भुंकला

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Aug 2016 - 11:09 pm

गेल्या वर्षी याच दिवसांत लिहीलेलं हे विडंबन. केवळ असावं म्हणून प्रकाशित करतोय. (चांगलं नाही हे माहित असूनसुद्धा).

इशारा : हे लिखाण 'छी बाबा' प्रकारात मोडणारे असून न वाचलेलेच बरे.

..................................................................

शेकड्यातील एकेकास...

मी एक ढेल्या नावाचा कुत्रा आहे. माझ्याकडे उदाहरणार्थ एक चांगली लांबसडक शेपटी आहे. बाकी सांगण्यासारखं विशेष असं काही नाही.
आपलं नाक सारख गळतं, आणि पाठीला मी सारखा पंज्याने खाजवतो. यापलिकडे स्वतःचं असं काही वैयक्तिक मी सांगणार नाही, कारण ते तर माझ्या पट्ट्यालासुद्धा ठाऊक आहे.

मांजर हा प्राणी आपल्याला आवडत नाही. जुन्या मालकाच्या घरचा त्यांचा नाटकी रुबाब मला चांगलाच माहीती आहे. रात्री जागरण करुन मी घरावर लक्ष ठेवायचो. आणि ही मालकिनीच्या पांघरुनात ढाराढुर झोपायची. हिला खायला मस्त मस्त साय आणि मला शिळ्या भाकरींचे तुकडे. माजुरडेपणाचा कळस होती ही मांजरीण. एकदा दुध ती पिली आणि रट्टे मला खावे लागले. डोक्यात तिडीक गेली. गॅलरीत झोपल्यावर अंगावर उड्या मारुन झोपमोड करण्यापर्यंत हिची मजल गेली. मग मी गेटच्या बाहेर झोपायला सुरु केलं.
एका रात्री शेपटाचा पिसारा फुलवुन माझ्याकडे लाडेलाडे आली. मग मी तीला खाऊनच टाकली. तेव्हापासुन मालकानं मला बाहेर हाकललयं.

मालकानं भरपूर बदडलं. पाठीवर ताज्या आठवणी घेऊन मी ईकडे तिकडे फिरत होतो. ग्रामपंचायतीच्या पायऱ्यावर पक्या नुकतचं कुणीतरी गेल्यासारख तोंड करुन बसला होता. मी त्याची गाठ घ्यायला निघालो. वाटेत एक खांब दिसला. तिथचं तंगडी वर करत त्याला म्हणालो, का रे, असा का बसलाय? तो म्हणाला, ढेल्या, ईकडं कुठं?. मी म्हणालो, घरातनं पळुन आलोय. तो म्हणाला, चांगलयं.मग मी त्याच्याजवळ जाऊन बसलो.
तो म्हणाला, तुझ्यासारख्या घरंदाज कुत्र्यानं असं पळालेलं बरं नाही.
मी म्हणलो, असतं एकेकाचं नशीब.
तो म्हणाला, आता काय?
मी म्हणालो, कुठे काय?
पक्या सारखा माझ्या पाठीकडं बघत होता. शेवटी म्हणाला, तू पण मांजार खाल्लं वाटतं.
हे थोरचं आहे. मग आमची दोस्ती झाली.

आम्ही भरपूर गप्पा मारल्या. विषय निघाला म्हणुन मी त्याला विचारलं, तुझ्या आयुष्याचं ध्येय वगैरे काय ठरवलं आहेस काय?
पंज्यावर तोंड ठेऊन डोळे बारीक करत पक्या म्हणाला, ध्येय म्हणजे आपल्या जमातीची गुलामगिरीतून मुक्तता करणे. ही सगळी माणसं मारुन एक भलमोठं जंगल उभं करणे. त्या दिवसाची मी वाट पाहतोय.
शेपटी वगैरे हलवून मी एक अजरामर जांभई दिली. मग गप बसून राहिलो.
त्यानं मला माझं ध्येय विचारलं, पण मी सांगितलं नाही. म्हणालो, अजूनतरी ठरवलं नाही.
आता माझं ध्येय म्हणजे गावात जागोजागी भलामोठे खांब ऊभे करणे. म्हणजे आल्यागेल्यांना तंगडी वर करायला बरं पडेल. पण लोकं ऊगाच टिंगल उडवतील म्हणुन मी लपवुन ठेवलयं.

