वेध संत गोरोबा, संत राजाई-नामदेव, संत मुक्ताईचा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
23 Apr 2017 - 8:39 am
गाभा: 

विठ्ठल आणि अद्वैत विषयक अंभग आवडीने ऐकणे या पलिकडे वारकरी संप्रदायाच्या साहित्याचा मी मोठा वाचक नाही, पण कोणत्या न कोणत्या शब्दाचा गूगल शोध शोध अधून मधून वारकरी संंतांच्या साहित्यापर्यंत पोहोचवत असतो आणि किती नको म्हटले तरी अधून मधून तुम्ही त्यात गढून जाताच.

मराठी विकिच्याच निमीत्ताने फेब्रु-मार्च महिन्यात दोन वेगवेगळ्या महाविद्यालयातील मराठीच्या दोन प्राध्यापक अभ्यासकांच्या भेटीचा योग आला. त्यांच्या बद्दल सांगण्याआधी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात इतिहासाचे व्यासंगी प्राध्यापक रविकिरण जाधव सर आहेत, यांनी स्वतः पुरातत्वीय संशोधनात महत्वाचा सहभाग घेऊन दयानंद महाविद्यालयात छोटेखानी पण इतिहास विषयाच्या रसिकांनी आवर्जून दखल घेण्याजोगे पुरातत्वीय संग्रहालय बनवले आहे. (त्यांना नाणेघाट स्टाईल मधील बरीच दगडी रांजणे सोलापूर जिल्ह्यात आढळली त्याबद्दलचे त्यांचे संशोधन रोचक आहे असो) . तर त्या संग्रहलायाच्या भेटीवर जाधवसरांच्या सोबत होते पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे मराठी भाषेचे प्राध्यापक देवानंद सोनटक्केसर, इतर गोष्टींसोबत त्या दोघांच्या चर्चेत आली ती जाधवसरांनी त्यांच्या संशोधनादरम्यान तेर (हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे) येथून आणलेली पाण्यात तरंगणारी/कि न भिजणारी विशेष वीट. आता योगायोगाने म्हणा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत गोरोबा कुंभार त्या तेर गावचेच आणि संत गोरोबा आणि संत नामदेव प्राध्यापक देवानंद सोनटक्केसरांच्या अभ्यासाचा विषय तेव्हा त्यांनी, आता पाण्याच्या बाबतीत विशेषता असलेल्या वीटा बनवण्याचे कौशल्य संत गोरोबा कुंभार (आणि कुटूंबीयांना) ठाऊक असेल का ? संत नामदेवांच्या अभंगातून संत गोरोबांचा विवीध शब्दांनी होणारा उल्लेख संत गोरोबा खरेच अती-गौरवर्णाचे नव्हते ना हे पुन्हा तपासून पहाण्याबद्दल सोनटक्केसरांना अभ्यासक म्हणून पडलेला प्रश्न आणि ती वीट पाहून विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्याची त्यांना झालेली इच्छा त्या प्रसंगी त्यांनी बोलून दाखवली. (वाचकांच्या विचारांना वेगळ्या दिशा लागण्याच्या आधी सोनटक्केसर कोणत्याही प्रकारे रंगवर्णभेद मानत नाहीत याची ग्वाही देतो-तसेच त्यांचे संशोधन पूर्ण होण्यापुर्वीच त्यांच्या मनातील विचारांचा जाहीर उल्लेख करून संकेत भंग होत असल्यास त्यांची क्षमाही आदरपुर्वक आणि जाहीरपणे मागतो)

