...उर्फ सुगरणीचा सल्ला : पोळ्या - एक अर्वाचीन छळ

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी.

आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच.

पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे. पण नाही आवडत मला पोळीची चव. फाशी देणार आहात? द्या. तरीही बाणेदारपणे हेच्च सांगीन. मला पोळी आवडत नाही. हरितक्रांतीनंतर शिरजोर होऊन बसलेल्या कणीक या फ्याशनेबल अर्वाचीन पदार्थाचा वास, पोत, चव, रंग यांतलं काहीच मला प्रिय नाही. कणीक भिजवायला घेतल्या-घेतल्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर त्या पिठाला एक प्रकारचा उबदारपणा आणि मग सूक्ष्म बुळबुळीतपणा येतो, तिथपासून ते तव्यावरची पोळी उलटताना पोळीतून कणकेच्या वाफेचा एक भपकारा येतो, तिथपर्यंत. कोण ते, ग्लूटेन ग्लूटेन म्हणून ओरडतंय? वैज्ञानिक स्पष्टीकरण गेलं गाढवाच्या गावात. आत्ता-आत्ता साठच्या दशकापर्यंत ज्वारी-बाजरी-तांदुळाचा भाकरतुकडा खाऊन आपण ढेकर देत असू आणि अगदी आजही आपल्या पितरांना घालायला कणकेच्या बाट्या न भाजता भाताचे पिंडच शिजवतो हे पोळीमाहात्म्य गाणारे लोक विसरले असतील. मी नाही विसरलेय.

आप्ल्याला-आव्डत-नाई.

कबूल आहे. हा व्यक्तिगत चवीढवीचा-आवडीनिवडीचा मामला आहे. वास्तविक इतक्या क्षुल्लक नावडीमुळे मी पोळीला इतकं खलनायकी फूटेज दिलंही नसतं. पण ‘पोळी आवडते-केली-खाल्ली-ढेकर दिली-गपगुमान झोपलं’असं करून लोक थांबत नाहीत. ते पोळीचे देव्हारे माजवतात.

तुम्ही स्वतः कधी पोळी करून पाहिली आहे का? ‘आज जेवायला काय ऑस्ट्रेलिया आहे की इंडोनेशिया?’छाप थुतरक निष्क्रिय वरवंटा विनोदांचा वीट येऊन मी पौगंडावस्थेतच माझं बंडनिशाण फडकवलं होतं, ‘मला पोळी आव्डत नाही. मी कर्णार नाही.’ मला कुणी तसा पर्याय दिला, तर मी जन्मभर भात बोकाणून माझ्या कोस्टल एलिमेंटीय पूर्वजांना मोक्ष मिळवून देईन याची जाणीव 'आकाशवाणी'ला असल्यामुळे तिकडून कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम आला नाही. एवढ्यावरच माझे आणि पोळीचे संबंध थांबू शकले असते. पण एका मैत्रिणीच्या आईचं एक चतुर मत ऐकलं आणि मी थोडा पुनर्विचार करायला सुरुवात केली. तिचं म्हणणं होतं, "कुठे कुणाच्या स्वैपाकघरात मदतीला उभं राहायची वेळ आलीच, तर मी दणादण पोळ्या करून टाकते. मीठ कुठे गं, तिखट कुठे गं, तेल कुठे गं नि साखर कुठे गं, असल्या ताशी छप्पन्न विचारणा करायला अडून न बसता एकठोकी काम होतं आणि शिवाय 'केवढ्या पोळ्या लाटल्यात बाई!' असं एक हातासरशी गुडविल तयार होतं, जे नंतर वाढण्यासारखं भावखाऊ आणि तापदायक काम निघाल्यावर हक्कानं हॉलमध्ये पाय पसरून गप्पा ठोकायला नैतिक बळ पुरवतं." हे फारच बरोबर आणि सोयीस्कर होतं. त्यामुळे आपल्याला ही कृती शिकून टाकली पाहिजे, असं माझ्या मनानं घेतलं.

इथून पुढे रानावनांनी, काट्याकुट्यांनी, दर्‍याखोर्‍यांनी आणि श्वापदांनी भरलेला प्रदेश सुरू होतो. सावधान.

पहिला धडा: 'डिसाइड अ‍ॅज वी गो' हा पर्याय घेऊन कधीही कणीक भिजवायला घेऊ नये.

