शामभट्टाची युरोपवारी .. इटली, स्वीस, फ्रान्स ... दहावा दिवस

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
28 Mar 2020 - 6:02 pm

दिवस १०

सूचना - ह भाग २०१७ साली लिहून झाला होता . तो इथे टाकायचा राहिला होता. यात फोटो नाहीत कारण यातील फोटो कार्ड पॅरिस द गॉल एअर पोर्टच्या ड्युटी फ्री शॉप मध्ये गहाळ झाले . सबब हा भाग टाकायाचा उत्साह मावळला होता. आता तो टाकीत आहे. गोड मानून घ्यावा .

इसेलटवाल्ड ते इंटरलाकेन - झेर्माट - इंटरलाकेन - म्युरेन

भल्या सकाळी स्नान करून खाली किचन मधे आलो. मस्त गरमागरम कॉफी बनविली व रेडी टू कूक नाष्टा बनविला. बाहेर आलो तर समोरच लेक ब्रिन्झ कमालीचे शांतपणे सूर्योदयाची वाट पहात होते. आमचा आजचा कार्यक्रम स्वीस पासचे पैसे पुरते वसूल करण्याचाच जणू होता. साडेसातच्या सुमारास इन्टरलाकेनसाठी सुटणारी बस गाठण्यासाठी डोरप्लात्झ चौकात आलो. पाचेक मिनिटात बस आली व आम्हाला घेऊन सुटली. ८ चे सुमारास झेर्माट जाण्यासाठी आम्ही इंटरलाकेन इस्ट या रेल्वे स्थानकावर दाखल झालो.

हा प्रवास एकूण दोन तासांचा होणार होता. यात स्पिझ व विस्प या दोन ठिकाणी गाडी बदलावी लागणार होती. अर्थात अत्यंत कुशलतेने चालविल्या जाणार्‍या रेल्वे व्यवस्थेत स्वीस रेल्वेची गणना होत असल्यामुळे वेळेवर झेर्माट येथे पोहोचू यात संदेह नव्हता. पण.... स्पिझला ला ९ वाजून दोन मिनिटानी पोचल्यानंतर स्वीस मधे एक वेगळाच अनुभव आला. आमची नियोजित गाडी येण्याऐवजी एक मालगाडी आली. मग आणखी एक मालगाडी आली व त्यामुळे आमची गाडी रद्द झाल्याचे कळले. आता स्वीसच्या नियमाप्रमाणे पुढे एक तासाने गाडी.

पण सुदैवाने एक ट्रेन ९ वाजून ३६ मिनिटानी आली. गाडी येण्याच्या या मधल्या काळात फलाटावर अचानक शेजारून भारतीय उच्चारण असलेले इंग्लीश सम्भाषण ऐकू आले. दोन मिनिटात त्या कुटुम्बानेही ओळखले की आम्ही ही भारतीय आहोत. बाकी बोलणे जुजबीच होते. ते गृहस्थ कोण वगैरे काही कल्पना नव्हती पण स्वीसला येण्याचा त्याना पूर्वानुभव होता असे बोलण्यावरून वाटत होते." आपल्या देशात बर्‍याच वरिष्ठ जागी नेमकी चुकीची माणसे आहेत "या माझ्या विधानावर ते गृहस्थ भलतेच खुलले. बायकोला म्हणाले " बघ मी तुला म्हणत होतो ना यानाही असेच वाटतेय... ! " मग जरा अधिक परिचय होण्यास सुरूवात झाली . आम्ही स्वीस पास काढून आलोत असे सांगताच कार भाड्याने घ्यायची व आपणच चालवायची. खेड्यात स्वस्त मिळते म्हणून एअर बी एन बी चे घर घ्यायचे व मनसोक्त भटाकायचे अशी एक युक्ती त्यानी पूर्वीच्या फेरीत वापरल्याचे सांगितले. अर्थात पहिले एक दोन दिवस उजव्या बाजूने ड्राईव्ह करणे जड जाते हे आवर्जून ते बोलले. " मी पॅरिसमधे रहातो व ही ठाण्याला. तिला मराठी येते. मला फक्त कळते. गेल्या वर्षी मी मुलीला घेऊन आलो होतो या वर्षी पत्नी व मुलगा असा आमचा ग्रूप जमला आहे ! "
इतक्यात ९ वाजून ३६ मिनिटांची एक दुसरेच कनेक्शन असलेली व झ्रेर्माट ला जाणारी व ११ १५ ला पोचणारी ट्रेन आली. तीत आम्ही बसलो. तर ते कुटुम्ब ही आमच्याच डब्यात येऊन बसले.

