वस्त्रोद्योग-१ : कापसापासून सुतापर्यंत

प्रदीप साळुंखे's picture
प्रदीप साळुंखे in तंत्रजगत
17 Jun 2016 - 1:02 am

नमस्कार,

आपणांस माहित आहेच कि अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत.
तर धाग्याच्या शिर्षकावरून आपणांस अंदाज आला असेलच कि या तीन मुलभूत गरजांपैकि मी कोणत्या गरजेबाबत लिहणार आहे ते.
तर ती महत्वाची गरज म्हणजे "वस्त्र".आदिम काळी मानवप्राणी निर्वस्त्रच फिरायचा,मग कसे कोण जाणे काळानुरूप मेंदू प्रगत होत गेला आणि मानवी मनामध्ये भावनांचा उदय झाला.त्यापैकिच एक भावना म्हणजे "लज्जा".
आणि त्यामुळेच शरीराचा काही भाग झाकणे हे गरजेचे होऊन गेले,तसेच ऊन,वारा,पाऊस यापासून शरीराचे रक्षण व्हावे हेही महत्वाचे.
पण सद्य स्थितीला आपण "लज्जा" या एका कारणास्तवच कपडे वापरतो असेच म्हणावे लागेल,आणि शरीराचे रक्षण व्हावे हे दुय्यम कारण आहे असे म्हणूया.
तर फार अवांतर न करता थेट विषयालाच स्पर्श करूयात.
[काही इंग्लिश शब्दांना पर्यायी मराठी शब्द नसल्याने किंवा माझ्या अज्ञानामुळे ते इंग्लिश शब्द जसेच्या तसे वापरले आहेत]

कापूस ते धागा असा प्रवास आपण पाहूयात,तर या पूर्ण प्रक्रियेला ढोबळमानाने "स्पिनिंग" असे म्हणतात.आणि जिथे ही सर्व प्रोसेस होते त्याला 'स्पिनिंग मिल' असे म्हणतात,मराठीमध्ये 'सूतगिरिणी'.काही सप्लीमेंटरी प्रोसेसेस सूतगिरीणीच्या बाहेरही होतात,त्याबद्दल सविस्तर आपण पुढे पाहूयात.

कापूस - लांबीनुसार(staple length) कापसाचे प्रामुख्याने चार प्रकार असतात,
(आता ही staple length म्हणजे कापसाच्या बोंडातून हळूच काही धागे(threads) काढायचे आणि काही सँपल्स घ्यायची,त्या सर्वांची लांबी मोजायची आणि मग सरासरी लांबी काढायची, सरासरी लांबी अशासाठी कि सर्वच threads हे एकाच लांबीचे नसतात म्हणून.
ही सरासरी लांबी म्हणजेच 'staple length'.)
● Extra Long - staple length ३७ mm च्या वर असते, हा उच्च दर्जाचा कापूस असतो आणि गंमत म्हणजे हा प्रकार भारतात पिकण्यासाठी अनुकूल वातावरण नाही=))
● Long - ३०- ३७ mm
हाही दर्जेदार प्रकार आहे,आणि यापासून बनणारे कापडही तितकेच दर्जेदार असते,हा प्रकार अमेरिका,इजिप्तमध्ये आढळतो.
● Medium - २५- ३० mm.
बर-यापैंकी चांगला कापूस.
● Short - २५ mm पेक्षा कमी staple length.
हलक्या दर्जाचा कापूस, आणि गंमत म्हणजे हा प्रकार भारतामध्ये उगवतो=))

चला आता ढोबळमानाने पूर्ण प्रोसेस पाहूया,

१) हार्वेस्टिंग(harvesting)/काढणी/कापणी
^

harvest म्हणजे कापणे.पण भारतामध्ये ही प्रक्रिया साधारणतः हातानेच होते,कापसाचे बोंड झाडापासून अलग करणे म्हणजेच हार्वेस्टिंग होय.
/
विकसित देशांत ही सर्रास प्रक्रिया मशिनद्वारेच होते.

