मिपा संपादकीय - आहे मनोहर तरी...

संपादक's picture
संपादक in विशेष
3 Nov 2008 - 1:41 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

ऋषिकेशरावांनी अवघ्या एका दिवसाच्या मुदतीत हा अग्रलेख लिहून दिल्याबद्दल मिपा व्यवस्थापन कृतज्ञता व्यक्त करत आहे...

आहे मनोहर तरी...

बालपण म्हणजे सोनेरी दिवस. प्रत्येकाच्या मनात एक कोपरा त्या सुगंधी आठवणींनी भरलेला असतो. बालपणी केलेल्या मजा, चुका, आलेले अनुभव, खेळलेले खेळ, मित्र, परिसर सारेच रेशमी असते. अर्थात हल्लीची मुलेही त्याला अपवाद नसावीत. मात्र शहरी मुलांचा एक सामान्य दिवस खरंच आनंददायी असतो का? भविष्यातील संधीच्या नावाखाली त्यांचे सोनेरी दिवस अजूनही सोनेरी आहेत का? आधीच्या मुलांशी तुलना करता हल्ली मुलांकडे अनेक विषयांवर भरपूर माहिती असते याचे कारण त्यांना माहिती देणारी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या विचार करण्याची पद्धतीतही फरक पडला आहे. जसे आपल्या लहानपणी हस्तलिखिते असताना काहीही लिहिण्याआधी त्यावर पूर्ण विचार करून मग लिहिले जात असे. आज संगणकयुगात, चूक झाल्यास ती बदलणे सहज शक्य आहे. हा जसा लिखाणासाठी फायदा तसा कृतीआधी पूर्ण विचार करण्याच्या सवयीला खीळही. आधुनिक तंत्रज्ञान, माहितीचा वेग, अनेक विषयांचा भडिमार यामुळे हल्लीच्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना संपूर्णपणे वेगळी चौकट विचारात घ्यावी लागेल. आज अग्रलेखाच्या निमित्ताने हल्लीच्या शहरातील शाळेत जाऊ शकणार्‍या मुलांच्या प्रश्नांकडे पाहणे रोचक ठरावे.

हल्लीच्या मुलांचे विश्व, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडी, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न याचा विचार करण्याऐवजी आपल्या लहानपणीचे प्रश्न त्यांनाही आहेत असे समजून त्याचे उपाय शोधणे चालू आहे असे वाटते. लहान मुलाच्या शिक्षणाची सुरवात सर्वप्रथम होते ती घरात. दोन्ही पालक हे मुलांचे पहिले शिक्षक. बर्‍याचशा सवयी, संस्कार हे घरातूनच होतात. पण त्या लावता येत नाही. या वयात मुले अनुकरणप्रिय असल्याने त्या सवयी पालकांना स्वतःला लावून घ्याव्या लागतात. हल्लीची मुले या शिक्षणाबाबत आधीच्या पिढीपेक्षा जास्त नशीबवान आहेत असे म्हणावेसे वाटते. पूर्वीच्या पालकांमध्ये जी "गप्प बसा" संस्कृती होती ती हळूहळू कमी होते आहे. मात्र त्याच बरोबर पालकांशी कमी संवाद, लहान वयात टीव्ही वगैरे मुळे अवेळी चुकीच्या पद्धतीने समजलेल्या "काही गोष्टी"मुळे जन्माला येणारा अनैसर्गिक रुक्षपणा अश्या नव्या समस्या वाढल्या आहेत. हल्लीच्या शहरी मुलांच्या प्रश्नांमध्ये अत्यंत वेगाने बदल घडत आहेत आणि तितक्या वेगात त्यावर उत्तरे शोधणारी यंत्रणा मात्र आपण हरवून बसलो आहे. बदलत्या समाजव्यवस्थेनेही मुलांचा फायदा करून दिला तसा तोटाही. मुलाला मनातील शंका हक्काने-प्रेमाने मांडायला सतत घरात असणार्‍या आजी-आजोबांचे कमी होणे, भावंडे नसणे हे नव्या कुटुंब पद्धतीतील मोठे तोटे. हे सारे असले तरीही अजूनही भारतात पालकत्व हे आद्य कर्तव्य मानले असल्याने मुलावर संस्काराचे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसतात हेही खरेच.

