गावाच्या गोष्टी : मना सज्जना भक्ती पंथेची जावे.

Primary tabs

साहना's picture
साहना in काथ्याकूट
3 Mar 2021 - 2:20 pm
गाभा: 

टीप : विषय धार्मिक आहे आणि लेखन विनोदी. ज्यांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे त्यांनी वाचू नये.

अळंबी ज्या पद्धतीने उगवतात त्या प्रमाणे आमच्या गावांत संत, धार्मिक टोळ्या निर्माण होत. कुठल्या तरी दूर गावाचा "स्वामी" आमच्या गावांत अचानक लोकप्रिय होत असे. आणि शेवटी ह्या सर्वाना कारणीभूत म्हणजे सदाशिव भट. ह्यांची जात बहुतेक कुठल्यातरी प्रकारची ब्राह्मण असली तरी तसे ते भटपण करणारे भट नव्हते. आडनावाचा भट. पण देव सोडून संत आणि जंत ह्यांच्या मागे लागणारा हा माणूस. गावांत ग्रामदेवता आणि आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात क्वचितच दृष्टीस पडणाऱ्या ह्या भटाने गावकर्यांना अनेक संत, बाबा महाराजांचा नाद लावला. माझ्या आठवणी प्रमाणे "गणी गण गणात बोते" नावाचा गुरु मंत्र देणाऱ्या नरेंद्र महाराज ह्यांना त्यांनीच सर्वप्रथम गावांत आणले (म्हणजे प्रत्यक्ष नाही हो, गावकर्यांना त्यांची ओळख करून दिली). सर्वप्रथम हा मंत्र मी ऐकला तेंव्हा मला तो विनोद वाटला. मग शाळेंतील काही वात्रट पोरांनी त्यातील काही शब्दांची थोडी मोडतोड करून अश्लाघ्य शी गीते बनवली आणि त्या साठी शिक्षकांकडून ना भूतो न भविष्यती असा मार सुद्धा खाल्ला.

नरेंद्र महाराज ह्यांचे वैशिष्ट्य असे कि काही कारणास्तव ह्यांचे जितके भक्त तितकेच हेटाळणी करणारे. त्यामुळे सगळीकडे ह्यांचीच चर्चा व्हायची आणि लोक अक्षरशः हमरीतुमरीवर यायचे. अश्या प्रकारचा भावनिक पगडा आणखीन कुठल्याच संतांचा मी पहिला नाही. पण सदाशिव भट मग नरेंद्र महाराजांनी कसे चमत्कार केले ह्याची गाथा सर्वत्र सांगत मिशनरी पद्धतीने फिरायचे. खिशाला त्यांचा "बॅज" लावत असत (तुम्हाला हे ठाऊक नसेल तर गुगल करून पहा). मग त्यांची पुस्तके वगैरे विकायचे.

ह्यांना सर्वांची वर्में ठाऊक. कुणाला मूल होत नाही तर कुणाचे लग्न होत नाही, कुणाचा नवरा दुसरीला घेऊन बसलाय तर कुणाची मूळव्याध जाता जात नाही. मग ह्या सर्वाना हे ह्यांची भक्ती केलीस तर मुक्ती मिळेल म्हणून पासा फेकत. मग तो लागला कि स्वतःहून बस टेम्पो वगैरे करून नाणीजला वारी करत. पण कुणाचेही लग्न झाले नाही, मुलंही झाले नाही आणि मूळव्याध झालेली व्यक्ती मेली आणि नाणीज वाल्या बाबांचे प्रस्थ गावांत हळू हळू कमी झाले.

पण सदाशिव भाऊंचा उत्साह मात्र जराही कमी झाला नाही. त्याकाळी गोव्यांतील फोन्डा येथील सनातन संस्था बराच जोम घेत होती. ह्यांचे एक वर्तमान पत्र असायचे "सनातन प्रभात" ह्याला वात्रट मुले "सुन्याचें (कुत्रा) तोंड" म्हणायची. हा एक गजब प्रकार होता. ह्यांनी अध्यात्माचे पूर्णपणे गेमिफिकेशन केले होते. तर म्हणे रात्री चंद्र पाहिल्याने मनाची चंचलता ०.००००१% ने वाढते. इतर अंधश्रद्धाळू सारखे आम्ही अंध नाही आहोत, तर आम्ही वैज्ञानिक पद्धतीने अध्यात्माकडे पाहतो म्हणूनच तर आम्ही अश्या प्रकारे आकडेवारी देतो असा ह्यांचा दावा. मग म्हणे प्रत्येकाची "अध्यात्मिक पातळी" असते, ह्यांत लेव्हल ० ते लेव्हल ५ वगैरे असतात. मग आपण संत पदाला पोचता. आणि संतांच्या मध्ये सुद्धा लेव्हल, जसे कॅटेगरी १ स्टॉर्म वगैरे असतात तसे संत सुद्धा वेग वेगळ्या पातळीचे असतात. ह्याचा मोटो म्हणजे "सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा विनाश" असे काही तरी होती. मग सज्जन कोण आणि दुर्जन कोण ह्यांची उदाहरणे ते द्यायचे. २००१ साली भ्रष्टचाराविरुद्ध युद्ध पुकारून २०२० पर्यंत तो पूर्णपणे खतम करून सज्जांचे सात्विक राज्य ते आणणार होते. आता वर्ष २०२१ असल्याने ह्या मंडळींना सिंहावलोकन करून प्रोजेक्ट कुठपर्यंत आला आहे ह्याचा विचार करण्याची गरज आहे.