२) जिनिंग(Ginning)
^
या प्रक्रियेमध्ये कापसाच्या बिया कापसापासून अलग करतात व निवळ्ळ कापूस एका बाजूला काढला जातो,मोस्टली ही प्रक्रिया मशिनद्वारेच होते,आता जिनिंगमध्येही काही प्रकार आहेत,roller gin, saw gin, Macarthy gin etc. याच्या खोलात न शिरलेलेच बरे.
जिथे कापूस पिकतो तिथेच जिंनिंगचे कारखाने शक्यतो असतात.
विदर्भ,मराठवाड्यात जिनिंगचे कारखाने आहेत.

३) प्रेसिंग आणि बेलिंग(press and bale)
/
/
bale म्हणजे कापसाची गासडी(गठ्ठा). कापूस वजनाने अतिशय हलका असल्याने त्याची एकसंध बांधणी करणे आवश्यक आहे,त्यासाठी मशिनद्वारे कापसावर जोरदार दाब दिला जातो आणि साधारणतः १७०-१८० किलो वजनाची एक गासडी तयार केली जाते.

४) ब्लो रूम (Blow Room)

blow म्हणचे जोरदार हिसका देणे, आणि तसेच काहीसे कापसासोबतही इथे होते.
या ब्लो रूम मध्ये कापसाच्या गासड्या(bale)
आणल्या जातात.
ब्लो रूम मध्ये पहिली महत्वाची मोठी मशिन म्हणजे "Bale Opener"

● बेल ओपनर
/
इथे कापसाच्या bales फोडून त्यातील कापूस ठराविक पद्धतीने horizontally पसरला जातो,जेणेकरून मशिनचे तोंड त्यावरून फिरू शकेल.या क्रियेमध्ये ओपनिंग होते म्हणजे प्रेसिंगमध्ये एकसंध झालेला कापूस उघडला(opening) जातो, तसेच बारीक दगड,माती,आणि इतर बाह्य पदार्थ जसे कि कापसाच्या झाडाचे देट,मेटल पार्ट्स,असे बाह्य घटक जे कि हार्वेस्टिंग, जिनिंग,प्रेसिंग मध्ये अनावधानाने मिसळलेले असतात ते घटक अलग केले जातात आणि शुद्ध कापूस पुढच्या मशिनकडे ढकलला जातो.
आता हा शुद्ध कापूस आणि बाह्य भेसळीचे घटक वाहून नेण्यासाठी "Ducts" वापरले जातात.
duct म्हणचे एक प्रकारच्या मोठ्या पाईप्सच असतात ज्यामध्ये काँप्रेसर बसवलेले असतात त्यामुळे मटेरिअल खेचण्यास आणि पुढे पाठवण्यास मदत होते.बाह्य घटक एकीकडे आणि शुद्ध कापूस पुढच्या मशिनकडे जातो.

● युनिक्लीन(uniclean)
/
या मशिनमध्ये सुद्धा क्लिनिंग(शुद्धीकरण) प्रक्रिया होते.आधीच्या प्रक्रियेमध्ये राहून गेलेले बाह्य घटक इथे अलग होतात.

● युनिमिक्स(unimix)
/
इथे कापूस एकसंध मिसळला जातो आणि पुढच्या कार्डिंग प्रक्रियेसाठी पाईप्समधून(ducts) अॅटोमॅटिक ढकलला जातो

