हरिश्चंद्रगड भाग २

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
6 Jan 2017 - 12:38 pm

हरिश्चंद्रगड भाग १.

आम्ही चढत असताना उतरणाऱ्या ट्रेकर्सना मी विचारात होतोच कि किती गर्दी आहे वर? तेव्हा एक दिलासादायक उत्तर मिळाले कि वर जागा नसली लेण्यांमध्ये तरी आता गडावर तंबू भाड्याने मिळतात कॅम्पिंग साठी. अर्थात माझे प्रयत्न लेण्यांमध्ये जागा मिळवण्याचेच होते.
गडावर पोचल्यावर मंदिरात न जाता आधी लेण्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी सगळ्यांना लेण्यांकडे पिटाळले. सुदैवाने लेणी रिकामीच होती सगळी. मग पहिल्याच लेण्यामध्ये पथारी पसरली. चटया अन्थरल्याबरोबर सगळे आडवे झाले. जड बॅगा उतरल्यावर खूप बरे वाटले. सगळ्यात मोठे समाधान लेण्यांमध्ये जागा मिळाल्याचे होते.
थोडा वेळ आराम केल्यावर सगळे कोकण कड्याकडे निघालो. सगळेच विचारात होते कुठे आहे कोकण कडा… त्यांना बहुधा वाटत होते कि कडा अजून थोध उंचावर असेल अन मी संगत होतो कि थोडी वाट बघा सरप्राईज आहे. आणि चालता चालता समोर कोकण कडा आला. प्रत्येकाचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मी मनीष आणि वसंत फक्त चेहरे न्याहाळत होतो. ग्रुपमधले दोन तीन जण तर कड्याजवळ येऊन आडवे झाले आणि कड्यावरून खाली बघायला लागले. मला तो दिवस आठवला जेव्हा आम्ही पहिल्यांदा हरिश्चंद्रगडावर आलो होतो. खिरेश्वर मार्गे आल्यामुळे प्रचंड थकलो होतो आणि त्यात कोकण कडा म्हणजे सगळ्या कष्टांच चीज झाल्यासारखं झाला होतं. आजही तेच फिलिंग होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर.

Kokan Kada

Kokan Kada 2

कड्यावर थोडावेळ गेला नाही अन एक अजब समस्या उद्भवली… कड्याच्या खाली असलेया मधमाश्यांच्या पोळ्यांपैकी एक मोहोळ उठलं आणि सगळीकडे पळापळ सुरु झाली. खरतर कोकण कड्यावर मधमाश्या नेहमीच्याच पण त्यांना बघून दोघेजण जरा बिथरले आणि पळापळ करायला लागले. त्यांच्या हात झटकण्याने खरोखरच एखादी माशी बिथरली बहुतेक आणि तिने त्याच्या मानेवर एक जळजळीत दंश केला. आता तो बोंबलत सैरावैरा पळत सुटला त्यात आमच्या गँगच्या मर्कटलीला भरीस पडू नयेत म्हणून मी आणि वसंताने सगळ्यांना कड्याच्या उजव्या बाजूला खाली खडकाळ भाग आहे तिथे पिटाळले. ते दोघे अजून पळत होते आणि अम्ही मजा बघत होतो.
आता पुन्हा फोटोसेशन चालू झाले. सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढून घेतले.
Kokan Kada 3

कड्यावरचा चहा
Chahaa

जसा सूर्य क्षितिजाजवळ आला तसे पुन्हा कोकण कड्यावर येऊन ग्रुपचे फोटो काढले आणि थर्मास मध्ये आणलेला चहा(अजून गरम होता, पैसे वसूल झाले म्हणा थर्मासचे) घेतला.
Sunset

