छोल्यासांठी साहित्य-
२ ते २.५ वाट्या काबुली चणे (छोले)
३ मध्यम कांदे+ १ कांदा वरून घालण्यासाठी
२ ते ३ टोमॅटो
१ उकडलेला बटाटा
१/२ चमचा गरम मसाला, १.५ चमचा छोले मसाला, आल्याचा तुकडा २ पेरांएवढा,६/७ लसूण पाकळ्या
डावभर तेल, मीठ चवीनुसार, तिखट चमचाभर, मूठभर कोथिंबिर,चाट मसाला
कृती -
७ ते ८ तास चणे भिजत घाला, कुकरमधून ३ ते ४ शिट्ट्या देऊन काढा.
बटाटा उकडून घ्या.
कांदे बारीक चौकोनी चिरा किवा मिक्सर मधून काढा.आले +लसूण वाटा.टोमॅटोही मिक्सर मधून काढा.
तेल गरम करून त्यात कांदा घाला, त्यावर आले लसूण पेस्ट घाला. तिखट घाला व परता,गरम मसाला घालून परता.छोले मसाला घालून परता. टोमॅटो घाला व परता.
उकडलेल्या छोल्यातले साधारण वाटीभर छोले बाजूला काढा व बाकीचे वरील मिश्रणात घाला. बाजूला काढलेले छोले मिक्सरमधून काढा आणि आता हे वाटण वरील छोल्यात घाला.चवीनुसार मीठ घाला. पाणी घालून खळखळून उकळू द्या.
उकडलेला बटाटा लांबट चिरून घाला. चिरलेली कोथिंबिर घालून सजवा.
भटुरे, पुऱ्या किवा पावाबरोबर खा.
खायला देताना छोल्यांवर बारीक चिरलेला कांदा+कोथिंबिर+चाट मसाला घालून द्या.
भटुर्यांसाठी साहित्य-
३ वाट्या मैदा
कोरेडे यिस्ट १ चमचा , ओले असेल तर ५ ग्रामचा १ क्युब
२ चमचे दही. यिस्ट नसेल तर ५ चमचे दही
२ चमचे तूप, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा साखर, वाटीभर गरम पाणी, तळणीसाठी तेल
वरील साहित्यात साधारण २५ भटुरे होतात.
कृती-
एका वाडग्यात यिस्ट व साखर गरम पाण्यात घालून ५ मिनिटे ठेवा.
तूप, मीठ व दही परातीत एकत्र करून हाताने फेसून घ्या. त्यात मैदा घाला. यिस्टच्या पाण्यात सैलसर भिजवा व चांगले मळा.(पिझ्झ्याला भिजवतो तसे) अजून पाण्याची गरज भासली तर दही/ताक त्याऐवजी वापरा.
१ तासभर तरी झाकून ठेवून द्या. पीठ फुलून येईल.
नंतर पुरी लाटा, मग हाताने ती सर्व बाजूनी थोडीथोडी ताणा व लगेचच तळा. तळताना आच मध्यम हवी.
नेहमी करतो त्या पुरीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची पुरी भटुर्यांसाठी बनवा.
विडंबनाचार्य (हंगामी निवृत्त) केशवसुमार आणि छोटा डॉन छोले भटुर्यांचा आस्वाद घेताना :
प्रतिक्रिया
28 Sep 2008 - 7:54 pm | टारझन
वा स्वाती तै ..
छोले भटूरे आमचा विक पॉइंट.... जेंव्हा डिवाय ला कॉलेजात होतो .. वाय.सी.एम. हॉस्पिटल, संत तुकाराम नगर,पिंपरी पाशी एक छोटीशी टपरी आहे. स्पेशल छोले भटूरे .. अप्रतिम छोले भटूरे .. किंमत फक्त १० रुपये. आणि त्याची पुरी पण अंमळ मोठी असते. बहुतांश वेळेस कॉलेजला येता जाता २-३ छोले भटूरे चापुनच पुढे जात असे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
28 Sep 2008 - 8:07 pm | सुनील
छोले छानच पण भटुरे घरी बनविणे म्हणजे पीडाच! तसाही मी पोळी, चपाती, भाकरी, रोटी, नान, पुर्या इ. प्रकार बाहेरून आणणे जास्त पसंत करतो.
