टीप -ही आमटी एकदा आमचे एक घराचे स्नेही श्यामराव म्हणून होते त्यांनी माझ्या लहानपणी हौशीने आमच्या घरी येऊन केली होती असे आठवते. आमच्या आजीचे अनेकांशी घरातल्यासारखे संबंध होते, त्यातील हे एक. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरची मंडळीही कधीकधी येत. बाहेरची बरीच मंडळी आली की घाउक प्रमाणावर करता येतील असे पदार्थ आमच्या घरी होत. तेव्हा मी फारच लहान होते (८-९ वर्षांची) त्यामुळे सर्व जिन्नस माहिती करून घेतले नसणार याची खात्री आहे. त्यानंतर त्या आमटीत थोडेफार बदल करून आमच्या घरी ती होतच राहिली. पूर्वी आमच्या गावी घरोघरी सायकलवर ब्रेड विकायला एक ब्रेडवाला येत असे. काहीसा खरपूस भाजलेला, थोडासा चिवट आणि ओलसर, जाडसर कडेचा कापलेला ब्रेड या आमटीत बुडवून पांढर्या लोण्याबरोबर खायला मस्त वाटे. या आमटीमुळे मला आमच्या घरची, पावसाची आणि एकंदरीत लहानपणची आठवण येते.
तर अशी ही आमटी - करायला एकदम सोपी आहे. मी बर्याचदा घरात असलेल्या पदार्थांत भागवते, पण तुम्हा कोणाला चवीप्रमाणे बदल करता येतील.
साहित्य - ४-६ पाकळ्या लसूण, ४-५ लवंगा, २-३ काळी मिरी, १ दालचिनीचा बोटाएवढा मध्यम जाडीचा तुकडा, ४ लाल सुक्या मिरच्या, १ वाटी सुके खोबरे (किसून), ३-४ मध्यम आकाराचे कांदे, बोरा एवढ्या चिंचेचा कोळ, पाणी, तेल आणि १ वाटी लाल मसुरांची डाळ, किंवा आख्खे मसूर, १ कच्चा बटाटा जाडसर कापून, तिखट, मीठ, गरम मसाला १-२ चमचे
कृती - मसूराची डाळ थोड्या पाण्यात सेगडीवर शिजवून घ्यावी किंवा कुकर वापरला तरी चालेल. त्याचवेळी कांदे सालासकट ओव्हनमध्ये भाजायला ठेवावे (कांद्यामुळे ओव्हन खराब होऊ नये म्हणून काळजी घ्यावी). कांदे भारतात गॅसच्या शेगडीवर भाजता येतात, जास्त चांगले होतात आणि लगेच शिजतात. इथे मला ते करता येत नाही :( थोडे थंड झाले की साले काढून मिक्सरमधून पाणी न घालता काढून घ्यावेत.
आधी आमटी करणार त्या भांड्यात किसलेले सुके खोबरे थोड्या तेलावर लालसर होईपर्यंत थोडे भाजून घ्यावे. मग दालचिनीचा तुकडा, सुक्या मिरच्या, मिरी, लवंगा घालून किंचित परतावे. हा मसाला बाजूला काढून ठेवावा. त्याच भांड्यात थोडे तेल घालून त्यावर कांदा परतून घ्यावा. पातेल्याला खाली न लागता कांदा चांगला परतला जाणे आवश्यक आहे. यासाठी सतत परतावे. कांदा शिजला की मग बाजूला ठेवलेला मसाला घालावा, बटाट्याच्या फोडी आणि किंचित मीठ घालून थोडे परतावे. यावर मग आमटीला पुरेसे पाणी , चिंचेचा कोळ, आणि चवीप्रमाणे मीठ, आणि वाटल्यास थोडे तिखट/गरम मसाला घालून भरपूर उकळावे. मसाला नीट उकळला जाणे महत्त्वाचे आहे (रसम उकळतो त्याप्रमाणे).
हे झाल्यानंतर शिजलेली मसूरांची डाळ घालून परत एकदा उकळावे. आमटी दुसर्या दिवशी अधिक चांगली लागते. आणि ब्रेडच्या जाडसर स्लाईसबरोबर खावे.
याबरोबर मऊ पाव अजिबात चांगला लागत नाही.
प्रतिक्रिया
14 Nov 2008 - 10:48 pm | रेवती
करून बघीन आणि कळवीन.
जर जमली नाही करायला तर माझ्या घरी येऊन कशी करायची ते दाखवशील का? :)
आणि जर जमली तर चव बघण्यासाठी जरूर ये, मी कळवीन तुला.
विचारल्यानंतर लगेच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद!
रेवती
14 Nov 2008 - 11:07 pm | चित्रा
नक्की येईन. तसेही आपण काही फार लांब राहत नाही :)
14 Nov 2008 - 10:52 pm | प्राजु
मी मसूराची उसळ करते. आता ही आमटी करेन नक्की.
बाय द वे, अख्खा मसूर की, मसूर डाळ वापरायची? अख्खा मसूर चालतो का? आणि सुके खोबरे ,मिरच्या, लवंग, दालचिनी... हा मसाला तसाच अख्खा ठेवायचा कि, वाटून घ्यायचा?
आवांतर : तो घरगुती ब्रेड चित्राताई विसरलेली दिसते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Nov 2008 - 11:05 pm | चित्रा
नाही, मी मसाला तसाच आख्खा ठेवते. वाटत नाही, पण वाटला तरी चालेल असे वाटते :)
ब्रेड विसरले नाही, देते लवकरच. पण त्या फोटोतला ब्रेड मी सुजाता कणीक वापरून केला होता (उरलेल्या कणकेचा) त्यामुळे परत एकदा नीट करून पाकृ. देते असा विचार केला.
15 Nov 2008 - 12:12 am | रेवती
जवळच्या भारतीय ग्रोसरीच्या दुकानातून सुजाता आटा लगेच संपतो, म्हणून माझ्या मैत्रिणीने एक युक्ती केलीये.
पूर्वीचे वाईल्ड ओट्स व आताचे होल फूडस मध्ये बल्क सेक्शनमधे जी वेगवेगळी पिठे ठेवलेली असतात त्यात कणकेचे दोन प्रकार असतात.
एक जरा जाडसर आटा असतो व दुसरी आपली नेहमीची कणिक असते. सुजातापेक्षा ताजी व चांगल्या गव्हाची असते. ती कणिक ट्राय कर चित्राताई.
आपल्या आज्जीच्या वेळी व्हायच्या तश्या पोळ्या होतात (किंचीत जाड पण मऊसूत). त्या कणकेचा गव्हाचा ब्रेड छान होतो.
रेवती
15 Nov 2008 - 4:47 am | चित्रा
बघते आता नक्की.
घाईत लिहील्याने लसणीचा उल्लेख कृतीत नाही, पण तीही बारीक करून मसाल्याबरोबर परतून घ्यावी.
14 Nov 2008 - 11:38 pm | स्वाती दिनेश
चित्रा,मस्त दिसतेय ही आमटी.करून पाहिनच आता.
स्वाती
15 Nov 2008 - 5:32 pm | विसोबा खेचर
केवळ सह्ही पाकृ..!
धन्यवाद चित्रावैनी...
तात्या.
16 Nov 2008 - 3:29 am | काळा डॉन
रेसेपी मस्त आहे. एकादा फोटू पन टाकायला पायजे होता.
16 Nov 2008 - 3:30 am | काळा डॉन
रेसेपी मस्त आहे. एकादा फोटू पन टाकायला पायजे होता.