काही आठव्ड्यांनी पुण्यातील गरवारे (वाणीज्य) महाविद्यालयाच्या ऊपप्राचार्या आणि प्राध्यापिका केतकी मोडक भेटीचा योग आला. उपप्राचार्य म्हणून व्यवस्थापनदृष्ट्या वेळा पाळतानाच अभ्यास विषयांच्या व्यासंगासाठी वेळ साधताना प्रसन्न तळमळ (-त्यांच्या प्रसन्न स्वभावाच रहस्य त्यांच्या संतसाहित्याच्या व्यासंगपूर्ण अभ्यासात आहे हे नंतर लक्ष्यात आले.) प्रत्यक्षभेटीतील चर्चेचा विषय वेगळा होता, पण पाठोपाठ त्यांचा संशोधन ग्रंथ प्रताधिकारमुक्त करावयाचा झाल्यास प्रोसिजर काय असेल असे विचारणारे इमेल आले त्यास प्रासंगिक उत्तर देऊन मी इतर विषयांमध्ये गुंतलेला असताना वेगळेच काही शोधताना पुन्हा गूगलबाबाने योगायोगाने त्यांच्या "कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी" या ग्रंथाच्या अर्काईव्हज डॉट कॉमवरील दुव्या पर्यंत पोहोचवले. केवळ संत ज्ञानेस्वरांची बहीण म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईंच्या व्यक्ती आणि वाङ्‍‍मयाचा वेगळाच परीचय त्यांचा हा ग्रंथ घडवतो. सहज चाळून बाजूला ठेऊ म्हणून दुवा उघडला तर संशोधन ग्रंथातून संत मुक्ताईंच्या वेगळ्या स्वतंत्र प्रतिभेची, संत मुक्ताबाईंच्या जिवनचरित्र, कार्यक्तृत्व आणि इतर समकालीन आणि उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभावाची ओळख होत जाते. अर्थात सोनटक्केसरांकडून ऐकलेल्या चर्चेत संत गोरोबांचा उल्लेख बॅक ऑफ द माईंड होताच आणि प्रा.केतकी मोडकांच्या ग्रंथातून संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ति दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे.

संतांच्या इतिहासात संत तुकाराम विमानात बसून सदेह वैकुंठास गेले म्हणजे काय झाले याचे आकलन जसे स्पष्ट होत नाही तसेच काहीसे त्यांच्या तीन एक शतके आधीच्या संत मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्या म्हणजे नेमके काय झाले ? ह्याची उकल तशी कठीणच जाते. मला यातले खूप उमगले नाही आणि जेवढे शिरते त्याचे वर्णन करता येईल याचा विश्वास नाही, तरी समाधी घेण्याचे जे काही प्रकार असत त्यात नियत मृत्यूच्या आधीच गुहेत स्वतःस कोडून घेऊन वर शीलेने दार बंद करून घेणे तर दुसरे नियत मृत्यूनंतर इतरांनी बांधलेली समाधी. तर मुक्ताईंना त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी कायम शरीरस्वरुपात राहाण्याचा काहीसा दिलेला आशिर्वाद, मृत्यू असे काही नसतेच हा मुक्ताईंचा दावा आणि त्यांच्या आयूष्याचा शेवट नेमका कसा झाला हे न कळण्यासारखे संत निवृत्तीनाथ आणि संत नामदेवांच्या डोळ्या देखत संत मुक्ताईचे नाहीसे होणे ज्यास स्वरूपाकार होण म्हणवले जाते या सार्‍या गुढाचा वेध प्रा. केतकी मोडकांनी त्याच्या "कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी" या संशोधक ग्रंथाच्या माध्य्मातून वाचकांना सबंध ग्रंथभर खिळवून ठेवेल एवढ्या वेधकपणे घेतला आहेच. पण त्याही पेक्षा या सर्व तत्कालीन संतांच्या जिवनातील एका गुढ प्रसंगाचा अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा प्रा. मोडक मॅडम घेतात तो म्हणजे संत मुक्ताबाई आणि त्यांचे तिन्ही बंधू यांना झालेल्या साक्षात्काराचा प्रसंग.