५) कार्डिंग(carding)
/
या प्रक्रियेमध्ये ब्लो रूम मधून थोडाफार शुद्ध होऊन आलेला कापूस पाईप्सद्वारे(ducting) इथे येतो.यासाठी अनेक कार्डिंग मशिन्सची आवश्यकता असते.या मशिन्समध्येसुद्धा राहून गेलेले क्लिनिंग होते तसेच धाग्यांचे अलगीकरण व पुन्हा कापसाची वेब शीट(कापसाचा एकसंध थर)तयार होते,ती वेब शंकु आकाराच्या घटकामधून पास होते त्या घटकास ट्रंपेट असे म्हणतात आणि त्या वेबचे रूपांतर sliver मध्ये होते,sliver म्हणजे 'काप' पण आपण sliver ऐवजी समजण्यासाठी म्हणून "रोप" हा शब्द वापरू.
/
तर वेब शीटचे रोपमध्ये रूपांतरण(rope/दोरी) होते,{आता ते कसे होते हे लिहित बसत नाही,कारण लेख फारच वाढेल.}
हे जे कापसाचे rope(दोरी) तयार होते,ते हात लावला कि सहज तुटू शकते.हे रोप वर्तुळाकार वेटोळे पद्धतीने(coils) उभट कॅन्समध्ये भरले जाते,
^
/
जेणेकरून पुढच्या प्रक्रियेत ते सहज फीड करता यावे.

६) ड्राॅ फ्रेम-१
(Draw Frame)
/
कार्डिंगधून आलेले कापसाचे ropes जे कि कॅन्समध्ये भरलेले असते ते feed material म्हणून ड्राॅ फ्रेम मशिनला फीड केले जाते.सहा ते आठ कॅन्स एक मशिनला फीड केले जातात.कॅन्समध्ये असणारे कापसाचे ropes मशिनमधून पास होतात आणि ते सहा किंवा आठ ropes(दोरी) चे एका रोप मध्ये रूपांतर होते,त्यासाठी ते ड्राफ्टिंग रोल्स मधून पास केले जाते.या मशिनचे मुख्य काम म्हणजे कापसाच्या रोपमधील धाग्यांचे समांतरण करणे म्हणजेच धागे वाकडे-तिकडे वगैरे झाले असतील तर सरळ करणे.
इथेही output म्हणून रोप च मिळते, फक्त हे रोप कार्डिग रोप पेक्षा दर्जेदार बनलेले असते.हे रोप ही कॅन्स मध्ये coiling(वर्तुळाकार वेटोळे) पद्धतीने भरले जाते.
हे कॅन्स पुढे युनिलॅप मशिनकडे पाठवले जाते.

७) युनिलॅप (unilap)
6
इथे कापसाच्या नाजूक दोर-यांचे रूपांतर lap sheet मध्ये होते,
^
आणि ही कापसाची शीट गुंडाळी पद्धतीने युनिलॅप मशिनचा आऊटपूट म्हणून बाहेर येते.

८ ) कोंबिंग (combing)
^
comb म्हणजे कंगवा,आता इथे जे मशीन वापरले जाते त्यास कोंबर(comber) असे म्हणतात.
युनिलॅप मशीनद्वारे बनवलेले कापसाचे लॅप शीट्स इथे फीड मटेरिअल म्हणून वापरले जाते,त्या लॅप शीटचे कोंबिंग ऑपरेशन होते.म्हणजे काही बारीकसारीक इतर पदार्थ कचरा वगैरे असले तर इथे ते साफ होतात आणि धाग्यांचे समांतरण होते, म्हणजेच कोंबिंग होते.{केसांतील कचरा जसा कंगव्याने निघून पडतो आणि केस सरळ होतात) इथे लॅप शीट्सचे परत rope मध्ये रूपांतर होते.
उत्तम दर्जाचा धागा(सुत) तयार करायचा असेल तरच कोंबिंग प्रक्रिया वापरली जाते, ही प्रक्रिया हलक्या दर्जाच्या उत्पादनासाठी वापरली जात नाही.

९) ड्राॅ फ्रेम-२

आता पुन्हा हे कोंबिंग झालेले रोप ड्राॅ फ्रेम मशिन मधून पास करायचे,कारण पुढच्या रोविंग मशिनसाठी ड्राॅ फ्रेम केलेले रोप वापरणेच गरजेचे आहे.

१०) रोविंग फ्रेम(Roving Frame)
^
इथे कापसाची रोव(rove) तयार होते,
रोव म्हणजे थोडीशी पिळलेली वात किंवा वेळू.
^
इथे कापसाच्या वातीला मशिनद्वारे पीळ दिला जातो जेणेकरून ती मजबूत होईल आणि सहजासहजी तुटणार नाही.आणि हि वात एका प्लॅस्टिकच्या छोट्या ट्युबला गुंडाळली जाते.