मध्येच बाहेरचा निसर्ग पहात त्यांच्याशी गप्पा रंगू लागल्या. सदर गृहस्थ कमोडोर पदावर एअर फोर्स मधे होते . ही जागा ब्रिगेडियर ला समांतर आहे असे कळले तसा मी जरा सरसावून बसलो . त्यांची सध्याची नेमणूक भारताच्या पॅरिसमधील दूतावासात होती. गप्पांचा ओघात मग त्यानी सुनामी च्या काळात सोपविल्या गेलेल्या कार्याची आठवण सांगितली. भारतीय संरक्षण मंत्रालयात मिलिटरीची काही माहिती नसलेल्या आय ए एस ची कशी भरताड झाली आहे हे त्यांचे दु: ख होते. गप्पांच्या ओघात मर्यादा सांभाळत दहशतवाद , सैनिकी हालचाली ई. अनेक गोष्टीवर ते मला माहिती देत होते. आम्हा नंतर जिनेव्हा मार्गे पॅरिसला जाणार आहोत हे आम्ही सांगितल्यावर त्यानी आयसीस व आताचे डागाळलेले पॅरिस याचा संबंध विशद केला. कपाळावर बायकोला कुंकू लावायला सांगा कारण भारतीय माणूस हा निर्वासितांपेक्षा खूप बरा असा पॅरिसकरांचा समज आहे असे त्यानी बजावले." काही अडचण आली तर हे माझे कार्ड ,, मी त्यावेळेस बहुदा तिथे पॅरिसमधे असेन मला कॉन्सुलेट मधे फोन केलात तर काही मदत मी करू शकेन " .
आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही म्हणून उतरते वेळी मी त्याना एक सिव्हिलियन जसा सैनिकाला मारेल असा कडक सलाम ठोकला व दोन्ही कुटुंबे झेरमाट च्या फलाटावर एकमेकांचा निरोप घेत पांगली.

आज आपल्या देशात इस्रो व आमची मिलिटरी सोडली तर राजकारण्यानी डागाळून टाकले नाही असे एकही क्षेत्र नाही . ज्या दिवशी ही विषवल्ली मिलिटरीत शिरेल त्या दिवशी आपण नक्की संपणार ! " कमोडोर साहेब पोटतिडीकेने सांगत होते.

जगातील सुंदर्‍यांमधे हे स्थान ऐश्वर्या राय चे आहे तेच स्थान " मॅटरहोर्न " या शिखराचे शिखरांमधे आहे. 'मोस्ट फोटोग्राफ्ड समिट ' या निकषात त्याने एव्हरेस्टला मागे टाकले आहे असे म्हणतात. झेरमाट हे गाव मॅटरहॉर्न नजिकच्या दरीत टोकाला वसले आहे. झेरमाटला जाताना विस्प मागे टाकले की एक नदी सतत आपल्याबरोबर प्रवासात असते कुलूवरून मनिकरण येथे जाताना पार्वती नदी बरोबर्॑ असावी तशी. ही नदी संथपणे वहात नाही. अनेक ठिकाणी तीन तीन कपार्‍या असलेले लहानसे धबधबे आपल्याला दृष्टीसुख देत असतात,

