श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ७ : कुण्या देशीचे पाखरू!

Naval's picture
Naval in लेखमाला
1 Sep 2017 - 9:09 am

माझ्या बाळाविषयी कधीतरी लिहायचं, हा विचार फार दिवसांपासून मनात घोळत होता. कित्येक वर्षांनी लिहायला बसले आणि अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या. आई होण्याचा माझा दहा वर्षांचा प्रवास हळहळू उलगडायला लागला. ह्या प्रवासाची सुरुवात झाली, जेव्हा आई होण्याची इच्छा पहिल्यांदा माझ्या मनात जागृत झाली त्या दिवसापासून. मला नीट आठवतं, मी तेव्हा दहावीत होते. आमच्या घरासमोर राहणारी माझी आवडती ताई तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी आली होती. मी सारखी तिच्याकडे जात असे. एका गरोदर स्त्रीला मी इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहत होते. तिच्या पोटातल्या बाळाची हालचाल, मधूनच होणारा त्याचा स्पर्श, मायलेकरांचा मूक संवाद मी विस्मयाने बघत असे. बाळाचा जन्म झाल्यानंतर तर मला वेडच लागायचं बाकी होतं. त्या निरागस जिवाच्या सहवासाने पहिल्यांदाच माझ्यात आई होण्याची इच्छा जागवली. आपणही कधीतरी आई होणार ही भावना माझ्या सगळ्या अंगात शहारून गेली. नंतर कॉलेज लाइफ सुरू झालं. तारुण्याच्या अनेक नवीन भावना मनात फुलायला लागल्या होत्या. पण तरीही माझं लग्न कधी होणार ह्यापेक्षाही मी आई कधी होणार याचीच मला ओढ असायची. मी स्त्रीच्या जन्माला आले हे किती ग्रेट, या विचारांनी अगदी खूश होऊन जायची. इतक्या कमी वयापासून आई होण्याची ओढ माझ्या मैत्रिणींच्या व इतर मुलींच्या तुलनेत जरा अधिकच आहे, हे मला कळायचं. अशा मला लग्न झाल्यानंतर तर आई होण्याचेच वेध लागले. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. लग्न झाल्यावर जरा वर्षभर थांबू या, मग पाहू.... असा विचार करायचा प्रश्नच नव्हता. त्यात नवरोबाही सहमतच, त्यामुळे सगळाच आनंद! मी तर गुडघ्याला बाशिंग बांधलेली आई होते!

लग्नाला ईनमीन दोन-तीन महिनेही उलटत नाहीत आणि आजूबाजूचे लोक तुम्हाला "काय? काही न्यूज वगैरे?" हा पठडीतला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. कुठल्याही कार्यक्रमात तर हा प्रश्न आम्हाला आता सवयीचा झाला होता. तुम्हाला काही वाटत असो वा नसो, लोक आपल्याला या गोष्टीचा विसरच पडू देत नाहीत. आमच्या लग्नाला सहा महिने उलटले होते आणि घरातल्या नातेवाइकांमध्ये एक अस्वस्थता पसरायला सुरुवात झाली. एखाद्या डॉक्टरला दाखवायला हवंय असाही विचार सुरू झाला आणि माझ्या आयुष्यात ‘औषधं’ या गोष्टींचा शिरकाव झाला तो कायमचा. प्राथमिक तपासण्या पूर्ण झाल्या आणि ट्रीटमेंट सुरू झाली. माझ्या घरात औषधांनी भरलेला एक मोठा डबा कायम असे. जेवण झालं की आपसूकच मी त्या डब्याकडे वळायचे, इतकं सवयीचं झालं गोळ्या-औषधं घेणं. हळूहळू त्याचं प्रमाणही वाढतंच गेलं. लग्नाला दोन वर्षं पूर्ण झाली होती आणि सगळेच आता काळजीत होते. सगळीकडूनच वेगवेगळे सल्ले, सूचना ह्यांचा भडिमार होत होता. अमुक डॉक्टरचा किती लोकांना गुण आला, तमुक देवस्थान किती जागृत आहे याबरोबरीनेच ज्योतिषी, व्रतवैकल्यं, उपास-तापास यांची भलीमोठी यादीच तयार झाली. आपल्यात काही तरी प्रॉब्लेम आहे ही गोष्ट कळत-नकळत माझ्या मनात घर करत होती. वैद्यकीय तपासण्यांत कुठलंच कारण न सापडल्याने माझी ‘वंध्यत्व चिकित्सा’ अक्षरशः धडपडत होती. एक दिशा न ठरल्याने ती वाट्टेल ते मार्ग चोखाळत होती. माझी ‘लॅप्रोस्कोपी’ झाली, तो माझा ऑपरेटिव्हचा पहिला अनुभव. यानंतर माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. आता रिझल्ट नक्की असं स्वतःच ठरवून मी प्रवास वगैरे नको म्हणून नोकरी न करण्याचाही निर्णय घेतला. आई होणंच सर्व काही झालं होतं माझ्यासाठी. माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये काही जणांमध्ये थोडे बदल झाले होते. काही अनुभव तर फारच त्रासदायक होते.

नोकरीच्या निमित्ताने आम्ही भरपूर भ्रमंती केली. महाराष्ट्र दौरा तर झालाच, त्याचबरोबर कर्नाटकातही राहिलो. त्यामुळे वेगवेगळ्या भागातल्या समजुती, पद्धती अगदी जवळून पाहायला मिळाल्या. आता मी लोकांच्या दॄष्टीने एक ‘वांझ स्त्री’ होते. आपल्या संस्कृतीमध्ये एखादी स्त्री सौभाग्यवती असणं आणि बरोबरीने तिचं पुत्रवती असणं ह्या गोष्टींवर त्या स्त्रीचा आनंद खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून ठेवलेला आहे. त्यामुळे एखाद्या मंगलकार्यात विधवा स्त्री आणि मूल नसलेली स्त्री हिला प्रकर्षाने ही कमतरता जाणवून दिली जाते. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी रूढी-परंपरांची झळ मला लागली नव्हती. अजूनही एवढ्या खोलवर गैरसमज पसरलेले आहेत हे पहिल्यांदाच कळत होतं. माझं अस्तित्व बर्‍याच ठिकाणी अमंगल मानण्यात येऊ लागलं. माझ्या एका मावसबहिणीच्या बाळाचं बारसं होतं. माझा आवाज चांगला म्हणून मावशीने मला पाळणा म्हणायला पुढे बोलावलं, तर माझा हात पाळण्याला लागायला तिच्या सासरच्या काही जणींचा विरोध होता. काही ठिकाणी मला स्पष्टपणे तसं बोलून दाखवलं जाई. काही मूकपणे दाखवून देत. मला असल्या फालतू विचारांनी काही फरक पडत नाही असं वरवर म्हणत असले, तरी आतून मन दुखावलं जायचं.

