हरिश्चंद्रगड भाग १.

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in भटकंती
6 Jan 2017 - 12:20 pm

दोन महिन्यांपासून तारखा ठरवत होतो, पण सुवर्णमध्य काही मिळत नव्हता…
सगळ्यांनाच ट्रेकला जायचे होते, तेही दोन दिवसांसाठी. म्हणजे एक रात्र वस्तीला. पण तारखा जुळत नव्हत्या. अख्या ग्रुप मधल्या सगळ्यांच्या सुट्या वेगवेगळ्या दिवशी. त्यात आमचे कनिष्ठ बंधू रत्नागिरीतील लांज्यात आय डी बी आय बँकेत कार्यरत असल्यामुळे त्यांचे येण्या जाण्याचे वेळापत्रक जुळणे सगळ्यात कठीण. त्यात कोणाच्या चुलत भवाचं लग्न तर कोणाच्या मित्राचं. स्पष्ट काही ठरत नव्हतं. मधेच अमरावतीकर सागरचं गावाला जाणंही होतंच.
शेवटी एकदाचे ते दोन सोनियाचे दिवस ठरले, ११ आणि १२ डिसेंबर. सलग तीन दिवसांची सुट्टी म्हणजे सोन्याला (आमचे कनिष्ठ बंधू) यायला जमणार होते, माझी अन इतर काही जणांची रविवार ची सुट्टी अन अमोलची सोमवार ची सुट्टी. म्हणजे प्रत्येकाला (सोन्या व्यतिरिक्त) एका दिवसाच्या रजेची आहुती द्यायची होती. पण आता ठरले कि ठरले. कोणीही नाही तरी मी एकटा जाणार. आता अजून तारखा बदलणार नाही. तरीही वेळेवर विकास आणि हरेश्वर रद्द झालेच.
ग्रुपवर सगळ्यांना पुन्हा पुन्हा सूचना दिल्या दोन दिवस आधीपासूनच. अगदी पाण्याच्या बॉटल पासून ते पायातल्या सॉक्स पर्यंत. दोन गाड्या ठरल्या, मामाची आणि दिपेश ची कार. आमचं एकत्र जमण्याच ठिकाण म्हणजे कुडूस, तिथून पाचनई १६८ किमी असल्याचं गुगल्यामुळे कळलं होतंच. आणि मीही या आधी पाचानैच्या वाटेने दोनदा आणि खिरेश्वरच्या मार्गाने एकदा जाऊन अलो होतो. त्यामुळे पाचनई च्या वाटेने बाइक्स घेऊन जाणे सोयीस्कर ठरणार नव्हते एवढे मात्र जाणून होतो. त्यामुळे कारच न्यायाच्या ठरवल्या. एकूण ११ जण होते. दोन गाड्यांची मिळून १३ जणांना प्रवास करण्याची क्षमता होती. पण दोन ते तीन तास डोंगर चढून जायचे म्हटले तर कोणीही तयार होईना यायला. मग एक गाडी थोडी रिकामीच ठेऊन जायचं ठरलं.
आणि एकदाचा तो 'सोनियाचा दिनू' उगवला…
पहाटे तीन वाजताच उठून सोन्या, स्वाती(आमच्या भगिनी) आणि सरिता(आमच्या सौ) यांनाही उठवलं आणि तयारीला लागलो. तयारी करता करता केतन, मनीष आणि अमोलला फोन करून उठवणे अन त्यांनाही इतरांना फोन करून उठवायला सांगणे चालूच होते.
बरोबर ५:१५ ला अमोल गाडी घेऊन आला. लगेच निघालो अन कुडूसला पोचलो, बाकीचे सगळेही पोचले होतेच. लगेच निघालो. मुंबई नाशिक महामार्ग गाठण्यासाठी आटगाव मार्गे कुठेही न थांबता सरळ कसारा घाटापर्यंत पोचलो... मग आमच्या नेहमीच्या बाबाच्या ढाब्यावर थांबलो अन गरमागरम नाश्त्यावर आडवा हात मारला. लगेच निघालो जेणेकरून पायथ्याशी पोचायला जास्त उशीर होऊन चढताना उन्हाचा त्रास होऊ नये. घोटी वरून उजव्या बाजूला सिन्नर कडे वळल्यावर अजून एकदा उजव्या बाजूला वळावे लागते(आता त्या ठिकाणाचे नाव आठवत नाही) तिथे परत एक थांबा घेतला आणि घरून आणलेला चहा घेतला.
Tea
मस्त वाटलं एकदम.
आता राजूर कडे वळलो. आता समोर असलेली दृश्यं आमच्यासाठी थोडी नवी होती, गावं, शेतं अन घरंही थोड्या वेगळ्या पद्धतीची. वळणा वळणाची वाट कापणे खूप वेळखाऊ होत होतं पण रस्ता छोटा असल्यामुळे वेगाने जाणे शक्य नव्हते.
सकाळी ११:०० वाजता राजूर ला पोचलो. मग रात्रीच्या जेवणासाठी भाजीपाला व इतर आवश्यक गोष्टी घेण्यासाठी बाजारात गेलो. रात्री खिचडी बनवायचा बेत असल्यामुळे समान मोजकंच लागणार होतं पण वेळेवर सागरने वांग्याच्या भरीताचा बेत आखला अन मला ते नाकारणे शक्यच नव्हते. मग त्याला हवी तशी मोठी वांगी अन इतर गोष्टी घेतल्या. आमच्यापैकी वसंताने सगळ्यांच्या नकळत गडावरील मंदिरासाठी मिठाई, नारळ आणि अगरबत्ती घेतल्याचे मी पहिले. एकदाचे राजुराहून निघालो.
Shopping

