उन्हाळी भटकंती: वासोटा ( Vasota )

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
13 Apr 2018 - 11:42 am

कोयनेच्या घनदाट जंगलात एक गड, वाघासारखा दबा धरुन अरण्याचे रक्षण करतोय. दाट झाडीची झुल पांघरलेला हा वनदुर्ग आहे, "किल्ले वासोटा". वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले. या शिवाय वासोटा या नावाची आणखी एक शक्यता वर्तवली जाते कि, ज्ञानेश्वरीमधे वसवटा हा शब्द वसणे या अर्थाने आला आहे. कदाचित वसण्यास योग्य जागा या अर्थाने वासोटा हे या गडाचे नाव पडले असावे.
व्याघ्रगड हे गडाचे आणखी एक समर्पक नाव. साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते.सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यामधून वाहणार्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे
इतिहासात या किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. नंतर बहुधा मोरे व शिर्के आणि अत्यंत अल्पकाळ आदिलशाही असे त्याचे हस्तांतर झाले असावे. १६५६ मध्ये शिवाजीराजांनी चंद्रराव मोर्‍याचा पराभव करुन जावळी प्रांताबरोबरच या वासोटा किल्ल्याचाही स्वराज्यात समावेश केला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. पुढे शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात पन्हाळ्यात अडकले असतानाही जिजाबाईंनी बांदलांचे सैन्य पाठवून हा गड ६ जुलै १६६० रोजी पुन्हा स्वराज्यात आणला. एकुणच गडाची दुर्गमता आणि भोवती असणारा वनसागर लक्षात घेता, शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते.अफझलखानच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. महाराजांच्या कोकण स्वारीत तिथल्या रहिवाश्यांचे दुखः कानी पडले. अरबस्थानातील चाचे कोकणच्या किनार्‍यावर उतरुन लुटालुट, जाळपोळ तर करीतच पण तरण्याताठ्या सुना-लेकी पळवून अरबस्थानातील बाजारात विकत किंवा जनानखान्यात डांबत. शिवाजी महाराजांनी आपली गलबते, समुद्रबंदीसारख्या कल्पना बाजुला ठेउन एडनला पाठवली आणि अरबी चाच्यांना पकडून वासोट्यावर कैदेत ठेवले आणि खास मराठमोळा पाहूणचार केला. याचा योग्य परिणाम होउन कोकण किनार्‍याला हा उपद्रव थांबला. महाराज पन्हाळ्यावर अडकलेले असताना राजापुर वखारीतल्या ईंग्रजांनी युनियन जॅक फडकवत, पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जोहरला मदत म्हणून लांब पल्ल्याच्या तोफा पन्हाळ्यावर डागल्या होत्या. पुढे कोकण स्वारीत महाराजांनी याचा हिशेब चुकता केला. राजापुरची वखार तर कुदळ लाउन खणलीच पण रेव्हिंग्टन आणि इतर इंग्रज कैदी वासोट्यावरच बंदिस्त करुन ठेवले . याच किल्ल्यावर शनिवार, २७ सप्टेंबर १६७९, रोजी शिवाजी महाराजांना २६००० रुपये भरलेले ४ मोहरांचे हंडे सापडले होते.
पुढे महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्र औरंगजेबाच्या वावटळीत सापडला. औरंगजेबाने किल्ले सातारा ( अजिंक्यतारा ) आणि सज्जनगड यावर एकाच वेळी मोर्चे बसवले. त्यावेळी सज्जनगडावरील मौल्यवान वस्तु, समर्थांच्या पुजेतील देव यांना सुरक्षितपणे वासोट्यावर हलवण्यात आले. यानंतरची घटना म्हणजे रायगडावरुन जिंजीला जाताना राजाराम महाराज वासोट्यावर आले होते. पुढे शाहुंच्या काळात पेशवे आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांच्यात वैर उत्पन्न झाले. हे भांडण पुढे विकोपाला गेल्यानंतर पेशव्यांनी सरदार बापु गोखले याला पाठवले. बापु गोखले यांनी पंतप्रतिनिधींचा पराभव केला. पण पंतप्रतिनिधींची रखेल ताई तेलीण हिने वासोटा व जंगली जयगडावर रसद व दारुगोळा जमा करुन बंड केले. बापु गोखले हे बंद मोडण्यासाठी वासोट्याच्या पायथ्याशी पोहचला.सातारा-मेढे-बामणोली-तांबी- मेट ईंदवली असा मार्ग त्याकाळी होता. यातील तांबी पाठोपाठ बापुने मेट ईंदवली हा वासोट्याचा पायथाही काबीज केला व ताई तेलीणीची रेडे घाटातील चौकी घेतल्यावर तिवरे या कोकणाकडील गावातून होणारी रसद बंद झाली. बापु लिहीतात "किल्ला वासोटा येथून तेलिणीने जमाव करोन प्रांतास प्रजेस उपद्रव बहुते केला आहे यामुळे लष्करसुध्दा दरमजल जाउन पोचलो. किल्ले वासोट्याकडील जमेत अलिकडे तीन कोसावर होती. इकडील लोक बामणोलीस होते, त्यांची लढाई होउन त्याजकडील लोक पलोन वासोट्यास गेले. दीपवाळीचे सुमुर्ते येथून कूच वासोट्याकडे होइल".