खेळाच्या मैदानाची कमतरता खरंतर अभाव हा तर या देशातील अतिशय चिंतेचा विषय असायला हवा. नुसते रुक्ष ओसाड माळरान म्हणजे खेळाचे मैदान हा समज पुसणे गरजेचे आहे. विविध खेळांच्या सामग्रीने, तज्ज्ञांनी युक्त अशी किती मैदाने तुमच्या पाहण्यात आहेत? क्रिकेट हा देव असणार्‍या देशातही खेळाच्या तासाला मुलांना संपूर्ण क्रिकेट-कीट उपलब्ध करून देणारी मैदाने-शाळा-कॉलेजे आहेत काय? जर क्रिकेटची ही तर्‍हा तर बाकीच्या खेळांबद्दल काय बोलावे. खेळणार्‍या वयात आपण लाकडी तुकड्याला ब्याट आणि सॉक्सच्या गोळ्याला बॉल म्हणून खेळलो असे अभिमानाने सांगणाऱ्या समाजात मुलाने व्यवस्थित पॅड लावून खेळावे असे ना बापाला वाटत ना सरकारला (किंबहुना प्रत्येक बापाला वाटत नाही म्हणूनच सरकारला वाटत नाही). खेळाचे महत्त्व विशद करणारे अनेक लेख येतात नि जातात. ऑलिंपिक, राष्ट्रकुल स्पर्धेनंतर काही नवी स्टेडियम्स उभी राहतात. आज देशातील लहानग्याला मोठाल्या स्टेडियम्सपेक्षा गावागावातल्या सुसज्ज क्रीडांगणांची अधिक आवश्यकता आहे.

सध्याच्या समाजाने मुलांच्या विश्वातून केवळ क्रीडा हिरावली नाही तर "कला" देखील मुलांना पारखी झाली आहे. इयत्ता ९वी पर्यंत एखाद्या कलेत कल आहे असे दिसूनही, "आता तुमची नाटकं/चित्रं/खेळ/छंद इ. बास झाली, आता दहावीचं वर्ष आहे आता यंदा अभ्यास एके अभ्यास" असं दरडावणारे सो कॉल्ड सुजाण पालक/शिक्षक आणि "पोरीचं कॉलेजात उंडारणं पुरे झालं, आता लग्न कराया हवं" म्हणणारा बाप हे एकाच माळेचे मणी वाटतात. मुलांमध्ये असणार्‍या कलेला शालेय शिक्षणापुढे नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो. "असेना का बारावी, तुला वाळूच्या स्कल्पचर्सची आवड आहे ना! जा तू खुशाल शिबिराला. " असा संवाद काही अपवाद सोडल्यास ऐकू येत नाही. "अरेच्या! तुझ्या शाळेची मॅच आणि स्कॉलरशिपची परीक्षा एकाच दिवशी आहे? बरं तुला काय आवडतं? क्रिकेट? मग झालं तर मॅच पहिली" हे तर स्वप्नरंजन वाटतं. एखाद्या गोड गळ्याच्या विद्यार्थ्याला फक्त "ईशस्तवन गाणारा" म्हणूनच शिक्का बसतो. चित्रकलेचे सर टिचर्सरूम मध्ये सगळ्यात दुर्लक्षित. कोणतेही पालक निकालाच्या दिवशी संगीत शिक्षकांना गाठून "याला "ब" शेरा का दिला? कोणती जागा चुकली? " म्हणून विचारताना आढळत नाहीत. आपण एकाच रंगाच्या, गंधाच्या एकाच साच्यातून निघालेली प्रॉडक्ट्स असे स्वरूप मुलांना दिलं आहे नाही?

बरं सारा समाज शालेय शिक्षणाच्या मागे आहे कारण शालेय शिक्षण उच्च दर्जाचे आहे असे म्हणावे तर तेही नाही. शालेय शिक्षण म्हणजे सरकारी जाहीरनामा झाला आहे. "विज्ञान" आणि "गणित" हेच जगात शिकण्यालायक विषय आहेत आणि बाकी विषय आहेत म्हणून शिकायचे-शिकवायचे अशीच मानसिकता शिक्षक-पालकांत दिसते. गणितात १००/१०० मिळवताना अर्थशास्त्र, नागरिकशास्त्राकडे दुर्लक्ष झालेले चालते. मात्र भूगोलात ४०/४० मिळवून गणितात ७० मिळाले तर तो मुलगा संपला. अनिल अवचट म्हणतात "आपल्या शाळांत आपल्याला सर्वाधिक काय मिळत असेल, तर तो न्यूनगंड". मुलांना काय येतं यापेक्षा काय येत नाही हेच अधोरेखित केलं जातं. सर्वांगीण प्रगती या गोंडस नावाखाली मुलांच्या इच्छांचा, मानसिकतेचा अजिबात विचार होत नाही. बेडूक कापताना मळमळणार्‍या मुलाला बावळट समजले जाते. प्रत्येक जण कोणत्यातरी क्षेत्रात उत्तम आहे हे मुलांना दाखवण्या ऐवजी प्रत्येकजण "सर्वगुणसंपन्न" कसा होईल याच्या मागे धावत सुटला आहे. असे करताना आहे ते कधी निसटून जाते कळतही नाही. या सगळ्याला शिक्षणपद्धती इतकेच जबाबदार सरकारी धोरण देखील आहे. "शिक्षक हा सरकार दरबारी एक मतमोजणी करणारा, दुपारी खिचडी बनवणारा, पेपर तपासणारा, हजेरीपट भरणारा, मुलांना रांगेत शू ला नेणारा, आई-बाप नोकरीला गेल्यावर पोरं सांभाळणारा व हे सगळं ३००० रुपयांत करणारा नोकर झाला आहे. " ज्या समाजात सफाई कर्मचारी १४००० किंवा कॉल सेंटरवाले पाच आकडी पगार कमावतात तिथे शिक्षकांना मिळणारा हा पगार अस्वस्थ करतो. अश्या आकर्षक पगारावर शिक्षण देणारे महर्षी किती तळमळीने मुलांना शिकवतील याची कल्पना तुम्ही करू शकताच.

