पुरणपोळी

Primary tabs

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
18 May 2017 - 12:21 am

.

प्रत्येक घरात बनवल्या जाणार्‍या खास पदार्थांची एक खास अशी कृती असते आणि तो पदार्थ तसाच बनला तरच तो घरच्या सगळ्यांना आवडतो. माझं घरही याला अपवाद नाहीच. आता पुरणपोळी हा काही मुद्दाम लिहिण्याचा प्रकार नव्हे. कारण प्रत्येक घरी ती बनतच असते. त्यामुळे इथून तिथून सर्वसाधारण सारखीच पाककृती असणार. तरीही विकत मिळतात तशा अगदी पातळ पुरणपोळ्या आमच्या घरात कुणालाच आवडत नाहीत. पोटात पुरण अगदी ठासून भरलेली आणि साजूक तुपासाठी अजिबात हात आखडता न घेतलेली ही पुरणपोळी माझ्याकडे बनते. तीच कृती तुमच्याकरता मी इथे देतेय. जरूर करून पहा...

साहित्यः

पुरणासाठी: २५० ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम साखर, १२५ ग्रॅम गूळ, चिमूटभर हळद, अर्ध जायफळ आणि १ इंच सुंठ बारीक किसणीने किसून.
वरच्या पारीसाठी- पाउण वाटी मैदा. (कणिक घेऊ शकत नाही कारण ती मैद्याइतकी ताणली जात नाही.) २ टेबलस्पून तेल, मीठ चिमूटभर आणि पाणी.
पोळी लाटण्यासाठी: तांदूळ पिठी
पोळीवर लावायला आणि वरून घ्यायला- भरपूर साजूक तूप. हयगय चालतच नाही ;)

कृती: पुरणपोळी करण्याच्या आदल्या रात्री हरभरा डाळ धुवून पाण्यात भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी ती ६ वाट्या पाण्यात हळद घालून कुकरमध्ये अगदी मऊ शिजवून घ्यावी आणि कुकरची वाफ गेली की चाळणीत ही डाळ उपसून ठेवावी.

मैदा - तेल, मीठ आणि पाणी घालून खूप तिंबून अगदी सैल भिजवून ठेवावा.(अर्धा तास तरी)

उपसलेली डाळ एका भांड्यात घेऊन त्यात साखर, गूळ घालून शिजत ठेवावे. हे मिश्रण सतत हलवायला लागते नाहीतर करपण्याची शक्यता असते. पुरणातला कालथा/ उलथने छान उभे राहिले की झालं पुरण. मग त्यात सुंठ पूड आणि जायफळ पूड घालून ते तावडतोब पुरण यंत्रातून काढावं. थंड करून घ्यावं.

आता..

पुरीची लाटी घेतो त्यापेक्षाही थोडी छोटी लाटी घेऊन (फोटो क्र.००१) तिच्यात मोठ्या चेंडूएवढं पुरण भरावं.(फोटो क्र. ००२) सराव नसतो तेव्हा हे खूप अशक्य वाटतं. (फोटो क्र.००३) (स्वानुभव बोल्लाच मधे:) )

तांदळाच्या पिठीवर ही पोळी (फोटो क्र. ००४)खूप अलगद लाटावी आणि गरम तव्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावी.

ही पोळी तिच्यावर मजबूत तूप घेउन, दूध, कटाची आमटी याबरोबर फस्त करावी. खरंतर नैवेद्य वगैरे नसेल तर मस्त कांदाभजी आणि ही पुरणपोळी इतकाच मेनू करून स्वर्गसुख मिळवावं.;:)

प्रतिक्रिया

प्रसाद लेले's picture

18 May 2017 - 5:24 am | प्रसाद लेले

पुरणपोळी कमी पुरणपराठा जास्त वाटत आहे

सविता००१'s picture

19 May 2017 - 10:09 am | सविता००१

पुरणपराठा नाही. पराठ्यासारखा गच्च प्रकार नाही हा. ही पोळीही अलवार होते.

कौशी's picture

18 May 2017 - 5:28 am | कौशी

ठासुन भरलेली आणि तुपात भिजलेली...माझी आवड्ती.

रेवती's picture

18 May 2017 - 6:42 am | रेवती

छान!
कागदासारखी पातळ पुपो जमत नाही व आवडत नाही. जरा जाड असली की आवडते.
एकूणातच सुंदर पुपो मला येत नाहीत. पहिल्या चारेक चांगल्या होतात मग पेशन्स ढपतो.

हेमंत८२'s picture

18 May 2017 - 7:52 am | हेमंत८२

कारण यात गुळ +साखर घातली आहे, आमच्याकडे फक्त गुळ घालतात. डाळ रात्रभर भिजत घालत नाही. हळद तर नाहीच.
जर गहु चांगले असतील तर सहसा मैदा वापरला जात नाही.
आणि महत्त्वाचे जर तेल लावुन पोळी लाटली आणि ति न फाटता भाजली तर तिला सुगरण म्हटले जाते....
ता.क. गेली अनेक वषॕ अशी पोळी खात आहे केल्यावर फोटो पेष्ट केला जाईल.