राजुर नंतरचा रस्ता अजूनच अरुंद आणि खुप जास्त वळणावळणाचा अन खराबही आहे. आता हळूहळू पायथा जवळ येत होता. हे अंतर अपेक्षेपेक्षाही जास्त लांबचे वाटले.
पाचनई गावाजवळच एक छानसं ठिकाण आहे, तीनही बाजूने वळसा घेणारी नदी आणि मधेच एक टेकडी हे दृश्य समोरच्या रस्त्यावरून खूपच छान दिसते, आधीच्या या वाटेने आलेल्या दोन्ही वेळेस मला इथे छायाचित्रे काढायची खूप इच्छा होती पण सगळ्यांनाच असणार्या घाईमुळे ते मी कधी सांगणे जमले नाही. या वेळेस मात्र आम्ही वेळेत मार्गक्रमण करित असल्यामुळे मी थांबायचं निर्णय घेतला. तसेही या वेळी सगळे निर्णय मीच घेत होतो म्हणून पुढे गेलेल्या गाडीला न थांबवता आम्ही मागे थांबलो अन येथेच्च क्लिकक्लीकाट करून घेतला. आणि पुढे निघालो.

scene

Scene2

पाचनईत पोचल्यावर मात्र मला भीती वाटली. कारणही तसच होतं, गावात भरपूर गाड्या दिसत होत्या. अगदी ४-५ शाळेच्या बसही होत्या. म्हणजे चित्र स्पष्ट होतं कि आम्हाला गडावर राहण्यासाठी लेण्यांमध्ये जागा मिळणे अशक्य होते. आमच्याकडे तंबूही नव्हते. आता एकच पर्याय समोर होता आणि तो म्हणजे एखाद्या झोपडीवजा हॉटेलात रात्री झोपणे. पण त्यात लेण्यांमध्ये राहण्याची मजा नाही. आणि इतरही एवढ्या गाड्या दिसत असल्यामुळे तेही कितपत शक्य होईल असे वाटत नव्हते. आणि मीही एक चुक केली होती, मिपा वरून मिळालेला तुकारामाचा मोबल्याचा क्रमांक फक्त घेऊन ठेवला पण त्याला फोन न करताच निघालो. आता नेटवर्क नसल्यामुळे ते करणे शक्यही नव्हते.
१२:३० वाजता गाड्या पार्क केल्या आणि सामानाची वाटाघाटी केली, स्लीपिंग मॅट नव्हत्याच त्याबदल्यात मोठ्या चटया घेतल्या होत्या त्या आणि ब्लांकेट्स व्यवस्थित रोल करून बॅग मध्ये भरले जे नव्हते बसत ते बांधून घेतले बॅग्स ला अडकवले.
चढाईला सुरुवात:
Start
आणि ट्रेकिंगचं अर्धं अंतर पार केल्यावर जेवायचं ठरलं कारण पाचनईच्या वाटेने चढताना पहिला टप्पा तेवढा अवघड आहे हे मी अनुभवलं होतं आणि मागच्या वर्षी पराठ्याला जेवण करून लगेच ट्रेकला निघाल्यामुळे एका सदस्याला उलट्या झाल्या होत्या . मला हेच टाळायचं होतं.
