फिजिक्स चं ग्रामर: कर्ता(Doer), कर्म(Object) आणि क्रिया(Actions)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
26 Jan 2019 - 6:09 pm

पुन्हा विक्रमामधला न्यायनीतीवान प्रशासक जागा झाला होता. झालं काय होतं की त्याच्या राज्यात असलेल्या जंगली प्रदेशांमध्ये आणि त्या लगतच्या शेतीमध्ये आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या होत्या. आता या आगी कोण लावतं हे कळायला मार्ग नव्हता. म्हणजे हे चुकून होतंय की कोणी मुद्दाम करतंय हे लक्षात येत नव्हतं. शिवाय नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा ते वणवे लागू शकतात. पण जर कोणी हे मुद्दाम करत असेल तर त्याचा तपास करणं गरजेचं होतं. कोणी(Who) केलं? कुठे(Where) केलं? कसं(How) केलं? त्यातली पद्धत काय, साधनं काय (What)? मुख्य म्हणजे कशासाठी(Why) केलं हे सगळं पहायाची गरज होती. तरंच घटनांच्या मुळाशी जाणं शक्य होतं. विक्रमाचं डोकं या 5W आणि H चा गुंता सोडवण्यात व्यस्त होतं.

"खरंच बाबा, देवाने काहीही करावं, पण न्यायनीतिवान राजा करू नये कोणाला..नाहीतर तुझ्यासारखी गत होणार.. सतत विचार, सतत लोकांची परीक्षा, पुन्हा परीक्षा, पण काय रे विक्रमा गुन्हे शोधण्यात ठीक आहे हे सर्व कोणी केलं, कुठे केलं, का केलं, कधी केलं शोधणं.. पण फिजिक्स मध्ये अशी गरज पडते का रे?"

"फिजिक्स वापरून घटनेच्या मुळाशी, त्याच्या कारणाशी जायचं असेल तर कर्ता(doer)-कर्म(object of action) आणि क्रिया(action itself) शोधावीच लागते. आता हे बघ. क्रिकेटची मॅच रंगात आलीये. बॅट्समन ने खेळायला म्हणून बॅट पुढे केली. पण बॉल थोडा स्पिन झाला. बॅट्समनचा अंदाज चुकला आणि बॅटच्या एका कडेला घासून बॉल उसळी घेउन गेला आणि विकेट किपर ने डाइव्ह मारून तो कॅच झेलला. आता बॉलरच्या हातातून निघून विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये विसावेपर्यंत बॉलच्या संपूर्ण प्रवासाला किती वेळ लागला? साधारण १ मिनिट पण यातली कर्ता -कर्म -क्रिया पाहूया
१. बॉलरने बॉल टाकला - कर्ता -बॉलर, कर्म कशावर - बॉलवर, क्रिया - हाताने बॉल फेकणे
२. बॅटस्मन बॉल खेळायला गेला आणि साध्या भाषेत एज दिली बॅटची - कर्ता - बॅटस्मन, कर्म-आधी बॅटवर, मग बॅटने बॉलवर क्रिया- बॅट्समन ने बॅट चेंडूला लावली व बॅटची कडा घासून बॉल उसळला
३. विकेटकिपर ने डाइव्ह मारून कॅच घेतला - कर्ता -विकेट किपर, कर्म - बॉलवर, क्रिया - बॉलचा कॅच घेणे"

"अरे बापरे, प्रत्येक बॉलची अशी कॉमेंट्रि करत राहिलं तर लोक क्रिकेटची कॉमेंट्री ऐकणं सोडतील. मॅच संपली तरी कॉमेंट्री चालूच राहिल. संपणारच नाही. पण कायरे विक्रमा निर्जीव वस्तूपण बळ लावतात नारे? मग तिथे कोणता आला कर्ता ?"

"बरोबर आहे वेताळा. फिजिक्स मध्ये बहुतेक यासाठीच थेट आणि सहेतुक बळ (direct application of force or contact forces) आणि अप्रत्यक्ष बळ (indirect application of force or indirect forces) ह्या संकल्पना आल्या असाव्यात. माणसांनी आणि इतर सजीवांनी जाणे, येणे, श्वास घेणे, पाणी पिणे, उडी मारणे एवढंच काय तर शिंकणे, उभं राहणे, बसणे अश्या अगदी सहज क्रिया केल्या तरी त्यात आजूबाजूच्या सॉलिड्स वर, लिक्विडवर किंवा हवेवर बळ लावले जाते. समजा उडी मारली माणसाने पृथ्वीवर तर जमिनीला पाय लावून वर उडला हे झाले प्रत्यक्ष बळ लावणे. पण त्यानंतर तो परत खाली येतो हे झाले अप्रत्यक्ष बळ. माणसाचे वजन(weight) हे अप्रत्यक्ष बळ आहे. घर्षण किंवा घासले जाणे (Static and dynamic friction) हे अप्रत्यक्ष बळ आहे. "

"हो आणि हे सांगायला तुमचे ते नियम पण आहेत नाहीका? काय रे तो ? एकाने ठोसा दिला की समोरचा उलटा ठोसा मारतोच असा काहीतरी?"

