अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ६ - ( सुरुवात करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचे.)

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
30 Sep 2019 - 8:59 pm

अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०
- भाग - १
- भाग - २
- भाग - ३
- भाग – ४
- भाग – ५
- माझे लेखन

बाजारात गुंतवणूकदार आणि ट्रेडर असे दोन गट कार्यरत असतात. त्याच बरोबरीने ट्रेडिंग अधिक गुंतवणूक करणारा तिसरा गटदेखील जोरदार कार्यरत असतो. मुख्यत्वे स्विंग ट्रेडर हे ह्या तिसऱ्या गटात मोडतात. म्हणजे ट्रेडिंगमध्ये जमा झालेले पैसे हे गुंतवणुकीसाठी वापरणारे ! शक्यतो एकदा मार्केटला लावलेले पैसे वाढवत रहाणे ह्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठीची त्यांची वैयक्तिक गणिती व्यूहरचना असते. ग्रोथकडे लक्ष असते. गुंतवणूक आणि ट्रेड किंवा पैसा हा कायम वेळेशी निगडीत असल्याने त्यांचे वेळेकडे लक्ष असते. कुठलाही धंदा – व्यवसायामागे वेळेचा रेटा जोरदार असतो. जेव्हा एखादा ट्रेडर महिन्यातले सरासरी २२ पैकी १० ट्रेड करतो आणि ९ ट्रेडमधून मिळवलेले पैसे १० व्या ट्रेडमध्ये घालवतो तेव्हा त्या ९ ट्रेडसाठी दिलेला वेळ वाया जातो. पैसा एकवेळ परत आला तरी गेलेला वेळ परत येत नाही. मग पुन्हा नव्याने सुरवात नवा वेळ देणे क्रमप्राप्त होते.
त्यामुळे गेलेला वेळ हा खरा लॉस असल्याचे ज्या ट्रेडरला समजते तो वेळ आणि पैसा ह्याची यशस्वी सांगड कशी घालता येईल ? ह्यावर विचार सुरु करतो आणि मग यशस्वी (म्हणजे १० /१० ट्रेड बरोबर येण्याकडे ) ट्रेडर होण्याकडे त्याची वाटचाल सुरु होते. (तो यशस्वी होतोच किंवा नाही हा कोलीत होऊ शकेल असा विषय आहे.)
पूर्वी म्हंटल्या प्रमाणे मार्केटमध्ये दोन बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
१) ट्रेंड ओळखणे / निश्चित करणे.
२) खरेदी – विक्रीची योग्य किंमत ठरवणे.

तर, ट्रेंड निश्चितीसाठीची रूढ पद्धत
1. मासिक चार्ट (मंथली) : हा तुम्हाला दीर्घ कालावधीचा ट्रेंड काय आहे ते स्पष्ट करतो.
2. साप्ताहिक (विकली) चार्ट : हा तुम्हाला मध्यम कालावधीचा ट्रेंड काय आहे ते स्पष्ट करतो.
3. दैनिक (डेली) चार्ट : हा तुम्हाला अल्पावधीचा ट्रेंड काय आहे ते स्पष्ट करतो.

वरील सर्व चार्ट एकाच दिशेने वाटचाल करत असतील तर एक मोठी तेजीची लाट संभवते असा कयास काढून खरेदी केली जाते आणि जो चार्ट तुम्हाला दिसतो तो सर्वांनाच दिसत असल्याने (आणि दिसत नसेल तर दाखवणारे असतातच जे विश्लेषक ह्या नावाने ओळखले जातात.) त्यात सर्वच जण उड्या घेतात परिणामी खरेदी म्हणजेच मागणी वाढते आणि तेजीची एक मोठी लाट उसळते.
पण, जर मंथली आणि विकली चार्टवर आगामी तेजीची चाहूल लागत असेल मात्र डेली चार्ट मंदीवर भाळलेला असेल तर, प्रत्येक पडेल भावात शेअर खरेदी करत राहावा असे मानले जाते. तसेच ह्याच्या उलट जर मंथली आणि विकली चार्टने मंदीशी मैत्री केली असेल तर प्रत्येक चढ्या भावात शेअर्स विकत राहावेत असा संकेत आहे.

ट्रेंड निश्चित करण्यासाठी असंख्य टूल्स चार्टसच्या बरोबरीने उपलब्ध असतात. त्याबद्दल पुढील लेखात आपण माहिती करून घेऊ. त्यामुळे जेव्हा केव्हा ट्रेंड ओळखायचा असेल तेव्हा मंथली – विकली – डेली अशी उतरती भाजणी लक्षात असुद्या.