किल्लेदारांनी मग मधुमकरंदगड ताब्यात देउ अशी बोलणी करुन वेळकाढूपणा सुरु केला. मात्र जंगलाचा अभेद्य पट्टा ओलांडून वासोट्यावर हल्ला करणे हे मोठे आव्हानात्मक होते. अखेरीस हत्ती लावून हि झाडी तोड्ली, तेव्हा सैन्यासाठी वाट तयार झाली. पेशव्यांना लिहीलेल्या पत्रात बापु लिहीतात, " डोंगर झाडी मनस्वी, अडचण बहुत ! किल्ला बहुत बांका ! सात कोस, अडीच मास झाडी तोडली, तेव्हा मार्ग झाला". अर्थात हि झुंज आठ- दहा महिने सुरु राहिली. सरळ मार्गाने किल्ला घेणे अवघड आहे हे बापु गोखलेंच्या लक्षात आले. जेव्हा दोन किल्ले शेजारी - शेजारी असतात, तेव्हा एकाचा पाडाव झाला कि दुसरा कह्यात येतो ह्याची इतिहासात उदाहरणे आहेत, पुरंदर-वज्रगड किंवा लोहगड-विसापुर ई. वासोट्याशेजारी एक त्याच उंचीची टेकडी आहे, "जुना वासोटा". या जुन्या वासोट्यावर एक तोफ चढवून मारा सुरु केला तेव्हाच ताई तेलीणीने शरणागती पत्करली. जेष्ठ ५ शके १७३० रोजी वासोटा किल्ला बापु गोखले याच्या ताब्यात आला, त्याने ताई तेलीणीला कैद करुन योग्य त्या मानाने पेशव्यांकडे पाठवून दिले. त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा
श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा |
ताई तेलीण मारील सोटा,
बापू गोखल्या सांभाळ कासोटा ||
या स्वारीसंदर्भात वृत्तांतात बापु गोखले लिहीतात, "मोर्चे किल्ल्यापासोन जवळ अर्धगोळीचे मारवीत गेले. जुने वासोटा म्हणोन मोठा पर्वत नजीक आहे. तेथे स्वामीचरणांचे करीन महत्प्रयासाने तोफ तेथे चढवली, तेथून गोले किल्ल्यात जातात".यानंतर मात्र वासोटा स्वराज्याच्या शत्रुंच्या हाती येउ शकला नाही.
पुढचा ईतिहास मात्र फारच विदारक आहे. ई.स. १८१८ मधे मराठेशाही मोडण्यसाठी ईंग्रज एक एक किल्ले ताब्यात घेत निघाले होते. हैद्राबादवरुन पुण्याकडे येणार्‍या कॉर्नेट हंटर न मॉरिसन या दोन ईंग्रज अधिकार्‍यांना मराठी सैन्याने पुण्याजवळ खडकीनजीक पकडले व कांगोरी उर्फ मंगळगडावर ठेउन त्यांचा छळ केला. नंतर त्यांना वसोट्यावर हलविण्यात आले. त्यांना सोडविण्यासाठी जनरल प्रिझलर व त्याच्या मदतीला ग्रँट डफ, एलफिस्टन हे अधिकारी ससैन्य निघाले. मेढे, तांबी मार्गे ईंग्रजांची फौज पायथ्याच्या मेट ईंदवलीत आली. सुरवातीला ईंग्रजांनी पायथ्याहूनच मारा केला, पण किल्लेदार भास्करपंत यांनी कडवा प्रतिकार केला. शेवटी बापु गोखल्याचीच युक्ती वापरुन ईंग्रजांनी तोफा जुन्या वासोट्यावर चढवल्या. स्थानिक समजुतीप्रमाणे वाटाघाटीला यश येत नाही हे पाहून , तोफेचा मारा केला, पण तो दरीतच पडला. नंतर मात्र ताकदीच्या दारुगोळ्याने केलेल्या मार्‍याला यश येउन किल्लेदाराच्या वाड्याचे नुकसान झाले. तिसरा तोफगोळा चांडिका मंदिरात पडला. नाईलाजाने किल्लेदाराने शरणागती पत्करली. मात्र ग्रँट डफच्या म्हणण्यानुसार हा भडीमार वीस तास चाललेला होता. ज्यामधे दोन लाखाची लुट आणि सातार्‍याच्या छत्रपतींचे तीन लाखाचे जड जवाहिर ताब्यात आले. वास्तविक अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतानाही भास्करपंतानी ज्या धैर्याने ईंग्रजांना तोंड दिले व शक्य तितका कडवा प्रतिकार केला, त्यांचे कौतुक करावे तितके थोडे. मात्र आज त्याच भास्करपंताबाबत ईतिहास मौन आहे. खुध्द छत्रपती ईंग्रजांचे कैदी असतानाही अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार्‍या भास्करपंताचे पुर्ण नावही आपल्याला धड माहिती नाही.
Vasota 1
( वासोटा गडाचा नकाशा )
अश्या या ईतिहास प्रसिध्द गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील चिपळूणकडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. सातार्‍यावरुन बामणोलीला जाण्यासाठी सकाळी ६.००, ९.००, १०.००, १.०० व ५.३० ( मुक्कामी) बस आहेत. सातारा- बामणोली अंतर ४० कि.मी. असून कास ते बामणोली अंतर १० कि.मी. आहे.
बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जाऊ शकतो. यामुळे परवानगीच्या सोपस्कारामुळे ट्रेक सकाळी ८ वा. आधी सुरु करता येत नाही. इथे काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
१) बामणोली येथून मेट इंदवलीला जाण्यासाठी बोटी मिळतात. एका बोटीत १२ माणसे घेतात. १ माणुस असो की १२ माणस असोत,तोच दर. सध्या बामणोलीवरुन वासोट्यासाठी १२ जणांचा ग्रुप असेल तर ३५४०/- असा दर आहे. तसेच वनखात्याचा कर बारा वर्षावरील व्यक्तिसाठी दर माणशी ३०/- ( तीस फक्त ) तसेच बोट अभयारण्यात नेण्यासाठी १५०/- + गाईड १५०/- असे आहेत..ह्या सर्व बाबी लक्षात घेउन वासोट्याला जाण्याचे नियोजन करावे.
२) बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - मेट इंदवली हा ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला पोहोचणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सूर्य मावळल्या नंतर पोहोचल्यास बामणोली येथे वनखात्याकडून कारवाई केली जाते. (पंचनामा केला जातो व माणशी रुपये १००/- दंड आकारला जातो.) तसेच अंधार पडल्यावर बोट चालवणारे अडवणूक करतात त्यांनाही जास्तीचे पैसे द्यावे लागतात.
३) वासोटा - नागेश्वर परीसर कोयना अभयारण्यात गेल्यामुळे तेथे राहाण्याची परवानगी नाही.
४) चिपळूणहून चोरवणे मार्गे नागेश्वर - वासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही, तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.
