भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
6 Jun 2016 - 8:12 am
गाभा: 

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

पुढचा लेख वाचला नाहीत तरी ही चार वाक्य कृपया वाचा. जरी शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असं पक्कं समीकरण आजकाल झालेलं असलं, तरीही मातृभाषा शिक्षणाबद्दल काही सत्य आणि त्यासंबंधी जगात बळावत असलेली भावना सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. हा एखादा प्रादेशिक भाषेसंबंधीचा लेख न समजता वैश्विक विषयासंबंधी काहीतरी माहिती म्हणून इथला मजकूर लिहिलेला आहे. मुलांच्या शाळेच्या प्रवेशाच्या तारखा कदाचित उलटल्या असतील, कदाचित अजून प्रवेश बाकी असतील. तेंव्हा निर्णय घेण्याआधी लेखात दिलेले दुवे (लिंक्स) जरूर बघा, वाचा, विचार करा आणि जमलं तर पूर्वग्रह बाजूला ठेवून निर्णय घ्या.

आपण अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल काही मतं करून घेतलेली असतात. ही मतं बहुतांशी विचारांती केलेली नसतात तर ऐकीव, गोष्टींवर, किंवा कसल्यातरी प्रभाव किंवा दडपणामुळे केलेली असतात. आणि या मतांचा अणूस्फोटाप्रमाणे प्रसार होत जातो आणि त्याचं प्रथेत रुपांतर होतं. भारतातील लोक हे ठराविक बाबतीत इतके अनुकरणप्रिय आहेत की त्यांच्यावर कुठल्याही विचाराचा प्रभावच होत नाही. आणि भारतात, किंबहुना कुठेही एखादा नवा विचार साधारण तीन अवस्थांतून जातो. प्रथम काहीतरी नवीन, म्हणून त्याच्याकडे लोकं आकृष्ट होतात. नवं ते हवं, अशा भावनेने तो विचार अनेकांच्या मनत घर करतो. मग पुढे सगळेच जण त्या मार्गाने जाऊ लागले की त्याचा 'ट्रेंड' होतो. आणि मग तो ट्रेंड एखाद्या लाटेसारखा सगळ्यांना वाहून नेऊ लागला की त्याची पद्धत किंवा प्रथा होते, आणि इतर पर्यायच दिसेनासे होतात. असंच काहीसं शिक्षणाच्या बाबतीत झालेलं आहे.

हा विषय तसा नवीन नसला, आणि गेले काही महिन्यात याबद्दल बरंच लिहिलं गेलेलं असलं तरी याच्याशी निगडीत काही बाबी लक्षवेधी आहेत, प्रामुख्याने शिक्षणाच्या माध्यमाबद्दल. इंग्रजांपासून दाखला द्यायचा झाला तर इंग्रज अधिकारी लॉर्ड मॅकॉले याने इंग्रजीतून शिक्षणाची मुळं भारतात रोवली. भारतासारख्याच ब्रिटिशांच्या इतर कॉलन्या होत्या त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे राज्य करता यावं याकरता घेतलेला हा धोरणात्मक निर्णय होता. पुढे कॉलन्या संपल्या, देश स्वतंत्र झाले, जग खुलं झालं आणि लोकांना, देशांना काही गोष्टींचे परिणाम खुपायला, जाणवायला लागले. त्याबद्दल अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं, आणि अनेक गोष्टी समोर आल्या.

a
#macaulayism

युनेस्को ही जागतिक स्तरावरची संस्था मातृभाषेतून शिक्षणाबद्दल आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनेस्को ने यासंबंधी अनेक लेख, अनेक पेपर प्रकाशित केले असून बहुभाषिक देशांना मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं सतत आवाहन केलेलं आहे. जगातील ४०% मुलं अशा भाषेत शिक्षण घेतात जी त्यांना सहज समजत नाही आणि जी त्यांची मातृभाषा नाही. पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे, सायबाची मुंबई म्हटलं की जसा आजही मुंबईकराचा ऊर भरून येतो, तसंच इंग्रजीत बोललं की अजूनही त्या माणसाबद्दल आपल्या मनात श्रेष्ठत्वाची भावना येते. परंतु युनेस्कोच्या या आवाहनांमुळे असेल किंवा स्वजाणिवेतून असेल, इतर अनेक देशांनी मात्र मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. काही देशात तर तसे कायदेही आहेत.

नेमके दाखले द्यायचे म्हटले तर, ज्या इंग्लंड देशाची ही भाषा आहे, तिथलीच नावाजलेली संस्था ब्रिटिश काउन्सिल आपल्या 'व्हॉईसेस' मासिकात 'व्हाय स्कूल्स शुड टीच यंग लर्नर्स इन होम लँग्वेज' या शीर्षकाने लेख लिहिते आणि त्यात मातृभाषेतून शिक्षणाचा आकलनशक्ती, बौद्धिक विकास यावर होणारा सकारात्मक परिणाम सांगते. गव्हर्नमेंट ऑफ हाँग काँग ने आपल्या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे या विषयी तरतुदी केलेल्या आहेत. युनायटेड अरब अमिराती, अनेक अफ्रिकन देश, जर्मनी, टर्की यासारख्या देशातही या विषयी आवाज उठवला जातोय, बदल घडत आहेत. अफ्रिकेत आणि अनेक युरोपियन देशात तर लोकांनी चळवळी उभा केलेल्या आहेत. आंतरजालावर, सोशल मिडियावर या संबंधीची मुबलक माहिती मिळते.

सोयीस्करपणे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा स्वभाव समजू शकतो. परंतु आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, वाढीसाठी, प्रगतीसाठी जर एखादी गोष्ट चुकीची आहे, आणि जे जागतिक स्तरावर वारंवार सिद्ध होत आहे, तरीही तीच गोष्ट योग्य आहे म्हणण्याला काय म्हणावं हे समजत नाही. हे कुणाला सांगायचा प्रयत्न केला की मात्र मराठी मराठी करणार्‍या कुठल्यातरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं सांगणार्‍याकडे बघितलं जातं. हा झाला महाराष्ट्राचा भाग. इतर राज्यातही बहुतेक इंग्रजीचाच पगडा आहे त्यामुळे भाषिक वैविध्यतेतून खुलणारी संस्कृती आणि तिची संपन्नता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या हे मानवजातीच्या वाढत्या वैफल्याचं मुख्य कारण होऊ शकतं कारण व्यक्त होता येणं ही नुसती भावनिक गरज नसून आरोग्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे. बहुभाषिक व्यक्तीलाही व्यक्त होण्यास मदत करते ती म्हणजे मातृभाषा. परंतु मातृभाषेतून ज्यांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना इतर भाषा शिकणंही अतिशय कठीण जातं आणि मेंदू आणि जग यात भक्कम असा दुवाच निर्माण होत नाही. त्याचं पर्यवसान वैफल्य आणि मानसिक दुर्बलतेत होतं.

या गोष्टी भंपक वाटू शकतात, किंवा वैयक्तिक मतं वाटू शकतात. परंतु याबद्दल अनेक पुस्तकं, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी काहींचे दुवे खाली दिलेले आहेत. ते वाचावेत अशी विनंती आहे.

a
2
qq

आपण अनेकदा समाजाच्या विरुद्ध जायला घाबरतो. सगळे एकीकडे जात असतील तर आपण दुसरीकडे तोंड करायला कचरतो. पण मेंढरं आणि आपण मानव यात फरक आहे हे सिद्ध होत असेल तर ते या एकाच गोष्टीतून आणि ती गोष्ट म्हणजे विचार. विचार केला तर पटतं, की इंग्रजी माध्यमातून न शिकल्याने आपलं काहीही अडलं नाही. वाचलं तर कळतं, की आपल्यासारखेच अनेक आहेत ज्यांचंही काही अडलं नाही. पण 'सगळे' नावाची मंडळी आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात मग आपणहही तेच केलं पाहिजे हे ठरवताना विचार होत नाही, कारण वेगळं पडणं म्हणजे मागे पडणं नव्हे हेच मुळी लक्षात घेतलं जात नाही. जे योग्य ते योग्यच म्हटलं पाहिजे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. भविष्य हे मिळणारी नोकरी, आणि पैसे इथेच संपत असेल तर मात्र मातृभाषेचं स्थान भविष्यात न दिसणं स्वाभाविक आहे.

मुंबई पुण्यातही मातृभाषेचं महत्व पटतंय. हळू हळू का होईना, मनं बदलतायत. इंग्रजी'च्या' शिक्षणासाठी इंग्रजी'तून' शिकण्याची गरज नाही याची जाणीव होते आहे. शासनाकडूनही याला प्रोत्साहन मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. पण त्या आधी एकत्र यायची तयारी दाखवायला हवी. मग शाळांची अवस्था, तिथली मुलं, तिथले शिक्षक या सगळ्या सबबी सहज दूर होण्यासारख्या वाटायला लागतील. पण एकत्र यायला हवं. मराठीसाठीच नव्हे, प्रत्येक प्रादेशिक भाषेसाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी. शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.

https://www.britishcouncil.org/voices-magazine/why-schools-should-teach-...
http://www.edb.gov.hk/en/edu-system/primary-secondary/applicable-to-seco...
http://timesofindia.indiatimes.com/home/education/news/Kids-fare-better-...
http://www.thenational.ae/opinion/comment/learning-in-your-mother-tongue...
https://www.culturalsurvival.org/news/mother-tongue-based-education-phil...
http://www.fremdsprachendidaktik.rwth-aachen.de/Ww/programmatisches/pach...
http://www.sbs.com.au/news/article/2016/04/01/calls-increased-mother-ton...
http://www.cu.edu.ph/?page_id=3290
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
https://www.linkedin.com/pulse/contribution-mother-tongue-reference-prim...
http://www.un.org/apps/news/story.asp?NewsID=50147
http://www.isaet.org/images/extraimages/P1214011.pdf

प्रतिक्रिया

आवडलं. आणि पटलं सुद्धा!
मी स्वत: मराठी माध्यमातून शिकलो आहे. आणि कुठल्याही इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तीइतकच, किंबहुना जास्त अस्खलित व व्याकरणशुद्ध इंग्रजी मी बोलू शकतो असा मला आत्मविश्वास आहे.
इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. तिच्याकडे तशाच दृष्टीने बघावे. जशी जापनीज, फ्रेंच, चायनीज, तशीच इंग्रजी. ती कुठल्याही वयात आरामात शिकता येईल. इंग्रजी म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे.

दिग्विजय भोसले's picture

6 Jun 2016 - 9:19 am | दिग्विजय भोसले

>> शेवटी माणसं घडवायची आहेत; शर्यतीचे घोडे नव्हेत.
अगदी खरं बोललात वेल्लाजी.जी भाषा आपल्याला कम्फर्ट वाटत नाही त्या भाषेतून घेतलेलं शिक्षण हे शिक्षण नसून फक्त ट्रेनिंग आहे.
(well educated बनायला हवं well trained नाही-3 idots)
सर्व प्रकारचं शिक्षण/कोर्सेस हे मातृभाषेतून घेण्याची व्यवस्था असावी असे वाटते.अर्थात यामध्ये सरकारी जबरदस्ती नसायला हवी.
आणि इतरांचे अनुकरण करणे याहून दुसरी मूर्खता नसावी.

आनंदी गोपाळ's picture

6 Jun 2016 - 9:29 am | आनंदी गोपाळ

गुजरातेत १२ पर्यंत गुजराती मिडियममधे शिक्षण घेता येत असे.

मेडिकलला जाणारी मुले सीईटी देखिल आपल्या भाषेत देऊ शकत होती. आता "नीट"च्या रिसेंट आदेशामुळे आता मुलांना नाईलाजाने पूर्ण भारतभर सीबीएसई अर्थात इंग्रजीत शिक्षण घ्यावे लागणार असे दिसते.