ओ एच एल सी : अर्थात ओपन, हाय, लो, क्लोज हे कसे तयार होतात?
तर, रोज सकाळी ९.१५ मिनिटांनी मार्केटमध्ये पहीला सौदा (खरेदी +विक्री) जेव्हा होतो तेव्हा त्याला ओपन भाव म्हणून संबोधले जाते./strong> तसेच सबंध दिवसात शेअर्सच्या भावातली उच्चतम वाढ आणि नीचतम वाढ हे त्या दिवसभराचे हाय किंवा लो दर्शवतात. दुपारी ३.४० ते ४.०० ह्या काळात ज्या एकाच स्थिर भावाला सौदे होतात ते क्लोजमध्ये गणले जातात. मार्केट जरी दुपारी ३.३० ला बंद होत असले तरी क्लोजिंग सेशन ३.४० ते ४.०० ह्या वेळेतच होते.

हे झाले दिवसासाठी त्याच प्रमाणे आठवड्याच्या / महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.१५ वा. ओपन आणि शेवटच्या दिवशी दुपारी ३.४० ते ४.०० वा. क्लोज तयार होताना आठवड्यातील / महिन्याभरातील उच्चतम भाव आणि नीचतम भाव हे त्या आठवड्यातील / महिन्यातील हाय आणि लो दर्शवतात. हे ओपन – हाय – लो –क्लोज मिळून दिवसभराचा /आठवड्याभराचा / महिन्याभराचा असा एक भाव तयार होतो जो त्या शेअर्सचा त्या कालावधीचा प्रवास दर्शवतो.

ह्या भावाचे चित्ररूप म्हणजेच चार्टस. चार्टसचे विविध प्रकार आहेत. पण आपण त्यातल्या कॅण्डलस्टिक चार्टसबद्दल जाणून घेऊ.

कॅन्डल्सस्टिक

कॅण्डलस्टिक उर्फ मेणबत्ती चार्टींगचा शोध जपानमध्ये लागला म्हणून जपानी कॅण्डल नावाने हे चार्टस ओळखले जातात. अप्पर शॅडो + रियल बॉडी + लोअर शॅडो असे मुख्यत्त्वे तीन भागात कॅण्डलस्टिक विभागली जाते. प्रत्येक शेअरचा उच्चतम भाव हा अप्पर शॅडो दर्शवतो आणि नीचतम भाव हा लोअर शॅडो दर्शवतो असे ढोबळमानाने आपण म्हणू शकतो. पण प्रत्येक शेअरचा वर उल्लेख केल्याप्रमाणेचा ओपन आणि क्लोज हा त्या कॅण्डलस्टिकची रियल बॉडी दर्शवतो. ह्या रियल बॉडी आणि शॅडोचे स्वतःचे अर्थ आहेत. खालील चित्रात कॅन्डल्सस्टिक कशा दिसतात ते दाखवले आहे.
candle stick
ह्या कॅण्डल स्टिक मध्ये जेव्हा क्लोज हा ओपन पेक्षा वर असतो तेव्हा चित्रात दाखवल्याप्रमाणे हिरव्या रंगाची किंवा बुलीश किंवा तेजीची (प्रकाशमान झालेली.) कॅण्डल तयार होते. त्या उलट जेव्हा क्लोज हा ओपनच्या खाली असतो तेव्हा चित्रात दाखवल्याप्रमाणे लाल रंगाची किंवा बेअरीश किंवा मंदीची (विझलेली काळी ) कॅण्डल तयार होते. ह्या चित्रातल्या कॅन्डल्स ह्या केवळ नमुन्यादाखल असून त्यावरून ट्रेंडचा बोध होत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

ह्या कॅण्डलस्टिकसच्या बरोबरीने येणारा आणि आवश्यक भाग म्हणजे ईंडीकेटर्स ह्या सगळ्यांची सांगड घालून आणि वेळोवेळी आणि कौशल्याने ती (सांगड) बदलती ठेऊन केलेला अॅ नालिसिस म्हणजे टेक्निकल अनालिसिस.

पुढील भागात दोजी ह्या कॅण्डलबद्दल जाणून घेऊ.

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

30 Sep 2019 - 9:05 pm | जॉनविक्क

अनिंद्य's picture

2 Oct 2019 - 11:24 am | अनिंद्य

वाचतोय

गोंधळी's picture

2 Oct 2019 - 11:40 am | गोंधळी

पु. भा. प्र.

mestrya's picture

18 Jan 2020 - 3:35 am | mestrya

चालु राहुद्या

वामन देशमुख's picture

7 Jun 2023 - 3:43 pm | वामन देशमुख

पुढील भागात दोजी ह्या कॅण्डलबद्दल जाणून घेऊ.

@ज्ञानव,

पुढील भाग लिहीले नाहीत का?

---
आतापर्यंत लिहिलेले सर्व भाग आवडले. पुढील भाग वाचायची उत्सुकता आहे.