हायवेच्या पाप्पाजीच्या धाब्यावर खाल्लेली , ही एक निराळीच अंडाकरी आहे. पांथस्थासारख्या बल्लवाने माझ्या पाकॄ चे फोटो पिकासावर पाहून ह्यातील एखादी मिपावर टाक असे कॉम्प्लिमेंट्स दिल्याने धीर करत आहे.
इथे एक सो एक सुगरणी आणि खवय्ये असताना आपण काही पाकॄ मिपावर टाकायची म्हणजे अंमळ धीराचं काम.
तरीसुद्धा.....
साहित्य
२ कांदे फोडी चिरुन
२ टॉमेटो फोडी चिरुन
३अंडी उकडून
१ कच्चे फेटून
तेल ( घ्याल तसे)
३-४लसूण पा़कळ्या
बोटभर आले
२ मिरच्या
२ चमचे गरम मसाला / कांदा लसूण मसाला
२ चमचे धने- जीरे पावडर
१ चमचा लाल तिखट
मीठ
किंचीत साखर
कोथिंबीर
कॄती
कढईत तेल गरम करा. त्यात कांदा गुलाबी होइपर्यन्त परतून घ्या.
आता परतलेले कांदे, टोमॅटो, आले, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घ्या. पाणी घालू नका. ( बिनपाण्याची करा.... पेस्ट हो!)
(कांदा टोमॅटो चिरुन मिक्सरमध्ये वाटायचे नसतील तर पेस्ट/ प्युरी मिळते ती वापरा. म्हणजे पाकॄ बॅचलर फ्रेंडली झाली!)
अजून थोडे तेल कढईत गरम करुन घ्या. त्या तेलात ही पेस्ट परता.त्यानंतर त्यात गरम मसाला ,लाल तिखट आणि धने- जीरे पावडर घाला. तेल सुटेपर्यन्त परता. दोन कप पाणी घाला. थोडी उकळी येउ दया. मीठ आणि साखर घाला.
उकळी येताना त्यात फेटलेले अंडे हळू हळू घाला. त्यावेळी डाव/ पळीने रस्सा हलवत रहा. झाकण ठेवा.अजून चांगली उकळी येउ दया. म्हणजे कच्च्या अंड्याचा उग्र वास जाइल. (कच्च्या अंड्याच्या बलकाचे हलवल्यामुळे छोटे- छोटे तुकडे होतात) त्यांना मसाल्याची चव लागेल. रस्सा छान मिळून येइल
आता उकडलेली अंडी पाउण भाग कापून किंवा अर्धे -अर्धे भाग करुन अलगद घाला.
थोडावेळ उकळा.
आवडत असल्यास वरती कोथिंबीर घाला. मला वरुन कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी ग्रेव्हीत घालतो.
ह्याच पाकॄच्या ग्रेव्हीत ओला नारळ घातला तर ह्या पंजाबी पाकॄचे रुपांतर कोकणी पाकॄत होते. पण त्यात मिरची, आले, लसूण, आणी मसाल्यांचे प्रमाण अजून वाढवावे लागेल.
उग्र वास आवडत असल्यास कांदा तेलात परतून न घेता कच्चाच मिक्सर मध्ये वाटून घ्यावा ही अजून एक उप-कॄती.
फारच धीर करुन पाकॄ टाकली आहे. चू. भू. दे. घे.
(अशीच जर भरपूर ग्रेव्ही करुन ठेवली तर, फक्त भिजवून शिजवलेली कडधान्ये + बटाटे घालून उसळ बनेल.)
पाकॄ चे फोटु न दिसल्यास इथे पहा
प्रतिक्रिया
2 Dec 2008 - 10:38 am | विसोबा खेचर
सह्हीच पाकृ आहे!
2 Dec 2008 - 10:52 am | पांथस्थ
एकदम झकास आहे मित्रा. या शनिवारी करुन बघतो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
2 Dec 2008 - 10:57 am | अभिजीत
सहीच ..
>>त्यात फेटलेले अंडे हळू हळू घाला ..
हे नविनच कळलं :)
करुन बघायला पाहिजे की एकदा ..
- अभिजीत
2 Dec 2008 - 10:59 am | वेताळ
कपिल भाऊ मस्त पाककृती..येत्या बुधवारी करुन बघुया.
वेताळ
2 Dec 2008 - 11:07 am | सुक्या
सही रे कपील. अश्याच प्रकारची भाजी आम्ही सडेफटिंग होतो तेव्हा खुप करायचो.
सही ... उकडलेले अंडे घालुन म्हणजे काहीतरी खासच. करुनच बघतो.
सुक्या (बोंबील)
वजन वाढणार आता :S
2 Dec 2008 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सही ... उकडलेले अंडे घालुन म्हणजे काहीतरी खासच. करुनच बघतो.
एवढा धीर कोणाला आहे, मी फक्त फोटू पाहून समाधान मानलं. अंडं उकडलं की तसंच खाते मी (अर्थात पिवळा भाग वगळून)
पाकॄ छानच.
अदिती
3 Dec 2008 - 8:33 am | प्राजु
आमच्या सुगरणी कुठे गेल्या आहेत सगळ्या? स्वातीताई, रेवती, शितल, ललिता.... शाल्मली..
अगं, जरा या सगळ्या आचार्यांकडे बघा गं.. उगाच फोटोसकट पा कृ देऊन त्रास देतात. तुम्हीही जरा त्यांना जळवा ना. काय हे?
असो.. पाकृ. आवडली हे सांगणे न लागे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Dec 2008 - 6:10 am | कपिल काळे
तात्या, पांथस्थ, अभिजित, वेताळ, सुक्या, अदिती, प्राजु
आवर्जून प्रतिक्रिया देउन पाकक्रियेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार.
ज्यांनी माझी पाकॄ चाखून ( की वाचून?) पण प्रतिक्रिया दिली नाही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ;)
मिपा सदस्य सुगरणी-- आता जरा फोटुसहित पाकॄ टाका हो एखादी. बल्लव टाकतायत ना.
पांथस्थाच्या किचन मध्ये काहीतरी शिजतय ते आता येइलच. तेव्हा सुगरणी मागे का बुवा?
http://kalekapil.blogspot.com/
5 Dec 2008 - 6:20 am | रेवती
पाकृही छान वाटतीये. पहिल्या प्रयत्नाचं कौतुक आहे.
मी टाकणार होते हो केकची पाकृ पण अतिरेक्यांना केक मिळणार नाही असं
निक्षून सांगितल्यावर रागावले आणि पुढं जे काही घडलं ते सगळ्याना माहीतच आहे.
मनाला अजूनही टोचणी आहे. ती गेली की टाकते पाकृ.
आज रात्री तरी नीट झोप यावी अशी देवाकडे प्रार्थना.
रेवती