११) रिंग फ्रेम (Ring Frame)
*
रोविंग फ्रेमला तयार झालेली रोविंग(वात) ही इथे फिड मटेरिअल म्हणून वापरली जाते.
ही वात लांबलचक असते आणि या वातीचे बारीक धाग्यात रूपांतर इथेच होते.
त्यासाठी ही वात ड्राफ्टिंग रोल्समधून पास केली जाते कि जिथे ठराविक दाब आणि पीळ दिला जातो आणि त्यामुळेच वातीचे बारीक सुतामध्ये(yarn) रूपांतर होते.हे सुत प्लॅस्टिक ट्युबला गुंडाळले जाते,त्यास 'रिंग काॅप' असे म्हणतात.
&
(रिंग काॅप↑)

१२) वाईंडिंग(Winding)
^
रिंगफ्रेममध्ये तयार झालेले रिंग काॅप हे इथे फिडींग मटेरिअल म्हणून लावले जाते त्यासाठी winding machine च्या मागे creels असतात.
तर हे सुत मशिनमधून पास होत असतानाच परत सुताला पीळ देणे,बारीक फाॅल्ट शोधून काढून ते नाहीसे करणे,सुताला मेण(wax) लावणे इ. प्रक्रिया होते आणि फायनली हे सुत गुंडाळी स्वरूपात साठवले जाते ते खालीलप्रमाणे.
/
कलरफुल सुतासाठी वेगळी डाईंग प्रोसेस आहे ती नंतर कधीतरी
^
.
.
.
.
पुढील लेख: वस्त्रोद्योग-२ : सुतापासून कापडापर्यंत

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

17 Jun 2016 - 2:06 am | राघवेंद्र

वा एकदम वेगळा आणि आम्हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय.
पु. भा. प्र.

हो, हा विषय जिव्हाळ्याचा आहेच. येऊ द्या डिट्टेल सारं.
हा भाग पण अप्रतिम झालाय.

विजुभाऊ's picture

17 Jun 2016 - 2:23 am | विजुभाऊ

वआ सुंदर माहिती. अगदी सोपी करून सांगितलई भउ.
रच्याकने तुम्ही स्पेन्टेकस वाले का हो?

प्रदीप साळुंखे's picture

17 Jun 2016 - 8:30 am | प्रदीप साळुंखे

.

सोप्या भाषेत लिहिलेय.

चेक आणि मेट's picture

17 Jun 2016 - 8:39 am | चेक आणि मेट

अरे व्वा मस्तच,
आता कापड कसे तयार होते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे,तेव्हा लवकर येवू द्या
सुतगिरीणी बाहेरूनच पाहिली आहे,आतून दर्शन घडवल्याबद्दल आभार

नाखु's picture

17 Jun 2016 - 9:39 am | नाखु

अश्या मेज्वानीसाठी मिपा आपलं आहे आणि आपलं वाटेलच.

पुभाप्र नितवाचक मिपा वारकरी नाखु

खुप माहीतीपुर्ण लेख. धन्यवाद

सुनील's picture

17 Jun 2016 - 9:59 am | सुनील

माहितीपूर्ण धागा.

पुलेप्र

सस्नेह's picture

17 Jun 2016 - 10:28 am | सस्नेह

तुम्ही याच व्यवसायात आहात वाटते ? इतके तपशीलवार लेखन देणे त्याशिवाय शक्य नाही.

प्रदीप साळुंखे's picture

17 Jun 2016 - 12:10 pm | प्रदीप साळुंखे

तुम्ही याच व्यवसायात आहात वाटते ?

होय.

दिग्विजय भोसले's picture

17 Jun 2016 - 1:33 pm | दिग्विजय भोसले

छान रे मित्रा!
नेहमी वापरात असणारा सुती धागा कसा बनतो हे माहितच नव्हते.