५) हा संपुर्ण परिसर सध्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या अखत्यारीत येत असल्याने, वासोट्याला पावसाळ्यात म्हणजे १५ जुन ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तसेच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत जाण्याची परवानगी मिळत नाही. तसेच वासोट्यावर कोणत्याही परिस्थितीत मुक्काम करण्याची परवानगी नाही. सापडल्यास मोठ दंड ( सुमारे ३,००,०००/-) तसेच तुरुंगवासही होण्याची शक्यता आहे. तसेच जेवणाची सोय आपण स्वत:च करावी. अभयारण्य क्षेत्र असल्याने आग पेटवण्यास परवानगी नाही. याशिवाय मद्य, स्फोटक पदार्थ, फटाके ई सोबत बाळगण्यास परवानगी नाही. सोबत कॅमेरा असेल तर त्याचे वेगळे शुल्क आकारले जाते.
ही परवानगी सका. ७.३० ते दु. १.३० पर्यंत घ्यावी लागते.
बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या सदस्यांचे संपर्क क्रमांक देतो.
संजय शिंदकर -9423862090
धनाजी संकपाळ -9421216232
दिनेश सिंदकर -9822726275
दिनेश सिंदकर -9403547353
विजय शिंदकर -9819303023
वासोट्याला रात्री मुक्कामाची परवानगी नसल्याने आणि ट्रेक सकाळी लवकर सुरु करणे सोयीचे असल्याने बामणोलीत मुक्काम करणे सोयीचे पडते. ज्यांना बामणोलीत मुक्काम सोयीचा वाटत नाही त्यांनी कास पठारावरच्या हॉटेलमधे मुक्काम करुन सकाळी लवकर बामणोलीला येणे बरे पडेल. बामणोलीतच ज्यांना मुक्काम करायचा आहे, तसेच तंबु वगैरे सोय पाहिजे असेल त्यांनी श्री. धनाजी भोसले 9403478008 यांच्याशी संपर्क करावा.
Vasota 2
याशिवाय बामणोलीला भैरवनाथ मंदिरात मुक्काम करता येईल.
बामणोली येथील वनखात्याच्या ऑफिसचा नंबर- ( 02168 ) 202020
Vasota 3
( वासोटा परिसराचा नकाशा )
बामणोलीला मुक्काम करुन वासोट्याबरोबरच दत्त मंदित, त्रिवेणी संगम, तापोळ्याला वॉटर स्कुटर अश्या ईतर गोष्टीचा आनंद घेउ शकतो .बामणोली येथे किनारी असलेल्या वृक्षांवर हजारो वटवाघळे पाहता येतील. त्यांच्या आवाजाने हा परिसर नेहमीच दुमदुमून जातो. सायंकाळची वेळ होताच हा थवा डोंगराच्या दिशेने जातो आणि पहाटेच्या सुमारास पुन्हा परततो. हा थवा आकाशात झेप घेतो तो क्षण अविस्मरणीय असतो.
खालील चार वाटांनी वासोटा- नागेश्वर ट्रेक करता येतो
१) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - आल्यावाटेने परत मेट इंदवली.
२) सातारा - बामणोली -मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - नागेश्वर कुंड - ओढ्याची वाट - मेट इंदवली
३) चिपळूण - चोरवणे - नागेश्वर - वासोटा - मेट इंदवली - बामणोली - सातारा.
४) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - चोरवणे - चिपळूण
वरील चारही मार्गाने शरीर - मनाची कसोटी पाहाणारा ट्रेक वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास एका दिवसात करता येतो.
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्गाचे पर्याय पाहु.
१) सातारामार्गे वासोटा :- खालील तिनही मार्गाने जातांना प्रथम कोयना धरणाचा " शिवसागर जलाशय " बोटीने पार करावा लागतो.
अ) मेट इंदवली मार्गे :- वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी वापरली जाणारी सर्वात प्रचलित वाट मेट इंदवलीहून आहे. त्यासाठी सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सातरा -बामणोली अंतर ३० किमी आहे. सातारा - कास पठार - बामणोली या सुंदर रस्त्याने तासभरात बामणोलीला पोहोचता येते. बामणोलीला जाण्यासाठी सातार्‍याहून बसची सोय आहे. बामणोलीहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय लाँचने पार करून मेट इंदवलीला पोहोचायला दिड तास लागतो.
मेट इंदवलीला वनखात्याचे ऑफ़िस आहे. वन खात्याच्या कार्यालया मागून जाणारी वाट १५ मिनिटात एका छप्पर नसलेल्या मंदिरापाशी घेउन येते येथे हनुमानाची व गणपतीची मुर्ती आहे. पुढे ओढा ओलांडल्यावर वासोट्याचा चढ चालू होतो. येथून साधारणपणे १ ते १.३० तासात आपण वासोटा आणि नागेश्वरच्या फ़ाट्यावर पोहोचतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते. तर सरळ चढत जाणार्‍या वाटेने ३० मिनिटात गडावर पोहोचता येते. मेट इदंवलीहून मळलेल्या वाटेने २ ते २.३० तासात गडावर पोहोचता येते.
ब) खिरकंडी मार्गे:- सातार्‍याहून बसने ’वाघाली देवाची’ या गावी यावे. येथून लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर वाडी पासून जाणारी वाट ’मेट इंदवली’ या गावात घेऊन जाते. सातार्‍याहून इथवरचा प्रवास आठ- नऊ तासांचा आहे. येथून पुढे पाच - सहा तासात वासोट्यावर जाता येते.
क) कुसापूर मार्गे:- सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सकाळी ९ वाजता सातार्‍याहून बसची सोय आहे. येथून कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय लाँचने पार करून जाता येते.तेथून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर घेऊन जाते.
ड) महाबळेश्वर मार्गे :- महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर घेऊन जाते.