सनातनचे वर्तमान पत्र घरांत कुणालाच आवडायचे नाही पण मी हट्ट करून मागवत असे. भयंकर विनोदी वाटायचे मला. कारण प्रत्येक बातमीवर संपादकांची बोल्ड मध्ये टिप्पणी असायची. एक गोष्टीला मात्र मानलेच पाहिजे. प्रत्येक राजकारणी आणि प्रत्येक व्यक्तीवर टीका करायला हि मंडळी घाबरत नसे. इतर वर्तमानपत्रांत शब्दकोडी असत पण ह्यांच्या वर्तमानपत्रांत "सूक्ष्म शक्तीची परीक्षा" असे. तर दोन फोटो द्यायचे. एका बाजूला लालू यादव आणि दुसऱ्या बाजूला संत नरेंद्र महाराज. मग तुम्ही दोन्ही चित्रांकडे ध्यान करून पाहायचे. तर तुमची अध्यात्मिक लायकी असेल तर म्हणे लालूंच्या चित्रातून तुम्हाला "रज" लहरी जाणवतील तर नरेंद्र महाराजांच्या चित्रांतून सात्विक लहिरी. आणि काहीच जाणवत नसेल तर मग तुमची अध्यात्मिक लायकी नाही, जास्त नामस्मरण करा. मी स्वतःला दुर्जन समजत असल्याने मी काही पोस्टकार्डे ह्यांना लिहून उगाचच खोटे "सूक्ष्मातील अनुभव" पाठवले. ह्यांनी ते छापले सुद्धा. कदाचित संपादक पत्रे निवडताना आपला सूक्ष्माचा चष्मा घरी विसरले असावेत.

इतरांच्या वर्तमानपत्रांत देश विदेशाच्या बातम्या तर ह्यांच्या वर्तमानपत्रांत साक्षांत पाताळ आणि देवलोकांतील बातम्या असत. नारद मुनींनी कुणाला दृष्टांत दिला, कुणाच्या तरी घरावर राक्षसाने हल्ला केला असल्या बातम्या. तर इंग्लंड मधील एका साधिकेने "अनुभूती" पाठवली होती कि तिचं घरावर राक्षसांनी सूक्ष्म स्वरूपांत हल्ला केला तर तिने देवीचा धावा केला. तर म्हणे देवी वाघावर बसून अवतरित झाली आणि तिने राक्षसांचा संहार केला. इतकेच नव्हे तर वाघाला दाराच्या बाहेर बांधून देवी आंत सुद्धा आली आणि आशीर्वाद दिला. साधिकेने देवीला चहा सुद्धा विचारला पण ती अंतर्धान पावली. आता इंग्लंड आणि चहा ह्यांचे विनोद अनेक असतील पण हि म्हणजे हद्द झाली. \ हा सर्व प्रकार कमी होता म्हणून कि काय मग ह्यांनी एअर गन चालवणे, तथाकथिक कराटे वगैरे सुरु केले आणि वर अत्यंत घाणेरडी दिसणारे "ब्लाऊज" टाईप रक्षा जॅकेट सुद्धा विकू लागले. ह्या नंतर गणपती लक्ष्मी ह्यांची "खरी" चित्रे विकणे सुरु झाले. इतर चित्रे म्हणे राजसिक असतात पण ह्यांची देवांची चित्रे सात्विक. आमच्या घरी ह्या सर्व प्रकाराला एक मोठा विनोद म्हणून पाहत असू. सदाशिव भाऊ ह्यांचे खंबीर "साधक" झाले. रामनाथी कि कुठे तरी आश्रम वगैरे मध्ये जाऊन राहिले.