एके ठिकाणी तर कॉलनीतल्या माझ्या मैत्रिणीला दिवस गेले आहेत ही गोष्ट ती माझ्यापासून लपवत होती. तिच्या सासूने तर माझी सावली तिच्यावर पडू नये याची काळजी घ्यायला सांगितलं होतं. नवर्‍याला माझ्या ह्या मनःस्थितीची पूर्ण जाणीव होती. एखाद्या मजबूत पहाडासारखा तो माझ्यासोबत होता. कुठलीही प्रतिक्रिया न देता त्याने हळूहळू मला डोहाळ जेवण, बारसं अशा कार्यक्रमांना जावंच लागणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली. बाळ होणं ह्या विषयावर तो अगदी निरपेक्ष होता. माझी तगमग बघून त्याला माझी खूप काळजी वाटायची. त्याने मात्र सगळ्या परिस्थितीला शांतपणे स्वीकारलं होतं. माझं मन मात्र मी आई होऊ शकत नाहीये ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नव्हतं. चांगल्यात चांगल्या डॉक्टर्सचा शोध घेणं, त्यांनी दिलेली ट्रिटमेंट नीट पूर्ण करणं, ठरावीक दिवस पाळणं, हॉस्पिटलच्या वार्‍या हे सगळं चालूच होतं. मी कधी हार मानली नव्हती. हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये माझ्यासारख्याच चातक आया भेटायच्या. आई होण्याचं प्रत्येकीचं कारण वेगळं असलं, तरी ओढ सारखीच होती. हॉस्पिटलच्या वार्‍या करून कंटाळून गेलेल्या, तणावपूर्ण स्त्रियांना बघून मन सुन्न व्हायचं. एकीकडे आर्थिक ओढाताण आणि दुसरीकडे औषधांच्या मार्‍याने होणारे शारीरिक बदल झेलणं फार कसरतीचं. कुटुंबाचंंही फार प्रेशर असतं. त्यांना स्वतःला आई होण्याची किती इच्छा आहे ह्यापेक्षा कुणाला वंशाचा दिवा हवा असतो, तर कुणाला नातवंड. मूल होणं जरी दोघांवर अवलंबून असलं, तरी स्त्रियांच्या तुलनेत पुरुष तपासणी आणि ट्रीटमेंटसाठी सहसा तयार होत नाहीत असं आढळून येतं. स्त्रिया मात्र तो भडिमार सोसायला निमूटपणे तयार असतात. मला मात्र ह्याही बाबतीत नवर्‍याची खूप साथ मिळाली. तो प्रत्येक गोष्टीसाठी तयार असायचा, पण तेवढाच अलिप्त. एक पुरुष म्हणून त्यालाही खूप काही झेलावं लागलं. मित्रांमध्ये तर सहजच केलेल्या कॉमेंट्स खूप जिव्हारी लागयच्या. "अरे काय रे, काही व्यसन बिसन करत जा जरा. निर्व्यसनी ना तू, म्हणून.. कमी असेल तुझ्यात" यापासून ते अनेक प्रसंग जे त्याने मला सांगितलेही नसतील. पण तरीही आजूबाजूच्या लोकांकडून येणार्‍या वाईट अनुभवाची बेरीज तशी चांगल्या अनुभवांच्या मानाने कमीच. अर्थात आम्हाला बाळ व्हावं अशी खूप आप्तेष्टांची इच्छा होतीच.

बघता बघता लग्नाला सहा वर्षं पूर्ण झाली. आता उपायही अधिक अॅडव्हान्स्ड करावे, असं सुचवलं जाऊ लागलं. आत्तापर्यंत आमच्या कॉन्टॅक्टचा दिवस महिने पाळण्यावर असलेल्या टाईमटेबलपासून ते अगदी टाईमटेबलप्रमाणे त्याच्या वेळा पाळण्यांपर्यंत घसरला होता. म्हणजे इतक्या वाजता संबंध ठेवून इतक्या वाजता हॉस्पिटलला पोहोचा वगैरे अत्यंत यांत्रिक पद्धतीने सगळं सुरू होतं. माझ्या या प्रवासातलं सगळ्यात भयंकर प्रकरण म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. ही निसर्गाच्या संपूर्णतः विरोधात पोहोचण्याची लढाई. इथे सगळंच कृत्रिम वातावरण होतं. आता संबंध ठेवण्याचा काही संबंधच उरला नव्हता. मला मात्र मी मूल जन्माला घालू शकणारं मशीन आहे की काय, असं वाटायला लागलं. निमूटपणे दिवसातून कित्येक इंजेक्शन्स टोचवून घेणार्‍या, पँट काढून सोनोग्राफीच्या लाईनमध्ये यंत्रवत उभ्या असणार्‍या माशीन्स आम्ही झालो होतो. इथे ट्रीटमेंट खर्चीक, त्यामुळे चेहरे अधिकाधिक ताणलेले असायचे. रिझल्ट येणं अगदी जिकिरीचं होऊन बसलेलं. माझ्या या प्रवासात माझी आई माझ्या कायम सोबत असायची. "सोन्या, या वेळी नक्की होणार बघ" अशी भाबडी आशा द्यायची. आमची आर्थिक परिस्थिती तशी नेहमी बेताचीच. त्यात हा खर्च म्हणजे फार मोठा निर्णय होता. सगळे औषधोपचार अगदी गुमान करून घेणं हेच जीवन झालं होतं. इतकी वर्षं प्रत्येक महिन्याच्या पाळीला मला रडू यायचं. आता तर आम्हाला सगळ्यांनाच रिझल्ट नाही आला तर रडायची पाळी होती. कारण फार ओढून ताणून केलेली ही गोष्ट होती.

आणि हा अॅटेम्प्ट फेल झाला...