इतकी कणीक, इतकं पाणी, इतकं तेल, इतकं मीठ अशी सुनिश्चित, मोजणेबल प्रमाणं तय्यार हवीत. नपेक्षा 'मी कर्णार नाही, मला आव्डत नाही' मोडवर जाणं श्रेयस्कर. प्रमाणं नसली तर अनेक अभिजात आणि कंटाळवाणे गोंधळ होऊ शकतात. पीठ-पाणी-पीठ चिकट-पुन्हा पीठ-पीठ कोरडं-पुन्हा पाणी.... ही साखळी कितीही काळ चालू राहू शकते. कोणत्याही प्रकारचं पीठ भिजवणं या कृतीबद्दल क्रॉनिक नफरत पैदा होऊ शकते. तुम्ही पुरेसे निर्ढावलेले नसाल, तर घरी येणार्‍या भोचक मोलकरणीपासून आकाशवाणीपर्यंत अनेक जण तुमचं मनोधैर्य आणि ज्ञानपिपासा नेस्तनाबूत करू शकतात. हे टाळायचं असेल, तर प्रमाण वाजवून घ्यावं. मी हे शिकण्यासाठी माझ्या गिनिपिगांना मात्र प्लाष्टिकी ते इलाष्टिकी अशा सग्ग्ळ्या पोळ्यांतून जावं लागलं. असो. बाकी नुसतं प्रमाण कळून उपयोग नसतो. नक्की काय नि कसं केलं की पोळ्या 'मऊसूत, रेशमी, तलम' होतात त्याबद्दल बाजारात जे सल्ले मिळतात, ते सगळे ऐकायचे म्हटले तर आपण पोळ्या करणार आहोत, की काडेपेटीत राहू शकणारी नि अंगठीतून बाहेर निघू शकणारी ढाक्क्याच्या मलमलीची साडी विणणार आहोत अशा गोंधळात पडण्याचा धोका असतो. कुणी म्हणतं, आधी पाणी घालावं. कुणी म्हणतं, आधी तेल घालावं. कुणी साजूक तुपावर अडून असतं. एका बाईंनी सांगितलं होतं, की आधी पीठ चाळून घ्यावं. मग त्यावर चमच्या-चमच्यानं तेल सोडावं, थोडं मीठ भुरभुरवावं आणि मग सगळ्या पिठाच्या कणांना ते तेलमीठ लागेल अशा प्रकारे पीठ दोन्ही हातांनी नीट चोळून घ्यावं. मग लागेल तसतसं किंचित कोमट पाणी घालत.... होय. संताप होऊ शकतो. बरोबर आहे. तर - ते सल्ले फाट्यावर मारून आपली स्वतःची अशी एक क्रमवार कृती निश्चित करून घ्यावी आणि कणीक भिजवावी. गोळा म्हणता येईल, अशा प्रकारचं काहीही जमलं म्हणून खूश होऊन हात धुण्यातही अर्थ नसतो. तो गोळा भिजवून, दहा मिनिटं झाकून ठेवून, मग स्वच्छ धुऊन कोरडं केलेलं बोट त्या गोळ्याच्या पोटात खुपसलं असता - अ) जोर न लावता बोट सहज आत गेलं पाहिजे आ) बोटाला कणीक न चिकटता तेलाचा अंश आला पाहिजे. हे जमणं अत्यंत क्रिटिकल आहे, कारण त्यातल्या अपयशाचे परिणाम पोळी मरेस्तोवर मिरवणार असते. ते जमल्यावर पुढची पायरी. पोळ्या लाटणे.

दुसरा धडा: विनोद डोक्यात जाण्याच्याच लायकीचे असले, तरीही पोळी गोल होणंच मानसिक-शारीरिक-भौतिक-आर्थिक-सामाजिक अशा सर्व बाजूंनी सोयीस्कर असतं.