काही कालावधीत सनातन सुद्धा तितके लोकप्रिय राहिले नाही. प्रत्येक मंदिरांत होणारे "सत्संग" बंद पडले. तरीसुद्धा माझ्या पाहण्यात लोकांचा अध्यात्माकडे कल वाढला. गावांत इस्कॉन वगैरे नव्हते त्यामुळे नामजप तितका लोकप्रिय नव्हता पण सनातन मुळे नामस्मरण खूपच वाढले.

ह्या सर्व पार्शवभूमीवर सदाशिव भाऊंनी एक नवीन महिला संतांचे सत्संग सुरु केले. सदर संतांचे नाव मी घेत नाही. ते महत्वाचे सुद्धा नाही. सदाशिव भाऊ ह्यांनी तिला गांवात लोकप्रिय केले. तिचे पती सुद्धा संत होते आणि त्यांच्या नंतर त्या संत बनल्या. त्याची एक बायोग्राफी ह्यांनी आम्हाला वाचायला दिली त्यांत ह्या स्त्री संतांचे चित्र होते जमिनीवर पाटावर बसून स्टीलच्या पेल्यांतून देशी दारू पिताना आणि खाली मथळा होता "संतांचे विषयपान सुद्धा प्रमाणात असते". तर मला हि संत जाम आवडली.

हीचा सत्संग म्हणजे दर मंगळवारी कि काय काही स्त्रिया देवळांत जमून हिचा पाठ करीत, भजन वगैरे म्हणत. त्या २-३ तासांत देऊळ जवळ जवळ बंद व्हायचे. पुरुष मंडळींना मज्जाव होता असे नाही पण परंपरेने पुरुष ह्यांत सहभाग घेत नसत. भजन झाले कि "सत्संग" घ्यायला "सज्जन" म्हणून एक व्यक्ती यायचा. ह्याला मी पाहिले आहे. दूरच्या गावांत हा शिक्षक होता पण काही कारणाने ह्याला नोकरीवरून काढला. हा वैफल्यग्रस्त होऊन फिरत फिरत आधी सनातन आणि नंतर ह्या महिला संतांच्या नादि लागला. समानशीले मित्रता न्यायाने ह्याची मैत्री सदाशिव भाऊं शी झाली. सज्जन साधारण २६-२७ वर्षांचा असावा तर सदाशिव भाऊ किमान ५५. ह्यांची मैत्री चांगलीच प्रसिद्ध होती. दोघेही जण प्रत्येक दूरच्या गावी मंदिरांत, कुठल्या बाबा महाराजांच्या पायी डोके टेकवायला जायची. दोघांची अध्यात्मातील रुची इतकी ipl टीम ने कोहली रोहित शर्माला भाड्याने घ्यावे ह्या पद्धतीने सर्व अध्यात्मिक संघटना, धार्मिक संघटना ह्यांना भाड्याने घेत. सज्जन आज सनातन तर्फे सत्संग तर दुसऱ्या दिवशी आणखीन कुठल्या सद्गुरूंचे कीर्तन घेत असे. ह्याचे सदाशिव भाऊंच्या घरी येणे जाणे नेहमीचेच, मग जवळच्या मंदिरांत मंगळवारी संध्याकाळी महिलांचे भजन झाले कि सज्जन चा सत्संग. पुरुष मंडळी कलटी मारत पण भजनात अडकलेल्या महिलांना काढता पाय घेणे मुश्किल जायचे. मग सज्जन सदाशिवभाऊंच्या घरी जेवण करूनच आपली वेस्पा घेऊन घरी जात असे.

किती वेळा नामस्मरण केल्याने पातळी ०.०००२% नी वाढू शकते. किंवा निव्वळ डोळ्यांनी पाहून वस्तू हलविण्याचे कसब पहिल्या लेव्हल चे संत करू शकतात कि दुसऱ्या लेव्हल चे ? ह्या विषयांवर ह्यांची चर्चा. काही मंडळी मनोरंजन म्हणून ऐकत तर काही ह्यांना वेड्यांत काढत. आणि एक दिवस असा उजाडला कि सदाशिव भाऊंचे अध्यात्माचे भूत खाड्कन उतरले. उतरले म्हणजे काय ? तर भाऊंनी सांभाळून ठेवलेले कसले कसले बिल्ले, कवचे, पुस्तके, पत्रके बाहेर फेकून मारली. पुन्हा तोंडाने सनातन, किंवा महिला संतांचे नाव आले नाही.