शालेय शिक्षण, खेळ, कला आदींमध्ये मुलांवर अन्याय करणारा समाज मुलांमध्ये विविध विचारांचे संस्कार घडवण्यातही तोकडा पडत चालला आहे. हल्ली तयार होणारे साहित्य, चित्रपट, नाटके, मालिका यामध्ये लहानांसाठी म्हणून जो काही धुमाकूळ चालू असतो त्यातून मुलांनी काय आणि कसा बोध घ्यावा हा प्रश्न पडतो. बालकविता, जादूंच्या गोष्टी, राक्षसांच्या गोष्टी वगैरे कालबाह्य झाले आहे. फास्टर फेणे नंतर मुलांचा असा कोणी जन्माला येऊ नये याहून शोचनीय काय असावे? बरं मुलांना वाचनाची आवड नाही असे अजिबात नाही जर मुले "हॅरी पॉटर" वर उड्या मारत असतील व मराठीकडे पाठ फिरवत असतील तर त्यांच्या भावविश्वाला साजेसे लेखन होत नाही हेच कारण असावे.

या सगळ्यावर काहीच करता येणार नाही का? तर येईल! हंगेरी सारख्या छोट्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेकडून बरेच शिकण्या सारखे आहे. पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र, समाज आणि सरकार यांची धोरणे लोकाभिमुख असण्यापेक्षा बालकाभिमुख असण्याची गरज आहे. शिक्षणपद्धतीवर नव्याने विचार करणे अनिवार्य आहे. दर सरकारबरोबर पद्धती हवी तशी बदलणे घातक आहे त्यासाठी "संपूर्ण" स्वायत्त संस्था असणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण देताना मार्कां ऐवजी शेरे देणेच योग्य वाटते. इयत्ता पाचवीपासून ऐच्छिक विषय, कला-क्रिडाभिमुख शाळा इत्यादी प्रकार राबवता येतील. पालकांनी मुलाची आवड ओळखून शिक्षणा बरोबर त्याचा असा "एक खेळ आणि एक वाद्य/छंद" मिळवून देणे गरजेचे आहे जे त्याच्या मानसिक आरोग्याला आयुष्यभर साथ देईल. प्रत्येकाने मुलाला भविष्यात कसा "फायदा" करून देता येईल यापेक्षा मुलाला जे करायचे आहे त्यात आपण कशी मदत करू शकू इतकाच विचार करावा. थोडक्यात काय तर स्वतःत असलेला न्यूनगंड मुलांवर थोपवू नका असं आजचे बाल्य ओरडून सांगते आहे. त्या मुलाचे भविष्य त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला जे चांगले वाटते तसे न घडवता त्यांना जे आनंद देते तसे घडू देणे आपल्याच हाती आहे.

मिसळपाव च्या ग्रामस्थांपुढे व तात्यांपुढे प्रस्तावः येत्या बालदिनाचा आठवडा (१० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर) मिसळपाववर "बालसाहित्याचा" आठवडा घोषित करता येईल का? या आठवड्यात मिसळपाववर केवळ लहान मुलांसाठी विविध विषयांवर लेखन करता येईल. तुम्ही नेहेमी जे लिहिता तेच लहानांसाठी लिहायचे जसे कथा, कविता, व्यक्तीचित्रे, अनुभव, प्रवासवर्णन, माहिती, प्रयोग, अगदी पाककृतीदेखील! फक्त अट एकच ते आपल्या छोट्या दोस्तांना कळलं आणि आवडलं पाहिजे.

पाहुणा संपादक : ऋषिकेश.

प्रतिक्रिया

मृदुला's picture

3 Nov 2008 - 2:57 am | मृदुला

लेख आवडला. मुद्देसूद व नेमका झाला आहे.
एक महत्त्वाचा मुद्दा, स्पर्धा, मात्र राहून गेला आहे.
अफाट लोकसंख्या आणि तुलनेने कमी शिक्षण/ रोजगार साधने हेही शोचनीय शिक्षणव्यवस्थेमागचे एक कारण आहे असे वाटते.

बालसाहित्य आठवड्याची कल्पना आवडली.
मी लिहिण्याचा प्रयत्न करेन.

भाग्यश्री's picture

3 Nov 2008 - 3:56 am | भाग्यश्री

वा..अग्रलेख खूप आवडला.. या संदर्भात अजुनही खूप सुधारणा होणे खरंच गरजेचे आहे.
मागचा वि.प्रं.चा अग्रलेख, व पाठोपाठ हा दोन्ही आवडले. अतिशय महत्वाचा विषय आहे..

