माझे सत्तुचे प्रयोग (छायाचित्र दिलेली नाहीत)

सुंड्या's picture
सुंड्या in पाककृती
27 May 2016 - 11:35 pm
तसा सत्तु हा प्रकार महाराष्ट्रीय लोकांसाठी अपरिचित नाही परन्तु सत्तुचा अथवा त्यापासुन बनविलेल्या खाद्य पदार्थांची रेलचेल 'आपल्याकडे' कमीच (असं माझं मत आहे! जाणकारांनी सुधारणा करण्यास मदत करावी हा आग्रह). गेल्या काही वर्षापासून उत्तर-प्रदेश, बिहार मधील मंडळींच्या संपर्कामुळे सत्तुचे काही खाद्यपदार्थ खाण्यात आले व आवडले सुद्धा आणि ते स्वतःच्या स्वयंपाकघरात व्यवस्थितपणे बनवु शकलो, अश्याप्रकारे आमच्या स्वयंपाक-घरात सत्तूची रेलचेल सुरु झाली. आता ही रेलचेल ‘आपल्या’ स्वयंपाक-घरात पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न म्हणून हा माझा पहिलाच लेख. माहिती : तसे सत्तू चे अनेक प्रकार आहेत (तांदूळ सत्तू, जव-गहू-चना, वाटाणा सत्तू इ.) परंतु या लेखात सत्तू हा शब्द “चना सत्तू=फक्त फुटाण्याचे पीठ” म्हणून वापरला आहे. ऊ.प्र./बिहार मध्ये सत्तुला “गरीबांचा बूस्ट” म्हणतात, या वरुनच सत्तूची महत्ता आपल्याला कळू शकते. सत्तू पचायला हलका, गास्त्रिक मध्ये लाभकारक, उन्हाळ्यात लाभदायक थंड-पेय म्हणून आणि वर्षभर साठवण्याजोगा व अक्षरशः कोणत्याही वेळी, खाण्याच्या कोणत्याही कारणासाठी तयार instant फूड म्हणून वापरल्या जाऊ शकणारा हा बाहुगुणी खाद्यपदार्थ. पाककृती: १. सत्तुचे पराठे. (२-३ पराठे मध्यम आकाराचे करिता) जीन्नस: सत्तुचे पीठ - २५० gm अंदाजे, गव्हाचे पीठ - २ पराठ्यांसाठी ४ पोळ्या झाल्या पाहिजेत या अंदाजाने, तेल/तूप - ५-६ टेबलस्पून=टेच., कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक२ कापलेला, मिरची - २-३ हिरव्या बारीक२ चिरलेल्या किंवा १ चहाचा चमचा(चच) तिखट पूड, मीठ - १/२ चच, ओवा -१ चच थोडा कुटलेला, कोथिंबीर अथवा धने पूड - बारीक२ कापलेली किंवा १ चच, जिरेपूड - १ चच, कृती: १. सर्वप्रथम पोळ्यांसाठी पीठ मळून घ्या, १ चमचा तेल घालून तीम्बून झाकून ठेवा (यामुळे कणिक मऊसर होते.) २. सारणासाठी एका वेगळ्या कोपरांत सत्तू, कांदा, मिर्ची, मीठ ओवा, कोथिंबीर, जिरेपूड, २ टेच तेल/तूप- हे साहीत्य कोरडेच मळून घ्या (गरज वाटल्यास थोडे पाणी टाकू शकता परंतु सारण कोरडेसेचं राहिले पाहिजे.) ३. आता दोन पोळ्यांना लागेल इतक्या कणकेची वाटी बनवून त्यामध्ये २-३ टेच सारण भरा आणि व्यवस्थितपणे कणिक वाटी बंद करा. जेणेकरून सारण भरलेला कणकेचा ‘चेंडू’ दिसायला हवा. (येथे सौ. चे कौशल्य कामी येते.) ४. या चेंडूला पोळपाटावर पुरणाच्या-पोळी प्रमाणे लाटावे. (येथे सौ.चे हात शल्यचिकित्सकाप्रमाणे काम करतात.) ५. तव्यावर तेल/तूप टाकून पराठा बनवावा. हे पराठे गोड दही-आंबे लोणच्या सोबत एकदम चविष्ट लागतात. (१. गव्हाच्या पीठ ऐवजी मैदा वापरून पराठा न बनविता “चेन्डू”ला तळून कचोरी सुद्धा बनवू शकता, २.सारण उरल्यास चमच्याने गट्टम करावे.) २. सत्तुचे शरबत:प्रकार १. (१ ग्लास करिता) जीन्नस: सत्तू - २-३ टेच मीठ - १/४ चच निंबू - मध्याम आकारचा १/२, काळे मीठ - अंदाजे १/४ चच, कोथिंबीर - बारीक-मध्यम कापलेली, जिरेपूड - १/२ चच, पुदिना - कुटलेली २-३ मध्यम आकाराची पाने (नाही टाकले तरी चालेल.), काळे मिरे पूड अथवा चाटमसाला - चिमूटभर (ना.टा.त.चा.), अद्रकचा रस - १/४ चच (ना.टा.त.चा.), थंड पाणी - अर्धा ग्लास. कृती: अर्ध्या ग्लास सत्तू मध्ये दिलेला सगळा जिन्नस टाका मिश्रित करा आणि त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून चमचाने व्यवस्थित ढवळून घ्या (#-सत्तुच्या गुठळ्या नको राहायला) आणि पिऊन टाका. सत्तुचे शरबत: प्रकार २. जीन्नस: सत्तू - २-३ टेच हिरवी मिरची- १-२ बरिक२ कापलेली (मध्यम तिखट) मीठ - चवीपुरते पाणी - १/२ ग्लास कांदा - १/४ बारीक२ कापलेला (ना.टा.त.चा.) काळे मीठ/आमचूर पूड- चिमूटभर (ना.टा.त.चा.) कृती: सगळा जिन्नस एका ग्लासमधे एकत्र करून पाणी घालून ढवळून (#) “घ्या”. (पाककृतींचे फोटो न डिकवण्याबद्दल दिलगीर आहे.) -----------------------