चतुर वाचकांनी ताडलेच असेल. सदाशिव भाऊंची एकुलती एक कन्या, कुमारी भक्ती हिच्याशी सज्जन ने सूत जुळवले होते, जातीच्या फरकाने सदाशिव भाऊ लग्न करून देणार नव्हते आणि सज्जनला नोकरी वगैरे काहीच नव्हती. पण सज्जन ने एक दिवस प्लॅनिंग करून भक्ती बरोबर पलायन केले ते कायमचेच. भक्ती जाताना घरांतील बऱ्याच मौल्यवान वस्तू सुद्धा घेऊन गेली.

काही वर्षांनी मग हे जोडपे आपल्या बालकाला घेऊन परत आलेच. सज्जनला नागपूर मध्ये नोकरी मिळाली होती आणि भक्ती सुद्धा संसारांत रमून गेली होती. आता सज्जन सुद्धा प्रमाणात विषयपान करू लागला होता. सदाशिव भाऊंनी आध्यात्माचा नाद सोडला आणि आपल्या नातवाचा नाद धरला. चंद्राला पाहून मनाची चंचलता ०.००१% ने वाढते कि नाही देवास ठाऊक पण सदाशिव भाऊंना नातवाचे तोंड पाहून शेकडो पटीने आनंद झाला. त्यांनी तसेच इतर गावकर्यांनी जोडप्याला माफ करून आपलेसे केले.

पण आज अनेक वर्षांनी सुद्धा आमच्या गावांत कुणी माणूस व्यवहार ज्ञान सोडून अध्यात्माच्या मागे लागला तर सदाशिव भाऊंचे उदाहरण देऊन अश्या व्यक्तीचे पाय जमिनीवर आणले जातात.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 4:32 pm | मुक्त विहारि

सनातन प्रभात, हा एक मनोरंजक प्रकार आहे..

मला काहीच नाही जमले तर, साधू होण्याचा विचार केला आहे. 10-12 चांगले शिष्य पण तयार आहेत...

सध्या तरी आर्थिक स्थिति उत्तम असल्याने, हा धंदा सुरू करणार नाही...

पण, हा एक अतिशय उत्तम धंदा आहे... मिठ्ठास वाणी, गोरे गोमटे रूप, नग्न राहण्याची हिंमत आणि नेम धरून दगड मारता, यायला पाहिजे.

शिवाय कधीच स्पष्ट बोलायचे नाही. काही वाक्ये सतत बोलायची किंवा स्वतःचा मंत्र तयार करायचा.

मी गुरू झालो तर मंत्र पण निवडला आहे ... कुकूचकू..

कुकुचकू म्हणजे .... कुठे कुठे चमत्कार कुणाचे?

ही वेळ नाही, भोग आहेत ते भोगायचे, कष्ट करा, हरी मुखे म्हणा, कुणाला घातवार सांगायचा, कुणाला हिरा सांगायचा, कुणाला हिरवा सोमवार, लाल मंगळवार, पांढरा बुधवार, चाॅकलेटी गुरूवार, काळा शुक्रवार, पिवळा शनिवार आणि निळा रविवार करायला सांगायचा...

कुणाला गाय पाळायला सांगायची तर कुणाला कुत्रा

अपेय पान बिंधास्त करायचे, लाया मारायच्या, शिव्या द्यायच्या पण चुकूनही, शारीरिक कष्ट करायला किंवा व्यायाम करायला सांगायचे नाहीत.व्यायाम करायला एकही भक्त तयार नसतो...

साहना's picture

3 Mar 2021 - 4:39 pm | साहना

> कुकुचकू म्हणजे .... कुठे कुठे चमत्कार कुणाचे?

"शिवाय कधीच स्पष्ट बोलायचे नाही. काही वाक्ये सतत बोलायची किंवा स्वतःचा मंत्र तयार करायचा." हा नियम आपण इतक्या लवकरच तोडला त्यामुळे तुम्हाला आणखीन मेहनत घ्यायची गरज आहे.

"गणी .... बोते" ह्याचा अर्थ काय ? हा प्रश्न नरेंद्र महाराज ह्यांस विचारला असता त्यांनी गंभीर चेहरा करून , "मंत्राचा अर्थ समजण्याची क्षमता तुमची असती तर, हा प्रश्नच मुळी तुम्ही विचारला नसता" असे उत्तर देऊन प्रश्न कर्त्याला गप्प केले होते.

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 4:59 pm | मुक्त विहारि

तसा दुसरा मंत्र पण आहे...

दगड-माती आकाशगंगा, मैं ही हुं चंगा

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 4:47 pm | मुक्त विहारि

मनावर घेऊ नये

नि३सोलपुरकर's picture

3 Mar 2021 - 4:47 pm | नि३सोलपुरकर

लेख आणी कुकुचकू ...... मस्तच .

धन्यवाद साहना आणी मुवि .