असो, फोटोत प्लेटच्या बाजूला ठेवलेल्या ग्लासात काय आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Sep 2008 - 8:26 pm | स्वाती दिनेश
तो आइस टी आहे..पिच फ्लेवरचा.
स्वाती
28 Sep 2008 - 8:45 pm | प्राजु
भटुरे असे करतात होय!!! मला नेहमीच प्रश्न पडत होता की, भटुरे कसे बनवायचे. आता हा मेनू लवकरच करेन. २-३ दिवसांपूर्वीच छोले केल होते. आता भटुर्यासोबत करेन या आठवड्यात.
धन्यवाद स्वातीताई. फोटो एकदम जबरा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2008 - 8:48 pm | प्राजु
आता डॉनची तब्बेत सुधारणार जर्मनीत असे पर्यंत. घरी परत जाशील तेव्हा घरच्यांना घराचे दरवाजे जरा जास्ती रूंद करून घ्यायला नक्की सांग रे. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2008 - 9:43 pm | छोटा डॉन
स्वातीताईने त्या दिवशी मस्त "छोले भटुरे" खाउ घातले बॉ, मजा आली एकदम ...
रेसी छानच आहे फक्त त्यातले "भटुरे" जमणे जरासे अवघड दिसते आहे.
[ त्यापेक्षा स्वातीताईकडे जाऊन खाणे सोपे पडेल, काय !]
असो. आम्ही "छोले - पोळी" खाऊ ...
आमच्याही हॉस्टेलच्या बाहेर एकदम रापचीक "छोले भटुरे" मिळायचे, तेव्हा पासुनची आवड ही ...
>> घरी परत जाशील तेव्हा घरच्यांना घराचे दरवाजे जरा जास्ती रूंद करून घ्यायला नक्की सांग रे.
नक्की हा प्राजुताई, पण मला त्याआधी एक वेगळी काळजी लागली आहे.
जास्त वाढलेल्या वजनामुळे इमानवाले इमानात घेतात का नाही ?
बघु जे होईल ते ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 Sep 2008 - 11:07 pm | रेवती
आज रात्रीच चणे भिजवते. उद्या करीन. भटूरे करीन कि नाही माहीत नाही. पुर्या सोप्या पडतील (नाहीतर दीप फूडस् चे भटूरे गडबडीच्यावेळी चांगला ऑप्शन आहे).
माझी एक मैत्रिण इतके टेस्टी छोले बनवते, पण पठ्ठी त्याची रेसेपी मात्रं शेअर करत नाही, कितीही वेळा खायला ये म्हणते (पण रेसेपी सांगत नाही). तुम्ही पाकृ शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद!
रेवती
29 Sep 2008 - 1:14 am | चतुरंग
छोले-भटुरे क्या बात है!
स्वातीताई, तुमच्या 'पाक' प्रतिभेला असाच बहर येत रहावा म्हणजे आम्हालाही नवनवीन (चवीचे) पदार्थ चाखायला मिळतात! :)
छोटा डॉन, तुझा परत येईपर्यंत 'मोऽऽऽठ्ठा डॉन' होणार रे बाबा! :D
(खुद के साथ बातां : वरच्या चित्रात केसु अंमळ झटकल्यासारखा वाटला नाही रे रंगा? ढगळ शर्ट घातलेला होता का खरोखरच पळायला जातो कोण जाणे? ;) B) )
चतुरंग
29 Sep 2008 - 1:19 am | विसोबा खेचर
पाकृ, सर्व लेखन आणि फोटू, जीव जाळणारे..!
स्वाती, आपण तुझ्याशी दोस्ती तोडली आजपसून.. कट्टी फू.... :)
तात्या.
29 Sep 2008 - 3:14 am | शितल
वा !
स्वाती ताई,
फोटो आणि पाककृती मस्त.
चला ह्या आठवड्यात छोले भटुरे आम्ही करून पहाणार.