संत मुक्ताबाई आणि त्यांचे तिन्ही बंधू यांच्या जिवनात; मातापित्यांचा देहत्याग - ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद - विसोबा खेचर शरण आले - शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. - ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - या सर्व गोष्टी होऊन गेल्या आहेत त्याबंधू भगिनींची नाव संत नामदेवांच्या कानी येते ते त्यांच्या कडे पोहोचतात. संत नामदेव भक्तीसंप्रदायातले त्यांचा धावा सरळ विठ्ठलाकडेच, तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ह्या मंडळींची नाथसंप्रदायाची गुरु दिक्षा घेऊन झालेली आहे. हि गुरु दिक्षा घेऊन झाल्यामुळे असेल किंवा प्रत्येक जिवमात्रात परमेश्वराचा अंष असल्याच्या श्रद्धेमुळे असेल किंवा एकमेकांच्या ज्ञानाचा आदर असेल चांगदेव विसोबा खेचरांसहीत त्यांच्या सानिध्यात आलेले सर्वजण एकमेकास वयाचे अंतर लक्षात न घेता वाकून नमस्कार करताहेत -संत मुक्ताई वयाने सर्वात लहान असूनही त्यांचा उल्लेख आदीमाया असा होतो- संत नामदेव त्यांच्या पोहोचले आहेत संत मंडळींनी त्यांचा आदर सत्कार केला आहे संत नामदेवांनाही या लहान संतांचे कौतुक आहे पण त्यांनी त्यांना वाकुन नमस्कार केलेला नाही याचे मुक्ताईंच्या बंधूंना काहीच वाटत नाही पण मुक्ताईंना यातील संत नामदेवांचा अंहकार असल्याचे भासते, संत नामदेवांनी कुणाला गुरू केले नाही हे त्यचे कारण असल्याचे आणि संत नामदेव एका महत्वपूर्ण अनुभवाला मुकत असल्याचे संत मुक्ताबाईंना वाटणे आणि त्या त्यांच्या ज्येष्ठ बंधूंकडे उल्लेख करतात ते हि गोष्ट मनावर घेत नाहीत पण संतांचे ठाई अंहकार योग्य नव्हे असा मुक्ताईंचा आग्रह ह्या आग्रहातून संत नामदेवांची परिक्षा घेण्यासाठी गोरोबांना बोलावणे धाडा असा मुक्ताईंच्या अभंगातून येणारा उल्लेख -त्यानंतर मुक्ताई आणि बंधूंना होणारा गोरोबांचा साक्षात्कार (कि भेट?)- त्यामुळे ते गोरोबा म्हणजे संत नामदेवांनाही वयाने ज्येष्ठ असलेले तत्कालीन संत गोरोबा असणार हा आतापर्यंतच्या बहुतांष संत अभ्यासकांचा ग्रह, आणि हा ग्रह बाळगण्यात अभ्यासक चुकत असण्याची शक्यता तर नाही ना हे आणि सा़क्षात्काराच्या प्रसंगाचे विवीध संतांनी केलेल्या वर्णनाचे अभंगातील दाखले उलाडत केलेले प्रा. मोडकांचे लेखन ज्ञानरम्य आहेच सोबतीने तेवढेच आध्यात्मरम्यही त्या बद्दल इथे लिहून वाचकांचा मूळ ग्रंथ वाचण्याचा आनंद मी हिरावणे बरोबर होणार नाही आणि मूळ लेखिकेप्रमाणे त्यांच्या मतांची मांडणी करण्यात मी पासंगालाही पुरणार नाही. या मुद्यावरून मी आता पुढच्या मुद्यावर जातो.

वरच्या परिच्छेदात आपण पाहिले की संत नामदेवांनी गुरू केले नाही आणि परस्परांना नमस्कार होत नाहीए. (नंतर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर (मुक्ताई-चांगदेव माघारी रहातात) तिर्थयात्रेस प्रयाण करतात असा उल्लेख प्रा.मोडक मॅडम यांच्या ग्रंथात दिसतो. मेसाई या महाराष्ट्रातील लोकदेवतेचा शोध घेताना जुन्यासाहित्यात संत नामदेवांच्या पत्नी राजाईंच्या येणार्‍या एका अभंगाचा उल्लेख माझ्या मागच्या या धाग्यात येऊन गेला होता. तो राजाईंचा अभंग खाली पुन्हा देत आहे.