२) चिपळूणहून वासोटा :-
अ) चोरवणे मार्गे:- चिपळूणहून सकाळी ८.३० वाजताच्या बसने ‘चोरवणे’ या गावी यावे. येथून ४ ते ५ तासाचा उभा चढ चढून नागेश्वरला पोहोचता येते. (या मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा भरपूर साठा घेऊन जावे.) या वाटेने वर गेल्यावर एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वरकडे तर उजवीकडची वाट वासोट्याला जाते. तर सरळ खाली जाणारी वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. पोढे हि वाट धबधब्याच्या वाटेला मिळते. या वाटेने दगड धोंड्यातून चातल २ ते ३ तासात मेट इंदवलीला पोहोचता येते.
नागेश्वरहून वासोटा समोर दिसतो. डोंगराच्या धारेवरून पुढे खोट्या नागेश्वरला वळसा घालून २ ते ३ तासात वासोट्याला पोहोचता येते.
ब) चिपळूणहून ‘तिवरे’ या गावी यावे, येथून रेडे घाटाने वासोट्याला जाता येते.
Vasota 4
अर्थात हे सर्व मार्ग असले तरी बामणोलीवरुन बोटीने वासोट्याला जाणे हे सर्वात सोयिस्कर आणि बहुतेक पर्यटक आणि दुर्गारोही ह्याच मार्गाने जातात. आपणही त्याची सविस्तर माहिती घेउ. बामणोली मार्गाने आपण निघाल्यास, लॉंचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो.
Vasota 5
एकदा लाँचवाल्यांनी आपल्याला ईथे सोडले कि ते थेट संध्याकाली ५.३० वाजता येतात. ती वेळ पाळणे आपल्याला बंधनकारक असते. जर उशीर झाला तर लाँचवाले आपल्यासाठी थांबत नाहीत. बामणोलीला लाँचमधे बसले कि लाँचच्या ईंजिनाच्या ताकदीनुसार वासोट्याच्या पायथ्यापर्यंतचा प्रवास दिड तास किंवा दोन तास असा होतो. कोयनेच्या घनदाट जंगल, सह्याद्रीच्या राकट रांगा, यामुळे डोळ्यांना सुखावणारे दृष्य चौफेर असते. सुखद वार्‍यामुळे दिड तासाचा हा नौकाविहार बिलकुल कंटाळावाणा होत नाही.
Vasota 6
त्यातच बरोबरीचे सोबती, मित्र दुसर्‍या लाँचमधे बसले असले आणि त्यांची लाँच जवळ आली कि एकमेकाच्या अंगावर पाणी उडवण्याचा खेळ रंगतो. सकाळी बामणोलीला नाष्टा केलेला असला तरी काही खाद्यप्रेमी मंडळीना एकदंरीत मस्तीचा माहोल पाहून काहीतरी तोंडात टाकायची हुक्की येते आणि चिवडा, बाकरवडी, भडंग असे पदार्थ सॅकमधून बाहेर निघतात आणि सगळ्यांचीच तोंडे हलु लागतात.
Vasota 7
वाटेत डावीकडून कांदाटी नदी येउन कोयनामाईला मिळते आणि तीचे डोंगरांनी वेढलेले खोरे उलगडते. लांबवर पश्चिमेला चकदेव आणि महिमंडनगड दर्शन देतात. कोयनेचा हा जलाशय निर्माण झाला तेव्हा बर्‍याच झाडांना जलसमाधी मिळाली, त्यांचे शेंडे अद्याप अस्तित्व दाखवतात.
Vasota 8
कुसापुर आणि खिरखिंडी मागे टाकून अखेरीच मेट ईंदवलीच्या खोर्‍यात आपली लाँच शिरते आणि कोयनेच्या शिवसागरावरच्या काठावर वनसागराने वेढलेल्या वासोट्याचे प्रथमदर्शन होते.
Vasota 9
लाँचमधून उतरून पाण्याच्या कडेने काही अंतर गेल्यानंतर एक स्वागत कमान उभारली आहे.
Vasota 10
थोडे अंतर चालून गेल्यानंतर वनखात्याने एक स्वागतकक्ष उभारला आहे. इथे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील प्राणी आणि वनस्पतींच्या प्रकाशचित्राचे कायमस्वरुपी प्रदर्शन भरवले आहे. तिथे आपली व आपल्याकडील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यांची नोंद होते व त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूसाठी रुपये १०/- डिपॉझिट भरल्यावर गडावर जाण्याची परवानगी मिळते. ( ट्रेक हून परत येताना नेलेल्या सर्व वस्तू परत दाखवल्यावर डिपॉझिट परत केले जाते. जंगलात होणारा प्लास्टीकचा कचरा कमी करण्यासाठी जंगलखात्याने ही अभिनव योजना चालू केली आहे.) त्यामुळे वासोटा किल्ल्याच्या परिसरामध्ये एका वर्षांत किती प्लास्टिकच्या बाटल्या जमा झाल्या असतील हे तेथील कर्मचारी डोळे बंद करून सांगू शकतात.
या स्वागतकक्षाजवळच कर्मचार्‍यांची दोन तीन घरे आहेत. सुट्टीच्या दिवशी गेल्यास ईथे ताक, सरबत वगैरे मिळू शकते.
Vasota 11
वन खात्याच्या कार्यालया मागून जाणारी वाट १५ मिनिटात एका छप्पर नसलेल्या मंदिरापाशी घेउन येते, इथेच मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते.
Vasota 12
सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. यानंतर पिण्याचे पाणी थेट गडावर उपलब्ध असल्याने त्यात हयगय करु नये.या संपुर्ण वाटेत वनखात्याने बर्‍याच प्रमुख वृक्षांची माहिती फलकांवर लावली आहे. हा अत्यंत उत्तम उपक्रम आहे.
Vasota 13
हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. अगदी दिवसाही सुर्यकिरण जमीनीवर न पोहचू देणारे हे सदाहरीत प्रकारचे जंगल, आपल्याला अफ्रिकेच्या जंगलांची आठवण करुन देते. या दाट वनराजीमुळे आपल्याला चढण्याचा थकवा अजिबात जाणवत नाही, साहजिकच वासोटा हा उन्हाळी भटकंतीसाठी उत्तम पर्याय आहे.
Vasota 14
ईथल्या काही वेलींच्या जाड फांद्या वाटेत आडव्यातिडव्या आलेल्या आहेत, त्यावर बसून मजेत झोके घेता येईल.
Vasota 15