तसे मी छोले करायचे पण भटुरे कधीच नाही केले, ह्या वेळी भटुरे ही करणार.
धन्यवाद स्वाती ताई सुंदर पाककृती बद्दल.
(डॊन्या स्वाती ताईशी कधी भांडु नको रे, नाही तर चांगल्या चांगल्या पदार्थांना मुकशील )
29 Sep 2008 - 7:14 am | वैशाली हसमनीस
छोले मस्त दिसत आहेत पण माझ्या पंजाबी मैत्रिणीकडून मी कालच रेसिपी शिकून घेतली,त्यामुळे त्याला अगदी पंजाबी चव येते.ती सांगू का? छोले शिजवून घेताना त्यात अर्धा कप चहाचे उकळलेले पाणी कींवा १डिप-डिप टी बॅग ,एक कांदा.थोडे जिरे वाटलेले,२लवंगा,२-३ मिरी,१ दालचिनी ,पाव चमचा सोडा असे घालावे.त्यानंतरची कृती सेम्.फक्त उकळताना चिंचेचे पाणी घालावे.क्या टेस्ट आती है क्या बताऊ या--र ! कालच केले होते म्हणून थोडी सुधारणा सांगितली.बस्स ! आपण अमृतसरला खाली होते त्याची आठवण होते.
29 Sep 2008 - 9:04 am | प्रभाकर पेठकर
छोले शिजल्यावर डिप-डिप बॅग काढून टाकावी.
कांदा चिरून घालावा.
चहाचे पाणी किंवा डिप्-डिप बॅग मुळे छोल्यांना मस्त सोनेरी रंग येतो.
29 Sep 2008 - 11:46 am | स्वाती दिनेश
ओके..चहाचे पाणी घालायचे काय? आता पुढच्या वेळी नक्की अमृतसरी आवृत्ती,:)
स्वाती
29 Sep 2008 - 7:33 pm | लिखाळ
छोले भटुरे मस्तच.. आता प्रयोग करुन पहायला (सांगायला :) ) पाहिजे !
चहा बद्दल सहमत.. मी सुद्धा एका पंजाबी स्नेह्याला छोल्यात चहा घालताना पाहिले आहे.
--लिखाळ.
29 Sep 2008 - 9:07 am | यशोधरा
तो ये हैं उस सोनेरी रंग का राज!!! धन्यवाद वैशाली ताई, पेठकर काका.
29 Sep 2008 - 11:23 am | झकासराव
अहाहा!
काय मस्त मस्त फोटो आहेत. :)
मस्त पाककृती.
अवांतर : दुसरा फोटु पाहुन अम्मंळ हेवा वाटला बॉ.
केसु खरच बारीक झालेत असच वाट्ल. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
29 Sep 2008 - 1:59 pm | शाल्मली
व्वा ! फोटो आणि पा़कृ मस्तच.
दुसरा फोटो बघून जरा जळजळ झाली इतकच.. ;)
आम्ही फ्राफूला आलो की आम्हाला पण पाहिजे.. सगळं लक्षात ठेवलं आहे.. ;)
वैशाली ताईंनी सांगितलेली सूचना पण छान आहे.
--शाल्मली.
29 Sep 2008 - 7:35 pm | लिखाळ
दुसरा फोटो बघून जरा जळजळ झाली इतकच..
आम्ही फ्राफूला आलो की आम्हाला पण पाहिजे.. सगळं लक्षात ठेवलं आहे..
:) सहमत !
-- लिखाळ.
29 Sep 2008 - 7:02 pm | स्वाती राजेश
स्वाती, मस्त आहे गं रेसिपी...:)फोटो पण छान आला आहे....
डॉन्याला खायला घालून घालून मोठा कर......खराखुरा डॉन वाटला पाहिजे.:)
भाऊबीजेला चांगली ओवाळणी वसूल कर....आमच्यावतीनेसुद्धा.....
29 Sep 2008 - 8:31 pm | रेवती
होते छोले+ पुर्या. चणे शिजवताना एक तमालपत्रं, दोन लवंगा, थोडी दालचिनी, दोन मिरे घातले. मस्त झाले होते.
धन्यवाद!
रेवती