यालाच मॅकॉलेकरण म्हणता येईल का?

नमकिन's picture

6 Jun 2016 - 9:49 am | नमकिन

प्रबोधनपर व्याख्याने व सभा (सप्टेंबर ते मार्च) घेऊन जनजागरण केले तरच याला रोखता येईल अन्यथा मातृभाषा हे शिक्षण माध्यम उरणार नाहीं व पुढच्या पिढीला पर्याय नाहीं (जो सोयिस्कररित्या आजंच काहीपालक कारण सांगतात) म्हणून नाईलाजाने इंग्रजी माध्यमात शिकावे लागेल.
खास करुन महिला वर्ग हिरिरिने सामिल करुन घ्यायला हवा, कारण पुरुषांचे यात काही चालत नाहीं असे पाहण्यात आले आहे.

वेल्लाभट's picture

6 Jun 2016 - 12:36 pm | वेल्लाभट

अधिकाधिक लोकांनी आपापल्या परीने प्रबोधन केलं तरीही पुष्कळ फरक पडेल. मागणीचा दबाव सरकार आणि शाळांवर झाला पाहिजे. अर्थात याचं समीकरण इतकं साधं नसून त्यात पैसा नामक गोष्ट मुख्य भूमिका बजावत आहे हे उघड आहे. शाळांना सीबीएसईचे वेध मिळणार्‍या फियांमुळे लागत आहेत हे त्यांच्या प्रत्येक युक्तिवादातून दिसतं.

त्यामुळे प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली तरच बदलाचा वेग वाढू शकतो. सोशल मिडिया यात मोठं काम करेल असा विश्वास आहे.

फेसबुकवरचे
मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत

मराठी माध्यमाच्या शाळा

हे ग्रूप बघा, सामील व्हा असं आवाहन सर्वांना करेन.

नमकिन's picture

9 Jun 2016 - 10:28 am | नमकिन

Amway व तत्सम कंपन्या तुम्ही पाहिल्या असतीलंच.
तिथे उच्च स्तर चा माणूस सोबत येतो व सर्व योजना उलगडुन सांगतो पण जो तुमच्या ओळखिचा असतो तो गप्प असतो किंवा मधली माहिती पेरत असतो. याचे कारण अनोळखी लोकांशी संवाद ठेवावा व वाद टाळावा हे आपण उमजून वागतो व ज्ञात व्यक्तिचे राग, लोभ सांभाळायचे असतात.
आपल्या पातळीवर प्रयास चालूंच आहेत पण संख्या ला सामोरे जाताना पटावर संख्याच जरुरी. समूह मन एक करण्यास एक एकटे प्रयत्न अपुरे तसेच कमी प्रभावी ठरतात. मित्र,परिवार व आजु-बाजूचे एकाच दिशेने जाताना दिसले की (माहित असूनही एक-दिशा मार्गात विरुद्ध दिशेने जातातंच लोकं) मग वेगळे/एकटे पडण्याच्या भितीने इंग्लिश माध्यम निवडले जाते.
२ सभा गोखले फेसबुक समूहाच्या हजर होतो पण अजूनही चळवळीत बदलायला वेळ आहे.

पद्मावति's picture

6 Jun 2016 - 3:32 pm | पद्मावति

लेख आवडला आणि पटला.

हेमन्त वाघे's picture

6 Jun 2016 - 6:45 pm | हेमन्त वाघे

वेल्लाभट तुमची मुले मराठी माध्यमात आहेत का? कितवीत ? कोठल्या शाळेत ?

वेल्लाभट's picture

6 Jun 2016 - 11:18 pm | वेल्लाभट

वाघे साहेब, मुद्दा न मिळाल्यास वैयक्तिक पातळीवर येऊन प्रतिवाद करणे हे अतिशय खालच्या दर्जाच्या विचारसरणीचे लक्षण आहे. तरीही आता विचारलंतच म्हणून सांगतो की माझा मुलगा एक वर्षाचा आहे. आणि तुम्हाला विशेष स्वारस्य असल्यास सांगा म्हणजे तुम्हाला पुढच्या वाटचालीची यथोचित माहिती देण्यात येईल.

कानडाऊ योगेशु's picture

6 Jun 2016 - 8:22 pm | कानडाऊ योगेशु

भारतासारख्या बहुभाषिक देशात जेव्हा कामानिमित्त एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते तिथे मातृभाषेतुनच शिक्षण हा हट्ट अडचणीचा ठरु शकतो. मी सध्या बेंगलोरमध्ये राहतो.अल्याड पल्याडला कोणी मराठी नाही.भारताच्या बाबत बोलायचे झाल्यास एकुण शिक्षणपध्दतीतच आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. केवळ मातृभाषेतुन शिक्षण घेतल्याने मिळणारा फायदा नगण्य असावा. मराठीतुन शिक्षण घेऊन सुध्दा शिक्षणपध्दतीचा भर घोकंपट्टीवरच असेल तर मग इंग्रजीतच घोकंपट्टी केल्याचा फायदा जास्तच असेल.

प्रियाजी's picture

6 Jun 2016 - 10:10 pm | प्रियाजी

भारतभर बदलीच्या नोकरीमुळे आम्हालाही दोन्ही मुलांना ईंग्रजी माध्यमाच्या शाळात नाईलाजाने घालावे लागले.त्यामुळे होणारे तोटेही सहन करावे लागले. सुरवातीला मुले ईंग्रजीमधून शिकताना कंटाळत असत परंतू नंतर जमले. मात्र त्यामुळे मराठी अवांतर वाचनावर व बोलण्यावर थोडाफार परीणाम झालाच. मात्र घरात सतत मराठीच बोलत असल्याने मुले मराठी अगदीच विसरली नाहीत. त्यामुळे मलाही असेच वाटते की ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी/ मात्रुभाषेतच मुलांना शालांत शिक्षण द्यावे त्याचवेळी ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकवावी. सध्या शालेय सुट्ट्यामध्ये ज्या अनेक कलाकौशल्याच्या वर्गांना मराठी माध्यमातील मुले जातात तसेच हसत खेळत मुले सहज ईंग्रजी बोलीभाषा म्हणून शिकू शकतील व एकदा भाषेची गोडी लागली की त्यांच्या आकलन शक्तीनुसार छोटी छोटी गोष्टींची पुस्तके सतत त्यांच्या वाचनात येतील असे पाहून ती मुले चांगले ईंग्रजी बोलू शकतील.
आम्हा उभयतांनाही शाळेत मराठी माध्यम व कॉलेजला ईंग्रजी माध्यम असूनही बोलीभाषा म्हणून ईंग्रजी चांगले येत नव्हते परंतू मी स्वतः ईंग्रजी पुस्तके सतत वाचूनच अन घरात सतत सवय केल्यानेच परप्रांतात स्वतःचे विचार योग्य रीतीने मांडू शकले.

वेल्लाभट's picture

6 Jun 2016 - 11:19 pm | वेल्लाभट

प्रियाजी धन्यवाद. तुमचा प्रतिसाद बरंच काही सांगतोय. आणि तुमच्या प्रयत्नांना मी दाद देतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2016 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरेख लेख आणि उत्तम विवेचन !

आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल.

भारतात शास्त्रिय विषयांतील उच्च शिक्षण व विशेषतः व्यावसायीक शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास सद्यातरी विद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये घेणे आवश्यक आहे. असे शिक्षण अनेक विकसित देशांमध्ये स्थानिक भाषेत करता येते. कारण तेथे स्थानिक भाषेत शिक्षण व संशोधन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक मूलभूत सोई निर्माण केल्या गेल्या आहेत.

अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सिंगापूर इत्यादी देशांत पदवी शिक्षण अथवा नोकरी करावयाची असल्यास इंग्लिशला पर्याय नाही. आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2016 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे

माझे स्वतःचे ११ पर्यंतचे (त्यावेळची एस एस सी) शिक्षण मराठीत झाले. तोपर्यंत इंग्लिशचा फारसा गंधही नव्हता... शिक्षाकांनाही केवळ जुजुबी इंग्लिश येत होते ! सायन्स कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे शिक्षण एकदम इंग्लिशमध्ये ! सुरुवातीला जरा कठीण गेले पण भाषांची आवड असल्याने नंतर सोपे झाले. ज्यांना इंग्लिश झेपले नाही त्यांची मात्र परवड झाली.

त्यानंतर मात्र सर्व सायन्स कॉलेजचे व व्यावसायिक शिक्षण आणि सर्व प्रकारचे व्यवसाय पूर्णपणे इंग्लिशमध्येच केले... करावेच लागले. व्यवसायानिमित्ताने इंग्लिश, अमेरिकन, कॅनॅडियन, सिंगापोरियन, ऑस्ट्रेलियन, इ लोकांबरोबर काम करायला आणि त्यांना इंग्लिशमध्ये युक्तीच्या चार गोष्टी सांगायलाही काही अडचण आली नाही :)

मुलाचे आठवी पर्यंतचे शिक्षण परदेशात झाल्याने अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. त्यामुळे नंतर भारतातले व परदेशातले शिक्षण अर्थातच इंग्लिशमध्ये झाले. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने त्याचे मराठी लिहिणे-बोलणे अस्खलित आहे. त्याच्या शिक्षणात एकही वर्ष मराठी हा विषय नव्हता हे सांगून विश्वास बसणार नाही, इतके ! "पुल" त्याचे आवडते लेखक आहेत, मराठी नाटक-सिनेमा आवडीने बघतो, सर्व नातेवाईकांशी सरळ सोप्या मराठीत (इंग्राजळेल्या नाही ;) ) बोलतो.

हा आणि इतर काही अनुभवांवरून (व काही बाबतीत शास्त्रिय मानल्या गेलेल्या पुराव्यांवरून) असे वाटते की :

१. लहानपणी मुले अनेक भाषा सहजी आत्मसात करतात. तेव्हा त्यांना प्राधान्याने मातृभाषा शिकवावी, शक्य असल्यास मातृभाषेतून शिक्षण द्यावे... पण त्याचबरोबर इतर उपयोगी भाषा शिकण्यासाठीही जरूर प्रोत्साहन द्यावे.

२. घरात मातृभाषा वापरली जात असली तर मुले ती सहज आत्मसात करतात... जशी ती त्यांच्या शाळेतील / घराशेजारच्या खेळगड्यांची भाषा सहज शिकतात तशीच. मुलांना इंग्लिशची सवय व्हावी या उद्येशाने बरेच पालक घरात इंग्लिश / इंग्राजळलेली मराठी बोलताना दिसतात. याचा अंतीम फायदा किती याबद्दल माझ्या मनात शंका आहे... मात्र त्यामुळे मुलांची मराठी बिघडते हे नक्की :( त्याऐवजी सरमिसळ न करता जशी जरूर आहे तशी (चर्चेच्या विषयावर अवलंबून) शक्यतो शुद्ध मराठी किंवा शुद्ध इंग्लिश वापरावी.

३. विशेषतः व्यापारी व शास्त्रिय विषयांतील उच्चशिक्षण आणि संशोधन स्थानिक भाषांत व्हावे इतक्या मूलभूत सोई सद्या भारतात नाहीत आणि (अगदीच अशक्य नसल्या तरी) त्या नजिकच्या काळात भारतात निर्माण होतील अशी शक्यता नाही... कारण त्याकरिता वित्त, राजकिय इच्छाशक्ती आणि सामाजिक इच्छाशक्ती यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि त्या सर्वांचाच प्रचंड अभाव सद्या दिसतो आहे :(

४. वरील सर्व मुद्दे पाहता,

(अ) आपल्या मातृभाषेत शिकणे केव्हाही जास्त सोपे आणि श्रेयस्कर असते याबाबत शंका नाही.