ट्रेकला सुरुवात झाली आणि सागर कामाला लागला… त्याने आपली सेल्फी स्टिक काढली आणि क्लिकक्लीकाट सुरु केला, त्याचा जोडीला योगेश, केतन आणि आमच्या सौ होतेच. मला कल्पना होतीच कि हा सागर आमचा वेग कमी करणार ते. पण तेही बरंच होतं कारण त्यामुळे कोणाला लवकर थकवा येणार नव्हता, किमान मनाने तरी. तरीही मनीष आणि वसंत सोडले तर बाकीचे "अजून किती चढायचे आहे?” असले प्रश्न करायला लागेले.
start1

start 2

थकले भागले जीव....
rest

आम्हाला तिघांनाच(मी, मनीष आणि वसंत) अंतराची कल्पना होती, बाकी सगळे नवीनच होते. त्यातही काही दुसर्यांदच ट्रेकला आले होते(पहिला नाणेघाट).
पहिला कठीण टप्पा पार केला आणि उभ्या कातळाच्या अंगाने चालत वाटेत लागणाऱ्या ओढ्याजवळ आलो. इथे जेवायचं होतं कारण आता जास्त अंतर राहिलं नव्हतं.

कडा
rock

valley

सुपरमॅन सागर
superman sagar
आतापर्यंत सगळ्यांना सणकून भूक लागली होती, त्यात घरून आणलेलं चिकन, पराठे आणि चपात्यांवर सगळे तुटून पडले.

जेवल्यानंतर...
(जेवताना कोणालाही फोटो काढणे म्हणजे पातक वाटत होतं.)
lunch

lunch 2

कोंबड्याचा फडशा पडल्यावर पुन्हा सगळ्यांचं फोटोसेशन चालू झालं. मीही मुद्दामच घाई केली नाही, म्हटलं वेळ आहे अजून करुदे थोडा आराम. आता हळूहळू एक गोष्ट ध्यानात येत होती कि बरेच लोकं गडावरून उतरत होते. महत्वाचं म्हणजे ज्या चार स्कूल बसेस बघन मी घाबरलो होतो त्यातील विद्यार्थी आम्हाला उतरताना दिसले. म्हणजे गडावरील गर्दी किमान ५० टक्यांनी कमी झाली होती तर.

विद्यार्थ्यांबरोबर फोटो काढायची हौस करून घेतली.
school

आता शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली, आतापर्यंत सगळे मस्त मजा करत चढत होते. विशेष थकलेलं कोणी वाटत नव्हतं. गप्पाटप्पा-खेचाखेची चालू होती.

पुढच्या ३० मिनिटांत गडावर पोचलो.

क्रमशः

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

6 Jan 2017 - 12:42 pm | संजय पाटिल

लवकर येउद्या पुढचा भाग..