भाद्रपद आपल्याला आवडतो. माझ्या सगळ्या दोस्तांनाही आवडतो. जनरीतचं आहे ती हे आपल्याला मंजुर. एकीच्या मागे चार चार जणांनी धावावं हेही आपल्याला कबुल. पण त्यासाठी मारामाऱ्या करनं हे आपल्याला खपत नाही. त्यापेक्षा लांबच्या कोपऱ्यात ताटकळत ऊभ राहणं कधीही परवडलं.
हे एक भलतचं

पुढे मी एका गँगमध्येही सामील झालो. ही एक अंडरवर्ल्ड गँग होती. मी नकळत त्याच्यात ढकलला गेलो. खून मारामाऱ्या हे यांचे रोजचे काम. पैदाईशी गुन्हेगार कोई नही होता. हालात उन्हे मजबूर करती है.
एके दिवशी आम्ही सगळे कुसळात फिल्डींग लावुन बसलो होतो. बराच वेळ.
एक ससुलं फिरत फिरत तिथं आलं. गब्र्या म्हंजे आमचा म्होरक्या. त्यानं सुळकण झेपावत सश्याच्या म्होरं ऊडी हाणली. ससुलं भेदरुन लांब आतवर काट्याकुट्यात शिरुन बसलं. नवा गडी म्हणुन त्येला बाहेर काढायची जबाबदारी माझ्यावरचं आली. मी आपला जोरजोरात भुंकत ईकडून तिकडं ऊड्या हाणायला लागलो. पण बेनं दाद दिना. आखरी उपाय म्हणुन समद्यांनी मला काट्याकुट्यात जायला भाग पाडलं. कितीबी आंग चोरलं तरी दहाबारा काटं घुसलचं. पण ससुल्याला घेऊनचं बाहेर आलो. समद्यांनी भुंकून माझा जयजयकार वगैरे केला.
झाडाखाली सगळी गँग ससुल्यावर तुटून पडली. मला कोणी जवळपण येऊ दिलं नाही. तेवढ्यात गब्र्यानं शेपटाचा नुसता एक तुकडा माझ्याकडं फेकला. लयचं खवटं होतं ते प्रकरणं. चार दिवस तोंडातनं चव गेली नाही. तेव्हापासुन मी ती गँग पण सोडुन दिली.
त्यांनी मला बऱ्याच धमक्या वगैरे दिल्या. पण मी म्हणलं, हाड!

पक्यानं आणि मी नंतर उकिरडे फुंकायला सुरु केलं.
ऊकिरडा.
कचऱ्याचा एक भलामोठा ढिगारा. सभोवताली कायम घोंगावणाऱ्या माश्या. माझ्या नाकावर गुदगुल्या करत बसताहेत. आणि मी ढिगारेच्या ढिगारे ऊकरत आहे.
एका ढिगाऱ्यात बारीकसं बीळ. खोल खोल. आतुन दोन ऊंदीर थेट माझ्याकडं पाहत आहेत. काय पाहत आहेत? फार फार ढबरे. मध्येच एखादं कोंबडीचं पिल्लू दाणं ईस्काटत ईकडं तिकडं फिरतयं. मी त्याच्याकडे कान टवकारुन बघतो. या पिलाने माझी भुक चाळवलीय खरी. पण दाणं टिपत असतानाच ते मागनं घाण सोडत चाललयं. असह्य दुर्गंधी. ही दुर्गंधी नाकावाटे शिरत माझ्या डोक्यात बाजार मांडत चाललीय. या बाजारात मी पिसाळुन जाईन. कीप मी अवे फ्रॉम धीस् टेरीफीक् ओडर अँड स्मेल अॉफ शीट्. माझ्यावर दया कर. हा ऊकिरडा आपली किव करणार नाही. हा हायड्रोजन सल्फाईडसारखा आपल्या पोटात दुर्गंधी घेऊन बसलाय. या अफाट घाणीत गुदमरुन जायला सीमा नाही. इथे तर आमचा रोजचाच खेळ.