या पायरीवरही बाजारात अनेक सल्ले मिळतात. कणकेच्या गोळ्याची गोल लाटी करून ती थेट लाटावी; तिचा लंबगोल लाटून मग तिला चिमटा काढावा आणि दोन्ही अर्धुकांत तेलाचा ठिपका टेकवून ती अर्धुकं मिटवावीत व मग त्याची पोळी लाटावी; तिचा लहान गोल लाटून मग त्यावर तेल लावावं, अर्धी घडी करावी, पुन्हा तेल लावावं आणि चतकोर घडी करावी नि ही नानसदृश घडी लाटून गोल करावी (अगदीच वेळ जात नसेल, तेव्हा ही कृती करण्यासारखी आहे. टोकं वाढत वाढत समभुज-समद्विभुज-विषमभुज असे नाना प्रकारचे त्रिकोण मिळणं, भलत्या ठिकाणी पोळी जाड होऊन बसणं, भलत्या ठिकाणी ती अर्धपारदर्शक होऊन पोळपाट दिसू लागणं या सामान्य लिळा तर साधतातच. पण विशेष एकाग्रता साधलीत, तर आपल्या दिशेच्या पोळपाटाच्या अर्धवर्तुळाभोवती कबड्डीपटू फिरतात तसं गोलगोल फिरत पोळीला चुचकारण्यासारखा नाच-ग-घुमा खेळप्रकारही अनुभवायला मिळू शकतो. असो.); मधे तुपाचं बोट फिरवावं; तेल आणि पीठ यांची पेस्ट लावावी... होय, इथवर आल्यावर मला क्षणभर भीती चाटून गेली, की 'पटकन पंचामृताचं मिश्रण करून ते चटकन ब्रशनं हलक्या हातानं लावून घ्यावं' असंही कुणीतरी सांगायचं. पण मग मी सावरले आणि फाटा जवळ केला. लोकांना चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ट... अशा कितीही घड्या घालून, त्यात तेल-तूप-मध-लोणी-मस्का-मेयॉनीज काय वाट्टेल ते घालून, त्याच्या पोळ्या लाटून, मग त्यांचे पदर सोडवण्याचे अश्लील चाळे करण्यासाठी वेळ असतो. आपण असल्या वायझेड उद्योगात पडायलाच हवं असं नाही. त्यामुळे मी गपचूप एक लाटी घेतली, भरपूर पीठ घेतलं आणि लाटणं फिरवलं. पोळी गोल झाली. इथे मी पहिला विजय मानला. सी, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट?! पण यानं होतं काय, की तुम्ही गाफील राहू शकता. तसं न होऊ देता लक्ष्यात ठेवायचं असतं, की एकच पोळी गोल होता उपयोगी नाहीय. शिवाय ती सगळीकडे एकसारख्या जाडीची असली पाहिजे. तिच्यावर इतकंही पीठ नको, की ती तव्यावर टाकताना आजूबाजूला खकाणा उडेल. पुढेही उरलेल्या पोळ्या याच दर्जाच्या नि आजच व्हाव्यात इतकाच वेळ आणि धीर आपल्याला या पोळीसाठी उपलब्ध आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या पोळीपर्यंत 'पोळी नीट लाटणे' या एकाच कृत्याचे पालक असलेल्या आपल्याला आता 'पोळी लाटणे' आणि 'पोळी भाजणे' ही जुळी कार्टी जोपासायची गोड कामगिरी करायची आहे. हे सगळं नीट करायचं असेल, तर पोळी गोल असणं सर्वाधिक रास्त आणि कमी कष्टाचं ठरतं.

तिसरा धडा: जगाची इंधनबचन गेली खड्ड्यात, तव्याखालची आच काही-केल्या कमी करायची नाही.

पोळी पापडासारखी कडक किंवा मैद्याच्या थंडगार रोटीसारखी चामट व्हायला नको असेल, तर व्यवस्थित तापलेल्या तव्यावर कमीत कमी वेळात पोळी भाजून होणं अत्यावश्यक असतं. उमेदवारीच्या काळात पोळपाटावरची पोळी गोल, आवश्यक तेवढी पातळ, एकसारख्या जाडीची, अगदीच लाज वाटणार नाही इतपत मोठ्या आकाराची आ.....णि पोळपाटाला वा लाटण्याला न चिकटणारी करण्यालाच मी पोपटाचा डोळा मानला होता. त्यामुळे झाली काय गंमत, की तव्यावर टाकलेल्या पोळीनं थेट तव्याशी काटा भिडवला. त्यांचं लफडं चांगलंच गरम होऊन धूर यायला लागल्यावर मला परिस्थितीचं भान आलं. पण तोवर पोळी मरून पडली होती. पुढच्या पोळीला हे टाळायचं म्हणून तव्यावर डोळा ठेवून बसले. परिणामी ती पोळी भाजून झाल्यावर तव्यावर वेकन्सी निर्माण झाली ती झालीच. तिकडे पुढची कच्ची पोळी पडेस्तोवर तवा इतका गरम झाला होता, की.... असो. तर टायमिंग इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स हिअर. गरम तव्यावरच पोळी भाजायची, चटकन भाजायची आणि ती भाजून होईस्तो खाली पोळपाटावर दुसरी पोळी तयार ठेवायची.

हे सगळं नीट जमलं, तर पोळीला काही भवितव्य असू शकतं.

आता मला सांगा, हे मुदलात किती लोकांनी करून जमवलेलं असतं? अर्धी लोकसंख्या तर सरळच बाद. या बाबतीत ते अत्यंत कुचकामीच असतात. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला कदाचित स्वानुभव असू शकतो. पण तरीही पोळ्यांचं सांस्कृतिक महत्त्व हे लोक ज्या प्रमाणात वाढवून ठेवतात, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. उदाहरणार्थ -

मिथ क्रमांक एक: पोळीमुळे पोषण होतं.
हा काय फंडा आहे? पोळीमुळे होतं ते पोषण आणि इतर अन्नधान्यांमुळे काय उपोषण होतं काय? एकदा एका मित्रदाम्पत्याचा त्यांचा लेकीशी चाललेला संवाद ऐकला होता. त्या लेकराला भात जेवायचा होता. आणि दाम्पत्य पोळीवर अडून होतं. म्हणजे लक्ष्यात घ्या, भाजी विरुद्ध पिष्टमय पदार्थ, प्रथिनं विरुद्ध पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ विरुद्ध पिष्टमय पदार्थ - असं या लढ्याचं स्वरूप नव्हतं. एक पिष्टमय पदार्थ विरुद्ध दुसरा पिष्टमय पदार्थ असं ते होतं. काय लॉजिक आहे? तर पोळी खाल्ली की पाय दुखत नाहीत हे मित्राच्या सासूबाईंचं ठाम मत. आपण जगात मूल आणलं, तर आणि तेव्हा त्याला अन्नाच्या बाबतीत इतपत तरी निर्णयस्वातंत्र्य असेल अशी शपथ मी मनातल्या मनात वाहिली, ती तेव्हा. भलेही ते पोळी का खायला मागेना! मी ती देईन.