बालसप्ताहाची कल्पनाही आवडली! :)

टारझन's picture

3 Nov 2008 - 4:36 am | टारझन

ऋषीकेश दादा, तु पुर्ण पणे मिसळ'लेला आहेस हे आज सिद्ध झालं, एका दिवसात एवढं झक्कास लिवलंस .. मानलं बॉ .. बाकी तुझ्या प्रस्तावास आपलं अनुमोदन आहे,

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

चित्रा's picture

3 Nov 2008 - 6:19 am | चित्रा

अग्रलेख खरेच छान उतरला आहे.
पालकांनी मुलाची आवड ओळखून शिक्षणा बरोबर त्याचा असा "एक खेळ आणि एक वाद्य/छंद" मिळवून देणे गरजेचे आहे जे त्याच्या मानसिक आरोग्याला आयुष्यभर साथ देईल.
हा विचार खरोखरच योग्य, पण अनेक पालक करताना दिसत नाहीत.

रामदास's picture

3 Nov 2008 - 7:43 am | रामदास

ऋषिकेशनी चांगल्या अग्रलेखांची परंपरा कायम राखली आहे.अभिनंदन.
विप्रंच्या संपादकीय लेख आणि त्यानंतर हा लेख दोन्ही पालकांना उपयुक्त ठरावेत.

अवांतर: तात्यासाहेब , तूर्तास आपण पालक नसलात तरी विप्र आणि ऋषिकेशनी लिहीलेले संपादकीय दोन्ही लेख वाचून आपला अभिप्राय वाचायला आवडेल.

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 11:35 am | विसोबा खेचर

रामदासभावजी,

अवांतर: तात्यासाहेब , तूर्तास आपण पालक नसलात तरी विप्र आणि ऋषिकेशनी लिहीलेले संपादकीय दोन्ही लेख वाचून आपला अभिप्राय वाचायला आवडेल.

अभिप्राय हाच की दोन्हीही अग्रलेख सुंदर आहेत.. ऋषिकेशने खूपच छान अग्रलेख लिहिला आहे तेव्हा त्याचं निश्चितच कौतुक आहे आणि विप्रचे तर साला आपण फ्यॅनच आहोत... :)

हा आमचा प्रभूमास्तर एक नंबर मिश्किल अन् पोचलेला समुपदेशक आहे... :)

आपला,
(विप्रसरांचा लाडका विद्यार्थी) तात्या.

अवांतर -तूर्तास तर नाहीच परंतु भविष्यातही आमचा पालक व्हायचा विचार नाही. आम्ही आहोत ते सुखी आहोत. माझी बायको, माझी मुलं, त्यांचं कसं होणार इत्यादी मोहपाशात मला अडकायचे नाही! :)

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 1:13 pm | विनायक प्रभू

आपल्या निर्णयाचा पुनः विचार करा. त्या फोटू मधील वैनीची अशी निराशा करु नका.कुणातरी समुपदेशकाच्या पोटावर पाय आणु नका.किंवा
आपण २० मिटीग करुन सगळे कागदोपत्री लिहुन काढु. म्हणजे समुपदेशकाला फाट्यावर मारायला तुम्ही मोकळे. नाही तरी ते सगळे काही बाही बरळतात. कोणाला काही समजत नाही.

मदनबाण's picture

3 Nov 2008 - 7:55 am | मदनबाण

लेख आवडला..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

यशोधरा's picture

3 Nov 2008 - 8:07 am | यशोधरा

संपादकीय अतिशय आवडले.

सहज's picture

3 Nov 2008 - 8:17 am | सहज

प्रभुसरांच्या अग्रलेखानंतर लगेच मुलांच्या शालेय जीवनावर उत्तम लेख.

शहरी मुलांबद्दल म्हणशील तर आजचा शहरी पालक बर्‍यापैकी [पुर्वीच्या मानाने] जागरुक झाला आहे. तसेच बर्‍याच संधी देखील उपलब्ध आहेत. खरे तर शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्स हा देखील एक मोठा धंदा झाला आहे. :-) पण तु मांडलेला मुद्दा की परत पालकांची झुंडीची मानसीकता तशीच आहे म्हणजे शालेय शिक्षणाबरोबर सोमवार ते रविवार वेगवेगळ्या क्लासेस ना पाठवले जाते. परत त्यांना भरडून काढले जाते.

बाय द वे, आर. दाभोळकर नावाचे एक नवे प्रतिभावान बालसाहित्यकार माहीत आहे.

रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. सर्व क्षेत्रात पुरेसा पैसा येउ लागेल तेव्हा पालक, मुलांना आपणहून इतर क्षेत्रांची निवड करण्यास विरोध करणार नाहीत.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2008 - 8:23 am | प्रकाश घाटपांडे

आधुनिक तंत्रज्ञान, माहितीचा वेग, अनेक विषयांचा भडिमार यामुळे हल्लीच्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना संपूर्णपणे वेगळी चौकट विचारात घ्यावी लागेल

नक्कीच आजी आजोबांच्या वस्तु ही चौकट विचारात घेउन केलेली निर्मिती आहे.
बालसाहित्याची कल्पना चांगली आहे. फक्त ज्यांच्यासाठी हे साहित्य आहे त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजे. एकदा मटाचे संपादक गोविंद तळवळकर यांनी कुणाच्या तरी साहित्याला बालसाहित्य असे हिणवले होते.त्यावेळी त्यांच्या विद्वत्तेची नशा उतरवणारे अनेक प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरातून आल्या होत्या.
उत्तम संपादकीय. हंगेरी विषयी पुढ कवातरी लिवा.
प्रकाश घाटपांडे

विनायक प्रभू's picture

3 Nov 2008 - 9:43 am | विनायक प्रभू

तुम्ही हंगेरी त का? अरेरे ,मला वाट्ले चला कोणीतरी साथीदार मिळाला टोपल्या उचलायला.
उत्तम लेखाबद्द्ल अभिनंदन

ऋषिकेश's picture

3 Nov 2008 - 9:47 am | ऋषिकेश

तुमच्यासारख्या या विषयातील तज्ज्ञाला लेख आवडल्याचे वाचून बरे वाटले. धन्यवाद :)

-(मुंबईकर) ऋषिकेश

मुक्तसुनीत's picture

3 Nov 2008 - 11:35 am | मुक्तसुनीत

अतिशय संवेदनाक्षम , नेमके लिखाण. ऋषिकेश हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत ; परंतु मुलांच्या जगाबद्दल त्यांनी आतापर्यंत आस्था, सजगता, त्यांच्याकरता काहीतरी सतत करत रहाण्याची तळमळ यातून त्यांनी आतापर्यंत केलेले आंतरजालीय जगातले काम या दृष्टीने ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक ठरतात. त्यांचा हा लेख त्यांच्या एकूण लिखाणातला एक महत्वाचा लेख ठरावा. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

ऋषिकेश यांचे सर्वच मुद्दे यथोचित आहेत. मात्र या निमित्ताने त्यांच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे हीच त्यांच्या लेखाला उचित दाद ठरेल.

माझा एक सर्वसाधारण प्रश्न असा आहे की, ऋषिकेश यांनी मांडलेल्या मुद्द्यांना ( जे मुद्दे मला तत्त्वतः पटले आहेत !) आधारभूत ठरेल असा काही विदा उपलब्ध असेल का ? म्हणजे असे की , मुले रॅटरेस मधे अडकली आहेत, कलाक्रिडादि क्षेत्रांकडे होणारे दुर्लक्ष , त्यांची होणारी आबाळ हे मुद्दे महत्त्वाचे आहेत पण ते केवळ आज समोर आलेले नाहीत. हेळसांडीची भावना गेली काही दशके रुजली आहे. याची एक साक्ष , म्हणजे , अगदी आम्ही १०वी -१२ वीला होतो तेव्हाही , समजूतदार मंडळी हेच म्हणायची. म्हणजे या बाबतचा किमान अवेअरनेस निर्माण व्हायला पंचवीसेक वर्षे तरी उलटली असे सावधपणे म्हणता येईल.

मग या पंचवीस वर्षात या परिस्थितीमधे थोडातरी बदल झाला असेल असे मला वाटत होते. (तो चांगला की वाईट झाला असेल ते मला सांगता यायचे नाही.) लोक आजकाल निदान क्रिकेटमधे तरी मुलांना करीयर करता येईल की नाही असे पहातात असे मी काही वर्तुळांमधे ऐकले आहे. एकेकाळी केवळ जे जे स्कूल ऑफ आर्टस् होते. आता काही इतर कला-स्थापत्य शास्त्रविषयक संस्था निर्माण झाल्या असतील. ज्या झी टिव्ही वगैरे घटकांना आपल्या मिपावर झोडपले जाते (जे बहुतांशी बरोबर आहे) ते घटक याशी साक्ष देतात की , सुगम संगीताद्वारे करीयर करण्याकरता तुम्ही केवळ मंगेशकरच असला पाहिजेत असे आता दिसत नाही. पुण्या मुंबईमधे शास्त्रीय संगीतात करीयर करू पाहणार्‍या होतकरू तरुणांबद्दल आपण ऐकतो. बॉलीवूडच्या एकंदर दर्जाबद्दल आपण कदाचित शिव्या घालू ; पण ही इंडस्ट्री आणि पर्यायाने याच्याशी निगडित डझनावारी इतर छोटे छोटे उद्योग यांचा टर्नओव्हर काही कोटिंपासून काही शे (का हजार ?) कोटिंपर्यंत गेला आहे हे मान्य व्हावे.

म्हणजे, इकॉनॉमी जसजशी विकसत जाते आहे तसतसे नवनवीन रस्ते उघडाताहेत किंवा कसे , याबाबत उहापोह होऊ शकतो. (कदाचित उघडणारे नवे रस्ते एकूण गरजेच्या मानाने आग्दी तुटपुंजे असतील !) म्हणूनच मला विचारायचे होते : याबाबत आपल्याला काही विदा मिळू शकतो काय ?

विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 11:42 am | विसोबा खेचर

त्यांचा हा लेख त्यांच्या एकूण लिखाणातला एक महत्वाचा लेख ठरावा. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

हेच म्हणतो.. ऋषिकेशा, जियो रे... :)

मुक्तरावांचा छोटेखानी उहापोहही आवडला..

बाय द वे, स्वत:वर पूर्ण विश्वास असेल तर कधीच कुठल्या रॅटरेसचा प्रश्न येत नाही/येऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे..

आपला,
(एकमेवाद्वितीय) तात्या.

ऋषिकेश's picture

3 Nov 2008 - 12:08 pm | ऋषिकेश

सर्वप्रथम प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल एकदम धन्यु! :)

मांडलेल्या मुद्द्यांना ( जे मुद्दे मला तत्त्वतः पटले आहेत !) आधारभूत ठरेल असा काही विदा उपलब्ध असेल का ?

यासंबंधी काहि प्रमाणात विदा मिळू शकेल.. आता नेमका आठवत नाहि की जालावर वाचलं होतं की कात्रण आहे. पण शोधून १-२ दिवसांत दुवा /संदर्भ देतो .

बाकी मुद्द्यंवर इथे लिहिन तुर्तास घाईत अहे

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2008 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी, संपादकीय आवडले.
फक्त, सरकारची धोरणे बालकाभिमुख करायची म्हणजे काय करायचे ? नवीन शिक्षण पद्धती आणायची म्हणजे, कोणते शिक्षण दिले पाहिजे ? अभ्यासक्रम बदलायचा असेल तर तो कसा द्यावा ? याचा उहापोह वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2008 - 12:52 pm | स्वाती दिनेश

ऋषिकेश, संपादकीय आवडले. बालसाहित्य सप्ताहाची कल्पनाही आवडली.
मृदूला म्हणते तसे ज्या स्पर्धेला मुलांना फेस करावे लागते आहे त्या महत्त्वाच्या मुद्याचा उल्लेख राहून गेला आहे असे वाटले.
स्वाती

वैशाली हसमनीस's picture

3 Nov 2008 - 2:54 pm | वैशाली हसमनीस

आपला लेख तपशीलात आवडला.पण माझ्यामते पालकांसाठी समुपदेशनाचे वर्ग घेणे आवश्यक आहे.पालक मुलाचा कल लक्षात न घेता आपल्या अपेक्षा,इच्छा त्याच्यावर लादत असतात.

चतुरंग's picture

3 Nov 2008 - 3:25 pm | चतुरंग

मुलांच्या प्रश्नांबद्दल तुझ्या मनात असलेली तळमळीची भावना ह्या लेखातून आमच्यापर्यंत पोचली. तुझे अभिनंदन.

मुलांचे आजचे प्रश्न हे गेल्या १० वर्षांपेक्षा फारच वेगळे आहेत त्यामुळे त्यांची उत्तरेही बर्‍याच अंशी वेगळीच असणार आहेत, हा तुझा मुद्दा अगदी योग्य आहे.
खेळांच्या मैदानांचा अभाव हाही खरेच चिंतेचा विषय आहे. मोकळ्या मैदानावर नुसते पळाल्यानेदेखील मुले मोकळी होतात. विचार मोकळे होतात हे आपल्याला वळत नाही!
एकूणच व्यायामाकडे अक्षम्य दुर्लक्ष हा आपला एक मोठा सामाजिक प्रश्न आहे त्याची सुरुवात बालपणापासून होते.
आई-बापांनी मुलांना अधिक आणि योग्य प्रकारचा वेळ देणे हे महत्त्वाचे आहे. मुलांना त्यांच्या मनातले प्रश्न मोकळेपणाने बोलता यावेत असे विश्वासू आईबाप होणे फार अवघड आहे!
वर मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातला ह्या जाणीवेबाबतचा विदा मिळाला तर नक्कीच आधारभूत ठरेल.

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 7:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश, खूप छान लिहिलं आहेस तू! मी स्वतः जेव्हा ठाण्याबाहेर पडून एका खेड्यात गेले तेव्हा मला समजलं मी शहरात, गर्दीत राहून काय नाही मिळवलं. बाकी माझं नशीब खूप चांगलं असल्यामुळे "मला तू डॉक्टर व्हावं असं वाटतंस पण तुला काय शिकायचंय ते तू शीक" असं म्हणणारे पालक लाभले.
माझ्या शाळेबद्दल मात्र म्हणशील तर मी तिथे शिक्षक कसे नसावेत हेच शिकले. अर्थात काही शिक्षक अपवाद आहेतच. पण त्यामानाने उच्च शिक्षण घेताना बरेचसे खूप चांगले शिक्षक मिळाले.

