जावे फेरोंच्या देशा - भाग ६ : कैरो ते आस्वान रेल्वे मधून

Primary tabs

कोमल's picture
कोमल in भटकंती
6 Oct 2019 - 2:34 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४


२१ सप्टेंबर २०१८
बहारियाहून निघालेली बस ६ तासांनी कैरोला पोहोचली. वाटेत महमूदचा फोन येऊन गेलेला. तो म्हणाला होता "गिझाला पोहोचल्यावर फोन करा. गाडी पाठवतो". त्याप्रमाणे बस गिझा स्टँड वर थांबली आणि आम्ही उतरून त्याला फोन केला तर तो म्हणाला, "तुम्हीच टॅक्सी करा मी आल्यावर पैसे देतो". बस स्टॅण्ड च्या बाहेर येतो तोवर १०-१५ टॅक्सी चालकांनी गराडा घातला. त्यातल्या एकाला पत्ता सांगितला आणि त्याने अक्षरशः बॅग आमच्या हातातून खेचली आणि त्याच्या गाडीच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मागे आम्ही पळत त्याच्या गाडी पर्यंत पोहोचलो तेवढ्यात दुसऱ्या टॅक्सी चालकाने येऊन पहिल्याला मारायला सुरवात केली. त्यांची बेदम मारामारी सुरु झाली. आमची बॅग त्याच्या डिक्कीत, त्यामुळे आम्ही तिथून निघू शकत नव्हतो. १५-२० मिनिटांनी दोन-चार दात प्रत्येकी पडल्यावर आमच्या टॅक्सीवाल्याने बॅग काढून आमच्या ताब्यात दिली, 'didn't wanted you to see this' असं पुटपुटतं तो निघून गेला. बाकीचे लोक अजूनही तसेच होते मात्र या वेळी कोणी बॅग हातातून घ्यायला धजावलं नाही. थोडं मागे चालत येऊन दुसरी टॅक्सी हाकारली. महमूदला फोन लावून नव्या टॅक्सी चालकाशी बोलायला लावलं आणि अवघ्या १५ मिनिटांत आम्ही आमच्या हॉटेलच्या खाली येऊन पोहोचलो. 

महमूद येई पर्यंत आम्ही अंघोळलो, चहा घेतला आणि रिसेप्शनिस्ट सोबत Ki & Ka बघत बसलो. थोड्या वेळाने तो आला. त्याला झाल्या प्रकारचं इत्थंभूत वर्णन केलं. सगळी ट्रीप उत्तम झाल्यानंतर संध्याकाळच्या प्रकाराने त्याला गालबोट लागलेसे झाले. महमूदने अजून एक चहा आणि फलाफल सॅन्डविच मागवले. एव्हाना सात वाजत आले होते. आमच्या ट्रेनची तिकिटे घेऊन त्याचा निरोप घेतला. खाली येऊन परत टॅक्सी केली आणि २० मिनिटांत रॅमसिस रेल्वे स्टेशन वर पोहोचलो.

आमची गाडी नं ८८ हि स्पॅनिश बनावटीची एक्सप्रेस ट्रेन होती. संध्याकाळी ८:३० ला कैरो वरून निघून गिझा-लक्सॉर-इस्ना-इडफू-कोम ओम्बो करत सकाळी १०:३० ला आस्वानला पोहोचणारी होती. कैरो वरून दक्षिणेला जायला टॅक्सी किंवा बस हे पर्यायसुद्धा आहेत पण रेल्वेने प्रवास करायची मज्जाच वेगळी अशा विचारसरणीची मी असल्याने शक्य असेल तेव्हा रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. परदेशातील रेल्वे सुविधेची ओळख करून देणारी https://www.seat61.com मला फार उपयोगी पडली. 

भारताप्रमाणेच मिस्र मध्येही रेल्वे ची पायाभरणी इंग्रजांनी केली. मात्र भारतासारखं इथं रेल्वेचं जाळं पसरलेलं नाही. कैरो ते अ‍ॅलेक्झांड्रिया/पोर्ट सैद/ मरसा मत्रुह/ दमाईत / अल मन्सूरा / सुवेझ या बंदरांपर्यंत आणि कैरो ते आस्वान अशा मोजक्याच मार्गांवर कैरो रेल्वे धावते.