(आ) मातृभाषेबद्दल ममत्व जरूर असावे आणि तिचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.

हे मान्य केल्यावरही खालील व्यावहारीक कटू सत्ये मानाविच लागतात...

(इ) भारतात व्यापारी व शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या भारतियांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे.

(ई) आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी सद्या इंग्लिश ही एक महत्वाची भाषा म्हणून शिकणे अपरिहार्य आहे.

याबाबत गैरसमज नसावा.

नमकिन's picture

8 Jun 2016 - 9:21 am | नमकिन

विषय सोपा व सरळ आहे त्यात गैरसमज नसावा. भाषा अमाप आहेत शिकण्यास कुणाचीच ना नाहीं तर मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे.

"आंतरराष्ट्रिय स्तरावरचे संशोधन करायचे असल्यास आजतरी सर्वच देशांच्या नागरिकांना (यात सर्व विकसित पाश्च्यात्य देशही येतात) इंग्लिश शिकणे आवश्यक ठरते."- इंग्रजी भाषा शिकण्यास आक्षेप नाहींच आहे तसेच संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.

वेल्लाभट's picture

8 Jun 2016 - 11:06 am | वेल्लाभट

योग्य उत्तर दिलंत नमकिन.

धाग्यातल्या लिंका अनेकांनी उघडल्याच नसण्याची दाट शंका येते काही प्रतिसाद बघून. धागाकर्त्याने आपली मतं कमी आणि इतर जागतिक संस्था काय म्हणतात त्याचे दुवे देण्याच्या हेतूने धागा काढलेला असूनही तो उद्देश पूर्णतः सफल झालेला नाही असं खेदाने वाटतं.

उदाहरणार्थ

आंतरराष्ट्रिय क्षेत्रांत व्यापारी व शास्त्रिय शास्त्रिय विषयांत उच्च ध्येय ठेवण्यार्‍या जगातल्या सर्व देशातील नागरिकांसाठी

अशी वाक्यं.
नेमकं हेच पूर्णसत्य नाही हे सांगायचा प्रयत्न होता.
असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2016 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे

संशोधन करताना कुठल्याही भाषेत करु शकतो, प्रत्येक देश आपल्या भाषेत संशोधन लेख प्रसिद्ध व उपलब्ध करतो. तेव्हा कृपया गैरसमज न पसरवावा.

गैरसमज !? नक्की ???

भारतिय भाषेत जागतिक स्तराचे शास्त्रिय संशोधन व्हावे असे माझेही स्वप्न आहेच. पण, दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती सद्या तरी आस्तित्वात नाही. प्रत्येक प्रबंध "कोण्याएका शास्त्रिय नियतकालिकात प्रकाशित झाला" या एकाच कारणाने त्यातले संशोधन जागतिक स्तराचे आणि / अथवा उपयोगी ठरत नाही.... मग ती भाषा इंग्लिश असो की इतर कोणतीही.

जेव्हा खालील गोष्टी आस्तित्वात येतील तेव्हाच एखादी भाषा जागतिक स्तरावरचे संशोधन होणारी भाषा मानणे योग्य होईल :

१. त्या भाषेत "जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होऊ शकणारे संशोधन" प्रथम प्रकाशित केले जाईल व गैरभाषिक संशोधकांना त्याच्या भाषांतराची निकड वाटेल.

२. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेले एखादे संशोधन पाठ्यपुस्तकात सामील होईल.

३. त्या भाषेतील प्रथम प्रकाशित झालेल्या संशोधनाने जागतिक उद्योगधंद्यांमध्ये किंवा जागतिक व्यवहारांमध्ये महत्वाचे बदल घडवून आणले जातील.

४. जागतिक स्तरावरचे इतर भाषांतले संशोधन प्रसिद्ध झाल्यावर ते त्या भाषेत त्वरीत (जास्तित जास्त एक-दोन महिन्यांत) भाषांतरीत होऊन ते स्थानिक संशोधकांना उपल्ब्ध होईल.

सद्या ही परिस्थिती पूर्णतः केवळ इंग्लिश व कमी-अधिक प्रमाणात आधुनिक पाश्च्यात्य भाषांतच (जर्मन, फ्रेंच, स्कँडेनेव्हियन भाषा, इ) उपलब्ध आहे. इतके असूनही इंग्लिश सोडून इतर भाषांतील संशोधकांना जर आंतरराष्ट्रिय स्तरावर काम करायचे असले तर एक सामाईक भाषा म्हणून इंग्लिश शिकावीच लागते, ही वस्तुस्थिती आहे.

मातृभाषेचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचे असते... नक्कीच असावे. माझेही असेच मत आहे.

मात्र, एखाद्या भाषेला जागतिक शास्त्रिय संशोधनातले महत्वाचे स्थान केवळ तशी कल्पना करून, बोलून किंवा लिहून मिळणार नाही... वस्तूस्थितीकडे डोळेझाक करून तर नाहीच नाही. कारण वस्तूस्थितीकडे डोळेझाक करणे गैरसमजाचे तर होईलच, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे ते अंतिमतः भाषेलाही घातक ठरेल.

भाषेला तसे उच्च स्थान मिळण्यासाठी, सर्वप्रथम त्यासाठी लागणार्‍या सर्व आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागेल; सर्व आवश्यक संसाधनांची व व्यवस्थांची उभारणी करावी लागेल; आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील.

सद्या मान्यताप्राप्त समजल्या जाण्यार्‍या (इंग्लिशसह) सर्व भाषांनी याच खडतर मार्गावरून वाटचाल केलेली आहे व ती चाल अविरत-अखंड चालू ठेवली आहे... या मार्गाला दुसरा साधासोपा पर्याय नाही. पूर्णविराम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2016 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

अर्थात...

जर स्थानिक भाषेत काम करून स्थानिक स्तरावर कार्यरत रहायचे असेल तर मात्र इंग्लिशच काय इतर कोणत्याही भाषेविना (अगदी इतर भारतिय भाषेविनाही) फारसे अडणार नाही... अगदी अडणारच नाही असे नाही, पण चालून जाऊ शकेल.

वेल्लाभट's picture

9 Jun 2016 - 12:39 pm | वेल्लाभट

म्हात्रे साहेब;

इंग्लिश ला विरोध आहे असं एका शब्दानेही सूचित होत नाहीये लेखात.
शिक्षणाचं माध्यमच इंग्लिश असण्याला विरोध आहे.

हे इतकं साधं असून तुमचाही प्रतिसाद चुकीचा अर्थ काढून दिलेला यावा याचं आश्चर्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2016 - 9:21 am | डॉ सुहास म्हात्रे

वेल्लाभट साहेब,

मी माझ्या पहिल्या प्रतिसादाची सुरुवात,

आपल्या मातृभाषीक राज्यात/देशात राहत असल्यास मातृभाषेतच प्राथमिक शिक्षण व शक्य असल्यास माध्यमिक शिक्षणही घ्यावे. मात्र इंग्लिश ही आणखी एक भाषा म्हणुन शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल.

अशीच केली होती. तरीही त्यावरच्या प्रतिसादात 'नमकिन' यांनी माझा गैरसमज असल्याचे लिहिले (?!).

त्यातच त्यांनी,

मातृभाषा हे शैक्षणिक माध्यम असावे हीच वैज्ञानिक व वैश्विक प्रमाण आहे.

असे सरकटीकरण करणारे आश्चर्यकारक विधान केले. त्या विधानाने काही वाचकांचा "मातृभाषेतलेच शिक्षण जगात सर्व काही मिळवून देऊ शकेल" असा गैरसमज होईल असे वाटले. हे विधान मराठीच्या बाबतीत खरे असते तर माझ्याइतका आनंद कोणाला झाला नसता... पण दुर्दैवाने तशी वस्तुस्थिती आज नाही. त्याऐवजी ते वाक्य खालील्प्रमाणे लिहिले असते तर सत्याच्या बरेच जवळपास असते...

"आयुष्यातले सुरुवातिचे (प्राथमिक व माध्यमिक) शिक्षण मातृभाषेतून दिल्यास ते विद्यार्थ्याला विषय समजून घेण्यास (ज्ञानार्जनासाठी) जास्त फायद्याचे ठरेल" असे पुरावे संशोधनाव्दारे पुढे आले आहेत.

आपल्याला ममत्व वाटणार्‍या गोष्टींबद्दल अतिशयोक्त दावे मूळ उद्द्येशाला धोका पोहोचवतात*. कारण, त्या दाव्यांतला फोलपणा आज ना उद्या बाहेर येतोच आणि मग त्यां दाव्यांची व इतर खर्‍या दाव्यांची (आणि दावे करणार्‍यांचीही) विश्वासार्हता कमी होते.

या वरच्या कारणांसाठीच पुढचे प्रतिसाद लिहिणे भाग पडले.

.

* : अतिशयोक्त दावे राजकारणात "तात्कालिक व संकुचित" स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा यशस्विरित्या केले जातात... हे "वैज्ञानिक" नाहीच व "नैतिक" तर अजिबात नाही. एखाद्या गोष्टीबद्दल खरे ममत्व वाटणार्‍या लोकांना हे लोकांना जेवढे लवकर कळेल तेवढे बरे.

===============

अजून थोडेसे...

(अ) मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला खालील कारणांनी उर्जितावस्था येणार नाही :

१. केवळ भाषेचे गोडवे गाणे.

२. त्या भाषेबाबतीत भावनिक दावे करणे... आणि विषेशतः अतिरंजित दावे करण्यासारखी धोकादायक दुसरी गोष्ट नाही.

३. त्या भाषेच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था जरूर असावी पण ते वापरण्याची जबरदस्ती करणे मूळ मुद्द्याला मारक ठरेल. किंबहुना, खालील (आ) मधिल परिस्थिती निर्माण केली तर लोकच त्या भाषेच्या उत्तम शिक्षणासाठीच्या व्यवस्थेचा आग्रह धरतील.

(आ) जर मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेला उर्जितावस्था यायला हवी असेल तर खालील गोष्टी व्यवहारात आस्तित्वात असणे / आणणे ही योग्य नीति ठरेल :

१. त्या भाषेचा वापर उपजिविका करण्यासाठी उपयोगी असावा. यामुळे ती भाषा शिकणे सर्वसामान्यांना आवश्यक वाटते.

२. त्यापुढे जाऊन, त्या भाषेचा वापर सधन आणि / किंवा उत्तम जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असला तर सोन्याहून पिवळे. असे झाले की आपोआप ती भाषा शिकणे ही एक आकर्षक गोष्ट बनते.

मग ती "भाषा शिका, तिचे संवर्धन करा, तिला जगवा" अशी मनधरणी करण्याची वेळ येणार नाही... मातृभाषा असलेले व नसलेलेही लोक काकू न करता आवश्यक ते परिश्रम घेऊन ती भाषा शिकायला आपणहून पुढे येतील.

वेल्लाभट's picture

10 Jun 2016 - 10:20 am | वेल्लाभट

बरं, तुमची मतं कळली.

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट;
कुठले दावे किती फोल ठरतील ते कळेलच पुढे पुढे. (यात आक्रस्ताळेपणा नाही किंवा धमकीही नाही)

एखादं विधान तुम्हाला अतिरंजित वाटलं तरी तसे सिद्धांत मांडलेले आहेत जगभर; तेही विद्वान (मानले तर) लोकांनी... त्याला काहीच कन्सिडरेशन नाही काय?

प्रॅक्टिकॅलिटी डाय्जेस्ट नाही झाली की त्याला भावनिक म्हणायचं... हे कसं बरोबर आहे?

आणि त्या खालील गोष्टी करायला हव्यात.... ज्या तुम्ही लिहिल्यात त्या सगळ्या करतातच ती लोकं ज्यांना कळकळ वाटते. त्यामुळे ते होईलच बरोबर पद्धतीने. चिंताच नको.

मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात. हे भावनिक विधान वाटलं तर समजा तसं. पण हे अनाकलनीय आहे.

नमकिन's picture

10 Jun 2016 - 9:05 pm | नमकिन

सुरुवातंच गंडली - भाषा शिकण्यास विरोध प्रदर्शन धाग्यात केले नव्हतेच पण इंग्लिश भाषा शिकणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे होईल - हे विधान भरकटवणारे वर भरीस संशोधन कसे १ भाषा प्रसिद्ध करण्यास अनिवार्य आहे यामुळे गाड़ी विषयावर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. दिलेल्या संशोधन पर दुवे व मागे शोधून केलेले वाचन यावरुन तुमचे अपेक्षित विधान मी मांडू शकलो नाहीं त्याबद्दल क्षमस्व; तरी भावना पोचल्याचे समाधान.
होता होता पुन्हा त्याच विषयावर भर घातलीत मूळ विषयाला बगलेत घालून.

असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा! या उक्तीनुसार मातृभाषेला बाजूला सारुन मुलाचा आनंद, शिकण्यातली सहजता व जीवन अनुभव जो परिसरात सहजसाध्य आहे तो सोडून अनैसर्गिक वातावरण देऊन इवल्या जीवाला आपल्या अपेक्षांच्या, आकांक्षाच्या ओझ्याखाली फुलवायचा प्रयोग करने व त्याची भलामण करीत रहाणे का? तर नौकरीच्या संधी व पैशाची राशि यांचा संबंध यशाच्या व्याख्येत समाविष्ट करुन लहान वयापासुन त्या बालकाच्या भावविश्वाचा नाश करतात व पुढे जीवनात अपेक्षा करतात संवेदनशीलता असन्याची, कसं काय शक्य आहे?

कित्येक शाळा शिक्षक सांगतात की आम्ही मुलांना काही शिकवताना मुलेच आम्हाला बरेच काही शिकवतात, अर्थात शिकण्याची तयारी असेल तर. हेच मोकळे मन धागा लिहिताना लेखकाच्या मनात असावे, असे वाटते. त्याला असे फरफटत घेऊन जाऊन चर्चा विस्कटते.
या विषयावर साधक बाधक चर्चा होत रहावी ही सद्य सच्ची भावना.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2016 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ वेलाभट व नमकिन :

माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादातून माझे मुद्दे स्पष्ट झाले आहेतच. तेव्हा पुनरुक्ती टाळतो आहे. फक्त...

मला कळ्ळतच नाही की मराठीतनं मोठी झालेली आणि त्यातूनच इंग्लिशमधे पारंगत झालेली मंडळी मराठीला एवढ्या आग्रहाने राइट ऑफ कसं करू शकतात.

हा (अजून एक) गैरसमज दूर करण्यासाठी एकच गोष्ट सांगाविशी वाटतेय, ती अशी...

मराठीबद्दलच्या तुमच्या आणि माझ्या भावना एकाच आत्मियतेच्या आहेत आहेत. म्हणुनच, माझ्या घरात मराठीच पहिली भाषा आहे आणि ४० वर्षांच्या लिहिण्याच्या दुराव्यानंतर मराठी वाचण्याची-लिहिण्याची संधी मिळते या एका महत्वाच्या कारणाने मी मिपावर चि़कटलो.

मराठीचे महत्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे माझेही ठाम मत आहे. मात्र, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असावी याबाबत आपल्यात मतभेद आहेत असेच आतापर्यंतच्या लिखाणातून मला ध्वनित होते आहे. ते कसे हे अगोदर आले आहेच.

आणि हा फरक फार महत्वाचा आहे, कारण...

यशासाठी खूप जोर लावणे फार महत्वाचे आहेच, पण तो जोर कोणत्या जागी/दिशेने लावला जात आहे यावर यश मिळेल की नाही हे जास्त अवलंबून असते.

असो. या विषयावर अजून काही नवीन मुद्दा नसल्यास, मी इथेच थांबणे श्रेयस्कर समजतो.

धन्यवाद !

आणि त्या सर्व प्रणालीचे अविरत-अखंड व्यवस्थापन चालू राहील याची खात्री करावी लागेल... असे झाल्यावर मग एकदोन दशकांनी त्या प्रणालीची फळे दिसायला लागतील.
>>
तुमच्या प्रतिसादातील उपाय व इतर अनेक उपाय कोणी करायचे? गुजरात्यांनी? बंगाल्यांनी? की मराठ्यांनी? मी ? तुम्ही? कोणी?
आज २०१६ मधे तुम्ही म्हणता एकदोन दशकांनी फळ दिसतील, तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासुन एवढ्या वर्षात मराठी माणसांनी काय केले? तेव्हाच केले असते तर ते एकदोन दशके नंतरचे फळ आज २०१६ मधे नसते का दिसले?
अजुन एकदोन दशकानंतरही फक्त उपाय सुचवायचे का? अंमल कधी करायचा?
त्या उपायांच्या मोठ्या चित्राचा एक छोटा भाग शिक्षणाचे मराठी माध्यम असणे हा आहे. तो तर तुम्ही मराठी विरोधक करत नाही आणि बाकीचे उपाय मात्र सुचवत बसता.
कुठुनतरी सुरुवात तर करा ना?

असंका's picture

7 Jun 2016 - 12:22 am | असंका

सुरेख लेख! तुमच्या प्रयत्नांना दाद देतो.

धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jun 2016 - 12:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

एकच, तुम्ही म्हणालात तसे शिक्षणाला मातृभाषा माध्यम grasping करता उत्तम ! मान्य करतो मी, पण ज्या मराठी माध्यमाबद्दल आपण हे म्हणता आहात ती मराठी खरंच आपली मातृभाषा आहे का?? 'त्वरक' 'उत्प्रेरक' 'संप्रेरक' ह्या वैज्ञानिक संकल्पना म्हणा किंवा सामाजिक शास्त्र विषयातील भौगोलिक ऐतिहासिक जारगन म्हणा ही छापील मराठी आपली मातृभाषा आहे का?? कुठल्या घरातली कुठली माता अशी दिव्य छापील मराठी बोलत असेल? ही प्रमाणित मराठी आहे मातृभाषा अहिराणी, कोकणी, वर्हाड़ी इत्यादी म्हणता येतील मग काय करावे बुआ?? माझी मातृभाषा वर्हाड़ी आहे मग उद्या मी पुस्तक मागतो ज्यात लिहिले असेल की बुआ 'लोकमान्य टीळकायनं अंग्रेजाले बेज्या झाबु देल्ला! इतला का त्याहीनं टिळक महाराजाले उचलून मंडाले ले पाठोले' ही आहे बुआ माझी मातृभाषा

मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते गणित शिकताना 'simultaneous equation' हे जर वाचायला जड़ जात असेल तर 'एकसमयावच्छेदक समीकरण' सुद्धा काही नीट पचत नाही कारण मुळात ती आपली मातृभाषा नाही!

बाकी चालू द्या

प्रतिसाद आधी इतरत्र प्रकाशित

वेल्लाभट's picture

8 Jun 2016 - 1:12 pm | वेल्लाभट

सोन्याबापू,

असे प्रतिसाद टाकून तुम्ही फार काही साध्य करंत नाही आहात हे सांगू इच्छितो. आपल्याला धड एक बाजू घेता येत नसल्यास फाटे फोडत बसणं यात शहाणपण नव्हे. तुम्हा लोकांचा नक्की प्रॉब्लेम तुम्हालाही कळत नसावा.

मातृभाषा अयोग्य असंही तुम्हाला म्हणवत नाही, इंग्रजी अयोग्य असंही म्हणवत नाही. मग मातृभाषातर हवी पण मग हे अमकं अमकं ही आपली मातृभाषा आहे का? किंवा आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाची मातृभाषा कुठली समजायची यासम मुद्दे काढत बसून आपली आणि पर्यायाने इतरांची दिशाभूल करत बसणं यातच तुम्हाला समाधान मिळतं बहुदा. किंवा आपण काय भारी मुद्दा टाकलाय आता दे उत्तर असं काहीतरी वाटून आनंद मिळत असावा. घ्या तुम्ही तो, माझं काही म्हणणं नाही.

पण अशाच वृत्तीमुळे आज ही गत आहे इतकं नमूद करतो. चीनमधेही अनेक 'डायलेक्ट्स' आहेत. पण कँटोनीज ला त्यांनी प्रमाण मानलेलं आहे. वरील लिंक्स वाचल्या असाल तर हे तुम्हाला कळलं असेल.

उपाय शोधण्याची मनोवृत्ती ठेवली तर उपाय मिळतात. अन्यथा

'बाकी चालू दे'

असंच म्हणून नामानिराळं होता येतंच, कशाही बाबतीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jun 2016 - 1:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

पहिली गोष्ट "ऐड होमिनेम" अर्थात वैयक्तिक हल्ले करू नका , ही विनंती , धागा सार्वजनिक आहे , तुम्हाला विरोधी मते चालणार नसली तर तुम्ही तशी सूचना धाग्यातच टाकायला हवी होती हे नम्रपणे सांगू इच्छितो. दूसरे म्हणजे मराठी भाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम ह्या विषयावर आपण बोलतोय मला वाटते मी बरेचसे विषयाला अनुसरुन बोलतोय, तीसरे म्हणजे "तुम्हा लोकांचा" वगैरे मधे मला ओढु नका मी कोणा व्यक्तीचा स्टीरियोटाइप करत नाही अन माझा केलेला मी खपवूनही घेणार नाही. (ही विनंती आहे धमकी समजू नये स्पष्टीकरण इतक्यासाठी का तुम्ही वाकडाच विचार करत असल्याचे स्पष्ट दिसते आहे)

"बाकी चालू द्या" बद्दल,

ते म्हणणे संयुक्तिक कसे आहे हे तुम्ही दिलेल्या वैयक्तिक शेरेबाजीने परिपूर्ण प्रतिसादातून सहज कळते

असो

आता चालूच द्या!. :)

ताजा कलम - समोरच्याला लागट बोलून मुद्दे सिद्ध होत नसतात त्याला तर्क लागतो अन तो हमरीतुमरी वर येऊन सापडत नसतो. बाकी तुम्ही असलं काहीतरी बोलले म्हणून मी आज एखाद चपाती कमी खाईन अशी तुमची धारणा असल्यास शुभेच्छा

चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात याला.

तुमचा http://www.misalpav.com/comment/847258 हा प्रतिसाद बघा. आक्रस्ताळेपणा, थयथयाट तुम्ही सुरू केलात. सरसकटीकरण तुम्ही केलंत... ज्यांना हे झेपत नाही, संस्कार ज्यांना शाळेच्या बोडक्यावर मारायचेत इत्यादी इत्यादी काय काय.

ठीक आहे?

तुमच्या चिथावण्याने मलाही शष्प फरक पडणार नाही हे ही सांगतो.

काय आता; जाऊ द्या.

शाम भागवत's picture

9 Jun 2016 - 1:57 pm | शाम भागवत

ही लिंक द्यायची आहे का?
http://www.misalpav.com/comment/847258#comment-847258

मुद्दा काय तर ही प्रमाणित मराठी मातृभाषा नाहीच अन त्यामुळे ती सुद्धा बहुसंख्य पाल्यांस इंग्रजी इतकीच जड़ जाते.

जड जात असेल, तरीही इंग्रजीइतकी जड अजिबात जाणार नाही. व्याकरणाचे नियम आणि असंख्य शब्द एकच असतील बोलीतले आणि लेखीतले. इंग्रजीत मात्र व्याकरण पूर्ण वेगळं असेल आणि एकही शब्द ओळखीचा नसेल. त्यामुळे सारखेच जड जातील हे आपण म्हणत असला तरी ते अजिबात पट्ण्यासारखं नाही.