सविता००१'s picture

19 May 2017 - 10:13 am | सविता००१

आपल्या मताचा आदर आहे. मी आधीच म्हणालेय की आमच्याकडे अशी करतात. शिवाय डाळ रात्रभर भिजत घातली तर पटकन आणि जास्त चांगली शिजते हा अनुभव आहे. हळद आम्ही रंगासाठी घालतो. ही वैयक्तिक आवडनिवड आहे. जशी तुमची आहे तशीच.

इतकं पुरण कणकेत भरून पोळी नाही नीट लाटली जात म्हणून मैदा. हे वर पण लिहिलंय.

**माझी पोळी कुठेही फाटलेली नाहीये. अर्थात आम्ही पुरणपोळी तेलावर नाही तर तांदळाच्या पिठीवरच लाटतो. ही तेलपोळी नाहीये. आणि सुगरणपणाचा दावाही नाही केलेला कुठे.

आपल्या फोटोची वाट पहातेय. आवडेलच. :)

आमच्याकडे पुरणपोळ्यांची पारी कणकेचीच. बाकी पुरण तयार झालंय का ते बघायची पद्धत सारखीच, कालथा उभा राह्यला की बघताना थोडं सरसरीत वाटलं तरी पुरण झालेलं असतं.

सविता००१'s picture

19 May 2017 - 10:07 am | सविता००१

इथे खूप पुरण भरलंय ना, तेवढ कणकेच्या पारीत भरलं जात नाही. आणि नीट लाटता येत नाही. पुरण बाहेर येउ शकतं. इथे मैदा खूप कमी वापरलाय. पण हो, वापरलाय.

पुढच्या कट्ट्याला बनवून घेऊन येतो, खाऊन काय ते ठरवा.

सविता००१'s picture

19 May 2017 - 1:17 pm | सविता००१

हे तर फारच छान

इरसाल's picture

18 May 2017 - 10:31 am | इरसाल

पुरणपोळीत हळद ?????????????????

सविता००१'s picture

19 May 2017 - 10:04 am | सविता००१

पुरणाला सुंदर रंग येतो. अगदी चिमूटभर हो.

नूतन सावंत's picture

18 May 2017 - 11:03 am | नूतन सावंत

पुरणाचा कट न काढता पुरण शिजवून घेते मी,आणि कटाच्या आमटीची वेगळी डाळ शिजवून घेते.कट न काढता केलेली पोळी जास्त खमंग लागते,फक्त जरा जास्त लक्ष ठेवावे लागते.
तसेच पोळीला तेलतुप न लावता भाजून घेऊन मग तूप लावायचे न वर पिठीसाखर भुरभुरवायची.

पद्मावति's picture

18 May 2017 - 1:20 pm | पद्मावति

तरीही विकत मिळतात तशा अगदी पातळ पुरणपोळ्या आमच्या घरात कुणालाच आवडत नाहीत. पोटात पुरण अगदी ठासून भरलेली आणि साजूक तुपासाठी अजिबात हात आखडता न घेतलेली ही पुरणपोळी माझ्याकडे बनते.

मस्तच सवि. खूप छान दिसतेय पुरणपोळी..

छान कृृति , मी पण अशीच पण पुर्ण गुळ घालून करते. पण सुंंठपूड कशासाठी ? चव जास्त छान लागते का?
ता.क. पोळपाटाला कापड बांंधून पोळी लाटली तर चिकटत नाही.

सविता००१'s picture

19 May 2017 - 10:03 am | सविता००१

सुंठपूड घातली की चव जास्त सुरेख लागते.
ता.क. छान आहे - ज्यांची पोळी चिकटते त्यांच्यासाठी छान टीप. :)

हळद रंंग येण्यासाठी, थोडी मैद्यात पण घालावी.

अनन्न्या's picture

19 May 2017 - 1:17 pm | अनन्न्या

प्रमाण बाकी असेच फक्त सुंठ नाही आणि अर्धा मैदा अर्धी कणिक पण पूर्ण कमी असते. मस्त दिसतेय पोळी आणि स्टेप बाय स्टेप फोटो आहेत ते बरं झालं! मला एवढी छान नाही येणार

फ्रेनी's picture

20 May 2017 - 10:43 am | फ्रेनी

मस्त फोटो आणि कृती

इज्या's picture

7 Jun 2017 - 5:16 pm | इज्या

अतिशय सुन्दर

<strong>उपसलेली डाळ एका भांड्यात घेऊन त्यात साखर, गूळ घालून शिजत ठेवावे. हे मिश्रण सतत हलवायला लागते नाहीतर करपण्याची शक्यता असते. पुरणातला कालथा/ उलथने छान उभे राहिले की झालं पुरण. मग त्यात सुंठ पूड आणि जायफळ पूड घालून ते तावडतोब पुरण यंत्रातून काढावं.<strong>

माझी आई डाळ शिजवून झाली कि लगेच पुरणयंत्रातून काढून घेते. नंतर शिजवताना साखर आणि गुळ बारीक करून मिक्स करायचा कार्यक्रम होतो. असे केल्याने पुरन सहज निघते अन यंत्र साफ करणे पण सोपे पडते.

होय, पण गूळ/साखरेला पाणी सुटलं तर पुरणाचे ३-१३ वाजतात.