मराठ्यांचा आदर्श.. छत्रपती शिवाजी महाराज...

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 3:12 pm

शिवचरित्रावर आधारित रचलेली कविता..

नाही आम्हा भिती कोणा मुघल और निजामाची..
फक्त आहे भूक तळपती मर्द मराठी प्रेमाची..
आले बहु गेले बहु उध्वस्त करण्या धरती..
सर्वांवरती भारी पडला एकला तो छत्रपती..

रक्त मराठी श्वास मराठी मराठी तो बाणा..
शिवनेरीवर बाळ जन्मला स्वराज्याचा राणा..
जिजाऊंचे मार्गदर्शन अन् कोंडदेवांचे शिक्षण..
उभा राहीला बाल मराठा करण्या शत्रूंचे भक्षण..

मित्रांसवे त्या शंभूमंदिरी घेतली शपथ स्वराज्याची..
हिंदूत्वाच्या वीर लढ्याची अन् प्रेमळ सुंदर सुराज्याची..
जिंकूनी प्रथम तोरणागड जगद्जाहीर केली वीरता..
सतराव्या वर्षीच पराक्रम दाविला वार्याने पसरली वार्ता..

आदिलशहाने होऊनी अस्वस्थ नेमिला अफजलखान..
प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याने उभारला शामियाना छान..
बलाढ्य सैन्यबळ आणोनी म्हणे शिवबाला भेटण्यास आला..
मिठी मारोनी शिवाजीला त्याने अक्षम्य दगा केला..

मारीला खंजीर पाठीवर काढण्या मर्द मराठी रक्त..
परि राजाच्या अंगी होते चिलखत ते सशक्त..
मारोनी वाघनखे राजांनी खानाला गनिमी काव्याने मारले..
स्वराज्यावरचे बलाढ्य संकट शिवबाने शिताफीने तारले..

चवताळला सिद्धी पाहोनी सिवाचा पराक्रमी बलाढ्य विजय..
सेना घेऊनी निघाला पन्हाळ्यास करण्या स्वराज्याचा पराजय..
वेढा घालोनी पन्हाळ्याला सिद्धीने राजांना अस्वस्थ केले..
चोरदरवाज्यातुनी निसटोनी राजे विशाळगड दिशेने गेले..

बातमी समजताच सिद्धीला त्याने राजांचा पाठलाग केला..
घोडखिंड पावन करण्या बाजीप्रभू देशपांडे गेला..
लढिला बाजी सिद्धीसैन्याशी बाळगोनी स्वराज्याचा ध्यास..
राजे विशाळगडी पोचले समजताच घेतला अखेरचा श्वास..

औरंगजेबाने वैतागोनी नेमिला शाहीस्तेखान नामक मानव..
उध्वस्त करोनी स्वराज्य लाल महाली शिरला हा दानव..
अफाट सैन्यबळ घेवोनी आला करण्या शिवाची फजिती..
परि मराठी पराक्रमांची त्याला नव्हती प्रचिती..

चोरगुहेतुनी शिवाजी शिरले पुण्याच्या लालमहाली..
तीक्ष्ण नजरेने खानास गाठले लेवोनी तलवार ढाली..
खान पळता खिडकीमधोनी राजांनी चालविली तलवार..
तीन बोटे छाटिता खान स्वराज्यातूनी झाला फरार..

पुरंदरावर मिर्जाराजे आले बनोनी संकट..
वीर मावळे मुरारबाजी लढा देती बळकट..
दोहातांनी लढोनी त्यांना वीरमरण आले..
मराठ्याचे ते रक्त तळपते मराठी मातीत ल्याले..

अस्वस्थ होऊनी शिवराजांनी केला पुरंदरचा तह..
तेवीस किल्ले तहात हरले माहुली कोंढाण्यासह..
तहासोबतच मोगलांनी ठेवली दिल्लीभेटीची अट..
स्वराज्यासाठी ती होती परिस्थिती क्लिष्ट बिकट..

राजे निघाले शंभूराजांसह दिल्लीभेट दौर्याला..
वेगाने ते दिल्ली गाठले हुलकावत त्या वार्याला..
परि महाली शिवरायांचा झाला असह्य अपमान..
बादशहाने तोलले मराठा राजाला गुलाम चाकरांसमान..

चवताळोनी त्या शिवरायाने दिले चोख प्रत्युत्तर..
मराठी राज्य वाकणार नाही मोडले तरी बेहत्तर..
अपमानित झाला औरंगजेब चालवली त्याने पावले..
शिवराजे अन् शंभूराजांना त्याने नजरकैदेत ठेवले..

बादशहाने नकळत केला स्वराज्यावरती घाव..
राजांनीही विचार करोनी खेळला अनोखा डाव..
आजार्याचे नाटक करोनी फळपेटारे वाटले..
मोगलांचे ते दुर्लक्ष होता पेटार्यातुनी निसटले..

बादशहाला खबर कळताच हलले मोगल साम्राज्य..
संत योगी बनोनी राजांनी गाठले अपुले स्वराज्य..
हर्षित झाले राज्य अवघे राजा सुखरूप आला..
औरंगजेबाच्या मोगल राज्याचा दाणून पराभव झाला..

