कडबू हा पदार्थ आमच्याकडे पुराणपोळ्यांसह गौरीच्या जेवणाला करतात. म्हणजे साधारण पणे पश्चिम महाराष्ट्रातला नेहमीचा मेनू.. पुपो, कटाची आमटी, वरणभात , लोणकढं तूप, काकडीची गोडसर कोशिंबीर, बटाटा भाजी, मटकीची उसळ, कुरडया सांडगे वगैरे..
यात पुपो करायचा कुणा गृहिणी ला कंटाळा आल्याने कडबू चा शोध लागला असावा असं माझं लॉजिक!!
पाकृ येणेप्रमाणे -
पुरण -
१ वाटी चणा डाळ, १ वाटी गुळ किसून, २.२५ वाट्या पाणी, हळद चिमूट भर, तेल चमचा भर, सुंठ, जायफळ, वेलदोडे.
पारी-
गव्हाचे पीठ २ वाट्या, २ चमचे रवा, १ चमचा तेल कडकडीत गरम करून, पाणी, चिमूट भर मीठ
तळण्यासाठी साजूक तूप (भरपूर घ्यायचे, सगळे लागत नाही)
**मी पूरण करण्याच्या आदल्या रात्री डाळ स्वच्छ धुवून ३ वाटी पाण्यात भिजत घालते. असे केल्याने पुरण यंत्राचा वापर करायचे कष्ट वाचतात आणि पुरण छान मऊसर होत.**
त्याप्रमाणे ५-६ तास भिजलेली डाळ , २.२५ वाटी पाण्यासह हळद आणि तेल घालून pressure कूक करून घ्यायची.
४ किंवा ५ शिट्ट्या पुरे होतील. तोपर्यंत गुळ किसून घ्यायचा आणि कणिक भिजवायला घ्यायची.
कणिक भिजवताना गव्हाच्या पिठाऐवजी मैदा हि वापरतात. आपल्या पसंती वर अवलंबून.
कणिक, रवा, मीठ, एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन घालायचे. आणि थोडी घट्ट कणिक तिंबून घ्यायची.
वर तेल लावून झाकून ठेवायची.
आता पुरणाकडे वळू. शिजलेली डाळ थोडी थंड होऊ द्यायची.डाळीचं पाणी काढून हवी असल्यास कटाची आमटी करावी.
मी करताना डाळ बारीक चाळणीत काढते आणि पाणी निथळून घेते. म्हणजे डाळीत पाणी उरत नाही.
आपण पूर्वी भिजत घातल्याने डाळ मऊ च शिजते, आता पावभाजी साठी वापरतो त्या smasher ने ती मॅश करून घ्यायची. जाड बुडाची कढई गॅस वर तापायला ठेवायची. त्यात हि मऊ केलेली डाळ आणि १ वाटी गुळ टाकायचा.
सतत ढवळत राहायचं. १०-१५ मिनिट ढवळून झालं कि हे मिश्रण थोडं कमी पातळ दिसेल. ते थंड झालं कि आपलं पुरण तयार!!
मग त्यात जायफळ किसून (मी भरपूर घालते.) , वेलदोड्याची पूड, आणि सुंठ घालायचं.
कडबू करण्या साठी भिजवलेल्या कणकेची पारी लाटून घ्यायची. त्यात आपण करंजी त सारण भरतो तसं पुरण भरायचं.
कडबू बंद करताना मुरड घालायची किंवा कडा कापून घ्यायच्या.
तळण्यासाठी भरपूर तूप गरम करायला ठेवायचं. कडबू मंद आचेवर खरपूस टाळून घ्यायचे.
यातील काहीच डाएट friendly नसल्याने त्याचा विचार न करता , कडबू वाढताना देखील साजूक तुपाची धार सोडायची!!
(माझा हा मिसळपाव वर लिहिण्याचा (प्रतिक्रिया वगळून) पहिलाच प्रयत्न. काहीबाही चुकले असेलच, तरी कृपया समजून घ्यावे. पारी/पुरण करण्यात काही टिप्स असतील तर मला सांगाव्यात, पुढच्या वर्षी करून पाहीन!)
प्रतिक्रिया
31 Aug 2017 - 6:01 pm | अनन्न्या
मी त्यात एक वाटी चणाडाळ, अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी खसखस आणि काजू तुकडे, बेदाणे असं घातलेलं. लय भारी खूप आवडतात!
31 Aug 2017 - 6:05 pm | अनन्न्या
ते राहिलं! तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे मी घातलेले प्रकार सांगितलेत, पण तुम्ही केल्यात तेही छान लागतं.
31 Aug 2017 - 6:41 pm | गम्मत-जम्मत
'तू' म्हणा! तुमच्या पद्धतीने करून पाहीन आता.
31 Aug 2017 - 11:44 pm | अभिदेश
पण टाळण्यापेक्षा उकडून घेतले तर ? आम्ही उकडून घेतो , तेही छान लागतात.
31 Aug 2017 - 11:45 pm | अभिदेश
पण उकडून घेतले तर ? आम्ही उकडून घेतो , तेही छान लागतात.
1 Sep 2017 - 5:32 pm | गम्मत-जम्मत
हो वाफवून घेतलेले पण खाल्लेत. त्याला कानोले म्हणतात ना ?
31 Aug 2017 - 6:57 pm | स्वाती दिनेश
फटू कुठेय?
कडबू छानच लागतात.
बाप्पाच्या नैवेद्यात का नाही घातली ही पाकृ?
स्वाती
1 Sep 2017 - 5:31 pm | गम्मत-जम्मत
बाप्पाच्या नैवेद्यात घालायला हवा होता..
31 Aug 2017 - 10:08 pm | गम्मत-जम्मत
31 Aug 2017 - 10:15 pm | गम्मत-जम्मत
.
31 Aug 2017 - 10:20 pm | पैसा
अशा पारंपरिक पाककृती नेहमी आवडतात!
31 Aug 2017 - 10:23 pm | गम्मत-जम्मत
31 Aug 2017 - 10:45 pm | राघवेंद्र
मस्त एकदम !!!
31 Aug 2017 - 11:09 pm | इशा१२३
मस्त!
1 Sep 2017 - 9:03 am | सविता००१
मस्तच आलाय फोटो.

मी पण काल केले होते कडबू. मला मुरड मात्र तितकीशी चांगली येत नाही त्यामुळे कातण्याने कापूनच मी कडबू केले. वरती खसखस लावली होती. आमच्या घरी तसे आवडतात म्हणून. माझी रेसिपी वर अनन्न्या ने लिहिलंय तशीच आहे.
हा आमचा फोटो:
1 Sep 2017 - 5:33 pm | गम्मत-जम्मत
@सविता००१ किती देखणा फोटो आलाय..
सर्वांचे आभार!