मानवांस खूळ लागले धावायचे
जाणतील ते कधी, कुठे थांबायचे?
घाबरून राहिले सदा काठावरी
सांगतात आज ते, कसे पोहायचे!
'माज' जो समाज मिरवतो आभूषणे
नम्र राहुनी तिथे कसे चालायचे?
गोंधळात यारहो , तलत मी ऐकतो
शान्तिदूत रोज रोज का शोधायचे?
कोणत्या युगात ते मला नेतील रे?
'काम फ़क्त आपले खुळ्या चालायचे'
टांगतील? जाळतील? भोसकतील का?
ठरवतील आज ते, कसे मारायचे
कोण तू? विचारतो कुणाला प्रश्न तू?
तो म्हणेल 'नाच!' आणि तू नाचायचे
शायरास त्या म्हणे मिळाली सूचना
शेर आपले लिहायचे, फाडायचे
काल बोलला कुणीतरी 'स्वामी' पुन्हा
जंगलातले नियम इथे लावायचे
- स्वामी संकेतानंद
प्रतिक्रिया
2 Jun 2016 - 10:02 am | चाणक्य
झकास.
2 Jun 2016 - 11:13 am | यशोधरा
2 Jun 2016 - 4:25 pm | अनिरुद्ध प्रभू
विशेष आवडले
4 Jun 2016 - 10:06 pm | कानडाऊ योगेशु
घाबरून राहिले सदा काठावरी
सांगतात आज ते, कसे पोहायचे!
आणि
टांगतील? जाळतील? भोसकतील का?
ठरवतील आज ते, कसे मारायचे
हे दोन शेर विशेष आवडले.
4 Jun 2016 - 11:32 pm | अविनाशकुलकर्णी
छान..लाइकलेी गझल
5 Jun 2016 - 9:31 pm | पैसा
नेहमीप्रमाणे मस्त लिहिलीस!