकेसे अवअड काम नाही. चालक कम गाइड स्टाफ या कामात फार हिरीरीने मदत करतात. खिंडीत खाली उतरल्यावर ४०० - ५०० मीटर फिरता येइल. शिवाय पावसाळा किंवा हिवाळा असेल तर एक छोटासा धबधबा आहे तिथे मजा करता येते.

Pawankhind 1

Pawankhind 2

येताना रस्त्यात बार्बेक्युचा आस्वाद घेउन मग आम्ही विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाउन आलो. गडावर मात्र गेलो नाही. जिथे बार्बेक्युअ खायला घालतात ती जागा देखील निसर्गरम्य आहे. येताना रस्त्यात ४-५ गवे दिसले. एकुणात सहल सफळ संपुर्ण झाली.

Barbeque Place

Barbeque 2

Vishalgad

Lakes and Bison

यालाच २ - ३ दिवस वाढवुन पन्हाळा / पावस / मार्लेशवर / गणापतीपुळे असे सगळे जोडुन ५-६ दिवसाची ट्रिप करता येइल. या सगळ्या जागा जाउन येउन करण्याच्या अंतरावर आहेत. शिवाय परतीच्या प्रवासात थोडी वाट वाकडी करुन चाफळच्या नितांत सुंदर आणि प्रसन्न अश्या राम मंदिरात देखील जाता येइल. एकुणात ३ ते ५ दिवसांसाठी करण्यासाठी ही एक उत्तम सहल आहे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

30 Nov 2021 - 11:35 pm | कपिलमुनी

छान डिटेल वर्णन !

पुढच्या ट्रिप साठी रेडिमेड गाईडबूक दिलेत

श्रीरंग_जोशी's picture

1 Dec 2021 - 3:28 am | श्रीरंग_जोशी

पावनखिंडीसारख्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी सोयीच्या रिसॉर्टची माहिती व तुमच्या सहलीचे तपशीलवार वर्णन या ठिकाणी जायचा मानस असणार्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नयनरम्य परिसराचे फोटोज आवडलेत.

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 12:01 pm | जेम्स वांड

टायटल माझ्यालेखी, माझ्यापुरते

पावनखिंड - तीर्थयात्रेसाठी एक उत्तम ठिकाण

असेच असेल,

धन्यवाद

- (मावळा) वांडो

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2021 - 12:01 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप छान तपशिलवार संतुलित रिव्हुव्ह. फोटो ही झकास !
दोन्ही बाजु लिहिल्यामुळे सर्व चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.
हा धागा वाचून जावेसे वाटत आहे !

मृत्युन्जय +१, धन्यवाद !

बाकी रिव्यू चांगला केला.
-----
रीफंड नियम असेच असतात वाटतं.

प्रचेतस's picture

1 Dec 2021 - 1:31 pm | प्रचेतस

मस्त लिहिलंय.
मी मागे गुप्तेंच्या हॉर्नबिल रिसोर्टला राहिलो होतो. गुप्ते जंगलाविषयी एकदम जाणकार माणूस, उत्साही. ते रिसोर्टही छान आहे एकदम. जेवण खास स्थानिक चवीचे, आग्रह करकरुन वाढतात. तेव्हा नाईट सफारीसुद्धा चालू होत्या. दोन वेळा विशाळगडाच्या रानात रात्र सफारी केली होते, गव्यांचा कळप दिसला.
दिवसा सड्यावर गेलो होतो, त्याविषयी घनदाट अरण्यातून सड्यावर येथे लिहिले होतेच.

बाकी पावनखिंड रिसोर्टचा रिव्ह्यु आवडला, एकदम भारी.

सौंदाळा's picture

1 Dec 2021 - 4:16 pm | सौंदाळा

मस्त लेख, फोटो आणि माहिती
दोन वेळा या परिसरात फिरलो आहे.
पावनखिंड म्हणून आपण आता जेथे जातो ती खरी पावनखिंड असेल असे आता तरी तेथिल भौगोलिक परिस्थिती बघून वाटत नाही. मला वाटते वल्ली (का अजून कोणी?) यावर लिहिले देखिल आहे.
कोकण दर्शन पॉइंट बद्दल लिहिले आहे पण वाघझर्‍याला गेला नाही का? अप्रतिम जागा. कितीही वेळ बसला तरी कमी पडेल. घनदाट जंगलात छोटे तळे आणि पक्ष्यांचा किलबिलाट. पहाटे / उजाडायच्या वेळी भरपूर पक्षी दिसतात असे ऐकले आहे.

रिसॉर्ट अंमळ महागडं वाटतंय, पण परिसराची तुम्ही दिलेली छायाचित्रे अप्रतिम आहेत.

Bhakti's picture

1 Dec 2021 - 4:47 pm | Bhakti

मस्त भटकंती.

अनन्त अवधुत's picture

2 Dec 2021 - 5:22 am | अनन्त अवधुत

प्रकाशचित्रे सुंदर आहेत.मस्त भटकंती.

स्मिता श्रीपाद's picture

3 Dec 2021 - 1:21 pm | स्मिता श्रीपाद

पावनखिंड रेसॉर्ट...आमचं खुप आवडतं ठीकाण...
तीन वेळा तरी जाउन आलो इथे... मालक एकदम मस्त गप्पीष्ट आहेत ...
पुणेरी पाट्या भरपुर... पण सगळ्या सोई चोख....
रुम साध्या असल्या तरी आरामदायक आहेत.... आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो तरी रात्री छान थंडावा होता तिथे... त्यांनी वेब साईट वर आवर्जुन लिहिल्याप्रमाणे हे ठीकाण कुटूंबासाठी आहे त्यामुळे कपल रुम वगैरे प्रकार नाही...पण तरी आम्ही विनंती केली तेव्हा आम्हाला ३ बेड वाल्या रुम पर फॅमिली मिळाल्या होत्या....
धरण भेट, पावनखिंड सहल, वनभोजन ..सगळंच खुप मस्त... नातवंडांपासुन ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी एकत्र मजा करायला खुप मस्त ठीकाण...
उत्कृष्ट जेवण ही त्यांची खासियत... उन्हाळ्यात गेल्यामुळे... अगदी हापुस चा आमरस- पुर्‍या, फणस भाजी असे स्थानिक पदार्थ खुप खायला मिळाले... शेवग्याचे सार, आमसुलाचे सार, खवा पोळी ( खवा पोळी सोबत दाटसर केसर घातलेलं मसाला दुध होतं...पोळी कशी थोडावेळ दुधात भिजत ठेवुन मगच खायची ते मालक येउन स्वतः प्रत्येकाला आवर्जुन सांगत होते... ) कोल्हापुरी चिकन , अंडाकरी ई पण सुंदर होते... वनभोजन हा एकदम मस्त प्रकार होता... त्याला बार्बेक्यु म्हणण्यापेक्षा वनभोजन हाच शब्द मस्त आहे.....चुलीत भाजलेले खरपुस बटाटे उलगडुन त्यात तूप आणि मीठ घालुन खायला पण मालकांनीच शिकवले...एकंदर प्रत्येकाला त्या त्या पदार्थाची ऑथेंटीक चव मिळावी अशी मालकांची धडपड दिसली...
बॅचलर लोकांना आम्हि बुकींग देत नाही असे मालकांनी स्वतः सांगितले...
एकंदरीत मस्त अनुभव
हा लेख वाचुन परत एकदा जावेसे वाटु लागले आहे...