ऋषिकेश's picture

3 Nov 2008 - 9:23 pm | ऋषिकेश

माझ्या शाळेबद्दल मात्र म्हणशील तर मी तिथे शिक्षक कसे नसावेत हेच शिकले. अर्थात काही शिक्षक अपवाद आहेतच. पण त्यामानाने उच्च शिक्षण घेताना बरेचसे खूप चांगले शिक्षक मिळाले

अतिशय महत्त्वाचे ऑब्झरवेशन...

काहिसे अवांतरः
आता मी या अग्रलेखाच्या विषयासंबंधी विदा शोधत होतो. त्यात काहि मिळालेले रोचक आकडे
शालेय शिक्षकांच्या शिक्षणाची टक्केवारी:
प्राथमिक = २.९२%
माध्यमिक = १८.४४%
उच्च माध्यमिक = २३.३५%
ग्रॅज्युएट = ३५.६१%
पोस्ट ग्रॅज्युएट = १८.३६%
त्यापुढे (डॉक्टरेट + इतर) = ०.४७+०.५३%

संदर्भ: सर्व शिक्षा अभियान प्रोग्रेस रिपोर्ट २००६-२००७

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय's picture

4 Nov 2008 - 3:53 am | धनंजय

अभिनंदन ऋषिकेश.
बालसाहित्याबद्दल ऋषिकेश यांची कळवळ आणि लेखन स्तुत्य आहेच, पण या अग्रलेखात सर्वांगीण विचारही पटवून दिला आहे.

ऋषिकेश, लेख खूप आवडला आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मनाला भिडला.

सध्याच्या समाजाने मुलांच्या विश्वातून केवळ क्रीडा हिरावली नाही तर "कला" देखील मुलांना पारखी झाली आहे. इयत्ता ९वी पर्यंत एखाद्या कलेत कल आहे असे दिसूनही, "आता तुमची नाटकं/चित्रं/खेळ/छंद इ. बास झाली, आता दहावीचं वर्ष आहे आता यंदा अभ्यास एके अभ्यास" असं दरडावणारे सो कॉल्ड सुजाण पालक/शिक्षक आणि "पोरीचं कॉलेजात उंडारणं पुरे झालं, आता लग्न कराया हवं" म्हणणारा बाप हे एकाच माळेचे मणी वाटतात. मुलांमध्ये असणार्‍या कलेला शालेय शिक्षणापुढे नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो. "असेना का बारावी, तुला वाळूच्या स्कल्पचर्सची आवड आहे ना! जा तू खुशाल शिबिराला. " असा संवाद काही अपवाद सोडल्यास ऐकू येत नाही. "अरेच्या! तुझ्या शाळेची मॅच आणि स्कॉलरशिपची परीक्षा एकाच दिवशी आहे? बरं तुला काय आवडतं? क्रिकेट? मग झालं तर मॅच पहिली" हे तर स्वप्नरंजन वाटतं. एखाद्या गोड गळ्याच्या विद्यार्थ्याला फक्त "ईशस्तवन गाणारा" म्हणूनच शिक्का बसतो. चित्रकलेचे सर टिचर्सरूम मध्ये सगळ्यात दुर्लक्षित. कोणतेही पालक निकालाच्या दिवशी संगीत शिक्षकांना गाठून "याला "ब" शेरा का दिला? कोणती जागा चुकली? " म्हणून विचारताना आढळत नाहीत. आपण एकाच रंगाच्या, गंधाच्या एकाच साच्यातून निघालेली प्रॉडक्ट्स असे स्वरूप मुलांना दिलं आहे नाही?

हा परीच्छेद तर काळजीपुर्वक वाचून मनन करावा असा. शिक्षणविषयक धोरणे (आणि अर्थविषयक सुद्धा) राजकीय प्रभावातून मुक्त होऊन ती स्वायत्त व्हावी असे मलाही मनापासून वाटते; आणि ह्यात तज्ञांची मदत घ्यावी. लिला पाटील, रमेश पानसे, किशोर दरक (ह्यांचा 'सुर्योदयाचा देखावा आणि मॅकडोनाल्डचे बर्गर' हा लेख सुप्रसिद्ध आहे), संजिवनी कुलकर्णी ह्या काही तज्ञांनी ह्यावर खूप चांगले काम केले आहे आणि विचार मांडले आहेत. मी स्वतः त्या विचारांनी तसेच नील च्या'समरहिल' ह्या पुस्तकाने चांगलाच प्रभावित झालो आहे. आता थोरो वाचतो आहे, तिथेही वेगळेपणाचा पुरस्कार आहे. मी स्वतः शाळेत/कॉलेजात वेगळे असल्यामुळे एकटा पडण्याचा अनुभव वारंवार घेतला आहे. कित्येकवेळा आपण का 'ठोकळेबाज' विद्यार्थी निर्माण करण्यातच धन्यता मानतो असे वाटते!