मी तर रडून रडून बेहाल करून घेतलं होतं. हळूहळू माझा उदासपणा वाढत गेला. सगळ्या आशा संपल्यासारखं वाटायला लागलं. डिप्रेशन कधी माझ्यात शिरलं मला कळलंच नाही. मी घरातच बसून राहायची. दोन दोन दिवस पायरीसुद्धा उतरायची नाही. तेव्हा आम्ही नाशिकला होतो. तिथे माझी एका आयुर्वेदिक डॉक्टरांची ओळख झाली. डॉ. अनिता कुलकर्णी. एक अत्यंत मनस्वी व्यक्तिमत्त्व. त्यांच्याशी झालेली मैत्री मला एक चैतन्य देऊन गेली. त्यांच्यामुळेच माझ्यातला चित्रकार जागा झाला आणि मी कॅनव्हास पेंटिग्ज करायला सुरुवात केली. आई होण्याच्या स्वप्नाचा थोडा विसर पडला होता. पण बरेच लोक असेही होते, जे मला विसरू देत नव्हते. लहान गावांमध्ये जसा वेगवगळ्या समजुतींचा अनुभव आला, तसाच जाचक अनुभव शहरातही आला. माझ्या वयाच्या इतर स्त्रियांची मुलं आता शाळेत जायला लागली होती. काही प्रसंगात सगळे जमल्यावर त्यांच्या आपापसातल्या विषयांत मी नेहमी ‘ऑड मॅन आउट’ असायचे. मुलांचे वाढदिवस वगैरे असले की मी एकटीच माझ्या घरात उरायची. बाकी मुलं आणि त्यांच्या आया निमंत्रित असायच्या. किंवा खूप ठिकाणी ‘मला काय समजत असणार त्यातलं?’ असं समजून मुलांचे कपडे बदलणं, खाऊ घालणं इ. मला सांगायला टाळत असत. असे प्रसंग माझ्या मनःस्थितीमुळे मला जास्तच खटकायचे.

दरम्यान माझ्या बहिणीने मला एका ज्योतिषांबद्दल सांगितलं. मनाने परत उचल खाल्ली की आपल्या नशिबात (नशिबात असा शब्द मी एव्हाना वापरायला शिकले होते..) मातृत्वाचं सुख आहे की नाही, ते खरंच जाणून घ्यायला हवंय, असं वाटून गेलं. त्यांनी सांगितलं की एका विशिष्ट काळातच योग आहे. पुन्हा काहीच शक्यता नाही. आणि नेमकी काहीच दिवसात नवर्‍याची कंपनी बंद पडली. दुसर्‍या जॉबचा शोध चालू होता, पण कुठे काम होत नव्हतं आणि योग असलेला काळ जवळच येऊन ठेपला होता. आता काय करायचं? आता तर आर्थिक स्थिती अत्यंत वाईट. तरीही ठरवलं की हा योग जाऊ द्यायचा नाही. उसनेपासने पैसे जमा केले आणि परत एकदा धैर्य एकवटून टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न करायचं ठरवलं. ह्या वेळी खर्चही दुप्पट आला. इंजेक्शनचा मारा चालू होता आणि हार्मोन्सने शरीराचे हाल केले होते. अखेर मी गरोदर आहे असा रिपोर्ट आला! माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. पण सेफ पीरियड अजून आलेला नव्हता. प्रेग्नन्सी टिकण्याच्या औषधांची आणि इंजेक्शन्सची पॉवर आणखी वाढवली गेली. ही इंजेक्शन्स सगळ्यात भयंकर होती. दुष्परिणाम खूप. एकदा कोकणात समुद्राच्या लाटेने पाण्यामध्ये मी गटांगळी खाल्ली होती आणि नाकतोंडात पाणी गेलं होतं, श्वासही घेता येईना... अगदी तश्शीच स्थिती मी आत्ता अनुभवत होते. सगळे सोपस्कार करूनही दीड महिना तग धरून असलेला गर्भ माझ्यातून अखेर निघून गेला. एव्हाना मला फोडणीचा वास सहन न होणं, मळमळ इ. लक्षणं सुरू झाली होती. माझ्या गरोदरपणाचा हा अगदी छोटासा का होईना, पण अनुभव मी घेतला होता.

हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि सगळं धैर्यच संपलं. आर्थिक, मानसिक, शारीरिक ओढाताण करून हाती काही गवसलं नाही. आता मात्र मी सगळी आशा सोडली होती. माझी आई आणि नवरा हे दोघेही बरोबरीने ही लढाई लढले होते. त्यामुळे त्यांनाही खूप त्रास होत असणार हे मला कळत होतं. नवर्‍याच्या नोकरीचं काम कुठेही होत नव्हतं आणि माझ्या या परिस्थितीमुळे मीदेखील नोकरी करू शकत नव्हते. आम्हाला आमचं पुण्याचं घर विकावं लागलं. आता पोटापाण्यासाठी दुसरे काही मार्ग शोधत आम्ही मेडिकल दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. नवरा फार्मसिस्ट, त्यामुळे त्याचं एक स्वप्नं होतं की आपलं मेडिकल दुकान असावं. शहर बदलणं, नवीन व्यवसाय समजून घेऊन त्यात नवर्‍याला मदत करणं ह्यात मी रमून गेले. मनाची मरगळ निघून गेली आणि बाळाचा विषय थोडा बाजूला पडला. मधल्या काळात मला दत्तक घेण्याविषयी काही जणांनी सुचवलं होतं, पण मी त्याचा गंभीर्याने विचार केला नव्हता. त्याच दरम्यान नवर्‍याच्या एका जवळच्या मित्राने स्वतःचा एक मुलगा असतानाही एक मुलगी दत्तक घेतली. एका सहलीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो होतो, तेव्हा त्या बाळाचा खूप सुंदर सहवास मिळाला मला आणि दत्तक मूल ह्याविषयी असलेल्या छोट्यामोठ्या शंका कमी झाल्या. ती मुलगी आमच्या सगळ्यांचीच अगदी लाडकी बनून गेली होती. त्याच्याकडूनच कळलं की वयाची चाळिशी उलटली तर दत्तकसाठी नोंदणी होणं फार अवघड. ही प्रक्रियाच मुळात किती किचकट आहे, हे त्यात पडल्यावरच कळतं. माझ्यासाठी ह्याच आयुष्यात आई होण्याचे दुसरे मार्ग संपले होते. पण दत्तक मूल ह्या गोष्टीसाठी मन थोडं कचरत होतं. मनात खूप शंका होत्या. किती वयाचं बाळ घ्यावं? मुलगा की मुलगी? ते आपल्यात मिसळेल का?

