गूढ भाग १

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
17 Jun 2017 - 12:02 am

गूढ

भाग १

चंद्रभान एक प्रथितयश लेखक. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नसे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघत असत. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे चंद्रभान खुप खुश होता. तो स्टुडियो मध्ये वेळेच्या अगोरच पोहोचला. कार्यक्रमाचा दिग्दर्शक राजन पूर्णपात्रे त्याचा मित्र होता. चंद्रभानला बघून तो खूप खुश झाला.
"ये ये भानू! लवकर बरा आलास?" राजनने त्याला मिठी मारत विचारले.

"अरे आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. वर मुलाखत आहे. त्यामुळे थोडा एक्साईट झालो आहे. राहावल नाही म्हणून लवकर आलो. तू बिझी आहेस का? तस असेल तर तुझ्या केबिनमध्ये थांबतो मी." चंद्रभान हसत म्हणाला. राजन काही म्हाणार इतक्यात... "अरे वा! तुमच्यासारखी भय आणि गूढ कथा लिहिणारी व्यक्तीसुद्धा एक्साईट होऊ शकते?" एक नाजूक किनाऱ्या आवाजातला प्रश्न चंद्र्भानच्या मागून आला आणि चंद्रभानने मागे वळून बघितले.

आवाजाप्रमाणेच नाजूक आणि मोहक तरुणी त्याच्या मागे उभी होती. गुलाबी रंगाची साडी आणि स्लीव्जलेस ब्लाऊज असा तिचा पेहेराव होता. चेहेऱ्यावर हलकासा मेकप होता.

'मेकपशिवायच चांगली दिसेल ही.' चान्द्रभानच्या मनात आल. राजनकडे वळत त्याने 'ही कोण?' असे नजरेनेच विचारले.

राजनने चंद्रभानकडे हसून बघितले आणि त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला,"निशा तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते आत्ताच विचारून घे भानुला. त्या निमित्ताने तुमची ओळखसुद्धा होईल. तुलाही गरज आहे त्याची ओळख होण्याची. भानु ही निशा बर का! आमची स्टार मुलाखतकार. असे गुगली टाकते ना एक एकदा... तयार रहा हो तिच्या प्रश्नाना." आणि मग निशा कडे वळत तो म्हणाला,"निशा, तुम्ही दोघे इथे गप्पा मारत बसा. सगळी अरेन्ज्मेंट झाली की मी तुम्हाला बोलावून घेतो सेटवर." अस म्हणून राजन सेटवर गेला.

"नमस्कार निशा. तुम्हाला अस का वाटल की गूढ किंवा भय कथा लिहिणारी व्यक्ति एक्साईट होऊ शकत नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे हो." हसत हसत चंद्रभान म्हणाला आणि जवळच्याच एका खुर्चीवर बसला. अजून एक खुर्ची ओढून घेत निशा देखील त्याच्या समोर बसली खरी पण अजूनही तिच्या चेहेऱ्यावर हसू नव्हत. काहीस गूढ आणि हरवलेल्या नजरेने ती चंद्रभानकडे बघत होती.

"काय हो? अस का बघता आहात माझ्याकडे? मी कोणी भूत किंवा जादूटोणा करणारा वाटतो आहे की काय तुम्हाला? एक साधासा लेखक आहे मी फक्त." चंद्रभान हसत म्हणाला.

तरीही निशा मात्र शांत होती. ती एक टक त्याच्याकडे बघत होती. तिची नजरदेखील अजूनही गूढ... हरवलेली होती. आता मात्र चंद्रभानला तिच हे वागण आवडल नाही. तिच्या चेहेऱ्यासमोर टिचकी वाजवत त्याने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या टिचकीचा परिणाम मात्र लगेच झाला. निशा एकदम खोल झोपेतून जागी व्हावी तशी दचकली आणि काहीश्या गोंधळलेल्या आणि आश्चर्यचकित चेहेऱ्याने चंद्रभानकडे बघायला लागली.

"काय हो निशाजी. कुठल्या जगात अडकला आहात? मी तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही मात्र नजर माझ्यावार रोखून कुठल्यातरी दुसऱ्याच विचारात हरवल्या आहात. सगळ ठीक आहे ना?" चान्द्रभानाने तिला विचारले.

