मदुराई, रामेश्वर ट्रीपबद्दल माहिती हवी आहे.

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in भटकंती
27 Dec 2016 - 5:06 pm

नमस्कार,

फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे.
बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो.
कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2016 - 7:33 pm | पिलीयन रायडर

http://www.misalpav.com/node/31372 - सफर तामिळनाडुची! - रामेश्वरम (भाग २)

http://www.misalpav.com/node/31385 - सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)

आर्या१२३'s picture

28 Dec 2016 - 2:51 pm | आर्या१२३

धन्यवाद पिराताई!
आम्हीही आधी मदुराई असेच धावतपळत करायच ठरवले होते. पण तुमचे हे दोन्ही लेख वाचुन मदुराईला कधी भेट देउ असे झालेय. रामेश्वरपेक्षा मदुराईतच मुक्काम करावा असे वाटतय.
रामेश्वरहुन कन्याकुमारीला जायला ऑप्शन काय आहेत?

कंजूस's picture

28 Dec 2016 - 4:48 pm | कंजूस

train no 22621(रात्री ८.३०)
ही परत मदुराइवरूनच( रा ११.३०) जाते

कन्याकुमारी हे मात्र करळ ट्रिपमध्येच करणे सोपे जातं.तिरुअनंतपुरमपर्यंत आपण जातोच तिथून एक दिवसाची सहल आहे. ७८ किमी दरम्यान कोवालम,पद्मानाभपुरम राजवाडा,नागरकोइल चे नागाचे देऊळ,सुचिंद्रम देऊळ,कन्याकुमारी देऊळ,विवेकानंद स्मारक होईल. मदुराई ते रामेश्वर दोनशे ,मदुराइ ते कन्याकुमारी तीनशे किमी आहे.

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2016 - 7:53 pm | पिलीयन रायडर

बरोबर. म्हणुनच आम्ही सुद्धा तामिळनाडु ट्रिपमध्ये कन्याकुमारी केले नाही.

आर्या१२३'s picture

28 Dec 2016 - 2:33 pm | आर्या१२३

कन्याकुमारी मधे विवेकानन्द केन्द्राचे शिबीर अटेन्ड करण्याचा विचार होता. तसेही ट्रेनने कन्याकुमारीस जाण्यास ४२ तास लागतात. मग त्याऐवजी त्याआधी मदुराई आणि रामेश्वर २ दिवसात झाले तर कराय्चा मानस आहे.

तामिळनाडु ट्रिप मलाही करायची आहे पण नव्वद टक्के देवळं आहेत जी अकरा ते पाच बंद असतात. पुजल्या जाणाय्रा देवदेवता असल्याने एरवीही रांगांमध्येच वेळ जाणार. बघता असं येणार नाहीच.त्यामुळे म्हातारपणासाठी ठेवली आहे.

मित्रहो's picture

1 Jan 2017 - 9:43 pm | मित्रहो

आम्ही दहा वर्षापूर्वी मदुराइ आणि रामेश्वरम केले होते. बंगलोरहुन ट्रेन संध्याकाळी निघाली की सकाळी मदुराइला पोहचते. तेथून गाडी करुन आम्ही रामेश्वरमला गेलो होतो. स्टेशनवर तामीळनाडू टुरीझमचे ऑफिस होते त्यांनीच गाडी बुकींगला मदत केली होती. मदुराइ रामेश्वरम हे अंतर १७० ते १७५ किमी आहे. चार ते पाच तास लागतात. समुद्र लागायच्या आधी रामनाथपुरम नावाचे गाव आहे तेथून कन्याकुमारी अडिचशे किमी आहे. पाच ते सहा तासाच रस्ता. तसे कन्याकुमारी केरळपासून जवळ आहे पण तसा प्लॅन लवकरच होनार असेल तर. आम्ही त्यावेळेला कन्याकुमारीला गेलो नाही आणि आजतागायत गेलो नाही. आम्ही रामेश्वरमला थांबलो होतो कारण बुजुर्ग व्यक्ती सोबत होत्या आणि त्यांना रामेश्वरममधेच फक्त रस होता. मदुराइला तिथेल मुख्य देउळ बघितले होते. तसा मदुराइ, रामेश्वरम, कन्याकुमारी आणि मग तुटीकोरीन किंवा कन्याकुमारी रेल्वे स्टेशनवरुन परत असाही प्रवास करता येतो.

तुमच्या एकंदर वर्णनानुसार हे सुचवितो आहे:

तामिळनाडू हे शक्तिस्थानांसाठी फार विशेष आहे. मदुराई मीनाक्षी व कन्याकुमारी भगवती मंदिर हि अतिशय प्रसिद्ध आहेतच, परंतु त्याबरोबर खालील स्थाने पाहण्यासारखी आहेत.