अनुप ढेरे's picture

17 Jun 2016 - 2:59 pm | अनुप ढेरे

छान धागा! :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jun 2016 - 3:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

'धागा' खरेच उत्तम विणलाय साळुंखे सर तुम्ही! कामावर तुमचे असलेले प्रेम सुद्धा दिसून आले व्यासंगी लेखनातून तुमच्या मस्त मस्त मस्त पुढील भाग लवकर टाका

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jun 2016 - 3:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

'धागा' खरेच उत्तम विणलाय साळुंखे सर तुम्ही! कामावर तुमचे असलेले प्रेम सुद्धा दिसून आले व्यासंगी लेखनातून तुमच्या मस्त मस्त मस्त पुढील भाग लवकर टाका

तुषार काळभोर's picture

17 Jun 2016 - 3:48 pm | तुषार काळभोर

औद्योगिक क्रांतीचे खरंच लई उपकार हैत आपल्यावर!!

मुक्त विहारि's picture

17 Jun 2016 - 5:16 pm | मुक्त विहारि

पहिलाच भाग एकदम जोरदार.

पुभाप्र

जगप्रवासी's picture

17 Jun 2016 - 5:24 pm | जगप्रवासी

खूप छान माहिती दिलात

मारवा's picture

17 Jun 2016 - 5:41 pm | मारवा

नेहमीच्या रटाळ विषयांपासुन एकदम वेगळा ताजातवाना लेख आवडला.
सर टेक्स्टाइल इंजिनीयरींग विषयी पण तुम्हाला माहीती असेलच असे वाटते. थोडी ब्रीफ आयडीया दिली तर बर होइल.
हा सीझन पण आहे न्यु अ‍ॅडमिशनचा एखाद्याला न जाणो दिशा मिळेल. म्हणजे या क्षेत्रात काय करीयर होउ शकत अस.
तुम्ही टेक्सटाइल इंजिनीयरींग केलेल आहे का ?

प्रदीप साळुंखे's picture

17 Jun 2016 - 6:59 pm | प्रदीप साळुंखे

होय मी टेक्सटाईल इंजिनिअरिंग केलं आहे.
फार कमी शिक्षणसंस्थांमध्ये टेक्सटाईलचे कोर्सेस उपलब्ध आहेत,
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फक्त आठ-नऊच संस्था असतील जिथे टेक्साटाईल कोर्सेस आहेत,त्यात पण काही ठिकाणी फक्त एखादाच कोर्स उपलब्ध असतो,
टेक्सटाईलमध्ये करिअर करायचं असेल तर मुंबईमधल्या VJTI व SASMIRA या नामांकित संस्था आहेत,आणि इचलकरंजीमध्ये DKTE इन्स्टिट्युट आहे, मी DKTE चा स्टुडंट असल्याने आमच्या काॅलेजची माहिती सांगतो
DKTE मध्ये डीप्लोमाचे तीन कोर्सेस उपलब्ध आहेत जे कि दहावीच्या बेसिसवर करता येतात,
1)Diploma in textile manufactures
2)Diploma in textile technology
3)Diploma in fashion and clothing technology

डीग्रीचे पाच कोर्सेस आहेत
1)Textile technology -नैसर्गिक धागे जसे कि काॅटन,वूल इ आणि स्पिनिंग,विविंग(weaveing) चा अभ्यासक्रम
2)Manmade textile technology-मानवनिर्मित धागे जसे पाॅलिस्टर,नायलाॅन इ आणि स्पिनिंग,विविंगचा अभ्यासक्रम
3)textile chemistry- weaveing नंतर कापडाचं जे प्रोसेसिंग होत जसं कि dyeing,bleach,mercerise etc चा अभ्यासक्रम
4)Textile Plant Engineering- स्पिनिंग,विविंग संबंधी मशनरींचा अभ्यासक्रम
5)Fashion Technology- garment,finishing चा अभ्यासक्रम विशेषतः मुलींचा ओढा इकडे असतो

वरील पाच प्रकारांना BE ऐवजी B'TEXT असं म्हणतात.