झेरमाट गावात जशी महाबळेश्वर वा सिमला मधे बाजरपेठ आहे तशी बाजारपेठ आहे. अनेक प्रकारची प्रवासी मालाची दुकाने त्यांच्या आकर्षक शोकेसेस आपल्याला क्षणभर का होईना थांबायला लावतात. बाजपेठेच्या शेवटी एक चर्च आहे. डावीकडे वळले की एक स्मशान आहे .पण स्मशान असूनही अगदी प्रेक्षणीय ठिकाण. दरीच्या टोकाकडून एक नदी वहात येते गावाचे दोन भाग करते. नदीच्या दोन्ही बाजूस रस्ते आहेत त्यावरून पुढे दरीच्या टोकाकडे जाउ लागले की एका ठिकाणी एकदम आपल्याला मॅटरहॉर्न दिसू लागते. मी त्या जागी पोहोचलो पण अरे दैवा तो " पांडुरंग ढगानी अर्धा अधिक व्यापलेला. ते शिंचे ढग काही हटेनात त्या पर्वत सुंदरीचे पदराआडून जेवढे दर्शन झाले त्यावर समाधान मानावे लागले. मला पुन्हा सवा बाराची इन्टरलाकेनला जाणारी ट्रेन पकडायची असल्याने ढग पांगतील व आपल्याला शिखर पूर्ण पणे फोटोत कैद करता येईल यासाठी थांबणे शक्य नव्हते. खंतावून परत फिरलो. झेरमाट गावात पेट्रोल वा डिझेल वर चालणार्‍या वहानाना प्रवेश नाही. सिमला रिज व नैनिताल येथे असा अपवादात्मक तरी प्रवेश आहे. इथे स्थानिक टॅक्सी आहे ती इलेक्ट्रीक वर चालते. आजूबाजूला हॉटेलच्या आकर्षक इमारती फुलांची लहडलेल्या बाल्कनीसह आपले लक्ष वेधून घेतात.

खरे तर मॅटरहॉर्न काहीसे जवळून पाहायचे असेल तर झेरमाट गावातून एक ट्रेन सेवा गोरनेर्ग्राट येथे आहे. तिथे पोचल्यावर जर आकाश मोकळे असेल तर एकूण २९ शिखरांचे दर्शन होते. आमचाबरोबर आलेले ते मिलिटरी ऑफिसर या रेल्वेने गोरनेर्ग्राट येथे जाणार होते. माझ्या माहिती प्रमाणे मिपाकर श्री डॉ. म्हात्रे या स्थळी गेलेले आहेत. अशा वेळी आपला एखादा स्वीसमधील दिवस वाढवायला पाहिजे होता असे वाटून गेले. ( खरे तर झेर्माट ला मी गेलो ते एकतर पासाचे पैसे वसूल होतील हे समाधान व आपला वीक पोईण्ट " मॅटरहॉर्न " पहायला मिळेल म्हणून एरवी हे गाव माझ्या मूळ आराखड्यात नव्हते) .
सवा बाराची गाडी पकडून आलेल्या मार्गानेच दुपारी सवा दोन चे सुमारास इंटरलाकेन इस्ट ला पोहोचलो. पुन्हा " स्वीस" नियमानुसार लॉटरब्रूनेन ला जाणारी ट्रेन तयार होतीच. तिच्यात बसलो ते ट्रेन चालूच झाली. गाडीत गर्दी बर्‍यापैकी होती. एक गुजूभाईंची फौज आपल्या सगेसोयरे पोरेटोरे घेऊन गलबला करीत होती. मी विचारले " केम छे गुजुभाई ? " ( इतकेच गुजराथी आपल्याला येते) पण त्याने आपुलकी निर्माण झाली. ते आपले काही न ठरवता प्रवास करीत सुटले होते. मी त्याना या परिसराची इतकी तपशीलवार माहिती दिली की मी नेहमी इकडे येतो काय " असा प्रश्न त्यांच्या म्होरक्याने मला टाकला. "आज युंगफ्राउ ला न जाता उद्या हवामानाची चौकशी करूनच जा कारण नाहीतर केवळ माऊंटन रेल्वे चा प्रवास या पेक्षा हाती काही लागणार नाही. ! " असे मी बोलल्यावर ते माझ्याच बरोबर " ट्रूमेल्बाख " वॉटरफॉल पहायला तयार झाले.