संत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवर्‍यास आलेली संसारविरक्ति पाहून म्हणतात -

घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं ||
असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा ||
धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई ||
सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें ||
मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा ||
वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती ||
काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती ||
अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें ||
एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया ||
म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती ||
भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||
-राजाई

यात इतर सोबतच्या संतांचा उल्लेख नाही, पण 'घरधन्यांनी केला गुरू', 'मंत्र घेतलासे जैसा' , 'एकमेकांच्या पडती पायां ' हे उल्लेख उल्लेखनीय दिसतात. यात संत नामदेवांनी नेमके कुणास गुरू केले याचा उल्लेख नाही. संत नामदेवांच्या अभ्यासकांकडून त्या बद्दल अधिक माहिती मिळाल्यास वाचण्यास आवडेल.

राजाईंच्या अभंगात 'पांढरा स्फटिक व्याली काई' असा उल्लेख येतो आहे, ह्यात 'पांढरा स्फटिक' उल्लेख कशाचा असेल. साक्षात्काराचा अजून एक अनुभव प्रसंग येऊन त्यात पांढरे स्फटीकसे या संतांना दिसले असेल का आणि त्याचा उल्लेख राजाईंनी 'पांढरा स्फटिक व्याली काई ' (काई म्हणजे काही) असा केला असेल का ? कि 'पांढरा स्फटिक' ला काही वेगळा संदर्भ असेल ? पुन्हा मुक्ताईंच्या आंतरजालावर दिसणार्‍या एका अभंगात 'अती-गौरवर्ण' अशी शब्द योजना येताना दिसते, तर इथे पांढरे स्फटीक असा उल्लेख यांचा काही परस्पर संबंध असलाच पाहीजे असे नाही पण रंगाचा उल्लेख आला म्हणून नोंदवले एवढेच

'अवघे भांबरभुतें होती' यातील भांबरभुतें (मायबोली संस्थाळावर नविन कवितेत या अर्थाने कविने वापरलेला दिसतो)

* भांबरभुतें शब्दाचा शब्दकोशीय अर्थ उपलब्ध आहे का ? असल्यास काय आहे
* भांबर हा स्थलनामाचा उल्लेख असण्याची काही शक्यता असू शकेल का ? कि भांबर / भांबुर येथे या संत मंडळींना जाण्याचा प्रसंग आला असेल किंवा तेथील कुणी सज्जन त्यांना भेटले असतील.
* भांबुर्डा हे वनस्पती नामही दिसते तर हि वनस्पती नेमकी कोणती ?
* भांबुर, भांबुरवाडी, भांबुर्डे नावाची कोणकोणती गावे महाराष्ट्रात कोणकोणत्या तालुक्यात आहेत ?
* bhambur bahambur या शब्दासाठी बहुधा बलोचीस्तान आणि अफगाणीस्तानातील शोध आंतरजालावर दिसताहेत कदाचित या उच्चारणानुसार एखाद्या देवीचेही नाव दिसते आहे त्याची या धागा लेखाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी या निमित्ताने दखल घेऊन ठेवायची आहे.

सरते शेवटी मी या धागा लेखात उल्लेखीलेल्या दोन्ही अभ्यासकांनी कोठेही टोकाच्या मतांचे प्रतिपादन केलेले नाही आणि दोघांच्याही अभ्यासातून अध्यात्मिक रसाचाच लाभ मुख्यत्वे होताना दिसतो तरीपण कोणत्याही विषयाच्या अभ्यासकांना संशोधनासाठी अगदी वेगवेगळ्या दिशेने विचार करुन पहावा लागतो, ते सर्व विचार पटलेच पाहिजेत असे नव्हे, न पटलेल्या मुद्द्यांना लागल्यास पद्धतशीपणे खोडावे टिकाही करावी, सहसा बहुतांश संशोधकांचा अभ्यासकांचा उद्देश जाणीवपुर्वक कुणाला दुखावणे नसतो हेही लक्षात घेऊन त्यांना त्यांची मते त्यांना मोकळेपणाने मांडता येतील एवढी सहिष्णूता आणि संयम अभ्यासकांप्रती होता होईतो बाणवण्याचा मराठी वाचकांच्या नव्या पिढ्यांनी शिकावयास हवे असे वाटते. मराठी संत आणि विचारवंतांनी सहसा श्रद्धा डोळस ठेवण्याचा आग्रह ठेवलेला दिसतो. श्रद्धा डोळस ठेऊनही आध्यात्मिक रसास्वाद घेता आला तरच आध्यात्म समजले असे म्हणता यावे असे वाटते.