बाकि वर उल्लेखित गुरुंमंत्र हा नरेंद्र महाराज ह्यांचा आहे का ह्या बद्द्ल शंका आहे .

सत्य धर्म's picture

3 Mar 2021 - 4:53 pm | सत्य धर्म

मला हि कधी कधी वाटते दाढी वाढवून साधू व्हावे बाकी HR मध्ये काम करत असल्यामुळे माझा निशाणपण बरोबर लागतो

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 5:22 pm | मुक्त विहारि

मी चेला व्हायला तयार आहे....

सविता००१'s picture

3 Mar 2021 - 4:58 pm | सविता००१

मुविंचा मंत्र आवडला.
सनातन प्रभात त्यांच्या भंपकपणामुळे कधीही आणला नाहीच.
गणी गण...हा नरेंद्र महाराजांचा मंत्र कुठय? तो गजानन महाराजांचा ना?

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2021 - 5:28 pm | प्राची अश्विनी

तो गण गण, हा गणी गण. केवढा मोठ्ठा फरक आहे.;)

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 5:34 pm | मुक्त विहारि

गुरूमंत्र महत्वाचा होतो.

गुरूमंत्र तयार केला की, लोकांच्या हातात आणि खिशाला एकाच वेळी, गंडा बांधता पण येतो आणि घालता पण येतो...

सविता००१'s picture

6 Mar 2021 - 12:59 pm | सविता००१

खरंच की :)

लेख वाचून हसू पण आले आणि त्या मनशक्ती वाल्या स्वामी विज्ञानानंद यांची आठवण पण आली! स्वतः आत्महत्या करणारे मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक ते (सो कॉल्ड) स्वामी विज्ञानानंद एक ग्रेट आणि त्या आत्महत्येला 'प्रकाश समाधी' असे नामाभिधान देऊन तिचे समर्थन करणारे त्यांचे शिष्यगण त्याहून ग्रेट!
त्या नरेंद्र महाराजांवरही काही गंभीर आरोप झाल्याचे अंधुकसे आठवतंय, नंतर एकदम ते नाणीज मठाचे मठाधिपती कि शंकराचार्य झाले म्हणे 😀
असो, देवाची भक्ती जरूर करावी, त्याचावर श्रद्धा जरूर असावी पण ती थेट त्या परमेश्वरावर असावी त्यासाठी कुठल्या बाबा/बुवा/महाराज रुपी मध्यस्थाची गरज नाही असे माझे वैयक्तिक मत.

मुक्त विहारि's picture

3 Mar 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि

धृव, मीरा, जनाबाई, प्रल्हाद, यांना पण लागली नाही...

पण, लक्षांत घेतो कोण?

मूकवाचक's picture

3 Mar 2021 - 5:51 pm | मूकवाचक

_/\_

मूकवाचक's picture

3 Mar 2021 - 5:51 pm | मूकवाचक

_/\_

चौकस२१२'s picture

4 Mar 2021 - 5:08 am | चौकस२१२

असो, देवाची भक्ती जरूर करावी, त्याचावर श्रद्धा जरूर असावी पण ती थेट त्या परमेश्वरावर असावी त्यासाठी कुठल्या बाबा/बुवा/महाराज रुपी मध्यस्थाची गरज नाही असे माझे वैयक्तिक मत.
२७०००% सहमत

मनशक्तीच्या स्वामींविषयी अजुन माहिती मिळेल काय?
प्रकाशसमाधी हे नवीनच ऐकतो आहे.

इथे थोडी माहिती सापडली, एक अंक ऑनलाईन आहे तो दिसतोय

www.manashakti.org

https://www.manashakti.org/prakashan2020/may2020.html

@ परिंदा
नक्की वर्ष आणि बाकी तपशील आता आठवत नाहीत कारण त्यावेळी मी विद्यार्थी दशेत होतो. कुठल्याश्या इमारतीवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली होती जिला त्यांचे शिष्य/भक्तगण 'प्रकाश समाधी' म्हणतात. ती घटना अजूनही लक्षात राहिली कारण त्याच्या काही काळ आधी एका आंतर शालेय कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आमच्या नात्यातील एका (मनशक्तीच्या साधक) महिलेने मध्यंतरी 'प्रकाश समाधी' नावाचे त्यावर लिहिलेले पुस्तक वाचायला दिले होते पण आत्महत्येला समाधी/प्रकाश समाधी वगैरे म्हणणे असला भंपकपणा मला पटत नाही आणि तसेही माझ्या त्या विषयीच्या शंकांचे निरसनही त्या करू शकल्या नसल्याने मी अर्थातच ते वाचले नाही. मनशक्तीच्या वेबसाईटवर ते विक्रीस उपलब्ध आहे.