"हो... ठीकच असावं.... मी खर तर हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे. जाउदे मी कशी आहे हे फारस महात्वाः नाही. पण खर सांगू का...... मला आश्चर्य वाटत की तुमच्यासारख्या तिशीतल्या तरुण व्यक्तिने हे अस भय आणि गूढ कथांमध्ये का गुंतून राहावं? मला माहित आहे की तुम्ही इतरही साहित्य लिहिता. काही रोमांटीक कथा देखील तुम्ही लिहिल्या आहात. पण तरीही तुमची ओळख गूढ किंवा भय कथा लेखक अशीच आहे. अस का? रोमांटीक किंवा इतर अस काही लेखन करावस नाही वाटत का तुम्हाला?" निशाने चान्द्रभानला विचारलं. अजूनही ती त्याच्याकडे ऐकटक बघत होती.

"बऱ्याच वेग-वेगळ्या कथा मी लिहिल्या आहेत हे खर आहे. पण मला गूढ आणि भय हे दोन विषय आकर्षित करतात. अशा कथा लिहिण्यात खूप थ्रील आहे हो." चान्द्रभानाने तिला म्हंटल.

"पण असे विषय तुम्हाला कसे सुचतात?" निशाने विचारले.

"कसे सुचतात ते मला नाही माहित. बस सुचतात." चंद्रभान म्हणाला. पण निशाच्या चेहेऱ्यावर उत्तराने समाधान झाल नसल्याच त्याला दिसल. मग हसत म्हणाला,"त्याच अस आहे न निशाजी की एखादी छोटीशी पण वेगळी घटना किंवा एखादी वेगळी वस्तू ..... जागा... बघितली की मला त्यातून काहीतरी गूढ अस दिसायला लागत आणि असच सुचत जात. मग लिहायला सुरवात केली ना की आपोआप कथा तयार होत जाते." चंद्रकांत असाच मूडमध्ये येऊन बोलायला लागला होता. पण त्याला मध्येच थांबवत निशाने विचारले,"आपोआप तयार होते कथा? म्हणजे नक्की काय चंद्रभान?" तिचा किनारा आवाज थोडा कातर झाला होता.

तिच्या अशा कातर आवाजाने तो थोडा गोंधळला. पण मग त्याकडे दुर्लक्ष करून प्रत बोलायला लागला,"म्हणजे अस निशाजी की एखादी शांत जागा किंवा एखादी जुनी वास्तू बघितली की तिथे कधीतरी काहीतरी वेगळ घडल असेल अस माझ मन मला सांगत. मग ते काय असेल याचा विचार मी करायला लागतो आणि कागद पेन घेऊन बसलो की आपोआप सुचायला लागत आणि मी लिहित जातो. अनेकदा तर कथा लिहित असताना माझ्या मनात शेवट वेगळाच असतो. पण कथा पूर्ण होते तेव्हा माझ मलाच आश्चर्य वाटत कारण शेवट मी अजून काहीतरी वेगळाच लिहिलेला असतो." अस म्हणून चंद्रभान थांबला.

"आश्चर्य का वाटत चंद्रभान?" निशाने अधिरतेने विचारले.

"निशा... मला आश्चर्य वाटत कारण मी जो शेवट माझ्या मनात ठरवलेला असतो तो मी लिहीतच नाही. माझ्या हातात जी कथा असते तिचा शेवट काहीतरी खूप वेगळा मी न विचार केलेला असाच असतो. जस काही तो शेवट मी लिहिलेलाच नाही." बोलता बोलता चान्द्रभानची तंद्री लागली. पण निशाच्या ते लक्षात आल नाही. ती त्याच्या उत्तराने थोडी अस्वस्थ झाली होती. तिची नजर खाली जमिनीवर खिळलेली होती. तशीच नजर असताना ती म्हणाली,"अहो शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळ असू शकत. आणि म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला अस कस होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच न? हो की नाही?"

निशाच्या शेवटच्या 'हो की नाही' ने चंद्रभानची तर्न्द्री तुटली. त्यामुळे ती काय म्हणाली ते त्याला समजल नव्हत. पण अमला समजल नाही अस तिला म्हंटल तर वाईट दिसेल अस वाटून त्याने तिच्या हो ला हो केल. मात्र त्याच्या त्या एका 'हो'मुळे निशा एकदम खुश झाली.

"तुम्हाला माहित नाही चंद्रभान पण तुमच्या या एका हो ने मला किती मोठा दिलासा दिला आहे. कधी कधी काही शेवट अर्धवट असतात. त्यामुळे अनेक जीव किंवा विचार अडकून राहातात नाही का? पण आता मला खात्री आहे की अस होणार नाही. आता माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की मिळेल. आता मी उमरगावला जायला मोकळी झाले. " निशा मनापासून हसत चंद्रभानला म्हणाली.

