तळ कोंकण २०१८ : भाग १

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
21 Dec 2020 - 2:42 pm

एप्रिलचा शेवटचा आठवडा. अचानक ठरलेल्या तळ कोंकण सहलीसाठी आम्ही दोघे व सोबत स्नेही मंडळीपैकी एक जोडपे असे चौघेजण रेल्वेने पनवेलहून रात्री दोन वाजता सावंतवाडीकरिता निघालो. कोंकण रेल्वेचा प्रवास पूर्वी केला असला तरी तो सर्व रात्रीचाच होता. यावेळी मात्र रत्नागिरीपासून उजाडले होते. वाटेत नदी-नाले ओलांडण्याकरिता बांधलेले पूल, हिरवेगार डोंगर, बोगदे बघत व कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्टेशन मागे टाकत सकाळी साडे अकराच्या सुमारास सावंतवाडी रोड स्टेशनला पोहचलो.

शहर स्टेशनपासून थोडेसे दूर आहे. १५-२० मिनिटात हॉटेलवर पोहचलो. ताजेतवाने होऊन जेवणही आटोपले. आमच्या स्नेह्यांचे एक परिचित येथे आम्हाला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चर्चा करून आजचा अर्धा दिवस व अजून पुढचे दोन दिवस कशी भटकंती करायची याचा आराखडा ठरवला. त्यांच्याच ओळखीने भाड्याने गाडीही ठरवली.
भटकंतीची सुरुवात रेडीच्या गणेश दर्शनाने केली. सावंतवाडीहुन निघून सुमारे तासाभरात (३२किमी) आपण येथे पोहचतो. रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील गाव असून येथील मूर्ती उत्खननात सापडली आहे. सहा फूट उंचीची ही मूर्ती द्विभुज असून जांभ्या दगडात साकारली आहे.

येथून जवळच म्हणजे अवघ्या सहा किमीवर असणाऱ्या तेरेखोल (Tiracol) किल्ल्याला पोहचलो. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असले तरी हा किल्ला गोवा सरकारच्या ताब्यात आहे. हा अगदी छोटासा किल्ला असून सुस्थितीत आहे. सध्या किल्ल्याचे रूपांतर एका हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. किल्ल्याला सुबक बांधीव तटबंदी व एक बुरुज आहे, आतमध्ये एक चर्चही आहे. तटबंदीला लागूनच समुद्र असल्याने हॉटेलमधे बसल्या जागेवरून किनारपट्टी व सागराचे रूप न्याहाळता येते. किल्ल्यात प्रवेश निःशुल्क आहे मात्र काही पेय अथवा खाद्य पदार्थ मागविल्यास हेरिटेज हॉटेलला साजेसच बील येते.

फेसाळती कॉफी आणि फेसाळता समुद्र. आहाहा !

येथून शिरोडा येथील बीचवर पोहचलो. किनाऱ्यावर सुरूचे बन आहे. तेथेच गाडी लावली व समुद्रकिनारी आलो. लांबच लांब तांबूस सोनेरी वाळूचा किनारा असून येथे घोड्यांची किंवा उंट स्वारी करता येते. समुद्राला छान भरती आलेली होती. आज अजून एका ठिकाणाला भेट द्यायची असल्याने भिजायचे टाळले.

समुद्र,सोनेरी वाळू आणि मागे सुरूचे बन

पुढे वेंगुर्ले तालुक्यातीलच अरावली येथील 'श्री देव वेतोबा ' मंदिरास भेट दिली.
अरावली गावाचा संरक्षक म्हणून वेतोबाची उपासना केली जाते. मूर्ती पंच धातूंपासून बनविलेली असून उंची नऊ फूट, एका हातात तलवार व एका हातात अग्निपात्र आहे. देवाला केळी, साखर, पेढे, लाडू याचा नैवद्य दाखवला जातो. देवाला नव्या चामड्याच्या चपला अर्पण करायची पद्धत आहे. वेतोबा गावचे रक्षक असून त्यासाठी ते चप्पल घालून रात्री संपूर्ण गावात फेऱ्या मारतात असा समज आहे.

अंधार पडायच्या सुमारास सावंतवाडीला परत आलो. येथील भालेकर यांच्या खाणावळीबद्दल मासे खाणाऱ्या लोकांकडून खूप कौतुक ऐकले होते. मी सोडून इतर तिघांनाही मासे आवडत असल्याने आज रात्रीचे जेवण तेथेच केले. जेवण चांगले व दरही वाजवी असले तरी दाटीवाटीने बसलेले लोक, माशांचा उग्र वास इ. मुळे ही जागा मला स्वतःला तरी इतकी काही आवडली नाही. रात्र झाली होती आणि थोडा थकवाही आलेला होता त्यामुळे आता जास्त कुठेही न फिरता हॉटेलवर जाऊन निद्राधीन झालो.