मिथ क्रमांक दोन: भातानं वजन वाढतं, पोळी खावी.
इथे मी भिवया उंचावून रोखून पाहते आहे असं कल्पावं. म्हणजे, हॅलो? सगळा दक्षिण भारत एव्हाना वजनवाढीचे रोग होऊन ठार नसता झाला अशानं? बासमती सोडून भाताच्या इतर जाती असतात, त्यात कोंडा असतो, चमक नसलेली आवृत्ती खाल्ली तर बी जीवनसत्त्व मिळतं, शिवाय आपण जे उष्मांक गिळतो ते जाळले नाहीत, तर कणकेचे गोळे गिळूनही वजन वाढतंच… वगैरे वगैरे सामान्यज्ञान वाटलं जात असतं तेव्हा हे लोक नक्की कुठल्या पिठाच्या चक्कीसमोर गव्हाचे डबे घेऊन उभे असतात?

मिथ क्रमांक तीन: पोळीभाजी हेच सर्वोत्तम अन्न आहे.
डोंबलाचं सर्वोत्तम अन्न. वैविध्य या गोष्टीची इतकी मारून ठेवणारं याच्याइतकं रटाळ, नीरस, कंटाळवाणं जेवण दुसरं कुठलं असूच शकत नाही. किंबहुना माझं तर असं मत आहे की अन्नाचा फार लळा मुदलातच लागू नये म्हणून शाळांमध्ये हेच जेवण देण्याची काळजी पहिल्यापासून घेत असावेत.

मिथ क्रमांक चार: पुरणपोळी हे मराठी अस्मितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
एकतर हे म्हणणार्‍या माणसानं ती स्वतः करावी आणि खावी. मला तितके कष्ट घेऊन चाखण्याइतकी ती आवडत नाही. ज्यांना आवडते, त्यांनी ती करावी आणि चाखावी. मेरा मूड बना, तो मैं भी चाखूंगी. पण माझ्यावर तुमच्या अस्मितेचं ओझं नको. माझं मराठीपण पुरणपोळीकडे ओलीस ठेवायला मी तयार नाही. मी मराठीच आहे. आणि मला नाहीच काही घेणंदेणं तुमच्या सांस्कृतिकदृष्ट्या बळंच उन्नत होऊन बसलेल्या पुरणपोळीशी. इट इज ओव्हररेटेड. जा, काय करायचं ते करा.

पुरणपोळीसारख्या मराठीच्या सांस्कृतिक गळवाला हा असा धसमुसळा धक्का लावल्यामुळे मला नोटीस बजावण्याची तयारी आता सुरू झाली असेलच. आन देव्. आपण काही तुमच्या पोळीला टाळी वाजवणार नाही.

Footer

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

24 Oct 2017 - 8:42 pm | आनंदयात्री

पण माझ्या प्राणप्रिय पोह्यात मात्र दाण्यांनी मध्ये येऊ नये असं माझं माझ्या परंपरेला जागणारं कट्टर मत आहे. आता आहे, त्याला काय करणार!

खरे आहे, आपण जे खातपीत वाढतो ते आपल्याला आवडते. कुणाला दाणे आवडतात तर कुणाला जिरावण. कुणाला ओले खोबरे आवडते तर कुणाला बारीक शेव. पोहे आवडतात हे सामान सूत्र आहे हे काय कमी आहे का?

राही's picture

24 Oct 2017 - 10:31 am | राही

मी म्हटले नव्हते? पोह्यांवर शेव काय फरसाण काय आणि सोबत चिंचगुळाची पण तिखट चटणी. अरारारारा.
तशी तर बटाटेवड्याबरोबरही चिंचगुळाची आणि पुदिन्याची पात्तळ चटणी देतात. जो न्याय समोश्याला तोच बटाटावड्याला. काय करणार! आलिया भटा बटाटावड्यासी असावे सादर!