रॅमसिस स्टेशन मात्र, मेट्रो आणि रेल्वेचं सगळ्यात महत्वाचं जंक्शन. स्टेशन तसं छान. प्रकाशमान. माहितीचे बोर्ड जागोजागी लावलेले. गाडयांची स्थिती सांगणारे डिजिटल डिस्प्ले. स्टेशनचा अंतर्भाग वातानुकूलित. पण प्लॅटफॉर्म वर पोहोचलात कि सगळीकडे सिगारेटच्या धुराचे ढग. रेल्वेच्या आत आणि स्टेशनच्या आत मज्जाव असलेल्या सिगारेटला फलाटावर मोकळीक होती. त्यामुळे सगळे अखंड तिचा आस्वाद घेत होते. सिगारेटच्या धुराच्या ऍलर्जीमुळे माझी अवस्था फार वाईट झाली होती. अखेरीस ८:१५ ला ट्रेन आली आणि बरोब्बर ८:३० ला निघाली. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा आता जाणवू लागला होता. कैरो पासून निघालेली गाडी गिझाला पोहोचायच्या आधीच आम्ही ढाराढूर झोपलो. 


२२ सप्टेंबर २०१८

सकाळी ६:३० च्या सुमारास जाग आली. एका सुंदर दिवसाची सुरुवात झाली होती. उजव्या बाजूला नील नदी, तिच्या पलीकडे हिरवीगार शेती, डाव्या बाजूला उंच बोडके डोंगर, डोंगरांच्या मधील सखल भागात वाळवंट. असं परस्पर विरोधी दृष्य आम्हाला पुढेपण बऱ्याच वेळा दिसलं. कैरो आस्वान रेल्वे लाईनला सोबत करत होता कैरो आस्वान हाय वे. खजुराची पळती झाडे पाहत पाहत १०:१० पर्यंत आस्वानला येऊन पोहोचलो. गाडीच्या डब्यातून खाली उतरल्या बरोब्बर गरम हवेच्या भपकाऱ्याने आम्हाला जागीच उभं केलं. कैरो नाईल डेल्टा मध्ये, त्यामुळे तिथे तापमान कमी असतं. आस्वानला पण नाईल आहे पण वाळवंट जास्त त्यामुळे इथे कैरोपेक्षा ५-६ °C तापमान जास्त असतं आणि ते पटकन जाणवतं सुद्धा.

नीलचा नजारा(रेल्वे मधून)

रेल्वेचा अंतर्भाग

आस्वान रेल्वे स्थानक

स्टेशन पासून १०-१५ मिनिटांवर आमचं हॉटेल होत. Nile Hotel, Cornish. नाईल च्या बाजूच्या रस्ताला कॉर्निश म्हणतात. रस्त्यालगतच आमचं हॉटेल छोटं पण छान होतं. Nile Facing अशी रूम तर भन्नाट होती. समोरच नाईल मधील एलफन्टाईन बेट दिसत होत,नदीमध्ये बऱ्याच क्रूझ उभ्या होत्या, छोट्या बोटी इकडून तिकडं फिरत होत्या. एकंदरीतच निवांत शहर आहे आस्वान. 

नीलचा नजारा(हॉटेल मधून)

नीलचा नजारा(हॉटेल मधून)

आधी फ्रेश होऊन मग दुपारचा वेळ आरामात घालवू असं ठरवलं. ४०-४२° मध्ये काय फिरणार म्हणा. संजयचा मित्र आयमन आठवत असेल तुम्हाला. त्याचा भाऊ मुस्तफा. संजयने मुस्तफाचा नंबर दिला होता, आम्ही येणार याची त्याला पण कल्पना दिली होती. त्याला फोन करून सांगितलं कि आम्ही आस्वान मध्ये दाखल झालो आहोत. संध्याकाळी भेटूया असं ठरलं. दुपारची भूक भागवण्यासाठी कॉर्निश वरील KFC मध्ये आसरा घेतला. टेस्ट वेगळी होती पण छान होती. उन्हाने मात्र आम्हाला नको करून सोडलेलं. हॉटेल मध्ये परत येऊन संध्याकाळची वाट बघत बसलो. 