आज भटकंतीचा दुसरा दिवस
सकाळी आठपर्यंत सर्व आवरून हॉटेल सोडले. भटकंतीसाठी काल ठरवलेली गाडी हजर होतीच. चहा,नाश्त्यासाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. त्याप्रमाणे चालकाने अगदी जवळच असलेल्या "साधले मेस" येथे गाडी थांबवली. खानावळीत पादत्राणे काढून प्रवेश करावा अशी पाटी बघून गंमत वाटली. हॉटेल नुकतेच उघडले होते. आतमध्येही दरपत्रक व वेगवेगळ्या पाट्या लागल्या होत्या. चौघांनी वेगवेळ्या चार पदार्थांची ऑर्डर दिली. स्वयंपाकगृहात मालक मंडळीपैकीच दोघी जणी (बहुतेक जावा-जावा) कामाला लागल्या . थोड्याच वेळात गरमागरम नाश्ता टेबलवर आला. आणि काय सांगू सर्वच पदार्थ अगदी चविष्ट होते. स्वच्छता, टापटीप एकदम भारी.

त्यांच्याकडे वरच्या मजल्यावर राहण्यासाठी रूम देखील आहेत. त्याही आम्हाला दाखविल्या पण आज सावंतवाडीला परत येणार नव्हतो म्हणून पुढच्यावेळी बघू असे म्हणून तेथून निघालो.
सहल फक्त कोकणची असली तरी गोव्याच्या अगदी सीमेवर आलो आहोत तर गोव्याच्या एखाद्या बिचला भोज्जा करून येऊ असे ठरवले. रस्ता छान होता. आजूबाजूने काजूची झाडेही दिसत होती.

साधारण तासाभरात तेरेखोल नदीवरील पूल पार करून गोव्याच्या हद्दीत शिरलो आणि हरमळ (अरंबोल) समुद्र किनारी पोहचलो. जास्त गर्दी नव्हती. किनाऱ्यावर शिरलो त्याच्या उजव्या बाजूला उंच दगडी सुळके आणि त्यावर धडकणाऱ्या लाटा दिसत होत्या. तेथपर्यंत फेरफटका मारून येऊ म्हणून किनाऱ्याने चालत निघालो.

वाळूचा किल्ला बांधत असणाऱ्या दोन गोड चिमुरड्या

बीच संपला पण सुळक्याकडे जायची वाट सापडली नाही. विचारणा केल्यावर कळले कि पुढे दुतर्फ़ा दुकानाची रांग आहे त्यामधील चिंचोळ्या वाटेने चालत जायचे. त्या वाटेने निघालो. बीचवर घालायसाठीचे खूप छान छान रंगीबेरंगी पोशाख दिसत होते. मलाही मोह झाला. घासाघीस करून दिडशे रुपयाला एक ड्रेस विकत घेतला व 'जसा देश तसा वेष' या उक्तीला अनुसरून लगेच परिधानही करून घेतला. सुळक्यांपर्यंत पोहचून त्यांच्यावर चढाईचाही आनंद लुटला.

दुकानांची रांग वळण घेऊन अजूनही पुढे जात होती. त्या वाटेनं अजून थोडे पुढे गेलो तर काय अजून एक शांत, स्वच्छ बीच नजरेस पडला. येथे बहुतेक विदेशी पर्यटक दिसत होते. किनाऱ्याच्या एका बाजूला बाजूला गोड्या पाण्याचे सरोवर व हिरवागार डोंगर आहे. बिचचे नाव पालीअम (Paliyem) / Kalacha Beach असल्याचे समजले. हा बीच लपलेला असल्याने याला हिडन बीच/सिक्रेट बीच असेही म्हटले जाते. येथपर्यंत पोहचायला थोडी पायपीट करावी लागते त्यामुळे बरेचशे पर्यटक इकडे फिरकत नाहीत.

या बिचला किनाऱ्याने जांभ्या दगडाचे खडक आहेत. त्यावर पाण्यात पाय सोडून बसायला खूप मस्त वाटते

आपल्याला गरज नाही तरी एक अनुभव म्हणून किंवा गंमत म्हणून सूर्यस्नान घेतले

का कुणास ठाऊक पण या हिडन बिचला माझे फोटो काढत असताना नवऱ्याचं क्लिक करण्याचं टायमिंग मात्र चुकत होतं!

याच बीचला आम्हीही समुद्रात डुंबण्याचा मनमुराद आनंद घेतला. गाडीकडे परत येताना दुकानांच्या रांगेतील एका हॉटेलात जेवण केले. स्वस्त आणि चवही मस्त. दुपार टळून गेली होती. तीन-साडेतीन तासात जीवाचं गोवा करून परत निघालो महाराष्ट्राच्या हद्दीतील वेंगुर्ल्याकडे.

