बुंधा
इतर छोट्या कोर्सेसचे रिझल्ट आधीच लागले होते. ते रिझल्ट घेऊन त्या त्या बॅचेस केव्हाच घरी गेल्या होत्या. फक्त एम.बी.ए.चा रिझल्ट बाकी होता. तो आज लागणार होता. बहुतेक सगळे निकाल लागलेले असल्याने विद्यापीठ कँपस रिकामा होता. फक्त एम.बी.ए च्या रिझल्टसाठी ऑफिस खुलं ठेवलं होतं. तिथे एक-दोघंच ऑफिसर होते. एकदा हे रिझल्ट दिले की, एक दोन दिवसांत ऑफिसही बंद होणार होतं. कँटीनही शेवटचे दोन-तीन दिवसच उघडं असणार होतं. पुढचं वर्ष सुरु व्हायला दोन महिने अवकाश होता. सगळीकडे शुकशुकाट होता.
सगळी बॅच सकाळी सकाळीच ऑफिसला पोहोचली. नोटिस बोर्डवर रिझल्ट लावलेला होता. बहुतेक सगळे फर्स्ट क्लासने पास झाले होते. अनिकेत व मधुरिमा, दोघांनाही फर्स्ट क्लास मिळाला होता. त्यांचा ग्रूप एकमेकांचं अभिनंदन करत करतच कँटीनला पोहोचला. ऑर्डर दिली गेली. सर आले. सरांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं. पुढे काय करणार आहात, विचारलं. प्रत्येकाने आपापले प्लॅन सांगितले. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर कुणी परदेशी आणखी शिकायला जाणार होतं, तर कुणी वडिलांना व्यवसायात मदत करणार होतं. एक पार्टीच साजरी झाली. सगळ्यांचे दोन तास कँटीनध्ये गेले. फोटो काढले गेले.
ग्रूपमधला एकेक जण सगळ्यांचा निरोप घेऊन जाऊ लागला. कँटीन रिकामं होत गेलं. सरही गेले. अनिकेत व मधुरिमा उरले. दोघांनीही आपापल्या सॅक घेतल्या व कँटीन सोडून निघाले. चालता चालता अनिकेतने विचारलं,
“तुझं काय ठरतंय?”
“काहीच ठरत नाहीये. पोस्ट ग्रँज्युएशन तर झालं. आता इतक्यात काही नाही. तुझं काय?”
“माझं काय... नोकरी शोधायची आहे. पुढच्याच आठवड्यात दोन कॉल आहेत.”
“हं...बेस्ट ऑफ लक.”
“हो. ए, तुझे वडील तुझ्या लग्नाचं पाहत होते ना?”
“हो. पाहत होते. मी त्यांना सांगितलंय, लगेच घाई करू नका.“
“घाई ते करणार नाहीतच, पण आज ना उद्या लग्न होणारच तुझं.”
“हो.”
“मित्रांना सोडून जाणार?” अनिकेतने लटक्या रागाने विचारलं.
“हो तर.” मधुरिमाने तितक्याच लटक्या खोचकपणे सांगितलं.
“एक ना एक दिवस लग्न होतंच, हे माहीत आहे.”
“माहीत आहे ना, मग, आज बालिश वागायचा मूड आहे का?”
“बालिश नाही गं. आज आपला कोर्स संपला. रिझल्टही मिळाला. लग्न होईल तेव्हा होईल, पण आजही तू सोडून चाललेली आहेसच. सगळेच सोडून चाललेत. पुढे आपल्या वर्गातले भेटतील की नाही, माहीत नाही. फोन नंबर असतात. त्याने काही होत नाही. समीर, सुलक्षणालाही तसंच वाटत होतं. भकास.”
“मलाही जाणवतंय. होय. ऐकलं मी दोघांचं म्हणणं.“
“बरं. मी काय म्हणतो, आपण जाताना आज एकमेकांना काहीतरी देऊन जाऊ या.”
“गुड आयडिया. पेन, रिस्ट बँड वगैरे. कँपसबाहेरच स्टेशनरीचं दुकान आहे.”
चालता चालता ते एका झाडापाशी आले. ते या दोघांचं नेहमीचं झाड. कँपसमध्ये इतकं मोठं झाड दुसरं नव्हतं. झाडाभोवती मोठा पार बांधलेला होता. झाडाचा बुंधाही इतका मोठा होता की, पलीकडे एक-दोघं जण बसले तर कळायचं नाही. दोघांनीही आपापल्या सॅक पारावर ठेवल्या.
“बसू या जरा.” अनिकेत म्हणाला.
“बसू. परत काही या इथे येण्याचा चान्स नाही.”