मेघना भुस्कुटे's picture

24 Oct 2017 - 11:31 am | मेघना भुस्कुटे

विषयांतराचा दोष पत्करून - पोह्यांवर शेव-फरसाण हे दक्षिणभारतातून आलेले चाळे आहेत. उपम्याची काय काशी करायची ती करा. पोह्यांच्या का वाटेला जाता? तसंच बटाटेवड्याचं. त्यासोबत एकतर लसणीचं तिखट किंवा कोकणातल्या काही घरगुती हाटेलांत मिळते तसली दही-भाजून लसूणमिठासोबत चिरडलेली मिरची. बास. हल्ली क्यांटिनं दक्षिण भारतीयांनी काबीज केल्यापासून बटाट्यावड्यात चक्क उडीद डाळही मिळते नि लोक गपगुमान खातात. :(

स्मिता.'s picture

24 Oct 2017 - 3:34 pm | स्मिता.

विषयांतर झालेच आहे तर माझीही एक काडी सारते. शेंगदाणे हे आमच्या जळगांवकडे 'स्टेपल फूड' प्रकारात येत असल्याने ते पोह्यांत नेहमीच आवडले, पण कोणाकडे त्यावर खोबर्‍याचा कीस दिसला की माझी चिडचिड व्हायची (कदाचित कोकणातल्यांची दाण्यांमुळे अशीच चिडचिड होत असावी). तसेच पोह्यांवर बारीक शेवही खपवून घेतले. पण पुण्यात एका ठिकाणी जे पोह्यांसोबत इडलीसोबत खातात ती चटणी मिळाली आणि लोकांना ती पोह्यांवर ओतून काला करून खाल्ली त्यानंतर बाहेर पोहे खायची इच्छाच मेली.

बाकी लेख एकदम मस्त आणि खमंग! मी पोळीप्रेमी आहे आणि नशीबाने मला पोळ्या उत्तम जमतात.

इशा१२३'s picture

23 Oct 2017 - 8:04 pm | इशा१२३

मस्त खमंग लेख!आवडलाच.
पोळि करणे बोअर प्रकार खरोखर. खायला मात्र आवडते गरम असेल तरच.फोडणिची असेल तर उत्तमच.आयती असेल तर अतिउत्तम.

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:40 pm | पैसा

पोळ्या करायचा एवढा बाऊ कोणाला वाटू शकेल ही गोष्ट महा अचंबित करणारी आहे. भराभर कणीक भिजवायची आणि दणादण २०/२५ पोळ्या करून टाकायच्या. दिवसाचा फक्त अर्धा तास घालवून घरातल्या वाढत्या वयाच्या पोरांची दिवसभराची जेवणाची सोय होते. घरात जेवायला जास्तीचे लोक असताना तर दिवसाला चाळीस पर्यंत पोळ्या दोन्ही वेळचा स्वयंपाक करून मी नेहमीच करते. हाकानाका!

मेघना भुस्कुटे's picture

24 Oct 2017 - 9:57 am | मेघना भुस्कुटे

असे कर्तृत्ववान लोक आहेत, म्हणून जग चालतंय बरीक! आपली काय ना नाही. तसाही माझा डिफॉल्ट मोड हा दिवाणखाना-पुस्तक/ल्यापटॉप-अर्धोन्लोळितावस्था हाच असतो. किती का ढ असेना, कुणीतरी हेही काम करावं लागतंच! ;-)

पैसा's picture

24 Oct 2017 - 7:28 pm | पैसा

स्वयंपाकघरात कमीत कमी वेळ कसा घालवावा यात मी पिहेचडी आहे. कधी माहिती पाहिजे तर जरूर विचारा! =))

पाटीलभाऊ's picture

24 Oct 2017 - 10:27 am | पाटीलभाऊ

मस्त खुसखुशीत लेख.

अनुप ढेरे's picture

24 Oct 2017 - 11:09 am | अनुप ढेरे

आमचे काही जळगाव साईडचे मित्र कोकणात गेलेले. तिथे पोहे खाल्ले. "शी... कोकणात पोह्यांवर ओलं खोबरं घालतात अरे.." अशी तक्रार करत होते आल्यावर. म्हटलं गाढवाला गुळाची...

"शी... कोकणात पोह्यांवर ओलं खोबरं घालतात अरे.."

मुळात खोबरं सुकं असतं आणि जो काही ओला पदार्थ असतो त्याला नारळ म्हणतात अशा बेसिक मध्येच लोच्या असणार्‍यांकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा करता!!

हर्मायनी's picture

24 Oct 2017 - 3:47 pm | हर्मायनी

"कुठे कुणाच्या स्वैपाकघरात मदतीला उभं राहायची वेळ आलीच, तर मी दणादण पोळ्या करून टाकते. मीठ कुठे गं, तिखट कुठे गं, तेल कुठे गं नि साखर कुठे गं, असल्या ताशी छप्पन्न विचारणा करायला अडून न बसता एकठोकी काम होतं आणि शिवाय 'केवढ्या पोळ्या लाटल्यात बाई!'