भाद्रपद आला तसा मी सुशीकडं गेलो. गब्र्या आणि निल्या तिच्यावर पाळत ठेऊन होते. मी लांबूनंच अंदाज घेतला आणि भिताडाच्या कडेला अंग चोरुन उभा राहिलो.
खूप वेळ कसलीच हालचाल नाही. निल्या उठून सुशीकडं यायला लागला तसं गब्र्यानं दात विचकून त्याला आव्हान दिलं. निल्या जर्रा कुठं बिचकला आणि गब्र्यानं त्याच्यावर झेप घेतली. निल्याचा ताणा काढत मग गब्र्या चौकाचौकात पळत सुटला. मी आणि सुशी ईकडे सुरु झालो.
तिला म्हणलं, लेट्स सिलेब्रेट भाद्रपद!

रात्री गब्र्या माझ्याकडं आला. रागानं लालबुंद होऊन गुरकवायला लागला. मी म्हणालो, हे बघ, नुसती बॉडी असुन ऊपयोग नाही. थोडपारं डोकं पण लागतचं. तसा गब्र्या अजूनच खवळला. साल्यानं दमछाक होईस्तोर माझा पाठलाग केला.
हे खुप झालं.

रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्ष्मात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतोय. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात. त्यांचे प्रतिध्वनी गावशिवारात घुमत राहतात. रात्रभर.
वडाच्या बुंध्याशी मी पुन्हा सुक्ष्मात निजतो.

विडंबन

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2016 - 2:24 am | बोका-ए-आझम

याचं केमिस्ट्रीचं ज्ञान तर थोरच आहे!

शाम भागवत's picture

29 Aug 2016 - 3:03 pm | शाम भागवत

आणि माझे गणित चांगले आहे अस सगळीकडे सांगत असतो.
भाषा विषय फारच चांगला आहे हे तर दिसतच आहे.
नक्कीच हे बेणं बोर्डात आलेले असावे.
;-)))

क्षमस्व's picture

29 Aug 2016 - 6:06 am | क्षमस्व

कडक।

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Aug 2016 - 6:24 am | कैलासवासी सोन्याबापु

"पंजावर तोंड ठेऊन...." वगैरे म्हणजे जव्हेरगंजभाऊ, लैच भारी, तुमच्या निरीक्षणशक्तीला आमचा मानाचा मुजरा करतो, जबरी observation आहे तुमचं

शाम भागवत's picture

29 Aug 2016 - 3:05 pm | शाम भागवत

वाचताना त्या पोझमधलं कुत्र अगदी डोळ्या समोर आले.

निखिल निरगुडे's picture

29 Aug 2016 - 7:00 am | निखिल निरगुडे

भारीच!

काहीच सोडेनात हे जव्हेरभाऊ!
जबरदस्त कथा परत परत!

नाखु's picture

29 Aug 2016 - 8:46 am | नाखु

श्वान पुराण आवडले....

श्वान पुच्छ गुण जंगलातला नाखु

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 9:29 am | महासंग्राम

अथ श्वान पुराणो भारीच कि ...

नूतन सावंत's picture

29 Aug 2016 - 9:53 am | नूतन सावंत

आवडली बरं का जव्हेरगंजभाऊ.जबरदस्त निरीक्षण आहे.

राजाभाउ's picture

29 Aug 2016 - 12:49 pm | राजाभाउ

उदाहरणार्थ हे मस्तच जमलय वगैरे.