Vasota 16

Vasota 17
या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. बर्‍याचदा आपण चढत असताना या वन्यप्राण्यांचे अस्तित्व झाडीत जाणवत असते. हि सर्व वाट वनखात्याने बर्‍यापैकी प्रशस्त केल्याने चुकण्याची फारशी शक्यता नाही.
Vasota 18
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. इथून नागेश्वर साधारण ३ कि.मी. असून साधारण पोहचण्यास १ ते १.५ तास लागतो.
Vasota 19
सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. इथे चुकू नये यासाठी मोठा फलक लावलेला आहे, शिवाय प्रशस्त कट्टा बांधून विश्रांतीची सोय केलेली आहे. यापुढची वाट पुर्वी अत्यंत घसरडी होती, आता मात्र वाटेची दुरुस्ती करुन जाण्यासाठी सोपी केली आहे. कारवीच्या रानातून साधारण अर्धा तास वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात.त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. या पायर्‍यांपासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळ एक हत्तीचे शिल्पही पडलेले दिसते.हा दरवाजा पाहून परत पाय‍र्‍यांनी वर चढल्यावर आपण वासोटा किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करतो. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे होते. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे
Vasota 20
दुसर्‍य़ा दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात.
Vasota 21
मारुतीच्या देवळाजवळच डावीकडे जाणार्‍या वाटेवर एक चुन्याचा घाणा पडलेला आहे.
Vasota 22
या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पूर्वेकडील बाजूस पोहोचतो. या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. इथून समोर वनकुसवडे पठार आणि त्यावर रात्रंदिवस चालणार्‍या पवनचक्क्या दिसतात.
Vasota 23
याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे.
Vasota 24
पाणी थोडे अस्वच्छ वाटले तरी पिण्यायोग्य आहे. ईथेच झाडीशेजारी जेवणाचा डबा सोडायला हरकत नाही.
Vasota 25
येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. वासोटा व जुना वासोटा याच्यामधे हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण करुन देणारा अर्धवर्तुळाकार "बाबु कडा" दिसतो.
Vasota 26
इथे पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. जुन्या वासोट्याच्या डोंगराचा थरांनी बनलेला खडक स्पष्ट दिसतो. त्याच्यामधे तांबुस रंगाचा पट्टा, ज्याला "रेड बोल्ट" म्हणतात, तो ही नजरेत भरतो. या रेड बोल्टमुळेच सह्याद्रीच्या गड किल्ल्यावर पाण्याची वर्षभर साठवण क्षमता निर्माण झाली आहे.
Vasota 27
जवळपास ८०० मीटर खोलीच हा बाबुकडा नवख्यांचे डोळे फिरवतो. इथून तोल गेल्यास आपण सातार्‍या जिल्ह्यातून थेट रत्नागिरी जिल्ह्यात कोसळतो. ;-)
याच बाबुकड्याच्या पायथ्यातून वसिष्ठी नदीचा उगम होतो, जी चिपळूणजवळ समुद्राला मिळते.
Vasota 28
अर्थात काळजीचे कारण नाही, कारण इथेही दगडी कट्टे बांधून सुरक्षितपणे हे निसर्गसौंदर्य अनुभवण्याची चांगली सोय केली आहे.
मारूती मंदिरापासून सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते.
Vasota 29
येथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात.बहुधा हा किल्लेदाराचा वाडा असावा. पूढे ही वाट कड्यापाशी जाते येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. वासोट्याची समुद्रसपाटीपासून ४२६७ फूट उंची इथे चांगलीच जाणवते.
परत मारुती मंदिरापाशी येउन उजव्या बाजूस जाणारी वाट पकडावी ही वाट ’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. या वाटेवर पहिल्यांदा डाव्या हाताला एक मोठा तलाव दिसतो.या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही.
Vasota 30
पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्याबाजूची वास्तू पाहायला मिळते.
Vasota 31
येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते.
Vasota 32

