शिंगूळबाबूंची बंबुळभेट

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
23 Sep 2016 - 11:34 pm

"बंबुळ्याला जायची यीश्टी कदी हाय वं?" वायरीची पिशवी हातात घीऊन मी बसलू हुतू. ऊन नुसतं कावत हुतं. येक जीपडं रस्त्यावर नव्हतं. पिपरणीखाली दोन करडं चरत हुती. तिकडंच बघत हुतू.
"आत्ताच गीली की तुज्या म्होरनं" भजी तळत त्या आशोक सरापानं सांगितलं. म्हजी ह्यो हाटीलवाला दिसतू आशोक सरापासारखा म्हणूनशान.
"आता दिड वाजोस्तोर येश्टी न्हाय रय" आशोक सरापानं यकदम येडझव्यासारखं माज्याकडं बघितलं. मी आपला पिपरणीच्या करडाकडं बघत ऱ्हायलू. तेज्यायचा दाणा येश्टी आपल्या म्होरनं गीली तरी दिसली न्हायी.

पाचूट पेटल्यावनी ऊन पोळत हुतं. लय भजी खाव वाटत हुतं. पण न्हायतं खाल्लं. च्या बी लय पीव वाटत हुता. पण न्हाय पिला. खिशातला खुर्दा खुळखुळ वाजवून यीश्टीचं साडेबारा रुपय पुना यकदा मुजून घेतलं. मग टकुरं खाजवत पुना येकदा ती करडं बघत बसलू.

लालाची टमटम पानपट्टीवर आली तसा पळतंच गीलू. मुकळीच हुती. वायरीची पिशवी घीऊन शिटावर बसलू. बंबुळं येस्तोर गाडी आशी मुकळीच ऱ्हाव दी रं देवा. चांगलं हातपाय पसरुन बसलू. मनलू, "आडशिंग्याचं किती घेणार?"
लाला म्हनला, "आरं गाडी भिकुर्णीला चाललीय"
तुमाला सांगतू फाफलत खाली उतारलू.

लाला भुरकण मोकळाच निघून गेला. पानपट्टीवर चिंगम घ्यावा म्हनला तर भरण्या मोकळ्याच. शीवटी आठाण्याची लाल गुळी तोंडात टाकून उभारलू. तसं हाटेलापसली पीटी पुढं दिसली. बरं झालं लालाला भिकुर्णीला जायचं हुतं. न्हायतर पीटी हितंच ऱ्हायली आसती. पळतच गीलू.

आशोक सराप म्हनला, "आमी काय ठिवत नसतू बरका. पीटी भंगारवाल्याला इकून टाकली आसती."
तुमाला सांगतू हाताला रग लागोस्तोर पीटी उचलून गावात आणली हुती. आमच्या आयनं पार कापडं धोपडं त्यात ठिवली हुती. आन ह्यो आयघाला आशोक सराप आमची पीटी इकणार. बापाचं गठुडं हाय काय?

मग पीटीवरंच बसलू. पाच म्हंता पन्नास रस्त्यावर सायकलसुदीक नव्हती. कुणाला तरी दगडं हाणत शांती तीवढी येताना दिसली. शांती लय यीडी. यकदा तिनं हाणल्याला दगुड माज्या नडगीवर बसला हुता. तवापस्नं आपुन तिच्या नादी लागत न्हाय.
मला म्हणली, "पोरा, गावाला चाल्ला कारं?"
तिच्यायला, यीडी यीडी म्हणता ही तर श्यान्यासारखं बुलती की.
म्या भेत भेतंच म्हणलं, " व्हय, व्हय"
मग दोन भजं घीऊन शांती निघून गीली. आशोक सराप म्हनला, "आरं तुज्या बायकूनं दोन भजं न्हेलं. पैसं कोण देणार?"

तुमाला सांगतू मोटा झाल्यावर ह्या आशोक सरापाचा खूनंच करणार हाय.

पार सकाळधरनं हित यीऊन बसलूय. फकस्त येकंच यीश्टी यीऊन गीलीय. पण ह्यो आशोक सराप सगळ्या गावाला सांगणार, "चार येश्ट्या यीऊन गेल्या, चार जिबडी गीली, पण पोरगं कशातंच बसलं न्हायी"
ह्यो आशोक सराप लय पेटव्या माणूस.

