ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ४ - अंगकोर थोम आणि बायोन मंदिर

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in भटकंती
27 Jan 2018 - 3:15 am

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ४ - अंगकोर थोम आणि बायोन मंदिर.
भाग १
भाग २
भाग ३
 

जयवर्मन् सातवा
अंगकोर वाटच्या ३ किमी उत्तरेस ’अंगकोर थोम’ (महान् नगर) नावाचे जुने नगर आहे. ३ गुणिले ३ कि.मी.च्या ह्या क्षेत्रात त्यापूर्वी ’यशोधरपुर’ नावाचे नगर होते पण पूर्वेकडून चम्पा देशाने आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. (पूर्वेकडून चम्पा - आजचे वियेतनाम - आणि पश्चिमेकडून अयुथाया - आजचे थायलंड - हे ख्मेर साम्राज्याचे अनेक शतकांचे स्पर्धक होते. ती स्पर्धा अजूनहि संपलेली नाही.) जयवर्मन् सातवा (११२५-१२१८, राज्यकाल ११८१-१२१८) ह्या पराक्रमी ख्मेर सम्राटाने चम्पा राज्याचा पराभव करून ख्मेर राज्याचा विस्तार केला. त्यानेच ’अंगकोर थोम’ हे नगर वसवून तेथे ’बायोन’ मंदिर बांधले. हा राजा थेरवादाचा अनुयायी होता आणि त्याच्या काळामध्ये ह्या बौद्धधर्माला त्या प्रदेशामध्ये मोठी उभारी मिळाली. ब्राह्मणी हिंदु धर्माचा ख्मेर साम्राज्यातील पगडा कमी होऊन त्याची जागा थेरवादाने घेण्याची प्रक्रिया ह्या राजापासून सुरू झाली. बायोन मंदिर बुद्धालाच वाहिलेले आहे.

बायोन मंदिराकडे जाण्याचा रस्ता अंगकोर थोमच्या दक्षिणेकडील भिंतीमधील प्रवेशद्वारामधून जातो. भिंतीबाहेर पाण्याने भरलेला खंदक आहे आणि त्यावरील पूल दक्षिण प्रवेशद्वारामधून जातो. पुलाचे दोन बाजूचे कठडे म्हणजे समुद्रमन्थन करणार्‍या असुर आणि देवांच्या प्रतिकृति आहेत.
 


अंगकोर थोमचे दक्षिण प्रवेशद्वार आणि समुद्रमन्थन करणारे असुर
 

अंगकोर थोमचे दक्षिण प्रवेशद्वार - जवळून दृश्य

 


समुद्रमन्थन करणारा असुर - जवळून दृश्य

 


समुद्रमन्थन करणारे असुर

 

प्रवेशद्वाराच्या शिखरावर चार बाजूंनी चार मुखे दिसत आहेत. ही कोणाची मुखे आहेत ह्याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते ही मुखे ’अवलोकितेश्वर’ ह्या विश्वाकडे करुणार्द्र दृष्टीने पाहणार्‍या बोधिसत्त्वाची - बुद्धाचा जन्मपूर्व एक अवतार - आहेत. अन्य अभ्यासक असे मानतात की सम्राट् जयवर्मन् सातवा हा आपल्या सर्व प्रजेवर दयेची कृपादृष्टि ठेवून आहे असे दाखविणारे हे प्रतीक आहे. ह्या मुखांच्या ओठावर एक किंचितसे स्मितहास्य जाणवते. ह्या गूढ अर्धस्मितहास्याचे फ्रेंच अभ्यासकांनी 'Khmer Smile' असे नामकरण केले आहे.

प्रवेशद्वारामधून नगरात शिरल्यावर सुमारे एक कि.मी. अंतरावर ’बायोन’ ह्या बुद्धाला वाहिलेल्या मंदिराचे अवशेष दिसतात. मंदिर अनेक पातळ्यावर असून जवळजवळ पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहे तरीहि मंदिरातील अनेक शिखरे आपल्या ’ख्मेर हास्य’ खेळविणार्‍या मुखांनी आपले लक्ष वेधून घेतात.
 


