विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
14 Oct 2020 - 4:26 pm
गाभा: 

विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती.
-------------------------------------------------------------------------
अखेरच आवाहन...
मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या.
मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड
ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे.
माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं.
विद्या बाळ २९ जानेवारी २०२०
संध्या. ७.३०

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

31 Oct 2020 - 12:15 pm | सुबोध खरे

स्विझरलंड मध्ये इच्छा मरण कायदेशीर आहे,

पण हा कायदा तेथील नागरिक नसणार्यां पर्यटकांना कसा लागू होऊ शकेल?

उद्या पाकिस्तान असा इच्छामरण कायदा करेल आणि येणाऱ्या प्रत्येक भारतीयाने इच्छामरण मागितले म्हणून सरळ इंजेक्शन देऊन मारून टाकतील.

सकाळ न्युज :- "वेलिंग्टन - इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.-प
इच्छामरणाचा कायदा अंमलात आल्यास सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्‍यक आहे.
कोण मागू शकते इच्छामरण?
. आत्यंतिक आजारामुळे सहा महिनेच आयुष्य उरलेल्या व्यक्ती
त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत असल्यास
इच्छामरणाबाबत निर्णय घेऊ शकणाऱ्या.

या देशांत परवानगी बेल्जियम, कॅनडा, कोलंबिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड, अमेरिकेतील काही राज्ये, व्हीक्टोरिया राज्य (ऑस्ट्रेलिया)Edited By - Prashant Patil",

तीन मुद्द्यांवर गोंधळ संभवतो :
१. सार्वमत: हे कितीही छान माध्यम वाटलं तरी त्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही "जनमानसाची" भावना कितपत व्यवहार्य असते हा वादाचा मुद्दा आहे. जनमत घेतल्यास अनेक भावनिक मुद्द्यांना बहुमत मिळू शकतं (उदा द्यायचे झाल्यास: अमुक गुन्हा केल्यास पब्लिकने त्याला तुडवून 'ताबडतोब' न्याय करावा.. किंवा... भर चौकात दगडांनी ठेचून मारावे... अथवा ... जाहीरपणे चौकात लिंग छाटावे / सुळावर चढवावे.. आम्हाला आमच्या चार जिल्ह्यांचे / समाजाचे वेगळे राज्य काढून द्या... वगैरेलाही बहुमत मिळू शकेल..)

पण हे घटनेच्या आणि सद्य लोकशाहीच्या कोणत्याच तत्वात / नियमात बसवून अंमलात आणणे शक्य नाही. किमान सोपे तर नाहीच नाही.

२. खालील अधोरेखित वाक्ये अत्यंत अनिश्चित शक्यतांवर आधारित आहेत.

सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्‍यक आहे.

मानवी शरीर आणि वैद्यकीय शास्त्र हे १+१ = २ अशा सूत्रबद्ध गणिती पद्धतीने चालत नाही. एखाद्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासारखे शरीराबाबत करता येत नाही.

कोण दोन डॉक्टर ही खात्री देणार की सहा महिनेच आयुष्य शिल्लक आहे (जरी अनुभवाने ९०% शक्यता त्यांना वाटत असली तरीही..)

३. शिवाय डॉक्टर ज्या प्रतिज्ञेच्या नैतिक बळावर शिक्षण आणि व्यवसायकर्म करतात त्याच्या हे अत्यंत विपरीत आहे. मानसिक बैठक इतकी बदलणं डॉक्टर लोकांना जमेल का? असे निर्णय डॉक्टरांवर सोपवण्यामागे सरकारी सिस्टीम नेमकी कशातून मुक्त होऊ पाहात आहे?

सुबोध खरे's picture

31 Oct 2020 - 12:12 pm | सुबोध खरे

दोन डॉक्टर ही खात्री देणार की सहा महिनेच आयुष्य शिल्लक आहे

बाडीस

असे अनेक रुग्ण मी पाहिले आहेत कि टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना फार तर सहा महिने जातील असे सांगितले असताना पुढे २-३ वर्षे जगले.

यात मी ज्यांच्या कडून आपले घर विकत घेतले ते सद्गृहस्थ आणि ( पुढे ४ वर्षांनी) त्यांची पत्नी असे दोघेही समाविष्ट आहेत.

(कर्करोगाबाबत) मीच श्रेष्ठ हि भावना टाटा रुग्णालयात दुर्दैवाने फार वेळा पाहायला मिळाली आहे आणि आज तरी सर्वात जास्त रुग्णांचे उपचार टाटा मध्येच होतात.

तेंव्हा एखादा रुग्ण सहा महिनेच जगेल असे कोणत्याही डॉक्टरने निदान रुग्णाला तरी सांगू नये.

आणि त्या अभिप्रायावर एखाद्या रुग्णाने निराश होऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची मागणी करणे हे सदोष मनुष्यवधच ठरेल.