क्रमश:

तळ कोंकण २०१८ : भाग 2

प्रतिक्रिया

एक_वात्रट's picture

21 Dec 2020 - 5:32 pm | एक_वात्रट

छान प्रवासवर्णन! दरवाज्यात उभे राहून बाहेरची दृश्ये पहावीत आणि काहीही स्थलदर्शन न करता त्याच स्टेशनवरून परत यावे इतका कोंकण रेल्वेचा प्रवास सुंदर असतो. दिवसा एकदा कराच.

का कुणास ठाऊक पण या हिडन बिचला माझे फोटो काढत असताना नवऱ्याचं क्लिक करण्याचं टायमिंग मात्र चुकत होतं!

हा हा हा! हे वाचून फुस्सकन हसू आले.

जाहिरातः मी २०११ मधे कोंकण रेल्वेने केलेल्या प्रवासाची काही छायाचित्रे इथे पहाता येतील.

उपयोजक's picture

25 Dec 2020 - 10:28 am | उपयोजक

Requested url was not found

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2020 - 5:42 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी वर्णन !
सगळे प्रचि सुंदरच !
कोकण आणि तळकोकण आहेच भारी, परवडेबल, साधंसुधं, आपलं वाटणारं मनाला मनापासून भावणारं !

पॉइंट ब्लँक's picture

21 Dec 2020 - 5:56 pm | पॉइंट ब्लँक

मस्त प्रवास वर्णन. दोन्ही मंदिरांची माहिती विशेष आवडली.

छान प्रवासवर्णन!

प्रचेतस's picture

22 Dec 2020 - 9:44 am | प्रचेतस

सुरेख वर्णन अणि फोटो.
साधले मेसबद्द्ल बरेच काही ऐकले होते पण गोव्याला जाताना कायम बेळगाववरुन जात असल्याने सावंतवाडीला जाणे होतच नाही.
अरावलीच्या वेतोबाबद्द्ल माहीत होतेच पण त्याचे फोटो बघून पुन्हा एकदा गोव्याचे वेताळ नजरेसमोर आले.

पुढचा भाग लवकर येऊ द्यात.

गोरगावलेकर's picture

22 Dec 2020 - 10:04 am | गोरगावलेकर

आवडले हे आवर्जून सांगितल्याबद्दल
एक_वात्रट, चौथा कोनाडा, पॉइंट ब्लँक, NAKSHATRA या सर्वांचे आभार _/\_

Bhakti's picture

22 Dec 2020 - 11:44 am | Bhakti

मस्त

दुर्गविहारी's picture

22 Dec 2020 - 12:50 pm | दुर्गविहारी

खुपच छान माहिती दिली आहे.

का कुणास ठाऊक पण या हिडन बिचला माझे फोटो काढत असताना नवऱ्याचं क्लिक करण्याचं टायमिंग मात्र चुकत होतं!

हे वाक्य म्हणजे षटकार आहे. :-)))

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2020 - 12:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

२-३ दिवसांसाठी आटोपशीर प्लॅन आहे.
नाहीतर आंबोलि,सावंतवाडी,रेडी,सिंधुदुर्ग,अरवली,सातेरीदेवी,धामापुर, करत गोव्याला जायचे तर ५-६ दिवस पाहिजेत. पुढे २-३ दिवस गोव्यात. मग पुढे ट्रिप चालु ठेवायची असेल तर कोस्टल कर्नाटक आहेच.
सर्व प्रचि सुंदर. लिहित रहा.

गोरगावलेकर's picture

23 Dec 2020 - 9:11 am | गोरगावलेकर

अभिप्रायाबद्दल
प्रचेतस, Bhakti, दुर्गविहारी, राजेंद्र मेहेंदळे या सर्वांचे आभार

कंजूस's picture

23 Dec 2020 - 1:43 pm | कंजूस

रमतगमत केल्यास हे भाड फारच छान आहेत.
मागे एकदा (२०१८) वालावल येथे गेलो होतो. गोवा ओझरता पाहून धामापूरल आलो. गाडी कुडाळवरूनच होती ( राज्यराणी ऊर्फ तुतारी एक्सप्रेस).
कर्ली नदी वालावल,काळसे अशी पुढे किनाऱ्याला मिळते ते तारकर्ली. गोव्याप्रमाणेच इथे वॉटरस्पोर्ट्स ,केरळसारखी backwater rides आयोजीत करतात. पण वेळ नव्हता.

तर माझ्या वालावलच्या मित्राने तिथल्या प्रभुसृष्टी हॉटेलचा विडिओ पाठवला.
https://youtu.be/unE6Y7KEgtQ

गोरगावलेकर's picture

24 Dec 2020 - 10:03 am | गोरगावलेकर

व्हिडीओ पहिला. वालावल खुप सुंदर आहे. पुढे कधी या भागात जाणे झाले तर निश्चित पाहीन.