इंटरलाकेन समोर एक दरी आहे. दरीच्या एका बाजूस इटरलाकेन धरले तर दुसर्‍या टोकास आयगर , युंगफाउ या शिखरांची भिंत आहे. या दरीत एकूण ७२ धबधबे कोसळत असतात. एका बाजूस म्युरेन, व शिल्टहॉर्न ( ००७ फेम) ला जायला केबल कार आहे .तर दुसर्‍या बाजूस वेंजेन मार्गे आयगर शिखाच्या पायथ्याशी जायला रेल्वे आहे. दरीतील सर्वात सखल भागात विल्डर्सविले ,लॉटर ब्रूनेन ,स्टेचेलबर्ग ही गावे आहेत. टूमेल बाख वॉटरफॉल हे ठिकाण लॉट्रब्रूनेन पासून बसने सातेक मिनिटांच्या अंतरावर असेल. दरीच्या डाव्या बाजूला जी अजस्त्र उभीच्या उभी भिंत आहे त्यात एका जागी एक फट पडली आहे. तीत वर पहाडांवर वितळलेल्या बर्फाचे पाणी वेगाने शिरत अकरा जागी झेपावत खाली त्या सापटीतून खाली येते. अर्ध्या उंचीवर जाण्यासाठी मोठी लिफ्ट आहे. कातळात बोगदे खणून जिने कोरून मार्ग तयार केलेत. जागोजागी रंगीत दिव्यांचे झोत टाकलेले दिसतात. राजकपूर , राजेंद्रकुमार व वैजयन्ती माला यांवर चित्रित केलेला एक प्रसंग ज्यानी संगम हा चित्रपट पाहिला आहे त्याना आठवत असेलच तो इथे मधेच एका गॅलरीत शूट केले॑ला आहे.

लॉटरब्रूनेनला गुजुभाईंच्या घोळक्यासह आम्ही उतरलो. इथून लगेचच बस मिळाली व ट्रुमेलबाख ला सात मिनिटात पोहोचलो. गुजु मागे पडले. आम्ही दोघे पुढे झालो. प्रत्येकी ११ युरो (रु ९०० बरे ) देऊन दोन तिकिटे काढली. पायर्‍या चढून वर गेल्यावर लिफ्ट दिसली. पुरेशी माणसे आल्यावर चार पाच मजले एवढी तरी लिफ्ट वर गेली. पाण्याचा "तोय आदळे धबाबा" असा आवाज ऐकू येत होता. काहीसे भिजायलाही होत होते. इथून पार वरपर्यन्त धबधबे आहेत . पण एकूण प्रकार मला एक टूरिस्ट ट्रॅप वाटला. स्वीसला गेल्यावर हे ठिकाण तुम्ही टाळू शकता असे मी नक्की सुचवेन. येताना मात्र लिफ्टने न येता वेगळ्या मार्गाने खाली येण्यासाठी रेलिंग असलेले जिने आहेत. उतरताना मात्र॑ हिरव्यागार लॉटरब्रुनन व्हॅलीचे दर्शन होऊन डोळे निवतात. खाली आलो. आता लवकरात लवकर पुढची बस पकडून स्टेचेल्बर्ग गाठायचे होते. कारण म्युरेन या गावातून आयगर मून्च व युन्ग्फ्राउ या त्रिदेवाचे मस्त दर्शन होते असले वाचून होतो. स्टेचेलबर्ग वरून शिल्टहॉर्न येथे जाण्यासाठी केबल कार आहे. त्यातील ग्रीमेलवाल्ट व मुरेन हे टप्पे स्वीस पासधारकाना मोफत आहेत . सबब म्युरेन पर्यंत जावे तिथून त्रिदेव पहावेत व परतावे असा बेत केला.

बसने सात मिनिटात स्ट्रेचेलबर्ग येथे पोहोचलो. नियमाप्रमाणे बस च्या आगमनाला जोडून वर जाणारी केबल कार तयारच होती. पहिला टप्पा स्टेचेलबर्ग ते ग्रीमेल्वाल्ड असा व दुसर्‍याच केबलकारने ग्रीमेलवाल्ड ते म्युरेन असा होता. केबल कार मधे हाउन्स फुल्ल गर्दी होती. मी मोबाईलने चित्रीकरण करण्यासाठी दरीच्या बाजूला कोपर्‍यात जागा पकडली. ( या कार मध्ये " अकेले अकेले कहा जा रहे हो " या गीताच्या एका अंतऱ्या चे शूटिंग आहे) वर जाउन लागलो तसे दरीचे हिरव्यागार सुशोभित परिसराचा परीघ नजरेत सामावू लागला. घरे काड्या पेटीसारखी दिसायला लागली. दरीत पार इथून तिथे वाहणारी लांबलचक नदी एखाद्या दोरी सारखी पसरलेली दिसत होती.