आणखी एक मुद्दा बाकीच होता, तो म्हणजे नवऱ्याची आणि कुटुंबातल्या लोकांची सहमती मिळेल का? माझ्या सासरचे लोक खूपच कर्मठ, परंपरावादी. त्यामुळे त्यांच्या विरोधाबद्दल तर खातरीच होती. सुरुवातीला नवराही ह्या गोष्टीला तयार नव्हता. त्याच्या मते निसर्गतः नाही ना झालं मूल, मग दुसरं लादून का घ्यायचं? मीसुद्धा तशी ठाम नव्हतेच. आमच्या दोघांचं सहजीवन तसं अगदी समाधानी, छान. वरवर पाहता कुठली उणीव जाणवत नव्हती. आणि दोघंच राहण्याची जीवनशैली पुरेशी अंगवळणी पडली होती. फक्त एकच मोटिव्हेशन काम करत होतं की चाळिशी गाठायच्या आत हा निर्णय घ्यायला हवाय, नाहीतर हाही मार्ग बंद होणार. पण एक दिवस एका सुंदर व्याख्यानात बोलल्या गेलेल्या वाक्याने नवरा ढवळून निघाला. “आपण आपल्या आयुष्यात खरंच संपूर्ण रसपूर्णतेने जगतो का?” ते ऐकून त्याच्या मनातली आमच्या आयुष्यातल्या ह्या रसाच्या कमतरतेची दबून राहिलेली जाणीव उफाळून आली. आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय त्याच रात्री घेतला. मुलगीच घ्यायची ह्यावर आमचं एकमत होतं. आम्ही त्या मित्राला फोन करून आमची ही इच्छा सांगितली. त्याने अगदी उत्साहाने आम्हाला संस्थांची माहिती काढतो म्हणून सांगितलं. दुसर्‍याच दिवशी त्याचा फोन आला की "एका संस्थेत सव्वा वर्षाची एक मुलगी आहे. बघून घ्या." लगेचच बॅगा भरून आम्ही निघालो. परत त्याचा फोन. "अरे, पण ती मुलगी ‘ब्राऊन’ आहे असं कळलंय. बघा तुम्हाला चालेल का" हे ऐकून माझं मन ढवळून निघालं. त्या संस्थेत काळ्या रंगामुळे त्या मुलीला कित्येकांनी डावललं होतं. आता तर तिला भेटलंच पाहिजे हे मी नक्की केलं. माझं सगळं बालपण ज्या न्यूनगंडात गेलं, त्या गोष्टीसाठी मी त्या बाळाला नाकारू शकतच नव्हते. लहानपणी मी आणि माझा भाऊ आमच्या काळ्यासावळ्या रंगाविषयी अनेक कॉमेंट्स ऐकायचो. नंतर लग्न होण्याच्या प्रक्रियेतही मला पंधरा मुलांचा नकार येण्याचं कारण माझा रंगच होतं.

आम्ही संस्थेत पोहोचलो आणि डायरेक्टरना भेटून प्राथमिक गोष्टी पूर्ण झाल्यावर त्यांनी "बाळाला घेऊन या" असं तिथल्या नर्सला सांगितलं. मला छातीत खूप भरून यायला लागलं, रडायला येत होतं. ही कसली घालमेल होती - कळत नव्हतं. अजून तर बाळ पाहिलंच नव्हतं मी. एक सिस्टर एका मुलीला कडेवर घेऊन आली आणि तिथल्या एका मॅटवर तिला ठेवलं. एक घाबरलेलं, भेदरलेलं बाळ मी पहिल्यांदा बघत होते. आत्तापर्यंत खळखळून हसणारी, रडणारी, खेळणारी बाळं मी पाहिली होती. सावळ्या रंगाची, केस वेडेवाकडे कापलेली घाबरलेली चिमुकली आमच्या पुढ्यात ठेवलेली होती. हेच आपलं बाळ का? मन मानत नव्हतं अजून. पण मला आवडून गेले तिचे टपोरे डोळे, भेदक नजर. इतकी घाबरलेली असूनही ती रोखून पाहत होती आमच्याकडे. आम्हा दोघांना काय वाटत होतं हे सांगणं कठीणच. नवरा फक्त बाळाच्या आरोग्याची काळजी करत होता. एका तज्ज्ञ डॉक्टरांकडून बाळाच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांच्या मते बाळ एकदम फिट होतं. आमचा निर्णय लगेच झाला. संस्थेकडून बाळ घरी नेण्याची तारीखही ठरली. पण मध्ये फार मोठी प्रक्रिया बाकी होती.

दत्तक मूल ह्याविषयी खरी परिस्थिती फारच कमी लोकांना माहीत असते. म्हणजे दहा-पंधरा मुलं रांगेत बसलेली असतील आणि त्यातलं एक आपल्याला निवडायचं असतं, अशा समजुती तर खूप मोठ्या प्रमाणात. मूल दत्तक घेणं ह्यासाठी उत्सुक असलेली जोडपी खूप आहेत. दत्तक मूल घेण्यासाठी भलीमोठी वेटिंग लिस्ट असते. तुमचा नंबर लागल्यावर तुम्हाला फक्त एक किंवा जास्तीत जास्त दोन बाळं दाखवली जातात. तुम्ही त्याला नाकारलं, तर तुमचा नंबर गेलेला असतो. ते बाळ मग पुढच्या जोडप्यांना दाखवलं जातं. थोडक्यात काय, तर मूल मिळालं म्हणून आपण भाग्यवान असतो आणि ते बाळच आई-बाबा बनवण्याचे फार मोठे उपकार तुमच्यावर करत असतं. आम्हाला कित्येक जण “तुम्ही किती ग्रेट, केवढे उपकार केलेत त्या बाळावर” असं म्हणतात... खरं तर उलट परिस्थिती आहे.

दत्तकविधानाची प्रक्रिया खूप दीर्घ होती. आमच्या दोघांचे संपूर्ण मेडिकल रिपोर्ट्स, संपत्तीचे दाखले, रहिवासी, चारित्र्य प्रमाणपत्र इ. अनेक गोष्टी आम्ही अगदी धावपळ करून पूर्ण केल्या. कारण नंतर कोर्टाला एक महिन्याची सुट्टी लागणार होती. आता बाळ घरी येणं एक महिना लांबणं मला सहनच होऊ शकत नव्हतं. बाळ घरी येण्याची तयारी करायला सुरुवात केली. एकदमच आलेल्या ह्या आनंदाने मी गोंधळून गेले होते. त्यातही माझं बाळ सव्वा वर्षाचं असल्याने माझी तयारी आणखीन वेगळी होती. आम्ही दोघांनी विचार केला की त्या बाळाला एकदम संस्थेतून उचलून घरी आणलं तर ते बिचकून जाईल, म्हणून मग संस्थेची परवानगी घेऊन मी आठ दिवस आधी तिथे जाऊन राहायचं ठरवलं. आमचा हा निर्णय फार योग्य ठरला.