आपण नक्की कशाला हो म्हणालो आहोत याची चंद्रभानला अजूनही कल्पना नव्हती. आणि अचानक मुलाखती संदर्भातले प्रश्न विचारायचे सोडून ही निशा हे अस कुठेतरी जाण्याबद्दल का बोलायला लागली हे देखील त्याला कळल नव्हत. 'उमरनगर? कुठेतरी एकल आहे हे नाव!' चंद्रभानच्या मनात आल. त्याबद्दल निशाला विचारावं म्हणून चंद्रभानने तोंड उघडल आणि तेवढ्यात राजनचा असिस्टट वैभव तिथे आला आणि म्हणाला,"निशा काम झाल आहे. चल."

"हो! आलेच मी वैभव. तू हो पुढे." निशा चंद्रभानची नजर चुकवत म्हणाली. निदान अस चंद्रभानला वाटल.

"नाही नाही. पुढ्यात घालून घेऊन यायला सांगितलं आहे तुला. चल तू." तो वैभव का कोण अगदी तिच्या शेजारी उभा राहून म्हणाला.

"इतका वेळ गेला तरी माझी आठवणसुद्धा नव्हती तुम्हाला. आणि आता काम झाल्यावर एका क्षणाची फुरसत नाही काय?" तिने थोड वैतागत म्हणल. "बर माझी मी पोहोचेन. तू यांना घेऊन जा." अस म्हणून ती बाजूच्या दारातून आत निघून गेली.

"सर, तुम्ही चला माझ्या बरोबर." क्षणभर निशा गेली त्या दिशेने बघून वैभव चंद्रभानकडे वळून म्हणाला. आणि त्याची वाट न बघता दाराच्या दिशेने निघाला. चंद्रभानदेखील त्याच्या मागे निघाला.

चंद्रभान काही न बोलता वैभवच्या मागोमाग सेटवर आला. ते दोघे तिथे पोहोचले पण सेट वरचे सगळेच दिवे बंद होते. "अरे सगळे दिवे का बंद आहेत कळत नाही. मी आलो तेव्हा सेटवर लखलखाट होता. सर तुम्ही इथेच थांबा. मी बघून येतो. काहीतरी घोटाळा झालेला दिसतो आहे. कुठेतरी शॉर्ट सर्किट असेल. राजन सर वैतागले असतील. मी आलोच." अस म्हणून आणि चंद्रभानला काही लक्षात यायच्या आत तो गायब झाला.

चंद्रभानला काही कळले नाही. तो बराच वेळ तिथे थांबला. पण त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल आजूबाजूला जाणवत नव्हती. सेट जर तयार असेल आणि फक्त दिवे बंद असतील तरी मग कोणी एकमेमांशी बोलत का नाही; याच त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होत. शेवटी हे अस अंधारात उभ राहून वैतागलेला चंद्रभान राजनला हाक मारत तो पुढे सरकला. नवीन-अनोळखी जागा असल्याने त्याला नक्की कुठे जाव ते लक्षात येत नव्हत.

"राजन... राजन.... अरे भय कथा मी लिहितो तू नाहीस. हे असे दिवे बंद करून तू मला घाबरवायचा प्रयत्न तर करत नाहीस ना?" राजनला हाक मारत आणि काहीस बोलत चंद्रभान पुढे सरकत होता. अचानक त्याचा धक्का कशाला तरी लागला आणि मोठ्ठा आवाज झाला. चंद्रभान देखील चांगलाच धडपडला. झालेल्या आवाजाने एकदम अनेकजण तिथे आले. कोणीतरी दिवेसुद्धा लावले. त्याठिकाणी एकदम लखलखाट झाला. चान्द्रभानला खाली पडलेला बघून राजनला खूप आश्चर्य वाटले.

"अरे चंद्रभान तू कधी आलास? बर, आलास तर सरळ माझ्या ऑफिसमध्ये यायचं न. इथे या बंद सेटवर काय करतो आहेस?" त्याला उठायला मदत करत राजन म्हणाला.