हाहा ! हा मुद्दा एकदम पटलाय. पुढील वेळी असेच करण्यात येईल.. :D

बाकी.. मी आत्ताच पोळ्या करायला शिकलेय. नुकतीच ताशी ४ पोळ्यांवरून १० वर आलेय. :p

पुंबा's picture

24 Oct 2017 - 5:52 pm | पुंबा

हाहाहा..
मस्त लेख!! हहपुवा
मऊसूत, घडीच्या गरम गरम पोळीचा जबरा फॅन असूनसुद्धा आवडला..

आज खूप सगळ्या पोस्ट्स उघडल्या एक पण आवडत नव्हतं. मग असा काय तो असणार पोळीवरचा लेख तरीही उघडला, वाचला पण काय सांगू...एकदम खुशखुशीत लेख. खरं तर एवढ्या वेळात मी माझ्या २५-३० लुसलुशीत प्राणप्रिय टम्ब फुगलेल्या गरमागरम पोळ्या सहज केल्या असत्या पण तुझ्या लेखाला मान देऊन आज पोळ्या करतच नाही.

मेघना भुस्कुटे's picture

25 Oct 2017 - 2:24 pm | मेघना भुस्कुटे

अहाहा! याहून मोठी दाद ती काय असणार!

चामुंडराय's picture

25 Oct 2017 - 6:17 am | चामुंडराय

पोळी करण्यात एव्हढं काय अवघड आहे म्हणतो मी.

फूड प्रोसेसर घ्यायचा आणि त्यात कणिक तिंबायची.

त्याचा एक छोटा गोळा तोडायचा आणि टॉर्टिया प्रेस मध्ये खट्याक करून दाबायचा ... अहा ... अगदी चंद्रासारखी गोल आटोपशीर साटोपचंद्र पोळी तयार कि वो.
हि पोळी अलवार उचलायची आणि तव्यावर टाकायची. आता त्याला पदर नाही सुटत (अश्लील, अश्लील कोण ओरडतोय?) पण आजकालच्या जीन्स च्या जमान्यात पदराची काय ती महती?

आणि तव्यावर पोळी भाजायचाही कंटाळा असेल तर इलेक्ट्रिक टॉर्टिया प्रेस घ्यायचा. हाकानाका. गरम गरम पोळी तय्यार.

.... आटोपचंद्र पोल्ळवाचार्य

गामा पैलवान's picture

25 Oct 2017 - 12:20 pm | गामा पैलवान
मेघना भुस्कुटे's picture

25 Oct 2017 - 2:24 pm | मेघना भुस्कुटे

नाहीय ना अवघड? मग करा बघू आपली आपण!

पद्मावति's picture

25 Oct 2017 - 2:56 pm | पद्मावति

मस्तं खुसखुशीत लिहिलंय. मला पोळ्या खायला आवडतात पण कणीक भिजवायला घेतल्या-घेतल्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर त्या पिठाला एक प्रकारचा उबदारपणा आणि मग सूक्ष्म बुळबुळीतपणा येतो, तिथपासून ते तव्यावरची पोळी उलटताना पोळीतून कणकेच्या वाफेचा एक भपकारा येतो, यासाठी +१००
मलाही तो स्पर्श, वास अजिबात नाही आवडत.
वर कोणी मला दुधात पोळी कुस्कुरुन खा वगैरे म्हण्टलं की आब्सोल्यूट्ली मळमळल्यासारख होतं :(
गुळ तूप पोळी थोडीफार आवडते पण फोडणीची पोळी मात्र प्राणप्रिय.

सई कोडोलीकर's picture

25 Oct 2017 - 5:41 pm | सई कोडोलीकर

भयंकरच आवडलं. आता पोळ्या करताना हटकून हसायला येईल :-) अगदी साग्रसंगीत बिनचूक वर्णन आहे.
पुरणपोळीबद्दल अगदी अगदी झालं, तशी आयती आणि ताजी गरमागरम मिळाली तर तुपात पोहवून एखादी खाल्ली जाते. करायला जमत नाही, पण हे वाचल्यावर आता द्राक्षे आंबटचा गिल्टही गेला एकदाचा.

भाकरीपुराण उलट्या बाजूनं लिहिण्याचा काही बेत आहे का? कारण आता त्या वर्णनाबद्दल उत्सुकता निर्माण झालीये. :-)

मेघना भुस्कुटे's picture

31 Oct 2017 - 3:55 pm | मेघना भुस्कुटे

भाकर्‍या आवडत असल्यामुळे की काय, चटकन करता यायला लागल्या. ही युक्त्यांसकटची कृती :