शिक्षणाची भाषा ही बोलण्यातलीच भाषा असावी असं वाटण्यात काहीच गैर नसावं. तर मग आपण आता त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, की जे तसे प्रयत्न करतायत त्यांनाच असं खच्ची करायचं?

तुमची भावना आणि तुम्हाला अपेक्षित असलेले उपाय सुसंगत नाहीत. म्हणजे तुमची इच्छा आहे की शिक्षण बोलीतनं मिळावं. आणि त्यावर उपाय हा की शिक्षण इंग्रजीतनंच घ्यावं?

पुढे आपण आपल्या मते सारखीच कठीण असलेले काही शब्द दिलेले आहेत. कुठली दिव्य माता असे शब्द घरात वापरत असेल असंही आपण विचारलंय. तर जोडीला, आपल्या भागातल्या साध्या साध्या माता आपल्या घरात या कल्पनांना (त्वरक, उत्प्रेरक, संप्रेरक इ.ना) आपल्या बोलीतले कुठले शब्द वापरतात तेही सांगायचंत ना? शिवाय यातनं आपण नक्की काय सांगू इच्छिता? एक तत्त्व म्हणून?

नमकिन's picture

9 Jun 2016 - 9:11 am | नमकिन

दिलेल्या pulse linked in च्या लेखात तसेच UNESCO च्या बहुसंख्य संशोधनात मातृभाषा व इतर शिक्षण माध्यम भाषा याचा परिणाम यावरंच ऊहापोह करण्यात येतोय (मागील जवळपास ५० वर्ष चे वेचक संशोधन माझ्या नजरेत आलेले)• तर यावर जे बोली भाषिक समूह आहेत त्यांनी बोली भाषेला लिखित रूप देण्यासाठी जर कष्ट उपसले तरंच ती भाषा तगेल, जिथे मुळात script नाहीं त्यात शिक्षण (आजच्या जमान्यातले जे सर्वस्वी छापील व प्रसारित करने योग्य) कसे शक्य आहे? हे शिवधनुष्य उचलायला कोन्या युगप्रवर्तक बापू ची वाट पाहण्यापेक्षा अशी शाळा उघडलीत वा लिपी घडवलीत तर पुढच्या पिढीला सार्थ अभिमान व भविष्य राहील अन्यथा संस्कृत -प्राकृत वाद जुन्या काळापासून सर्व जाणतात व त्यातून साधलेली सामाजिक उतरंड आपण पाहतोच/अनुभवतोच आहोत.
उपलब्ध पर्याय कुठवर चालू द्यायचं व किती चालवून घ्यायचं यावरंच तर संघर्ष व अंतिमत: अपेक्षित स्वातंत्र्य निश्चित होते. बाकी पोकळ!

अप्पा जोगळेकर's picture

9 Jun 2016 - 1:34 pm | अप्पा जोगळेकर

सरकारी अभ्यासक्रमात शिकवली जाते ती मराठी 'प्रमाण मराठी मात्रूभाषा' नाहीख्हे ऐकून मौज वाटली.
भारताची राज्यघटना, सरकार, सैन्य, पोलिस, झालंच सरकारी कार्यालये वगैरे गोष्टी तरी प्रमाण मानाव्यात किंवा कसे असा प्रश्न पडला आहे.

अभिनव's picture

9 Jun 2016 - 1:44 pm | अभिनव

:-D

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jun 2016 - 12:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

आप्पा आमचे लैच भारी ! फट म्हणता प्राण कंठाशी आणणाऱ्या अस्सल श्रीवर्धनी रोठ्यासारखे! त्यात आप्पा ह्यांची आमच्यावर खाशी खुन्नस अर्र मर्जी म्हणायचे होते आम्हाला, म्हणून बुआ आमचे आप्पा काहीही बोलताना मधे सैन्य आणतात(च) बघा कायम! नाहीतर बहुदा त्यांना तो तिरके बोलायचा आनंद मिळत नसावा (आवडी एकेकाच्या) तरीही प्रिय आप्पा दरवेळी "कशी शिपुरड्याची जिरावली" मोड़ असू दे तुमचा तुम्हाला लखलाभ तरीही मुद्दा मांडताना आपण काय बोलतोय ह्याचं ज़रा भान ठेवा,

अन हो प्रमाण मराठी ही मातृभाषा नसते(च) ती वेगवेगळ्या भागांतील भाषा ह्यात समन्वय साधायला प्रमाणित केलेली असते, अर्थात ती प्रशासकीय सुविधेस उत्तम असतेच , फ़क्त म्हणून ती शिक्षणमाध्यम म्हणून उत्तम ठरेलच असे नाही , तुमचा मुद्द्यावर बोलायचा विचार असला तर पुढे बोलता येईल नसलीच इच्छा तर ओढ़ा अजुन एकदा सैन्यबिन्य मधे! तसंही लागट बोलायला काही जात नाही टाकायचं बोलून! हाकानाका!!

अप्पा जोगळेकर's picture

13 Jun 2016 - 3:10 pm | अप्पा जोगळेकर

तुम्ही सांगता ते प्रमाण असा आग्रह दिसतो.
जौंद्या. You cannot agree to disagree.
बाकी मुद्दा सोडून केलेली वैयक्तिक टीका दखलपात्र नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jun 2016 - 3:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही शिकवणार अग्री टु डिसग्री? And I thought तुम्ही सवंग विनोद करणे बंद कराल! असो! Lets agree to disagree here ;)

वेल्लाभट's picture

8 Jun 2016 - 1:17 pm | वेल्लाभट

तूर्तास ही कालची बातमी वाचा.

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Marathi-pulls-down-aggreg...

मजल इथवर गेलेली आहे. पुढे मराठी ऐच्छिक करतील, आपण तरीही फ्यूच्चर चा विचार करून जर्मन, फ्रेंच किंवा अजून काही निवडू, मग मराठी कुणी घेत नाही आजकाल म्हणून अभ्यासक्रमातून काढूनही टाकतील कदाचित, आपण तरीही नक्की प्रमाण मराठी ही आपली मातृभाषा का अशा गोष्टींमधे अडकलेले असू, किंवा कदाचित तोवर इंग्रजी इतकं अनिवार्य झालेलं असेल की मातृभाषा वगैरे संकल्पनाच गौण ठरतील...

दहा वर्ष अजून... हे असंच चाललं तर लिहून देतो दहा वर्षात यासारखी परिस्थिती असेल नक्की.

बाकी चालू दे!, नाही का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jun 2016 - 1:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाकी चालूच द्या तुमचं आक्रस्ताळेपण कारण तो तुमचा चॉइस आहे .

पोरे फ़क्त ५ तास शाळेत असतात उर्वरीत वेळ म्हणजे एकोणीस तास आपल्यासोबत असतात. मराठी ऐच्छिकच काय बंद केली तरी मला फरक पडत नाही. चांगली नोकरी मिळवायला माझ्या पोराला फ्रेंच अन जर्मन काय स्वाहिली शिकावी लागली तरी मी शिकवेल. राहता मायमराठीचा प्रश्न तर घरी असलेले १९ तास मी त्याला/तिला मराठी शिकवायला रोजचा एक तास घातला तरी पुरेसा होईल. ठराविक वयात हाती गोट्या सरकवले की भागते ठराविक वयात बोरकरांच्या कविता हाती दिल्या की मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल. ज्यांना वैयक्तिक संस्कार करणे हा भाग सुद्धा शाळेच्या बोडक्यावर घालायचाय त्यांना कोपरा पासुन दंडवत . माझी भाषा माझ्या पोराला शिकवायला मी समर्थ आहे शाळेने त्याला मॉब सेन्स अन कागदं इतकं शिकवले तरी हरकत नाही. अस्मिता घरी शिकवायच्या असतात अन योगक्षेम संबंधी शिक्षण शाळेत शिकायचे असते हा आमचा फंडा सुस्पष्ट आहे

ज्यांना हे झेपत नाही त्यांनी फुकट आक्रस्ताळेपणा करत लोकांवर शाळेवर शिक्षणव्यवस्थेवर ब्रह्मदेवावर ओबामावर वाटेल त्याच्यावर लांछन लावत फिरावे मला घेणे देणे नाही. पालक म्हणून माझ्या जबाबदारी मला कळतात नीट!

मग? चालू दे का बाकी? ;)

वेल्लाभट's picture

8 Jun 2016 - 2:15 pm | वेल्लाभट

मी म्हणणार नाही. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे तो माझा चॉईस आहे.

तुम्हाला फरकच पडत नाही, हा तुमचा चॉईस(?) आहे. चांगली नोकरी हे तुमच्या लेखी शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे, तुमचा चॉईस(?) भारी आहे. संस्कार शाळेच्या बोडक्यावर घालण्याच्या लोकांच्या कल्पना तुम्हाला अंतर्ज्ञानाने कळतात नाही का! हे पण भारी आहे. तसंही पाचच तास ना शाळेत जायचंय; त्यापेक्षा न जाऊनही चालेल, बघा विचार करून. तुम्ही समर्थ पालक आहातच तसंही.

जाता जाता,
बोरकरांच्या कविता हाती दिल्या की....
मी शिकवेल...
मी माझ्या मातृभाषेबद्दल निश्चिन्त असेल...
माझ्या जबाबदारी...
हे शब्दप्रयोग बाकी अतिशय मजेशीर होते.

व्हय का जी?

तुम्हाला त्यांची "मातृभाषा" उर्फ वर्‍हाडी अजिबातच येत नाही, वेल्लाभट. तुम्हाला तुमची संस्कृतप्रचुर पुणेरी मराठीच जर समस्त मराठी लोकांची "मातृभाषा" म्हणून रेटायची आहे काय?

बाकी चालू द्या! ;)

मराठी माध्यम, इयत्ता पहिली,विषय मराठी

पाठ पहिला- आला पाऊस आला
पान २-

"ढोंड, ढोंड पानी दे, साय माय पिकू दे"

हे माझी लेक कोल्हापुरात शिकली. हे संस्कृत शब्द आहेत का? जी कुठली ही भाषा आहे ती तिची मातृभाषा आहे का?

एकदा फाटे फोडायला लागलं की हे असं होतं. वस्तुस्थिती न बघता फक्त समोरच्याचा मुद्दा खोडून काढला असं दाखवणं एवढंच शिल्लक रहातं.

खरंतर पुण्याचे लोकही लिहितानाची भाषा आणि बोलतानाची भाषा यात अंतर ठेवतच असतील. पण एकदा पुणेरी म्हणून हिणवलं की मुद्दा सर झाल्याचं दाखवणं एकदम सोपं जातं.

आनंदी गोपाळ's picture

9 Jun 2016 - 10:55 pm | आनंदी गोपाळ

त्या प्रतिसादातला मुद्दा वेल्लाभट यांनी बापूंच्या बोलीला हिणवून दाखवण्याचा आहे.

"आजकालच्या" मराठी मेडियममधे काय शिकवतात तो नाही.

बाकी चालू द्या ;)

अच्छा? शिक्षणाच्या धाग्यावर 'काय शिकवलं जातं' हा मुद्दा नसून 'कोण काय म्हणतं' हा मुद्दा आहे तर!

बरं झालं आपला प्राधान्यक्रम इतका उघड सांगितलात ते. आधी माझ्या लक्षातच आलं नव्हतं की फाटे फोडायचे हाच उद्देश आहे. मला वाटलेलं की गैरसमजातून विषय वाढतोय तेव्हा त्याच्यामागची सत्य परीस्थिती सांगितली की गैरसमज संपून विषय पुढे सरकेल.

पण ते नकोच असेल तर ... चालेल तितकं चालू द्या...अन काय!