प्रतिक्रिया

टेच आणि चच ला आम्हांला कितीवेळा ठेच लागली काय सांगावे. सातू ऊर्फ सत्तूचे पीठ एकदा पाहिले पाहिजे आणून. बरेच ऐकले आहे.

फोटू द्या की हो. बरेच ऐकले होते सत्तू पराठ्याबद्दल. हा पराठा कोरडा होऊन तोठरा बसत नाही का? की दह्याबरोबर निभावून न्यायचे असते?

सारणामध्ये पाणी नाही टाकले तर पराठा आतमध्ये कोरडाच राहतो तेव्हा दह्या सोबत निभावून न्यावे लागेल पण पाणी टाकले तर सत्तूची चव कमी होते हा माझा अनुभव.

रेवती's picture

28 May 2016 - 12:44 am | रेवती

ओक्के. वाटलेच.

प्रणवजोशी's picture

28 May 2016 - 4:55 pm | प्रणवजोशी

सत्तुचे पिठ+दुध+साखर म्हणजे माझ्यासाठी जन्नत आहे.;-)
परफेक्ट नाश्ता

सुंड्या's picture

28 May 2016 - 11:16 pm | सुंड्या

प्रणव दादा व सगळ्या'मराठी' प्रेमींना एक विनम्र आग्रह 'नाश्ता' या शब्दा एैवजी 'न्याहारी' हा शब्द वापरावा.

नूतन सावंत's picture

3 Jun 2016 - 9:49 am | नूतन सावंत

पराठा करून पाहण्यात येईल.पिठल्याच्या पराठ्यासारखी चव लागत असावी.

सुंड्या's picture

3 Jun 2016 - 8:11 pm | सुंड्या

कधी खाल्ला नाही(असं वाटतं)...पण चवेंद्रियचा अनुभवातून 'हो' म्हणण्यास हरकत नाही कारण एकदा सौ.ने सत्तूचे ओम्लेट बनविण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा 'ते ओम्लेट' पिठ्ल्याच्या चवीच्या आसपास होतं...