मी वर म्हटल्या प्रमाणे हा माझ्या अभ्यासाचा मुख्य विषय नाही प्रसंग परत्वे समोर आला ते शेअर केले, सोनटक्केसर किंवा मोडक मॅडम प्रमाणे मला मांडणी न करता आल्याची शक्यताही असू शकेल. कुठे काही चुकले असल्यास मोकळेपणाने लक्षात आणून द्यावे. चुभूदेघे.

अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार. तुर्तास लेखन समाप्ती

* "कडकडोनी वीज निमाली ठायीचे ठायी" लेखिका प्रा. केतकी मोडक
*मराठी विकिपीडियावरील काही लेखांचे दुवे (लेख परिपूर्ण नसण्याचीच शक्यता अधिक तरीही संदर्भासाठी किंवा कुणास लेखन योगदान करावयाचे असल्यास असलेले बरे)

** संत मुक्ताबाई
** संत नामदेव

** संत गोरोबा

** गोरखनाथ
** नाथ संप्रदाय
** वारकरी संप्रदाय

** निवृत्तिनाथ
** संत ज्ञानेस्वर
** संत सोपानदेव
** संत चांगदेव
** विसोबा खेचर

* प्रा. देवानंद सोनटक्केसरांचा मराठी विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखन सहभाग असलेले लेख
** साहित्याचे प्रयोजन** दोहा (छंद) ** रस (सौंदर्यशास्त्र)** कॅथार्सिस ** अनुकृतीचा सिद्धांत ** समीक्षेचा अंत:स्वर (समीक्षा ग्रंथ)** तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता) **दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी** शतक (कविता)
**

प्रतिक्रिया

भांब/भांभ : भ्रांति, आभास, शोभा.
भांबा : विकार.
भांबावणे : भ्रम पावणे, घाबरणे.
भांबळ/भांबळ्या : विसराळू, अव्यवस्थित.
भांबरभूत/भांबडभूत : पिसाट, वेडसर मनुष्य.
------
तरंगत्या विटा : प्राचीन भारतातच नव्हे तर अजूनही पोकळ, सच्छिद्र विटा बनवल्या जातात. त्या पाण्यावर तरंगतात. रायगड जिल्ह्यात अशा विटा पाहिलेल्या आहेत. या विटा तयार करताना त्यात मातीबरोबर तूसकाडी अथवा तत्सम मटीरिअल वापरतात. त्याचा उपयोग बाइंडर म्हणून तर होतोच, शिवाय फायरिंग करताना (भट्टीत जाळताना) हे तूस जळून जाऊन त्या जागी थोडी राख आणि पोकळी निर्माण होते. विटांची मजबुती कायम राहून त्या वजनाने हलक्या होतात. प्राचीन भारतात देवालयांच्या कळसाच्या अथवा शिखराच्या बांधकामात या विटा वापरत. त्यामुळे इमारतीच्या वरच्या भागाचे वजन कमी होऊन पायाच्या भागावर भार येत नसे. शिवाय उंच उंच बांधताना गुरुत्वमध्यसुद्धा पायाच्या आकारात राहण्यास मदत होई.

"झोप नाहिइतर भांबड येतय बघ" हि सोलापूर जिल्ह्यातलि जुनि धमकि आहे लहान पोरांसाठी.

माहितगार's picture

23 Apr 2017 - 10:09 pm | माहितगार

राही, धन्यवाद शब्दकोशीय अर्थ माहित नव्हते. राजाईंच्या अभंगात तरी बहुधा शब्दकोशीय अर्थानेच प्रयोजन झाले असावे.

*'भांब' शब्द तेलगु अथवा कन्नड असण्याची काही शक्यता असू शकते का?
* हा शब्द वनस्पती आणि स्थलनामांशी कसा जोडला गेला असेल हे सध्यातरी उमजत नाही.