वेल्लाभट's picture

8 Jun 2016 - 2:28 pm | वेल्लाभट

आणिक एक;

ते २४ वजा ५ १९ तास जे तुम्ही घरी शिकवेल, ते इंग्लिशमधे शिकवेल की मराठीमधे शिकवेल? जर इंग्लिशमधे शिकवेल तर त्याला मराठी कसे येएल? आणि मराठीतून शिकवेल तर.... तर मग मराठी शाळेत काय वेगळं असेल?

नमकिन's picture

9 Jun 2016 - 9:45 am | नमकिन

मराठी शाळांना प्रतिसाद नाहीं असे चित्र उभे करुन सरकारी यंत्रणा व व्यापारी वृत्तीचे संचालक /विश्वस्त मंडळाचा अनुदान विलंब, कमी पगार व शिक्षक/कर्मचारी वर्गाचा इतर शिक्षणेतर कामात राबवून घेणे असे विघ्नसंतोषी प्रकार चालू असतात तिथे मराठी भाषा ऐच्छिक करुन पुढे त्यामुळेच गुण कमी होतात असा प्रचार करुन मुलांची इच्छा कमी करायची व पुढे प्रतिसादाअभावी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून "मराठी भाषा" विषय संपवायचे उघड कारस्थान आहे.
शेरा- पालकांनाच नकोय मराठी शाळा, मराठी विषय व मराठी भाषा हे सोदाहरण नियमात बसवणे.

मधुरा देशपांडे's picture

8 Jun 2016 - 1:31 pm | मधुरा देशपांडे

वेगळी मतं असणार्‍यांनी नाही लिहिलं तरी चालेल हे वाचूनही आणि तशीही सध्या मिपावर वामा असूनही काही मुद्दे लिहायचा मोह आवरला नाही. तेही माझी मतं काय हे लिहित नाही, महत्वाचं हे की सतत जर्मनी, जपान वगैरेचे जे दाखले दिले जातात, त्याबद्दल.
मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे. बरं भारतातलं शिक्षण हे पुण्या मुंबईपुरतं गृहित धरून चालणार नाही. कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची. अगदी निषाणी डावा अंगठा सारखी परिस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे असतीलही किंवा तोटेही असतील, याबाबतीत माझं एकच असं काही मत नाही, पण सतत इतर देशांशी तुलना करून ते कसे बरोबर असं होत नाही. अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही. पूर्णपणे इकडचे सगळेच बरोबर असेही नाही, दोन्हीकडे चांगले वाईट मुद्दे आहेत.

मातृभाषेतील शिक्षण असावे की नाही याबद्दलचा कुठलाही प्रतिवाद करायचा नाही. दोन्ही बाजूची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जर्मनीत जन्म घेऊन, जर्मन माध्यमाच्या शाळेत शिकूनही उत्तम मराठी आणि इंग्रजी बोलणारी मुले आहेत तशीच मराठी आणि इंग्रजीही न येणारी देखील आहेत.

आणि मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे. याबाबतीत मागेही एका धाग्यावर लिहिले होते, पण तरीही हे फक्त माझे आणि काही ओळखीच्यांचे अनुभव म्हणून तसंच आहे असे म्हणणार नाही. असो, तो वेगळा मुद्दा आहे.

वेल्लाभट's picture

8 Jun 2016 - 2:25 pm | वेल्लाभट

कित्येक ठिकाणी अनावस्था आहे सगळ्याची

याला पुरावा आहे का? नसेल तर ग्रामीण भागात बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीची चार उदाहरणं मी तुम्हाला देतो. बघून आलोय मी.

अमुक एका देशात जर मातृभाषेत शिक्षण होते तर आम्ही का नको, हा युक्तीवाद त्यामुळे पटत नाही

असा युक्तिवाद नाहीच आहे तो. अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे. आणि काही वर्षापूर्वीपर्यंत होतंच होतं ना मातृभाषेतून शिक्षण? तसंच शिकून आपल्यातले अनेक जण आज इंग्रजी बोलतात ना?

जर्मनीत काय आहे हे तुम्हीच सांगू शकता जास्त योग्य प्रकारे पण जर्मनीत आहे 'म्हणून' आपल्याइथे असं मुळीच म्हणणं नाही, ना इंग्लिशला विरोध आहे.

ज्याला त्याला हेच समजावून दमतोय की इंग्लिश पहिलीपासून शिकवतात! आणि असं असताना एका कणाचीही अडचण येत नाही पुढे जाऊन. पण अख्खं माध्यमच इंग्लिश केलं ना की विचार करण्याची जी भाषा आहे तिचं खोबरं होतं. असो. उपयोग नाहीच आहे हे समजवण्याचा असं दिसतंय.

टाईम विल टेल.

मधुरा देशपांडे's picture

8 Jun 2016 - 2:47 pm | मधुरा देशपांडे

तुम्ही ज्या बदल घडत असलेल्या उदाहरणांबद्दल लिहिलं होतं वेगळ्या धाग्यात, त्या बदलांचं स्वागतही आहे आणि कौतुकही. पण ग्रामीण भागातलीच शिक्षणाची अनावस्था याची देही याची डोळा पाहिली आहे, आणि आता मी त्यातून बाहेर पडले असले तरीही माझी आई शिक्षणक्षेत्रात असल्याने अजूनही संबंध येतो. तुम्ही जो भाषेचा मुद्दा सांगताय त्याबाबतीत मी पूर्ण असा विरोध करत नाही, पण फक्त तेच बरोबर असे नाही. भाषेशिवाय इतर अनेक मुद्दे येतात. माझी आई ज्या ११-१२वीतल्या मुलींना शिकवते, त्यांना इंग्रजीतून शिक्षणाची सक्ती करा असे अजिबात नाही. त्या इंग्रजी सुटलं दहावीत की किती खुश होतात, (गणित सुटलं की सुद्धा) आणि पुढे मराठीतून कशी प्रगती करू शकतात हे माहिती आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे जर इतर अनेक मुद्दे बघता एखाद्याला इंग्रजी बरे पडेल असे वाटले तर तेही चुकीचे नाही. मग अगदी

अनेकांनी त्यावर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत जे सांगतात की हे व्हायला हवं, हे योग्य आहे.

असे कुणी मला सांगितले तरीही मी स्वत: दोन्ही बाबतीत टोकाची मते ठेवू शकत नाही.
आणि जर्मनीचा मुद्दा यासाठी कारण वर लेखातही मारियाताई विर्थ यांचे उदा आहे. आणि इतरही अनेक वेळा याबाबतीत जपान, जर्मनी वगैरे उदा. नेहमी बघितली आहेत. ती खरी असतीलही, पण भाषा हाच एकमेव मुद्दा त्यात येत नाही असे माझे अनुभव.
लेखनसीमा.

मुळात जर्मनी या देशात एकच मुख्य भाषा आहे. बोलीभाषा आहेत, पण त्या वेगळ्या. भारतात तसे नाही. त्यामुळे इतकी सरळसरळ तुलना होऊ शकत नाही.
>> का नाही? प्रत्येक राज्याला प्रचंड अधिकार आहेत. समुद्रकिनारा असलेल्या सगळ्यांना त्यांचे त्यांचे पोर्ट्स आहेत. इतर राज्यांना पण ते वापरता येऊ शकतात. अधिकृत नसला तरी भारत शेवटी अनेक देशांचाच देश आहे. तसे फक्त घटनेत लिहिलेले नाही. राहिले असेल वेळेअभावी. ४७ लाच नाहीका ५०० संस्थाने होती?

दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाची पद्धत. कितव्या वर्षीपासून शिक्षण चालू होते, त्याची एकंदर रचना कशी आहे, शाळेत कशा पद्धतीने शिकवले जाते, त्यात पाठांतरावर भर दिला जातो की समजून घेण्यावर, परीक्षा पद्धती कशा आहेत, शाळेतून बाहेर पडल्यावर कुठे आणि काय संधी उपलब्ध आहेत, उच्च शिक्षणाच्या संधी किती आहेत, शिवाय मग तिथे आरक्षणादि मुद्दे वगैरे अनेक बाबतीत भारतातले शिक्षण आणि जर्मनीतले यात फरक आहे
>> मग हा फरक मिटवण्यासाठी कमी करण्यासाठी भारतीय नागरीक / अधिकारी / नेता या नात्याने मी तुम्ही आपण आपल्या पुर्वजांनी काय काय केले? त्याची यादी मिळेल का?

कदाचित इंग्रजीशी थोडी जरी मैत्री करायची जरा जास्त जर्मन लोकांची तयारी असती, तर इथल्या बर्‍याच कंपन्या आज वेगळ्या उंचीवर राहिल्या असत्या आणि पर्यायाने देशही अजून जास्त पुढे गेला असता असं वाटण्याची वेळ बरेचदा आली आहे.
>> या ज्या जर्मन कंपन्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच क्षेत्रातल्या किती अशा भारतीय कंपन्या तुम्ही सांगु शकता ज्यांचे मालक / सीईओ/ अधिकारी वर्ग भारतातील इंग्रजी माध्यमातुन शिकला, इंग्रजीशी प्रचंड मैत्री केली म्हणून आज त्या जर्मन कंपन्यांचा बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या आहेत? भारतात तर इंग्रजी माध्यमाच उदोउदो कधीपासुन चालू आहे ना? मग आत्तापर्यंत तुमच्य लॉजीकने अशा डझनभर तरी भारतीय कंपन्या पाहीजे होत्या ना ज्या निव्वळ इंग्रजीशी मैत्री या मुद्द्यामुळे त्यांच्या जर्मन कांउटरपार्टपेक्षा मोठ्या / उजव्या आहेत? नोकरी मिळवणे या व्यतिरिक्त काय फायदा करुन घेतला भारतीयांनी इंग्रजीचा? मागच्या पिढीपिर्यंततर यातले बहुतांश त्यांच्या त्यांच्य मातृभाषेतुनच शिकलेले होते.

थोडक्यात निव्वळ इंग्रजीमुळे असे जर्मनांचे किती व काय नुकसान झाले जे भारतीयांचे झाले नाही? नोक-य मिळवणे हे नका सांगू. ते तर जर्मन्स पण मिळवतात.

नमकिन's picture

9 Jun 2016 - 9:49 am | नमकिन

अभिनव प्रतिवाद

पैसा's picture

8 Jun 2016 - 1:36 pm | पैसा

उत्तम लेख आणि चर्चा

वरील चर्चेत सोन्याबापु यांनी मांडलेला बोली भाषे संदर्भातील मुद्दा मराठीतच शिक्षण हवे ची तार्कीक परीणीती आहे. अत्यंत वेगळा व जबरदस्त मुद्दा तर्कयुक्त रीतीने मांडलेला आहे जो विचारणीय आहे.
असंका यांनी इंग्रजीपेक्षा मराठी च बोलीभाषेशी अंतर जे दाखवल आहे तो मुद्दाही जबरदस्त तर्कयुक्त आहे.
चर्चेतील प्रतिसाद प्रगल्भ आहेत मजा येत आहे वाचायला
धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.

धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते

बर दिला.

असंका's picture

9 Jun 2016 - 1:16 pm | असंका

अवांतरः
अरेच्या!
धन्यवाद !!

खरं तर तुमचाच एक प्रतिसाद माझ्या वरच्या प्रतिसादाच्या मुळाशी होता. यनावाला की राजेश घासकडवी यांच्या धाग्यावरचा. "ब्रिटीश राज नक्की कधी सुरु झालं?...तो पहिला ब्रिटिश नागरीक महत्वाचा!" असं काहीतरी होतं.

धागालेखकांनी थोडा मतभेदांना वाव दिला तर बरे होइल असे वाटते.

हे आयडियल झालं. लेखक विषयाशी अत्यंत समरस होउन लिहित असल्याने त्यांची प्रतिक्रिया तशी साहजिक वाटली.