Vasota 33
या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. या ठिकाणच्या उध्वस्त तटबंदीची वनखात्याने उत्तम दुरुस्ती केलेली आहे. एकंदरीतच या गडाची निगा वनखात्याने उत्तम राखली आहे.

जुना वासोटा

नव्या वासोट्याच्या बाबु कड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात नाही. गडावर अवशेषही फारसे नाहीत. मध्यंतरी काही जणांनी जुन्या वासोट्याची पहाणी केली असता, त्यांना काही तटबंदीचे अवशेष आणि तोफा सापडल्या.
Vasota 34
या गडाकडे जाणार्‍या वाटा वनखत्याने अडथळे उभारुन बंद केल्या आहेत. हिच वाट पुढे माळदेव या धनगरवस्तीवरून खाली कोकणात तिवरे घाटाने तिवरे या गावात उतरते, तसेच कलावंतिणीच्या डाकेवरुन सापिर्ली या गावात उतरते. वासोट्यावरुन माळदेवला जायचे झाल्यास एक तासात रेडे घाट येतो, त्यानंतर एक तासात माळदेव येते. माळदेव गाव आता श्री. संजय कोकरे ( मो- ९७६५४७६६७५ ) यांची दोन घरे सोडली तर पुर्णपणे उठलयं. गावाची खुण म्हणून जुनी विहीर तेवढी आहे. याच तिवरे घाटातून पुर्वी नारळ, काजू, तांदूळ यांची आयात देशावर होई.

वासोटा - नागेश्वर ट्रेक :-

Vasota 35
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोट्यावरुन समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, तो खोटा (छोटा) नागेश्वर ( या सुळक्याला "तुळशी वृंदावन" तसेच "खोटा नागेश्वर" अशी नावे हल्लीच दिलेली दिसतात) ,वासोट्यावरील नागेश्वर फाट्यावरुन नागेश्वरकडे जाताना, सुरवातीला वाट गर्द झाडीतून आहे.
Vasota 36
( वासोटा नागेश्वर परिसराचा नकाशा )
पुढची वाटचाल मात्र दरीच्या टोकावरून काही पॅच थोडे घसार्‍याचे असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. या वाटचालीत कोठेही सावली नाही.
Vasota 37
त्याच्या पुढे दुरवर एक सुळका दिसतो त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे.
Vasota 38
इथून आपण एका सपाटीवर पोहचलो कि (जिथे चोरवण्याहून येणारी वाट मिळते तेथे) एक बोर्ड पाण्याच्या विहीरीची दिशा दाखवतो. उजवीकडून जंगलात जाणारी वाट नागेश्वर कुंडापाशी म्हणजेच विहीरीपाशी जातो. विहीर जाळीने झाकलेली आहे आणि पाणी पिण्यायोग्य आहे. या कुंडात वर्षभर पाणी असते.
Vasota 39
हजारो नागरिक दर शिवरात्रीला या पवित्र स्थानी दर्शनास येतात.याशिवाय श्रावणी सोमवारी ईथे दर्शनासाठी गर्दी असते.
Vasota 40
गुहेसमोर कोकणात कोसळणारा कडा, खालचे वशिष्ठीचे सुरेख खोरे न्याहाळण्यासाठी भोळा शंकर ईथे वस्तीसाठी आला पण भाविकांच्या श्रध्दापाशात कायमचा जखडला
Vasota 41