किल्ले कोंढाणा पाहताच तो जिजाऊंच्या मनी भरला..
कोंढाण्याच्या मोहिमेसाठी नरवीर तानाजी पुढे सरला..
आधी लगीन कोंढाण्याचे अन् मंग माझ्या रायबाचे..
उद्गारोनी गड जिंकाया निघाले बालमित्र त्या शिवबाचे..

घोरपडीच्या सहाय्याने मावळे किल्ल्यावर त्या चढले..
किल्लेदार उदयभानाशी तानाजी प्रचंड जिद्दीने लढले..
गड जिंकला परि नरवीर तानाजी मृत्यु पावला..
सिंहासारखा गड आला पण स्वराज्याचा सिंह हरवला..

आता वेळ आली होती सत्तधिश होण्याची..
स्वराज्याची पुर्णतोपरी जबाबदारी घेण्याची..
स्वराज्याची होणार होती अफाट अजिंक्य उन्नती..
शिवाजीराजा होणार होता राष्ट्रराणा छत्रपती..

क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधिश्वर..
महाराजाधिराज रयतेचे ईश्वर..
जाणता राजा तो करी स्वराज्यावर राज..
प्रौढप्रतापपुरंदर छत्रपती शिवाजी महाराज..

सोळाशे चौर्याहत्तर साली राजे छत्रपती झाले..
ढोलताशंचे विजयी सुर पार गगनात ल्याले..
मराठवाडा कोकण विदर्भ सह्याद्री मावळ आणिक गोवा..
मोगल निजामांवर भारी पडला मराठी मातीचा छावा..

बघता बघता दिवस सरले छत्रपती अस्वस्थ झाले..
प्रकृतीच्या उतरत्या वयात त्यांना आजारपण आले..
चार एप्रिल सोळाशे ऐंशी सुर्य गगनी भिडला..
स्वराज्याच्या पराक्रमी वाघाने देह अपुला सोडला..

मौन झाले स्वराज्य अवघे अश्रू ते ओघळले..
मराठ्यांचे छत्रपती अचानक सुर्यासवे मावळले..
अंत्यसंस्कार झाले रायगडावरी समाधी अनोखी उभारली..
राजांच्या अचानक मृत्युमुळे धरती अवघी थरारली..

परि येथेचि संपला नाही मराठी वीरांचा इतिहास..
भोसले, पेशवे अन् क्रांतीकारी लढले लेवोनी स्वराज्याचा ध्यास..
संभाजी राजाराम शाहू बाजीराव नानासाहेब टिळक सावंत..
सावरकर ताराबाई फुले आंबेडकर होळकर अन् बळवंत..

घडवला यांनी मराठी स्वाभिमान केले स्वराज्याचे जतन..
मराठी अस्मिता राखली मराठी राज्य ठेविले नुतन..
घडवला यांनी महाराष्ट्र अपुला घडवला यांनीच इतिहास..
आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनी असतो यांचाच वास..

आजही शिवराय महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात वसले आहेत..
आजही शिवराय महाराष्ट्राच्या दर्याखोर्यात बसले आहेत..
महाराष्ट्राचा छत्रपती तो शिवाजी माझा राझा..
दरीदरीतुनी नाद धुंदला महाराष्ट्र हा माझा....

जय भवानी जय शिवाजी...

इतिहास

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Oct 2016 - 3:36 pm | पैसा

नव्या काळातला पोवाडा

Bhagyashri satish vasane's picture

21 Oct 2016 - 3:36 pm | Bhagyashri sati...

झक्कास!

हृषीकेश पालोदकर's picture

21 Oct 2016 - 3:39 pm | हृषीकेश पालोदकर

खूप मस्त !
जीवनक्रम खूप सुंदर मांडलाय.

पद्मावति's picture

21 Oct 2016 - 3:47 pm | पद्मावति

सुरेख!

सन्दीप's picture

21 Oct 2016 - 3:56 pm | सन्दीप

पोवाडा झक्कास!.

सोहम कामत's picture

21 Oct 2016 - 6:46 pm | सोहम कामत

काव्यप्रेमी वाचकांना आणि comment मार्फत प्रतिक्रिया देणार्या वाचकांना धन्यवाद...

अत्रुप्त आत्मा's picture

21 Oct 2016 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा

छान.. स्फूर्तिदायक.

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2016 - 10:33 pm | टवाळ कार्टा

भन्नाट

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2016 - 10:33 pm | टवाळ कार्टा

भन्नाट

जावई's picture

23 Oct 2016 - 9:38 am | जावई

आवडलं.

खटपट्या's picture

23 Oct 2016 - 12:02 pm | खटपट्या

छान

विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:42 pm | विवेकपटाईत

पोवाडा आवडला.

विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:42 pm | विवेकपटाईत

पोवाडा आवडला.

विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:42 pm | विवेकपटाईत

पोवाडा आवडला.