आमच्या वस्तीत तुमाला सांगतू सगळी मला 'दादा' म्हणत्यात. पार च्या पावडर आणायची आसली तरी "दादा आणंल, दादाला हिशेब कळतू" हितनं सुरवात आसती. मळ्यात गहू पेरायचं की मका? "दादा सांगल तसं".
आता मला कणसं आवडत्यात म्हणल्यावर मी मकाच म्हणणार. मग आर्धा गुंठा मका पेरुन सगळा गहूच टाकणार आमचा बाप. मी म्हणतो इचारायचंच कशाला. येकुलता येक हाय म्हणून लय फाजील लाड करुन ठेवल्यात घरच्यांनी. सपनी माजी बारकी बहीण मी येखादा मास्तर आसल्यासारखा बुलती माज्यासंग. तुमाला सांगतो लय तरास हाय.

मला वाटतंय दिडची यीश्टीपण आत्ताच गीली आसणार. रस्त्यावर नुसता धुरुळा उठलाय बघा. आशोक सराप मावा खाऊन चूळ भरतूय बघा. आयघालीचा यीश्टी गेल्यावरंच मला सांगणार. तवस्तर नुसता मुकाट्या बसणार.

मी उठलू. जगातलं पाणी पिलू. आशोक सराप जसं काय मी तिथं न्हायीच आश्या इचारात भज्याचं पीठ कालवत हुता. ह्येजं भजं खातं तरी कोण? येक गिऱ्हाईक दिसलं न्हायी तुमाला सांगतू.

आजपण बंबुळ्याला जायचं रहित हुतंय का काय वाटाय लागलं. आता ही पीटी पुना घरी घीऊन जायचं जिवावर आलतं. डोक्यात नुसता कालवा झाला तुमाला सांगतू. बसायचं तरी किती येळ कळंना. पिपरणीखाली आता करडंबी नव्हती.

आशोक सराप म्हणला, "बग रय, तुजी आय आली बग"
म्या वढ्याकडं बघितलं. पुलावरनं म्हानंदीचा वला फोक मुडून आय माज्याकडं चालत येताना दिसली. तुमाला सांगतू बाप मला कधीच मारत न्हाय. पण आयनं लय येळा फोडलंय. येक दोनदा तर हातातलं टिकुरनं पण तुटलं हुतं तिज्या.

मी उठलू. चौकात डिरीच्या पायऱ्यावर जाऊन ऊभारलू. आयनंपण लगीच हेरलं. ती डिरीकडंच यायला लागली. तसा लपत लपत मी पानपट्टीम्हागं आलू. आन तिथनंच घराकडं पळत सुटलू.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

24 Sep 2016 - 7:38 am | तुषार काळभोर

उत्सुकता लागून राहिली आहे.

(अन ते बादलीचं फुडं काय झालं ते पन अजून नाय कळलं!)

रातराणी's picture

24 Sep 2016 - 7:52 am | रातराणी

आवडलं. पुभाप्र!

यशोधरा's picture

24 Sep 2016 - 8:55 am | यशोधरा

वाचतेय.

प्राची अश्विनी's picture

24 Sep 2016 - 10:44 am | प्राची अश्विनी

पुभाप्र. लवकर टाका . :)

लोथार मथायस's picture

24 Sep 2016 - 1:07 pm | लोथार मथायस

वाचतोय

हेहेहेहे, वातावरणनिर्मीती झाली आता कथा येऊ द्या.

नाखु's picture

26 Sep 2016 - 2:13 pm | नाखु

सोडून हे काय नवीन? जे बी हाय मस्त हाये

झाडाखालचा नाखु

आयला ही टायटल कुठन आणता कुणास ठाउक.
मस्त हाय. पुभाप्र.
(ते बादली पुर्ण करा की)

हाहा, मस्त ! कुठली भाषा आहे हि ? येऊ द्या लवकर पुढला भाग.

काय डोस्कं आहे सुपीक. काय काय लिहतंय!
पुभाप्र