Vasota 42

Vasota 43
गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक शिवलिंगावर होत असतो. यासंदर्भात ईथे एक कथा सांगितली जाते, जर जोडप्याने नागेश्वराचे दर्शन घेउन शिवलिंगावर पानसुपारी धरायची, जर वरुन ठिपकणारे पाणी, पानावर पडले तर मुलगा अन्यथा मुलगी.
बहुतेक ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.
Vasota 44
( चोरवणे गावातून दिसणारा नागेश्वर सुळका )

या नागेश्वरवरुन परतण्यासाठी तीन पर्याय आहेत, १ ) आल्यामार्गाने परत, म्हणजेच गवांड म्हणजे गव्यासारखे पशु जाउन तयार झालेल्या वाटेने पुन्हा वासोट्याला जायचे.
२ ) पाण्याच्या विहीरीजवळून एक वाट थेट ओढ्याच्या मार्गे २ ते २.५ तासात मेट ईंदवलीला पोहचतो. अर्थात या वाटेवर फार वर्दळ नाही, त्यामुळे मोठा ग्रुप नसेल तर जाउ नये, तसेच शक्यतो एकत्र वाटचाल करावी. बर्‍याचदा इथे वन्यपशूंचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्यात. शिवाय वाट ओढ्याची असल्याने बरीचशी वाटचाल दगडधोंड्यातून करावी लागते.
Vasota 45
३ ) थेट कड्यात कोरलेल्या उभ्या उतरणार्‍या वाटेने एक वाट कोकणात चिपळूण तालुक्यातील चोरवणे गावी उतरते, चोरवण्यावरुन चिपळूणला जाता येते. तसेच या वाटेने खोपीवरुन खेडला जाता येते.
Vasota 46
वाट खडी आणि घसार्‍याची असल्याने सुरवातीला रेलिंग लावलेले आहेत. या वाटेवरुन २.५ ते ३ तासात चोरवण्यात पोहचतो.
Vasota 47
चोरवणे गावातून दिसणारा पॅनोरमिक व्ह्यु. ( १. वासोटा २. जुना वासोटा ३.बाबु कडा ४.तुळशी वृंदावन सुळका ५. नागेश्वर ३. कडा )
एकुणच वासोटा - नागेश्वर ही दोनही ठिकाणे कोयना अभयरण्यात असल्यामुळे रात्री राहाण्यास परवानगी नाही. तरी आणिबाणीच्या वेळेला खालील ठिकाणी मुक्काम करता येईल.
वासोट्याला रहाण्याची परवानगी नसली तरी आणिबाणीच्या परिस्थितीत रहाण्यासाठी
१) वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते.
२) वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
३) नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.
एकूणच पावसाळा सोडला तर अरण्यभ्रमंती, वन्यजीवदर्शन, नौकाविहाराचा आनंद, एतिहासिक गडाची सफर, दत्तमंदिराचे दर्शन, तापोळ्याच्या वॉटरस्पोर्टची जंमत, बामणोलीचे ग्रामीण आदरातिथ्य असे सध्याच्या भाषेत "कम्प्लिट पॅकेज" असणार्‍या वासोट्याला जरुर भेट द्या.

( या धाग्यातील बोटीचे दर व ईतर माहितीसाठी बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबचे चेअरमन श्री. संजय शिंदकर यांनी विशेष सहकार्य केले त्याबध्दल त्यांचे आभार )
( तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साथ सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) आव्हान - आनंद पाळंदे
६ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) https://yorocks.wordpress.com हा ब्लॉग

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

13 Apr 2018 - 11:54 am | दुर्गविहारी

१ एप्रिल २०१७ ला गंभीरगडावर पहिला धागा लिहून मि.पा.वर लिखाणाची सुरवात केली. त्यानंतर आजचा हा पन्नासावा धागा. सध्या फार ट्रेक होत नाहीत, पण मि.पा.वरच्या लिखाणाने पुन्हा एकदा त्या गडावर मनाने जाणे होते.
आतंरजालावर शोध घेतला तर रायगड, राजगड, पुरंदर, सिंहगड अश्या किल्ल्यावर विपुल लिखाण सापडते. मात्र महाराष्ट्रातील जवळपास ४५० किल्ल्यांपैकी अनेकाची नावेही कोणी एकली नसतात. या उपेक्षितांचे अंतरंग दाखवावेत म्हणून अनवट किल्ले हि मालिका लिहायला सुरवात केली. बर्‍याच धाग्यांनी खुपच चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या आय.डीं.चे लेखन वाचून मि.पा.वर रमलो त्यांनीही माझ्या काहीशा अनगड लिखाणाचे कौतुक केले. कित्येकांनी प्रत्येक धाग्यवर हजेरी लावून सतत प्रोत्साहन दिले. या सर्वांचे आभार न मानता केवळ ॠणात रहाणे पसंद करेन. काही धागे शिफारसमधे आले, हा सन्मान दिल्याबध्दल साहित्य संपादकांचे आभार. माझ्या लिखाणाला मंच उपलब्ध करुन दिल्याबध्दल मि.पा. चा ऋणी.
यापुढेही तुम्ही सगळे जण मला लिखाणाला प्रोत्साहीत कराल अशी आशा करतो.

सिरुसेरि's picture

13 Apr 2018 - 1:18 pm | सिरुसेरि

अर्धशतकाबद्दल अभिनंदन . माहितीपुर्ण वाचनीय वर्णन आणी फोटो .

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Apr 2018 - 1:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! भटकंती धाग्यांच्या अर्धशतकासाठी हार्दीक अभिनंदन ! हा धागाही नहमीप्रमाणेच सुंदर आहे.