अर्थात ह्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती पालकांची मानसिकता बदलायची. वर कोणी तरी स्पर्धेचा उल्लेख केला. खर तर मुलाची स्पर्धा फक्त त्याच्या स्वतःशीच हवी; "सर्वोत्तम मी, माझ्यासारखा" बनण्याची. बाहेरची स्पर्धा तुम्ही जेवढी मानाल तेवढी (आणि तेवढीच) असते. इथेच खरी कसोटी आहे. 'अक्षरनंदन' सारखी निराळी शाळा निवडणारा पालक विरळाच. ज्या पालकांनी संपुर्णपने ह्या स्पर्धेची भीती, 'असेच झाले पाहिजे तुला' ही अट आपल्या मुलांच्या बाबतीत बाजूला ठेवली ती मुले खूप जगण्यास सक्षम, अधिक आनंदी झालेली मी पाहिली आहेत. नाहीतर ह्याच स्पर्धेत (रॅट रेसमधे) अव्वल येऊनसुद्धा, आय आय टी तल्या, सॉफ्ट्वेअरमधे चांगली नोकरी असलेल्या तरुणाने आत्महत्या केलेली आपण वाचलेच आहे. 'तारें जमींन पर' आवडणे वेगळे आणि खरच तो दृष्टीकोन अंगीकारणे वेगळे...शिक्षणाची सुरुवात होते घरापासून, आणि तिथेच बदल व्हायला हवेत आपल्या दृष्टीकोनात आणि अर्थातच आपल्या वागण्यातही! आपला दृष्टीकोन बदलला, तर शाळाही बदलतील!

जाता, जाता - समरहिल ह्या माझ्या आवडत्या पुस्तकाविषयी -

At a time when schools have become giant factories churning out kids who must fit into the present order, who cooperate smoothly, and who consume more and more, Summerhill, which has been in existence since 1921, has shown the world that a school could abolish fear of teachers and adults and, deeper down, fear of life

समरहिलचा व्हिडीओ इथे बघता येईल -
http://video.google.com/videoplay?docid=351862798006272328&hl=en

अभिरत भिरभि-या's picture

4 Nov 2008 - 3:33 pm | अभिरत भिरभि-या

उत्तम अग्रलेखाबद्दल ऋषिकेषरावांचे अभिनंदन.
आणि इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल मनिषशेठला टाळ्या =D>

लिखाळ's picture

4 Nov 2008 - 6:45 pm | लिखाळ

सुंदर अग्रलेख ! अभिनंदन ऋषिकेश.
मुक्तसुनित, चतुरंग, मनिष आणि इतर बरेच प्रतिसादसुद्धा नेमके आणि छान आहेत.

पालकांची मानसिकता, खेळाचा-व्यायामाचा अभाव, कलेकडे दूर्लक्ष अथवा मारुनमुटकून कला हे सर्व मुद्दे फार योग्य आहेत.
शहरांमध्ये अनेक मुलांची शाळा घरापासून फार लांब असते. यामुळे अनेक गोष्टींना ही मुले मुकतात, त्यांना मनोरंजनाला वेळ मिळत नाही. त्यांच्या व्यथा अजूनच तीव्र होतात.

मनिषने थोरोचा उल्लेख केला आहे आणि इतर काही शिक्षण विषयांत काम करणार्‍या लोकांचा उल्लेख केला आहे. त्या लोकांबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल वाचायला आवडेल.

शिक्षण कसे असावे? ते कसे द्यावे आणि त्यात काय असावे? या बद्दल जे. कृष्णमूर्ती यांचे विचार चिंतनीय आहेत. त्यांनी स्वतःच्या मताला अनुसरणारार्‍या शाळा भारतात चालू केल्या आहेत. ऋषीव्हॅली आणि पुण्याजवळ सह्याद्रीस्कूल या दोन शाळा ऐकून माहित आहेत. तेथे शिक्षण कसे असते याबद्द्ल कुणाला माहिती-अनुभव असेल तर तो इथे सांगावा.
--लिखाळ.

ऋषिकेश's picture

8 Nov 2008 - 11:47 pm | ऋषिकेश

सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल अनेक आभार.. जमतील तसे एकेक प्रतिसादाला उत्तर देईनच.. (सध्या फार कामात आहे क्षमस्व!)
तुर्तास एक आठवणः
पुढील आठवडा बालसप्ताह पाळण्यास आपले अनुमोदन असेल तर लहानांसाठी काहितरी नक्की लिहा :)
म्हणजे प्रत्येक लेखन लहानांसाठी नाहि आले तरी प्रत्येकाने एक तरी लेखन लहानग्यांसाठी करावे हि विनंती!

-(लहानगा मावळता संपादक) ऋषिकेश

एकदा एका व्याख्यानात शिक्षणक्षेत्रातील वर्णाश्रमाचा उल्लेख आला होता.

ब्राह्मण : गणित आणि शास्त्र.

क्षत्रिय : सर्व भाषा.

वैश्य : इभुना.

शुद्र : चित्रकला, खेळ आणि संगित इत्यादी.

बाकी संदर्भ विसरलो, चु.भु.दे.घे.