मनशक्तीच्या गर्भसंस्काराची पुस्तके वाचण्यात आली होती. ७-८ पुस्तकांचा सेट होता, पण सगळ्यात फिरवून फिरवून तीच तीच माहिती दिली होती. शिवाय स्वामी विज्ञानानंदांची माहिती होती. त्यात त्यांना प्रसिद्धीची हौस नव्हती म्हणून फोटो नाही काढून दिला वगैरे वगैरे छान छान गोष्टी सांगितल्या होत्या.
त्यांनी संन्यास घेण्याआधी आर्थिक घोटाळा केला होता आणि त्याचे प्रायश्चित केले होते असा उल्लेख वाचला तेव्हा शंकेची पाल चुकचुकली होती.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 3:58 pm | मुक्त विहारि

एक जण विचारतो : भाई ये सुसाट क्या होता है

दुसरा उत्तरतो : अंग्रेज लोक जब मर जाते है, तो उस को
सुसाट, कहते हैं।

उपयोजक's picture

4 Mar 2021 - 12:04 am | उपयोजक

भारी लेख! :)

चित्रगुप्त's picture

4 Mar 2021 - 5:52 am | चित्रगुप्त

लेख आवडला.
"नम्ये हो रेंगे क्यो" आणि "पप्र" बद्दल ऐकले आहे का कुणी? हे पण वेगळेच प्रकारचे धंदे जोरात सुरू आहेत.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 10:38 am | मुक्त विहारि

नाही ऐकले

माहिती दिलीत तर उत्तम

अनन्त अवधुत's picture

4 Mar 2021 - 6:18 am | अनन्त अवधुत

लेख आवडला. तो सनातन प्रभात असा एकट्याने वाचायचा विषय नाही. चार मित्र गोळा करुन सार्वजनिक वाचन करावे म्हणजे अजुन हसायला येते.

गण गण गणात बोते/ गणी गण गणात बोते असे गजानन महाराज सतत म्हणत. हा काही त्यांचा गुरु मंत्र नाही.

नाणीजचे नरेंद्र महाराज पण हाच मंत्र वापरत असतील माहिती नाही. पण बॅज/ बिल्ले लावून मात्र त्यांचे शिष्य फिरतात हे मी पाहिले आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Mar 2021 - 8:52 am | ज्ञानोबाचे पैजार

बाकी काही असले तरी नरेंद्र महाराजांच्या सतसंगाचा परीणाम म्हणून दारु सुटलेले अनेक जण मला माहित आहेत.

त्यांचा एक फिरता फोटो असायचा / असतो. तो आठवडाभर / पंधरा दिवस घरी आणायचा आणि त्या घरी रोज आरती आणि सत्संग असायचा. त्या काळात घरातली मंडळी दारुला स्पर्श करत नसत. असे करताना हळू हळू अनेकांची दारु सुटत गेली.

नरेंद्र महाराजांमुळेच "जे लोक जे आपल्या लॉजिक मधे बसत नाहीत त्यांचा इतरांना / समाजाला काहीच फायदा नसतो असे मानणे चूक आहे" हे मात्र मला पक्के समजून गेले.

पैजारबुवा,

"जे लोक जे आपल्या लॉजिक मधे बसत नाहीत त्यांचा इतरांना / समाजाला काहीच फायदा नसतो असे मानणे चूक आहे"

+१

शाम भागवत's picture

4 Mar 2021 - 1:00 pm | शाम भागवत

ज्ञा.पै.,
या जगात काहीच टाकावू नाहीये किंवा उगीचच काहीही नाहीये. कारणमिमांसा करायची आपली ताकद फक्त कमी पडते. पण “काय कारण असावे? काही कळत नाही“ असे म्हणण्याऐवजी, मग जो तो आपल्या कुवतीप्रमाणे आपण निष्कर्ष काढून मोकळा होतो.
असो.

शा वि कु's picture

4 Mar 2021 - 9:22 am | शा वि कु

सनातन प्रभात मध्ये एक बाई पोळ्या गुंडाळून देत असत. कधी घेतल्या तर मी आणि बहीण भांडत असू पहिला कोण वाचेल यासाठी.

अध्यात्मिक पातळी,परात्पर गुरू डॉकटर, स्वर्गातून धाडलेले दैवी बालक, अंनिसच्या कार्यकर्त्यांची व्यंगचित्रे वैगरे चांगला धमाल टाईमपास असे.