संस्थेत माझा पहिला दिवस मी फक्त सगळं नीट निरीक्षण करण्यात घालवला. गेल्याबरोबर माझं बाळ कुठाय ह्याची उत्सुकता होती. ती गाढ झोपलेली होती. छोटे छोटे बेड आणि त्यांना पिंजर्‍यासारखी जाळी लावलेली होती. एका हॉलमध्ये जवळजवळ ३८ मुलं ठेवलेली होती आणि एक-दोन नर्स सर्व सांभाळत होत्या. बाहेरच्या जगातल्या मुलांपेक्षा एक वेगळेपणा इथल्या मुलांमध्ये होता. थोडी घाबरलेली, बावरलेली ही मुलं ना खळाळून हसत, ना फारसं रडत. जिच्यासाठी मी इथे आले होते, ते माझं बाळ दिवसभर काय करतं, काय खातं, कसं खातं, कसं झोपतं हे समजून घेत होते. माझं पिल्लू उठलं. तिला मी गार्डनमध्ये घेऊन जाण्याची परवानगी मागितली. आम्ही दोघी तिथली खेळणी खेळत होतो. ती फार गांगरून गेलेली होती आणि अंग अवघडून माझ्यापाशी निमूटपणे बसली होती. एक-दोन तास गेले आणि संस्थेतल्या एका बाईने मला तिथे पाणी आणि चहा आणून दिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते बाळ चोरट्या नजरेने पाण्याकडे बघत होतं आणि ओठ हलवत होतं. तिला खूप तहान लागली असणार, जे माझ्या लक्षातच आलं नाही. दोन तासांपासून मी तिला काही खायला किंवा प्यायला दिलंच नव्हतं. माझ्या डोळ्यांना धारा लागल्या आणि जाणवलं की आपण अजून आई झालो नाहीये. मला आत्तापर्यंत मोठ्या माणसांसोबत राहायची सवय. त्यांना असं थोड्या थोड्या वेळाने स्वतःहून काही द्यावं लागत नाही. त्या दिवसापासून आजतागायत मी तिची खाण्यापिण्याची काळजी घ्यायला कधी चुकले नाही.

दुसर्‍या दिवशी संस्थेत पोहोचले. माझ्या बाळाकडे गेले, तर आज ती खूपच अंग चोरत होती आणि मान खाली घालून बसली होती. तिला माझ्यासोबत यायचं नव्हतं. नर्सने तिला तयार केलं आणि माझ्याजवळ दिलं. मीही तसंच तिला घेऊन फिरत राहिले. आज थोडी जागरूकतेने मी तिची काळजी घेत होते. दिवसभर आम्ही सोबत होतो. मग मी हळूहळू तिला जेवू घालणं, झोपवणं, आंघोळ घालणं करायला लागले. माझ्या बाळाला आता माझा सहवास परिचयाचा झाला होता. मी तिला घ्यायला गेल्यावर तिच्या डोळ्यात एक चमक दिसायची. ती थोडी खुलायला लागली होती. चार-पाच दिवस झाले. आता तिला माझी आणि मला तिची ओढ वाटायला लागली. संध्याकाळी तिला परत तिच्या बेडमध्ये ठेवून निघाले की ती मला पकडून ठेवायची. सातवा दिवस होता. संध्याकाळी तिला बेडवर ठेवलं आणि म्हणाले की “पिलू, उद्या आपण आपल्या घरी जाणार.” तिला काय कळलं माहीत नाही, पण ती जोरात रडायला लागली. माझं मन कुठेच लागत नव्हतं. फक्त उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा! माझ्या बहिणींनी आता मला बाळ होणार तर डोहाळ जेवण करू या, असं ठरवलं. मावशीने मला साडी घेतली. आम्ही मस्त जेवायला गेलो. हे सर्व मला फार सुखावून गेलं! इतकी सगळी धावपळ, तयारी करूनही माझ्या मनात धाकधूक होतीच. असं अचानक आई होणं मला जमणार का? हे मला समजत नव्हतं. मी माझ्या बहिणीशी हे बोलत असताना तिचा नवरा पटकन म्हणाला "अगं ताई, मी नाही का बाळाला जन्म न देता बाबा झालो, तशी तूसुद्धा आई झालीस." त्याच्या ह्या वाक्याने माझ्या मनातल्या शंकांचं मळभ दूर व्हायला सुरुवात झाली.

अक्षय्य तृतीयेच्या छान मुहूर्तावर, सर्व आप्तेष्ट संस्थेत जमले. आमच्याबरोबर आणखी तीन जोडप्यांचा दत्तकविधान कार्यक्रम सुरू झाला. अतिशय नीटनेटका सुंदर कार्यक्रम. माझे डोळे सारखे भरून येत होते. गेली दहा वर्षं मी ज्या मातृत्वाच्या शोधात होते, तो शोध आता संपत होता. मीसुद्धा आई झाले होते!! माझ्या भावाच्या गाडीतून घरी जात असताना पिल्लू अगदी शांतपणे माझ्या बाजूला बसून होती. खिडकीतून दिसणारी बाहेरची दृश्यं अगदी डोळे विस्फारून पाहत होती. माझा भाऊ म्हणालाही की “तायड्या, आपल्या गाडीत एखादं लहान लेकरू बसलंय असं वाटतंच नाहीये.” आमच्या घरी माझ्या भावंडांनी आमच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. सगळं घर लखलखत होतं. तेव्हापासूनच आयुष्य उजळून निघालंय! आणि तो आनंद फक्त वाढतंच चाललाय!

आई बनण्याचा माझा खरा प्रवास आमचं पिल्लू घरी आल्यावर सुरू झाला. तिची तब्येत, खाणंपिणं हळूहळू सुधारत होतं. तीसुद्धा आता एक हसरं खेळकर बाळ झाली होती. आपण रडलो तर कुणी घ्यायला आहे, ही गोष्ट जणू तिची ताकद होती. पण बालसंगोपनाच्या माझ्या गोंडस कल्पनांना पिल्लूने घरी येताच तडा दिला! सतत मिळणार्‍या अटेन्शन आणि प्रेमामुळे ती जिद्दी आणि आक्रमक बनली होती. हे आपल्यापासून दूर तर जाणार नाहीत ना, ह्या भीतीने ती आकांडतांडव करायची. प्रत्येक वस्तूला हात लावून पाहण्याची उत्सुकता खूप. त्यामुळे ती कधीच स्थिर बसत नसे. आम्ही दोघे आता कायम तिचेच आहोत ही खातरी वाटली, तशी ती थोडी शांत झाली. तिची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. ती सहा महिन्यात चालेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं असताना पंधरा दिवसातच ती चालायला लागली. आता तर ती तिच्या वयाच्या इतर मुलांनाही कधी कधी भारी पडते, तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. तिच्या शाळेतसुद्धा ती उत्साही आणि प्रेमळ मूल आहे. तिचे आई-बाबा म्हणून ओळखले जावे यासारखी धन्यता ती काय!

