गावाकडच्या बोरी

पथिक's picture
पथिक in जनातलं, मनातलं
21 Oct 2016 - 3:47 pm

गावाकडे दरवर्षी पिकतात बोरी
हिरवी पिवळी केशरी लाल बोरं
मण्यांसारखी रत्नांसारखी
फांद्यांवर झुलतात
खाली मातीत, गवतकाट्यात, पाचोळ्यात पडून वाळतात
काही बारकी काही माध्यम काही मोठी
काही आंबट काही गोड
पोरं बाया माणसं वेचून खातात
घरी नेऊन वाळू घालतात
पाखरं, प्राणी खातात
लहानपणी मीही खूप खाल्ली
ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या घातलेल्या गावातल्या मित्रांसोबत
याच्यात्याच्या शेताततून हिंडून
झाडाची तोडून, गवत-काट्यातून शोधून, वेचून
कच्ची पिकली वाळलेली
नुसती बोरेच खाल्ली नाही तर त्यांच्या बी मधलं इवलं इवलं मगजपण खाल्लं ती दगडाने फोडून !
काटेही खूप रुतले हातापायात
पण सोबत त्या बोरींची मायाही झरली आत
आणि ईतक्या वर्षांनंतरही त्या मायेची वीण विरली नाही
उलट आणखीच पक्की झाली आहे
स्थळाकाळाचं अंतर पार करून त्या रानवट आयांची साद येते अन जीवाला हात घालते
ये पोरा, बोरं पिकली...

मुक्तक