पदव्युत्तर कोर्सेस- याला M'TEXT असं म्हणतात.
1) Textile Technology
2) Textile Chemistry
3) Technical Textile

शिवाय Phd साठी रिसर्च सेंटर सुरू केलं आहे असं म्हणतात.

आता मुद्याचं बोलतो,करिअरच्या संधी आहेत पण मोस्टली मुलांना प्रोडक्शन लाईनला सुपरवायझर म्हणून काम करावं लागतं जिथे कामगार आणि मॅनेजर दोन्हींची कटकट सहन करावी लागते,
इंजिनिअरिंग करून स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर उत्तमच आहे पण इंडस्ट्रीमध्ये कामाचा(कटकटीचा) थोडा त्रास असतो,
शिवाय हा असा उद्योग आहे जो 24 तास सुरू असतो त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करावं लागतं,पण हे ज्याच्या त्याच्या मेहनतीवर आहे कि कोणत्या कंपनीत सिलेक्शन होईल.
मोस्टली बैठ्या(बसून) प्रकारचं काम नसतं.म्हणूनच या क्षेत्रात फार मुलं इंटरेस्ट घेत नाहीत.
हा पण एक आहे, इंजिनिअरिंगनंतर जाॅब हा हमखास भेटणारचं,कारण फार कमी टेक्सटाईल इंजिनिअर बनत असतात. या क्षेत्रात मेहनतीने परदेशात जायची संधी पण आहेच.संधीच्या दृष्टीने मेकॅनिकलपेक्षा कैकपटीने बरे!

प्रदीपजी
विस्तृत अनुभवातुन दिलेल्या व्यावहारीक प्रतिसादासाठी धन्यवादी
अनेकांना हा प्रतिसाद उपयुक्त होऊ शकतो.
पालकांनाही मुलांना सुचवता येईल हा कोर्स ज्याला आवड अ‍ॅप्टीट्युड असेल त्याला एक संधी मिळते.
धन्यवाद !

नीलमोहर's picture

17 Jun 2016 - 6:00 pm | नीलमोहर

उत्तम माहितीपूर्ण लेख,
पुलेप्र.

धनंजय माने's picture

18 Jun 2016 - 12:18 am | धनंजय माने

+११११
उत्तम माहितीपूर्ण लेख आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2016 - 12:19 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेख. सर्वसामान्यपणे माहित नसलेल्या नवीन क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍यांसाठी हा लेख समयोचित आहे.

नि३सोलपुरकर's picture

18 Jun 2016 - 12:07 pm | नि३सोलपुरकर

उत्तम माहितीपूर्ण लेख,
पुलेशु .

प्रदीप साळुंखे's picture

18 Jun 2016 - 7:14 pm | प्रदीप साळुंखे

सर्व प्रतिसादकांचे आभार,

जाता जाता-
महर्षी गृत्समद यांनी कापसाचा शोध लावला असे वाचून आहे,(खरं खोटं माहित नाही)
शिवाय ऋग्वेदामध्ये सुद्धा सुती वस्त्रांचा उल्लेख आहेच.
मोहनजोदडो येथील उत्खननात कातलेला कापूस सापडला होता असे वाचले आहे,तो सुमारे तीन हजार वर्षापूर्वीचा असावा असा अंदाज आहे.

सोलापुरातील पद्मशाली विणकर समाज मार्कंडेय ऋषीन्ची जयंती साजरी करतात, त्यांनी ह्या समाजाला कमळातील तंतूंपासून(पद्मतंतु म्हणून पद्मशाली)वस्त्र विणण्याचे शिकवले असे मानतात.