"राजन काय चेष्टा चालवली आहेस? अरे मी कधीच आलो आहे. तुझ्या ऑफिसमध्ये आपण भेटलो. मग तू सेट लावायला गेलास तेव्हा निशाला माझ्या बरोबर सोडून गेलास. आम्ही गप्पा मारत होतो तर तुझा असिस्टंट वैभव आला बोलवायला. निशा बहुतेक तयार व्ह्यायला गेली. मी तुझ्या त्या वैभव बरोबर इथे आलो. पण इथे अंधार होता. त्याच कारण शोधायला म्हणून तो वैभव मला इथेच सोडून गेला. मी बराच वेळ थांबलो पण काहीच हालचाल नाही वाटली. अरे कोणी इथे आहे की नाही ते देखील कळत नव्हते. बर तुला सोडून मी इथे कोणालाही ओळखत नाही. म्हणून मग तुला हाक मारत पुढे सरकलो तर धडपडलो." चंद्रभान राजनला म्हणाला.

चंद्रभान जे सांगत होता त्यामुळे राजनला खूप आश्चर्य वाटलं. पण इतरांच्या मनात काही येऊ नये म्हणून त्याने चंद्रभानचा हात धरला आणि म्हणाला,"बर बर... चल. जरा चहा घेऊ. मग सुरु करू तुझी मुलाखत." आणि त्याला घेऊन परत आपल्या केबिनच्या दिशेने निघाला.

केबिन मध्ये शिरताच राजनने चंद्रभानला सोफ्यावर बसवले आणि विचारले,"हा आता बोल. हे काय चालवाल आहेस तू? कोणत्यातरी गूढ कथेचा काहीतरी प्लॉट मनात आहे का? त्याचा प्रयोग तू माझ्यावर करून बघतो आहेस का?"

"मी? मी काय चालवाल आहे? म्हणजे काय राजन? काय म्हणायचं आहे तुला नक्की?" आता मात्र चंद्रभान पुरता गोंधळला होता.

"तू बाहेर काय म्हणत होतास? निशा तुला भेटली? वैभव बोलवायला आला होता? तू कस ओळखतोस निशाला आणि वैभवला?" राजनने चंद्रभानला विचारले.

"मी कस ओळखतो? अरे तूच ओळख करून दिलीस ना निशाशी? आता थोड्या वेळा पूर्वी इथेच तुझ्या ऑफिसमध्ये." चंद्रभान वैतागत म्हणाला.

"मी? भानू... अरे मी कधी ओळख करून दिली तुझी?" राजन आश्चर्याने म्हणाला.

राजनच्या बोलण्याने चंद्रभानच्या लक्षात आल काहीतरी गडबड होते आहे. त्यामुळे तो एकदम शांत झाला आणि म्हाणाला,"राजन काहीतरी गैरसमज होतो आहे दोघांचाही. मला काय माहिती आहे ते मी सांगतो आणि मग तुला काय माहित आहे ते तू सांग. ठीक?"

"ठीक आहे." राजन म्हणाला.

"तर अस झाल आहे की मी आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. इंटरव्यू देणार असल्याने थोडा एक्साईट होतो. म्हणून तू सांगितलेल्या वेळेच्या अगोदरच आलो; काही वेळापूर्वी. इथेच तुझ्या केबिनमध्ये आपली भेट झाली. तू माझ्याशी बोलत असताना इथे निशा आली. तू मला तिची ओळख करून दिलीस की ती तुमची स्टार मुलाखतकार आहे आणि माझी मुलाखत देखील तिच घेणार आहे. मग तू तिला म्हणालास की माझी चांगली ओळख व्हावी महणून आम्ही दोघांनी इथे बोलत बसाव आणि पुढची तयारी करायला म्हणून तू गेलास. आम्ही दोघे इथे गप्पा मारत बसलो होतो. थोड्यावेळाने वैभव इथे आला. निशाने त्याचे नाव घेतले म्हणून मला कळले त्याचे नाव. तर... तू आम्हाला बोलावले आहे असे त्याने म्हंटले. बहुतेक निशाला मेकअप करायचा होता म्हणून मग ती या इथल्या दाराने आत गेली आणि मी वैभव बरोबर बाहेर पडलो. सेटवर आम्ही पोहोचलो तर अंधार होता. काहीतरी शोर्टसर्किट झालं असेल अस म्हणून त्याच कारण शोधायला वैभव गेला. जाताना म्हणाला देखील की तू रागावशील. त्याने मला तिथेच उभ राहायला सांगितल म्हणून मी थोडावेळ उभा राहिलो. पण कोणतीच हालचाल जाणवत नव्हती किंवा कोणाचाही आवाज येत नव्हता. म्हणून मग मी तुला हाक मारत थोडा पुढे सरकू लागलो आणि धडपडलो. झालेल्या आवाजाने तुम्ही सगळे तिथे आलात.... पुढच तुला माहीतच आहे." चंद्रभान म्हणाला.