sunset

सूर्यास्त
Sunset

आता लेण्यांकडे निघायचे होते. जाता जाता सगळ्यांना रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणासाठी लाकडे जमा करताच यायला सांगितलं.
लेण्यांपर्यंत येईपर्यंत बर्यापैकी सरपण जमा केलं सगळ्यांनी. आता जाऊन स्वयम्पाकाची तयारी सुरु केली . तीन दगडांची चूल लेनिसमोर आधीपासूनच होती आता वसंत, मी आणि सागराने लगबगीने सुत्रेहातात घेतली. बाकीचे गप्पाटप्पा करत होते. पण तिघांनी सगळं करणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही कामं वाटून दिली. मी, वसंत आणि केतन मंदिराजवळील छोट्या कुंडातून पाणी आणले तोपर्यंत सागराने महिला मंडळाला हाताशी घेऊन चूल पेटवणे, खिचडीसाठी भाज्या कापणे आणि त्याच्या स्पेशल वांग्याच्या भरीतासाठी वांगी भाजून घेणे सुरु केलं. हे सगळं काम चालू असताना प्यायला आणि स्वयंपाकाला पुरेसं पाणी भरून झालं होतं. लेण्यांमध्ये वापरलेल्या पणत्या सापडल्या त्यात स्वयंपाकासाठी आणलेलं तेल भरून लेणी छानशी उजळून काढली त्यामुळे आमच्या चार्जेबल लाईट्सवर थोडा कमी भर आला(तसेही त्या बेभरवश्याच्या असतात हा माझा वयक्तिक अनुभव). वेफर्स, फरसाण खात खात आम्ही स्वयंपाक पूर्ण व्हायची वाट बघत छान चुलीशेजारीच शेकत बसलो.

तयारी जेवणाची
dinner

सागरने छानपैकी भरीत बनवलं, बनवताना माझ्या कानात तो बोलला होता कि सगळे एवढे भुकेले आहेत कि भरीत काही पुरणार नाही म्हणून थोड्या जास्त मिरच्या टाकतो जेणेकरून तिखट लागते या कारणे कमी खाल्ली जाईल. एक गोष्ट स्पष्ट झाली होती, आमची खिचडी अपेक्षेपेक्षा जास्तच झाली होती. केतनने घरून खिचडीसाठी 'एक पायली'तांदूळ आणले होते, सगळी करामत या 'पायलीची'असावी कारण तिचा आकार घरोघरी कमीजास्त असतो. केतनच्या घराची पायली मोठी असणार तर…
स्वयंपाक झाल्याबरोबर जेवायला बसलो. आणि मुद्दामून तिखटजाळ बनवलेले भरीतही सगळे अधाश्यासारखे खाऊ लागले(सागराच्या हातच्या, चवीला तोड नाही दुसरं काय!).

ऐसे सहभोजन पुन्हा होणे नाही!
Dinner

खिचडीभात मात्र बरंच उरला होता. आता उद्याच्या सकाळचा मॅगीचा बेत रद्द करावा लागणार एवढे नक्की होते. जेवणं आटोपली आणि गप्पा मारता मारता झोपले सगळे.

पण शांत झोप सगळ्यांच्याच नशिबात नव्हती, रात्री दोघे अज्ञात लेण्यांमध्ये शिरले आणि आतल्या स्वयंपाकघर वजा खोलीत बसून शेकोटी पेटवू लागले. त्यांच्या शेकोटी पेटवण्याच्या उठाठेविंमुळे आणि तुटणाऱ्या लाकडांच्या आवाजांमुळे आमच्यापैकी काहीजणांची झोपमोड झाली. त्याय पुन्हा शेकोटीचा धूर पूर्ण लेण्यामध्ये पसरला आणि डोळ्यांत झोम्बयाला लागला. सगळे प्रचंड वैतागले तेव्हा थोड्यावेळात ते दोघे थोडेसे शांत झाले(आमच्या ग्रुप मध्ये महिला मंडळ नसते तर मी अमोलचे हात आवरू शकलो नसतो अन मनिषचे शब्दिक वार तर निव्वळ असहनीय, जंगलमध्ये सगळं अमंगल झालं असतं ना राव.).
'केव्हातरी पहाटे'ते दोघे निघून गेले आणि आम्ही थोडे शांत झोपलो.
क्रमशः:

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

6 Jan 2017 - 12:49 pm | संजय पाटिल

टाकला पण लगेच? छान वर्णन!! आणि फोटो सुद्धा!

इरसाल कार्टं's picture

6 Jan 2017 - 1:49 pm | इरसाल कार्टं

सगळे भाग तयारच होते, मागील आठवड्यात मिपावर उद्भवलेल्या समस्येमुळे टाकायचे राहून गेले होते म्हणून आज सलग टाकतोय. तिसराही डकवतो थोड्या वेळात.

छान वृत्तांत आणि फोटो.