अहमदनगरला देखील हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. हातमागाचा बहुतेक सगळा व्यवसाय याच समाजाचे लोक बघतात.
माझ्या माहितीप्रमाणे हे लोक मूळचे तेलंगणातले त्यामुळे त्यांची घरी बोलली जाणारी भाषा तेलुगु मिश्रित असते. (नगरकडे कोंगाडी असे म्हणतात.) अतिशय कष्टाळू अशा या समाजातील मुलेमुली लहानपणापासून चित्रकला, हस्तकला, विणकाम, रांगोळ्या यात प्राविण्य मिळवून असतात. बहुदा परंपरागत विणकामाच्या व्यवसायामुळे या कलाक्षेत्रात उपजतच जाण असावी. या समाजाची टिपिकल आडनावे म्हणजे अडगटला, नडीमेटला, संदुपटला इ.
नगरचे बरेच लोक सोलापूरशी रोटीबेटी व्यवहार राखून आहेत!
नगरला मार्कंडेय ऋषींचे मोठे मंदिरही आहे.

(अभ्या - पद्मतंतुंवरुन पद्मशाली आले आहे हे माहीत नव्हते! :))

विअर्ड विक्स's picture

18 Jun 2016 - 8:38 pm | विअर्ड विक्स

लेखमाला वाचतोय … मी सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रातील असल्यामुळे या field ची आम्हाला जास्ती धास्ती ;) तरी ३R concept बद्दल थोडे लिहिलेत तर बरे होईल …

चतुरंग's picture

19 Jun 2016 - 5:56 am | चतुरंग

आपण जे कापड रोजच्यारोज वापातो त्याची कुळकथा वाचायला नक्कीच आवडेल.
या क्षेत्रातही चांगल्या संधी असाव्यात असे दिसते. पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.

नगरला पूर्वी जिनिंग फॅक्टरी होत्या. मला वाटते विडिओकॉन कंपनीचे धूत कुटुंब पहिल्यांदा जिनिंगच्याच व्यवसायात होते तिथून त्यांची इतर क्षेत्रातली घोडदौड सुरु झाली.

नगर एमायडीसीत खतांसाठी लागणार्‍या प्लॅस्टिकच्या धाग्यांपासून बॅग्ज विणण्याचा एक कारखाना होता. त्यांच्या मशीनरीत डीसी मोटर ड्राईव्ज असत. कित्येकदा ते बंद पडले की त्यांच्या उत्पादनावर परिणाम होई. ते रिपेअर करण्यासाठी मी जात असे. त्या कामाची आठवण झाली!

छान सविस्तर माहिती . साळुंखे साहेब.
११ व्या चित्रात दाखवलेले यंत्र आमच्याच पूर्वीच्या कंपनीचे. त्याची उभारणी करायला मी अनेक महिने मिलमध्ये काम केले आहे. गिरण् गावाची जवळून ओळख तिथेच झाली. ऑटो डॉफर हा त्या काळी आमचा अत्यंत आवडीचा विषय.
त्या निमित्ताने नेस वाडियाबरोबर गफ्फा हाणल्या त्याची आठवण झाली.
मात्र स्पिनिंगपलीकडे कांही माहीत नसल्याने पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

रोज लागणारी वस्तू कशी बनते माहितच नसते.या लेखमालेसाठी अनेक धन्यवाद.

खूपखूप छान लिहिलं आहेच शिवाय इतर क्षोत्रातले मिपाकरही यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या उद्योगांविषयी लेख लिहायला घेतील.
कापूस- झाडापासून मिळणारा कापूस एवढ्या जगाच्या लोकसंख्येची गरज भागवायला अपुरा पडतो.त्याला पर्याय आला - कृत्रिम कापूस अर्थात व्हिस्कोज.जसं नैसर्गिक रबर/कृ रबर यात फरक आहे तसा यातही आहे परंतू किंमतीतली भयानक तफावत/फरक खोट्या कापसाचा खप वाढवायला कारण ठरते.आणखी बय्राच गोष्टी करून कृत्राम कापसासाच्या कपड्यांना चांगले बनवण्याचे प्रयत्न सुरूच असतात.

नरेश माने's picture

21 Jun 2016 - 11:33 am | नरेश माने

छान माहितीपुर्ण लेख.

शेखरमोघे's picture

21 Jun 2016 - 4:52 pm | शेखरमोघे

पुढील भाग वाचण्यास उत्सुक!