भाकरीचं पीठ भिजवताना एक तर उकड काढायची. (जेवढं पीठ, तेवढंच पाणी. हे तांदुळाच्या पिठाचं माप. ज्वारी आणि नाचणी या पिठांना जेवढ्यास तेवढ्याहून थोडं कमी पाणी लागतं. पाण्याला उकळी फुटली, की त्यात चवीपुरतं मीठ नि मापलेलं पीठ घालून ग्यास बारीक करायचा. झाकण ठेवायचं. नि हलक्या हातानी तळापासून हलवून पाचेक मिंटात बंद करायचं.) ती भरपूर मळून घेतली नाही, तर भाकरी हमखास मोडते. गेला बाजार तिला चिरा तरी पडतातच. नि चिरा पडल्या की भाकरीची वाफ त्यातून निसटून जाते नि मग भाकरी फुगत नाही.
पीठ मळताना हाताच्या तळव्याचा - मनगटाच्या लगतचा उंचवटा - वापर करायचा. पीठ रेमटवून ताटलीला चिकटवायचं नि परत सोडवून तीच कृती करायची. असं दर गोळ्याला किमान तीन-चारदा तरी करायचं, की चांगलं मिळून येतं. असं मऊ झालेलं पीठ असलं, की भाकर्‍या मोडत नाहीत.
भाकरी थापताना सुरुवातीला तरी भरपूर पीठ गोळ्याखाली घ्यायचं. थापताना हातही कोरड्या पिठात वारंवार बुडवून घ्यायचा. मधेमधे ताटली भाकरीसकट उचलायची नि पीठ चाळताना चाळण हलवतो तशी हलवायची. की भाकरी ताटलीत चिकटणारच असेल, तर सुटी होते. असं मधेमधे करत राहायचं. भाकरी पुरेशी मोठी झाली, की भाकरीवर एक हात ठेवायचा नि तो हात अलगद उताणा करायचा. तसा उताणा करताना दुसर्‍या हातानी ताटली पालथी करायची, की भाकरी उताण्या हातावर अलगद येऊन पडते. तिला दुसर्‍या हाताचा आधार देऊन - खाली पीठ लागलेली बाजू वर येईल अशा बेतानी - तिला तव्यावर पोचती करायची. नि ग्यास बारीक करून तिच्यावर पाणी फिरवून घ्यायचं. लगेच ग्यास वाढवायचा.
पाणी सुकलं की लगेच भाकरी उलटायची. पाणी फिरवताना ते जर जास्त झालं, तर भाकरीवरून खाली तव्यावर जातं नि मग तिथे भाकरी तव्याला चिकटते. सोडवताना फाटू शकते नि त्यातून वाफ जाते. की फुगण्याचं गंडलंच. त्यामुळे पाणी फिरवताना अगदी नेमकं पाणी घ्यायचं नि भाकरी तव्याला चिकटू द्यायची नाही, हे ट्रिकी.
एकदा नीट भाजू दिली, की परत उलटायची.
मग तिला चांगली दाबून दाबून भाजायची. हळूहळू तिच्यात वाफ भरून ती फुगायला लागते. मग तव्यावरून थेट विस्तवावर घ्यायची. सगळं नीट जमलं असेल, भाकरीला चिरा नसतील, ती चिकटून फाटली नसेल, तर वाफ सुटू शकत नाही, आत कोंडली जाते नि भाकरी टम्म फुगते.

भाकरी थापताना ती सगळीकडे सारख्या जाडीची असेलसं पाहावं, त्यानं फुगण्याच्या शक्यतेत खूपच वाढ होते. मधे जाड राहिली तर एकवेळ चालेल, पण कडा शक्यतोवर पातळ होईलशा बघाव्यात. नाहीतर त्या नीट भाजल्या जात नाहीत आणि खाणारा शिव्या घालतो. भाकरीला चीर पडलीच, तर ती फडक्यानं वा कालथ्यानं दाबून थोडी चीटिंग करावी आणि वाफ कोंडावी. भाकरी फुगते. पोळ्यांची कणीक थोडा वेळ भिजवून ठेवली की बहुतेक ग्लुटेन नीट तयार होतं आणि पोळ्या मऊ होतात. भाकरीचं पीठ मात्र अगदी दरेक भाकरी थापायपूर्वी चांगलं मळून घेतलं तर भाकरी चांगली होते.

मेघना भुस्कुटे's picture

31 Oct 2017 - 4:00 pm | मेघना भुस्कुटे

कोरडं पीठ अजिबात न वापरता फक्त पाणी वापरून दोन्ही हातावरच थापून भाकरी करतात, ती यायला पाहिजे. कुणाला येत असेल, तर त्यातल्या ट्रिका सांगा बघू.

हेम's picture

26 Oct 2017 - 3:32 pm | हेम

पोह्यांवर शेव-फरसाण हे दक्षिणभारतातून आलेले चाळे आहेत. मला वाटतं हे मध्यप्रदेशातलं आहे. इंदूर रतलामकडे नमकीन फरसाण प्रसिद्ध त्यामुळे तिकडे पोह्यांवर फरसाण वगैरे घालतात. मला तर एकाने पोहे मूळचे आमचेच म्हणून सांगितले होते. कोकणातले पोहे म्हणजे मूळ दडपे पोहेच असणार. लाल पोहे नारळाच्या पाण्यात भिजवले, खवलेला नारळ व मिठ मिरची चुरडून लावले की झाले. फोडणीचे पोहे वगैरे नंतर आलं असावं कोकणात. शेंगदाणे खूप दूर राहिले. आजही नरक चतुर्दशीस तिकडे बर्‍याच घरांतून दडपे पोहे, ताकातले पोहे वगैरे केले जातातच की..!