गामा पैलवान's picture

4 Mar 2021 - 8:24 pm | गामा पैलवान

साहना,

अन्न खाता येतं, तसंच अन्नपदार्थ इतस्तत: फेकून त्याची आबाधोबीही खेळता येते. तद्वत सनातनप्रभात वाचून साधना करायची बुद्धी होते, किंवा तशी न झाल्यास तो मनोरंजनार्थ वाचताही येतो. पसंत अपनी अपनी.

बाकी, नरेंद्र महाराजांबद्दल उलटसुलट ऐकलंय. ते भोंदू आहेत का नाही हे माहित नाही. पण त्यांच्या बिल्ल्यावरनं एक आठवलं. त्यांचा बिल्ला लावल्याने म्हणे भक्तांचं रक्षण होणार होतं. माझा असल्या बिल्लेबाजीवर आजिबात विश्वास नाही.

पण आज हाच प्रकार वेगळ्या स्वरूपात समोर आला आहे. WHO सुई टोचल्याचं सर्टिफिकेट इश्यू करणार आहे म्हणे. संदर्भ (इंग्रजी दुवा) : https://www.who.int/news-room/commentaries/detail/immunity-passports-in-...

नरेंद्र महाराजांनी खाल्लं तर शेण आणि WHO ने खाल्लं तर श्रीखंड !

चालायचंच !

आ.न.,
-गा.पै.

> नरेंद्र महाराजांनी खाल्लं तर शेण आणि WHO ने खाल्लं तर श्रीखंड !

मला हू विषयी प्रेम नसले तरी लस चे प्रमाणपत्र आणि बिल्ला ह्यांत काहीही सदृश दिसत नाही. बिल्ला निव्वळ श्रद्धा आहे. कुह्टल्याही प्रकारची डबल ब्लाइन्ड टेस्ट करवून बिल्ला रक्षण करतो हे सिद्ध करता येऊ शकत नाही. लस त्या मानाने जास्त खरी आहे.

रक्षण नाही केले तरी आर्थिक फायदा होतो...टाईमपास पण उत्तम होतो...

बरेच वेळा गाडीत, असे भक्त भेटतात....

आपण जरा चौकस पणा दाखवला की, भक्त त्यांच्या महाराजांच्या लीला सांगायला सुरूवात करतो...

मी तिकीट काढायला गेलो आणि तिकीट मिळाले, बाबांचा चमत्कार.

नौकरीच्या मुलाखती साठी अंगारा लावून गेलो, नौकरी मिळाली, बाबांचा चमत्कार.

पण, कुठल्याही भक्ताला, व्यायाम कर, चौरस आहार घे, वेळच्या वेळी झोप घे, खाण्याची आणि पिण्याची बंधने पाळ, असे कुठलेच बाबा सांगत नाहीत...

साहना's picture

4 Mar 2021 - 11:49 pm | साहना

रामदेव बाबा

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 8:42 pm | मुक्त विहारि

योग साधना आणि व्यायाम, ह्यात फरक आहे...

गामा पैलवान's picture

4 Mar 2021 - 9:10 pm | गामा पैलवान

साहना,

कुठलीही लस कधीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवीत नसते. WHO चा बिल्ला नरेंद्र महाराजांच्या बिल्ल्याइतकाच निरर्थक आहे.

आ.न.,
-गा.पै.

साहना's picture

4 Mar 2021 - 11:49 pm | साहना

मान्य नाही.

गामा पैलवान's picture

5 Mar 2021 - 12:44 am | गामा पैलवान

साहना,

लस टोचल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचं उदाहरण आहे का तुमच्याकडे?

आ.न.,
-गा.पै.

साहना's picture

5 Mar 2021 - 1:00 am | साहना

हो.

गामा पैलवान's picture

5 Mar 2021 - 1:10 am | गामा पैलवान

साहना,

इथे कृपया दुवा द्यावा ही विनंती.

माझ्या माहितीप्रमाणे लस टोचल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढंत नाही. शरीरातल्या रोगप्रतिकारक यंत्रणेस फक्त लशीच्या विषाणूंची तोंडओळख होते. हा एखादा लुटुपुटूचा सामना खेळल्यासारखा प्रकार आहे. रोगजंतूंना ( जर अस्तित्वात असलेच तर ) संपवण्याचं काम शरीर करतं. लस नव्हे.

तुमच्याकडे पुरावा असल्यास तो पहायची उत्सुकता आहे.

आ.न.,
-गा.पै.

> शरीरातल्या रोगप्रतिकारक यंत्रणेस फक्त लशीच्या विषाणूंची तोंडओळख होते. हा एखादा लुटुपुटूचा सामना खेळल्यासारखा प्रकार आहे. रोगजंतूंना ( जर अस्तित्वात असलेच तर ) संपवण्याचं काम शरीर करतं. लस नव्हे.

