देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा
#टिचभर_गोष्ट
देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा
ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी. एवढ्या पैशात पुढचा आठवडा निभावून जाईल, अशी आशा डोळ्यांत उमटे. सोमवारपासून परत कॉलेज, असाईनमेंटस यात गर्क. ‘चित्र काढून करियर होत नाही,’ म्हणून ज्या घराने तिला सदानकदा हिडीसफिडीस केले, त्या घरातून ती एकेदिवशी निघून जाते, ती माझी पाठची बहिणच नव्हे का?
‘फर्मिनाचे लग्न झालेय’ अशी कुणी आठवण करून दिलीच तर, ‘तिचा नवरा मरण्याची वाट बघतोय’ असं बेदरकार उत्तर देणारा फ्लोरेन्तिनो पन्नास वर्षे तिची वाट पहात राहतो. ज्या गरिबीने हा जीवघेणा दुरावा निर्माण केला, तिच्यावर मात करून श्रीमंत होतो. आयुष्यात बायका येतात, जातात. हा फार्मिनाची वाट बघत राहतो. चौकात बसून गावातल्या प्रेमिकांना रोज संध्याकाळी प्रेमपत्रं लिहून देत राहतो. कितीतरी वर्षे! ज्याने त्याने ती पत्रं आपापल्या प्रेमिकांना दिली, पण त्याच्यासाठी प्रत्येक पत्र जणू फर्मिनासाठी लिहिलेले. वयाच्या ८० व्या वर्षी, जीर्णशीर्ण होऊन कॉलऱ्याच्या साथीत जेव्हा ते दोघे भेटतात, तेव्हा काळ क्षणात थांबतो. काळाला न जुमानता केवळ प्रेमच करत राहणारा, एकतर्फी पत्रं लिहित राहणारा फ्लोरेन्तिनो सारखा प्रियकर कुणाला हवासा वाटणार नाही?
साल्झबर्गच्या Mozartium म्युझिक युनिवर्सिटीच्या प्रांगणात पुरुषभर उंचीचे lyre घेऊन सुरावटींचे नक्षीकाम करणाऱ्या मायकेलपाशी आपण पोहोचलो. त्याच्या टोपीत युरो टाकणार, तेवढ्यात त्याने हसून आपल्याला आपली फर्माईश विचारली. आपण उत्साहाने सांगितले, ‘मोझार्ट, सिंफनी नंबर 40’. म्हणाला, ‘रोज संध्याकाळी lyre वाजवतो. युरोज मिळतात, दाद मिळते, पण फर्माईश मिळत नाही.’ कितीतरी वेळ मनापासून वाजवत राहिला. हळूहळू कानसेन जमले. सर्वांच्या कानात कौतुक होते. डोळ्यांत हसू होते. चेहरे प्रसन्न होते. त्याच्या टोपीत नाणी पडल्याचा आवाज माझे कान टिपत होते. माझ्या चित्र काढणाऱ्या बहिणीचा तो भाऊच नव्हता का?
एके रात्री अमृता येते आणि अफरोजबद्दल सांगून जाते. बर्कले स्ट्रीटवर बसून आपल्या antique टाईपरायटरवर कविता लिहून देणारी अफरोज. या टाईपरायटरवर डिलीटची सोय नाहीच. एकदा टंकिले ते टंकिले. ‘Ask me for a poem’ असा बोर्ड लावून, मागेल त्या विषयावर सार्थ, जिवंत कविता लिहून देणारी अफरोज मला बाजारू वाटत नाही. धाडसी वाटते. जगण्याच्या धबडग्यात कवितेला ओवणारी रिव्हर्स बहिणाबाई वाटते.
ग्रहणवेळा वाईट समजल्या जातात. पण ग्रहण लागलेल्या चंद्राकडे पहात रात्र जागवणारे, दूरस्थ प्रेमाची आठवण काढत ग्रहणकळा सोसणारे, मोक्षकाल येताच झोपी जातात. तसेच, देवाघरचे देणे घेऊन आलेल्या या कलावंतांची, माणसांच्या जगातली ग्रहणवेळ संपून, मोक्षकाल लागेल तेव्हा माझ्यासारखे दाराबाहेरचे रसिक निश्चिंतपणे झोपी जातील.
-शिवकन्या
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा! केवळ.
सुंदर. खासच.
उत्तम !!!
नि:शब्द :)
+1
मुक्तक आवडले.
सुरेख लेख. ....
सर्व रसिक वाचकांचे आभार.
अप्रतिम आहे
खुप सुरेख!
सुंदर! खूप आवडलं.
क्या बात है
काळजाला
मस्तं लिहिलं आहे !
अह्ह्हा,
आयुष्य पाहून आहेस एकंदरीत!
अभ्या भौ
ज्या काळी
एक नंबर लेखन
जबरदस्त हृदयस्पर्शी लिखाण.