स्मिता चौगुले's picture

27 Oct 2017 - 5:30 pm | स्मिता चौगुले

मेघनाताई मस्त खुसखुशीत लेख... खूप आवडला.. :)

स्मिता चौगुले's picture

27 Oct 2017 - 5:30 pm | स्मिता चौगुले

मेघनाताई मस्त खुसखुशीत लेख... खूप आवडला.. :)

शब्दबम्बाळ's picture

30 Oct 2017 - 11:12 pm | शब्दबम्बाळ

पोळ्या आणि गहू याच्याशी संबंधित एक लेख वाचला...
गहू मी तब्येतीला चांगला समजत होतो पण बरेच असे लेख वाचनात येत आहेत हल्ली ज्यात गहू तितका चांगला नसल्याचे सांगितले जात आहे.

"हरयाणातील रेवारी जिल्ह्य़ात एका डॉक्टरांशी सहज गप्पा मारत होतो त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्ण मुलांमध्ये दिसणारी एक वेगळीच आरोग्य समस्या सांगितली. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती यात शंका नाही. त्यांच्या मते मुलांमध्ये गव्हाची अ‍ॅलर्जी वाढत आहे. ज्या राज्यात गहूच मुख्य पीक आहे तेथे मुलांना गव्हाची अ‍ॅलर्जी.. हे ऐकून मी जरा अचंबितच झालो. डॉक्टरसाहेब पुढे सांगतच होते, ही गव्हाची अ‍ॅलर्जी ग्लुटेनमुळे आहे, ग्लुटेन हे गव्हातच जास्त असते. ज्वारी, बाजरीत कमी असते. आपले शरीर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात ग्लुटेन पचवू शकत नाही. त्यामुळे या मुलांचे आजी-आजोबा जे जेवण घेत होते तेच या मुलांना द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. मुलांना जर बाजरीच्या मुख्य अन्नावर ठेवले तर अ‍ॅलर्जी राहत नाही. बाजरी हे जास्त पोषक अन्न आहे यात शंका नाही. एक तर त्यात चोथ्याचे म्हणजे तंतूचे प्रमाण अधिक असते व त्यात लोहाचे प्रमाणही पुष्कळच असते. गहूयुक्त आहाराकडे लोक वळले हा शापच होता."

मूळ लेख:
गहूक्रांतीची विषवल्ली

वीणा३'s picture

31 Oct 2017 - 2:00 am | वीणा३

अगदी म्हणजे अगदी मनातलं लिहिलंय. मला तर किती वेळा असं वाटत कि ज्यांना पोळ्या आवडतात ना त्यांना करायला लावल्या तर त्यातले बरेच जण कायमस्वरूपी भाताला शिफ्ट होतील, पोळ्या आवडणं बंद होऊन जाईल :P

विजय नरवडे's picture

6 Nov 2017 - 7:45 pm | विजय नरवडे

आवडलं, )))

शाली's picture

18 Nov 2017 - 6:12 pm | शाली

निव्वळ अप्रतीम. मस्तच!

मसाला महाराणी's picture

19 Nov 2017 - 7:15 pm | मसाला महाराणी

लंय भारी,गंमत म्हणजे मी उत्कृष्ट चपात्या पोळ्या करते,एक पदरी ते सात,पुरणपोळी पण तरीही मला पोळ्या चपात्या आवडत नाहीत,कोकणी भात बोकणी आहे मी आणि ही चपाती पोळी जे काय आहे ते बायकांचा छळ करायला निर्मित झालेय,मरणाच्या उकड्यात ग्यास समोर पोळ्या लाटणे हे सहनशीलता वाढवण्याचे उत्तम साधन आहे, खाणार्यांना कसाय जातेय बॉम्बलायला

मसाला महाराणी's picture

19 Nov 2017 - 7:16 pm | मसाला महाराणी

लंय भारी,गंमत म्हणजे मी उत्कृष्ट चपात्या पोळ्या करते,एक पदरी ते सात,पुरणपोळी पण तरीही मला पोळ्या चपात्या आवडत नाहीत,कोकणी भात बोकणी आहे मी आणि ही चपाती पोळी जे काय आहे ते बायकांचा छळ करायला निर्मित झालेय,मरणाच्या उकड्यात ग्यास समोर पोळ्या लाटणे हे सहनशीलता वाढवण्याचे उत्तम साधन आहे, खाणार्यांना कसाय जातेय बॉम्बलायला