'अभ्या' यांनी माहिती दिली तशी माहिती स्थानिक लोकच देऊ शकतात म्हणूनच असे विवीध विषयांची चर्चा मिपासारख्या व्यासपीठावर करणे आवडते.

आपल्या दोघांच्याही प्रतिसादासाठी आभार

राही's picture

23 Apr 2017 - 11:10 pm | राही

वरील शब्द उघड उघड 'भ्रम' या संस्कृत धातुवरून आले आहेत.
भांबुर्डा/भांबुर्डी नामक वनस्पतिविशेष, भांबुर्डा नामक कीटकविशेष आणि भांबुरडे नामक स्थलविशेष यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. तसा कोणी जोडलेलाही नाही. जसे, दिंड हे पक्वान्न, दिंड हा खरडपट्टी या अर्थाने बोलीभाषेत वापरला जाणारा शब्द, धिंड काढणे हा वाक्प्रचार, दिंडोशी हे गाव यांचा तसा संबंध नाही. फार तर दिंड आणि धिंड यांचा सबंध लावता येईल. अनेक शब्द, वाक्प्रचार स्थानिक पॉकेट्समध्ये स्वतंत्ररीत्या उगम पावून रूढ होतात. त्यांमध्ये संबंध असतोच अथवा असलाच पाहिजे असे नाही.

अर्धवटराव's picture

24 Apr 2017 - 10:40 am | अर्धवटराव

.

माहितगार's picture

24 Apr 2017 - 11:47 am | माहितगार

माझ्या कामात कामापेक्षा अविर्भाव जास्त नाही ना असे माझेच मला वाटते. मोडक मॅडम सारख्यांचे लेखन आणि काम तेही कोणत्याही अविर्भावा शिवाय पाहिले कि काही अहंता असेल ती गळून पडते

प्रचेतस's picture

24 Apr 2017 - 11:15 am | प्रचेतस

यात संत नामदेवांनी नेमके कुणास गुरू केले याचा उल्लेख नाही

नामदेवांचे गुरु हे विसोबा खेचर होते.

नामा म्हणे एक | शून्य दिलें हरीं | प्रीतींने खेचएरी | आज्ञा केली ||

बार्शीस नामदेवांनी विसोबांचा गुरुपदेश घेतला.

श्रवणीं सांगितली मात | मस्तकीं ठेवियला हात } पदपिंड्विवर्जित | केला नामा||
खेचरु विसां | प्रेमाचा पिसा| तेणें नामा कैसा | उपदेशिला ||
तया सांगितले गुज | दाखविंले निज | पाल्हाळी हो तुज | काय चाड||
खेचरु म्हणे मज | ज्ञानराज हे गुरु | तेंणे अगोचरु | नाम्या केला ||

विसोबा खेचर ह्यांचेसहित ते ज्ञानेश्वरांना देखील गुरु मानत असत (किंवा विसोबांनी ज्ञानेश्वर हेच गुरु मान असा उपदेश केलेला असावा असे दिसते.

भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||

नामदेवांच्या आईचे नाव गोणाबाई. नामदेव हे पांडुरक्या रंगाचे असावेत. म्हणूनच गोणाबाईने हा (नामदेव) पांढरा स्फटिक प्रसवला (व्याली) व तो विठ्ठलाच्या (शेषशायी-विष्णू) चरणी लीन होउन घरादाराकडे लक्ष देत नाही असे गार्‍हाणे राजाई गात आहे.

बार्शीस नामदेवांनी विसोबांचा गुरुपदेश घेतला.

हो, आणि भांबड शब्दाची गंमत सांगायची तर तो बार्शी भागातच कळतो. अगदी सोलापूरात विचारले तर याचा अर्थ लोकांना कळणार नाही कारण सोलापूर जिल्हा असला तरी कर्नाटकी संस्कार जास्त आहेत. पण बार्शी तुळजापूर उस्मानाबाद भागात भांबड म्हणले लगेच कळते.

माहितगार's picture

24 Apr 2017 - 12:33 pm | माहितगार

संदर्भासहीत माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभारी आहे.