अनिंद्य's picture

24 Dec 2020 - 11:15 am | अनिंद्य

खूप छान. त्या तेरेखेल किल्ल्यात एकदा मुक्काम करायचाय.

सुरुची झाडे आणि उंट कोकणच्या सुंदर किनाऱ्यावर फार विसंगत दिसत आहेत, पब्लिक डिमांड असेल :-(

वेताळाच्या प्रतिमा साधारणपणे नग्न आणि उग्र असतात, तुमच्या फोटोतला वेताळबाबा चक्क हसरा, वेलड्रेसज्ड आणि क्यूट दिसतोय.

... नवऱ्याचं क्लिक करण्याचं टायमिंग मात्र चुकत होतं!.... हे भारी आहे :-))

अथांग आकाश's picture

24 Dec 2020 - 12:47 pm | अथांग आकाश

सुंदर लेख आणि फोटो! हिडन बिच आवडला!!
नवऱ्याचं क्लिक करण्याचं टायमिंग चुकलं नाहीये उलट परफेक्ट आहे :)
.

बाकी असे फोटो आपल्याच क्याम्रात असले पाहिजे असा आग्रह कशाला हवा? विडिओ माध्यमे यांनीच भरली आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Dec 2020 - 2:34 pm | ज्ञानोबाचे पैजार

आपले यजमान हे अत्यंत चतुर आणि अनुभवी गृहस्थ आहेत, असे निरिक्षण नोंदवतो.

किंगफिशर ५०० रुपयांच्या ५ बाटल्या आणि सुला १२०० रुपयांना म्हणजे नाशिक पेक्षाही स्वस्त... याच साठी लोक गोव्याला जातात.

रच्याकने :- खादाडीचे फोटो टाकताना प्रथमावताराचे फोटू न दिल्याचा अतितिव्र निशेध.

पुभालटा,

पैजारबुवा,

@अनिंद्य
'त्या तेरेखेल किल्ल्यात एकदा मुक्काम करायचाय.'
आपली इच्छा लवकरच सफळ होवो.

@अथांग आकाश
आपली प्रतिक्रिया देताना विषयाशी समर्पक ऍनिमेटेड इमेज देण्याची पद्धत खूप आवडते.

@ज्ञानोबाचे पैजार
'आपले यजमान हे अत्यंत चतुर आणि अनुभवी गृहस्थ आहेत, असे निरिक्षण नोंदवतो.'
आपकी पारखी नजर. मला पस्तीस वर्षांच्या संसारात उमगले नाही ते तुम्हाला क्षणार्धात समजले.

थोकल आनद's picture

26 Dec 2020 - 3:58 pm | थोकल आनद

हॉटेल ची नावे सुध्दा सांगावीत

समीरसूर's picture

28 Dec 2020 - 4:31 pm | समीरसूर

आवडले! लवकर टाका पुढील भाग!

दोन्ही मंदिरे आणि समुद्रकिनारे मस्त 👍 फोटोही छानच आहेत (अगदी तो टाईमिंग चुकलेला सुद्धा 😂)
गोव्याला अनेकदा जाणे झालंय/होते, पण हा भाग पहिला नाहीये अजून.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2020 - 3:01 pm | चलत मुसाफिर

1. भालेकरांची सावंतवाडी गावातील खाणावळ मत्स्याहारासाठी प्रसिद्ध आहेच. आता त्यांनी दोडामार्गनजिक झाराप- पत्रादेवी महामार्गावर नवी शाखा उघडली आहे. प्रशस्त, शांत आणि दर्जेदार (असे ऐकतो, मी स्वतः शाकाहारी आहे).
2. अरंबोल (मराठीत हरमल) चौपाटीचे वैशिष्ट्य म्हणजे भरतीच्या रेषेपासून जेमतेम 50मीटर दूर असलेले गोड्या पाण्याचे तळे.

गोरगावलेकर's picture

30 Dec 2020 - 9:00 am | गोरगावलेकर
गोरगावलेकर's picture

30 Dec 2020 - 9:01 am | गोरगावलेकर
गोरगावलेकर's picture

30 Dec 2020 - 9:01 am | गोरगावलेकर
गोरगावलेकर's picture

30 Dec 2020 - 9:08 am | गोरगावलेकर
नीलकंठ देशमुख's picture

4 Jan 2021 - 1:51 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलंय. आम्ही पण पंधरा वर्षांपूर्वी या ठिकाणी गेलो असे आठवले. (फक्त गोव्यातला बीच सोडून)तेरेखेल चा किल्ला तर मस्तच. पूर्वी तिथे कुठल्या तरी सिनेमाचे शूटिंग झाले होते..