मूगाची कचोरी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
18 Nov 2016 - 9:28 pm

खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे.
सकाळी १०-११ च्या सुमाराला तिथे गेलात तर बरेचदा मस्त गरमागरम मूग कचोर्‍या मिळतात. म्हणजे एरवीही मिळतात पण गरमागरम हव्या असल्या तर तेथे सकाळी जा. नाहीतर मग मी सांगते तशा करून खा.
ह्या कचोर्‍या तशा टिकाऊ आहेत पण नो वन कॅन इट जस्ट वन.. म्हणत फस्त केल्या जातात.
तर ही कचोरी इथे जर्मनीत मनात येईल तेव्हा कशी बरं मिळणार? मग स्वतःलाच कामाला लावावे लागते. असो, नमनाला घडाभर तेल खूप झाले.. कचोर्‍याही तळायच्या आहेत त्याला तेल लागणार आहे ना..
तर ह्या कचोर्‍यांसाठीचे साहित्य-

सारणासाठी- १ वाटी मूग डाळ, २ चमचे बडिशेप, ३ ते ४ चमचे धने जीरे पूड, चमचाभर आमचूर, २ चमचे लाल तिखट, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ३ ते ४ चमचे साखर, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबिर, २ पळ्या तेल

आवरणासाठी- २.५ वाट्या मैदा, पाउण वाटी तूप, मीठ, लिंबाच्या रस चमचाभर- साधारण दोन छोट्या फोडींचा रस, कोमट पाणी

तळणीसाठी- तेल किवा ए फ्रा

सारणाची कृती-
मूगाची डाळ व बडिशेप साधारण तीन तास तरी भिजत घाला. नंतर उपसून वाटा, वाटताना पाणी कमीत कमी ठेवा.
एका कढईला तेलाचा हात लावून तिच्यात २ पळ्या तेल तापत ठेवा. त्यात तीळ व खसखस घाला. नंतर ही मूगाची वाटलेली डाळ घाला. थोडे परतून घ्या.
मग तिखट, धनेजीरे पूड, मीठ घाला.
आच मोठी ठेवून परतत रहा. वाटल्यास अधून मधून पाण्याचा हबका मारा.
मिश्रण मऊ व मोकळे झाले पाहिजे.
आच बंद करून साखर घाला,
आमचूर व कोथिंबिर घाला.
मिश्रण ढवळून एकसारखे करा.

आवरणाची कृती-
तूप पातळ करून घ्या.
मैद्यात छोटा चमचाभर मीठ घाला. लिंबाचा रस घाला.
त्यात हे गरम केलेले पातळ तूप घाला.
हवे तसे कोमट पाणी घालून मळा.
फार घट्ट नको, किंचित सैलसरच गोळा बनवा व १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
ह्याच्या छोट्या पुर्‍या लाटून त्यात मूगाचे सारण भरा, कडेने बंद करत आणा व बंद केलेला भाग खाली ठेवा.
तसेच तळतानाही बंद केलेला भाग खाली ठेवून तेलात सोडा व कचोरी तेलात सोडताना आच मोठी ठेवा, नंतर तळताना मध्यम आच करा. म्हणजे कचोरी फुटणार नाही.

ए फ्रा मध्ये करायच्या असतील तर-
ए फ्रा २०० अंशावर प्रिहिट करा.
कचोर्‍यांना ऑइल ब्रशिंग करून घ्या.
आधी ६ मिनिटे, मग पालटून ६ मिनिटे मग १८० अंशावर २ ते ३ मिनिटे ए फ्रा करा.
गोल्डन गुलाबी रंग आला नसेल तर अजून एखादा मिनिट ए फ्रा करा.

दोन्ही प्रकारे केलेल्या कचोर्‍यांचा फोटो देते आहे. मुद्दाम एकाच वेळी दोन्ही प्रकारे केल्या. चवीत फारसा फरक जाणवला नाही.

तेलात तळलेल्या कचोर्‍या-
.

ए फ्रा मधील कचोर्‍या-
.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2016 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त !आवडले.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

18 Nov 2016 - 10:41 pm | पद्मावति

मस्तं!

अजया's picture

19 Nov 2016 - 9:13 am | अजया

अहाहा! मस्त.
एफ्रा पर्यायासाठी धन्यवाद!

नरेश माने's picture

19 Nov 2016 - 10:41 am | नरेश माने

एकदम तोंपासु.....

सविता००१'s picture

19 Nov 2016 - 10:52 am | सविता००१

सुरेखच ग

नूतन सावंत's picture

19 Nov 2016 - 2:23 pm | नूतन सावंत

स्वाती,झकास.

मस्तच! लावलेस कामाला सुट्टिचे.

विशाखा राऊत's picture

20 Nov 2016 - 2:59 am | विशाखा राऊत

मस्त रेसेपी... लवकरच करुन बघावी लागेल

ए फ्रा वाल्यांची मजा आहे बुवा! दोन्ही प्रकारे केलेया कचोर्‍या छान दिसतायत. आवरणात लिंबूरस घालतात हे पहिल्यांदा पाहिले. मी एकदाच कचोर्‍या घरी ट्राय केल्या होत्या. पुस्तकातील प्रमाणानुसार सारण परतायला घेतले तर जामच चिकटले.