बरोबर आहे.

लस ने घेतल्याने रोगा पासून बाधा होण्यापासून आपण वाचतो. काही लसी आयुष्यभर संरक्षण देतात (पोलिओ) तर काही तात्पुरत्या (फ्लू).

शेवटी काय तर नरेंद्र महाराजांच्या बिल्ल्या पेक्षा लस हि प्रभावशाली आहे.

गामा पैलवान's picture

5 Mar 2021 - 2:29 am | गामा पैलवान

साहना,

लस घेतल्याने रोगा पासून बाधा होण्यापासून आपण वाचतो, ही साफ चुकीची धारणा आहे.

तसंच काही लसी (उदा. पोलियो) आयुष्यभर संरक्षण देतात ही सुद्धा चुकीची धारणा आहे. लस तयार केलेल्या प्रत्येक रोगाचे नवीन जंतू आढळून आले आहेत. पोलियोचं म्हणाल तर हल्ली तो मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मल्टिपल स्क्लेरॉसिस वगैरे रूपांनी परत अवतीर्ण झालाय.

लस हा उपचाराचा व/वा प्रतिबंधाचा भाग कधीच नव्हता.

आ.न.,
-गा.पै.

ह्याचा अर्थ आपल्या समाजाला पोलिओ ची लस घेऊन काहीही फायदा झाला नाही असे म्हणणे आहे का ? आपण स्वतः कुठलीही लस घेत नाही का ? आपल्या मुलाना आपण लस दिली नाही/देणार नाही का ?

गामाजी, लस घेतल्याने रोगाची बाधा होण्यापासून वाचत नाही हे छदमविज्ञान आहे असे वाटते. कुठल्याही विषाणू पासून लढायचं शिक्षण शरीराला मिळालं असेल तर तो रोग प्रतिबंध होईल या विचारशैली मध्ये नक्की काय त्रुटी आहे?

गामा पैलवान's picture

5 Mar 2021 - 7:56 pm | गामा पैलवान

पिनाक,

लशीचे केवळ फायदे सांगितले जातात. तिचे धोके व दुष्परिणाम याविषयी उघड चर्चा होत नाही. तिची परिणामकारकता किती यावर कोणीही काहीही बोलंत नाही. ती वारंवार घ्यावी लागते का की एकदा घेतलेली पुरते हे ही कोणी धडपणे सांगंत नाही.

लशीत विषाणू असतात. देहप्रविष्ट विषाणू नियंत्रणात कसा ठेवायचा ( controling the virus in-vivo ), ते कोणालाही माहित नाही.

लस हे नेमकं काय आहे? मानवी आरोग्याचं उपकंत्राट देता येतं का?

आ.न.,
-गा.पै.

लस घेतल्याने रोगा पासून बाधा होण्यापासून आपण वाचतो, ही साफ चुकीची धारणा आहे.

या तर्काने सर्व मॉक ड्रिल्स, नौदल सराव, नेट प्रैक्टिस, दहावी प्रिलिम परीक्षा वगैरे बंद केल्या पाहिजेत. प्रत्यक्ष संकट, युद्ध, परीक्षा आली की त्याच्याशी लढा देण्याच्या अनुभवात या सर्व गोष्टींनी काहीच फरक पडत नसेल तर.

गामा पैलवान's picture

5 Mar 2021 - 8:04 pm | गामा पैलवान

गवि,

क्रिकेटचा सराव करायचा झाला तर तो आरामखुर्चीत करता येईल का, हा ही एक प्रश्न आहे. खेळण्यातल्या बंदुका घेऊन प्रत्यक्ष युद्धाचा सराव होऊ शकतो का? नुसतं ३ तास एके जागी बसून काहीबाही खरडल्याने प्रिलीमचा अभ्यास होतो का?

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 12:11 pm | मुक्त विहारि

असे माझे निरीक्षण आहे

रंगीला रतन's picture

5 Mar 2021 - 8:26 pm | रंगीला रतन

साहना ताई एक विनंती
ही मालिका तुम्ही कथ्याकुट मधून जनातले मनातले मधे हलवायची विनंती admin कडे करा. अन्यथा इथे पुढे राजकीय विषयांवर चर्चा सुरु होईल. सध्या विनोदी लेखवार who करोना लस यावर चर्चा चालू झाली आहे पुढे तीला मोदी व काँग्रेस वर यायला वेळ लागणार नाही.

साहना's picture

6 Mar 2021 - 2:38 am | साहना

+१

स्वराजित's picture

10 Mar 2021 - 4:23 pm | स्वराजित

अप्रतिम लेखमाला
खुप छान