५ वाजता उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर आम्ही खाली येऊन कॉर्निश वर फेरफटका मारत बसलो. गरम हवेच्या झुळूका वाळवंटावरून नदीपार करत आमच्यावर येऊन थडकत होत्या. एका बाजूला नील दुसऱ्या बाजूला फारशी रहदारी नसलेला रस्ता. मधल्या रुंदशा फुटपाथवर बाकड्यांची सोय. फार छान वाटत होतं. थोड्या वेळाने मुस्तफा आला आणि त्याच्या आणि आयमनच्या दुकानात घेऊन गेला. "आयमन सकाळी दुकान सांभाळतो आणि मी संध्याकाळी येतो." मुस्तफाने आमच्या मनातल्या न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. थोड्याच वेळात त्याने इजिप्ती चहा आणून दिला, संजयची विचारपूस केली  आणि गप्पांचा सिलसिला सुरु झाला.

सध्या दुकान वगैरे सांभाळत असला तरी मुस्तफा आणि त्याचे वाडवडील कलाकार. इजिप्तच्या इतिहासातील कोणतीही गोष्ट, मूर्ती, वस्तू दगडांत घडवण्यात त्याच्या आजोबांचा आणि वडिलांचा हातखंडा. मुस्तफा मात्र चित्रकारी, फॅब्रिक प्रिंटिंग, आणि वजनाने हलक्या अश्या वस्तू फायबर पासून बनवण्यात पटाईत. त्याने बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन फिनलँड मध्ये ३-४ वर्षे होतं. पण इजिप्तच्या प्रेमात असलेल्या मुस्तफाला फिनलँड फार भावला नाही आणि वर्षभरातच तो पुन्हा इजिप्तला परत आला आणि लग्न करून आस्वान मधेच स्थायिक झाला. त्याची सध्याची कामं, बायको-मुलं, आई-वडील असे झपाट्याने विषय बदलत आम्ही भरपूर गप्पा मारत होतो.

हळू हळू राजकारणाच्या गोष्टी सुरु झाल्या आणि मी माझा खास ठेवणीतला प्रश्न त्याला विचारला, "मुबारक यांची सत्ता गेली त्याचा आस्वान वर काय परिणाम झाला?"
"मुबारक होते तोवर ठीक सुरु होतं सगळं असं नाही. जनतेचे प्रश्न तेव्हाही होते. पण आत्ताची परिस्थिती तेव्हा पेक्षाही बिकट आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. उद्योगधंदे नाहीत. पूर्वी नुसत्या पर्यटनावर इजिप्तची अर्थव्यवस्था भक्कम उभी होती. बांधकाम विश्व पसरत होतं. आता तर कित्येक वर्ष बांधून ठेवलेल्या इमारती पण नीट विकत नाहीत."
हातातल्या सिगारेटचा मोठ्ठा झुरका मारत तो म्हणाला. "मुबारक चांगल्या योजना आणायचे. शेतीसाठी सुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. पण आता सरकार लष्कराला आणि धार्मिक गोष्टींना सगळा पैसे वापरतं त्यामुळे सामान्य नागरिकाला काहीच मिळत नाही. २०११ नंतर इजिप्त कित्येक वर्ष मागे लोटला गेला आहे हे नक्की." मुस्तफा हताश होत म्हणाला. 
आणि माझा इजिप्तच्या सत्तापालटाचा अंदाज खरा ठरला. बरेच लोक याबद्दल नाखूश होतेच आणि नवीन सरकारचे सगळेच काही आलबेल सुरु होते असं पण नव्हे. 
"पण गेल्या १-२ वर्षात पर्यटनाने परत जोर पकडला आहे ना. होईल सगळं पूर्ववत." मी म्हणाले. 
"इन्शाल्ला!" एवढे बोलून मुस्तफा दुसऱ्या सिगारेटला पेटवण्याचा मागे लागला. 