कपिलमुनी's picture

13 Apr 2018 - 4:15 pm | कपिलमुनी

पुर्वि इथे जळवांचा त्रास व्हायचा सध्या कल्पना नाही

उत्तम लेख. उपयुक्त माहिती दिली आहे. वाचनखूण साठवतो. वासोट्याला जायचा योग्य बऱ्याच वर्षांपूर्वी आला होता. तेव्हा वनखात्याचा एव्हढा त्रास नव्हता आणि वासोट्याला मुक्काम सहज करता येत असे. परंतु काही कारणांनी जाऊ शकलो नाही. तेव्हापासून वासोटा करायचा राहून गेला तो गेलाच. असो. आता या लेखातील माहितीचा वापर करून जाऊन येईन. धन्यवाद!

फुटूवाला's picture

13 Apr 2018 - 7:59 pm | फुटूवाला

हा धागा ही छानच..

सोमनाथ खांदवे's picture

14 Apr 2018 - 3:11 pm | सोमनाथ खांदवे

तुमच्या लेखा मुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या .साधारण पणे 30 वर्षा पूर्वी आम्ही चार पाच मित्र वासोट्या ला गेलो होतो बामणोली मार्गे . त्या वेळी वनविभाग ची परवानगी हा विषय च नव्हता . लॉन्च मधून उतरले की सरळ वाटाड्या चे मागे चालायला सुरुवात करायची . विशेष म्हणजे त्यावेळी स्पोर्ट्स शूज सारखी चंगळ परवडत नसे , बारा ही महिने पायात स्लीपर असायच्या त्यामुळे आता कळतंय की स्लीपर वर ट्रेक करने किती अवघड असते .

अतिशय सुरेख किल्ला.
साधारण वीसएक वर्षांपूर्वी वासोटा पाहिला होता. तुमचा लेख वाचून त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या.
तुमच्या मुळे वासोट्याचा रोचक इतिहासही समजला
पैजारबुवा,

अभिजीत अवलिया's picture

14 Apr 2018 - 4:57 pm | अभिजीत अवलिया

उपयुक्त माहिती .

तेजस आठवले's picture

14 Apr 2018 - 6:12 pm | तेजस आठवले

फारच अप्रतिम लेख, विषय, किल्ला, प्रकाशचित्रे आणि वर्णन. नेहमीप्रमाणे सुंदर लिखाण.
एकूणच गर्द वनश्री पाहून ही जागा अशीच अस्पर्श राहावी ही इच्छा.
तुमचे लेखन वाचून जे ह्या गडकिल्ल्यांवर जाऊन आलेले आहेत त्यांना त्या आठवणी आणि आनंद मिळत असेल. ज्यांची जायची इच्छा आहे त्यांना प्रेरणा मिळते आणि आमच्या सारखे काही लोक ज्यांना असे फिरणे शक्य नाही त्यांना आयुष्यात काहीतरी चांगले बघायचे राहून गेल्याची हुरहूर वाटते. मला वाटते हेच तुमच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.

पैसा's picture

14 Apr 2018 - 6:58 pm | पैसा

जवळपास आठवड्याला एक या सातत्याने किल्ल्यांची ओळख करून देत आहात! खूप धन्यवाद!! देव करो आणि सगळ्या ४५० किल्ल्यांची ओळख तुमच्या हातून होवो.

रीडर's picture

16 Apr 2018 - 3:57 am | रीडर

खूप छान लेख

वासोट्यावर इतका तपशीलवार लेख पहिल्यांदाच वाचला. जबरदस्त झालाय.

_/\_

ही तारीख बहुतेक चुकली आहे कारण ती शिवकाळात येत नाही - १६६९ पाहिजे?

शनिवार, २७ सप्टेंबर १६८९

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार.
एस सर वासोट्याला शक्य तितक्या लवकर जाउन या असाच सल्ला देईन. खांदवे साहेब आणि ज्ञानोबाचे पैजार साहेब माझ्यामुळे आपल्या आठवणी जाग्या झाल्या याचा खरच आनंद आहे. अभिजित अवलिया, तेजस आठवले, रिडर, अर्धवटराव आणि वल्लीदा धन्यवाद. मिसळपावच्या माध्यमातून शक्य तितक्या किल्ल्यांची आणि इतर ठिकाणांची माहिती लिहीण्याचा प्रयत्न करेन.
मनो साहेब चुक निदर्शनास आणून दिल्याबद्धल धन्यवाद, धाग्यात दुरुस्ती केली आहे. आणि फटूवाला आभार मानणार नाही. ;-)

यशोधरा's picture

29 Apr 2018 - 12:27 pm | यशोधरा

सुरेख!! वासोटा ट्रेकच्या आठवणी जाग्या केल्या तुमच्या लेखाने.
फोटोही आवडले. कधीकाळी पुस्तक प्रकाशित केलेत तर जरूर कळवा, मी घेईन.

दुर्गविहारी's picture

3 May 2018 - 10:35 am | दुर्गविहारी

धन्यवाद यशोधरा ताई. आपले नेहमीच प्रोत्साहन मिळते. पुस्तक हातून लिहून होईल कि नाही ते माहिती नाही, पण कधी काळी झालेच तर त्याची एक प्रत माझ्यातर्फे आपल्याला भेट असेल. :-)