स्टेचेल्बर्ग हे २८०० फूट उंचीवर तर गीमेल्वाल्ड चा टप्पा ४४०० फूटावर आहे. इथून ५३०० फुटावर म्युरेन आहे. गीमेलवाल्ड किंवा म्युरेन मधे कुठेही उभे राहिले तरी आयगर , माँक व युन्ग्फ्राउ या त्रिदेवांचे भव्यतेचा अनुभव घेता येतो. ( हिमालयातील शिखरांपुढे मात्र ही बाळे शोभतील. ) .

गीमेल्वाल्ड ला पोहचल्यावर एकच मिनिटात पुढचा टप्पा चालू झाला व तीन चार मिनिटातच म्युरेनच्या फलाटाला लागलो. दरम्यान कळून आले होते की मोबाईल मधे ले कार्ड फुल झाले आहे. आता आली का पंचाईत. सुदैवाने लूझर्न मधे घेतलेले १६ जी बी चे कार्ड बरोबर आणले होते.माझ्या मोबाईल मधे कार्ड बदलण्यासाठी एका पिन ची आवश्यकता असते. मोबाईल नवीनच असल्याने ते कसे बदलायचे हे ही समजत नव्हते. एक उपाय म्हणून तिथे एक अण्णा व त्यांची पत्नी दिसले. तिने आपल्या जवळची सेफ्टी पिन वापरून मिनिटात कार्ड बदलून दिले. तूनळीवरचे व्हिडिओ पाहून म्युरेन गावातून चक्कर मारायचीच असे मनाशी पक्के ठरवले होते. आत फोटो काढायला बक्कळ मेमरी पण जवळ होती. दोघेही बाहेर पडलो. म्युरेन गाव हे दरीच्या इतके कडेला वसले आहे ही तिथे क्रिकेट खेळले सिक्सर खाली तीन हजार फूट दरीत जाईल. समोर दरीच्या पलोकडच्या भिंतीवर ढग पांघरूण घालून होते. त्रिदेवाचे दर्शन घदत नव्हते. झेरमाटचा अनुभव येथेही येत होता. ढग नगाधिराजाची द्रुष्टीभेट आमच्याशी घालून द्यायला तयारच होईनात. मुरेन गाव मात्र फारच आटोपशीर व सुरेख. गावात वहानांची रहदारी नाहीच. मुख्य रत्याच्या आजूबाजूना दुमजली घरे कम होटेल्स. अंगणात काही ठिकाणी बर्फ अजूनही न वितळलेल्या अवस्थेत. काही घरांच्या छपरावर बर्फाचे पॅचवर्क पहुडलेले.

गावातून भटकत असताना पहाडांच्या बाजूला जवळ जवळ ४५ अंशाचा चढ व त्यावर तितकाच तिरका पूल दिसला. तो एका रेल्वेचा पूल होता. गुगल अर्थ मधे पाहिले तर ती एका खाजगी कंपनीने चालवलेली रेल्वे आहे. रेलेवे कसली रेल्वे जिना. एकूणच स्वीसमधे पर्वतांवर जिथे मिळेल इथे हिरवळीतून मनसोक्त पायी फिरणे , सायकलींग करणे वा केबल कार व रेल्वे व रस्ते यांची एकच एक गुंफण असते. जगातून तरूणाई अनेक साहसी खेळांमधे भाग घेण्यासाठी येते . जिथे अजून मुलभूत प्रश्नच पुरेसे सुटलेले नाहीत ते थर्ड वर्लड मात्र यात पार मागे आहे.