दोघेही बसून सगळा कँपस न्याहाळू लागले. सुट्यांचा मोसम सुरू झाल्याने कँपसमध्ये मुलांचा कलकलाट नव्हता. कँटीन व ऑफिसपासून ही जागा दूर असल्याने तिथल्या कुणाचाही आवाज येत नव्हता. फक्त दुपारच्या उन्हाचं पिवळं अस्तित्व होतं. फक्त अनिकेत व मधुरिमाचा आवाज होता. वारा झाडाची पानं व मधुरिमाचे केस हळूच उडवत होता. तिच्या चेहर्यावर ऊन-सावलीची नक्षी तयार झाली होती.
“ब्युटिफुल, मधुरिमा.”
“मी तुला सांगितलं होतं ना अनिकेत, आपल्यात फक्त आणि फक्त मैत्री. मग, ही सौंदर्याची स्तुती परत परत का?”
“सांगितलं होतंस, पण दिल है के मानता नही. आहेस सुंदर, म्हणून करतो.”
“मैत्री ठेवूच आपण. त्यात प्रॉब्लेम येणार नाही. हे बघ, परत जर मला तू हे म्हणालास तर आपली मैत्रीही संपेल.”
“तुझा सहवास फार छान होता. एकाच बाकावर बसणं, एकत्र अभ्यास करणं, एकत्र बाइकवरून फिरणं यातून तो सहवास मिळतो. एकमेकांना तो आपण दिलाच आहे. ज्यांच्या सहवासात आपण असतो, त्यांच्या शरीराचा गंध कायम आपल्याला जाणवतो. त्याची सोबत असते. तुलाही माझा गंध जाणवत असेल, मघू.”
“हो. जाणवतो नेहमी.”
“आपण त्या जाणिवा स्वतःबरोबर न्यायच्या का? खूप जाणिवा. ताज्या. करशील सहकार्य? परत भेटणार नाही आहोत आपण.”
“काय करायचं. ?”
“बुंध्याच्या मागे जाऊ.”
अनिकेतने मधुरिमाचा हात धरून तिला मागे नेलं. अनिकेतने तिच्या चेहर्याकडे नीट पाहिलं. त्याचे दोन्ही हात तिच्या कंबरेवर आले. टॉपच्या आतली तिची शीतकोमल, गोरी गोरी कंबर शहारली. हात सरकत सरकत खांद्यावर आले. त्याने तिच्या ओठांजवळ ओठ नेले. एक घट्ट चुंबन घेतलं. तिला मिठीत घेतलं. मधुरिमानेही अनिकेतला प्रतिसाद दिला. शरीरं भिडली. त्याच्या भरदार बाहूंवर आणि खांद्यावर तिनेही ओठ रोवले. शरीरं पुरेशी उबदार झाल्यावर दोघांनी आपापली मिठी सैल केली. श्वास संथ होऊ दिले.
अनिकेतने अपेक्षेने मधुरिमाकडे पाहिलं.
मधुरिमा म्हणाली,
“सेमिस्टरचे निकाल लागल्यावर आपण एकमेकांना मिठी मारली होती. ही मिठी वेगळी वाटली. ही जाणीव वेगळी होती.”
“आवडली का जाणीव ?”
“हो.” मधुरिमा इतकंच म्हणाली. अनिकेतकडे पाहत राहिली. थोड्या वेळाने तिनं विचारलं,
“आपल्याला एकमेकांना काही द्यायचं होतं. पेन, रिस्टबँड...”
“त्याची आता गरज आहे?” अनिकेत उत्तरला.
(समाप्त)
प्रतिक्रिया
15 Nov 2020 - 6:34 pm | टर्मीनेटर
@केदार पाटणकर
'बुंधा'
ही तुमची लघुकथा आवडली 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@केदार पाटणकर
'बुंधा'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
17 Nov 2020 - 3:32 pm | चांदणे संदीप
इतका भारीय की याचे नीट जतन-संवर्धन होण्यासाठी म्हणून याला युनेस्कोने "वर्ल्ड हेरिटेज साईट" म्हणून घोषित करावे अशी मी मागणी करतो आणि खाली बसतो.
सं - दी - प
21 Nov 2020 - 10:00 pm | चौथा कोनाडा
व्वा, सुंदर !
असा सहवास संपतानाचं उदासपण आयुष्यभर सोबत करत राहतं !
कथा आवडली, कथेचं नाव देखील आवडलं
22 Nov 2020 - 9:11 pm | प्राची अश्विनी
कथा आवडली!
23 Nov 2020 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
बरं झालं तो उभ्या झाडाचा बुंधा होता, नाहीतर काय खर नव्हत बॉ....
पैजारबुवा,