मी जशी आई झाले, तसा बाबा होण्याचा माझ्या नवर्‍याचा प्रवासही चॅलेंजिंग होता. पिल्लूने त्या संस्थेत फारसे पुरुष पाहिलेले नव्हते. तिथे सर्व कामांना स्त्रियाच. त्यामुळे बाबा तिच्या रूममध्ये आला तरी ती घाबरायची. त्याने जवळ घेतलं तर त्याची दाढी, अंगावरचे केस याकडे फार विस्मयाने पाहायची. नवर्‍यानेही फार धीराने, शांतपणे तिची ही भावना कमी होण्याची वाट बघितली. आता माझं पिल्लू म्हणजे एक पूर्ण बाबाभक्त मुलगी आहे. त्या दोघांचं फार सुंदर भावविश्व आहे. तिचा आणखी एक हक्काचा माणूस म्हणजे माझी आई. माझ्या आईला तिची दोन्ही नातवंडं सारखीच. तिने तिलाही तेवढाच जीव लावलाय. पिल्लूही तिच्यावर सगळ्यात जास्त सत्ता गाजवते! सगळ्यात सुखद धक्का म्हणजे माझ्या सासरच्या मंडळींनी तिला मनापासून स्वीकारलं. सर्वांनी तिला नुसतंच स्वीकारलं नाही, तर लळा लावला. आमच्या बाळाला त्याची गरजही जास्त आहे.

चार महिन्यांचा ट्रायल पीरियड संपला आणि कायद्याने पिल्लू आमची झाली. आम्हाला तिचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं तो अगदी सर्वोच्च क्षण होता. तिचा वाढदिवस आम्ही फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला. तो जणू आमच्या आई-बाबा होण्याचा विजयोत्सवच होता. ज्या माझ्या बाळाच्या अस्तित्वाचं कोणतंही स्वागत झालं नव्हतं, त्याचं भव्य सेलेब्रेशन करणं आवश्यकच होतं! आम्ही दोघं नेहमी म्हणतो की ‘अरे, हे आपलंच कुरियर चुकीच्या पत्त्यावर गेलं होतं.’ कित्येकांना तर ती एक दत्तक मूल आहे ह्याची भनकही लागत नाही. आमचं आयुष्य ह्या बाळाने परिपूर्ण, रसपूर्ण बनवलंय. तिला आम्ही प्रेमाशिवाय काय देणार? पण ती मात्र आम्हाला भरभरून देत आली आहे. सुधीर मोघेंच्या कवितेनेच ह्या लेखाचा शेवट करते.

कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे

माती कोठल्या धरेची, त्याच्या नखांना लागली
माया हिरवी कोणती, त्याच्या उरात साठली
आणि कोठले आकाश, त्याने सर्वांगा माखले

कुठे पिऊन घेतले, त्याने मेघातले जळ
दिली वार्‍याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ
त्याच्या लकेरीत गाणे, कुण्या जन्मीचे भेटले

माझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस
त्याला न्हाऊ घालावया ओला काजळ पाऊस
माझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

1 Sep 2017 - 6:19 pm | सुबोध खरे

अगदी हृदयातून आलेले आर्त बोल आहेत.
या परिस्थितीतील जोडपी गेली २६ वर्षे पाहत आलो आहे. किती तरी जोडप्याना केवळ अशा देणे आणि धीर देणे एवढेच डॉक्टर म्हणून करू शकतो. प्रचंड खर्च आणि प्रचंड मानसिक तणाव यातून युगुलं जाताना पाहून फार हतबलतेची भावना येते.
"इतकी वर्षं प्रत्येक महिन्याच्या पाळीला मला रडू यायचं. आता तर आम्हाला सगळ्यांनाच रिझल्ट नाही आला तर रडायची पाळी होती. कारण फार ओढून ताणून केलेली ही गोष्ट होती."
आपण आणि आपले यजमान यांनी एकमेकांना दोष न देता एकमेकांना सांभाळून घेतलं हि फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अशा तणावातून वैफल्याची भावना फार लवकर येते.
दर महिन्याला पाळी दोन दिवस पुढे गेली कि लगेच अशा पल्लवित होते आणि परत तिसऱ्या दिवशी पाळी आली कि निराशेच्या खोल दरीत फेकले जातात अशा अतिशय वाईट दोलायमान परिस्थितीतून जोडप्याना जायला लागते ती स्थिती प्रत्यक्ष त्यांनाच माहित असते.
पण एकदा बाळ घरात आले कि या सर्व ताण तणावाच्या गोष्टी विसरायला होतात. मातृत्व हि काय गोष्ट आहे याची खरी जाणीव बाळ कुशीत आल्यावरच होते.
आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्याला आणि आपल्या बाळाला मनपूर्वक शुभेच्छा.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Sep 2017 - 6:22 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्ही दोघांनी अशा परिस्थितीतही न डगमगता अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन . . . तुमचं कुरियर दुसऱ्या पत्त्यावर गेलं होतं पण योग्य पत्ता तुमचाच आहे ह्याची खात्री पटली . . .

तुमच्या पिल्लूला अनेक आशिर्वाद !

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Sep 2017 - 6:23 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्ही दोघांनी अशा परिस्थितीतही न डगमगता अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन . . . तुमचं कुरियर दुसऱ्या पत्त्यावर गेलं होतं पण योग्य पत्ता तुमचाच आहे ह्याची खात्री पटली . . .

तुमच्या पिल्लूला अनेक आशिर्वाद !

ज्योति अळवणी's picture

1 Sep 2017 - 6:28 pm | ज्योति अळवणी

सारखे डोळे भरून येत होते वाचताना. मन:स्पर्शी लिहिलं आहात. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

लेख खूप खूप आवडला. तुमच्या कुटुंबाला अनेक शुभेच्छा.

जव्हेरगंज's picture

1 Sep 2017 - 6:47 pm | जव्हेरगंज

अरे, हे आपलंच कुरियर चुकीच्या पत्त्यावर गेलं होतं! >>>>> क्या बात है!!!

_/\_

अनन्त्_यात्री's picture

1 Sep 2017 - 6:49 pm | अनन्त्_यात्री

सु॑दर लेख!