"भावना बरोबर आहे, कणाद ‘कार्यविरोधीकर्म’ नावाच्या वैशेषिक सूत्र १-१-१४ मध्ये म्हणतात
वेग: संयोगविशेषविरोधी, क्वचित्कारणगुणपूर्वक्रमेणोत्पद्यते|
कार्य (Reaction) हे कर्म(Motion) ज्या दिशेत होते त्याच्या विरुद्ध दिशेत कार्य करत असते. न्यूटनचा याबाबतीतला नियम आहे
To every action(samyoga) there is always an equal and opposite reaction(virodhi), or the mutual action of the two bodies upon each other are always equal and directed to counterparts."

"अरे हो हो.. ऐकलंय रे या नियमांबद्दल.. पण म्हणजे मला सांग की सगळ्याच बाबतीत कोण्या सजीव माणसाने काही करायचं आणि निर्जीवांनी फक्त प्रतिक्रिया द्यायची एवढंच ते करतात? मला सांग की पावसाचं पाणी टप टप पडतं तिथे कोण ते टाकतं वरून? समुद्राला पौर्णिमेला भरती येते तेव्हा तिथे चंद्रावर कोणी बसलेलं असतं का ओढायला? समुद्रामध्ये लाटा येत राहतात तेव्हा कोण पंखा फिरवत बसतं?"

"वेताळा पावसाच्या पाण्याचं म्हणशील तर पाण्याच्या थेंबांना त्यांचं वजन किंवा गुरुत्वाकर्षण बळच खाली ओढतं. पौर्णिमेला समुद्राला भरती येते ती दोन वस्तूंमध्ये कायम काम करत असणाऱ्या गुरुत्व बळामुळे. पृथ्वीच्या स्वतः च्या अक्षाभोवती फिरण्यामुळे लाटा निर्माण होत राहतात.. "

"पण काय रे विक्रमा हे जे कर्ता, कर्म, क्रिया बोलतोयस ते तर मला फिजिक्स मध्ये ऐकल्यासारखं वाटत नाही..तू काय सांगतोयस हे?"

"वेताळा प्राचीन भारतीय वैशेषिक सूत्रे जेव्हा नऊ प्रकारची द्रव्ये सांगतात तेव्हा हे ओघानेच येतं.. पृथ्वी (solid), आप (liquid), तेज (heat), वायू (gas), आकाश (plasma), काल (time), दिक (space), मन (mind) आणि आत्मा (soul) ही ती द्रव्ये.. त्यातले पृथ्वी, आप, तेज, वायू आणि मन हे प्रत्यक्ष बळ लावतात.. अक्षरश: ढकलतात.. काल, दिक, आकाश व आत्मा हे बळ लावत नाहीत आणि लावूनही घेत नाहीत हे सर्व दृश्य जगताला आधार, संदर्भ देतात आणि सतत फिरत राहतात.. "

"अरे काय सांगतोयस हे.. ऐकायला तर मजा वाटतेय.. पण कुठं लिहिलंय हे?"

"वेताळा, ही वर्णने प्रशस्तपाद यांनी लिहिलेल्या पदार्थ धर्म संग्रह या ग्रंथाच्या तिसऱ्या धड्यात आहेत. पहा जाऊन हवं तर.."

"हो. भाषेत ज्याला कर्म किंवा object म्हणतात ते कळलं.क्रिया म्हणजे ओढणे, श्वास घेणे कळले. पण भाषेत ज्याला subject किंवा कर्ता म्हणतात किंवा doerम्हणतो ते कोण हे क्लिअर नाही? याबद्दल काही बोललेत का प्रशस्तपाद ऋषी? "

"याच पुस्तकाच्या चौथ्या धड्याच्या नवव्या विभागात आत्मा या द्रव्यावर भाष्य आहे.. आत्मा हाच कर्ता किंवा doer असं स्पष्ट लिहिलं आहे..अनेक उपमा देऊन अगदी छान लिहिलं आहे.. "

"पण विक्रमा, चंद्र आणि पृथ्वीतल्या गुरुत्वबलामुळे भरती येते म्हणतोस? कसं काय? एकदा मला सांगाच रे या लाटांविषयी.. म्हणजे पौर्णिमेला लाटाच का उसळतात? डोंगर का नाही उसळत? आणि एखाद्याला या गुरुत्वाच्या कचाट्यातून बाहेर पडायचं तर काय केलं पाहिजे रे ? सांगून टाकरे एकदा ! का यातून सुटका नाहीच हेही सांग .. पण आता मला जायला पाहिजे.. काळ आणि दिशा सतत धावत राहतात किंवा आपण धावत राहतो त्या केवळ आपल्या बरोबर येतात.. अरेरे मी ही तुझ्या सारखाच बोलायला लागलो की !!! जाऊ दे मला मी वेताळच बरा .. तुमचा माणूसपणा तुमच्याकडेच असुदे.. येतो मी विक्रमा.. हा हा हा.. "

(क्रमश:)

मूळकथा: मुखपृष्ठ
या पद्धतीच्या इतर कथा: ८वी पर्यंतचं Physics
कथांची पूर्ण यादी: गोष्टींची पूर्ण यादी (Complete Story List)

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Jan 2019 - 7:49 pm | यशोधरा

भारी! क्रमशः आहे हे उत्तम!