राजन चंद्रभानच बोलण शांतपणे ऐकत होता. चंद्रभानच्या प्रत्येक वाक्यागणिक त्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्य फुलत होत. चंद्रभान बोलायचा थांबला आणि राजन म्हणाला,"चंद्रभान................. हे सगळ आत्ता झाल? तू मला काही वेळापूर्वी इथेच भेटला होतास अस तुझ म्हणन आहे का? मी तुझी आणि निशाची ओळख करून दिली? मग तुम्हाला सोडून मी सेटवर गेलो? मी वैभवला पाठवल?" त्याने एका मागोमाग एक प्रश्न विचारायला सुरवात केली.

आता मात्र चंद्रभान पूर्ण वैतागला आणि म्हणाला, "राजू अरे मी तुला जे घडल ते सगळ सांगितलं ना? मग हे असे परत परत तेच प्रश्न विचारून तू मला परत तेच सांगायला का लावतो आहेस?"

"मी तुला परत परत तेच विचारतो आहे भानू पण तू तेच परत सांगू नयेस अस मला वाटत आहे............ कारण तू जे म्हणतो आहेस तस काहीही घडलेलं नाही. मी सकाळपासूनच स्टुडियोच्या दुसऱ्या कोपऱ्यात काम करतो आहे. कारण तुझ्या मुलाखतीसाठी फार मोठा सेट लावायची गरज नाही. म्हणून मग मी माझ्या दुसऱ्या एका सिरीयलच्या सेटची तयारी करतो होतो. बर........ त्याहूनही महत्वाच म्हणजे निशाला माझ्याकडच काम सोडून अनेक महिने झाले आहेत. महत्वाच म्हणजे वैभव नावाचा माझा कोणी असिस्टट नाहीच आहे." राजन चंद्रभानकडे एकटक बघत म्हणाला.

हे एकताच चंद्रभानला मोठा धक्का बसला. "राजू........... अरे.............. तू काय बोलतो आहेस?" चंद्रभान सुन्न झाला.

चंद्रभानची अवस्था बघून राजनला काळजी वाटली. त्याच्या हातावर थोपटत राजनने विचारले,"भानू बरा आहेस न तू? अरे काहीतरी भास झाला असेल तुला. जाऊ दे. मी आत येतानाच दोन कॉफी पाठवायला सांगितल्या आहेत. मस्त कॉफी घेऊ या आणि मग तुझा इंटरव्यू घेऊया. ठीक?"

"राजू आज इंटरव्यू नको प्लीज. मला खूप अस्वस्थ वाटत आहे. मी घरी जातो." अचानक अस्वस्थ होत चंद्रभान म्हणाला.

त्याची एकूण परिस्थिती बघून राजनने देखील त्याला आग्रह केला नाही. "जाऊ शकशील ना एकटा? की माझ्या गाडीने जातोस? माझा ड्रायव्हर सोडेल तुला. मी सगळ काम आटपल की तुझी गाडी तुझ्या घरी सोडायला येतो. तेव्हा गप्पा मारू." राजन म्हणाला.

"ठीक! तुझ्याच गाडीने जातो मी. रात्री नक्की भेटू. अच्छा." चंद्रभान म्हणाला आणि कॉफीची वाटही न बघता राजनच्या गाडीत बसून निघून गेला.

क्रमशः ...

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

17 Jun 2017 - 2:19 am | पद्मावति

मस्तच!
वाचतेय.

अमितदादा's picture

17 Jun 2017 - 2:18 am | अमितदादा

चांगली सुरुवात....पुभाप्र

Ranapratap's picture

17 Jun 2017 - 8:53 pm | Ranapratap

पुढील भाग लवकर येऊ द्या.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

19 Jun 2017 - 8:15 am | योगेश लक्ष्मण बोरोले

गुढकथा बर्‍याच वेळा हास्यास्पद वाटतात. पण तुम्ही मस्त लिहीलीय. पुढिल भागाची प्रतीक्षा आहे.

सिरुसेरि's picture

20 Jun 2017 - 6:34 pm | सिरुसेरि

छान सुरुवात . डरना मना है / जरुरी है .