सप्तरंगी's picture

1 Sep 2017 - 7:03 pm | सप्तरंगी

अतिशय हृदयस्पर्शी लेख आणि अनुभव. कनेक्टेड फिलिंग आली वाचताना. तिघांना खूप शुभेच्छा.

Ranapratap's picture

1 Sep 2017 - 7:35 pm | Ranapratap

तुमच्या जिद्दीला सलाम, तुम्हा तिघांनाही मी दीर्घ आयुष्य चिंतितो, माझ्या दोन मित्रांनाही हा लेख वाचायला देतो. आपलं लेखन फार छान आहे, लिहीत राहा आणि तुमच्या पिलू ची प्रगती कळवत राहा.

तुषार काळभोर's picture

1 Sep 2017 - 7:51 pm | तुषार काळभोर

लेखमालेचे नाव सार्थक करणारा लेख!!!

तुम्हाला जशी परिचिताच्या अनुभवातून प्रेरणा मिळाली, तशीच तुमचा अनुभव वाचून अजून कित्येकांना नक्कीच मिळेल.

तुम्हाला व तुमच्या मुलीला खूप खूप शुभेच्छा!!

तुषार काळभोर's picture

1 Sep 2017 - 7:53 pm | तुषार काळभोर

तुमच्यात अफाट प्रतिभेचा लेखक आहे. मिपा आपलंच आहे, कृपया लिहित्या राहा, ही नम्र विनंती.

दहा वर्षांपासूनचं लिहून काढलं आहे तरी प्रत्येक वाक्याला वाटतय हे आता होतय. उद्या परवा काय होणार? शिवाय स्वत:चे अनुभव. लेख नव्हे झय्राचं पाणी आहे.

नीलमोहर's picture

1 Sep 2017 - 9:42 pm | नीलमोहर

मातृत्वाचा अनुभव घेण्यासाठी केवढ्या दिव्यांतून जावे लागले तुम्हाला, अर्थात त्या सार्‍याचं पिल्लूच्या आगमनाने चीज झालं, आणि ते होणारच होतं.
तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि पिल्लूला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..

टिवटिव's picture

1 Sep 2017 - 11:07 pm | टिवटिव

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

खूप आभार या प्रतिसादाबद्दल! हे सगळं वाचुन एके ठिकाणी वाचलेलं वाक्य आठवलं The more personal you write, the more universal it becomes!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2017 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतक्या नाजूक विषयावरचे भावविश्व उलगडणारे सरळ सोप्या शब्दांत, पण इतके हृदयस्पर्शी, मनोगत फारा दिवसांनी वाचले. दहा वर्षांची खडतर वाट आणि तिचा आनंदी शेवट, हा सगळा प्रवास वाचताना लेखाच्या शेवटावर केव्हा आलो हे कळलेच नाही ! तुमच्या धीराची जास्त स्तुती करावी की तो प्रवास समर्थपणे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या लेखनकौशल्याची, अश्या संभ्रमात होतो... निर्णय कठीण आहे... दोन्ही तितकेच पात्र आहेत !

आम्ही दोघं नेहमी म्हणतो की ‘अरे, हे आपलंच कुरियर चुकीच्या पत्त्यावर गेलं होतं.’ हा तर तुमच्या मनोगताचे सार सांगणारा कळस आहे !!!

हा प्रवास करणार्‍या तुम्हा उभयतांना आणि त्यात तुम्हाला सहृदयतेने साथ देणार्‍या नातेवाईक व मित्रांची प्रशंसा आम्ही काय करणार ! सॅल्युट स्विकारा !

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Sep 2017 - 12:48 am | लॉरी टांगटूंगकर

_/\_

शलभ's picture

2 Sep 2017 - 12:55 am | शलभ

हृदयस्पर्शी..

या लेखमालेच्या विषयाला साजेसा आणि अत्यंत अप्रतिम लेख ! तुम्ही सोसलेल्या कष्टांना इतकं गोड फळ आलं , वाचून फार छान वाटलं. तुम्हा तिघांना पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा !

लिहीत रहा, तिची प्रगती आम्हाला ऐकायला फार आवडेल. अजुन काय बोलू?? हॅट्स ऑफ तुम्हाला आणि तुमच्या पतीला !!

मधुरा देशपांडे's picture

2 Sep 2017 - 1:51 am | मधुरा देशपांडे

अत्यंत सुंदर लिहिलंय, डोळे भरून आले सतत, पुन्हा पुन्हा वाचले शेवटचे काही परिच्छेद...खूप शुभेच्छा!!

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2017 - 9:03 am | पिलीयन रायडर

"जे झाले ते असे" ह्या पद्धतीने तटस्थपणे मांडलेला लेख फार आवडला. अगणितवेळा वाचलाय...

आपल्याकडे लग्न आणि मूल ह्या दोन गोष्टींवर आयुष्याचे यशापयश जोखण्याची एक विचित्र मानसिकता आहे. ज्यांचं हे सगळं काही विघ्न न येता पार पडतं, त्यांना आपण आयुष्यात इतरांहून फार यशस्वी झालो असं उगाच वाटतं. मूल होण्यावरुन तर बायकांना नैराश्य येईल इतका त्रास दिला जातो. अनेक जणींच्या स्वभावात त्याने मोठे बदल होतात. तुम्ही सुद्धा फार वाईट अनुभवांमधून गेला आहात, पण तुमच्या निवेदनात कुठेही कुणाही विषयी कटूता दिसत नाही. हे मला विशेष भावलं. कुठेही मी किती सहन केलंय असा आविर्भावही जाणवत नाही. ह्या तटस्थपणामुळेच लेख जास्त परिणामकारक झालाय.

अगदी नऊ महिने पोटात वाढवलेलं आणि ज्याच्याशी "हे माझं मूल आहे" हा अहंकार जोडला गेला आहे, अशा आपल्याच बाळासोबतही काही वेळ तारांबळ उडते. अनेकदा कुठून ह्या भानगडीत पडलो असंही वाटतं. तरी बरं ते मूल अगदीच मातीचा गोळा असल्या सारखं असतं, ज्याला आपण हवं तसं घडवू शकतो. त्याच्यावर जन्मल्याच्या सेकंदापासून आपलेच संस्कार असतात. अशा वेळेस एका सव्वा वर्षाच्या मुलीला एका क्षणात आपलं म्हणणं फार मोठ्या मनाचं लक्षण आहे. तुम्ही इतक्या मोठ्या दु:खातून गेला होतात की तिचं एकटेपण तुम्हाला इतर कुणाहूनही जास्त समजलं. आणि मला जे अक्षरशः अशक्य वाटतं ते तुम्ही इतक्या सहजपणे करु शकलात. इथे मी तुम्ही म्हणतेय तेव्हा तुमच्या मिस्टरांनाही बाय डिफॉल्ट पकडलंय. हे श्रेय तुम्हा दोघांचं आहे.