म्युरेन गावातून फिरत फिरत जाणे हे माझे स्वप्न पूर्ण झाले पण.... पण समोरचे तीन पर्वत दहा टक्के ही दिसले नाहीत. मे महिना या स्वीसला येण्यासाठी फारसा योग्य नाही हा त्याचा अर्थ आहे. कदाचित जून १५ चे दरम्यान आल्यास बर्फ व मोकळे आकाश यांचा संगम दिसू शकेल. खाली उतरताना दहा मिनिटात ३००० फूट खाली आलो. लगोलग इंतरलाकेनला पोहोचलो. आमची इसेल्टवाल्ड ला जाणारी बस हुकली होती. एक तास आता स्टेशन बाहेर टाईम पास करायला लागणार होता. थंडी फारच वाजू लागली. आत उबदार असलेल्या कक्षात जाउन बसलो. मग स्टेशनसमोर असलेल्या सी ओ ओ पी मॉल ला भेट दिली. काही फळे विकत घेऊन बाहेर आलो. बस आली व आम्हाला घेऊन इसेल्टवाल्डच्या मार्गाला लागली. उद्या इंटरलाकेन सोडून आम्हाला जिनेव्हा गाठायचे होते.

क्रमश:

प्रतिक्रिया

निशाचर's picture

28 Mar 2020 - 7:25 pm | निशाचर

अरे वा!
बर्‍याच दिवसांनी मिपावर आले आणि शामभट्टांनी पुढचा भाग टाकलेला पाहून आनंद वाटला. सावकाश वाचून पुन्हा प्रतिसाद देईन.

बरीच माहिती काढून गेलात हो. फोटो नसले तरी वर्णन आवडले.

प्रचेतस's picture

29 Mar 2020 - 4:43 pm | प्रचेतस

वर्णन खरेच खूप छान आहे, छायाचित्रांची कमतरता जाणवली नाही. पुढचे भाग पण येऊंद्यात काका.

कुमार१'s picture

29 Mar 2020 - 8:50 pm | कुमार१

वर्णन खरेच खूप छान आहे.

Nitin Palkar's picture

30 Mar 2020 - 7:50 pm | Nitin Palkar

या आधीचे भाग शोधून वाचण आलं...

जीएस's picture

31 Mar 2020 - 1:57 pm | जीएस

>>>>>> म्युरेन गावातून फिरत फिरत जाणे हे माझे स्वप्न पूर्ण झाले पण.... पण समोरचे तीन पर्वत दहा टक्के ही दिसले नाहीत. मे महिना या स्वीसला येण्यासाठी फारसा योग्य नाही हा त्याचा अर्थ आहे. कदाचित जून १५ चे दरम्यान आल्यास बर्फ व मोकळे आकाश यांचा संगम दिसू शकेल.

स्वित्झर्लंड्मध्ये ढगाळ हवा/पाउस कधीही असू शकते. चार दिवस राहण्याचे नियोजन केले तर किमान एक दिवस निरभ्र मिळू शकतो, त्या दिवशी डोंगरावर जावे.

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2020 - 11:35 am | चौथा कोनाडा

व्वा, रोचक भटकंती ! मस्त वर्णन आहे. एअरफोर्स कमोडोर यांचा किस्सा भारी आहे, मदतीचा हात पुढं करणारे असे लोक कायम आठवत राहतात.
सी ओ ओ पी मॉलचा उल्लेख वाचून पुण्यातलं सीओईपी आठवलं. मॉल काढायला लावणारी इंजिनियरिंग बेकारी एवढ्या लवकर कशी काय असा विनोदी विचारही येऊन गेला मनात.
(विसू: या स्थळांचे आंजावरील फोटो लेखसोबत चिटकवायला हटकत नव्हते)

चौकटराजा's picture

1 Apr 2020 - 11:55 am | चौकटराजा

पुढच्य भागात गुगल स्ट्रीट व्हू चा उपयोग्य करून तसे करणार आहे !

चौथा कोनाडा's picture

3 Apr 2020 - 11:41 am | चौथा कोनाडा

व्वा ! एक नंबर होईल !

जालिम लोशन's picture

1 Apr 2020 - 4:08 pm | जालिम लोशन

सुरेख