बायोन मंदिराची शिखरे

 


बुद्ध भिक्खू

 


Khmer Smile

 

बायोन मंदिरातील विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये शिरतांना दोन्ही बाजूंना कोरलेली भित्तिशिल्पे. यशोधरपुरावर चढाई करून ते नगर उद्ध्वस्त करणार्‍या चम्पा राज्यावर सातव्या जयवर्मन् ह्याने स्वारी केली आणि तोन्ले साप तलावावरील नाविक युद्धामध्ये त्यांचा पराभव करून त्यांना राज्याबाहेर काढले. हा विजय भित्तिशिल्पांमधून आपणास दिसतो. त्याशिवाय ख्मेर सैन्यातील सैनिक, सामान्य ख्मेर प्रजाजन आणि त्यांचे दैनंदिन जीवन ह्यांचेहि मनोवेधक चित्रीकरण ह्या भित्तिशिल्पांमधून केले गेले आहे. पुढील सात भित्तिशिल्पांमधून युद्धासाठी सज्ज ख्मेर सैन्य, त्याचे युद्धभूमीकडे प्रस्थान, ख्मेर विरुद्ध चम्पा ही नाविक लढाई, ख्मेर सैनिक आणि चम्पा सैनिक ह्यांच्यातील युद्ध, सैन्याचा शिधासामुग्री पुरवठा आणि सैन्याबरोबर जाणारे कुटुंब अशी दृश्ये दिसत आहेत.
 

गजारूढ जयवर्मन् सातवा आणि सैन्य

 


अश्वारूढ सेनानी

 


दोन अश्वारूढ सैनिकांमधील युद्ध - दोघांपैकी एक घोड्यावरून खाली पडत आहे.

 


ख्मेर-चम्पा नौयुद्ध - वल्ही आणि सुकाणूधारक

 


ख्मेर आणि चम्पा सैनिकांमधील हातघाईची लढाई

 


सैन्यासाठी साधनसामुग्री

 


सैन्यासोबत निघालेले कुटुंब, बरोबर त्यांचे दोन कुत्रेहि आहेत.

 

ह्यापुढील चित्रांमध्ये ख्मेर कुटुंबांचे दैनंदिन जीवन दिसत आहे.
 

बाजार

 


पाकसिद्धि

 


मेजवानीची तयारी

 


सूकरमांस, शेजारी रिब्ज उघड्या जाळावर शेकत आहेत

 


शिक्षकासमोर विद्यार्थी

 


झुंजणारे कुत्रे

 


झुंजणारे कोंबडे

 


बुद्धिबळ किंवा तसलाच काही पटावर खेळायचा खेळ

 


आसन्नप्रसवा स्त्री

 

अंगकोरमधील सर्व मंदिरांमधून जागोजागी दिसणार्‍या ’अप्सरां’च्या वर्णनाशिवाय अंगकोरचे कोठलेच वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. ह्या सर्व शिल्पांमधून मोकळ्य़ा जागांवर सुंदर अनाम स्त्रियांची चित्रे कोरलेली असतात. त्यांची वस्त्रे, केशभूषा, उभे राहण्याची पद्धत एका प्रकारची असते आणि त्यांना ’अप्सरा’ अशा सर्वसामान्य नावाने ओळखले जाते. त्या अप्सरांसारख्याच आधुनिक अप्सरा पारंपारिक कंबोडियन नृत्य करून परदेशी प्रवाशांचे मनोरंजन करत असतात आणि असे नृत्य पाहाणे हा तेथील प्रवासी अनुभवाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. 'APSARA" हे एक Acronym हि आहे आणि त्याचे पूर्ण रूप Authority for the Protection of the Sites and Administration of Angkor असे आहे. बायोन मंदिरातील दोन अप्सराशिल्पे आणि अप्सरानृत्याची दोन छायाचित्रे खाली दाखवत आहे.
 