५:३० वाजता सुरु झालेल्या आमच्या गप्पा १०:३० वाजता भुकेच्या जाणिवेने खंडल्या. नील नदी वरच्या एका बोटीतील रेस्टारंट मध्ये आम्हाला सोडून मुस्तफा घरी गेला. चविष्ट नुबीयन जेवण मागवलं. आईश, हम्मुस, भात, बटाट्याची भाजी आणि गरमा गरम उम्म अली. जेवण करून नदीच्या कडेने चक्कर मारत आम्ही हॉटेल वर परत आलो. निवांत आस्वान मधील पहिला दिवस मस्त निवांत गेला. 

नुबीयन जेवण

5 Terre

उम्म अली


क्रमशः

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

6 Oct 2019 - 2:57 pm | जेम्स वांड

एकच नंबर सुरू आहे, पिरॅमिड अन ममीजच्या देशाबद्दल कितीही वाचलं तरी कमीच, त्यामुळे संजुभाऊंच्या लेखांचीही वाट पाहत असे अन आता तुमच्या लेखांचीही आतुरतेने वाट पाहत असतो ताई, जबरी सुरू आहे मालिका, पुढील भागांच्या प्रतिक्षेत

पिरॅमिड अन ममीजच्या देशाबद्दल कितीही वाचलं तरी कमीच

खरं आहे. सतत नविन काहीतरी वाचायला मिळतं. रहस्यमय देश आहे अगदी.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे भौ _/\_

प्रचेतस's picture

7 Oct 2019 - 9:11 am | प्रचेतस

अगदी अगदी.
हेच म्हणतो.
ह्या देशाबद्द्ल जितके वाचावे तितके कमीच.

मस्त सुरू आहे सफर. फोटो आवडले.

कंजूस's picture

6 Oct 2019 - 5:58 pm | कंजूस

मलाही आवडते रेल्वे. पण स्थानिक सामान्य लोक प्रवासी हवेत. बोलणे भाषेची अडचण झाली तरी मजा येते.

ट्रिप आवडत आहे.

जेम्स वांड's picture

6 Oct 2019 - 7:59 pm | जेम्स वांड

आधी मज्जा असायची रेल्वेत गप्पांचे फड जमत, घणाघाती चर्चा होत मग त्यावर उतारा म्हणून डब्यातल्या खाऊची देवाणघेवाण होई, पुस्तके अदलाबदल होत प्रवासापूर्ती, आजकाल मात्र एसी 1 मध्ये जा किंवा स्लीपरमध्ये जिथे पाहावं तिथे माणसे मोबाईल मध्ये डोकं टाकून आपली काहीतरी करत बसलेली दिसतात संवाद तुटतोय कुठंतरी असं सतत वाटत राहतं.

जॉनविक्क's picture

6 Oct 2019 - 11:20 pm | जॉनविक्क

लवकरच मिळो इंशाअल्ला! :)

अनिंद्य's picture

7 Oct 2019 - 10:32 am | अनिंद्य

मस्त सफर.
रेल्वेचा प्रवास आणि 'जनसुविधा/टॉयलेट' त्या-त्या देशाची खरी प्रतिमा दाखवतात असे माझे मत.
टॅक्सीवाल्यांची मारामारी एन्जॉय केली :-)

पु भा प्र

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2019 - 5:04 pm | चौथा कोनाडा

हे वाचून मलाही इथं जावसं वाटू लागलंय !

एक नंबर वर्णन आणि फोटोज !
लगे रहो कोमल जी !

कोमल's picture

7 Oct 2019 - 7:01 pm | कोमल

सगळ्यांचे अनेक आभार.
@जॉनविक्क, @चौथा कोनाडा लवकरच तुमचे प्रवासवर्णन वाचायला मिळो हीच इच्छा.

सुधीर कांदळकर's picture

10 Oct 2019 - 7:27 am | सुधीर कांदळकर

रेलवे आतून छान दिसते आहे. पण फलाटापासून गाडी जास्त दूर धोकादायक वाटते आहे. २०११च्या आणि आताच्या ईजिप्तची तुलना आवडली. नुबियन जेवण छान दिसते आहे. धन्यवाद.

जालिम लोशन's picture

13 Oct 2019 - 10:27 pm | जालिम लोशन

फुडवर पण तुम्हाला वेगळी लेखमाला काढता येईल. आणी तीपण सुपर हिट होईल.