स्वाती दिनेश's picture

20 Nov 2016 - 9:42 pm | स्वाती दिनेश

अग, परतायला घेतले की मूगाचे सारण चिकटायला लागतेच, म्हणून तर कढईला तेलाचा हात लावून घ्यायचा आधी, म्हणजे मग बरे पडते.
स्वाती

नूतन सावंत's picture

21 Nov 2016 - 2:36 pm | नूतन सावंत

अगोदर कुकरमध्ये वाफवून घेऊन,तहान झाल्यावर हाताने मोकळी करून परळी तर काम सोपे होते.

मस्त दिसत आहे. कचोरी फार आवडते, पण कधीच करुन पाहिली नाही. लहानपणी ते सायकलवर डब्ब्यांमधून आणून कचोरी विकणारे यायचे, त्यांच्याकडची कचोरी फार आवडायची. तान वर्षांपूर्वी राजस्थानात फिरताना एका छोट्याश्या गावात सकाळी मस्त कचोरीचा नाश्ता केला होता त्याची आठवण आली :)

स्वाती ताई कोणत्या चांगल्या लाग्ल्या जास्ती? ए फ्रा च्या की, तळलेल्या? कचोरि मस्त! एकदम.

यशोधरा's picture

20 Nov 2016 - 12:44 pm | यशोधरा

अगं, किती दिवसांनी!

सरप्राइज!!! ट्याणट्याढ्याण!!

यशोधरा's picture

22 Nov 2016 - 6:14 pm | यशोधरा

=))

स्वाती दिनेश's picture

20 Nov 2016 - 5:25 pm | स्वाती दिनेश

किती दिवसांनी? यशोसारखेच म्हणतेय, :)
खूप फरक नाही जाणवला ए फ्रा आणि तळलेल्या कचोर्‍यांमध्ये त्यामुळे आता ए फ्रा कचोर्‍या खाता येणार असल्याने जास्त वेळा केल्या जातील हे नक्की.. :)
बाणा, बरोबर.. तेथील गुलकंदवडी मस्त असतेच, मला त्यांच्याकडची दुधीवडीही आवडते, गोरसपेक्षाही यांची जास्त आवडते.
स्वाती

मदनबाण's picture

20 Nov 2016 - 12:39 pm | मदनबाण

कचोरी मस्तच !

गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस
ते हनुमान "डेअरी" आहे, स्वीट्स नव्हे ! त्यांच्याकडे गुलकंद वडी आणि सुतरफेणी हे माझे दोन्ही आवडते पदार्थ देखील मिळतात. :)

अवांतर :--- ते (सर्वव्यापी) कुठेतरी हरवलयं पहा बरं... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नशे सी चढ़ गयी ओय कुड़ी नशे सी चढ़ गई... पतंग सी लड़ गई ओये कुड़ी पतंग सी लड़ गई... ;) :- Befikre

प्राजु's picture

21 Nov 2016 - 10:09 pm | प्राजु

अवांतर :--- ते (सर्वव्यापी) कुठेतरी हरवलयं पहा बरं... ;)
गप्प मेल्या!

काय टेंप्टींग दिसत आहेत ते फोटो!

सारिका होगाडे's picture

20 Nov 2016 - 1:06 pm | सारिका होगाडे

एकदम तोंपासु.. दोन्ही पध्द्तीने करून पाहीन.. पाककृती खूपच छान सांगितली आहे.. आवडली..

स्रुजा's picture

20 Nov 2016 - 7:23 pm | स्रुजा

आह्ह !!! कचोरी.. स्लर्प !

जुइ's picture

21 Nov 2016 - 3:47 am | जुइ

करून बघेन.

स्मिता चौगुले's picture

21 Nov 2016 - 9:22 am | स्मिता चौगुले

मस्त मस्त ..नक्की करून बघेन

केडी's picture

21 Nov 2016 - 10:51 am | केडी

आवडली पाकृ, एकदा करून बघेन....

नाखु's picture

21 Nov 2016 - 10:58 am | नाखु

सारणात लिंबाचा रस घालण्याचे प्रयोजन छान चव व्यतिरिक्त आणखी काय असावे ? एक बाळबोध शंका म्हणून फक्त विचारतोय.

नेमस्त नाखु

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2016 - 1:19 pm | स्वाती दिनेश

घातल्याने आवरणात क्रिस्पीपणा येतो.
स्वाती

मराठी कथालेखक's picture

21 Nov 2016 - 3:44 pm | मराठी कथालेखक

पाउण वाटी तूप

वनस्पती तूप का ? वनस्पती तूपाऐवजी तेल चालेल का ?

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2016 - 4:31 pm | स्वाती दिनेश

मी मार्गारिन घेतले. वनस्पती तूप घेऊ शकता किवा तेलही घेऊ शकता. तेल घेतल्यास गरम करून मैद्यात घालावे.
स्वाती

पूर्वाविवेक's picture

21 Nov 2016 - 3:47 pm | पूर्वाविवेक

फार छान आणि सोप्पी रेसिपी.

विजय पिंपळापुरे's picture

21 Nov 2016 - 7:25 pm | विजय पिंपळापुरे

स्वाती

असली ठाणेकर आहात् तर,

छाया स्वीट्स चा उल्लेख केलात म्हणजे बरेच वर्ष ठाण्यात राहीलात तर

अनन्न्या's picture

22 Nov 2016 - 6:09 pm | अनन्न्या

आता करून बघते.