अप्सरा

 


अप्सरा

 


पारंपारिक अप्सरा नृत्य

 


पारंपारिक अप्सरा नृत्य

 

बायोन मंदिरापासून जवळच सातव्या जयरामन् सम्राटाचा राजप्रासाद होता पण त्याचे कसलेहि अवशेष आता उरलेले नाहीत. राजवाडा ज्या चौथर्‍यावर उभा होता तो चौथरा आणि त्याच्यापुढील विस्तीर्ण पटांगण गतवैभवाची आठवण करून देतात. ह्या पटांगणाचा उपयोग राजाकडून सैन्याची पाहणी करणे, गजदलाचे प्रदर्शन, हत्तींच्या साठमार्‍यांसारखे खेळ करण्याची जागा ह्यांसाठी केला जात असावा कारण चौथर्‍याच्या उभ्या भिंतींवर खर्‍या हत्तीच्या उंचीइतकी हस्तिशिल्पे, तसेच चौथरा उचलून धरणारे गरुड असे दाखविले आहेत. ह्या चौथर्‍याला Leper King's Terrace असेहि ओळखले जाते. असे नाव पडण्याचे कारण म्हणजे चौथर्‍यावर एक बसलेला पुतळा सापडला. तो त्यावर वाढलेल्या शेवाळामुळे विद्रूप दिसत होता. यशोवर्मन् पहिला (इ.स. ८८९ - ९१०) ह्या राजाला महारोग जडला होता अशी कंबोडियन समजूत आहे. सापडलेला विद्रूप पुतळा ह्या राजाचाच असावा अशी समजूत होऊन पुतळा जेथे सापडला त्या चौथर्‍याला Leper King's Terrace असे नाव पडले, जे अजूनहि वापरात आहे. कालान्तराने आधुनिक उपायांनी पुतळा साफ केल्यावर तो यमदेवाचा आहे असे दिसून आले. पुतळा आता तेथून हलवून राजधानीतील राष्ट्रीय संग्रहालयामध्ये ठेवण्यात आला आहे पण हलण्यापूर्वी पुतळ्याने चौथर्‍याचे Leper King's Terrace हे नाव मात्र निश्चित केले आहे. ही वर्णिलेली दृश्ये आता पाहा.
 

चौथर्‍याचे आधारभूत गरुड आणि हनुमान्

 


चौथर्‍याचे आधारभूत गरुड आणि हनुमान्

 


चौथर्‍याचे आधारभूत हत्ती

 


हत्ती - जवळून दृश्य

 

अखेरच्या ह्या पुढील भागामध्ये अंगकोरच्या उत्तरेकडील कुलेन टेकड्यांमधील तोन्ले साप नदीच्या उगमाजवळ आणि नदीच्या पाण्यामध्ये कोरलेली शिल्पे आणि नॉमपेन्हच्या राष्ट्रीय संग्रहालयातील काही वित्रे पाहून ही लेखमाला संपवू.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Jan 2018 - 8:53 am | प्रचेतस

हा भागही प्रचंड आवडला. शिखरांवरील मुखे प्रचंड सुंदर आहेत. तत्कालीन संस्कृतीचे सुरेख दर्शन ह्या शिल्पपटांद्वारे होते आहे.

विलक्षण अप्रतिम आहे! या सुंदर लेखमालेसाठी तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. पुभाप्र.

उपेक्षित's picture

27 Jan 2018 - 12:17 pm | उपेक्षित

हि लेखमाला संपूच नये असे वाटत आहे, अभ्यासपूर्ण लेखन _/\_

पगला गजोधर's picture

27 Jan 2018 - 5:54 pm | पगला गजोधर

लेखं छान !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2018 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली लेखमाला. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

28 Jan 2018 - 11:28 pm | अर्धवटराव

__/\__

दुर्गविहारी's picture

31 Jan 2018 - 11:21 am | दुर्गविहारी

मस्तच माहिती आणि फोटो. जेम्स बाँडच्या कोणत्यातरी चित्रपटात पाहिल्यासारखे वाटते.

हा भागही आवडला. शिल्पांच्या फोटोंना वर्णनाची उत्तम जोड आहे.
पुभाप्र

शलभ's picture

11 Feb 2018 - 2:24 pm | शलभ

अप्रतिम लिखाण.