तुम्ही तिघं एकमेकांसाठीच बनलेले आहात.आयुष्यात जसा अचानक एक माणूस जन्माचा जोडीदार म्हणून लाभतो आणि आपलाच होऊन जातो.. तो आपल्या रक्ताचा नसतो तरी रक्ताच्या नात्याहून मोठा होऊन जातो, तसं हे पिल्लू तुम्हाला भेटलंय. तुम्ही तिला जन्म दिलात की नाही ह्यानी काडीचाही फरक पडत नाही. तुमच्या दोघांपेक्षा जास्त प्रेम ह्या बाळाला कुणी देऊ शकलंच नसतं.

तुमचं आयुष्य असंच उत्तरोत्तर उजळत राहो!!

गुल्लू दादा's picture

2 Sep 2017 - 9:57 am | गुल्लू दादा

खूप दिवसांपासून डोळ्यातून पाणी काढणारा लेख वाचला नव्हता.आज मात्र डोळ्यांची हालत आजच्या मुंबई पेक्षा वेगळी नव्हती. इतकं स्पष्ट लिहिणे सोपं नाहीये. लेखामध्ये भरपूर Waw movements होत्या. तुमच्या पिल्लू ला भरपूर शिकवा. तिला तुम्ही कधीही दत्तक असल्याची जाणीव होऊ देणार नाहीत या बद्दल खात्री आहेच. छान लिहिता लिहीत रहा. पिल्लू चे updates देत रहाल ही अपेक्षा. या लेखाने चार चांद लागलेत लेखमालेला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.. प्रतीक्षेत☺

पिशी अबोली's picture

2 Sep 2017 - 10:12 am | पिशी अबोली

तुमचं मातृत्व किती उदात्त आहे!

दहा वर्षांत काय काय सहन केलंत, तरीही लिखाणात कुठेही कडवटपणा नाही. तुम्ही, तुमचा नवरा, दोघेही प्रचंड ग्रेट आहात.
इतकं अकृत्रिम लिखाण वाचून काय वाटलं सांगूच शकत नाही..

तुमच्या पिल्लूला एक गोड पापा, आणि खूप खूप शुभेच्छा!

रायगड's picture

2 Sep 2017 - 10:59 am | रायगड

किती किती सोसलंयत तुम्ही...पण पिल्लूच्या आगमनाने आता सगळं भरून पावलं

खरं आहे, एखाद्याची किंमत लग्न , मुल यासारख्या गोष्टींनी करणे म्हणजे मूर्खपणा आहे...कधी सुधारणार हे सगळं?

संत घोडेकर's picture

2 Sep 2017 - 1:47 pm | संत घोडेकर

हृदयस्पर्शी लेख, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 2:20 pm | श्रीगुरुजी

सुंदर अनुभव! तुम्हा तिघांना खूप खूप शुभेच्छा!!!

तरीही सांगू इच्छितो की जे तुम्ही केलंत ते अतुलनीय आहे. देवकी आणि यशोदेच्या कथा ऐकणं वेगळं आणि त्याप्रमाणे वागणं वेगळं. त्यासाठी जे असामान्य धैर्य लागतं ते तुम्ही दाखवलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा उभयतांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

जुइ's picture

3 Sep 2017 - 3:34 am | जुइ

खूप छान भावपूर्ण आणि अगदी मनापासून झाला आहे तुमचा हा प्रवास. वाचत असताना अनेकदा माझे डोळे भरुन आले.

यशोधरा's picture

3 Sep 2017 - 7:17 am | यशोधरा

अतिशय प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी लिखाण. तुम्हां तिघांना अनेक शुभेच्छा!
हा आगळा वेगळा विषय निवडल्याबद्दल साहित्य संपादकांचेही खास आभार, अन्यथा हे असे विलक्षण अनुभव वाचायला मिळाले नसते..

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Sep 2017 - 6:42 pm | भाग्यश्री कुलकर्णी

दंडवत.सुरेख लिहीलय.चित्र उभे राहिले समोर .‘अरे, हे आपलंच कुरियर चुकीच्या पत्त्यावर गेलं होत" हे खरय अगदी.

सुमीत भातखंडे's picture

4 Sep 2017 - 12:03 pm | सुमीत भातखंडे

अप्रतिम लेख.

पप्पुपेजर's picture

4 Sep 2017 - 3:35 pm | पप्पुपेजर

डोळे भरून आले सतत,तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

प्रमोद देर्देकर's picture

5 Sep 2017 - 5:46 am | प्रमोद देर्देकर

अतिशय प्रामाणिक , मनापासून लिहलेलं हृदयस्पर्शी लिखाण. तुम्हां तिघांना भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 12:29 pm | सविता००१

अत्यंत हृदयस्पर्शी लिखाण. कधी डोळे वहायला लागले ते कळालंही नाही. ___________/\__________

चिगो's picture

5 Sep 2017 - 2:21 pm | चिगो

तुमच्या उदार मातृत्वाला, तुमच्या सहनशीलतेला, तुम्हां उभयंतांच्या सहजीवन सामंजस्याला आणि तुमच्या लेखनशैलीला त्रिवार सलाम.. आपले अनुभव आणि भावना कुठलाही गंड आड न येऊ देता केलेले असे सुरेख लेखन विरळाच !

तुम्हां तिघांनाही आणि तुमच्या कुटूंबाला मनःपुर्वक शुभेच्छा..

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2017 - 3:23 pm | चौथा कोनाडा

काय लिहू ?
वाचताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते !
सलाम ..... तुम्हाला, तुमच्या जोडीदाराला अन सर्व कुटुंबिय, आप्त, मित्रांना !

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2017 - 11:38 pm | अमरेंद्र बाहुबली

खूप छान लेख. लेखन करतच रहा.

अभिजीत अवलिया's picture

19 Sep 2017 - 7:13 pm | अभिजीत अवलिया

फार हृृदयस्पर्शी लेख.

परिंदा's picture

21 Sep 2017 - 2:44 pm | परिंदा

खुपच सुंदर लेख!
वाचताना डोळ्यात कधी पाणी आले ते कळलेच नाही.
देव तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सदैव सुखात ठेवो __/\__

संदीप धुमाळ's picture

2 Oct 2017 - 10:37 pm | संदीप धुमाळ

खूप छान !