मुळ विषयाबद्दल आपण काहीच मत दिलेलं नाही याचं मात्र आश्चर्य वाटलं.

शान्तिप्रिय's picture

9 Jun 2016 - 11:20 am | शान्तिप्रिय

माझेही शिक्षण मराठी भाषेत झाले. पण त्यामुळेच मी चांगले इंग्रजीहि बोलु शकतो.
परंतु माझ्या मुलीला मी इंग्रजी माध्यमात घातले आहे.
पण तिला मराठीची आवड निर्माण करायचा माझा प्रयत्न असतो. आणि माझे सुदैव म्हणजे आवड हळूहळू निर्माण होत
आहे. सध्या ती म्रुत्युंजय हे पुस्तक वाचत आहे ( हळुहळु). त्यातील काहि शब्द कळाले नाहित तर मी समजावुन सांगतो.

मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.

आपणास लेखाचा मुद्दा कळलेला आहे का?

मुलांना मराठी येणं न येणं हा मुद्दा नाहीये.

मुलांना सर्वोत्तम माध्यमातनं शिक्षण मिळावं - जे मातृभाषा हेच असू शकते, हा मुद्दा आहे. मराठी ही इथे बहुतेकांची मातृभाषा आहे त्यामुळे सरळ "मराठी" माध्यम म्हणून लोक पुढे जात आहेत.

नमकिन's picture

10 Jun 2016 - 8:56 am | नमकिन

मुलांना इंग्रजी वा इतर भाषा येणं न येणं हा ही मुद्दा नाहीं तर मातृभाषा (भले ती कुठलिही असो) शिक्षण माध्यम असावी हाच आहे.
मुद्दा धरुन ठेवायला माझा हातभार!

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2016 - 3:30 pm | श्रीगुरुजी

मराठी हा विषय सर्व शाळात १ ली पासुन (सि बि एस ई, आय सी एस ई, इंटर्नेशनल स्कूल) सक्तीचा करावा या मताचा आहे. इंग्रजीही १ली पासुन शिकवावे.

+१

खरं तर महाराष्ट्राने अंमलात आणलेलं त्रिभाषा सूत्र ही मुख्य समस्या आहे. महाराष्ट्रात लहानपणापासून हिंदी सक्तीची असल्याने इतरभाषिक महाराष्ट्रात हिंदीतच बोलतात कारण महाराष्ट्रीयन हिंदी बोलू शकतात. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे त्या राज्याची भाषा शिकणे सक्तीचे नाही व इतरभाषिक स्थानिक भाषा अजिबात न शिकता आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात आरामात घालवू शकतात (अमिताभ बच्चन, गुलजार, सलीम , जावेद, शाहरूख, दिलीपकुमार इ. मंडळींनी आपले सर्व आयुष्य महाराष्ट्रात घालविले पण आजतगायत मराठी शिकले नाहीत.).

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jun 2016 - 5:48 pm | llपुण्याचे पेशवेll

महाराष्ट्रात पहिलीपासून मराठी व इंग्लिश भाषा सक्तीची असावी व हिंदी ऑप्शनल असावी.
तसंही आमची पिढी हिंदी सिनेमे पाहूनच हिंदी भाषा शिकली आहे. हिंदी ८ नंतर संस्कृताला ऑप्शन म्हणून असली तरी चालेल. मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी.

चंपाबाई's picture

27 Jun 2016 - 11:13 pm | चंपाबाई

हिंदी ऑप्शनल आहे... हिंदी , हिं + सं , पूर्ण संस्कृत असे पर्याय असतात.

बायदिवे , लोकाना संस्कृत ही परकी वाटत नाही , पण हिंदी परकी वाटते हे पाहून नेत्रे जलं आगम्यति !

+१ मु़ळात ज्या प्रांतात आपण राहतो तिथली भाषा उत्तम बोलता यावी ही आनंदाची गोष्ट आहे असंच वाटत नाही या लोकांना. दुसरी भाषा चांगली बोलता यावी अशी आस असणं हे किती आनंददायी असु शकतं हे परप्रांतियांना कळत नाही हे फार दुर्दैवी आहे.

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 9:51 pm | रमेश भिडे

हे जुनं नाटक नवीन संचात परत आलंय का???

नमकिन's picture

9 Jun 2016 - 10:34 pm | नमकिन

खेळ व्हायचा तुझा जायचा जीव चिमुकल्यांचा!
नेमेचि येतो पावसाळा व शालेय प्रवेश.

कापूसकोन्ड्या's picture

10 Jun 2016 - 9:40 am | कापूसकोन्ड्या

कुट
कुट
काथ्या
कुट

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Jun 2016 - 10:10 am | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम विषय व चांगली चर्चा.
मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात?
एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India)
येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.

वेल्लाभट's picture

10 Jun 2016 - 10:28 am | वेल्लाभट

मातृभाषेतून शिक्षण केव्हाही चांगले पण तीच मातृभाषा कायम वापर्ली जाते का शि़क्षणात?
हा प्रश्न आहे, आरोप आहे, तक्रार आहे की पळवाट आहे?

एम.ए. मराठी झालेला तरूण महाराष्ट्राबाहेर्,देशाबाहेर करीयर करू शकेल का?वर चीन्,जर्मनीची उदाहरणे दिली आहेत पण त्या
देशात बालवाडीपासुन ते पी.एच.डी.पर्यंत मातृभाषाच वापरली जाते ना ?इंग्रजीकडे दुर्लक्ष करणारे तरूण मुलाखतीत 'त त प प' करतात व हुशारी असूनही नोकरी मिळू शकत नाही.
नक्कीच करू शकेल कारण त्याचा विचार भक्कम तयार झालेला असेल. तो कुठलीही भाषा सहज शिकू शकेल, इतरांपेक्षा लवकर. याचीही उदाहरणं असंख्य आहेत. ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी. इंग्लिश यायलाच हवं, आधीपासून म्हणतोय, आणि तेही उत्तम यायला हवं. स्वतःची स्तुती नाही पण अमेरिकेतल्या परिक्षेसाठी प्रश्न सेट करताना, किंवा ऑफिसात लोक (इंग्लिशमधूनच शिकलेले) जेंव्हा मला मेल ड्राफ्ट करून दे सांगत येतात तेंव्हा ते करताना, कंपनीच्या अ‍ॅन्युल पब्लिकेशन मधे टॉपिक्स लिहिताना, इंग्लिश पुस्तकाच्या मॅनुस्क्रिप्टचं प्रूफरिडिंग करताना... मला काडीचीही अडचण जाणवली नाही. इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं. पण विचार मराठीतूनच करतो आणि त्याचा अभिमान आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Foreign_Secretary_(India)
येथे बहुतांशी लोक इंग्रजी माध्यमात शिकलेले कसे? त्यातही बहुतांशी एम.ए.इंग्रजी! मातृभाषेत शि़क्षण घेऊन परिस्थिती बदलेल का ? असा ह्यांचा प्रश्न.
पास. ते ह्यांनाच विचारा तुमच्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Jun 2016 - 12:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

इंग्रजीची आवड लहानपणापासून लावली गेली, आणि प्रोत्साहन दिलं गेलं
हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक घरात ते कसे होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

ते त त प प वाले इंग्लिशवर मेहनत घेत नसावेत पुरेशी

म्हणजे अगदी सुरूवातीपासूनच तशी मेहनत घ्यायला हवी.पण त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.
मी म्हणते, मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे?अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?

वेल्लाभट's picture

10 Jun 2016 - 12:52 pm | वेल्लाभट

मुलास इंग्रजी माध्यमात घालून मराठीवर घर मेहनत घ्यायला काय अडचण आहे

अरे यार! मी म्हणतो हा उलटा अट्टाहास का? आपलं सोडून दुसर्‍याचं नेसायची धडपड का?

त्याच वेळेत इंग्रजी माध्यमाचा एखादा मुलगा तासभर फूट्बॉल खेळेल व घरी आई वडिलांबरोबर बसून इंडिया-टुडे वाचण्याचा प्रयत्न करणार्या मुलाला नैराश्य आणेल.असो.

हो आणि त्याचप्रकारे मराठी माध्यमाचा मुलगा उद्या मराठी साहित्य, दर्जेदार कलाकृतीही तितक्याच आनंदाने बघेल आणि इंग्रजी माध्यमाचा मुलगा 'त्यात खूप हाय फाय मराठी असतं' म्हणून त्याला मुकेल. जवळचे मित्र आहेत हे वाक्य म्हणणारे. कीव येते.

अमेरिकेत राहणारे भारतिय वंशाचे लोक असेच प्रयत्न करतात ना?त्यांच्या मुलांना विचार करताना काही अडचण येते का?

ते अमेरिकेत राहतात, तो प्रश्नच वेगळा आहे. इथल्यांबद्दल बोला. आणि विचार करताना अडचण येतेच्च.

असेल ते इटवा अन् नसेल ते पाठवा हा प्रकार आहे शाळेत वेगळी भाषा अन् घरी वेगळी शिकवणी, मूल बिचारे सगळीकडे शिकण्यातंच.
इक पल तो जीने दो!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jun 2016 - 5:52 pm | llपुण्याचे पेशवेll

वेल्ला तुझाशी अनेक वेळा सहमत आहे. मराठी वाचकच दर्जेदार न राहील्यामुळे उरले सुरलेले लेखकू भाव खाऊन जातात. मराठी मधे उत्कृष्ठ लेखन करणारे आता फारसे शिल्लक नाहीत. सुदैवाने जे आहेत ते जुन्या पिढीतलेच आहेत. मराठी माणूस इंग्रजी चांगला शिकला अभ्यास करून, सराव करून तर शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने काही फार बिघडणार नाही.

संदीप डांगे's picture

11 Jun 2016 - 3:15 pm | संदीप डांगे

नेहमीचाच विषय आणि सर्वांचे नेहमीचेच गैरसमज.

ह्यावर मागे बराच वादंग होऊनही 'मातृभाषेतून शिक्षण' ह्याचा अजूनही भलताच अर्थ लावत काही लोक गोंधळ घालत आहेत हे बघून आश्चर्य वाटले.

१. युनेस्कोच्या मते प्राथमिक शाळा म्हणजे अगदी बालवाडी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण.
२. हे शिक्षण मुलांना अनोळखी भाषेतून देणे चुकीचे. कारण ह्याचे विषय हे अगदी जवळचे, आजूबाजूचे, परिसरातले असतात. मुलांना त्यांच्या नेहमीच्या (मातृभाषा हा शब्द शब्दशः घ्यायची गरज नाही) भाषेतून माहिती लवकर समजू शकते. अनोळखी भाषेमधे आधी भाषेवर मेहनत घ्यावी लागते, नंतर माहितीवर दुसरी.
३. इंग्रजीतून उच्च शिक्षण ह्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. जागतिक स्तरावर राहण्यासाठी बारावीनंतरचे काही शाखांचे शिक्षण इंग्रजीतून असले तरी हरकत नसावी.

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे. 'मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण' व 'उच्चशिक्षणाची भाषा' हे दोन वेगवेगळे मुद्दे व विषय आहेत हे कृपया आतातरी ध्यानात घ्या.

नमकिन's picture

11 Jun 2016 - 4:19 pm | नमकिन

कुणाच्यातरी आयुष्यातला व आयुष्याची दिशा ठरवणारा प्रश्न.

जालावर मनोहर राईलकरांचे अनेक लेख मराठीत ( "अमृतमंथन" अनुदिनीवर ) फार पूर्वी पासून हीच भूमिका आग्रहाने मांडत आहेत.