मदुराई : मीनाक्षी - सुन्दरेश्वर मंदिर, मंदिरापासून जवळच सुब्बलक्ष्मी यांचे घर, तेथून लगेच पुढे मदुराई नायकांचा राजवाडा या गोष्टी जरूर पहा. मुख्य मंदिरात देवीला नेसवलेल्या व पूजेत आलेल्या साड्यांची विक्री होते, काही उत्तम प्रतीच्या कांची रेशमी, कोईम्बतूर सुती व प्रिंट हॅण्डलूम साड्या अल्प दरात मिळतात. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला न चुकता पहा.
कूदल अळगर हे विष्णू मंदिरही जवळच आहे, १०८ वैष्णव दिव्यस्थानांपैकी एक. सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती, व 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान प्रेक्षणीय.
थोडे अनपेक्षित : मंदिराच्या बाजूला काश्मिरी गालिच्यांची दुकाने आहेत (माझ्या मते पश्चिम दिशेस) व गालिचे तिथेच तयार केले जात असल्याने (ते कामही पाहू शकता) जेन्युईन कारागिरी परंतु त्याच कारणाने महाग वाटू शकते.

रामेश्वर : मुख्य मंदिरात २२ तीर्थांचे स्नान भाविक करतात, परंतु सर्व तीर्थांचे सार शेवटी समुद्रात (त्यास अग्नितीर्थ असे म्हणतात) असल्याने ते अधिक सोयीचे. रामेश्वराच्या पूर्वेस समुद्राच्या (अग्नितीर्थाच्या) दिशेस भद्रकालीचे मंदिर आहे; अतिशय जागृत स्थान व चुकवू नये... मुख्य मंदिरात पहाटे ५-५:३० ला स्फटिक लिंगाची पूजा होते, हि वेळ दर्शनास उत्तम. इतरवेळी स्फटिक लिंग पाहता नाही. वयोगट पाहता धनुष्कोडी नाही पाहिलात तरी चालेल. गावातच लहानशी राम -सीता - लक्ष्मण - सुग्रीव आदी तीर्थे (कुंड) आहेत. गंधमादन पर्वत नावाची लहानशी टेकडी शक्य असल्यास पहा, उत्तुंग मंदिर गोपुर, दीपस्तंभ, सुदूर श्रीलंका किनारा व जवळचे पवनचक्की विद्युत प्रकल्प छान दिसतात. कोणाकडे गंगाजल असेल तर घेऊन जा. रामेश्वरास अर्पण करण्याची प्रथा आहे. व तेथील वाळू येताना घेऊन या, पुढे कधी काशीला गेलात तर ती तिथे अर्पण करतात. त्यानंतर सेतू यात्रा पूर्ण होते.

कन्याकुमारी : मुख्य भगवती मंदिर दक्षिण-पूर्वेस असून देवीची नथ पाहायला विसरू नका. प्रत्येक शक्तिस्थानास भैरव स्थानही असते. येथील भैरव गुंगनाथ मंदिर हे थोडे अंतरावर उत्तरेस वरच्या अंगाला आहे. अतिशय शांत व वर्दळरहित व जरूर पाहावे. विवेकानंद स्मारक व तिरुवल्लुवर पुतळा प्रसिद्ध आहेतच. गांधी मंडप इच्छा असल्यास पाहू शकता, जवळच आहे.

सुचिंद्रम : ५१ पैकी आणखी एक शक्तीस्थान, शक्यतो लोक मोठ्या शैव मंदिरास भेट देतात, ते मंदिरही सुंदरच आहे, परंतु तेथून थोडे अंतरावर जल कुंडाच्या पलीकडे देवीचे मंदिर आहे. अजून एक शांत गंभीर व जागृत स्थान. कन्याकुमारीपर्यंत गेल्यावर अजाबात चुकवू नये असे.

तिरुनेलवेली : मदुराई व कन्याकुमारी यांच्या मध्ये असल्याने उल्लेख करतो आहे. भव्य शिव मंदिरासाठी प्रसिद्ध. ५ विशेष सुंदर नटराज मंदिर प्रांगणांपैकी (तमिळमध्ये सभा म्हणतात - चिदंबरम, मदुराई इत्यादी) एक. तिरुनेलवेली हलवा प्रसिद्ध आहे.

मंदिरे दुपारी बंद असतात तेव्हा मोठी चर्च, राजवाडे इत्यादी पाहू शकता किव्वा पुढचा प्रवास करू शकता. मंदिरांना पहाटे भेट देणे सर्वात उत्तम. खाण्यासाठी उत्तम व्यवस्था सर्वत्र असतेच, परंतु पुरणपोळीची तामिळ भगिनी 'पोळी' जरूर चाखून पहा. आनंदभवन किंवा सर्वनाभवन मध्ये चांगली मिळते.

महिला मंडळ असल्याने हॅन्डलूम साड्यांची खरेदी किंवा नुसता कलेचा आस्वाद हा विषय नक्की वेळापत्रकात ठेवा. वेंकटगिरी, गुंटूर, मंगलगिरी या स्वस्त सुती पासून कोइंबतोर-गडवाल हॅण्डप्रिन्ट - केरळ कॉटन - उप्पाडा जामदानी या मध्यम तर पोचमपल्ली-धर्मावरं-कांजीवरम या महाग रेशमी कला विशेष उल्लेखनीय, तुम्ही अधिक जाणत असाल, परंतु तरीही उल्लेखास पात्र अशी प्रादेशिक कला.