"हा ऊकिरडा आपली किव करणार नाही. हा हायड्रोजन सल्फाईडसारखा आपल्या पोटात दुर्गंधी घेऊन बसलाय. या अफाट घाणीत गुदमरुन जायला सीमा नाही" -- हे म्हणजे थोरच

अनुप ढेरे's picture

29 Aug 2016 - 4:34 pm | अनुप ढेरे

मस्तं जमलिये ही गोष्ट पण!

मी एक अजरामर जांभई दिली.

अजरामर जांभई खतरनाक कंप्सेप्ट आहे.

हो, मला पण जब्बरदस्त आवडलीय ही कन्सेप्ट.
हायला हे जव्हेरभाव असल्या उपमा कुठल्या उडप्याकडून आणतेत कुणास ठाऊक. ;)

तुषार काळभोर's picture

29 Aug 2016 - 10:22 pm | तुषार काळभोर

जव्हेरभौंच्या कथेला "उपमा" नाही.

समीरसूर's picture

29 Aug 2016 - 4:59 pm | समीरसूर

हे पण बेफाट. जव्हेरभाऊ नक्कीच सुपर कॉम्पुटर असले पाहिजेत

चैतू's picture

29 Aug 2016 - 8:05 pm | चैतू

आवडली गोष्ट.

चित्रगुप्त's picture

29 Aug 2016 - 9:50 pm | चित्रगुप्त

उदाहरणार्थ थोरच वगैरे.
ससुलं मारण्याच्या प्रसंगाच्या वर्णनात तेवढी गावठी भाषा (.... समद्यांनी मला काट्याकुट्यात ... कितीबी आंग चोरलं तरी दहाबारा काटं घुसलचं...) इतरत्र शहरी (कुठे कुठे आंग्लाळलेली सुद्धा) असे का, हे मात्र समजले नाही. मात्र एकंदरित वाचनानुभव उत्कट.

काट्या कुपाट्यातला जव्हेरभौ म्हणजे थोरच वगैरे.

आनंद कांबीकर's picture

29 Aug 2016 - 11:11 pm | आनंद कांबीकर

जव्हेरभौ

बरेच महिने झाले तुमची कथा वाचून!

गामा पैलवान's picture

30 Aug 2016 - 12:14 am | गामा पैलवान

ष्टोरी कडक हायेच. बाकी काही म्हणा पण आपल्याला ढेल्या हे नाव जाम आवडलं. पोरगं टीव्ही बघंत बसलंवतं. म्हंटलं काय ढेल्यावाणी बसून्हायेस. तर बायकोलाही शब्द आवडला. आता बोला !

-गा.पै.

खटपट्या's picture

30 Aug 2016 - 1:10 am | खटपट्या

ज ब र द स्त ह

निओ's picture

30 Aug 2016 - 4:31 pm | निओ

जव्हेरभाऊ ..मस्तच लिहिलं आहे.

रातराणी's picture

31 Aug 2016 - 7:54 am | रातराणी

हा हा भारीये!

शित्रेउमेश's picture

31 Aug 2016 - 8:47 am | शित्रेउमेश

असली भन्नाट कथा दुसर कोणी लिहुच शकत नाही...

जव्हेरगंज भाऊ _/\_

भाग्यश्री कुलकर्णी's picture

31 Aug 2016 - 8:57 am | भाग्यश्री कुलकर्णी

भारीच.

vikrammadhav's picture

31 Aug 2016 - 9:10 am | vikrammadhav

हा हा हा !!!

मस्तच जमलीय वगैरे .......

बरखा's picture

1 Sep 2016 - 4:54 pm | बरखा

भारी आहे कथा. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभ रहात होत.मस्तच....

मृत्युन्जय's picture

1 Sep 2016 - 5:12 pm | मृत्युन्जय

भन्नाट भुंकणं आहे :). आम्ही उगाचच फ्यान नाही जव्हेरभौंचे

स्वीट टॉकर's picture

2 Sep 2016 - 2:58 pm | स्वीट टॉकर

नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलं आहेत.

पैसा's picture

2 Sep 2016 - 10:38 pm | पैसा

:)