बाल संगोपन विषयावर विविध पुस्तकातही हेच म्हटलंय की मातृभाषा शिक्षण माध्यम उत्तम.
बहुधा व्यवहार भावनेवर मात करतोय हेच खरं

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jun 2016 - 5:58 pm | llपुण्याचे पेशवेll

काथ्याकुट करणारी मंडळी 'उच्चशिक्षण मातृभाषेतून उपयोगाचे नाही' ह्याच मुद्द्यावर विनाकारण अडून बसलेले असतात हे नेहमीच बघितले आहे.
हज्जारदा सहमत. आताच आमच्या ओळखीती एका मध्यप्रदेशस्थ मुलीने एम एस सी कॉम्य्पुटर सायन्स केले. तिची क्रमीक पुस्तके हिंदीतून होती. जिथे तांत्रिक शब्द येई तेव्हढा फक्त ईंग्रजीत होता. जसे "Menu में जाकर, आप सारे System Options देख सकते है". "Java एक Object Oriented programming languag है".
ती आता तिच्या कंपनीत इतरांबरोबर राहून इंग्रजी पण चांगली बोलते.
मागे कोणत्या तरी चर्चेत बंगालात १८७० साली मेडीकल चे शिक्षण देखील बंगाली भाषेत देत असत हे वाचले आहे. आणि त्यात इंग्रजी आणि बंगाली २न्ही माध्यमातून मेडीकल शिक्षण घेणार्‍यांची संख्या सारखी होती उलट बंगाली भाषेत शिक्षण घेणारे अंबळ जास्त होते हे ही वाचल्याचे स्मरते.

नमकिन's picture

27 Jun 2016 - 6:31 pm | नमकिन

प्रतिसाद मीच "पुरवला" होता

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2016 - 11:10 pm | टवाळ कार्टा

मला स्वतःला सेमि इंग्लिश हा प्रकार चांगला वाटतो....पण त्यातुन शिकलेल्या मुलांची जीआरीची वर्ड लिस्ट करताना हालत बघितली आहे

सेमी इंग्लिशचे वर्ग चुकीच्या पद्धतीने भरवले जातात. त्याचे २ निकष पूर्ण व्हावे लागतात.

१. इंग्रजी माध्यमात शिकून किमान डीएड झालेला शिक्षक त्या शाळेत हवा
२. पुस्तके सेमीची असावीत. सध्या सेमीची पुस्तके बाजारात नाहीत. ती इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत. सेमीची पुस्तके आर्धी मराठी आणि आर्धी इंग्रजी असावीत..पण हे दोन्ही निकष शासनातर्फे पूर्ण केले जात नाहीत.

मग सेमी अवघड जाते अशी पण अगदी हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांकडून ओरड ऐकायला मिळते.

त्यापेक्षा युनेस्कोच्या संशोधनाप्रमाणे जितके दूरपर्यंत शिकता येईल तितके मातृभाषेतूनच शिका.

ऋषिकेश's picture

13 Jun 2016 - 4:18 pm | ऋषिकेश

छान लेख आहे.
आम्ही आधीच मुलीला मराठी माध्यमांत घातले आहे. पण इतर कुंपणावरल्या लोकांसाठी उपयुक्त ठरावा.

सुचिकांत's picture

13 Jun 2016 - 4:50 pm | सुचिकांत

@वेल्लाभट - लेख अभ्यासपूर्णच आहे. आम्ही याच विषयावर काम करत आहोत. असे सर्व संदर्भ एकत्रित करून आम्ही एक पीपीटी, सद्य मराठी शाळांची स्थिती, युनेस्कोचा मराठीतून अहवाल अशा अनेक गोष्टी एकाच इमेल मध्ये देत आहोत. एकदा डोळ्याखालून घालायचे असल्यास, Majhishala.Majhibhasha@gmail.com ला मेल करा. नाहीतर तुमचा मेल आयडी द्या. इतरांना पण हीच विनंती.

असंका's picture

13 Jun 2016 - 5:48 pm | असंका

मेल पाठवला आहे..

सुचिकांत's picture

13 Jun 2016 - 8:45 pm | सुचिकांत

मेलला प्रतिसाद दिला आहे ..

नमकिन's picture

13 Jun 2016 - 9:39 pm | नमकिन

मी पण

पिलीयन रायडर's picture

13 Jun 2016 - 10:35 pm | पिलीयन रायडर

माझा मुलगा एकाच भाषेतुन काही शिकत नाही हे माझ्या लक्षात आलंय. सध्या तरी त्याला शाळाच नसल्याने आम्ही मनाला येईल ते प्रयोग करु शकतो. तो आमच्याशी बोलतो.. इथे अमेरिकेत आता त्याला सतत इंग्रजीत बोलणारे लोक भेटत आहेत, त्याच्याशी बोलत आहेत. आम्ही मध्ये पडत नाही, तो त्याचा प्रयत्न करुन बोलतो. हिंदी लोकांशी हिंदीत. मराठी लोकांशी मराठीत. प्रत्येक वेळेस त्या त्या भाषेतले शब्द बरोबर वापर्तो. ह्याचा अर्थ मुलं डोक्यात बरोबर ठेवत असतात. ज्ञान महत्वाचं ना. भाषा दुय्यम वाटते मला तरी. पण माझी मतं बदलत असतात. एक वर्ष इंटरनॅशनल शाळेत घालवुन लक्षात आलंय की कल्पना कितीही भारी असली तरी ती राबवणं जास्त महत्वाचं असतं. अत्यंत दर्जा शिक्षणपद्धत असुनही काही फायदा नसतो जर शिक्षक उत्तम नसतील. शिक्षक चांगले असतील तर भाषा दुय्यम असते. हे सध्याचं मत आहे. एक वर्षानी पाहु. आल्यावर मराठी एस.एस.सी मध्ये घालायचा विचार आहे.

सुचिकांत's picture

14 Jun 2016 - 10:42 am | सुचिकांत

मी तुमची याअगोदरचीपण मते वाचली आहेत. तुम्ही मराठी एसएससीचा विचार करताय ही गोष्ट अभिनंदनीय आहे. तुमची टोकाची विचारसरणी नाही.. तुम्हाला मराठी माध्यमाचे फायदे पाठवायची इच्छा आहे. यावर जाणून घ्यायचे असल्यास मेल करा आणि अभिप्राय द्या - Majhishala.Majhibhasha@gmail.com

मुक्त विहारि's picture

14 Jun 2016 - 11:54 am | मुक्त विहारि

आणि तितकीच उत्तम चर्चा.

Nitin Palkar's picture

25 Jun 2016 - 9:31 pm | Nitin Palkar

माझ्या मुलाचा जन्म ऑक्टोबर १९८५ मधला.तो मराठी माध्यमातून शिकला. तो पाचवीत असताना त्याच्या शाळेतील एका शिक्षक पालक सभेत 'गणित व शास्त्र हे विषय मुलांना इंग्रजीतून शिकवावेत का' या विषयावर चर्चा होती. बहुसंख्य पालकांचे मत सदर विषय इंग्रजी भाषेतून शिकवावे असे होते. काही जणांनी असे प्रतिपादन केले की, गणित व शास्त्र विषय आतापासून इंग्रजीतून शिकवल्याने मुलांना उच्च माध्यमिक व पुढील शिक्षणात त्याचा फायदा होईल कारण उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. माझे स्वतःचे मत मात्र याच्या विरुद्ध होते. मी माझ्या मुलाला दहावी पर्यंत संपूर्ण मराठी तुकडीत ठेवले. २००० साली तो एस.एस.सी. व २००२मध्ये एच.एस.सी. झाला. त्याला अनुक्रमे ८४% व ८६% गुण मिळाले. त्यानंतर त्याने भौतिक शास्त्रात पदवी व पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी. फिजिक्स) मिळवली. या सर्व शिक्षणात त्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठीतून (मातृभाषेतून) घेतल्याने कोणतीही अडचण आली नाही.
आणखी एक माहिती येथे देणे अनाठायी ठरणार नाही असे वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करताना, काही काळ त्याने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांना (एक्झीक्युटिव्ह्जना) इंग्रजीचे शिक्षण देण्याचे कामही केले.
मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे मध्यम मातृभाषाच असावी असे माझे ठाम मत आहे.

वेल्लाभट's picture

27 Jun 2016 - 10:48 am | वेल्लाभट

तुमचं अभिनंदन व कौतुक. योग्य निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिल्याबद्दल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Jun 2016 - 12:39 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माझे मत थोडे वेगळे आहे ,मुळात इंग्रजी भाषा ही आपल्यापेक्षा प्रगत मेंदू असलेल्या युरोपियन अर्थात ब्रिटीशांची भाषा आहे .एखादा भारतीय विद्यार्थी जर कमी IQ चा असेल तर त्याला पहील्या यत्तेपासुन जरी इंग्रजि माध्यमात ठेवले तरी त्याला इंग्रजीचे पुर्ण ज्ञान घेता येणार नाही कारण मुळातच ही भाषा शिकायला अक्कल लागते.जर एखादा भारतीय विद्यार्थी जात्याच हुशार असेल तर तो कोणत्याहि माध्यमात शिकला तरी त्याला इंग्रजी सहज आत्मसात करता येईल.माझ्या बरोबर मराठि माध्यमात शिकलेले अनेकजण केवळ बुद्धीमत्तेमुळे इंग्रजी आत्मसात करु शकले व आज ते परदेशात डॉलरमध्ये खेळत आहेत व माझ्यासारखे बेताची अक्कल असलेले आजही इंग्रजीत बोलताना चाचपडतात
तात्पर्य काय ,अक्कल असेल तर मराठी माध्यमात शिकुनसुद्धा इंग्रजिवर प्रभुत्व मिळवता येते ,जगभरातल्या संधी दाराशी येतात व आमच्या सारखे सुमार बुद्धिमत्तेचे लोक तंबाखु मळत पाट्या टाकत बसतात.
( आपला पाल्य हुशार असेल तर बिनधास्त मराठी माध्यमात घालावा)

असंका's picture

28 Jun 2016 - 9:31 am | असंका

_/\_

अत्यंत बेजबाबदार विधान करताय!

@'टर्बोचार्जड फिलॉसॉफर' - शहरातल्या मोठ्या इस्पितळामध्ये दरवर्षी शाळा सुरु व्हायच्या वेळी, आयक्यू तपासणी कार्यक्रमासाठी पालक येतात, आणि डॉक्टर सांगतात आयक्यू चांगलाच आहे, तुम्ही तुमच्या मुलांना मातृभाषेतून शिकवा. इंग्रजी शिकायला काय आयक्यू लागतो? काहीही !!! गोव्यात गेला तर, फेरीवाला पण चांगलं इंग्रजी बोलू शकतो!
बुद्धीमत्तेचे विविध प्रकार आहेत. भाषिक बुद्धिमत्ता त्यापैकी एक. एखाद्या उत्कृष्ट mechanical engineer चे इंग्रजी जर कच्चे असेल तर त्याचा आयक्यू कमी आहे म्हणता येईल का? यावर विचार करा. मुलांचा कल कोणत्या दिशेला आहे, हे जर ठरवायचे असेल तर पहिल्या पासून मातृभाषेतून शिक्षण कधीही चांगलेच आहे.

टवाळ कार्टा's picture

29 Jun 2016 - 7:52 pm | टवाळ कार्टा

खिक्क...गिर्जाचा सल्ला जास्तच मनावर घेतलात काय? =))

'अनावस्था' हा शब्द या चर्चेत वाचण्यात आला. 'दुरवस्था' + 'अनास्था' या दोहोंपैकी काय अपेक्षित आहे काही कळले नाही! ;-)

चंपाबाई's picture

30 Jun 2016 - 7:43 am | चंपाबाई

हायब्रीड

नमकिन's picture

1 Jul 2016 - 8:20 am | नमकिन

चपखल.
अनवस्था प्रसंगंच म्हणायचा हा.
बाकी अनावस्था= अनावश्यक आस्था होईल का?